निमशहरी भारताचा बंडखोर नायक : अजय देवगण

पिंपातला उंदीर's picture
पिंपातला उंदीर in जनातलं, मनातलं
20 Sep 2017 - 11:13 am

अजय देवगणबद्दल वेगवेगळ्या लोकांची, वेगवेगळी मतं आहेत. काही लोक (विशेषतः स्त्रिया) त्याच्या इंटेन्स डोळ्यांच्या प्रेमात आहेत. काही लोकांना तो 'अल्टिमेट अंडरडॉग' वाटतो. काही लोकांना खान त्रयीला आव्हान देणारा 'आपला' माणूस वाटतो. काही लोकांना तो 'अॅव्हरेज' अभिनेता वाटतो. पण माझ्या तालुक्याच्या ठिकाणी वकिली करणाऱ्या मित्राने अजय देवगणला परफेक्ट डिकोड केले आहे. त्याच्या मते, ‘निमशहरी आणि ग्रामीण भागात ज्याची गाणी अजून सर्वाधिक ऐकली जातात, तो हिरो म्हणजे अजय देवगण.’ निमशहरी किंवा ग्रामीण भागातल्या लग्नांमध्ये, सण-समारंभामध्ये , सिक्स सिटरमध्ये, ऑटोमध्ये, बारमध्ये अजय देवगणची गाणी सगळ्यात जास्त वाजतात. आजपण प्रेमभंग झालेल्या तरुण पिढीला अजयच 'एक लडकी ऐसी थी' हे 'दिलवाले' चित्रपटातलं गाणं सगळ्यात जवळचं वाटतं. रोमँटिक मूडमध्ये असले तर 'धीरे धीरे प्यार को बढाना है' हे 'फुल और कांटे'मधलं गाणंच हे लोक ऐकतात. 'कच्चे धागे', 'जिगर', 'मेजरसाब ', 'दिलजले ', 'सुहाग' या चित्रपटातली अजयवर चित्रित झालेली आणि देशभरातल्या मेट्रो भागात आऊटडेटेड झालेली गाणी हा निमशहरी भाग अजून नियमित ऐकतो. या भागाच्या पाठबळावरच अजयच्या आजच्या 'स्टारडम' चा पाया आहे, असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये.

गेल्या पंधरा वर्षांतली त्याची कारकीर्द, बॉक्स ऑफिसवर मिळणारी ओपनिंग (ज्यावरून स्टारच्या लॉयल प्रेक्षकांचा अंदाज येतो), चित्रपटांनी केलेली कमाई, मिळालेले पुरस्कार (त्यात पण फिल्मफेअर आणि नॅशनल अवॉर्ड ), मिळणाऱ्या एंडोर्समेंट्स अशा विविध निकषांवरून बॉलिवूडमध्ये 'टॉप फाईव्ह' राज्य करतात असं ढोबळमानाने मानलं जातं. सलमान, आमिर, शाहरुख, अक्षय कुमार आणि हृतिक रोशन हे ते 'टॉप फाईव्ह'. सध्या रणबीर, रणवीर, शाहिद, सुशांत सिंग राजपूत हे नवीन रक्तही बॉलिवुडवरील वर्चस्वाच्या लढाईत उतरलं आहे. या दोन फळ्यांना जोडणारा दुवा म्हणजे अजय देवगण. बॉलिवुडमध्ये दरवर्षी अनेक नवीन अभिनेते -अभिनेत्री पदार्पण करत असतात. त्यातले बहुतेक पहिल्या सिनेमांनंतरच गायब होतात. नंतर त्यांचं नामोनिशाणही सापडत नाही. पण ज्याला कोणी फारशी संधी द्यायला तयारच नव्हतं, तो अजय इथं आला, भरपूर संघर्षानंतर स्वतःला प्रस्थापित केलं आणि दिवसेंदिवस अभिनेता म्हणून तो बहरतच चालला आहे. ना तो सलमानसारखा देखणा आहे, ना तो हृतिकसारखा नाचू शकतो, ना त्याच्याकडे शाहरुखचा चार्म आहे, ना त्याच्याभोवती आमिरसारखं बुद्धिवादी वलय आहे, पण अजय पारंपरिक नायकांच्या रुळलेल्या नियमांना फाटा मारून इथं फक्त टिकूनच नाहीये, तर त्याच्या नावाचाच एक ब्रँड बनला आहे.

अजय देवगणने जेव्हा 'फुल और कांटे' या चित्रपटामधून पदार्पण केलं, तेव्हा तो इथं मोठी इनिंग्ज खेळेल असं कुणालाच वाटलं नव्हतं. एक तर हा पोरगा सावळा होता. उर्वरित भारताप्रमाणेच बॉलिवुड पण गोऱ्या रंगाच्या प्रेमात न्हाऊन निघालं असल्यामुळे याला दुसरा चित्रपट मिळेल की नाही याची शाश्वतीही अनेकांना वाटत नव्हती. अनेकांनी तर अशी शंका व्यक्त केली होती की, अजयचे वडील प्रख्यात फाईट मास्टर वीरू देवगण यांनीच पडद्याआड राहून 'फुल और कांटे'ची निर्मिती केली असणार. नाहीतर असा चेहरा असणाऱ्या पोराला कोण हिरो बनवण्याची रिस्क घेणार? पण अजयचे 'फुल और कांटे' मधले स्टंट्स जबरदस्त होते. बॉलिवुडमधले लोक आणि समीक्षक कितीही हेटाळणीने बघत असले तरी सर्वसामान्य प्रेक्षकाला अजयची मारधाडवाली भूमिका आवडलीच.

