रुद्राध्याय एक मनन.

अरविंद कोल्हटकर's picture
अरविंद कोल्हटकर in जनातलं, मनातलं
24 Oct 2017 - 8:19 am

रुद्राध्याय ह्या प्रसिद्ध सूक्ताचे नाव बहुतेकांनी ऐकलेले असते कारण शिवभक्तांचे ते एक नेहमी आवर्तन केले जाणारे सूक्त आहे. मी स्वत: जरी शिवभक्त - किंबहुना कोणत्याच देवाचा भक्त - नसलो तरी ह्या सूक्ताचे स्वच्छ उच्चारांमध्ये आणि आघातांसह केले जाणारे पठन मला ऐकायला फार आवडते. (जालावर अनेक ठिकाणी हे ऐकायला सापडते. त्यासाठी माझे आवडते संस्थळ हे आहे. हे पठन प्रामुख्याने ’नमक’ आणि ’चमक’ अशा दोन भागांमध्ये विभागले आहे. नमकामध्ये ’नम:’ ह्या शब्दाच्या आणि चमकामध्ये ’च मे’ ह्या शब्दांच्या वारंवार आणि लयबद्ध पुनरावृत्तीमुळे ही सुश्राव्यता निर्माण होते. (नमक आणि चमक ह्याविषयी थोडे पुढे पहा.) सूक्त ऐकत असतांनाच कानावर पडणारे शब्द काय आहेत हे जाणायचे असेल तर नमक येथे पहा आणि चमक येथे.)

रुद्राध्याय हे सूक्त यजुर्वेदामध्ये काण्ड ४, प्रपाठक ५ येथे आहे. ११ अनुवाकांचा नमक विभाग आणि ११ अनुवाकांचा चमक विभाग असे हे सूक्त आहे. नमक विभागात रुद्र ह्या वैदिक देवतेच्या नानाविध रूपांना ’नम:’ अशी वंदने आहेत. चमक विभागात ’च मे’ म्हणजे ’मला मिळो’ अशा अनेक गोष्टी आणि सुखांसाठी रुद्रदेवतेची प्रार्थना आहे. ’नमक’ आणि ’चमक’ ही ह्या दोन भागांची अशी अन्वर्थक नावे वायुपुराणापासून (इ.स. ३०० च्या सुमारास) चालू आहेत.

शिवपूजेमध्ये रुद्राध्यायाची आवर्तने करणे हे एक महत्त्वाचे कर्मकाण्ड आहे. नमकाचे एक आवर्तन आणि त्याच्यामागून चमकातील एक अनुवाक असे अकरा वेळा करणे ह्याला ’एकादशिनी’ म्हणतात. ११ एकादशिनींचा एक लघुरुद्र होतो. ११ लघुरुद्रांचा एक महारुद्र आणि १२१ लघुरुद्रांचा एक अतिरुद्र होतो. अशा आवर्तनांमधून पुण्यप्राप्ति होते अशी शिवभक्तांची समजूत आहे. ह्याला आधार पुढीलसारखी वचने आहेत:
शुक्रियारण्यकजपो गायत्र्याश्च विशेषतः ।
सर्वपापहरा ह्येते रुद्रैकादशिनी तथा ॥
याज्ञवल्क्यस्मृति ३.३०८.
(शुक्रिय मन्त्रांचा, जायत्री मन्त्राचा आणि रुद्रैकदशिनीचा जप हे सर्व पापांचा नाश करतात.)
वेदमेकगुणं जप्त्वा तदह्नैव विशुध्यति।
रुद्रैकादशिनीं जप्त्वा तदह्नैव विशुध्यति।। <'strong>याज्ञवल्क्य
(वेदांचे एकदा पठन केल्याने, तसेच रुद्रैकादशिनीचे पठन केल्याने तत्काल शुद्धि होते.)
एकादशगुणान्वाऽपि रुद्रानावृत्य धर्मवित्।
महापापैरपि स्पृष्टो मुच्यते नात्र संशय:॥
(अत्रि-अङ्गिरस - भट्टभास्करटीका)
(रुद्राची ११ वेळा आवृति केल्याने महापापांपासून मुक्ति मिळते ह्यामध्ये संशय नाही.)

रुद्राध्यायाच्या पारंपारिक पाठांमध्ये शिवस्तुति, न्यास, ध्यान, उपचार, महागणपतीची प्रार्थना (गणानां त्वां गणपतिम्...), शान्तिपाठ, ’त्र्यम्बकं यजामहे’ अशासारख्या वैदिक ऋचा पुढेमागे जोडायची पद्धत आहे पण मूळ यजुर्वेदामध्ये प्रत्येकी ११ अनुवाकांच्या नमक आणि चमक विभागांशिवाय अन्य काही नाही. पुढेमागे जोडल्या जाणार्‍या अशा गोष्टी हा पूजाविधीचा वाढलेल्या कर्मकाण्डाचा एक प्रकार आहे.

पूजाविधीमध्ये यजमानासाठी रुद्राची आवर्तने करणार्‍या याज्ञिकांपैकी फार थोडयांना रुद्राचा अर्थ समजत असावा, यद्यपि स्वरित पद्धतीने त्यांना पूर्ण रुद्र मुखोद्गत असतो. हा लेख लिहितांना सूक्ताचा अर्थ समजून घेण्यासाठी मी प्रामुख्याने प्रख्यात भाष्यकार सायणाचार्य ह्यांचे भाष्य, त्यांच्या पूर्वीचा एक टीकाकार भट्टभास्कर ह्याची टीका, जुन्या पिढीतील एक मराठी विद्वान श्रीपादशास्त्री किंजवडेकर ह्यांचे ’रुद्रार्थदीपिका’ हे पुस्तक आणि श्रीपाद दामोदर सातवळेकर ह्यांच्या वैदिक व्याख्यानमालेमधील रुद्रविषयक व्याख्याने ह्यांचा उपयोग केला आहे. तसेच आर्थर कीथ आणि राल्फ टी.एच. ग्रिफिथ ह्यांनी केलेल्या वेदांच्या भाषान्तरांचाहि उपयोग केला आहे. (सायणाचार्य हे वेद आणि अन्य ग्रन्थांचे प्रख्यात भाष्यकार १३व्या-१४व्या शतकामध्ये होऊन गेले. विजयानगर साम्राज्याच्या उभारणीमध्ये ह्यांचा हातभार होता आणि हे विजयानगराचे महामन्त्रीहि होते अशी समजूत आहे. ’सर्वदर्शनसंग्रह’ हा सर्व प्रमुख भारतीय तत्त्वज्ञानशाखांचा परिचय करून देणारा ग्रन्थ ही ह्यांचीच निर्मिति असून ’यावज्जीवेत्सुखं जीवेत् ऋणं कृत्वा घृतं पिबेत्। भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:॥ अशी चार्वाकदर्शनाची ओळख करून देणारे श्लोक ह्यांनी निर्माण केले आहेत. भट्टभास्कर ह्या दुसर्‍या टीकाकाराची त्याच्या टीकेव्यतिरिक्त काहीच अन्य माहिती उपलब्ध नाही.)

पारंपारिक भाष्यकार सूक्ताचा परमार्थपर अर्थच केवळ देतात पण रुद्राच्या अर्थाकडे लक्ष दिल्यास रुद्रनिर्मितिकालीन सामाजिक आणि आर्थिक परिस्थिति आणि आर्यदेवतांची उत्कान्ति ह्यांवरहि उत्तम प्रकाश पडतो. विशेषत: वेदांमध्ये जवळजवळ अनुपस्थित असा शंकर हा पारंपारिक भक्तिमार्गातील एक महत्त्वाचा देव वैदिक रुद्रापासून उत्क्रान्त होत कसा पुढे आला असा विचार रुद्राध्यायाच्या वाचनाने करता येतो.

नमक आणि चमकांमधील सर्व अनुवाकांचा अर्थ येथे देता येणे शक्य नाही पण वानगीदाखल प्रत्येकातील काही भागांचा आर्थर कीथ ह्यांनी दिलेला अर्थ देतो.
’नमका’मधील अनुवाक क्र.१
नमस्ते रुद्रमन्यव उतोत इषवे नमः | नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्यामुत ते नमः ||

Homage to thy wrath, O Rudra,
To thine arrow homage also;
Homage to thy bow,
And homage to thine arms.

