डंकर्क... भाग - २

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
24 Sep 2017 - 10:51 pm

डंकर्क भाग -२
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

हिटलर त्याच्या जनरल बरोबर चर्चा करताना. सर्व जनरल्स..कायटेल, फॉन बॉक व गुडेरियन

या अशा महाकाय सेनेसमोर कोण उभे ठाकले होते तेही बघुया एकदा. दोस्तराष्ट्रांच्या सेनेत फ्रेंच आर्मी ग्रुप-१ च्या ५१ डिव्हिजन होत्या ज्याचे नेतृत्व करत होता जनरल बिलोट्टे. या ५१ डिव्हिजनमधे ब्रिटीशांच्या एक्सपिडिशनरी फोर्सच्या ९ डिव्हिजन होत्या. या शिवाय फ्रेंच आर्मी ग्रुप-२ आणि आर्मी ग्रुप-३ च्या ४३ डिव्हिजन होत्या, ज्यात राखीव सैन्यही मोजले आहे. मॅजिनोच्या उत्तरेस, टोकाला असलेल्या लाँगवेपासून बेल्जियमच्या सीमेपर्यंत पसरलेल्या फ्रान्सच्या सीमेवर आर्मी ग्रुप-१ चे सैन्य पसरलेले होते ते पार डंकर्कपर्यंत. या अँग्लो-फ्रेंच सैन्याशिवाय बेल्जियमच्या २२ डिव्हिजन आणि डचांच्या १० डिव्हिजन जर हल्ला झाला तर तयार होत्या. हे दोन देश तटस्थेच्या नादी लागल्यामुळे त्यांना या युद्धात भाग घेण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांच्या फौजा त्या घटकेला पूर्ण तयार नव्हत्या. मॅजिनोच्या तटबंदीत फ्रान्सचे नऊ डिव्हिजन सैन्य नेहमीच असायचे ते होतेच.

या सगळ्या सैन्याचा विचार केला तर दोस्तांचे अंदाजे १३५ डिव्हिजन सैन्य जर्मनीच्या सैन्याला तोंड देण्यासाठी तयार होते. चिलखती दलाचा विचार केला तर फ्रान्सकडे सहापेक्षा जास्त डिव्हिजन होत्या ज्यात साधारणत: २३०० रणगाडे होते. त्या काळात रणगाडे हे एक अत्यंत महत्त्वाचे शस्त्र मानले जायचे कारण रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रे एवढी विकसित झालेली नव्हती. अर्थात युद्ध संपेपर्यंत त्यात विध्वंसक सुधारणा झाली हेही खरे. हे रणगाडे जरा विस्कळीत स्वरूपात विखुरलेले होते आणि शिवाय त्याचे चिलखतही तुलनेने अभेद्य नव्हते. म्हणजे पहा ब्रिटिश जे चिलखती दलाच्या युद्धनीतिचे आद्य प्रवर्तक होते त्यांच्या पहिल्या चिलखती दलाचे प्रशिक्षण अजून इंग्लंडमधे चालू होते. यात ३२८ रणगाडे होते आणि या दलाची उभारणी अजून पूर्णत्वाला पोहोचली नव्हती.

जनरल बॉकच्या व ज. रुनस्टेडच्या ७० डिव्हिजनने अचानक कसलीही घोषणा ना करता तटस्थ हॉलंड, बेल्जियम व लक्सेनबर्ग या राष्ट्रांवर हल्ला चढवला. फ्रान्स आणि ब्रिटिशांनी लगेचच ‘प्लॅन-डी’’ योजना अमलात आणली. हा युद्धव्यूह फ्रान्सच्या प्रसिद्ध जनरल गॅमलीन याने तयार केली होती. जनरल गॅमलीन आता दोस्तराष्ट्रांच्या सेनेचा सेनापती होता. जनरल गिरॉडची सातवी फ्रेंच आर्मी डचांच्या मदतीस धावली व जनरल बिलोट्टेच्या अधिपत्याखाली जी ब्रिटिश व फ्रेंच सेना होती त्यांनी आपला मोर्चा बेल्जियमकडे वळवला. त्यांचे काम होते डायल नदीपाशी, सागरकिनाऱ्यावरील अँटवर्प पासून लौवेन आणि नामूर व नंतर मेयुज नदीच्या काठाकाठीने फ्रेंच सरहद्दीला भिडणाऱ्या काल्पनिक रेषेचे संरक्षण करणे. बेल्जियन सैन्याला याच्याही पुढे असलेली आघाडी सांभाळायची होती – मुज आणि अल्बर्ट कॅनॉल यांना जोडणारी रेषा त्यांना जितका काळ शक्य असेल तितका काळ सांभाळायची होती कारण ती सेना जर्मन सैन्याला फक्त थोडाफार अडथळा करू शकते, याहून जास्त काही तिच्याकडून कोणाची अपेक्षा नव्हती.

