डंकर्क.... भाग ३

Primary tabs

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
6 Oct 2017 - 11:46 am

पण त्या क्षणी तरी विजयमाला हिटलरच्या आर्देन्सच्या जंगलातून परजत येत असलेल्या चिलखती दलाच्या गळ्यात पडली होती....
पुढे चालू...

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

अर्देन्सच्या जंगलात फ्रान्सच्या ९व्या आर्मीमागे या सेना स्वैर संचार करून त्यांना हैराण करत होत्या. फ्रान्सच्या सैन्यात गोंधळाचे व भीतीचे वातावरण पसरले होते. पराभूत मनोवृत्तीने जोर धरला होता. जर्मनीच्या दोन आर्मर्ड डिव्हिजन मूज नदी पार केली आणि १५ मे ला भल्या पहाटे चर्चिल यांना एक फोन आला ज्याने त्यांची झोप उडाली. फोन होता फ्रान्सच्या पंतप्रधानांचा, म्हणजे पॉल रेनॉड यांचा. ते म्हणत होते,

‘‘ आमचा पराभव झाला आहे. आम्ही लढाई हरलो आहोत.’’

सगळ्या लष्करी ताकदीचा विचार केला तर दोस्तांकडे वर उल्लेख केलेल्या पायदळा खेरीज अकराशे लढाऊ विमाने, चारशे बाँबफेकी विमाने तर लुफ्तवाफकडे तेवढीच लढाऊ विमाने, अकराशे बाँबफेकी आणि तिनशे पंचवीस सूर मारून बाँबवर्षाव करणारी (डाईव्ह बाँबर्स) होती. या डाईव्ह बाँबर्सला दोस्तांकडे उत्तर नव्हते.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

दोस्त राष्ट्रांची विमाने मुख्यत: हवाई टेहळणी आणि स्वसंरक्षणासाठी वापरण्यात येत होती या विरूद्ध पायदळासाठी जमिनीवरून विमानांशी संदेशवहनाचे तंत्रज्ञान विकसित करून जर्मनीने आक्रमण करणार्‍या पायदळाला लुफ्तवाफच्या विमानांनी पाठबळ देण्याचे तंत्र विकसित केले होते आणि ते पोलंड व नॉर्वेच्या विरुद्ध यशस्वीरीत्या वापरलेही होते. फ्रान्सचा तोफखाना आणि रणगाड्यांविरुद्ध वापरायचा तोफखाना हे खरे तर जर्मनांच्या तोफखान्यापेक्षा खूपच सरस होता पण जर्मनांच्या विमान विरोधी ८८ मिमी व्यासाच्या तोफेस तोड नव्हती. ही तोफ विमान विरोधी असली तरी ती रणगाड्यांच्या विरोधातही वापरता येत असे. ब्रिटीशांच्या माटिल्डा रणगाड्यावर असलेली २-पौंडी तोफ जर्मनांच्या पॅंझरवर असलेल्या मार्क - ३ ३७ मिमी तोफेच्या, तोडीसतोड होती. असे तुल्यबळ लष्करी ताकद दोन्ही बाजूला होते मग जर्मनांची सरशी का झाली ? नुसते शस्त्र बळ असून चालत नाही, हे त्याचे उत्तर आहे. सैनिकांचे मनोबल, त्यांचे प्रशिक्षण, त्यांचे सेनानी, मानसशास्त्र, हालचाली, वेग, कामावरची निष्ठा, शस्त्रास्त्रांचा दर्जा या व यासारख्या अनेक गोष्टींचा अशा युद्धात कस लागत असतो आणि यात जे सरस असतात तेच जिंकतात. जर्मन औफट्रॅग्सटॅकटीक कल्पनेचा ही यात महत्त्वाचा सहभाग होता.

औफट्रॅग्सटॅकटीक
जर्मन युद्धनीतीचा हा एक महत्त्वाचा भाग होता आणि आहे. ही एक आदेश द्यायची आणि ते कसे पाळायचे याची पद्धत आहे. यात जे आदेश स्वीकारतात त्यांना त्या आदेशाची पार्श्वभूमी आणि ते आदेश का दिले आहेत याची पूर्ण जाण असावी लागते. यात या दुसर्‍या फळीला एकदा आदेश मिळाला की त्यांना तो कसा अमलात आणायचा याचे त्यांना पूर्ण स्वातंत्र्य असते. त्यांना स्वतंत्रपणे ही कारवाई करायची क्षमता येण्यासाठी तसे प्रशिक्षणही दिले असते.यामुळे प्रत्यक्ष रणांगणात जो सेनाधिकारी लढत असतो तो पटकन निर्णय घेऊ शकतो. याचा दुसरा फायदा असाही होतो की एकदा कामगिरी सोपवली की वरीष्ठ या कामगिरीपासून मुक्त होऊन दुसर्‍या आघाडीकडे लक्ष पुरवू शकत. या पद्धतीचे यश हे आदेश स्वीकारणार्‍या त्या आदेशाचे कारण कितपत समजले आहे याच्यावर अवलंबून असते. याच्या विरुद्ध असलेली पद्धत म्हणजे कमांड अँड कन्ट्रोल जी आज अमेरिकन सैन्यदलासाठी वापरली जाते. (आणि आपल्याकडेही वापरली जाते)

