योग ध्यानासाठी सायकलिंग ५: चौथा दिवस- वाई- महाबळेश्वर- वाई

मार्गी's picture
मार्गी in भटकंती
24 Oct 2017 - 11:24 pm

योग ध्यानासाठी सायकलिंग १: अपयशातून शिकताना

योग ध्यानासाठी सायकलिंग २: पहिला दिवस- चाकण ते धायरी (पुणे)

योग ध्यानासाठी सायकलिंग ३: दूसरा दिवस- धायरी (पुणे) ते भोर

योग ध्यानासाठी सायकलिंग ४: तिसरा दिवस- भोर- मांढरदेवी- वाई

५: चौथा दिवस- वाई- महाबळेश्वर- वाई

१ ऑक्टोबरची पहाट! पहाटे लवकर जाग आली व उठल्यावर ताजंही वाटलं. चांगला आराम झाला. कालचा तिसरा दिवस असल्यामुळे शरीराला आता ह्या रूटीनची सवय झाली आहे. त्यामुळे झोप आरामात लागली. पहाटे पाचला उठून आवरलं. हा लॉज वाई बस स्टँडच्या अगदी समोर आहे. त्यामुळे पहाटेही जाग आहे. मस्त चहा मिळाला. पहाटेची शांतता आणि अंधार! सुखद थंडी, वा! सोबत आकाशातले ओळखीचे मित्र- व्याध, मृग, रोहिणी, कृत्तिका! थोडा वेळ चहाचा आनंद घेतला आणि निघण्यासाठी तयार झालो. पण आवरून बाहेर निघण्याच्या आधी परत पाच मिनिट पांघरूण ओढून झोपण्याचाही आनंद घेतला! आज मला सोबत सामान न्यायचं नाही आहे. फक्त पंक्चर किट, पाण्याची बाटली आणि चॉकलेटस- बिस्किटस इतकंच. त्यामुळे अगदी हलका होऊनच जाईन.

एक भिती होती की पाऊस किंवा धुकं असलं तर? पण आकाश निरभ्र आहे. सहा वाजता मस्त दोन प्लेट पोहे खाल्ले आणि निघालो. महाबळेश्वरचा रस्ता समोरच आहे. आज ह्या प्रवासातला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा. इथून बारा किलोमीटर घाट आहे. एका अर्थाने हा टप्पा सगळ्या मोहीमेचा मध्यबिंदू आहे. जर मला इथे सायकल चालवता आली, तर पुढेही अडचण येणार नाही. आणि पूर्वी ज्या मोहीमा अर्धवट राहिल्या, ती खंतही दूर होईल. हे बारा किलोमीटर खूप निर्णायक असतील. माझ्या परभणीमध्ये दोन म्हणी आहेत. लोक म्हणतात, जगात जर्मनी, भारतात परभणी आणि बनी तो बनी, नही तो परभणी! बघूया आज त्यापैकी काय होतं! मनात हे विचार असले तरी मन खूप शांत आहे.

नजारा इतका अद्भुत आहे की, सारखं 'आहा, आहा, च च च' वाटतंय! आणि अचानक मनात आपोआप 'होशवालों को खबर क्या बेखुदी क्या चीज़ है' गाण्याचं संगीत सुरू झालं! ते ऐकत ऐकत पुढे जातोय. वाईमधून किंबहुना लॉजवरून निघाल्यापासूनच हलका चढ सुरू आहे. एक किलोमीटरनंतर घाट सुरू झाला. पहिल्या किलोमीटरला वाटलं की, पाय थोडे जड झाले आहेत. कदाचित पायांचा पुरेसा आराम झाला नसेल. पण हळु हळु पाय मोकळे होत गेले. अनेक लोक मॉर्निंग वॉक व जॉगिंग करताना दिसत आहेत. घाट सुरू झाल्यानंतर सायकलचा गेअर १-१ टाकला. गेअर सेटिंग थोडं डिस्टर्ब झाल्यामुळे खाली उतरून हाताने गेअर टाकावा लागला. आता मस्त घाट सुरू झाला आहे. पण काहीच अडचण नाही आहे. आरामात स्लो स्पीडने पुढे जातोय. वळून बघतानाच चढ किती आहे, हे कळतं आहे. ह्या घाटाचं एक खूप चांगलं हे आहे की, रस्ता खूप रुंद आहे आणि घाटही बारा किलोमीटर पसरलेला व कमी तीव्र आहे. सकाळची वेळ असल्यामुळे गर्दीही नाही.