ब्रिटिश सेनानींना ही योजना मुळीच पसंत नव्हती. त्यांचे मत असे होते की जोपर्यंत बेल्जियन सैन्य त्यांच्या जागी पाय रोवून उभ्या आहेत याची खात्री होत नाही तोपर्यंत आपली सेना डायल नदीवर हलवू नये. बेल्जियमच्या सैन्याची फळी जर कोलमडली तर अँग्लो-फ्रेंच सनेने फ्रान्सच्या सीमेवरच जर्मन सैन्याचा आघात झेलावा कारण १९३९ साली मॅजिनो तटबंदी ते समुद्रापर्यंत चांगली संरक्षण व्यवस्था उभी केली गेली होती. अर्थात असे त्यांना वाटत होते. जास्तीत जास्त सैन्य शेल्ड नदी व ॲटवर्प यांना जोडणाऱ्या रेषेपर्यंत नेण्याची त्यांची तयारी होती. पण त्यांना सुनावण्यात आले, ‘‘ ज्या जनरलने पहिल्या महायुद्धात मार्ने येथे जगप्रसिद्ध विजय मिळवलाय त्या जनरल गॅमेलिन यांनी हा व्यूह आखलाय… माहिती आहे ना?’’

तटस्थ बेल्जियमने आपल्या संरक्षणाची सिद्धता वेळेवर न केल्यामुळे ज. गॅमलिनची ही योजना अमलात आणण्यापूर्वीच त्यांच्या संरक्षक फळीला अनेक ठिकाणी खिंडारे पडली होती. जर्मन तोफा गर्जण्या आधी दोन तास आधीच, म्हणजे भल्या पहाटे छत्रीधारी सैनिकांनी बेलिजियन सैन्याची संदेशवहनाची व्यवस्था नष्ट केली. महत्त्वाचे पूल ताब्यात घेतले व दारू गोळ्याची कोठारे ताब्यात घेतली. अनेक विमाने अचूक बाँबींग करून जागेवरच नष्ट करण्यात जर्मन हवाईदलालाही यश आले आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अल्बर्ट कॅनॉलवरील तीन महत्त्वाचे पूल काहीही नुकसान न होता जर्मन सैन्याच्या ताब्यात आले.

हॉलंडमधे जर्मन छत्रीधारी सैनिकांनी धरणाचे पाणी सोडण्याची यंत्रणा ताब्यात घेतली. जर त्यांनी मनात आणले असते तर सखल भागात पूर आणणे आता त्यांना सहज शक्य होते. महत्त्वाची ठिकाणे हातातून गेल्यावरही ब्रिटिश व फ्रान्सच्या सैन्याने प्लॅन-डी ची पहिली पायरी यशस्वीरित्या अमलात आणली. पण आता त्यांच्यावर उत्तरेतून आक्रमण होण्याची भीती होतीच. याच भितीपोटी फ्रान्सच्या सेनानींनी आपले बरेचसे सैन्य उत्तरेत एकवटले होते. याचा फायदा जर्मन सैन्यालाच झाला कारण दक्षिणेला आता बेल्जियमच्या घनदाट आर्देन्स जंगलातून त्यांच्या चिलखती दलांना एक जंगल सोडल्यास कसलाच अडथळा उरला नाही. मुज नदीच्या नैसर्गिक खंदकामुळे त्या जंगलातून चिलखती दले, रणगाडे येऊच शकणार नाहीत असा गाढ विश्वास फ्रेंच सेनानींना होता, त्यामुळे त्यांनी तेथे अत्यंत सुमार दर्जाची सैन्यदले तैनात केली होती.