या त इषुः शिवतमा शिवं बभूव ते धनुः | शिवा शरव्या या तव तया नो रुद्र मृडय ||

With thy most kindly arrow,
And kindly bow,
With thy kindly missile,
Be gentle to us, O Rudra.

या ते रुद्र शिवा तनूरघोराऽपापकाशिनी | तया नस्तनुवा शन्तमया गिरिशंताऽभिचाकशीहि ||

That body of thine, O Rudra, which is kindly,
Not dread, with auspicious look,
With that body, most potent to heal,
O haunter of the mountains, do thou look on us.

यामिषुं गिरिशंत हस्ते बिभर्ष्यस्तवे | शिवां गिरित्र तां कुरु मा हिंसीः पुरुषं जगत् ||

The arrow which, O haunter of mountains,
In thy hand [1] thou bearest to shoot,
That make thou kindly, O guardian of mountains;
Harm not the world of men.

शिवेन वचसा त्वा गिरिशाच्छा वदामसि | यथा नः सर्वमिज्जगदयक्ष्मॅं सुमना असत् ||

With kindly utterance thee
We address, O liver on the mountains,
That all our folk
Be free from sickness and of good cheer.

अध्यवोचदधि वक्ता प्रथमो दैव्यो भिषक् | अहींश्च सर्वाञ्जम्भयन्त्सर्वाश्च यातुधान्यः ||

The advocate hath spoken in advocacy,
The first divine leech,
Confounding all the serpents
And all sorceries.

असौ यस्ताम्रो अरुण उत बभ्रुः सुमंगलः | ये चेमॉं रुद्रा अभितो दिक्षु श्रिताः सहस्रशोऽवैषॉं हेड ईमहे ||

The dusky, the ruddy,
The brown, the auspicious,
And the Rudras which in thousands
Lie around this (earth) in the quarters [2],
Their wrath do we deprecate.

असौ योऽवसर्पति नीलग्रीवो विलोहितः | उतैनं गोपा अदृशन्नदृशन्नुदहार्यः | उतैनं विश्वा भूतानि स दृष्टो मृडयाति नः ||

He who creepeth away,
Blue-necked and ruddy,
Him the cowherds have seen,
Have seen the bearers of water
And him all creatures;
May be, seen, be gentle unto us.

नमो अस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय मीढुषे | अथो ये अस्य सत्वानोऽहं तेभ्योऽकरन्नमः ||

Homage to the blue-necked,
Thousand-eyed one, the bountiful
And to those that are his warriors
I have paid my homage.

प्रमुञ्च धन्वनस्त्वमुभयोरार्त्नियोर्ज्याम् | याश्च ते हस्त इषवः परा ता भगवो वप ||

Unfasten from the two notches
Of thy bow the bowstring,
And cast thou down
The arrows in thy hand.

अवतत्य धनुस्त्वॅं सहस्राक्ष शतेषुधे | निशीर्य शल्यानां मुखा शिवो नः सुमना भव ||

Unstringing thy bow,
Do thou of a thousand eyes and a hundred quivers,
Destroying the points of thine arrows,
Be gentle and kindly to us.

विज्यं धनुः कपर्दिनो विशल्यो बाणवॉं उत | अनेशन्नस्येषव आभुरस्य निषङ्गथिः ||

Unstrung is the bow of him of the braided hair
And arrowless his quiver;
His arrows have departed,
Empty is his quiver.

या ते हेतिर्मीढुष्टम हस्ते बभूव ते धनुः | तयाऽस्मान्विश्वतस्त्वमयक्ष्मया परिब्भुज ||

O most bountiful one, the missile
That is in thy hand, thy bow,
With it on all sides do thou guard us,
Free from sickness.

नमस्ते अस्त्वायुधायानातताय धृष्णवे | उभाभ्यामुत ते नमो बाहुभ्यां तव धन्वने ||

Homage to thy weapon,
Unstrung, dread;
And homage to thy two hands,
To thy bow.

परि ते धन्वनो हेतिरस्मान्वृणक्तु विश्वतः | अथो य इषुधिस्तवाऽऽरे अस्मन्निधेहि तम् ||

May the missile from thy bow
Avoid us on every side,
And do thou lay far from us
This quiver that is thine.

नमकामधील अनुवाक क्र. २
नमो हिरण्यबाहवे सेनान्ये दिशां च पतये नमो
नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यः पशूनां पतये नमो
नमः सस्पिञ्जराय त्विषीमते पथीनां पतये नमो
नमो बभ्लुशाय विव्याधिनेऽन्नानां पतये नमो
नमो हरिकेशायोपवीतिने पुष्टानां पतये नमो
नमो भवस्य हेत्यै जगतां पतये नमो
नमो रुद्रायाऽऽतताविने क्षेत्राणां पतये नमो
नमः सूतायाहन्त्याय वनानां पतये नमो
नमो रोहिताय स्थपतये वृक्षाणां पतये नमो
नमो मन्त्रिणे वाणिजाय कक्षाणां पतये नमो
नमो भुवन्तये वारिवस्कृतायौषधीनां पतये नमो
नम उच्चैर्घोषायाक्रन्दयते पत्तीनां पतये नमो
नमः कृत्स्नवीताय धावते सत्त्वनां पतये नमः ||

Homage to the golden-armed leader of hosts, and to the lord of the quarters homage!
Homage to the trees with green tresses, to the lord of cattle homage!
Homage to the one who is yellowish-red like young grass, to the radiant, to the lord of paths homage!
Homage to the brown one, to the piercer, to the lord of food homage!
Homage to the green-haired, wearer of the cord, to the lord of prosperity homage!
Homage to the dart of Bhava, to the lord of the moving world homage!
Homage to Rudra, with bent bow, to the lord of fields homage!
Homage to the minstrel, the inviolate, to the lord of the woods homage!
Homage to the ruddy one, the ruler, to the lord of woods homage!
Homage to the minister, the trader, to the lord of thickets homage!
Homage to the extender of the world, the offspring of the maker of room, to the lord of plants homage!
Homage to the loud calling, the screaming, to the lord of footmen homage!
Homage to the wholly covered, to the running, to the lord of warriors homage!Homage to the minister, the trader, to the lord of thickets homage!
Homage to the extender of the world, the offspring of the maker of room, to the lord of plants homage!
Homage to the loud calling, the screaming, to the lord of footmen homage!
Homage to the wholly covered, to the running, to the lord of warriors homage!

नमकामधील अनुवाक क्र.१०
द्रापे अन्धसस्पते दरिद्रन्नीललोहित | एषां पुरुषाणामेषां पशूनां मा भेर्माऽरो मो एषां किंचनाऽऽममत् ||
या ते रुद्र शिवा तनूः शिवा विश्वाह भेषजी | शिवा रुद्रस्य भेषजी तया नो मृड जीवसे ||
इमॉं रुद्राय तवसे कपर्दिने क्षयद्वीराय प्रभरामहे मतिम् | यथा नः शमसद्द्विपदे चतुष्पदे विश्वं पुष्टं ग्रामे अस्मिन्ननातुरम् ||
मृडा नो रुद्रो तनो मयस्कृधि क्षयद्वीराय नमसा विधेम ते | यच्छं च योश्च मनुरायजे पिता तदश्याम तव रुद्र प्रणीतौ ||
मा नो महान्तमुत मा नो अर्भकं मा न उक्षन्तमुत मा न उक्षितम् | मा नो वधीः पितरं मोत मातरं प्रिया मा नस्तनुवो रुद्र रीरिषः ||
मानस्तोके तनये मा न आयुषि मा नो गोषु मा नो अश्वेषु रीरिषः | वीरान्मा नो रुद्र भामितो वधीर्हविष्मन्तो नमसा विधेम ते ||
आरात्ते गोघ्न उत्त पूरुषघ्ने क्षयद्वीराय सुम्नमस्मे ते अस्तु | रक्षा च नो अधि च देव ब्रूह्यधा च नः शर्म यच्छ द्विबर्हाः ||
स्तुहि श्रुतं गर्तसदं युवानं मृगन्न भीममुपहत्नुमुग्रम् | मृडा जरित्रे रुद्र स्तवानो अन्यं ते् अस्मन्निवपन्तु सेनाः ||
परिणो रुद्रस्य हेतिर्वृणक्तु परि त्वेषस्य दुर्मतिरघायोः | अव स्थिरा मघवद्भ्यस्तनुष्व मीढ्वस्तोकाय तनयाय मृडय ||
मीढुष्टम शिवतम शिवो नः सुमना भव | परमे वृक्ष आयुधं निधाय कृत्तिं वसान आचर पिनाकं बिभ्रदागहि ||
विकिरिद विलोहित नमस्ते अस्तु भगवः | यास्ते सहस्रॅं हेतयोऽन्यमस्मन्निवपन्तु ताः ||
सहस्राणि सहस्रधा बाहुवोस्तव हेतयः | तासामीशानो भगवः पराचीना मुखा कृधि ||