बरं, हा पोरगा त्या चित्रपटात अमरीश पुरीसारख्या दिग्गज अभिनेत्यासमोर न बुजता उभा राहिला होता. अजय देवगण बापाच्या पैशावर 'चलो एक फिल्म कर के देखते है' म्हणून इंडस्ट्रीत आलेला अजून एक ठोकळा नाहीये हे 'फुल और कांटे'नंतरच सिद्ध झालं होतं. अजयच्या पदार्पणाच्या आसपासच खान त्रयीने बॉलिवुडमध्ये बस्तान बसवायला सुरुवात केली होती. पण समीक्षक , प्रेक्षक आणि बॉलिवूडचे दिग्गज जेवढं खान मंडळींना सिरियसली घेत होते, तेवढं अजयला घेत नव्हतेच. याला काही प्रमाणात अजयपण कारणीभूत होताच. त्याने 'दिव्यशक्ती', 'प्लॅटफॉर्म', 'एक ही रास्ता' आणि यासारखेच तत्सम मारधाडपट करण्याचा सपाटा लावला होता. त्या काळात पण 'जिगर', 'दिलवाले' असे अजयचे चित्रपट हिट झाले असले तरी स्वतःच्या अभिनयक्षमतेला लोकांसमोर आणता येईल असे काही चित्रपट त्याला मिळालेच नाहीत किंवा त्याने केलेच नाहीत.

अजय हा काय कॅलिबरचा अभिनेता आहे हे लोकांना कळण्यासाठी १९९८ साली महेश भटचा 'जखम' यावा लागला. हा बऱ्यापैकी महेश भटच्या आयुष्यावरच बेतलेला होता. यामधल्या अजय देसाईचं अतिशय होरपळलेलं बालपण हे महेश भटचंच बालपण आहे. भावनिकदृष्ट्या अतिशय अस्थिर असणाऱ्या आणि होरपळलेलं बालपण जगणाऱ्या माणसाच्या भूमिकेत महेश भटला अजय देवगणला घ्यावंसं वाटलं यातच सगळं आलं. बाबरी मस्जिद पडल्यावर देशात पूर्ण धार्मिक ध्रुवीकरण झालं होतं. देशातलं वातावरण संवेदनशील बनलं होतं. त्या पार्श्ववभूमीवर देशातल्या धार्मिक ध्रुवीकरणावर भाष्य करणाऱ्या आणि हिंदू बाप व मुस्लिम आईच्या अनौरस संतती असणाऱ्या माणसाची गोष्ट सांगणारा 'जखम' प्रदर्शित होणं महत्त्वाचं होतं. मनाचे तुकडे पडलेल्या अजय देसाईच्या भूमिकेत अजयने कमाल केली होती. अजयचे डोळे संवादाशिवाय पण खूप काही बोलू शकतात हे प्रेक्षकांना कळलं. या चित्रपटातल्या भूमिकेमुळे अजयला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि अजय नावाच्या अभिनेत्याच्या आगमनाची नांदी झाली. नंतर यावर शिक्कोमोर्तब केलं ते संजय लीला भन्साळीच्या 'हम दिल दे चुके सनम'ने.

या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी सलमान आणि ऐश्वर्याच्या अफेअरची जोरदार चर्चा चालू होती. त्यामुळे चित्रपटाच्या प्रसिद्धीचा सगळा फोकस त्या दोघांवरच होता. चित्रपटातली सगळी हिट गाणीही त्या दोघांवरच चित्रित झालेली होती. चित्रपटातल्या प्रेमकहाणीचा अजय हा तिसरा कोण. पण हा चित्रपट बघून प्रेक्षक चित्रपटगृहाच्या बाहेर पडले ते सगळे अनपेक्षितपणे अजयच्या वनराजच्या प्रेमात पडले होते. नाव वनराज असं भारदस्त असलं तरी अतिशय साधा सरळ, आत्मविश्वासाचा प्रचंड अभाव असणारा आणि दिसायला ऑर्डिनरी असणारा अजयच्या वनराजशी बहुतेक प्रेक्षकांची लगेच नाळ जुळली. अतिशय सामान्य असणारा हा इसम आपल्या रूपवान बायकोला तिच्या पूर्वाश्रमीच्या प्रियकराशी पुन्हा भेटवण्यासाठी वडिलांचा रोष पत्करून आणि पुरुषत्वाच्या भंपक निकषांमध्ये अडकलेलं जग आपल्याला हसेल याची पर्वा न करता घराबाहेर पडतो, तेव्हा एकदम आभाळाएवढा उंच वाटायला लागतो. अजयने वनराजच्या भूमिकेत अक्षरशः परकायाप्रवेश केला होता. त्याचं जेवढं श्रेय दिग्दर्शक संजय लीला भन्साळीला जातं तेवढंच अतिशय इंटेन्स परफॉर्मन्स दिलेल्या अजयलाही जातं.

२००१ साली 'लगान' आणि 'दिल चाहता है'च्या प्रदर्शनानंतर एकूणच बॉलीवुडने कंटेन्टच्या बाबतीत कूस बदलली. स्टोरी टेलिंगमध्ये अक्षरशः सर्वांगाने बदल व्हायला लागले होते. अनेक नवीन दिग्दर्शक कथा सांगण्याच्या अनुषंगाने वेगवेगळे प्रयोग करू लागले होते. अजय देवगण या बदलाच्या लाटेवर स्वार झाला. २००१ ते २०१० हा काळ अजयच्या कारकिर्दीचा सुवर्णकाळ म्हणता येईल. या काळात अजयने व्यवसायिक सिनेमाची आणि प्रायोगिक सिनेमाची अतिशय व्यवस्थित सांगड घातली. एका बाजूला 'मस्ती' ,'खाकी', 'गोलमाल' आणि 'अतिथी तुम कब जाओगे'सारखे व्यवसायिक चित्रपट करत असतानाच 'भूत' , 'ओंकारा' , 'रेनकोट' , 'युवा', 'कंपनी' आणि अनेक वेगळी वाट चोखाळणारे चित्रपट त्याने केले.

