योग ध्यानासाठी सायकलिंग २: पहिला दिवस- चाकण ते धायरी (पुणे)

मार्गी's picture
मार्गी in भटकंती
11 Oct 2017 - 10:53 pm

योग ध्यानासाठी सायकलिंग १: अपयशातून शिकताना

२: पहिला दिवस- चाकण ते धायरी (पुणे)

२८ सप्टेंबर. सकाळी लवकर उठून जायचं आहे. आज पहिला दिवस आहे, पण सामान बांधणं, सगळ्या गोष्टी तयार ठेवणं ह्याची तयारी आधीच केली आहे. त्यामुळे सकाळी आरामात निघू शकलो. मन खूप शांत आहे. कालपासून काहीच तणाव नाही आहे. नेहमीचीच बाब आहे, असं वाटतंय. उजाडायच्या आधी पावणे सहाला निघालो. आजचा टप्पा छोटासाच आहे. पूर्वी अनेकदा ह्या मार्गावर गेलो आहे. सुमारे सव्वा तीन तासांमध्ये पोहचेन, असं वाटतंय.

सकाळची शांतता, आल्हाददायक थंडी आणि प्रसन्न वातावरण! आणि एक अनिश्चित प्रवासाची सुरुवात! मनात आपोआप गाणं सुरू झालं- तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, क्या ग़म है जिसको छुपा रहे हो! त्यानंतर आपोआप पूर्ण गाणं वाजत गेलं, मी ऐकत राहिलो. जर एखादं गाणं- फक्त त्याच्या ओळी नाही तर पूर्ण संगीत पाठ असेल, तर मनातल्या मनात असं ऐकताना मस्त वाटतं. लगेचच दुसरं गाणंही सुरू झालं- तू मेरे साथ साथ आसमाँ से आगे चल, तुझे पुकारता है तेरा आनेवाला कल, नई हैं मन्जिलें, नए हैं रास्ते, नया नया सफर है तेरे वास्ते!


पहिली नदी- इंद्रायणी!

अलीकडच्या राईडस आठवत आहेत. भीमाशंकर राईड असफल झाली असली तरी तिथेही स्टॅमिना वाढला होता. पाय अजिबात दुखले नव्हते. आणि दुस-या दिवशी लवकर रिकव्हर झालो होतो. कदाचित असं असावं की, रनिंगमुळे माझा स्टॅमिना थोडा नक्की वाढला असेल, पण काही दिवस सलग सायकल न चालवल्यामुळे पाय इतके मोकळे किंवा तयार झालेले नसावेत. त्यामुळे त्या राईडमध्ये त्रास झाला आणि वाढलेला स्टॅमिना मला सायकल चालवताना इतका उपयोगी पडला नसावा. पण त्यानंतर गेल्या काही दिवसांमध्ये मी ज्या छोट्या २०- ३० किमीच्या राईडस केल्या, त्यावेळी हळु हळु पाय मोकळे होत गेले. तसंच स्टॅमिना/ फिटनेस वाढवणं ही अचानक होणारी गोष्ट नसतेच. तेही घाटाचा रस्ता चढण्यासारखंच आहे. हळु हळु उंची वाढत जात असते. रस्ता एकदम वर चढत नाही. जे काही असेल, ते आज आणि येणा-या दिवसांमध्ये कळेलच.

ऊर्जा स्तर टिकवून ठेवण्यासाठी हे आधीच ठरवलं आहे की, प्रत्येक पंधरा- वीस किलोमीटरनंतर काही ना काही खात राहीन आणि पंचवीस- तीस किलोमीटर अंतरावर मोठा नाश्तासुद्धा करेन. त्यामुळे पहिले पंधरा किलोमीटर पूर्ण झाल्यावर चिक्की खाल्ली. पाण्यातही इलेक्ट्रॉल टाकलेलं आहे. पंचवीस किलोमीटरवर अर्धा टप्पा पूर्ण झाला. इथे मित्रासोबत हेव्ही नाश्ता केला. आता पुढे हायवेवरून जायचं आहे. हायवेवरून जायचं एक टेन्शनसुद्धा आहे आणि एक फायदाही‌ आहे. टेन्शन हे की, मोठी‌ वाहनं मोठा हायवे असूनही अगदी वेगात पळत असतात व अगदी जवळून जातात. सायकलला तर जागा मिळत नाही कधी कधी. आणि फायदा हा की, इतक्या वेगाने जाणारी वाहनं बघून नकळत मनही वेगाने जाण्याचा प्रयत्न करतं. अनकॉन्शस मनात एक प्रकारची स्पर्धा जणू तयार होते. त्यामुळे पूर्वी मी‌ बघितलं आहे की, हायवे वर रस्ता लवकर पार होतो. असो. आत्ता सकाळचे आठच वाजले आहेत. त्यामुळे ट्रॅफिक कमीच आहे. आरामात निघालो. अजूनही किंचित गारवा आहे. एका जागी हायवेवर तर धुकंही दिसलं. ऊन पडल्यावरही धुकं दिसलं.

चांगला नाश्ता केल्याचा फायदा झाला आणि चाळीस किलोमीटरनंतरही थकवा वाटला नाही. त्याच वेगाने पुढे जात राहिलो. आता एक खूप छोटा पाचव्या ग्रेडचा घाट लागेल. पूर्वी माझा स्टॅमिना खूप चांगला असताना मी तो २-१ काँबीनेशनवरच पार केला होता. आत्ताही प्रयत्न करेन की, त्याच गेअरवर चढेन आणि हळु हळु तो चढलोही. एक- दोन ठिकाणी किंचित त्रास झाला, पण तरी आरामात पोहचलो. वेळेच्या आधी ९.४० ला धायरी, डिएसके येथे पोहचलो. मध्ये नाश्त्यासाठी पाऊण तास थांबलो होतो. म्हणजे एकूण ४९ किमी अंतर सव्वा तीन तासांमध्येच पार केलं! वा!

पण आजचा दिवस अजून संपला नाहीय. आता चांगला आराम करायचा आहे आणि मग माझं रूटीन कामही करायचं आहे. फ्रेश होऊन जेवण केल्यानंतर खूप झोप येत आहे. पण त्याचं कारण थकवा नाही तर काल रात्री कमी झालेली झोप आहे. रात्री जेमतेम पाच- सहा तास झोपलो असेन. त्यामुळे दुपारी थोडा वेळ पडावं लागलं. पण त्यानंतर दिवस चांगला गेला. संध्याकाळी परत सायकलवर चक्कर मारली व एकदा डोंगर उतरून आलो. आतून खूप छान वाटतंय. दिवस मस्तच गेला. पण रात्रीची झोप अपुरी झाल्यामुळे खूप झोप येते आहे. रात्री लवकरच झोपायचं आहे. एक एक मिनिट किमती आहे! उद्या इथून सुमारे पन्नास किलोमीटरवरच्या भोरला जाईन. बघूया. पहिला दिवस तर अपेक्षेनुसारच पार पडला. आणि भावाच्या घरी आल्यामुळे एक प्रकारचा कम्फर्ट झोनही आहे. खरा प्रवास उद्यापासून सुरू होईल.


आजचा टप्पा- ४९ + २ = ५१ किमी. आज चढ कमी होता.

पुढचा भाग- योग ध्यानासाठी सायकलिंग ३: दुसरा दिवस- धायरी (पुणे) ते भोर