फ्रान्सची ९ वी आर्मी पूर्णपणे विस्कळीत झाली होती. दोस्तांच्या संरक्षण फळी पडलेल्या ५० मैल रुंदीच्या खिंडारातून पॅन्झर अक्षरश: लोण्यातून सूरी फिरावी तसे पुढे जात होते. ते आता फ्रान्समधे जवळजवळ १०० मैल आत घुसले. निर्वासित झालेल्या जनतेने मग रस्त्यांवर गर्दी केली ज्यांनी दोस्तांच्या सैन्याच्या हालचालींना अटकाव होऊ लागला.

दक्षिणेकडे फ्रान्सचे सैन्य मार खात असताना उत्तरेकडे ब्रिटिश सैन्य मोठ्या धीराने जर्मन सैन्याला तोंड देत होते. ब्रिटिश वायूदल व पायदळाच्या सैन्याने मोठ्या चिवटपणे युद्धात भाग घेतला ज्याचा त्यांना पुढे फायदाच झाला.

ब्रिटिश सैन्याच्या या चिवट प्रतिकारामुळे १५ मे पर्यंत डायल नदीच्या आसपास असलेल्या संरक्षक फळीला, जर्मन सैन्य कुठेही खिंडार पाडू शकले नव्हते. ब्रिटिशांच्या उजव्या बाजूला लढणारी फ्रान्सची आर्मी-१ मोठ्या शौर्याने लढत होती खरी पण थोड्याच काळात त्यांचाही धीर सुटला व त्यांच्या फळीला भले मोठे भगदाड पडले. त्यांच्या डाव्या बाजूला सगळा आनंदी आनंद होता. बेल्जियम सैन्याचे असंख्य तुकडे पडले होते व डच सैन्याचा नाश थोड्याच काळात अटळ होता. जर्मनांनी डचांनी शरणागती पत्करावी म्हणून रॉटरडॅमवर अमानुष हवाईहल्ले चढवले. (हीच युक्ती नंतर ब्रिटिश वायुदलाने नंतर वापरून जर्मनांचे खच्चीकरण केले.)

रॉटरडॅम...
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

दुसर्‍या महायुद्धात जनतेचे, सैनिकांचे मनोबल हा एक फार महत्त्वाचा घटक होता आणि चर्चिलच्या भाषणांनी ब्रिटीश जनतेचे देशप्रेम आणि देशाभिमान जागॄत केला. स्टॅलिनने एकदा छद्मीपणे विचारले होते की पोपकडे किती डिव्हिजन सैन्य आहे ? त्याला म्हणायचे होते की या काळात फक्त सैन्य हेच महत्त्वाचे आहे, बाकी काही नाही. पण चर्चिलच्या स्वरयंत्राची किंमत त्या काळात अनेक डिव्हिजन सैन्यापेक्षा ही जास्त होती. दररोज रात्री नऊ वाजता आख्ख्या ब्रिटनमधील रेडिओ चालू व्हायचे आणि त्यावर चर्चिलच्या खंबीर आवाजाची जनता आतुरतेने वाट पहायची. त्या भाषणात ब्रिटनचा इतिहास, ड्रेक आणि नेल्सन यांच्य़ा शौर्याची उदाहरणे देत चर्चिल महाशय ब्रिटीश जनतेला पटवून देत की हा देश इतिहासात अशा अनेक संकटातून गेला पण नष्ट झालेला नाही आणि या वेळीही तेच होणार आहे.

ब्रिटनला रोज हवाई हल्ल्याशी सामना करावा लागत होता. “इमारती तोडणार्‍या कंत्राटदारांचा भला मोठा लोखंडी गोळा जसा भिंतीवर आदळतो त्या प्रमाणे रोज आमच्यावर आकाशातून हातोडे पडत होते” इतिहासकार हॉवर्डने त्यावेळचे वर्णन करताना लिहून ठेवले आहे. डाईल-ब्रेडा आघाडीवर जर्मनीच्या आर्मी ग्रुप बी ने अजून यश मिळवले नसतानासुद्धा पंधरा मेला डचांनी शरणागती पत्करली. रॉटरडॅम बाँबवर्षावात जवळजवळ संपूर्ण नष्ट झाले होते आणि ऐशी हजार लोक बेघर झाले. असा विध्वंस अजून दुसर्‍या कुठल्या शहराच्या नशिबी यायला नको म्हणून डच लष्कराच्या प्रमुखाने – हेन्री विंकेलमन याने रेडिओवर या शरणागतीची घोषणा केली. खरे तर या बाँब वर्षावात फक्त ९८० माणसे ठार झाली होती पण तो विध्वंस बघून नाझींच्या दहशतीने सामान्य जनतेच्या ह्रदयाचा थरकाप उडाला.