अजयच्या फिल्मोग्राफीमधल्या दिग्दर्शकांच्या यादीत जेवढं वैविध्य आहे, तेवढं वर उल्लेख केलेल्या 'टॉप फाईव्ह' कडेही नाही. देशातल्या जवळपास सगळ्या गुणवत्तावान दिग्दर्शकांसोबत अजयने काम केलं आहे. दिग्दर्शकांची ही यादी इतर कुठल्याही अभिनेत्याला असुरक्षित करू शकते. कोण आहे या यादीत? रामगोपाल वर्मा, राजकुमार संतोषी, मणिरत्नम, मधुर भांडारकर, संजय लीला भन्साळी, विशाल भारद्वाज, प्रकाश झा, प्रियदर्शन, जॉन मॅथ्यू, डेव्हिड धवन, रोहित शेट्टी, निशिकांत कामत, मिलन लुथरिया, महेश भट आणि इतर कित्येक. भूमिकांच्या आणि चित्रपटांच्या जॉनरमध्ये पण अजयने प्रचंड वैविध्य दाखवलं आहे. 'लिजंड ऑफ भगतसिंग' या भगतसिंगवर बनलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटातला अजयचा परफॉर्मन्स अप्रतिम होता. 'खाकी'मध्ये कारकिर्दीच्या शिखरावर असताना नकारात्मक भूमिका करण्याचं धाडस त्याने दाखवलं. मधुर भांडारकरच्या 'दिल तो बच्चा है'मध्ये विनोदी भूमिका केली. रितूपर्णो घोषच्या 'रेनकोट' या तरल अयशस्वी प्रेमिकांची कहाणी सांगणाऱ्या चित्रपटात एक अपयशी प्रियकर मनस्वीपणे रंगवला. विशाल भारद्वाजच्या 'ओंकारा'मध्ये ‘औरंगजेब सिंड्रोम’ने (वरवर स्वतःला कणखर दाखवणारा पण आतून असुरक्षित असणारा माणूस) ग्रस्त नायक अप्रतिम केला. रोहित शेट्टी या आपल्या जीवलग मित्रासोबत 'गोलमाल' सीरिज आणि 'सिंघम' सारखे मसाला पोटबॉयलर्स केले. रामूच्या 'कंपनी'मधला अतिशय थंडगार आणि मनातली वादळ चेहऱ्यावर न दाखवणारा मलिकही अप्रतिम. मिलन लुथरियाच्या 'वन्स अपॉन अ टाइम'मधला लार्जर दॅन लाईफ सुलतान मिर्झाही टेरिफिक. चित्रपटात सुलतान मिर्झाच्या तोंडी असणाऱ्या संवादांना कल्ट स्टेट्स प्राप्त झालं आहे.

अजयची फिल्मोग्राफी एवढी वैविध्यपूर्ण आहे की, त्याच्या प्रत्येक चित्रपटाचा आढावा घेणं वेळ आणि जागेअभावी शक्य नाही. पण जॉनर, कथानक, दिग्दर्शक यांच्याबाबतीत सर्वाधिक प्रयोग करणारा आमिर खानसारखाच दुसरा अभिनेता म्हणजे फक्त अजय देवगण हे लक्षात आलं तरी पुरं. यावरून अजय हा अतिशय बुद्धिमान आणि स्क्रिप्टचा अतिशय चांगला सेन्स असणाऱ्या दुर्मिळ अभिनेत्यांपैकी एक आहे हे सिद्ध होतं. त्याला 'गोलमाल' आणि 'सिंघम'च्या प्रतीमेपलीकडे बघू न इच्छिणाऱ्यांनी याची नोंद घ्यावी.

प्रत्येक अभिनेत्याचा स्वतःचा असा प्रेक्षकवर्ग असतो. अजयचा लॉयल प्रेक्षकवर्ग हा छोट्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भागांमध्ये विखुरलेला आहे. ही छोटी शहर ही पूर्ण वाढ न झालेल्या अर्भकांसारखी असतात. ना ती धड शहरांसारखी असतात, ना खेड्यांसारखी. मध्येच कुठंतरी त्रिशंकू अवस्थेत लटकत असतात. मूलभूत सोयीसुविधांचा अभाव, प्रचंड बेरोजगारी असूनही तळागाळात पोचलेली डिजिटल क्रांती हे या भागाचं व्यवच्छेदक लक्षण. जुनाट पारंपरिक मूल्यां कवटाळून तर बसायचं आहे, पण शहरी आधुनिकताही अंगिकारायची आहे, या प्रचंड विरोधाभासी प्रतलात इथली जनता राहते. अजय देवगणचा प्रेक्षकवर्ग इथं एकवटलेला आहे. हीच अजयची ताकत आहे आणि मर्यादाही. कारण त्याच्या 'सिंघम'मधल्या बाजीराव सिंघमवर जीव ओवाळणारी आणि 'दिलजले'मधली गाणी लुपवर ऐकणारी जनता अजयच्या प्रायोगिक चित्रपटांना पूर्ण नाकारते असा अनुभव आहे. 'युवा', 'रेनकोट', 'ओंकारा' आणि इतर अनेक त्याच्या चांगल्या प्रायोगिक भूमिका असणाऱ्या चित्रपटांना हा वर्ग मुळीच जात नाही. वर्षानुवर्षं असे प्रयोग केलेल्या अजयला हे बहुतेक लक्षात आलं असावं. एकेकाळी बिनदिक्कत प्रयोग करणारा हा धाडसी अभिनेता पुन्हा 'सेफ बेट' खेळण्याच्या प्रेक्षकशरण भूमिकेत गेला आहे असं निरीक्षण आहे. सध्या तो 'बाद्शाहो' आणि 'गोलमाल रिटर्न्स' या मसाला चित्रपटांमध्ये काम करत आहे. प्रेक्षकांना आवडेल असा चित्रपट करण्यात काहीच वावगं नाही, पण एका अतिशय पोटेन्शियल असणाऱ्या जबरदस्त अभिनेता कायमचा बॅकसीटला जाऊ नये असं खूप तीव्रतेनं वाटतं.

अजयची फिल्मोग्राफी बघितली तर त्याच्यात असणारी चोप्रा, जोहर, बडजात्या या नावांची अनुपस्थिती ठळक जाणवते. नियम सिद्ध करणारा अपवाद म्हणजे करण जोहरचा 'काल'. अतिशय अर्बन वर्गाला डोळ्यासमोर ठेवून चित्रपट काढणाऱ्या दिग्गजांना अजय आपल्या चित्रपटांसाठी 'मिसफिट' वाटत असणार. अजयलाही यामुळे या बड्या लोकांबद्दल एक अढी असावी. कारण वेळोवेळी तो या लोकांना आव्हान देण्याचा प्रयत्न करत असतो. नीट निरीक्षण केलं असता असं लक्षात येतं की, जोहर- चोप्रा साम्राज्याला आवाहन देणारं असं कुणीतरी ठराविक काळानंतर उगवतं. रामू आला. मग अनुराग आला. आता ती जागा अजय देवगणने घेतली आहे. अजय अनुराग-रामू पेक्षा वेगळा आहे. एकतर तो स्वतः मोठा स्टार आहे. त्याचं स्वतःच एक प्रभावशाली वर्तुळ आहे. धर्मा-यशराज आणि खान त्रयी हे सगळ्या महत्त्वाचा रिलीज डेट्स (दिवाळी ,ईद ,ख्रिसमस इ.) खूप अॅडव्हान्समध्ये ब्लॉक करून ठेवतात, हे आता निर्मातासुद्धा बनलेल्या अजयला खटकत आहे. बरं, त्यांच्यासोबत प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांचं चोप्रा-जोहर अनेक मार्गानं खच्चीकरण करतात. अजय देवगणने हे डोक्यात ठेवून यश चोप्रा-शाहरुख यांच्या 'जब तक है जान'समोर काही वर्षांपूर्वीच्या दिवाळीत आपला 'सन ऑफ सरदार' टिच्चून प्रदर्शित केला. चोप्रांनी जास्तीत जास्त थिएटर्स बुक करून 'सन ऑफ सरदार' ला कमीत कमी थिएटर्स मिळतील अशी व्यवस्था केली. पण अजयने माघार घेतली नाही. सगळ्या बाबी प्रतिकूल असून पण 'सन ऑफ सरदार' चांगला चालला. अजयने 'शिवाय' धर्माच्या 'ए दिल है मुश्किल'समोर प्रदर्शित करून वर्चस्वाच्या लढाईचा दुसरा अध्याय लिहिला. करण जोहरसोबतच्या त्याच्या वादाला वैयक्तिक किनारही आहे. चोप्रा घराण्याला यशस्वीरीत्या तोंड दिल्यानंतर अजयने करण जोहरलाही यशस्वीपणे आव्हान दिलं. मोठा स्टार असून अजय इथं अंडरडॉग आहे. त्याच्या चित्रपटातल्या नायकांप्रमाणेच. अंडरडॉगवर अपेक्षांचं ओझं कमी असतं आणि ही गोष्ट त्याच्या पक्षात जाऊ शकते. बॉलिवुडवरच्या वर्चस्वाच्या लढाईत सर्वस्व झोकून हा पार्ट्या आणि वादविवादांपासून दूर राहणारा शांत माणूस आहे. या लढाईचा शेवट काय असेल हे पाहणं अजयच्या एखाद्या रोचक अॅक्शनपटाच्या 'क्लायमॅक्स' इतकंच रोचक असेल हे नक्की.

(हा लेख अक्षरनामा या वेब पोर्टल वर प्रकाशित झाला आहे )

सोर्स -http://www.aksharnama.com/client/article_detail/951

चित्रपटलेख

प्रतिक्रिया

किसन शिंदे's picture

20 Sep 2017 - 11:31 am | किसन शिंदे

आपण अमोल उदगीरकर का?

चाणक्य's picture

20 Sep 2017 - 11:33 am | चाणक्य

.

पिंपातला उंदीर's picture

20 Sep 2017 - 11:41 am | पिंपातला उंदीर

हो

चाणक्य's picture

20 Sep 2017 - 11:47 am | चाणक्य

तुमच्या लिखाणाचा पंखा आहेच. मिपावरही आहात पाहून आनंद झाला.

पिंपातला उंदीर's picture

20 Sep 2017 - 11:50 am | पिंपातला उंदीर

धन्यवाद चाणक्य : )

महेश हतोळकर's picture

20 Sep 2017 - 11:45 am | महेश हतोळकर

२०१९ ची सुरुवात झाली म्हणायची. माई आल्या, तुही आलास, लवकरच बाकीचेही येतील.

पिंपातला उंदीर's picture

20 Sep 2017 - 11:49 am | पिंपातला उंदीर

तु ? मित्रा तू कोण आहेस ?मला तू अरे तुरे का करत आहेस?? तू माझ्यासाठी अज्ञात आहेस . मी तुला ओळखत पण नाही . त्यामुळं अंतर ठेवून रहा . कस ?

महेश हतोळकर's picture

20 Sep 2017 - 1:37 pm | महेश हतोळकर

ह्म्म! बघू कसं जमतयं ते!!

अभ्या..'s picture

20 Sep 2017 - 12:20 pm | अभ्या..

ए जिगर....
आमच्या हिरोवर लिहिलेय, लैच भारी वाटले राव.
अजय देवगण सुरुवातीपासून निमशहरी आणि ग्रामीण भागात आवडायचा त्याच्या साईड भांगामुळे. नॉर्मली मुलांची तीच डिफॉल्ट हेअरस्टाईल असायची. सावळा रंग, सरळ नसलेले पण दरदरीत नाक आणि उभा चेहरा असणारे कित्येक युवक स्वतःमध्ये अजय देवगणला शोधायचे. कपूर, खन्ना, खान अशा भारी नावांपेक्षा अजय देवगण हे साधे नाव आपलेसे, आपल्यातले वाटायचे. निमशहरी भागात शर्ट इन करण्याविषयी प्रचंड नावड असायची त्या काळात. अजय देवगणही कधी इनशर्ट केलेला दिसला नाही. ब्लेझरच्या आतही ओपन शर्ट ठेवायच्या त्याच्या बिनधास्त स्टाईलने लोक फिदा होते. फाईटमधली सफाई आणि आरडाओरडा न करता अगदी मॅनली आवाजात शांतपणे केलेली डोयलॉग डिलिव्हरी हे त्याचे प्लस पॉइंट होते. कुमार शानू ची सुरेल गाणी त्याच्या करीअरला फायदेशीर ठरली. दिलजले, दिलवाले सारखी भावुक प्रेमकथा असलेले चित्रपट ग्रामीण आणि निमशहरी भागात प्रचंड बिझनेस करुन गेले.
बॉलीवूडमध्ये एकदा एस्टॅब्लिश झाल्यावर कमावलेले शरीर आणि गहर्‍या डोळ्याचा इंटेन्स अभिनय अशा डबल इंजिनवर त्याची गाडी सुसाट सुटली. त्याच्यासोबतच वयाने मोठे झालेल्या त्याच्या चाहत्यांनी प्रौढ आणि गंभीर भुमिकात त्याला आपलेसे ठेवले. पोलीसात भरती झालेल्या बहुजन समाजातील युवकांना अजय देवगण तर रोल मॉडेल ठरला. सिंघम, गंगाजल मधील डॅशिंग पोलीसी रोलची कॉपी न का नसेना पण त्या मिशांची स्टाईल सगळ्या पोलीस चाहत्यांनी आपलीसी केली. अपहरण सारख्या चित्रपटातील सुरुवातीचा पोलीसात जाऊ पाहणारा साधासुधा तरुण ते अपहरणासारख्या इझी मनीत गुंतून स्वतःचे माफीया साम्राज्य उभे करुन त्यासहीत स्वतः नष्ट होणारा अजय देवगण अजुनही लक्षात राहतो. गंगाजलमधील कायदा हा सर्वश्रेष्ठ आणि शेवटपर्यंत त्याच लीगल प्रोसीजरने जाणारा पोलीस अधिकारी हाही अविस्मरणीय.
अजय देवगणबद्दल कीती लिहावे आणि किती नाही असे होतेय पण ह्या सुंदर लेखाचा मान ठेवून म्हणतो..
ए जिगर....तूच रे फक्त.

पिंपातला उंदीर's picture

20 Sep 2017 - 1:59 pm | पिंपातला उंदीर

क्या बात है !

रुपी's picture

20 Sep 2017 - 12:22 pm | रुपी

लेख चांगला आहे.. पण यात 'दृश्यम' चा उल्लेखही नाही याचे आश्चर्य वाटले

विशुमित's picture

20 Sep 2017 - 12:30 pm | विशुमित

"गंगाजल" चा उल्लेख नाही दिसला.

अमरेंद्र बाहुबली's picture

20 Sep 2017 - 12:48 pm | अमरेंद्र बाहुबली

लेख खरचं खुप छान! अजय देवगण हा खरा "अभिनेता" आहे. अभिनय कशाशी खातात हे अजय देवगणचं जाणतो. खानावळीला उगाच लोकांनी डोक्यावर बसवलय.

पद्मावति's picture

20 Sep 2017 - 2:05 pm | पद्मावति

खुप मस्तं लिहिलंय

पगला गजोधर's picture

20 Sep 2017 - 2:10 pm | पगला गजोधर

माझ्या तालुक्याच्या ठिकाणी वकिली करणाऱ्या मित्राने अजय देवगणला परफेक्ट डिकोड केले आहे. त्याच्या मते, ‘निमशहरी आणि ग्रामीण भागात ज्याची गाणी अजून सर्वाधिक ऐकली जातात, तो हिरो म्हणजे अजय देवगण.’ निमशहरी किंवा ग्रामीण भागातल्या लग्नांमध्ये, सण-समारंभामध्ये , सिक्स सिटरमध्ये, ऑटोमध्ये, बारमध्ये अजय देवगणची गाणी सगळ्यात जास्त वाजतात.

तुमच्या लेखाचा फक्त पहिला पॅरा वाचूनच ही प्रतिक्रिया देतोय...

चित्रपटातील गाणी श्रावणीय असणे व मनाला भावणे, याचे श्रेय माझ्यामते संगीतकार गीतकार गायक वैगरे लोकांना जायला पाहिजे !
हिरोचा काय संबंध ?

पिंपातला उंदीर's picture

20 Sep 2017 - 2:16 pm | पिंपातला उंदीर

जायला पाहिजे हे खरं आहे पण तस होत नाही . चित्रपटाचा दिग्दर्शक , लेखक ,संगीत दिग्दर्शक , गायक कोण आहेत ह्या गोष्टी हिरो वर्शीपिंग करणाऱ्या आपल्या समाजात दुय्यम आहेत . आपल्याकडे अजूनही बहुसंख्य प्रेक्षक चित्रपटाला नायकावरून ओळखतात .

पगला गजोधर's picture

20 Sep 2017 - 4:44 pm | पगला गजोधर

चित्रपटाचा दिग्दर्शक , लेखक ,संगीत दिग्दर्शक , गायक कोण आहेत ह्या गोष्टी हिरो वर्शीपिंग करणाऱ्या आपल्या समाजात दुय्यम आहेत . आपल्याकडे अजूनही बहुसंख्य प्रेक्षक चित्रपटाला नायकावरून ओळखतात/strong>त .

सहमत आहे.

अनेक शतकांपासूनच्या, समाजमनावरील ह्या "हिरो वर्शीपिंग" मानसिकतेच्या जोखडामुळे,
टीम-वर्क मधून निर्माण झालेल्या चांगल्या निर्मितीचे श्रेय, टीमला न मिळता, एकट्या हिरोच्या क्रेडिटला जातंय हेच खरं.....

शतकानुशतके भारतीय समाजाला नेहमी एखादा हिरोच हवा असतो, टीम नाही ......
:(

अमित भोकरकर's picture

30 Sep 2017 - 6:12 am | अमित भोकरकर

गाण्यामुळे प्रसिद्धी हीच गोष्ट इमरान हाश्मी साठी पण लागु पडते. तो चांगला अभिनेता असला तरी त्याला हिमेश व इतर अनेक जणांच्या गाण्याचा भरपूर फायदा झाला

अप्पा जोगळेकर's picture

20 Sep 2017 - 3:54 pm | अप्पा जोगळेकर

चित्रपटातील गाणी श्रावणीय असणे व मनाला भावणे, याचे श्रेय माझ्यामते संगीतकार गीतकार गायक वैगरे लोकांना जायला पाहिजे !
हिरोचा काय संबंध ?
असे नाही. बरीच फालतू गाणी सुद्धा निव्वळ त्या त्या विशिष्ट हिरो मुळे किंवा चित्रीकरणा मुळे चाललेली आहेत.
तांत्रिक भाषेतच बोलायचे झाले तर गाणे हे विजेट आहे. म्हणजे एखादे गाणे ऐकले जाते तेंव्हा फक्त ते गाणे, सुरावट, शब्द लक्षात नसतात तर ते चित्रीकरण सुद्धा लक्षात ठेवतात. यात काही चूक नाही.
भीमसेन जोकि, वसंतराव यांचे गाणे वेगळे आणि चित्रपट संगीत वेगळे.

अप्पा जोगळेकर's picture

20 Sep 2017 - 3:55 pm | अप्पा जोगळेकर

*जोशी

अनुप ढेरे's picture

20 Sep 2017 - 5:14 pm | अनुप ढेरे

आपल्याकडे गाणं हे गोष्टीचा भाग म्हणुन येतं. किंवा गोष्टीला सप्लिमेंट म्हणुन. त्यामुळेच नॉन फिल्मी गाणी फार चालत नाहीत. इंडीपॉप १९९९-२०००च्या आसपास खूप चाललं. पण मुळ धरू शकलं नाही ते याचमुळे असावं.

पगला गजोधर's picture

20 Sep 2017 - 5:36 pm | पगला गजोधर

आपल्याकडे गाणं हे गोष्टीचा भाग म्हणुन येतं. किंवा गोष्टीला सप्लिमेंट म्हणुन.

मग त्या तर्काने गाण्याच्या लोकप्रियतेचं श्रेय लेखक, पटकथा-लेखक, संवाद-लेखक, आणि एडिटिंग च्या लोकांना मिळायला हवं

:)

अजय देवगणचा कंपनी विशेष आवडतो. जख्म बद्दल खूप ऐकून आहे. बघितला नव्हता. आता बघीन. लेख आवडला.

पैसा's picture

20 Sep 2017 - 2:40 pm | पैसा

अजय देवगणला सुरुवातीच्या काळात लोक 'राक्षसगण' म्हणून लोक हेटाळणीने बघत. हळूहळू त्याने आपली जागा निर्माण केली. काजोलबरोबर सुखी संसारही केला.

त्याचा सिनेसृष्टीतील प्रवास छान उलगडून दाखवला आहे.

काजोलबरोबर सुखी संसारही केला. >> कोणे एके काळी मुंबईत जरा अडचणी आला होत्या त्यांच्या संसारात ;)

पगला गजोधर's picture

21 Sep 2017 - 10:13 am | पगला गजोधर

जरा अडचणी आला होत्या त्यांच्या संसारात ;)

होना रनौट (Run-out) होता होता वाचला बिच्चारा ....

सिरुसेरि's picture

20 Sep 2017 - 2:55 pm | सिरुसेरि

अजय देवगणच्या यशामधे त्याच्या अभिनयाबरोबरच चित्रपट संगीत ( फुल और कांटे , जख्म , हकीकत , दिलवाले , दिलजले , सुहाग , प्यार तो होनाही था .. असे अनेक) आणी गाजलेले संवाद ( कॅरम बोर्ड तो तुम्हारे सामने होगा लेकीन स्ट्रायकर चलाने के लिये हथेलीपे उंगलीयां नही होगी ..असे अनेक ) यांचाही वाटा आहे . गोविंद निहलानीसारख्या कलात्मक चित्रपटांच्या दिग्दर्शकाने आपल्या "तक्षक" चित्रपटासाठी अजय देवगणला घेतले ते त्याच्या डोळ्यांतील इंटेन्सिटी पाहुनच .

जयंत कुलकर्णी's picture

20 Sep 2017 - 3:07 pm | जयंत कुलकर्णी

:-) वाचला होता हा लेख.

या बात! लेख अर्थात आधीच वाचला होता. तुमचा लय मोठा फॅन आहे मी.

बादवे तुम्ही वाट पहात असलेला 'न्यूटन' प्रदर्शित झाला. त्याबद्दल मिपाच्या दिवाळी अंकात लिहिणार का?

पिंपातला उंदीर's picture

20 Sep 2017 - 3:46 pm | पिंपातला उंदीर

धन्यवाद . न्यूटन मला वाटत येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे . सध्या अनेक ठिकाणी गुंतल्यामुळे लेख लिहिणं अवघड वाटत आहे : )

ओह, फर्स्टपोस्टवर परीक्षण वाचून वाटलं झाला की काय.

तुम्हाला प्रॉपर लिहायला वेळ नसेल तर ऑडियो रेकॉर्ड करून पाठवला तरी चालेल.

पिलीयन रायडर's picture

20 Sep 2017 - 6:14 pm | पिलीयन रायडर

वेळ नसतोच हो, पण त्यांच्या मागे सतत भुंगा लावायचा, देतात ते! "गोष्ट.."च्या वेळेला जीव खाल्ल्ला होता मी त्यांचा. =))

अमोल, रेकॉर्डींगचं घ्या मनावर. येतेच मी मेसेंजरवर भुणभुण करायला. ;)

पिंपातला उंदीर's picture

22 Sep 2017 - 8:34 am | पिंपातला उंदीर

नक्की प्रयत्न करतो : )

अप्पा जोगळेकर's picture

20 Sep 2017 - 3:57 pm | अप्पा जोगळेकर

अजय देवगण आवडतो म्हणून बरेच जण मला हसायचे. हा लेख वाचून बरे वाटले.
वन्स अपॉन...., कंपनी , गंगाजल, अपहरण जबरदस्त होते.

अजय देवगणचे दृष्यममधील काम फार आवडले होते. मलाही तो अंडरडॉग वाटतो. लेखन आवडले.

वेल्लाभट's picture

20 Sep 2017 - 4:28 pm | वेल्लाभट

तेवढी 'आवाहन देणं' आणि 'आव्हान देणं' यातली गल्लत सोडली

तर

लेख उत्तम झालाय. गंगाजल आणि द्रुश्यम चा अनुल्लेख खटकला. पण हरकत नाही, अजय देवगण चे आम्हीही चाहते आहोत.

कंपनी मधलं काम निव्वळ लाजवाब. आणि अर्थातच, भगत सिंग.

क्लास.

arunjoshi123's picture

20 Sep 2017 - 4:44 pm | arunjoshi123

खूप छान लेख.

विनिता००२'s picture

20 Sep 2017 - 5:11 pm | विनिता००२

गंगाजल मुळे खूप आवडायला लागला. बोलके डोळे तर लाजवाब!
माझा फेव्हरेट हिरो :)

पिलीयन रायडर's picture

20 Sep 2017 - 6:17 pm | पिलीयन रायडर

लेख अर्थात वाचला होताच. इंट्रेस्टेड लोकांना एक फुकटचा सल्ला, अमोल उदगिरकरांना फेसबुकवर फॉलो करा. अत्यंत उत्तम लिखाण वाचायला मिळेल ह्याची गॅरंटी!

अजय देवगण आधी मला बावळट वाटायचा, त्याच्या रडक्या हसण्यामुळे. मग नंतर बरा वाटाला लागला. पण त्याची गाणी पॉप्युलर आहेत हे मात्र खरं!

संग्राम's picture

20 Sep 2017 - 6:28 pm | संग्राम

सर्व जण डोळ्याबद्दल बोलत आहेत पण अजय देवगण ची चालण्याची पण अशी एक स्टाईल आहे .... खूप कमी हिरो असे "हिरो" सारखे चालू शकतात

भित्रा ससा's picture

20 Sep 2017 - 7:58 pm | भित्रा ससा

माझ्या मते दिवानगी चित्रपटातील अजयचा अभिनय सर्वोकृष्ट होता

दशानन's picture

21 Sep 2017 - 12:15 am | दशानन

+1

हा चित्रपट अतिशय उत्तम होता, उर्मिला मुळे थोडा बोजड होतो पण अजयचे काम क्लास वन!

प्रमोद देर्देकर's picture

20 Sep 2017 - 9:07 pm | प्रमोद देर्देकर

खनावळ बंद करणारी २ जोड्या अजय आणि अक्षय
पण दोन्ही पैकी अजय जास्त आवडीचा.
लेख आवडला.

अभिदेश's picture

20 Sep 2017 - 11:14 pm | अभिदेश

पण हिम्मतवालाचा उल्लेख नसल्याबद्दल निषेध .... :-)

फारएन्ड's picture

21 Sep 2017 - 12:32 am | फारएन्ड

अजय देवगण आवडता कलाकार झाला आहे गेल्या काही वर्षांत. सुरूवातीला तो विशेष काही वाटायचा नाही. मला तो बहुधा काजोल बरोबरचा त्याचा प्यार तो होना ही था पाहिल्यापासून. मग हम दिल दे चुके सनम मधे, कंपनी मधे व इतर अनेक चित्रपटांत आवडला. त्याने विशेष चर्चेत न आलेल्या 'बोलबच्चन' मधेही धमाल उडवली आहे.

तो 'ब्रूडिंग' रोल्स करतो तेव्हा थेट ७०ज मधल्या अमिताभची आठवण करून देतो.

खरे म्हणजे तो सहज उठून दिसण्यासारखा नाही. चेहर्‍याने व अंगकाठीनेही. अनेक चित्रपटांत त्याला तीन्ही खान मंडळींसारखेच काही अ‍ॅंगल्स मधून 'बिग' दाखवावे लागते. (अभिषेक व अक्षय कुमारच्या तुलनेत). पण तो चांगल्या अभिनयावर ते बेमालूम करतो.

अभिजीत अवलिया's picture

21 Sep 2017 - 12:26 pm | अभिजीत अवलिया

लेख आवडला.

चिनार's picture

22 Sep 2017 - 9:42 am | चिनार

मस्त लेख !!
अजय देवगण एक जबरदस्त ताकदीचा अभिनेता आहे यात वाद नाही. अनुभवाने आलेली मॅच्युरिटी त्याच्या अभिनयात दिसून येते.पण विनोदी भूमिकांमध्ये त्याला बघायला आवडत नाही. त्यात त्याच्या मर्यादा दिसून पडतात. गोविंदा,आमिर,अक्षय,शाहरुख यांच्याकडे असलेलं विनोदाचं टायमिंग अजयला जमत नाही.

त्याचे विनोदी सिनेमे खूप चालले याचा अर्थ त्याला विनोद करता येतो असं मी तरी मानत नाही.

-कंपनी,गंगाजल,दिवानगी मधल्या अजयचा चाहता,
चिनार

विशुमित's picture

25 Sep 2017 - 11:31 am | विशुमित

विनोदाबाबत थोडासा असहमत.

"गोपाल" आपला फेवरेट आहे बाबा..!!

नरेश माने's picture

22 Sep 2017 - 4:05 pm | नरेश माने

छान लेख!

अजय देवगण पुर्वी फार आवडायचा नाही, मारधाड पटातील एक हिरो म्हणून ठिक वाटायचा ते त्याच्या अ‍ॅक्शन सीनमुळे. पण हम दिल दे चुके सनम पाहल्यावर मात्र एक वेगळाच अजय देवगण दिसला. नंतर गंगाजल, कंपनी, ओंकारा, वन्स अपॉन अ टाईम अश्या अनेक चित्रपटाद्वारे त्याने आपल्या अभिनयाचे नाणे खणखणीत आहे हे दाखवून दिलेच आहे.

जॉन मॅथ्यू या दिग्दर्शकाच्या कुठल्या चित्रपटात अजय ने काम केले आहे?

रुपी's picture

25 Sep 2017 - 11:41 pm | रुपी

शिखर

जेम्स वांड's picture

26 Sep 2017 - 7:58 am | जेम्स वांड

म्हणजे पॅकेज तिच्यायला,

एकीकडे गोलमाल मधले माकडचाळे,

दुसरीकडे 'और याद रखना सुंदर यादव, हमारी चाय बोहोत कडवी होती है' म्हणणारे एसपी अमितकुमार साहेब

तिसरीकडे 'दुवा मे याद रखना' सुलतान मिर्झा

अन चवथ्या सनातन दिशेला कशात काय नाय तरी विसरले न जाणारे 'शावा ये नखरा लडकी का' जबरदस्त पॅकेज म्हणजे देवगण बाबा (अजयचे आमच्या निमशहरी भागातील लाडकं नाव)

फॅन फॉलोइंग किती जबरी म्हणावी ? आमच्या डोळ्या समोरचं उदाहरण म्हणजे आमचा बालमित्र राम्या जोशी, राम्या साधारण अजयच्या रंगाचा, किडमिडीत - ते लपवायला कराटे शिकणारा, अजयला नायसा झाली तेव्हा पेढे वाटणारा अन परीक्षेला जायच्या आधी गुडलक म्हणून अजयच्या हसऱ्या पोस्टरकडे दोन क्षण टक लावून बघून मग पेपरला जाणारा. राम्या असल्या च्युत्यापणाला काय अर्थ आहे असं एकदा विचारल्याबर राम्याने देवगणभक्ती एका वाक्यात फोडली होती

'वांडो, तुझ्या माझ्या सारखी घारी गोरी नसलेली पोरे सुद्धा पुढे जाऊ शकतात, अन हरहुन्नरी होऊ शकतात ह्याचा परिपाठ म्हणजे देवगण बाबा, हात जोड पाहू'

एमी's picture

26 Sep 2017 - 9:09 am | एमी

लेख आवडला.
प्रतिसाददेखील रोचक आहेत.
अजय आवडत नाही; अभिनय चांगला करतो हे मान्य आहे.

चित्रपटातल्या प्रेमकहा नाही; णीचा अजय हा तिसरा कोण. >> कोन

मनिमौ's picture

30 Sep 2017 - 6:54 am | मनिमौ

हिरो हिराॅईन पासून अत्यंत आवडत्या कडे प्रवास झालेली जोडी म्हणजे अजय आणी काजोल. फारसे न चाललेल्या टूनपूर का सुपरहीरो आणी राजुचाचा मधे पण झकास काम केलंय. पण दृश्यम चा कुठलाही अभिनिवेश न आणता आपल्या मुलींचे जिवापाड रक्षण करणारा बाप जबरदस्त.
लेख आवडला हेवेसांन

संग्राम's picture

2 Oct 2017 - 3:15 pm | संग्राम

.
.
.
.
.
विजय (अजय देवगन) अपनी फॅमिली को लेकर सत्संग के लिए पणजी गया था ऑ और ३ ऑक्टोबर को वापस लौटा था

निओ's picture

2 Oct 2017 - 3:06 pm | निओ

'लज्जा' या मोठी स्टारकास्ट असणाऱ्या चित्रपटात ...लहानशा भूमिकेत दिलेला कडक परफॉर्मन्स...

कपिलमुनी's picture

4 Oct 2017 - 11:57 pm | कपिलमुनी

Tango Charlie मध्ये पण अजय आवडला होता