O chaser, lord of the Soma plants,
O waster, red and blue,
Frighten not nor injure
(Any) of these people, of these cattle;
Be not one of these injured.
That auspicious form of thine, O Rudra,
Auspicious and ever healing,
Auspicious and healing (form of) Rudra,
With that show mercy on us for life.
This prayer we offer up to the impetuous Rudra,
With plaited hair, destroyer of men,
That health be for our bipeds and quadrupeds,
And that all in this village be prosperous and free from ill.
Be merciful to us, O Rudra, and give us delight;
With honour let us worship thee, destroyer of men;
The health and wealth which father Manu won by sacrifice,
May we attain that, O Rudra, under thy leadership.
Neither our great, nor our small,
Our waxing or what has waxed,
Do thou slay, nor father nor mother;
Injure not, O Rudra, our dear bodies.
Harm us not in our children, our descendants, our life;
Harm us not in our cattle, in our horses;
Smite not in anger our heroes, O Rudra;
With oblations lot us serve thee with honour.
From afar to thee, slayer of cows, and slayer of men,
Destroyer of heroes, be goodwill for us;
Guard us and accord us aid
And grant us protection in abundance.
Praise the famous youth, mounted on the chariot seat,
Dread and destructive like a fierce wild beast;
Being praised, O Rudra, be merciful to the singer;
Let thy missiles smite down another than us.
May the missile of Rudra spare us,
May the wrath of the brilliant evil worker (pass over us);
Unstring for the generous donors (thy) strong (bows);
O bounteous one, be merciful to our children and descendants.
O most bounteous, most auspicious,
Be auspicious and favourably inclined to us;
Placing down thy weapon on the highest tree,
Clad in thy skin, come,
And approach us bearing the spear.
O blood-red scatterer,
Homage to thee, O adorable one;
May thy thousand missiles
Smite down another than us.
A thousandfold in thousands
Are the missiles in thine arms;
O adorable one, do thou turn away
The points of those which thou dost rule.

चमकामधील अनुवाक क्र. १
अग्नाविष्णू सजोषसेमा वर्धन्तु वां गिरः | द्युम्नैर्वाजेभिरागतम् ||
वाजश्च मे प्रसवश्च मे प्रयतिश्च मे प्रसितिश्च मे धीतिश्च मे क्रतुश्च मे स्वरश्च मे श्लोकश्च मे श्रावश्च मे श्रुतिश्च मे ज्योतिश्च मे सुवश्च मे प्राणश्च मेऽपानश्च मे व्यानश्च मेऽसुश्च मे चित्तं च म आधीतं च मे वाक्च मे मनश्च मे चक्षुश्च मे श्रोत्रं च मे दक्षश्च मे बलं च म ओजश्च मे सहश्च म आयुश्च मे जरा च म आत्मा च मे तनूश्च मे शर्म च मे वर्म च मेऽङ्गानि च मेऽस्थानि च मे परूंषि च मे शरीराणि च मे ||

O Agni and Visnu, may these songs gladden you in unison; come ye with radiance and strength.
May for me strength, instigation, influence, inclination, thought, inspiration, speech, fame, renown, reputation, light, heaven, expiration, inspiration, cross-breathing, breath, mind, learning, voice, mind, eye, ear, skill, might, force, strength, life, old age, breath, body, protection, guard, limbs, bones, joints, bodies (prosper through the sacrifice).

चमकामधील अनुवाक क्र. ४.

ऊर्क्च मे सूनृता च मे पयश्च मे रसश्च मे घृतं च मे मधु च मे सग्धिश्च मे सपीतिश्च मे कृषिश्च मे वृष्टिश्च मे जैत्रं च म औद्भिद्यं च मे रयिश्च मे रायश्च मे पुष्टं च मे पुष्टिश्च मे विभु च मे प्रभु च मे बहु च मे भूयश्च मे पूर्णं च मे पूर्णतरं च मेऽक्षितिश्च मे कूयवाश्च मेऽन्नं च मेऽक्षुच्च मे व्रीहयश्च मे यवाश्च मे माषाश्च मे तिलाश्च मे मुद्गाश्च मे खल्वाश्च मे गोधूमाश्च मे मसुराश्च मे प्रियंगवश्च मेऽणवश्च मे श्यामाकाश्च मे नीवाराश्च मे ||

May for me strength, righteousness, milk, sap, ghee, honey, eating and drinking in company, ploughing, rain, conquest, victory, wealth, riches, prosperity, prospering, plenteousness, lordship, much, more, fun, fuller, imperishableness, bad crops, food, freedom from hunger, rice, barley, beans, sesame, kidney beans, vetches, wheat, lentils, Millet, Panicum miliaceum, Panicum frumentaceum, and wild rice (prosper through the sacrifice).

असेच अन्य अनुवाक आहेत. विस्तारभयामुळे सर्वच येथे दाखवीत नाही.

नमकभागाच्या अर्थावरून दिसते की रुद्र ही देवता धनुष्यबाणधारी, सर्वसमर्थ आहे पण देवतांच्या साधारण प्रकृतीला धरून दया आणि करुणा अशांचे दर्शन रुद्रदेवतेमध्ये होत नाही. रुद्र कोपिष्ट आहे आणि सूक्तकाराला त्याच्या कोपाचे सतत भय आहे. सूक्तकाराला शत्रूंविरुद्ध रुद्रदेवतेचे साहाय्य हवेच आहे पण त्याला अशीहि भीति आहे की रुद्राची शस्त्रे कधी आपल्यावर, आपल्या मुलाबाळांवर, कुटुंबीयांवरहि आणि गाईबैलांवरहि उलटू शकतात. रुद्राने असे न करावे, आपले बाण उलटे आणि शान्त करावे, धनुष्याची ज्या काढून ठेवावी अशा अनेक प्रार्थना तो रुद्रापाशी करीत आहे. हा रुद्र काहीसा मध्ययुगीन राजांसारखा आहे. तो आपल्या प्रजेचे रक्षण करतो पण त्याचे सैनिक आपल्याच जनतेवर उलटून त्यांची घरेदारे लुटण्यास आणि त्यांच्या पिकाची नासधूस करण्यास मागेपुढे पहात नाहीत. प्रजेला त्यांचीहि भीतीच असते.

त्याच्या अनुयायांमध्येहि ज्यांची धास्ती बाळगावी असे बरेच जण आहेत. तिसर्‍या अनुवाकामध्ये चोरांचा पुढारी (स्तेनानां पति:), सरावलेले चोर आणि भुरटे चोर (वञ्चक आणि परिवञ्चक), आपल्याच परिचयातल्यांपासून चोर्‍या करणारे (स्तायू), धन्याच्याच घरात चोरी करणारे (निचेरु), बाजारात फिरून उचलेगिरी करणारे (परिचर), ठगांप्रमाणे एकटयादुकटया प्रवाशाला गाठून त्याला लुटणारे (अरण्य), शस्त्रधारी जबरी चोर (सृकावि - सृका म्हणजे बाण अथवा भाला), ठार करून चोरी करणारे (जिघांसक), मुंडासे बांधून डोंगरांमध्ये वाटमारी करणारे, असे अनेक प्रकारचे चोर सर्व रुद्राचे अनुयायी म्हणून सांगितलेले असून त्यांच्या प्रमुखाला म्हणून रुद्राला नमन तिसर्‍या अनुवाकामध्ये नमन केले आहे.