फ्रान्सच्या सातव्या आर्मीने ज्या तडफेने हॉलंडमधे प्रवेश केला होता त्याच तडफेने ती सेना अँटवर्पच्या संरक्षण फळीत आक्रसली. १५ मे ला डचांनी वर उल्लेख केलेली शरणागती पत्करली आणि १६ मे ला ब्रिटीश एक्सपिडिशनरी फोर्सच्या प्रमुखाला, लॉर्ड गॉर्टला, जनरल बिलोट्टेने माघारीची सूचना केली.

उत्तरेकडे आघाडी विस्कळीत झालेली, दक्षिणेकडे जर्मन रणगाडे खोलवर घुसत असताना ब्रिटीश एक्सपिडिशनरी फोर्स व फ्रान्सच्या पहिल्या आर्मीला पाय रोवून उभे राहण्यासाठी शेल्ट नदीपर्यंत माघार घेणे भाग होते. येथे दोस्तांची दुसरी संरक्षण फळी होती व ब्रिटिशांच्या सात डिव्हिजन लढत होत्या. ब्रुसेल्स आणि कँब्रामधून जर्मन सेना घुसली व तिने सेंट क्वेंटिनला वळसा मारून तिच्या अठरा डिव्हिजननी अमाइन्सला वेढा घातला.

जर्मन सैन्याच्या आघाडीच्या फौजा ब्रिटीश एक्सपिडिशनरी फोर्सला सतावत होत्या. त्यांनी त्यांच्या पुरवठा करणारी यंत्रणा मोडकळीस आणली. त्या फौजांचे ध्येय पॅरीस गाठणे हे नव्हतेच. त्यांना चॅनेलवरील बंदरांवर कब्जा करायचा होता. कारण उघड आहे. याच काळात फ्रेंच हायकमांडला धोरण लकव्याने गाठले. हा नवीन शब्द या स्थितीचे वर्णन करण्यास उपयुक्त आहे. वाढत जाणार्‍या जर्मन सैन्यावर प्रतिहल्ला करण्यासाठी त्यांच्याकडे आता सेनाच नव्हती.

लंडनमधे काळजीत असलेल्या वॉर कॅबिनेटला जनरल गॉर्टने ब्रिटीश एक्सपिडिशनरी फोर्सच्या माघारीची परवानगी मागितली. त्याच्या ब्रिटीश एक्सपिडिशनरी फोर्सला अमाइन्स येथे फ्रेंच सैन्याला जाऊन मिळण्याचा आदेश मिळाला पण आता उशीर झाला होता. २० मे ला जर्मन फौजांनी अमाइन्स व ॲबेव्हील काबीज करून चॅनेलचा किनारा गाठला होता. गॉर्टच्या सेनेचा तिच्या मुख्य फौजेशी असणारा संपर्क तोडण्यात जर्मन सेनेला यश आले. वॉर कॅबिनेटच्या वृत्तांतात अशी नोंद आहे की पंतप्रधानांनी सावधगिरी म्हणून नौदलाने मोठ्या प्रमाणावर छोट्यामोठ्या बोटी तयार ठेवाव्यात ज्या गरज पडली तर फ्रान्सच्या किनाऱ्यावरून अडकलेल्या सैनिकांना परत आणू शकतील.’’ नौदलाने या वर ताबडतोब कार्यवाही केली व व्हाईस ॲडमिरल सर रॅमसे यांना या योजनेचे प्रमुख म्हणून नेमले. योजनेला नाव देण्यात आले
‘ऑपरेशन डायनामो’’

या व्हाईस ॲडमिरलकडे अंदाजे फक्त तीस विविध प्रकारच्या बोटी उपलब्ध होत्या पण त्याने लगेचच मोठ्या संख्येने असलेली सैनिकांना परत आणण्यासाठी योजना आखली. त्यात कॅले, बोलोन व ड्ंकर्क येथून रोज १०,००० सैनिक परत आणण्याची योजना तयार झाली. याशिवाय अजूनही तीन चार छोटी बंदरे होती तेथूनही असे सैनिक परत आणण्यात येणार होते. ३० फेरी बोटी, १२ नौदलाच्या ड्रिफ्टर व सहा किनाऱ्यावर वाहतूक करणाऱ्या बोटी तयार करण्यात आल्या. थोड्याच काळात त्यांना अजून एक महत्त्वाची मदत मिळाली ती म्हणजे ब्रिटिश बंदरातून आसऱ्याला आलेल्या ४० डच बोटी त्यांना सामील झाल्या. या बोटी नौदलाच्या ताब्यात देण्यात आल्या व त्याच्यावर नौदलाचे अधिकारी नेमण्यात आले. हारविच ते वेमाउथ या किनारपट्टीवर असलेल्या १००० टन पर्यंतच्या सगळ्या बोटींची यादी बनविण्यात आली. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती ती या सगळ्या बोटींना हवाई संरक्षण पुरवणे.