हाडाचा चुरा करणारा घणाघाती आघात जर्मन फौजांनी अँग्लो-फ्रेंच फौजांच्या डाव्या फळीवर लाँगवे येथे या बाजूचा सांधा होता, तेथे चढवला. येथूनच ही फौज जर्मनांच्या दिशेने आक्रमण करणार होती. १४ मे ला जर्मन सैन्याने सेदान काबिज केले. जनरल फॉन क्लीस्टच्या सैन्याच्या रणगाड्याच्या लाटा खवळलेल्या समुद्राच्या लाटा ज्या प्रमाणे किनार्‍यावर आदळतात त्याप्रमाणे पुढे सरकत होत्या. आजवर जगाने एवढ्या मोठ्या सेनेचा असा वेग कधीच पाहिला नव्हता. एक आग ओकणारा अकराळ विकराळ गाडा संरक्षण करणार्‍या दोस्तांच्या सैन्यावर चालून येत होता. त्या गाड्यापुढे भयंकर आवाज करणारी स्टुका डाईव्ह बाँबर उडत होती जी खालच्या शत्रूच्या फौजांना अक्षरश: भाजून काढत होती. या विमानांना दोस्तांकडे अजून उत्तर नव्हते. जमिनीला समांतर पण खालून उडणारी स्टुका आग ओकून वर सूर मारत ते दृष्य मोठे विलोभनीय दिसत होते पण त्या बाँबवर्षावात फ्रेंच सैन्याचा धीर सुटत चालला होता. थोड्याच काळात मूज नदी येथे दोस्तांच्या संरक्षण फळीला खिंडार पडले….

आता जर्मनीच्या या योजनेच्या मागे कोणाचे डोके होते ते पाहुया कारण त्या माणसाच्या कल्पकतेनेच हे सगळे शक्य झाले होते. जे दोस्तराष्ट्रांच्या सेनानींना अशक्य वाटत होते ते त्याच्या योजनेचा मुख्य भाग होता…पण त्यासाठी थोडेसे मागे जावे लागेल… थोडेसे हिटलर आणि चर्चिल यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकावा लागेल कारण त्या दोघांच्या व्यक्तिमत्त्वाचा या युद्धावर एकंदरीत बराच प्रभाव पडणार होता. थोडेसे अवांतर झाले तरी ते क्षम्य मानून ते लिहिले पाहिजे..

पहिल्या महायुद्धात जर्मनीची फ्रान्स नेस्तनाबूद करायची योजना फसली त्याला कारणीभूत ती योजना आखण्यात आणि कार्यान्वित करण्यामध्ये जो काळ गेला तो होता असे आजवर मानले जात होते. उदा. काऊंट अल्फ्रेड फॉन स्लिफेन याने १९०५ मधे ती योजना आखली होती तेव्हा जर्मनांची उजवी फळी अत्यंत ताकदवान अशा सेनेची बनली होती. ती योजना १९१४ मधे कार्यान्वित झाली आणि तो पर्यंत त्या सेनेतील असंख्य तुकड्या काढून घेऊन पूर्व आघाडीवर हलवल्या गेल्या होत्या. या अनुभवावरून जेव्हा हिटलरने OKWला १९३९ साली फ्रान्स नेस्तनाबूद करण्याची योजना आखायला सांगितली तेव्हा त्यांनी त्याला फॉल गेब नावाची योजना सादर केली. यात त्यांनी उजवी आघाडी आणखी मजबूत केली होती आणि डाव्या आघाडीवरच्या तुलनेने कमकुवत असलेल्या सेनेला सिग्फ्रीड लाईनच्या मागे आणून ठेवले होते. उजव्या आघाडी वरचे आक्रमण आर्मी ग्रुप बी च्या दहा पॅन्झर डिव्हजन्स करणार होत्या. या योजनेअंतर्गत जर्मनांची सेनादले बेल्जियम आणि उत्तर फ्रान्समधून आक्रमण करणार याचा अंदाज दोस्तांना आलेला आहे हे माहीत असतानाही हीच योजना राबवायची ठरली. हिटलरच्या स्वभावाच्या हे अगदी विरुद्ध होते, कारण यात कुठलेही धक्कातंत्र वापरलेले नव्हते.

दहा जानेवारीला एक जर्मन विमान मुन्स्टरहून कोलोनला जायला उडाले. ते दाट धुक्यात आपली वाट चुकले आणि त्याला निकडीने बेल्जियममधे मेचेलेन-सूर-मेयुज येथे उतरावे लागले. या विमानात असलेल्या जर्मनीच्या सातव्या हवाईदळाच्या डिव्हिजनचा स्टाफ ऑफिसर मेजर हेलमुथ रेनबर्गर याला त्याच्याकडे असलेल्या फॉल गेब योजनेची प्रत नष्ट करण्यात अपयश आले आणि ती बेल्जियमच्या हातात पडली. त्यामुळे हिटलरला ही योजना पूर्णपणे बदलायला लागली. खरे तर याची आवश्यकता नव्हती. कारण तटस्थ बेल्जियमने त्यापैकी फक्त दोनच कागद ब्रिटीशांना दिले होते आणि ते कुठे मिळाले हे सांगण्यास नकार दिला होता त्यामुळे ब्रिटीश गुप्तहेर खात्याला यात दगाफटक्याचा संशय आला व त्यांनी यावर विश्वास ठेवायचे नाकारले. बेल्जियमला ही योजना खरी असल्याचे चांगलेच माहीत होते, कारण जेव्हा रेन्बर्गरला जर्मन हवाईदलाचा अधिकारी भेटायला आला तेव्हा त्यांचे संभाषण त्यांनी ध्वनीमुद्रित केले होते. तरीही हिटलरला घाबरून त्यांनी ही बातमी दोस्तांना दिली नव्हती.

हेलमुटची जळालेली कागदपत्रे. आजही ती संग्रहालयात जपून ठेवली आहेत.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

बारा जानेवारीला मेजर जनरल जोड्लने त्याच्या रोजनिशीत लिहीले “जर शत्रूच्या हातात ही कागदपत्रे पडली असतील तर परिस्थिती गंभीर आहे. फॉल गेब योजनेचे काही खरे नाही असे समजून हिटलरने त्याला पर्यायी असलेल्या ऑपरेशन सिशेलश्निट नावाच्या राखीव योजनेला मान्यता दिली. ही योजना जनरल एरिक फॉन मान्स्टीन याने तयार केली होती. मध्यभागी असलेल्या आर्मीग्रुप ए चा गर्ड फॉन रुनस्टेड कमांडर होता आणि मान्स्टीन त्याचा चीफ ऑफ स्टाफ होता. या योजनेअंतर्गत जर्मनांच्या उजव्या आघाडीवरून सात पॅंझर डिव्हिजन्स काढून त्या मधल्या आघाडीवर हलवायच्या आणि डाव्या आघाडीवर जे सैन्य (आर्मी ग्रुप सी) होते ते तसेच ठेवायचे असे ठरले होते. उत्तरेला आर्मी ग्रुप बी च्या सैन्याने उत्तरेला बेल्जियम आणि हॉलंडवर आक्रमण केल्यावर दोस्तांच्या सेना या येथे लढाईला उतरतील आणि तशा त्या उतरल्या तर योग्य वेळी आर्मी ग्रुप ए चे सैन्य जे मध्यभागी आघाडीवर होते, त्याने आर्देनच्या जंगलातून जोरदार मुसंडी मारून इंग्लिश चॅनेल गाठायचा आणि उत्तरेकडील दोस्तांच्या सैन्याला अलग करायचे अशी ही एकंदरीत व्यूहरचना होती.

या मानस्टाईनच्या युद्धव्यूहाचे श्रेय नंतर हिटलरला देण्यात आले. खरे तर त्या वेळी तो बॉनपासून वीस मैलावर असलेल्या आयफेल जंगलातील फेल्स्नेस्ट नावाच्या त्याच्या मुख्यालयात बसला होता. कायटेलनेही हिटलरचे याबाबतीत तोंड फाटेपर्यंत कौतूक केले. तो म्हणाला, “ हिटलर हा जगातील कालातीत सर्वश्रेष्ठ सेनानी आहे आणि राहील ”. सहा वर्षानंतरही त्याचे हेच मत होते हे विशेष. न्युरेंबर्गच्या खटल्यादरम्यान त्याच्या मानसोपचारतज्ञालाही कायटेल हेच म्हणाला “ तो एक बुद्धिमान माणूस होता हे निर्विवाद आणि त्याने हे अनेक वेळ सिद्ध केले आहे. त्याने योजना बदलल्या आणि तो त्याचा निर्णय अचूक असे. बेल्जियम आणि हॉलंडच्या आक्रमणाच्या वेळी आपण ते बघितलेच. त्याची स्मरणशक्ती अत्यंत तीव्र होती. जगातील सर्व आरमारातील प्रत्येक महत्त्वाची नौका त्याला माहीत होती. कायटेल त्याचे हे मत हिटलरलाही खूष करण्यासाठी सांगतच असणार यात शंका नाही. डॉ. गोबेल्सच्या अनेक प्रचारतंत्रात हिटलर हा सगळ्यात ताकदवान सेनानी कसा आहे हे ठासून सांगितले जाई. पण हिटलरचे पाय जमिनीवर होते. एखाद्याला हे सारखे ऐकून आपल्या सर्वश्रेष्ठत्वाचा भ्रम झाला असता.

हिटलरचे लष्करी ज्ञान निर्विवादपणे छाप पाडणारे होते. त्याची सखोल अभ्यास करण्याची वृत्ती, इतिहासाचा गाढा अभ्यास, तल्लख स्मृती, युद्धनीती दूरदृष्टी या सगळ्या अतिरंजित कहाण्या होत्या, असे मत त्या काळातील एलन क्लार्क व डेव्हिड आयर्व्हिंग सारखे इतिहासकार ठामपणे मांडत. आता हाताशी असणार्‍या ऐतिहासिक कागदपत्रे आणि वस्तुनिष्ठ संशोधन बघितले तर या त्यांच्या मताशी सहमत होणे कठीण आहे असेच म्हणावे लागेल. कोणीही काहीही म्हटले तरीही हिटलर कुठल्याही लष्करी शस्त्राबद्दल केव्हाही बारीकसारीक माहिती देऊ शकत असे. त्याच्या ग्रंथसंग्रहालयात एकूण सोळा हजार तीनशे पुस्तके होती त्यातील बाराशे वॉशिंग्टनमधील काँग्रेसच्या ग्रंथालयात अजूनही बघायला मिळतात. त्यात युद्धनौका, लढाऊ विमाने, चिलखती रणगाडे आणि त्यांची चिलखते या विषयावरच अनेक पुस्तके होती. त्यातील काही नावे बघा – कॉन्क्वेस्ट ऑफ एअर : हॅंडबूक ऑफ एअर ट्रान्सपोर्ट / फ्लाईंग टेकनिक्स, हेगेलचे हॅंडबूक ऑफ टॅंक्स, नेव्हीज ऑफ द वर्ल्ड –देअर फाईटींग पॉवर, आणि वाचून वाचून मलीन झालेले वेअरचे हॅंडबूक ऑफ वॉर फ्लिटस. बर्लिन मधील युनायटेड प्रेसच्या वार्ताहराला जेव्हा या ग्रंथालयाला भेटीची परवानगी देण्यात आली तेव्हा त्याने बघितलेली ग्रंथसंपदा प्रचंड होती. नुसती संख्याच नाही तर सैनिकी पोषाख, हत्यारे, शस्त्र, सैनिकांचे मानसशास्त्र, तोफा, शांततेच्या काळात सैन्य कसे उभारावे, सैन्याची हालचाल, अशा व इतर अनेक विषयांवर अभ्यासपूर्ण अशा ग्रंथांची तेथे रेलेचेल होती आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे हिटलरने स्वत: यातील बरीचशी पुस्तके पहिल्या ते शेवटच्या पानापर्यंत वाचलेली होती. हिटलरचा वृत्तपत्र सचिव ओट्टो डिट्रिच हा त्याच्या मालकाच्या वाचनामुळे फारच प्रभावीत झाला होता. त्याने म्हटले आहे की -
“त्याचा शस्त्रास्त्रांचा अभ्यास असामान्य होता. उदा. त्याला जगातील सगळ्या आरमारातील नोंद झालेल्या युद्धनौकांची सविस्तर आणि अचूक माहिती होती. कुठल्याही जहाजाची तो त्या जहाजाचे वय, ते किती पाणी फेकते, वेग, त्याच्यावर असलेल्या तोफांचा पल्ला, त्याच्या चिलखताचा अभेद्यपणा किती आहे.. इ अशी माहिती सहज देऊ शकत असे. जगातील सगळ्या तोफांमधे काय संशोधन चालले आहे, तसेच कुठल्या रणगाड्याचे चिलखत बदलले आहे अशा गोष्टींची त्याला इत्यंभूत माहिती असे.
पण माहितीचा उपयोग मर्यादेत असतो. माहितीचा उपयोग समोरच्याचा आवाज बंद करण्यासाठी वापरायचा नसतो तर त्याचे विश्लेषण करून आडाखे बांधण्यासाठी करायचा असतो. मला वाटते हिटलर हे विसरला. त्याच्या बैठकींमध्ये काय होत असे हे आपण पाहू..

हिटलरने आपल्या ज्ञानाने उपस्थितांना दिपवण्याच्या अनेक प्रसंगांच्या, शेवटी आख्यायिका झाल्या. जेव्हा फार गंभीर चर्चा चाललेली नसे तेव्हा OKW च्या बैठकींमधे वरिष्ठ सेनाधिकार्‍यांना आपल्या शस्त्रात्रांच्या अभ्यासाने व आकड्यांने दिपवून टाकायचे, हा त्याचा आवडता छंद होता. ज्या विषयांवर तो विस्तृत चर्चा करायचा त्यात त्याला अक्षरश: कसलेही बंधन नव्हते. उदा. जड हॉव्हिट्झर तोफा ओढायला लागणार्‍या ट्रॅक्टरची अश्वशक्ती- ८५ असावी का नाही..टायगर रणगाड्याचा गिअर बदलताना येणारे आवाज...रणगाडाविरोधी १५ इंच व्यासाच्या तोफांचा बसणार्‍या दणक्याचा प्रश्न, त्याच तोफांसाठी लागणार्‍या तोफगोळ्यांचे संशोधन, हेंकेल विमानांची रात्री उडण्याची क्षमता, सगळ्यात किती कमी उंचीवरून छत्रीधारी सैनिक उडी मारू शकतो... जर्मनी आणि इटलीमधे चालू असणार्‍या फेरी बोटींची संख्या...पाणबुड्यांचा कमाल वेग, पाणबूडीचे स्लुईस दार उडवण्यासाठी पाण्यात फुटणार्‍या बॉंबची ताकद किती असावी.... शत्रू तीस यार्डवर असेल तर फ़्लेम थ्रोअर हातबॉंबपेक्षा का परवडतात....अशा अनेक बाबी....दुर्दैवाने जनरल कायटेलला या सगळ्याचे कौतूक नव्हते. त्याला आश्चर्य वाटे ते हिटलरला सगळी माहिती कशी पाठ असते त्याचे. त्यामुळे त्याला तो युद्धनिती तज्ञ म्हणायचा. त्याच्या सारख्या अनुभवी आणि एवढ्या मोठ्या पदावर काम करणार्‍या अधिकाऱ्याकडून ही अपेक्षा नव्हती. आगगाडीचे डबे मोजणार्‍या माणसाला ती चालवता येईलच याची खात्री कोण देऊ शकते ?

चर्चिलही युद्धाच्या डावपेचांच्या बारीक सारीक तपशिलात लक्ष घालायचा पण त्यातील तांत्रिक बाबीत तो लक्ष घालायचा नाही. ते काम तो त्या विषयातील तज्ञांवर सोडायचा. जर त्यात काही प्रशासकीय अडचणी आल्या, तर मात्र तो त्या तातडीने सोडवायचा. या उलट हिटलरने आपल्या सैनिकांच्या सुखसोयींकडे कधीच लक्ष दिले नाही. चर्चिल आपल्या सैनिकांच्या लढण्याच्या इच्छाशक्तीला जास्त महत्त्व देई. ते परत परत येत तेव्हा त्यांच्या स्वागताला ब्रास बॅंड आहे का नाही...त्यांच्या बढत्या वेळेवर होत आहेत का नाही.....इ. सतरा जुलै १९४४ रोजी त्यांनी सेक्रेटरी ऑफ वॉर, ग्रीगला, डेली मेल नावाच्या वृत्तपत्रातील एक लेख पाठवला ज्यात सैनिकांना जेवणात ब्रेड नसल्यामुळे कंटाळा आला आहे असे स्पष्टपणे म्हटले होते. ग्रीगने उत्तर पाठवले “ स्थलसेनेच्या एकूण बारा बेकर्‍यांपैकी सहा फ्रान्समधे तैनात आहेत. चर्चिलने उत्तर दिले “सैनिकांना चांगले मटण व ब्रेड मिळेल हे बघा. त्यासाठी फ्रान्सला फिरत्या बेकर्‍या पाठवा.'' ही अशी चर्चा हिटलरच्या युद्धविषयक बैठकींमध्ये होणे शक्यच नव्हती कारण जर्मनीमधे कुठलेही वर्तमानपत्र वेअरमाख्टवर सैनिकांना व्यवस्थित अन्न मिळत नाही अशी टीका करायला धजले नसते. हिटलरच्या दृष्टीने या सगळ्या किरकोळ गोष्टी होत्या...याविरूद्ध ब्रिटीशांना सैन्य पोटावर चालते याची पूर्ण कल्पना होती.

मानस्टाईनने मूजनदीचा ५० मैलाचा पट्टा जो डॅनांट आणि सेदानच्या मधे होता त्यात सगळ्यात जास्त विरोध होणार हे ओळखले होते. तो विरोध मोडून हा पट्टा एकदा पार करून इंग्लीश चॅनेल गाठला आणि ब्रिटिशांचे उत्तरेला असलेले ४० डिव्हिजन सैन्य वेढ्यात सापडले की मग उर्वरित दक्षिण फ्रान्सवर सोम्मे आणि एन्ना नदी पार करून आक्रमण करून प्लॅन रेड या युद्धव्यूहाच्या योजनेअंतर्गत दक्षिण फ्रान्स काबिज करता येण्यासारखा होता. या आक्रमणात सगळ्यात महत्त्वाचा होता वेग आणि तो लुफ्तवाफ आणि पॅन्झर तुकड्यांमधील उत्कृष्ट समन्वयाने साधण्यात येणार होता. पोलंडच्या युद्धात अनुभव येऊनसुद्धा दोस्तांनी आपल्या चिलखती सैन्याच्या डिव्हिजन या पूर्ण आघाडीवर विखरून ठेवून जी चूक केली होती त्याचा फायदा उठवून या ५० मैलांच्या पट्ट्यात सर्व पॅंझर डिव्हिजन्सना केंद्रित हल्ला करून आपले उद्दिष्ट सहज पार पाडता येणे शक्य होते. तुलना केली तर जर्मनीकडे या आघाडीवर जे सैन्य होते ते दोस्तांपेक्षा खूपच कमी होते. तुलनेने त्यांचे युद्धसाहित्यही कमी दर्जाचे होते. पण त्यांचे सैन्याचे प्रशिक्षण अत्यंत उच्च दर्जाचे होते आणि मॅनस्टाईन सारख्या बुद्धिमान युद्धनितीतज्ञांच्या डावपेचांपूढे फ्रान्सचा पराभव अटळ होता. मॅनस्टाईनचा ही योजना मेजर हेलमुथ रेनबर्गरच्या त्या अपघातग्रस्त विमानामुळे अमलात आली असे म्हणायला हरकत नाही.

ही जी योजना मॅनस्टाईने आखली होती त्याला हिटलरने फेब्रुवारीमध्ये मान्यता दिली पण त्यातही काही धोके होतेच. एक तर आरदेन्सचे जंगल फार घनदाट होते व त्या जंगलातून जे रस्ते गेले होते ते फार चिंचोळे आणि जड वाहतुकीला योग्य नव्हते. दोस्तांच्या सैन्याने दक्षिणेकडून प्रतिआक्रमण केले असते तर आर्मी ग्रुप ए ची डावी फळी एबव्हिले ते बुलोनी आणि शेवटी डंकर्क या मार्गावर पूर्णपणे उघडी पडली असती. यासाठी मूज नदीवर जे काही थोडेफार पूल होते ते त्वरित काबीज करणे आवश्यक होते. शिवाय या सगळ्या भानगडीत कमकुवत आर्मी ग्रुप सी चे सैन्य जे सिगफ्रीड संरक्षण फळीच्या आधाराने उभे होते त्याला मॅजीनो लाइनच्या मागे तयारीत असलेल्या फ्रेंचांच्या ४० डिव्हिजन सैन्याकडून धोका होता तो निराळाच.

पण दोस्तराष्ट्रांच्या नशीबाने एक महत्त्वाची घटना त्याच सुमारास म्हणजे अगोदर घडली होती ती म्हणजे सर विस्टन चर्चील आता पंतप्रधानपदी आरूढ झाले होते. पुढचा धोका ओळखून त्यांनी हाउस ऑफ कॉमन्समधे भाषण करताना देशाला सांगितले,
‘‘ आज मी तुम्हाला रक्त, श्रम, अश्रू आणि घाम याशिवाय दुसरे काही देऊ शकत नाही. तुम्ही मला विचारताय, या युद्धाविषयी माझे धोरण काय आहे ? या प्रश्नाला माझे उत्तर आहे, आम्ही जमिनीवर, समुद्रात आणि आकाशात शत्रूशी सर्व शक्तिनिशी लढू आम्ही परमेश्वराने जेवढी आम्हाला शक्ती दिली आहे त्या शक्तीनिशी या निर्दय आक्रमणाला विरोध करू. मानवतेला चिरडून टाकणार्‍या या पाशवी शक्तीच्या विरोधात आम्ही युद्ध करू. हेच आमचे धोरण आहे. तुम्ही मला विचाराल की आमचे ध्येय काय आहे यावर माझे उत्तर असेल, ‘विजय, कितीही किमत मोजायला लागली तरी, त्याचा मार्ग कितीही खडतर असला, कितीही काळ लागला तरीही अंतिम विजय मिळवणे हेच आमचे अंतिम ध्येय आहे.’’…

पण त्या क्षणी तरी विजयमाला हिटलरच्या आर्देन्सच्या जंगलातून परजत येत असलेल्या चिलखती दलाच्या गळ्यात पडली होती…

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

क्रमशः
जयंत कुलकर्णी.
आधार : युद्धाचे वादळ व ग्रेट बॅटल्स ऑफ वर्ल्ड वॉर टू.

kathaaलेख

प्रतिक्रिया

सतिश म्हेत्रे's picture

24 Sep 2017 - 11:10 pm | सतिश म्हेत्रे

नवी माहिती मिळाली. मस्त आहे.

वाचतोय. कृपया नकाशे जोडा लेखांना.

इडली डोसा's picture

25 Sep 2017 - 2:43 am | इडली डोसा

नकाशे असतील तर समजायला जरा जास्त सोपे जाईल.

धन्यवाद! पुभाप्र

पगला गजोधर's picture

25 Sep 2017 - 3:24 pm | पगला गजोधर

3

पगला गजोधर's picture

25 Sep 2017 - 3:20 pm | पगला गजोधर

1

पगला गजोधर's picture

25 Sep 2017 - 3:21 pm | पगला गजोधर

2

पगला गजोधर's picture

25 Sep 2017 - 3:22 pm | पगला गजोधर

21

जयंत कुलकर्णी's picture

25 Sep 2017 - 6:52 pm | जयंत कुलकर्णी

धन्यवाद पग !

एस's picture

25 Sep 2017 - 7:32 pm | एस

वा! अनेक धन्यवाद!

संग्राम's picture

25 Sep 2017 - 1:10 am | संग्राम

वाचतोय

Anand More's picture

25 Sep 2017 - 7:55 am | Anand More

पुभाप्र

नरेश माने's picture

25 Sep 2017 - 2:36 pm | नरेश माने

पुढील भागाच्या प्रतिक्षेत........

उपेक्षित's picture

25 Sep 2017 - 2:52 pm | उपेक्षित

जबरदस्त, वाचतोय....

सिरुसेरि's picture

25 Sep 2017 - 8:25 pm | सिरुसेरि

माहितीपुर्ण लेखन

स्वाती दिनेश's picture

26 Sep 2017 - 12:31 am | स्वाती दिनेश

वाचते आहे.
स्वाती

पैसा's picture

30 Sep 2017 - 9:42 am | पैसा

जबरदस्त लिहिताय!

सोमनाथ खांदवे's picture

1 Oct 2017 - 7:59 pm | सोमनाथ खांदवे

कुलकर्णी सर , नेहमी प्रमाणे उत्तम लिखाण केले आहे . सर , जमल तर रशिया तील झारशाही व रास पुतीन बद्दल लिहा ना , खुप उत्सुकता आहे रशिया बद्दल . वीस वर्षा पूर्वी जागतिक इतिहासा वर भरपूर पुस्तके वाचली होती पण आता संसार चा जु माने वर असल्या मुळे पुस्तक वाचन कमी झाले , पण स्मार्टफोन , मिसळपाव आणि तुमच्या मुळे कधी ही वेळ भेटला की इतिहास कालीन विषया वर मन तृप्त होइ पर्यन्त वाचन करता येते .