नाना व्यवसाय करणारे संघ (व्रात) आणि त्या संघांचे प्रमुख (व्रातपति), नाना गण आणि त्यांचा पुढारी गणपति, रथावर आरूढ असलेल्यांना तसेच पायी लढणार्‍यांना, रथांना आणि रथकारांना, शिरस्त्राणधारी (बिल्मिन्) आणि कवचधारी (कवचिन्) सैनिकांना, टिपरीने दुन्दुभि वाजविणार्‍यांना, बाणांना आणि बाण बनविणार्‍यांना, सुतारांना, पात्रे बनविणार्‍या कुंभारांना आणि धातुकाम करणार्‍या लोहारांना अशा समाजाच्या अनेकविध घटकांना रुद्ररूप मानून वंदन केले आहे. पक्ष्यांची आणि प्राण्यांची स्वत: आणि पाळीव कुत्र्यांकडून शिकार करणारे, जाळे फेकून पक्षी आणि मासे पकडणारे, अशी समाजाला आवश्यक कामे करणार्‍यांना चौथ्या अनुवाकामध्ये नमन केले आहे. ह्यापुढे नीलग्रीव (निळ्या कंठाचा) आणि शितिकण्ठ (गोर्‍या मानेचा), शर्व आणि पशुपति, जटाधारी (कपर्दिन्), पर्वतवासी (गिरिश), शंकर (शुभकारक) अशा अनेक रूपातील रुद्राला नमन केले आहे. पशुपालन आणि शेतीभातीवर उपजीविका करणारा वेदकालीन समाज कसा असला पाहिजे ह्याचे उत्तम चित्र ह्या वर्णनामधून डोळ्यासमोर उभे राहते.

वैदिक कालामध्ये भौतिक आयुष्य कसे होते आणि सर्वसामान्य व्यक्तीच्या मागण्या काय असत हे ’मला अमुक दे’ अशा स्वरूपात दिसून येते. चौथ्या अनुवाकामध्ये आप्तेष्टांसह भोजन आणि पान (सग्धि आणि सपीति), दूध आणि दुधाचे पदार्थ, मध, वृष्टि, सुपीक जमीन (जैत्र), वृक्ष आणि वेलींपासून मिळणार्‍या गोष्टी (औद्भिद्य), मौल्यवान् खनिजे (रयि), मोती (राय), नाना धान्ये (व्रीहि - भात, यव - सातू, माष - उडीद, तिल - तीळ, मुद्ग - मूग, खल्व - चणे, गोधूम - गहू, मसूरा - मसूर, प्रियङ्गु - राळे, श्यामाक - वरीसारखी धान्य, नीवार - अरण्यात आपोआप उगवलेला भात), नाना धातु (हिरण्य - सोने, अयस् - पोलाद, सीस - शिसे, त्रपु - कथील, श्यामाक - अशुद्ध धातु, लोह - लोखंड), पाळीव आणि अरण्यातील प्राणी, गाईंची खिल्लारे (वसु) अशा प्रकारच्या बर्‍याच मागण्या केल्या गेल्या आहेत. सर्वसामान्यांचे जग शेतीभाती आणि गुरे पाळणे ह्यांच्याशी संबंधित असल्याचे अनेक पुरावे मिळतात. दहाव्या अनुवाकामध्ये गाईबैलांचे किती प्रकार भेटतात ते पहा. गर्भ (न जन्मलेला), वत्स (पाडस), त्र्यवि आणि त्र्यवी म्हणजे अनुक्रमे दीड वर्षांचा बैल आणि दीड वर्षांची गाय, दित्यवाट् म्हणजे दोन वर्षांचा बैल आणि दित्यौही म्हणजे दोन वर्षांची गाय, पञ्चावि म्हणजे अडीच वर्षांचा बैल आणि पञ्चावी म्हणजे अडीच वर्षांची गाय, त्रिवत्स म्हणजे तीन वर्षांचा बैल आणि त्रिवत्सा म्हणजे तीन वर्षांची गाय, तुर्यवाट् म्हणजे साडेतीन वर्षांचा बैल आणि तुर्यौही म्हणजे साडेतीन वर्षांची गाय, षष्ठवाट् म्हणजे चार वर्षांचा बैल आणि षष्ठौही म्हणजे चार वर्षांची गाय. गाईंपासून उत्तम सन्तति व्हावी ह्यासाठी पाळलेला खोंड म्हणजे उक्षा. गाभण न राहणारी गाय म्हणजे वशा. खोंडाहून मोठा तो ऋषभ. गर्भ धरू न शकणारी गाय ती वेहत् आणि गाडी ओढणारा बैल म्हणजे अनड्वान्. धेनु म्हणजे नुकतीच व्यालेली गाय.

ह्याच्या पुढच्या अनुवाकामध्ये ’एका च मे तिस्रश्चमे पञ्च च मे ...’ (मला एक, तीन, पाच....मिळोत) अशी त्रयस्त्रिंशत् म्हणजे तेहतीसपर्यंत आणि ’चतस्रश्च मेऽष्टौ च मे द्वादश च मे...’ (मला चार, आठ, बारा... मिळोत) अशी अष्टाचत्वारिंशत् म्हणजे अठ्ठेचाळीसपर्यंत मागणी केली आहे. ह्याच्यावर काही विवेचन पुढे येईल.

इन्द्र, वरुण, मरुत्, अग्नि, आदित्य, द्यौस् आणि पृथ्वी, उषस्, अश्विन् अशा अनेक ऋग्वेदातील देवतांमध्ये रुद्राचा क्रम बराच खालचा लागतो असे रुद्राला अनुलक्षून केलेल्या सूक्तांवरून जाणवते. इन्द्राला सर्वाधिक म्हणजे २८९ सूक्ते आहेत. त्याच्या खालोखाल अग्निदेवतेला २१८ अशी क्रमवारी लावीत गेल्यास रुद्राच्या वाटयाला केवळ ५ (किंवा ६) सूक्ते दिसतात. आजच्या देवांमध्ये शिखरावरचे तीन देव म्हणजे ब्रह्मा, विष्णु आणि महेश (शंकर). त्यांपैकी शंकर एक स्वतन्त्र देव म्हणून कोठेच दिसत नाही. ’शंकर’ अथवा ’शिव’ असे जे उल्लेख कोठेकोठे दिसतात ते ’मंगल’ असे विशेषणार्थी आहेत. सध्याचा देव शंकर तो नाही. ह्याउलट वेदांमधील सर्वात पहिला जो इन्द्र तो कोठेच दिसत नाही. वरुण, मरुत्, पृथ्वी, उषस् इत्यादिकांची आजच्या काळात देवतारूपात पूजा कोठेच होत नाही. वेदांमध्ये विष्णु आहे पण सध्याच्या सर्वशक्तिमान् रूपात नाही. आर्यांचा एकेकाळचा विजिगीषु पुढारी इन्द्र आपल्या स्थानापासून इतका ढळला आहे की शरीराला क्षते पडणे, स्त्रीलंपटपणा अशी देवांना न शोभणारी लक्षणे त्याला कथांमधून लागून त्याचे पार अवमूल्यन झाले आहे.

असे दिसते की वेदांतील उग्र प्रकृतीचा आणि खालच्या फळीतील रुद्र हा देव वेदकालानंतर बदलत जाऊन वेदोत्तर कालात भक्तानुकम्पी असा ’शिव’ ह्या स्वरूपात एक प्रथम श्रेणीचा देव बनला. आर्येतर समाजांशी समन्वय साधतांना जी देवाणघेवाण झाली त्यामध्ये रुद्रदेव सौम्य प्रकृतीचा झाला आणि त्याच्या वेदांमध्ये उपलब्ध असलेल्या वर्णनांचे समर्थन करणार्‍या कथा धार्मिक वाङ्मयाचा अविभाज्य भाग झाल्या. उदाहरणार्थ, ’नीलग्रीव’ (निळ्या कंठाचा) हे वर्णन सार्थ ठरविण्यासाठी शंकराने समुद्रमन्थनानंतर हलाहल विषाचे प्राशन केले अशी कथा निर्माण झाली. ’कपर्दिन्’ (जटाधारी) ह्या वर्णनाला अनुलक्षून गंगावतणाची कथा निर्माण झाली. वैदिक आर्यांना गंगा नदी जवळ जवळ अज्ञात होती कारण ते रहात होते अशा पश्चिमेकडील भूप्रदेशापासून ती बरीच दूर होती. त्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या नद्या म्हणजे सप्तसिंधु (सिन्धु आणि तिच्या उपनद्या) आणि सरस्वतीसह दृषद्वती, आपया अशा तिच्या उपनद्या. त्या नद्या त्यांच्या वसतिस्थानाच्या जवळपासच्या होत्या आणि त्या नद्यांच्यावर त्यांचे जीवन अवलंबून होते अशा नद्या. ऋग्वेदामध्ये गंगेचा उल्लेख केवळ दोनदा मिळतो आणि ’नदीसूक्ता’मध्ये (मण्डल १०, सूक्त ७५) पूर्वेकडून पश्चिमेकडे अशी आर्यांना ज्ञात असलेल्या नद्यांची यादी आहे त्यामध्ये गंगा सर्वप्रथम म्हणजे सर्वात पूर्वेची अशी दाखविली आहे. नंतरच्या काळात गंगेला आणि शंकराला महत्त्व प्राप्त झाले आणि गंगावतरणाची कथा निर्माण झाली. रुद्राला रुद्राध्यामध्ये आणि अन्यहि ठिकाणी ’गिरिश’ (पर्वतवासी) असे म्हटलेले आहे. ह्याच्याशी जुळणारा असा लांबवरच्या हिमालयातील कैलास पर्वत शंकराचे निवासस्थान म्हणून पुढे आला. रुद्राच्या परिवारातील गणांचा प्रमुख गणपति हा शंकराचा पुत्र आणि एक पहिल्या महत्त्वाचा देव म्हणून पुढे आला, इतका की ’गणानां त्वां गणपतिं हवामहे..’ अशा सूक्ताशिवाय पूजाविधीचा विचारच आज करता येत नाही. गीतेमध्ये अध्याय १०, विभूतियोग येथे ’रुद्राणां शङ्करश्चास्मि’ (रुद्रांमधील शंकर मीच आहे) असा उल्लेख आहे.
ऋग्वेदामध्ये मण्डल ७, सूक्त ५९, ऋक् १२ येथे पुढील सर्वश्रुत मन्त्र आहे:

त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्।
उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥

(Tryambaka we worship, sweet augmenter of prosperity. As from its stem the cucumber, so may I be released from death, not reft of immortality. Griffith.)

ह्यातील ’त्र्यंबक’ ह्याचा मूळ अर्थ ’तीन मातांचा पुत्र’. तो गळून पडला आणि ’त्रिनेत्र’ अशा अर्थाने तोच शब्द शंकराला लागू झाला. त्याच्याशी जुळणारी अशी मदनाचे भस्म करण्याची कथाहि निर्माण झाली. आता यजुर्वेदातील रुद्राध्यायाचे पठन ऋग्वेदातील ह्या सूक्ताशिवाय पूर्ण होत नाही.

यजुर्वेदातील रुद्राला कोणी सहचरी नाही पण शंकराला पार्वती मिळाली. ’सामर्थ्यवान्’ अशा अर्थाने रुद्राचे वर्णन कोठेकोठे ’पांढरा बैल’ असे करण्यात आले आहे. तो पांढरा बैल शंकराचे वाहन बनला. रुद्राचे धनुष्यबाण जाऊन शंकराला त्रिशूल हे प्रमुख शस्त्र मिळाले. कोपिष्ट रुद्र, ज्याच्या पुढे सूक्तकर्ता चळाचळा कापत आहे, तो बदलून त्याची जागा परिणामांचा विचार न करता कोणालाहि काहीहि देणार्‍या आणि त्यामुळे नंतर स्वत:च अडचणीत येणार्‍या भोळ्या शंकराने घेतली.

ह्या बदलामधील सर्वात लक्षणीय गोष्ट कोठली असेल तर शिवपूजेमध्ये लिंगपूजेला मिळालेले महत्त्वाचे स्थान. अशी कोठलीच पूजावस्तु वेदांमध्ये दिसत नाही, इतकेच नाही तर ’शिश्नपूजे’बाबत मण्डल ७, सूक्त २१, ऋक् ५ आणि मण्डल १०, सूक्त ९९, ऋक् ३ ह्या दोन ठिकाणी तिरस्काराचे शब्द काढले आहेत. कालान्तराने हे सर्व चित्र बदलून लिंगपूजा हा शिवपूजनाचा अविभाज्य भाग झाला आहे.

पारंपारिक टीकाकार रुद्राध्याचा अर्थ पूर्णत: परमार्थपर लावतात. देवतास्वरूपाच्या ऐतिहासिक उत्क्रान्तीचा विचार त्यांच्यापुढे नसतोच. त्यासाठी आवश्यक तेथे retrofitting करण्याची त्यांची तयारी असते. त्यामुळे ’गिरिश’ असा उल्लेख आला की त्याचा अर्थ ’कैलास पर्वतावर राहणारा’ असा पूर्वलक्षी अर्थ ते देतात. ’नीलग्रीव’ म्हटले की त्यांना हलाहलाची गोष्ट आठवते. रुद्राध्याय हा पूर्णत: शंकरस्तुतिपर आहे असे मानूनच त्यांचे लिखाण होत असते. किंजवडेकरशास्त्रींनी कित्येक ऋचांच्या अर्थामध्ये मुळात तसे सुचविणारे काही शब्द नसतांना ’शंकराला नमस्कार’ अशी जोड जोडली आहे. वर लिहिल्याप्रमाणे नमकाच्या तिसर्‍या अनुवाकामध्ये रुद्राला ’स्तेन’, ’स्तायु’, ’वञ्चक’, ’परिवञ्चक’ अशा नानाविध चोरांचे नेतृत्व दिले आहे. शंकराच्या रूपाला हे साजेसे नसल्याने किंजवडेकरशास्त्रींनी आपल्या टीकेमधे ’प्रत्येक व्यक्तीमध्ये परमात्म्याची दोन रूपे असतात - जीवस्वरूप आणि ईश्वरस्वरूप. पैकी ईश्वरस्वरूपाचे अनुसन्धान करणारा तो स्तेन’ असे स्पष्टीकरण देऊन अडचणीमधून मार्ग काढला आहे. केवळ सातवळेकरांच्या विवेचनामध्ये काही सामाजिक अर्थ शोधण्याचा प्रयत्न दिसतो. समाजामध्ये चांगले-वाईट, सुष्ट-दुष्ट असे सर्व प्रकारचे लोक असतात. ह्यापैकी कोणालाही वगळून समाजपुरुष पूर्ण दिसत नाहीत. अशा पूर्ण समाजपुरुषाचे स्तवन करण्याच्या हेतूने ’स्तेनानां पतये नम:’, ’स्तायूनां पतये नम’ हेहि उल्लेख आवश्यक म्हणून बघावयास हवेत असे प्रतिपादन ते करतात.

चमकाच्या शेवटाकडे ’एका च मे तिस्रश्चमे पञ्च च मे ...’ (मला एक, तीन, पाच....मिळोत) अशी त्रयस्त्रिंशत् म्हणजे तेहतीसपर्यंत आणि ’चतस्रश्च मेऽष्टौ च मे द्वादश च मे...’ (मला चार, आठ, बारा... मिळोत) अशी अष्टाचत्वारिंशत् म्हणजे अठ्ठेचाळीसपर्यंत मागणी केली आहे ह्याचा उल्लेख वर आलाच आहे. ३३ पर्यंतच्या विषम संख्या आणि ४ च्या पटीतील ४८ पर्यंत संख्या ’मला मिळोत’ ह्या मागणीचा अर्थ काय हे मला तरी गूढ आहे. सायणाचार्यांनी ह्यावर 'एकादिशब्दा: संख्यापरा:’ इतकीच टिप्पणी केली आहे. किंजवडेकरशास्त्री ह्या संख्यांचा परमार्थपर अर्थ असा लावतात:
एक - अविकृत, निर्गुण, निराकार ब्रह्म.
तिस्र: - तीन गुण - सत्त्व, रज, तम.
पञ्च - पञ्चमहाभूते.
सप्त - ५ ज्ञानेन्द्रि्ये + मनस् + बुद्धि.
नव - नवद्वारयुक्त मनुष्यदेह.
एकादश - ५ प्रमुख प्राण (प्राण, अपान, समान, व्यान, उदान) + ५ अन्य (देवदत्त, धनंजय, नाग, कूर्म, कृकल) + सुषुम्ना नाडी.
इत्यादि.
मला हेहि retrofitting वाटते. रुद्राध्याय निर्मितिकाली वेदांमध्ये ह्या संकल्पना कोठेच आढळत नसाव्यात असे थोडे धार्ष्टयाचे विधान मी करतो. वेदवाङ्मयाचा माझा सखोल अभ्यास नाही पण ह्या संकल्पना वेदांमध्ये कोठे असल्याचे मी ऐकलेलेहि नाही.

असे retrofitting आणखी आधुनिक शब्दांमध्ये आणि सध्याच्या शास्त्रीय ज्ञानाची जोड देऊन करण्याचा प्रयत्नहि काहीजण करतात. ह्या संदर्भात मी अलीकडेच वाचलेला पुढील उतारा पाहण्याजोगा आहे. (मला तरी ह्याचा अर्थ लागत नाही आणि त्याचा संदर्भहि मला उपलब्ध नाही.)
'One great scholar says these numbers represent a polymer chain of molecules that form apa or water that enables evolution of life and intelligence, and apa is nothing but the nitrogenous base pairs of the DNA. The numbers 1 to 33 represent the 33000 base pairs of mitochondrial base pairs of DNA. The numbers 4 to 48 represent the 48 million nuclear bases of DNA. The two sets of DNA bases combine to provide sustenance of human well-being and onward evolution of human life. When the devotee prays for the blessing of these numbers, actually he is praying for bestowing on him all these DNA bases which conduce to sustenance of human well-being and happiness.'

असो. रुद्राध्याय वाचून आणि ऐकून मला जे जाणवले ते हे असे.

(टीप - अपारंपारिक मार्गाने रुद्राध्यायाचा विचार मांडणारा दिवंगत प्राध्यापक कृ.श्री.अर्जुनवाडकर ह्यांचा एक लेख सुमारे ८-१० वर्षांपूर्वी माझ्या वाचनात आला होता. त्याची स्मृति काही प्रमाणात ह्या लेखामागे आहे.)

('ऐसीअक्षरे'मध्ये ३ वर्षांपूर्वी पूर्वप्रकाशित.)

संस्कृतीविचार

प्रतिक्रिया

अर्धवटराव's picture

24 Oct 2017 - 9:49 am | अर्धवटराव

.

’सर्वदर्शनसंग्रह’ हा सर्व प्रमुख भारतीय तत्त्वज्ञानशाखांचा परिचय करून देणारा ग्रन्थ ही ह्यांचीच निर्मिति असून ’यावज्जीवेत्सुखं जीवेत् ऋणं कृत्वा घृतं पिबेत्। भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:॥ अशी चार्वाकदर्शनाची ओळख करून देणारे श्लोक ह्यांनी निर्माण केले आहेत.

हा श्लोक म्हणजे चार्वाकांच्या मूळ श्लोकाचे विडंबन आहे. 'ऋणं कृत्वा घृतं पिबेत्।' असं चार्वाकांनी कधीही म्हटले नव्हते. मूळ चरण 'नास्तिमृत्योर्गोचरः' असा आहे. सायनाचार्य ह्यांचा कालखंड इतका अलीकडचा असेल तर याच सर्वदर्शनसंग्रहात त्यांनी 'शेवटी सारेच लोकायतिक जीवनपद्धतीच प्रत्यक्षात आचरणात आणतात' अशा स्वरूपाचे उद्गार काढले आहेत. एका अर्थाने चार्वाकांच्या आदिशंकराचार्यांनंतरच्या सर्वात जहाल विरोधकानेही शेवटी चार्वाकांचं श्रेष्ठत्व मान्य केल्याचं दिसतं.

बाकी लेख उत्तम. रुद्र व इतर वैदिक देवतांबद्दल केलेलं विवेचन योग्यच आहे. आजच्या काळात मूळ वैदिक धर्माचे हिंदू धर्मात रूपांतर होताना स्वरूप जवळजवळ पूर्ण बदलून गेले आहे हे तथाकथित स्वयंघोषित संस्कृतीरक्षकांना पचनी पडणार नाही. असो.

मिपावरदेखील लिहीत रहा.

लेख अतिशय आवडला. ऋग्वेदातील देवतांचे उत्तर वेदकालात अवमुल्यन का झाले याबद्दल अधिक वाचायला आवडेल.
आर्थर कीथ यांचे भाषांतर अतिशय सुरेख आहे.
आणखी लिहित रहा कृपया.

अनिंद्य's picture

24 Oct 2017 - 2:18 pm | अनिंद्य

@ अरविंद कोल्हटकर,

रुद्राची काही वर्णने मी वाचली होती (अर्थात भाषान्तरित) ती आता फार 'अश्लील' समजली जातील. :-)

इंद्र, रुद्र, वरुण, सूर्य अश्या वैदिक देवतांची देवालये आणि त्यांचे पूजन काही पूर्व-एशियाई देशात अजूनही थोडेफार प्रचलित आहे असे दिसले, उदा. - थायलंड, इंडोनेशियाची जावा-सुमात्रा बेटे, कंबोडिया इत्यादी.

लेख उत्तम.

अनिंद्य

शरद's picture

24 Oct 2017 - 3:36 pm | शरद

सर्वदर्हनसंग्रह हा ग्रंथ सायणाचार्य यांचे चिरंजीव माधवचार्य यांनी लिहला आहे.

सायनाचार्य ह्यांचा कालखंड इतका अलीकडचा असेल तर याच सर्वदर्शनसंग्रहात त्यांनी 'शेवटी सारेच लोकायतिक जीवनपद्धतीच प्रत्यक्षात आचरणात आणतात' अशा स्वरूपाचे उद्गार काढले आहेत. एका अर्थाने चार्वाकांच्या आदिशंकराचार्यांनंतरच्या सर्वात जहाल विरोधकानेही शेवटी चार्वाकांचं श्रेष्ठत्व मान्य केल्याचं दिसतं.

असे काही दिसत नाही. श्री. एस,. यांनी मांडलेले वाक्य ज्या श्लोकावरून घेतले असावे असे वाटते त्याचे श्री र पं.कंगले केलेले भाषांतर पहा.
" ... आणि चार्वाकाचा युक्तिवाद खोडून काढणे कठीण आहे. कारण, बहुतकरून सर्वच प्राणी "जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत सुखाचा उपयोग घेत राहावे; शेवटी मृत्यूच्या पाशात सापडत नाही असा कोणताही प्राणी नाही; चितेवर भस्म झालेल्या देहाचे उज्जीवन कोठून होणार?" ह्या लोकप्रसिद्ध गाथेच्या अनुरोधाने वागणारे, नीतिशास्त्र (म्हणजे अर्थशास्त्र) आणि कामशास्त्र यांना अनुसरून अर्थ आणि काम एवढेच पुरूषार्थ होत असे मानणारे ,पारलौकिक गोष्टींचे अस्तित्व नाकारणारे,(व अशा रीतीने ) चार्वाकाच्या मताला अनुसरून वागणारे असेच अनुभवास येतात.."

इथे कोठेही चार्वाकाचे श्रेष्ठत्व मान्य केलेले नाही. बहुजन समाज कसे वागतो एवढेच सांगितले आहे. असे बघा. आज सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळला आहे. म्हणून कोणी "भ्रष्टाचार हा योग्य मार्ग " असे म्हटले तर त्याला कोणी मान्यता देईल कां ? दर्शनाचे श्रेष्ठत्व त्यातील विचारसरणीवर अवलंबून असते. त्याला किती अनुयायी मिळाले यावर नाही.

महाभारत कालापर्यंत लोकायत हे विद्वत्मान्य दर्शन होते व निरनिराळ्या आश्रमात त्यावर चर्चा घडत हे मान्य. पण त्याचा येथे काहीही संबंध नाही.
शरद

एस's picture

25 Oct 2017 - 5:32 am | एस

नमस्कार. सर्वप्रथम चार्वाक तत्त्वज्ञानाची आणि भ्रष्टाचाराची तुलना केल्याबद्दल अभिनंदन! माधवाचार्य आणि आपल्या भूमिकेत लोकायत तत्त्वज्ञानाच्या प्रति असलेला तिरस्कार असा प्रकट झाल्याचे पाहून अजिबात आश्चर्य वाटले नाही. असो.