जेव्हा युद्ध सुरू झाले तेव्हा ब्रिटिशांची हुरिकेनची फायटरची १० स्क्वाड्रन फ्रान्समधे तैनात होती. त्याच्या बरोबर एक इंजिन असलेल्या बाँबर विमानांची ८ स्क्वाड्रन फ्रान्समधे होती. या विमानांचे लवकरच नामकरण झाले, ‘उडत्या शवपेट्या’. शिवाय दोन इंजिने असलेल्या ब्लेनहाईम बाँबर्सचीही ६ व लायसॲन्डर टेहळणी करणाऱ्या विमानांची ५ स्क्वाड्रन ही फ्रान्समधे होती. फ्रान्सने अजून विमानांची मागणी केली पण एअर-चिफ-मार्शल सर डाउउडिंग याने त्याला स्पष्ट नकार दिला. त्याने राजीनामा देईन पण एकही जास्त विमान मिळणार नाही असे बजावले. त्याला कमीतकमी २५ स्क्वाड्रन ब्रिटनच्या संरक्षणासाठी पाहिजे होती. त्याने स्पष्टच सांगितले, ‘‘ हा काही या युद्धातील निर्णायक क्षण नाही आणि हा ‘लढा किंवा मरा’ असा अंतीम क्षणही नाही. माझ्या दृष्टीने तो क्षण जेव्हा हिटलर त्याच्या लुफ्तवाफला लंडनवर हल्ले चढवायला सांगेल तेव्हा येईल. त्यावेळेस जर आकाशात माझे वर्चस्व असेल व समुद्रावर मुक्त संचार असेल, आम्ही तो ठेवूच, तर आम्ही तुमचे गेलेले सगळे परत मिळवून देऊ.’’

जेव्हा ब्लिट्झक्रीग सुरू झाले तेव्हा फ्रान्सकडे शंभरही विमाने नव्हती. आणि जी होती त्यातील फक्त २५ आधुनिक होती. त्यामुळे दोस्तांनी बॅटल विमानांचा वापर केला. याच विमानांना उडत्या शवपेट्या असे टोपण नाव पडले हे वर लिहिलेच आहे. नाही म्हणायला यांच्याबरोबर दोन इंजिने असलेल्या ब्लेनहाईम या विमानांनीही यात भाग घेतला. यांचे लक्ष्य साधारणत: पूल व दळणवळणाचे रस्ते हे होते, जेणे करून त्या रस्त्यावर कोंडी होवून रणगाड्यांची हालचाल मंदावेल. ब्रिटनच्या हवाईदल त्यांची बाँबर विमाने ऱ्हुर प्रांतातील दाटीवाटीने वसलेल्या कारखान्यांचा नाश करण्यासाठी वापरायची होती पण त्यांना मोठ्या विचित्र कारणाने त्यासाठी परवानगी नाकारण्यात आली. जनरल गॅमलिनला वाटत होते की तसे केले तर जर्मन वायुदल त्याचा फ्रान्सच्या शहरांवर सूड घेईल असे कारण पुढे करण्यात आले. शेवटी एअर मार्शल सर ऑर्थर बॅरॅट यांनी पुढाकार घेऊन त्याच्या बॅटलसारख्या विमानांनी हल्ला चढवला. अर्थात त्याचा निकाल जो लागायचा तोच लागला. पहिल्याच हल्ल्यात अनेक विमाने मशीनगन आणि बंदुकांनी पाडण्यात आली. आर्देन्समधे केलेल्या एका हल्ल्यात आठ विमानांपैकी फक्त एकच परत येऊ शकले.

२० मे रोजी जर्मन सैन्याचा डाव उघड झाला आणि दोस्तांच्या छातीत धडकी भरली. जर्मन सेना निश्चितपणे समुद्राच्या किनार्‍याकडे चालली होती. त्यांनी ॲबेव्हील जाळले आणि उत्तरेकडील दोस्तांच्या सेनेशी संपर्क तुटला. त्यात ब्रिटीश एक्सपिडिशनरी फोर्सच्या सैन्याचाही समावेश होता. प्रत्येक तासाला परिस्थिती भयंकर होत होती. माघारीचे सर्व मार्ग पळणार्‍या जनतेने कोंडले होते. पहिल्या महायुद्धानंतर मॅजिनो म्हणजे शत्रू त्यातून येणे शक्यच नाही अशी सर्व जनतेचीच काय सैनिकांचीही खात्री होती. आता शत्रू समोर उभा ठाकल्यावर सगळ्यांचीच भंबेरी उडाली. मॅजिनोच्या एवढ्या सहज चिंधड्या उडतील असे कोणाला स्वप्नातही वाटले नव्हते. एखादा फुगा टाचणीने फुटावा तसा फ्रान्सच्या सेनेचा फुगा फुटला.

एक शेवटचा प्रयत्न म्हणून दक्षिणेकडे जर्मन सैन्याच्या रणगाड्यांची फळी तोडण्यासाठी एक प्रतिहल्ला चढविण्यात आला पण फ्रेंच सैन्याने या हल्ल्यात भाग घेतला नाही. चेरबोर्गला उतरलेल्या ब्रिटिश आर्मर्ड डिव्हिजनला आता ब्रिटीश एक्सपिडिशनरी फोर्सच्या मदतीला जाण्यास उशीर झाला होता. या सेना न मिळाल्यामुळे त्याचा परिणाम भयंकर झाला. ब्रिटिशांच्या दोन अपूर्ण डिव्हिजन व ६५ जुनाट रणगाड्यांच्या एका ब्रिगेडला जर्मन सातव्या व आठव्या आर्मर्ड डिव्हिजनच्या ४०० रणगाड्यांना तोंड द्यावे लागले. या दोन डिव्हिजनचा कमांडर होता जनरल रोमेल. थोड्याच काळात यांना अजून एक पँझर डिव्हिजन व एस्‌ एस्‌ ची एक अशा दोन डिव्हिजन येऊन मिळाल्या. पण या हल्ल्यात ब्रिटिश शौर्याने लढले असेच म्हणावे लागेल. माघार घेताना त्यांनी ५०० जर्मन सैनिकांना युद्धकैदी केले.

दक्षिणेकडे न जाता आल्यामुळे वर उल्लेख झालेल्या ब्रिटीश आणि फ्रेंच सेनेने डंकर्कच्या दिशेने माघार घेतेली. २१ मे रोजी जनरल गॅस्टॉन बिओत्तच्या कारच्या अपघातात झालेल्या मृत्यूनंतर फ्रान्सच्या सर्वोच्च लष्करी मंडळात नैराश्याचे वातावरण पसरले. जनरल बुफाच्या मते त्यांचे मनोबल सेदान येथे झालेल्या जनरल कोरापच्या पराभवानंतर ढासळले होते ते त्यातून कधीच सावरले नाहीत. दुसर्‍याच दिवशी दोस्त राष्ट्रांच्या हातातून त्यांचा फ्रान्समधील एकुलता एक मेरव्हिले यथील विमातळ गेला त्यामुळे ब्रिटीश विमानांना आता चॅनेलच्या पलीकडून उड्डाणे करायला लागत होती. त्यामुळे त्यांना लुफ्तवाफच्या विमानांबरोबर लढाई करायला कमी वेळ आणि इंधन मिळायला लागले.

बेल्जियम मधे जर्मन...
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

२५ मे ला लॉर्ड गॉर्टला एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे आता त्याला फक्त डंकर्कमधूनच सुटणे शक्य होते. बेल्जियम सैन्य जे त्याच्या उत्तरेकडील बाजूला होते त्याची पूर्णपणे धुळदाण उडाली होती व त्यांचा राजा लिओपोल्ड याची शरणागतीची तयारी झाली होती. ( त्यामुळे झीब्रूग, ऑस्टेंड व न्युपोर्ट ही बंदरे आता आपरता येणार नव्हती. आता प्रश्न उरला होता तो ब्रिटीश एक्सपिडिशनरी फोर्स त्या १५ मैल रूंद व ५० मैल लांब असलेल्या पट्ट्यातून डंकर्कला कशी पोहोचणार तो. त्यांना जर वेढण्यात आले असते तर त्यांचा विनाश अटळ होता आणि समजा पोहोचलीच तर त्यांना इंग्लंडला परत आणता येईल का… जर्मन सैन्याचा डाव स्पष्ट होता. जनरल फॉन ब्राऊस्टीशने जो जनरल रुनस्टेडला आदेश दिला होता त्यात त्याने स्पष्टच म्हटले होते, ‘चवथ्या आर्मीला वेढा घालू दे…’ पण अरस येथे ब्रिटिश फौजांनी जी प्रतिकाराची चुणूक दाखविली होती त्याने जर्मन सेनानींना विचार करण्यास भाग पाडले. रुनस्टेडला त्याचे रणगाडे इतर फौजांच्या मदतीशिवाय या लढाईत उतरवणे प्रशस्त वाटले नाही आणि ते बरोबरही होते.

डंकर्कच्या वेढ्यात अडकलेल्या सैन्याच्या सुटके आधी एक आठवडा अगोदर ब्रिटीश एक्सपिडिशनरी फोर्सच्या २७९३६ बाजारबुणग्यांना हलवण्यात आले होते. यांच्या सुटकेच्या कार्यवाहीचे प्रमुख रायफल ब्रिगेडचे कर्नल लॉर्ड ब्रिजमन आणि व्हाईस एडमिरल रामसे होते. कर्नल ब्रिजमन यांनी त्यावेळी जरा कठोर मतप्रदर्शन केलं, “खायला भार असलेल्या मंडळींना अगोदर तेथून बाहेर काढण्यात आले’’. ही मंडळी परत आलेली बघून काहीतरी गडबड आहे आणि काहीतरी भयंकर घडणार आहे, याची कल्पना ब्रिटीश जनतेला आली आणि थोड्याच दिवसात त्याचा प्रत्ययही आला. चोवीस मेला जर्मन आर्मी ग्रुप ए आणि आर्मी ग्रुप बी एकत्र मिळाल्या आणि त्यांनी दोस्तराष्ट्रांच्या सैन्याला फ्रान्सच्या एका कोपर्‍यात कोंडायला सुरुवात केली.

तेवढ्यात एक अघटित घटना घडली. क्लाईस्टचे पॅंझर डंकर्कपासून फक्त अठरा मैलांवर असताना त्याला त्याची आगेकूच रोखण्याची हिटलरकडून आज्ञा मिळाली. वेअरमाख्ट्च्या कमांडर-इन-चीफ ब्राऊश्टीचच्या “डंकर्क काबीज करा” या आज्ञेच्या बरोबर विरोधी ही आज्ञा होती. या आदेशात असेही स्पष्ट म्हटले होते की लेन्स-बेथ्यू-सेंट-ओमेर-ग्रेवलाईन्स ही रेषा ओलांडू नये. हा आदेश का देण्यात आला हे दुसर्‍या महायुद्धातील एक मोठे रहस्य आहे. जनरल रुनस्टेडने क्लाईस्टची आगेकूच रोखावी व त्याला त्या डंकर्कच्या कोपर्‍यात जाण्यापासून रोखावे अशी विनंती हिटलरला केली होती आणि त्या विनंतीला मान्यता देऊन हिटलरने हा निर्णय घेतला असाही एक प्रवाद आहे. दोस्तांच्या सेनेचा धुव्वा उडविण्याची ही संधी हातची जाताना क्लाईस्ट आणि गुडेरियन हताशपणे बघत राहिले. या आदेशाने दोस्तांच्या सैन्याला अत्यंत आवश्यक असे ४८ तास मिळाले. त्यात त्यांनी डंकर्कची नाकेबंदी केली आणि त्याच्या किनार्‍यावरून सैनिकांच्या तुकड्यांना समुद्रमार्गे त्या वेढ्यातून सोडवले. OKH च्या रणगाडा विभागाचा प्रमुख जनरल विल्यम फॉन थोमा हा त्यावेळी आघाडीवर बर्गेसजवळ होता आणि त्याला डंकर्कमधे काय चालले आहे ते स्पष्ट दिसत होते. त्याने OKHला हल्ल्याची परवानगी द्यावी असे वारंवार निरोप पाठवले पण त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्याने नंतर उद्‌गार काढले, अर्थात हिटलर मेल्यानंतर, “मुर्खाशी तुम्ही बोलू शकत नाही. हिटलरने जर्मनीला एका मोठ्या विजयाची संधी नाकारली.”

चर्चिलने या हजारो सैनिकांच्या सुटकेला एक चमत्कार म्हटले जो हिटलरच्या आणि रुन्स्टेडच्या कृपेने घडला होता. जर्मनांच्या हातून पुढे जी चुकांची मालिका घडत गेली त्याची ही सुरवात आणि चुणूक होती.

जनरल क्लाईस्ट म्हणाला, “मी अत्यंत काळजीपूर्वक आखलेल्या सापळ्यातून हिटलरच्या मदतीने ब्रिटीश आणि फ्रेंच सैन्याने आपली सुटका करून घेतली. अरस ते डंकर्क हा रस्ता पार करून माझ्या सैन्याने उंचावरच्या सगळ्या जागांवर कब्जा मिळवला होता ज्यामुळे डंकर्कवर आमचा पूर्ण ताबा होता. ब्रिटीश सैन्याला डंकर्कमधे प्रवेश न करू देणे आम्हाला पूर्णपणे शक्य होते. पण तेवढ्यात स्वत: हिटलरने आम्हाला त्या उंचीवरच्या जागा सोडायला सांगितल्या”

क्लाईस्टने एक मोठी चूक केली ती म्हणजे रुन्डस्टेडचे हिटलरजवळ किती वजन आहे याचा त्याने बांधलेला चुकीचा अंदाज ! अर्थात या मोहिमेच्या यशाचे श्रेय जर हिटलरला दिले गेले असेल तर क्लाईस्टला डंकर्क काबीज करायच्या अगोदर थांबायला सांगण्याची जबाबदारीही हिटलरनेच स्वीकारली पाहिजे. ती रुन्डस्टेडवर टाकून कसे चालेल ? काहीच दिवसांनंतर क्लाईस्ट हिटलरला कांबलेच्या विमानतळावर भेटला तेव्हा त्याच्या मनातील ही बोच त्याने हिटलरला बोलून दाखवली. “एक फार मोठी संधी आपण डंकर्कला घालवली”. हिटलरने उत्तर दिले “ तसेही असेल ! पण मला आपले रणगाडे फ्लॅंडर्सच्या दलदलीच्या प्रदेशात पाठवायचे नव्हते आणि मला नाही वाटत की ब्रिटीश आता या युद्धात परत उतरतील.” दुसर्‍या एका ठिकाणी हिटलरने याच प्रश्नाचे वेगळे उत्तर दिले. त्यात त्याने रणगाड्यांची नादुरूस्ती, तसेच फ्रान्सच्या उरलेल्या सैन्याचा पराभव करायला तंदरूस्त चिलखती दले लागतील म्हणून थांबायचा आदेश दिला असे सांगितले.
१९४४ मध्ये चर्चिल बेल्जियमच्या राजपुत्राचा स्वीय सचिव आंद्रे द स्टार्क बरोबर डंकर्कवरून विमानाने जात असता त्याने खाली बघून म्हटले, “हिटलरने डंकर्कला ब्रिटीश सैन्याला का सोडले हे मला कधीच कळले नाही."

कदाचित त्याची खालील कारणे असू शकतील. कारण तोही शेवटी एक माणूसच होता. –
१)२४ मे पर्यंत त्याचे सैन्य दोन आठवडे सतत लढत होते. तो स्वत: सैनिक असल्यामुळे त्याला सैनिकांच्या थकावटीची कल्पना असू शकते.
२)डंकर्कच्या भोवतालचा प्रदेश हा रणगाड्यांच्या हालचालींना अत्यंत धोकादायक होता.
३)रणगाड्यांच्या बरोबर पायदळ ही पुढे जायला हवे होते
४) थोड्या काळात त्याने एवढे मिळवले होते की त्याच्याच मनात थोडी शंका निर्माण झाली असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्याच काळात जनरल हाल्डरने आपल्या रोजनिशीत जे लिहून ठेवले आहे त्यावरून हिटलरच्या मन:स्थितीची कल्पना येऊ शकते. तो लिहितो, “फ्यूरर अत्यंत तणावात आहे. धोका पत्करायची त्याच्या मनाची अजिबात तयारी होत नाही.”

एवढे यश आणि तेही एवढ्या कमी काळात मिळवल्यावर त्या सगळ्यावर एखाद्या चुकीच्या निर्णयाने बोळा फिरला असता. त्याची त्याला अजिबात तयारी नव्हती. अजूनही फ्रान्सचे बरेच मोठे सैन्य सोम्मे आणि एन्न नदीच्या दक्षिणेला होते आणि पहिल्यांदा त्याला त्यांचा समाचार घ्यायचा असावा. राईश मार्शल गोअरिंगनेही हिटलरला अशी खात्री दिली होती की लुफ्तवाफ डंकर्कचा समाचार घेईल. त्यानंतर वेअरमाख्टला फक्त युद्धकैदी करायचे आणि शेवटची साफसफाई एवढेच काम उरेल.

जॉडलच्या हाताखाली काम करणारा जनरल वॉल्टर वार्लीमाँट याने त्याच्या आठवणीत लिहिले, “ त्याचा त्याच्या जनरल्सवरच विश्वास नव्हता हेच खरे ! त्याने त्या लढाईचे उद्दिष्टच नष्ट केले. त्या लढाईत इंग्लिश चॅनेलवर दोस्तांच्या सेनेला पोहोचू द्यायचे नाही हेच उद्दिष्ट असणार्‍या क्लाईस्टच्या सेनेला त्याने थांबायला सांगितले. त्याला त्याच्या पहिल्या महायुद्धाच्या अनुभवाने घाबरवून सोडले होते. फ्लॅन्डर्समधे ज्या प्रकारची चिकणमाती होती त्याची आणि त्यात वाहणार्‍या अनेक ओढ्यांची त्याला भीती वाटत असे कारण त्याच्या फौजांचे यश हे रणगाड्यांच्या हालचालींवर अवलंबून होते. त्या प्रकारच्या भौगोलिक परिस्थितीत ते अवघड होते. त्याने त्या लढाईचे प्राथमिक उद्दिष्ट साध्य करायच्या आतच दुसरी आघाडी उघडली”