एक गोष्ट नक्कीच खटकली की, हवामान फारच चांगलं आहे. महाबळेश्वरला जातोय तर पाऊस नाही तर किमान ढग तरी हवेत ना. पण आकाश पूर्ण निळं आहे. चढही काही विशेष वाटला नाही. अगदी कम्फर्टेबल स्थितीत चालवू शकतो. समोर घाटाचा माथापण दिसतोय. एक एक वळण घेऊन रस्ता हळु हळु वर चढतोय. आणि हळु हळु खालचा नजारा दिसतोय. खाली छोटी गावं आणि दूर धोम डॅमचा परिसर. एकदा सायकल बघताना एक मुंगी दिसली होती. मातीच्या ढिगा-यावर हळु हळु चालणारी मुंगी! आज मीसुद्धा तसाच जातोय! त्या मुंगीसाठी तो ढिगारा जितका छोटा किंवा मोठा असेल, जितका कठीण असेल, तितकाच कठीण हा घाट माझ्यासाठी असेल. काहीच फरक नाही!

हळु हळु पाचगणी जवळ येत गेलं. सव्वा तासांमध्ये बारा किलोमीटरचा घाट पूर्ण झाला! मुख्य घाट इथेच संपतो! त्यानंतर थोडे चढ- उतार आहेत. बारा किलोमीटर चढून मी आता सुमारे १२०० मीटर उंचीवर आलो आहे व त्यामुळे मस्त थंडी वाजते आहे! महाबळेश्वर इथून फक्त वीस किलोमीतर दूर. पण सगळ्यांत अवघड टप्पा तर पार झाला. बनी तो बनी, पंचगनी भी बनी!!! खूप आनंद होतोय. एका बाजूला विश्वास बसत नाहीय! इथे चहा बिस्किट घेतलं. अर्थात् साधं हॉटेल शोधावंच लागलं. पण मार्केटमध्ये सगळ्या प्रकारच्या गोष्टी असतातच. न थांबता पुढे निघालो. पाचगणीचा पारसी पॉईंट विशेष आवडला. इथून धोम डॅम व अन्य परिसर खूप मस्त दिसतो आहे.

पाचगणीपासून पुढचा रस्ता झाडांच्या मधून पुढे जातो. हे पठारच आहे. थोडी वस्ती आहे, थोडी गावं आहेत. आणि अर्थात् प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण असल्यामुळे मानव प्रदूषणही फार आहे. सतत हॉटेल्स, दुकानं, रेसॉर्टस! ह्या रस्त्याचा फारच थोडा भाग शांत आहे. पाचगणीत व ह्या रस्त्यावर बघण्याचे अनेक पॉईंटस आहेत, पण बघावेसे वाटले नाहीत. मला महाबळेश्वरला जायचं आहे आणि दुपारच्या आधी परतही निघायचं आहे. त्यामुळे न थांबता जात राहिलो. मध्ये मध्ये किरकोळ चढ लागतोय. पण पाचगणीमध्ये परत सायकलचा गेअर २-२, २-३ केला आहे. त्यामुळे चढाईसारखं काही वाटलं नाही. नंतर नकाशात बघितलं तेव्हा कळालं की, इथेही दोन छोट्या स्तराचे घाट आहेत.

पण काय प्रवास होतोय! बघता बघता महाबळेश्वरला पोहचलो. वाईपासून बत्तीस किलोमीटरच होते, पण मनात अनेक शंका होत्या. भिती होती. पोहचेन, असं वाटत होतंच, पण इतकं आरामात पोहचेन असं वाटलंच नाही. महाबळेश्वरने थोडा तरी त्रास द्यावा ना! पायी चालत जावं लागावं, थोडा थकवा तरी यावा! पण काहीच झालं नाही आणि बघता बघता वेण्णा लेकला पोहचलो. निघून फक्त तीन तास होत आहेत! वा! थोडा वेळ इथे थांबलो. फोटो घेतले. इथून पुढे महाबळेश्वर गांव दोन किलोमीटर आहे. पण हा चढ होता. थोडे क्रँप्सपण आले. त्यामुळे भरपूर पाणी घेतलं. महाबळेश्वर बस स्टँडच्या थोडं पुढे जाऊन परत आलो. इथे एक वन वे रस्ता होता व त्यावर फारच तीव्र चढ होता. तेव्हा मात्र परत खाली उतरून १-१ गेअर टाकला. इथे आता ट्रॅफिक जाम होण्याची लक्षणं दिसत आहेत. वेण्णा लेकजवळ डबल आमलेट खाल्लं आणि निघालो!


