विचारांतील सातत्य

सर टोबी's picture
सर टोबी in जनातलं, मनातलं
9 Sep 2017 - 1:50 pm

हे आताशा नेहेमीचेच झाले आहे. गणेशोत्सवाच्या अगोदर अगदी मधाळ लेखणीने लिहिल्यासारखे काही ठराविक वर्तमानपत्रातून येणारे लेख. सुख आणि मांगल्याचे प्रतीक असणारा उत्सव. उत्सवाच्या अगोदर बाजारपेठेचा कानोसा. मागील वर्षापेक्षा १० ते १५% भाववाढ. रोषणाईचे कोणते नवे प्रकार बाजारात आले आहेत त्याची माहिती. प्रतिष्ठित मंडळांच्या आरशींची माहिती आणि पदाधिकारांच्या मुलाखती.

गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी एखाद्या सुखी आणि चौकोनी कुटुंबाचा, गणेशाची मूर्ती घेऊन येतानाच फोटो आणि त्याचे विलक्षण निरागसतेने आणि कौतुकाने केलेले वर्णन. म्हणजे असं: बाजारपेठ पत्री, फुलं आणि विविध वस्तूंनी भरलेली आहे, नागरिकांची खरेदीची लगबग चालू आहे, लहान मुलांचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे वगैरे. मी अशा वेळेस धक्के खात असताना स्वतःला बजावतो कि बाबारे उत्सवाचे वातावरण आणि आनंदाचा जल्लोष हाच बरका. खुश हो बघू इतरांसारखा!

प्रत्यक्ष उत्सव सुरु असताना तर काही विचारायलाच नको. काय ते वर्णन. आताशा रात्री अधिकच गहिऱ्या आणि रंगतदार झालेल्या असतात. डोक्यावर मुलांना घेऊन आरास बघणारे पालक, रस्त्यावरच्या स्टालवर काही बाही खाणारी जनता, कुजलेल्या अन्नाचा वास, रहदारीने कावलेली जनता. कुठल्या नजरेने या रात्री गहिऱ्या आणि रंगतदार दिसतात त्यांच्या नजरेला सलाम. मी तर माझे आहे ते डोळे काढून हे दिव्य डोळे लावून घ्यायला तयार आहे.

आणि उत्सव अर्ध्यावर आलेला असताना या लेखक मंडळींना वेध लागतात ते विसर्जनाचे. काही लाख दिव्यांनी सजलेला रथ, देवापाशी सेवा रुजू करण्यासाठी उत्सुक असलेल्या पथकांचा लवाजमा आणि अशीच काही वर्णनं छापून येतात. आणि मग येतो विसर्जनाचा दिवस. आनंदाचे उधाण आलेलं वातावरण आता संपणार म्हणून कावरे बावरे झालेले कार्यकर्ते आणि भक्त. सारे दुःख पोटात घेऊन उत्साहानी हे लोक विसर्जनाला सामोरे जातात. तल्लीनता तर अशी कि वेळेचं भान राहत नाही. कधी कधी दुसऱ्या दिवशी ग्रहण असते, हिंदू धर्मानुसार स्वर्गस्थ पितरांचे स्मरण करण्याचा, साधेपणाचा काळ सुरु होतो पण मिरवणे संपत नाही.

मग सरसावतात हीच लेखक मंडळी. गणेशोत्सव आता कसा त्याच्या मूळ रूपापासून आणि उद्दिष्टांपासून दूर जात चालला आहे याचे विश्लेषण सुरु होते. विरोधाभास इतका कि हे सर्व एकाच मुखातून सुरु असते, म्हणजे ज्या मुखातून दहा दिवसापूर्वी मांगल्याचा उत्सव असण्याची भाषा केलेली असते.

एक समाज म्हणून आपण आणि व्यसनी माणसं यांच्यात फारसा फरक नाही. शुद्धीवर असताना व्यसनी माणसं शपथा घेतात पण 'वेळ' झाली कि मदिरेच्या अधीन होतात तसाच काहीसा हा प्रकार आहे. आपल्या विचारांचा नांगर पाण्यात गेलाय पण रोवला गेला नाहीये. त्या मुळेच दरवर्षी आपण हाच अनुभव घेतो आहोत.

संस्कृतीप्रकटन

प्रतिक्रिया

पगला गजोधर's picture

9 Sep 2017 - 3:17 pm | पगला गजोधर

लेखाकाच्या निरीक्षणास दाद १+

अमरेंद्र बाहुबली's picture

9 Sep 2017 - 4:19 pm | अमरेंद्र बाहुबली

छान निरिक्षण!

उत्तम विवेचन केले आहे.

बाजीप्रभू's picture

9 Sep 2017 - 5:03 pm | बाजीप्रभू

यावरून मला मटाच्या लेखिका आठवल्या (बहुतेक शुभदा चौकर)... एकदम डबल ढोलकी होत्या... एका रविवारी लिहिणार "लव्ह मॅरेज शिवाय पर्याय नाही" आणि दुसऱ्या रविवारी लिहिणार "लव्ह मॅरेज-समाजाला लागलेला शाप"... म्हणे नाण्याची दुसरी बाजू.

कुमार१'s picture

9 Sep 2017 - 8:28 pm | कुमार१

सहमत.
एक समाज म्हणून आपण आणि व्यसनी माणसं यांच्यात फारसा फरक नाही. ">>>>+११

अप्रतिम कविता आणि अप्रतिम सुलेखन!

भारीच, या सुलेखनाची फ्रेम वैग्रे मिळणं शक्य आहे का?

स्मिता.'s picture

10 Sep 2017 - 3:42 am | स्मिता.

सुंदर कविता, ययातिची उपमा आवडली.

जेम्स वांड's picture

10 Sep 2017 - 1:04 pm | जेम्स वांड

पटण्यासारखा आहे, तरीही आपला निरुपाय आहे

लेखक सुद्धा उत्सवकाळात त्या उत्सवावर आधारित अर्थव्यवस्थेचा भाग होतात, उत्सव सरला की बाधक विचाराचे पाईक होतात कारण ते लेखकू आहेत अन शेवटी 'सब पापी पेट का सवाल है'

अभिजीत अवलिया's picture

18 Sep 2017 - 12:31 pm | अभिजीत अवलिया

पटले विवेचन.