हा आदेश काढण्याचे पातक ज्याच्या माथी मारले जाते त्या जनरल रुन्डस्टेडने नंतर हात झटकले. “मला जर संपूर्ण अधिकार असते तर ब्रिटीशांना एवढ्या सहजपणे डंकर्क सोडता आले नसते हे निश्चित” असे त्याने नंतर एका मुलाखतीत कडवटपणे सांगितले. पुढे तो म्हणाला “मलाही हा आदेश पसंत नव्हता पण माझे हात हिटलरकडून आलेल्या या आदेशामुळे बांधलेले होते. डंकर्कमधे ब्रिटीश जेव्हा बोटीत चढत होते त्या काळात मला जाणीवपूर्वक डंकर्कच्या बाहेर ठेवण्यात आले आणि माझ्या हालचालींवर बंधनेही घालण्यात आली होती. मी सर्वोच्च कमांडला पॅंझर डिव्हिजन्सना डंकर्कमधे पाठवा, अशी सूचना देत होतो. तसे झाले असते तर ब्रिटीश सैन्याचा संपूर्ण नाश झाला असता. पण हिटलरने कुठल्याही परिस्थितीत हल्ला करायचा नाही अशी सख्त ताकीद दिली होती. एवढेच नाही तर माझ्या तुकड्यांना डंकर्कपासून ८ मैलांच्या परिघामध्ये जायलाही बंदी घालण्यात आली....''

......ही घोडचूक हिटलरच्या ’चांगले नेतृत्व म्हणजे काय’ या बद्दलच्या चुकीच्या कल्पनांमुळे घडली...”

क्रमश: ......

जयंत कुलकर्णी.

लेखइतिहास

प्रतिक्रिया

लुफ़्टवाफने रॉयल एअरफोर्सला युद्धाच्या सुरुवातीला बराच मार दिला खरा; पण पुढे लंडनवर बॉम्बफेक करताना रॉयल एअरफोर्सच्या विमानांनी लुफ़्टवाफचा नक्षा उतरवला.

लेख उत्तम. पुभाप्र.

पगला गजोधर's picture

6 Oct 2017 - 4:27 pm | पगला गजोधर

४) थोड्या काळात त्याने एवढे मिळवले होते की त्याच्याच मनात थोडी शंका निर्माण झाली असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
.
एवढे यश आणि तेही एवढ्या कमी काळात मिळवल्यावर त्या सगळ्यावर एखाद्या चुकीच्या निर्णयाने बोळा फिरला असता. त्याची त्याला अजिबात तयारी नव्हती.

अशीच काहीशी परिस्थिती, १९६५ चे भारतीय युद्ध सेने नेतृत्वाच्या मनांत होती.

जेव्हा भारतीय सैन्य विद्युत वेगाने, लाहोरच्या जिमखान्यापर्यंत धडकलं होतं...
तोपर्यन्त त्या वेस्टर्न थिएटर मधे, लाहोरपर्यंतच्या रस्त्यातल्या प्रतिरोध त्यांनी सहजी मोडून काढला होता.

त्यामुळे भारतीय सेनानेतृत्वाच्या मनात रास्त अशी शंका आली, आपण पाकिस्तानने रचलेल्या एखाद्या मोठ्या सापळ्यात (अँम्बुश)तर आपलं सैन्य घेऊन चाललो नाही ना ? म्हणून त्यांनी तिथेच थोडं थांबून परिस्थिती पुर्नआकलन करण्याचे ठरवले .....

जयंत कुलकर्णी's picture

8 Oct 2017 - 3:50 pm | जयंत कुलकर्णी

सर्वांना धन्यवाद !

जबरदस्त लिहिताय जयन्तकाका.
काही गोष्टी नव्याने समजताहेत तर काही अत्यंत सोप्या भाषेत असल्यामुळे चांगल्या समजताहेत.

अभिजीत अवलिया's picture

8 Oct 2017 - 6:14 pm | अभिजीत अवलिया

तीनही भाग वाचले. मस्त चालू आहे लेखमाला.

पैसा's picture

8 Oct 2017 - 7:05 pm | पैसा

डंकर्कबद्दल किती वाचावे ते कमीच! त्यातून तुम्ही लिहिताय म्हणजे वाचकांना मेजवानी!!

कपिलमुनी's picture

9 Oct 2017 - 8:44 am | कपिलमुनी

लेख आवडला

VINOD J. BEDGE's picture

10 Oct 2017 - 1:33 pm | VINOD J. BEDGE

वाळिंबे यांचं वार्सा टू हिरोशिमा वाचले ..पण एवढा मोठा विषय आणि बारीक सारीक घडामोडी तुमच्यामुळे कळल्या ...

अमरेंद्र बाहुबली's picture

11 Oct 2017 - 1:16 am | अमरेंद्र बाहुबली

मस्त

उपेक्षित's picture

13 Oct 2017 - 2:33 pm | उपेक्षित

थरारक,

कृपया पुढील भाग लवकरात लवकर टाका ही विनंती.

क्लाईस्टच्या फौजांप्रमाणेच ही लेखमाला अचानक थांबली आहे. तरी कृपया वेळात वेळ काढून पुढील भाग टाकावा ही विनंती.

उपेक्षित's picture

22 Nov 2017 - 11:39 am | उपेक्षित

+१११११