वेण्णा लेक

महाबळेश्वरमध्ये अजून काही बघावसं वाटलं नाही. सायकलवर तिथे जाणं हेच उद्दिष्ट होतं व ते आरामात पूर्ण झालं. मध्ये जे दोन पॉईंटस लागले- पारसी पॉईंट आणि वेण्णा लेक, तेच फक्त बघितले. वेण्णा लेक छान वाटला. परतीच्या रस्त्यावरही काहीच अडचण आली नाही. वेगात येऊ शकलो. दुपारच्या वेळी पारसी पॉईंटवरून नजारा आणखी वेगळा दिसतोय. घाटामध्ये काही सायकलस्वारही दिसले. ते दुपारच्या ऊन्हात घाट चढत आहेत आणि बहुतेक पहाटे पुण्यातून निघाले असावेत. हाताने त्यांना अभिवादन केलं. घाट उतरताना दूरवर वाई गावही दिसतंय. पण जर हवा इतकी चांगली होण्याऐवजी थोडा पाऊस असता तर? असंही वाटून गेलं की, महाबळेश्वरने माझ्यासोबत चीटिंगच केली. थोडं तरी कठिण जायला हवं होतं! कदाचित माझी योजना फार सटीक असावी. सामान लॉजमध्येच ठेवून दिलं आणि परत वाईलाच थांबण्याचं ठरवलं. सामान न घेतल्यामुळे ओझं तर नसतंच, पण मनानेही फ्री वाटतं. आणि परत वाईलाच जायचं म्हणजे अर्ध्या रस्त्यावर उतार आणि पोहचल्यावर लॉज शोधण्याचा ताण नाही. त्यामुळेच मनानेही मी फ्रेश राहू शकलो. पण जर सामान घेऊन आलो असतो आणि महाबळेश्वर- मेढा रस्त्याने साता-याला जाण्याचा प्रयत्न केला असता तर हा घाटही इतका आरामात चढता आला नसता आणि शेवटी साता-याला पोहचतानाही अडचण आली असती. असो!


दूर दिसणारं वाई गांव

अपेक्षेच्या बरंच आधी म्हणजे दिड वाजता वाईतल्या लॉजवर पोहचलो. घाट पसरट असल्यामुळे उतारावरही थोडं वेगात येऊ शकलो आणि ट्रॅफिक जाममधूनही वाचलो (पाचगणीमध्ये ट्रॅफिक जाम लागला होता)! दुपारी‌ आराम केला. आज रविवार आहे. सलग चौथ्या दिवशीसुद्धा माझी‌ योजना पूर्ण होते आहे! तसंच ह्या मोहीमेतला सगळ्यांत महत्त्वाचा टप्पाही पूर्ण झाला. जेव्हा मित्रांना हे सांगितलं, तेव्हा एक मित्र- दिग्गज सायकलिस्त डॉ. पवन चांदक ह्यांनी सांगितलं की, वाईत एक दिग्गज सायकलिस्ट राहतो. त्यांना भेट. प्रसाद एरंडे त्यांचं नाव. त्यांची साईटही मी वाचलेली होती (www.prasaderande.in). ते गिनीज बूक रेकॉर्ड होल्डर आहेत व वाईलाच राहतात! त्यांना फोन केला, ते वाईमध्येच होते. मग त्यांच्याशीही छान भेट झाली. मस्त गप्पा झाल्या. त्यांचे मिल्खा सिंह व राहुल द्रविडसोबतचे फोटो बघितले! अनेक गोष्टी त्यांच्याकडून शिकण्यासारख्या कळाल्या. त्यांनी म्हंटले की, जो कोणी १० किलोमीटर सायकल चालवू शकतो, तो जगात कुठेही सायकल चालवू शकतो. सायकल चालवण्यासाठी चालणे हा सगळ्यांत चांगला व्यायाम आहे. त्यामुळे सायकलसाठी स्नायु तयार होतात. त्यांनी सायकल चालवताना आहार कसा असावा, ह्याबद्दलही सांगितलं. अनेक गोष्टी कळाल्या त्यांना भेटून. माझ्यासाठी काय जबरदस्त दिवस होता! खरं तर अजूनही विश्वास बसत नाहीय!

आता उद्या सातारामार्गे सज्जनगडला जाईन. अंतर जवळपास पन्नास किलोमीटरच असेल. आणि फार मोठा घाट लागणार नाही. आणि असला तर असू दे. मला आता घाटाला घाबरण्याची काहीच गरज नाही. फक्त पुरेसा आराम, योग्य आहार आणि बेसिक्सचा हाच क्रम पुढेही सुरू ठेवायचा आहे.


आज ६२ किलोमीटर सायकल चालवली व एकूण चढ १२५३ मीटर


चढ

पुढचा भाग- योग ध्यानासाठी सायकलिंग ६: वाई- सातारा- सज्जनगड

माझे सर्व लेख इथे एकत्र आहेत- www.niranjan-vichar.blogspot.in

प्रतिक्रिया

वा! एकदा महाबळेश्वरलाजायचं आहे सायकलवरून. बघू कसं जमतंय ते! छान भटकंती.

वेल्लाभट's picture

25 Oct 2017 - 10:46 am | वेल्लाभट

खतरनाक चाललीय तुमची सफर ! सायकलयोग !

पाटीलभाऊ's picture

25 Oct 2017 - 11:05 am | पाटीलभाऊ

_/\_

दुर्गविहारी's picture

26 Oct 2017 - 11:42 am | दुर्गविहारी

वा !!! मजा आली वाचायला. छान.

मार्गी's picture

26 Oct 2017 - 4:53 pm | मार्गी

वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद!