सफर ग्रीसची: भाग ११ - गूढरम्य डेल्फी १
बसमधून उतरायच्या आधी उजवीकडे अवशेषांचं दर्शन झालं. संप वगैरे नव्हता. डेल्फी म्हणजे छोटंसं गावठाण आहे. स्टॉपसमोरच्या कॅफेत बसचं तिकिट मिळतं. लगेच परतीचं तिकिट काढलं. भूक लागली होती, दिवसभरात खूप चालणंही होणार होतं. मग कॅफेतच अंड्याचा पोळा, पाव आणि कॉफी अशी पोटपूजा केली आणि डेल्फी बघायला सज्ज झालो. तिथून चालत दहा मिनिटांवर प्रवेशद्वार होतं. आजूबाजूला पर्वतराजी आणि दूर समुद्राचं पाणी असा नजारा पाहून प्रसन्न वाटत होतं.
इसवीसनपूर्व आठव्या शतकात डेल्फीला महत्त्व प्राप्त व्हायला सुरूवात झाली. इ.स.पूर्व सातव्या शतकात इथे अपोलो आणि अथेना (Athena Pronaia) या मुख्य देवतांची मंदिरे बांधली गेली. डोंगराच्या मध्यभागी बांधलेल्या अपोलोच्या देवळात जाण्यासाठी डेल्फीच्या प्रवेशद्वारापासून Sacred Way नावाचा मार्ग होता. देवळाच्या मागच्या बाजूला नाट्यगृह (theatre) आणि त्याच्या मागे आणखी उंचावर क्रीडांगण (stadium) होते. या दोन ठिकाणी ऑलिंपिक खेळांसारखे Pythian Games भरवले जात असत.
संग्रहालयातील अपोलोच्या देवस्थानाचा आराखडा
अपोलोच्या देवळातील मुख्य पुजारिणीला (High Priestess) पिथिया (Pythia) म्हणत असत. भविष्यवेत्ती (Oracle of Delphi) म्हणून पिथियाची हळूहळू ख्याती होत गेली. अपोलो पिथियाच्या माध्यमातून दैवी संकेत देतो अशी श्रद्धा होती. या ओरॅकलचा सल्ला घेण्यासाठी भेटवस्तू घेऊन सर्वसामान्य लोक येत तसेच वेगवेगळ्या राज्यांचे प्रतिनिधीही येत असत. धार्मिक आणि राजकीय महत्त्व वाढत गेले तशीच अपोलोच्या देवस्थानाची संपत्तीही. अनेक नगरराज्यांनी इथे porticoes बांधले, पुतळे उभारले. देवाला समर्पित केलेल्या वस्तू ठेवण्यासाठी किंवा युद्धातील विजयाचे प्रतिक म्हणून treasuries बांधल्या. ओरॅकलची कीर्ती या काळात सर्वदूर पसरली होती. वैभवाच्या शिखरावर असताना डेल्फीतील अपोलोच्या देवळाचा परिसर कसा दिसत असेल याची कल्पना या चित्रावरून येते.
त्या २,७०० वर्षे पुराण्या वैभवाच्या खुणा काही इमारतींच्या आणि वस्तूविशेषांच्या रूपात अजूनही शिल्लक आहेत. जिथे फक्त इतस्ततः विखुरलेले दगडधोंडेच उरले आहेत तिथेही गतवैभवाचं चित्र डोळ्यांसमोर सहज उभं राहतं. डेल्फीचे अवशेष दोन भागांत आहेत. एका बाजूला डोंगरउतारावर मुख्य अवशेष आणि वस्तुसंग्रहालय आहे. हा भाग आम्ही आधी पाहणार होतो. रस्त्याच्या दुसर्या बाजूला दूर डोंगराच्या पायथ्याशी अथेनाच्या sanctaury चे आणि इतर इमारतींचे अवशेष अस्पष्ट दिसत होते.
प्रवेशद्वारातून आत जाऊन थोडं चालल्यावर अपोलोच्या sanctaury च्या परिसर समोर आला.
अपोलोच्या sanctaury त एक फेरफटका मारून येवू!
Treasury of the Athenians: सुस्थितीत असलेली डेल्फीतील महत्त्वाची इमारत
इ.स.पूर्व सहाव्या शतकात अपोलोच्या देवळाला आधार देण्यासाठी बांधलेली polygonal भिंत. मागे देवळाचे खांब आणि पुढे Stoa of the Athenians चे अवशेष आहेत. अथेनियन्सनी युद्धात, विशेषतः पर्शियन्सकडून, लूटलेल्या आणि देवाला अर्पण केलेल्या वस्तू Stoa या इमारतीत ठेवत असत. पर्शियाच्या झर्क्सिसला एका लढाईत हरवल्यावर अथेनियन्सनी ही इमारत बांधली.
देवळाचा परिसर
परिसरातील एका खांबावरील लेख
मुख्य देऊळ
उंचावरून दिसणारं पार्नासस पर्वताच्या कुशीत वसलेलं अपोलोचं देऊळ
थिएटर आणि त्याखाली देवळाचे अवशेष
थिएटर बघून एक चढण चढल्यावर स्टेडियमपाशी आलो. इ.स. पूर्व पाचव्या शतकात इथे एक racing track बनविण्यात आला, प्रेक्षकांना जमिनीवर बसावे लागे. दुसर्या शतकात रोमन सम्राट हाड्रियनच्या कार्यकाळात बांधलेलं तीन arches असलेलं प्रवेशद्वार (क्र. २) आणि संगमरवरी आसने अजूनही आहेत.
स्टेडियमची रचना
शर्यतीचा १७८.३५ मीटरचा track आणि उजवीकडे arched entrance. साधारण मध्यभागी परीक्षकांची विशेष आसने दिसत आहेत.
शर्यत संपते ते स्टेडियमचं टोक
आमचीही डेल्फीची अर्धी शर्यत झाली होती. वस्तूसंग्रहालय आणि डोंगर उतरून अथेनाचं देऊळ पाहण्याआधी थोडा श्रमपरिहार केला. समोर दिसणारं डेल्फीचं विहंगम दृश्य साथीला होतंच!
(क्रमशः)
In reply to जबरदस्त झालाय हा भाग. by प्रचेतस
In reply to धन्यवाद! डेल्फीचं setting ही by निशाचर
In reply to जबरदस्त झालाय हा भाग. by प्रचेतस
In reply to सुंदर सफर. मस्तं फोटो ! by डॉ सुहास म्हात्रे
जबरदस्त झालाय हा भाग.