चार्वाकांच्या मताची, किंबहुना सर्वदर्शनसंग्रहात दिलेल्या सोळापैकी आधीच्या पंधरा दर्शनांची मंडळी माधवाचार्य यांनी केली आहे, ती निष्पक्ष नाही. त्यांनी ते स्वतः जर त्या त्या दर्शनाचे समर्थक असते तर त्यांनी कसा विचार केला असता ह्याची कल्पना करून हा ग्रंथ लिहिला आहे. ह्या ग्रंथाची मांडणीही अशी केली आहे की चार्वाकसारख्या तत्वज्ञानाला सर्वात आधी स्थान दिले आहे आणि शेवटी वेदांत ठेवला आहे. ही चढत्या भाजणीची मांडणी करण्यामागे वेदांताला सर्वोच्च स्थान देण्याचा हेतू आहे. सर्वदर्शनसंग्रहात माधवाचार्यांनी 'पूर्वपक्ष-उत्तरपक्ष' अशी तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात प्रचलित मांडणी करून खंडनमंडन स्वरूपाची चर्चा केलेली नाही. तेव्हा संपूर्ण सर्वदर्शनसंग्रह ह्या ग्रंथाचा उद्देश हा केवळ वेदांत हेच कसे सर्वात श्रेष्ठ दर्शन आहे आणि बाकीची मते कशी कमी दर्जाची आहेत हे सांगणे हा होता. तेव्हा, चार्वाक किंवा अन्य दर्शनांच्या यथातथ्य अभ्यासाचे साधन म्हणून सर्वदर्शनसंग्रहाचा वापर करता येत नाही.

विशेषतः चार्वाक दर्शनाबद्दल माधवाचार्य यांना वाटत असलेला तिरस्कार त्यांनी 'ऋणंकृत्वा घृतं पिबेत' ह्या मूळ श्लोकांच्या केलेल्या टिंगलटवाळीवरून सिद्ध होतोच. ही टिंगल इतकी प्रसिद्ध झाली की लोक मूळ श्लोक विसरूनच गेले आणि 'कर्ज काढून तूप प्या' उर्फ चंगळवाद आणि भोगलोलुपता हाच चार्वाक दर्शनाचा सारांश आहे असे मानू लागले. यात भलेभले विचारवंतही आले. चार्वाक तत्त्वज्ञान हे केवळ महाभारतापर्यंतच नव्हे तर अगदी मध्ययुगात अकबराच्या काळापर्यंत प्रचलित होते आणि ठाम तर्कांच्या आधारे चार्वाकवादी तत्त्ववेत्ते आपला पक्ष तत्त्वज्ञानाच्या चर्चेत मांडत असत आणि त्याला सन्मानही मिळत असे हे अनेक ठिकाणी दिसून येईल. अकबराच्या दरबारात इतर धर्म आणि दर्शनांच्या बरोबरीने चार्वाकांचाही प्रतिनिधी होता याची नोंद आहे. चार्वाक हे तत्त्वज्ञान जर केवळ 'बहुजन' वर्गाच्या रोजच्या व्यवहारापुरते मर्यादित असते तर त्याला इतर दर्शनांनी इतका मान दिला नसता, किंवा त्याची दखलच घेतली नसती. ते तसे नव्हते आणि चार्वाक उर्फ लोकायत आणि लोकायत प्रमुख भाग असलेली आन्विक्षिकी विद्या ही बहुजनांसोबतच अभिजनांमध्येही मान मिळवून होती हे स्पष्ट होते. ज्यांना बहुजनांचं सर्वच कमी दर्जाचं वाटतं त्यांना चार्वाकांच्या श्रेष्ठत्वाची ऍलर्जी असणं स्वाभाविक आहे. परंतु अशा मूठभर व्यक्तींमुळे आजही प्रत्यक्ष व्यवहारात अंमलात आणि आचरणात आणल्या जाणाऱ्या चार्वाकांच्या विचारांची महती कमी होत नाही.

- एस.

मंदार कात्रे's picture

24 Oct 2017 - 7:36 pm | मंदार कात्रे

चांगला लेख

मारवा's picture

24 Oct 2017 - 11:38 pm | मारवा

डी.डी.कोसंबी यांच्या मिथ अ‍ॅन्ड रीअ‍ॅलीटी या विख्यात ग्रंथात ही तुमचे जे खालील विधान आहे त्या संदर्भातील उल्लेख आढळतो.
ह्यातील ’त्र्यंबक’ ह्याचा मूळ अर्थ ’तीन मातांचा पुत्र’. तो गळून पडला आणि ’त्रिनेत्र’ अशा अर्थाने तोच शब्द शंकराला लागू झाला. Ambika means 'little mother',
and is elsewhere one of three sisters, jointly mothers of Tryambaka !
The presumption is
strong that the Manava sacrifice was for the Mothers, not as mere ancestresses, but as
separate goddesses in their own right whom it was necessary to appease, although vedic
practice did not openly enjoin this. It will be made plausible in what follows that this
practice was borrowed from the 'non-Aryan' element in India. This would account for the
recipients of the crossroads sacrifices not being named explicitly, and for the rite
becoming standard without benefit of the grhya-sutras, as brahminism accepted more and
more aboriginal practices. Finally, it also accounts for the cross- roads, as will appear in
the penultimate sections of this note.
The Mothers could not have been simple Aryan ancestresses, as dissociation from the
Fathers shows quite clearly. There is, moreover, an ancient tradition of mothers- incommon
that cannot be reconciled with vedic father-right. It would be difficult to explain
Panini 4.1.115 unless mothers-in-common were taken for granted by the master
grammarian. Tryambaka, later explained away as 'with three eyes' means ‘with three
mothers'. Though this appears physically impossible to us, the legends of Jarasamdha
born of two, and Jantu born of a hundred mothers-in-common show that there was an
undeniable tradition of many mothers with equal status, even for a single child. These
legends were meant to explain the record away when society had changed to the extent
that the original concept seemed fantastic. Jarasamdha was almost certainly a historic
king of Rajgir.

अनेक मातांचा मिळुन एक पुत्र असणे ही मात्र पितृसत्ताकसमाज पुर्व ( आर्यपुर्व मातृसत्ताक समाजाची ) रीत असावी असा महत्वपुर्ण निर्देश कोसंबी पुढे या शब्दांत करतात
However, several mothers who equally bear a child-in-common (without
any particular father) is a primitive concept in some kinds of pre-patriarchal society, and
the inexplicable notion is present; surprisingly enough, even in the Rgveda. But the pinda
offered to such Mothers would not have to be at the crossroads, because the domestic
offerings at eve are for the special deities and ancestors of the family. The Mothers of the
two dramas were independent deities of some sort.

पुढे मोहेंदो जरो त सापडलेल्या तीनमुखी सील शी असलेला शिवा चा थेट संबंधही ते दाखवतात

They were, however, mother-goddesses in a group, without proper names. The
Amarakosa 1.1.37 does say that they begin with Brahmi, but commentators do not agree
either as to the names or the total number, which seems to have increased well beyond
the vedic, whether three as for tryambaka or the seven never-resting (? yahvi) mothers of
truth (rta), or sixteen in another early list. Two stages are combined in the Skanda myth,
the theme of Kalidasa's unfinished or incomplete Kumara-sambhava. The young god was
born (by intermediacy of the river Ganges) jointly of six mothers-in-common (the
Pleiades) with a separate head to suckle each. (Parenthetically, this might explain the
three heads of Siva tryambaka, whose image goes back to the three-faced god on a
Mohenjo-daro seal, and who must originally have had three mothers rather than three
eyes.
Several confluent rivera could account for the many 'mothers' as well as the
polycephaly). Skanda (like his prototype Marduk in Babylon) was assigned the function
of killing a troublesome demon Tarafcasura, and recruited his army from goblins. He was
also joined by the Mothers—not the ones who bore him. but thousands of others, of
whom some 192 are named in the 46th chapter of the (Vulgate) Salya-parvan of the
Mahabharata. Three of the names are specially interesting. One companion-Mother is
Catuspatha- niketana, "housed at the crossroads'; another is named Catuspatha-rata
enamoured of the crossways. Even more remarkable is Putana. A demoness by this name
was killed by the pastoral child-god Krsna whom she tried to nurse with her poisonous
milk. The name cannot be a mere coincidence, for these Mothers-companion are
described as with horrifyingly sharp teeth and nails, protruding lips, all standard terms for
demonesses; and simultaneously as beautiful, eternally youthful women. THEY SPOKE
DIFFERENT LANGUAGES—clear sign of varied tribal origin. The cults were therefore
undoubtedly pre-Aryan, though in process of assimilation. It would appear that the
Mothers were easier to control through their child Skanda—invented for that special
purpose -than by the imposition of violently hostile -patriarchal cults. There is still not
enough to account for the crossroads in all this. Any explanation must take that location
into consideration, as also tiie great increase in the number of the Mothers, with or
without names.

एक एक देवतेची कालांतराने कशी उत्क्रांती होत जाते , त्या देवते संदर्भात कथा गाणी कविता कर्मकांडे इत्यादींच एक सुक्ष्म कॉम्प्लेक्स अस जाळं कस विणलं जातं हे या रुद्रा च्या शिवा पर्यतंच्या झालेल्या प्रवासातुन जाणवतं. हे हे लक्षात येतं की कूठलीही देवता स्टॅटीक नसते ती डायनॅमिक असते. पिढ्या न पिढ्यांच्या अनेक मानवांच्या इतिहास भाव भावनांचा योगदानांचा वैराचा आनंदाचा प्रभाव एका कलेक्टीव्ह मानस चा प्रभाव त्या देवतेवर पडत ती मुळची रॉ क्रुड देवता संप्पन्न होत जाते.
उदा. राम ही देवता काही शतकांपुर्वी तुलसीदास अस्तित्वात नव्हता. काही शतकांनंतर तो येतो रामचरीत मानस रचतो . मग रामाला असोसिएट करणारी एक रचना एक गाणे एक भाषा हे सर्व त्या मुळ रॉ राम या देवतेच्या अस्तित्वात सम्मीलीत होते. मग असोसिएशन्स इमोशन्स ने ती रॉ देवता अधिकधिक आकर्षक रीलेट करता येण्यासारखी होत जाते. सम्द्दुड्ध अजुन मुळ रुजवुन नेणीवेत रुजते.
एक एक देवतेचा उत्क्रांत होत जाण्याचा प्रवास मोठा रोचक असतो कारण तो एक एक संबंधित समुह मानस चा ही उत्क्रात होत जाण्याचा प्रवास असतो.

हा सील असावा कदाचित ज्याविषयी कोसंबी बोलत आहेत.
https://en.wikipedia.org/wiki/Pashupati_seal

1

पैसा's picture

15 Nov 2017 - 10:40 pm | पैसा

सुरेख लेख!

गामा पैलवान's picture

16 Nov 2017 - 3:42 am | गामा पैलवान

एस,

१.

आजच्या काळात मूळ वैदिक धर्माचे हिंदू धर्मात रूपांतर होताना स्वरूप जवळजवळ पूर्ण बदलून गेले आहे हे तथाकथित स्वयंघोषित संस्कृतीरक्षकांना पचनी पडणार नाही.

हे तुम्ही परस्पररीत्या कसं ठरवलंत? मी स्वयंघोषित धर्ममार्तंड आहे. मला कालच्या वैदिक धर्माचं आजच्या हिंदू धर्मात झालेलं रुपांतर आजिबात आक्षेपार्ह वाटंत नाही. कारण की सत्य एकंच असून ते अनेक प्रकारे वर्णिलं जातं.

२.

सर्वप्रथम चार्वाक तत्त्वज्ञानाची आणि भ्रष्टाचाराची तुलना केल्याबद्दल अभिनंदन!

माझ्या मते अशी काही तुलना केलेली दिसंत नाहीये. केवळ बहुजन समाज कसा वागतो इतकंच सांगितलं आहे. लोकायत कर्ममार्ग सांगतो. हे कर्म प्रचलित नीतीला धरून हवं. लोकायत दर्शनाचा नीतीशी थेट संबंध नाही. याउलट भ्रष्टाचार नैतिक मूल्यं न आचरल्याने होतो. त्यामुळे लोकायत आणि भ्रष्टाचार यांची तुलना होऊच शकंत नाही.

३.

ज्यांना बहुजनांचं सर्वच कमी दर्जाचं वाटतं त्यांना चार्वाकांच्या श्रेष्ठत्वाची ऍलर्जी असणं स्वाभाविक आहे.

हे पार असंबद्ध विधान आहे. द्रौपदीला लोकायत मार्गाची जाण होती. तिच्या वडिलांनी तिच्यासाठी ट्रेनिंग आयोजित केलं होतं. याचा अर्थ लोकायत ही पैसेवाल्यांची चैन होती. खिशात नाय दमडी आणि चाललेत लोकायत अनुभवायला, हे असंभव. त्यामुळे बहुजनांचा लोकायतशी संबंध नाही. असलाच तर विपरीत संबंध आहे.

लोकायत प्रशिक्षण घेऊनही द्रौपदीच्या धर्माचरणावर वा सतीत्वावर विपरीत परिणाम झाला नाही. म्हणजेच लोकायत हे वेदविरोधी व/वा नीतीविरोधी नाही. उगीच काहीतरी कल्पना लढवून वैदिक परंपरेस तुच्छ लेखू नये.

आ.न.,
-गा.पै.

संपूर्ण लेख आणि प्रतिसादही आवडले. संस्कृत शिकलो असलो तरी इतर काव्य वाचून समजेल इतकं येत नाही आणि अमुक ग्रंथांत काय लिहिले आहे हे कळत नाही. भाषांतरकारांच्या प्रयत्नांमुळे हे कार्य साध्य होते.

राघव's picture

16 Nov 2017 - 7:07 am | राघव

खूपच छान लेख. धन्यवाद :)
वाचनखूण म्हणून ठेवला आहे.

अनन्त्_यात्री's picture

16 Nov 2017 - 8:59 am | अनन्त्_यात्री

देवतांच्या ३३ कोटींमधील ११ कोटी रुद्रांच्या आहेत असे वाचले आहे. रुद्राच्या या ११ कोटी कोणत्या व रुद्राध्यायात या सर्व कोटींचा अंतर्भाव केला आहे का?

अरविंद कोल्हटकर's picture

16 Nov 2017 - 9:22 pm | अरविंद कोल्हटकर

’कोटि’ ह्या शब्दाचा आपणास आज अधिक ठाऊक असलेला अर्थ म्हणजे १,००,०००,०० ही संख्या. ह्या अर्थाने एकूण ३३ कोटि देव आहेत अशी श्रद्धावन्तांची श्रद्धा असते.

’कोटि’ त्या शब्दाला अजूनहि एक अर्थ आहे आणि तो म्हणजे ’सर्वोच्च बिंदु, excellence, eminence, प्रकार, type इत्यादि. (आपण ’उच्च कोटीचा’ हा शब्दप्रयोग करतो तेव्हा हाच अर्थ आपल्याला अभिप्रेत असतो.) ह्या अर्थाने देवांमध्ये ३३ प्रकार आहेत आणि ते म्हणजे इन्द्र, प्रजापति, आठ वसु, अकरा रुद्र आणि बारा आदित्य, एकूण तेहतीस.

ह्यांची नावे मत्स्य, गरुड इत्यादि पुराणांमध्ये आणि महाभारतासारख्या काव्यामध्ये मिळतात आणि ते प्रत्येक ग्रन्थामध्ये निरनिराळी दिलेली आहेत. ’शब्दकल्पद्रुम’ ह्या बृहत्कोशामधून मी काढलेली नावे अशी: इन्द्र, प्रजापति, आठ वसु (धर, ध्रुव, सोम, सविता, अनिल, अनल, प्रत्यूष आणि प्रभात), अकरा रुद्र (अज, एकपात्, अहित्रघ्न(?), पिनाकी, अपराजित, त्र्यम्बक, महेश्वर, वृषाकपि, शम्भु, हरण आणि ईश्वर), बारा आदित्य (विवस्वान्, अर्यमा, त्वष्टा, सविता, भग, धाता, विधाता, वरुण, मित्र, शक्र, उदक्रम.)

रुद्राच्या आवर्तनांमध्ये ’अकरा’ ह्या संख्येस जे महत्त्व आहे असे लेखामध्ये लिहिले आहे त्याचा उगम ’अकरा रुद्रां’मध्ये असावा.