बरं एवढं नि उगीच थोडं ..

सस्नेह's picture
सस्नेह in जनातलं, मनातलं
6 Sep 2017 - 11:19 am

‘ए आई, दूध गरम करायचंय, मापाचा ग्लास कुठेय ?’ माझा मुलगा विचारतोय.
‘अरे, कशाला हवा ग्लास ? हे एवढं घ्यायचं !’ मी दुधाच्या पातेल्यातून लहान भांड्यात पटदिशी दूध ओतून दिलं. गरम झाल्यावर मुलानं ग्लासात ओतलं. बरोब्बर मापात !
‘आई, तुला कसं गं समजतं, केवढं घ्यायचं ते, न मोजता ?’
बरोब्बर तीस वर्षापूर्वी मी माझ्या आजीला हाच प्रश्न विचारलेला ! आजी मला गरगट्टं करायला शिकवत होती तेव्हा !!
आजी माझी, सुगरण. तिच्या बोटातून रसवंती झरायची. तिच्या हातचं पिठलं आणि गरगट्टं खायला देवांना अमृत सोडून स्वर्गातून खाली उतरावं लागत असे ! गरगट्टं म्हणजे डाळ, चिंच आणि आख्खे शेंगदाणे घातलेली घट्टसर सरसरीत पालेभाजी. त्यातही पेश्शल म्हणजे चाकवताचं गरगट्टं ! ते भरपूर तूप घालून गरम भाकरीबरोबर खावे किंवा जाड्या तांदळाच्या वाफाळत्या भातावर घालून, निवेल तसे कडेकडेने ओरपावे !!
तर तीस वर्षापूर्वी माझी अन्नपूर्णा आजी मला गरगट्टं शिकवत होती.
‘हे बघ, उगीच एवढीशी तूरडाळ घ्यायची, मग बचकभर चाकवताची पानं चिरून त्यात घालायची ! ...’
‘अगं पण आजी, चाकवत धुवून नाही का घेतला ? पालेभाज्या धुवून खाव्यात.’ माझ्या शालेय पोपटाची पोपटपंची. ‘घे, तुला हवा तर ! मी कुठलीच भाजी धुवून घेत नाही गं सोने !’ आजी हनुवटीला हाताचा मुटका लावून बोलली.
धुवाधुवीचा आणि चवीचा व्यस्त संबंध तर नसेल ना ? असा एक विचार शाळेत शिकलेल्या पोपटाला चाटून गेला.
‘बरं मग ? मग काय करायचं ?’
‘मग बरं एवढं खोबरं, उलीशी चिंच, जरा शेंगदाणे फोडणीत घालायचे... मग थोडं मीठ आणि उगीच थोडी हरभरा डाळ...’
‘थांब, थांब. बरं एवढं आणि उगीच एवढं म्हणजे केवढं, गं ? माप सांग ना !’
‘आता त्यात कसलं आणि माप, बिट्टे ? अगं घ्यायचं अंदाजानं !’
‘अगं पण सगळंच कसं अंदाजानं घ्यायचं ? आणि चुकलं म्हणजे ?’ शालेय पोपटाचे डोळे मोठ्ठे झाले.
‘नाही चुकत ! सगळं माप हातात बसलं म्हणजे अज्जिबात चुकत नाही !’ आजी ठामपणे म्हणाली.
ज्जे बात ! माप हातात बसलं म्हणजे चुकत नाही !
आई चहा ठेवताना कप हातातसुद्धा घेत नाही, तरी बरोबर चार कप चहा बनतो. मावशी पातेल्यात कावळ्यानं पाणी घालते आणि त्यात बरोबर आठ लोकांचं पिठलं तयार होतं. आत्याने परातीत घातलेल्या पिठाच्या ढिगाच्या बरोबर मोजून जितकी माणसे तितक्या, किंवा अधिक एक भाकरी होतात. आजीच्या साठवणीतलं धान्य बरोबर नवीन धान्य बाजारात येण्याच्या बेताला कसं संपतं ? आधी नाही आणि नंतर नाही. लहानपणी फ्रीज नव्हता. पण स्वैपाक कधी खूप उरलाय, फ्रीज नसल्याने टाकून द्यावा लागलाय, किंवा दोन दिवस घरातली माणसे शिळे खातायेत, असं काही आठवत नाही. सगळं काही न मोजताही मापात !
हैला, कसं काय जमत असेल यांना हे ? यांच्या डोक्यातच मापं टाकलीयेत की काय देवबाप्पानं ? आपल्याला शिकायचंय हे असं सगळं !
मग मी ‘बरं एवढं अन उगीच थोडं’ यांच्या खनपटीला बसले. सगळी मापं हातात बसवायचा चिकाटीनं आणि अतोनात प्रयत्न करत राहिले.
आणि मग हळूहळू एक दिवस मी, मुलाला दुकानात न नेता बरोब्बर त्याच्या मापाचा शर्ट आणायला कधी शिकले, ते लक्षातपण आलं नाही !
...आज माझा मुलगा मला तेच विचारतोय !
‘माप कसं लक्षात ठेवायचं ?’
‘लक्षात ? नाही रे, ते हातात बसावं लागतं !’ मी आजीला आठवत बोलले.
‘म्हणजे ?’
‘म्हणजे ते असं सारखं ते काम करून करून, खूप वेळा केलं की आपोआप हातात बसतं.’
मुलगा मठ्ठ चेहेऱ्याने बघत राहिला !
बस्स ! ‘बरं एवढं’ आणि ‘उगीच एवढं’ हीच खरी मापं ! बाकी सर्व आभास आहेत !
आजही ‘बरा एवढा’ आणि ‘उगीच थोडा’ अशा पद्धतीने केलेल्या जिन्नसाची सर, टेबलस्पून आणि टीस्पून घेऊन केलेल्या पदार्थाला येत नाही, असा अनुभव आहे. किंबहुना केक, बिस्किटे किंवा तत्सम आंग्लदेशीय पदार्थांना टीस्पून आणि टेबलस्पून ही मापे मानवतात आणि वांगी किंवा बटाटा पोहे, मसालेदार भरले वांगे, मूगडाळीची गुलगुलीत खिचडी, मटकीचा झणझणीत रस्सा, दमाची खुशबूदार बिर्याणी आणि दबदबीत मटण असले बेत, ‘हे एवढं’ किंवा ‘उगीच तेवढं’ अशा मापांनीच सुरस संपन्न होतात.
त्यातही काही जिन्नस असे आहेत की ते सार्वजनिक स्तरावर मोठ्या प्रमाणात केल्यावर, घरच्या निगुतीनं केलेल्या कोणत्याही गोडाधोडाच्या तोंडात मारतात. विशेषत: मसालेभात, कसलीही खीर, वांग्याची पातळ भाजी आणि भरपूर लसूण आणि कढीपत्ता घातलेली पाणीदार पण तरीही झणझणीत आमटी या वस्तू कोणत्याही देवस्थानच्या अन्नछत्रात खाव्या आणि घरी हुबेहूब तशाच बनवून दाखवाव्या. आईशप्पथ, अपुन सर काटके देगा !
मी एकदा कुतूहलानं एका देवस्थानच्या मुदपाकखान्यात जाऊन बघितलं होतं. जेमतेम गुडघ्यापर्यंत पोचणारी पांढरीशुभ्र धोतरे आणि वरती फक्त जानवे अशा युनिफॉर्मातले ढेरपोटे बल्लव, हातात बरण्या घेऊन चुलीवरच्या भीमकाय पातेल्यातल्या भाजीत अन आमटीत डायरेक्ट तिखट मीठ ओतत होते आणि प्रचंड काहिलीतल्या खिरीत पराती भरभरून गुळाचे डोंगर लोटले जात होते ! एकूणच, माप त्यांच्या हातातच नव्हे, तर पुऱ्या देहात भिनलं असावं, असं मानायला जागा होती.
आधी नाक आणि डोळ्यांनी रसपान करून मग जिव्हेने पाणीदार स्वागत करून मग आनंदाने ओठी-पोटी धारण करावेत असे पदार्थ बनतात, ते माप हातात बसल्यानंतरच ! माझं तर मत आहे की फक्कड स्वैपाक जमायचा असेल तर पहिल्यांदा स्वैपाकघरातली सगळी वजनं आणि मापं विसर्जित करावीत. मापांच्या साच्यात बनलेले जिन्नस डोळ्यांना सुखावून जात असतील. पण जो खादीआयटम नाक, डोळे, जीभ, ओठ आणि नंतर उदरापर्यंतचा प्रवास संस्मरणीय करून जातो, तो बिन मापाचाच !
तसेही बघा, निसर्गात कुठे काही मोजमाप आहे का ? पेटत्या ग्रीष्मातल्या निवत्या सायंकाळी पश्चिम क्षितिजावर उमटणाऱ्या आतूनच लवलवत असल्यासारख्या दिसणाऱ्या रंगांच्या उधळणीला काही माप असते ? त्याच रंगांना उरात सामावून धरणीकडे धाव घेणारी प्रत्येक लाट अमुक इतक्या मीटरची असते का? काळ्या मेघांनी भरून आलेल्या कुंद दुपारी अवचित धो धो कोसळणारा पाऊस किती लिटरचा रतीब घातल्यावर थंड होतो ? आणि दोनचार श्रावणसरी पडून गेल्यावर टेकडीच्या उतारावर ऐसपैस तरारून आलेले कोवळेलूस गवत किती ब्रास असते ? हिमालयाची नजरबंदी करणारी पांढरीशुभ्र शिखरे एकमेकांशी कोणता कोन, कोणते प्रमाण साधतात ? सौदर्याचा आदिम वारसा मिरवणारे कोणतेही फूल एकाच मापाच्या सर्व पाकळ्या घेऊन फुलले आहे काय ?
हे सगळे काटेकोर मापात असते तर इतके मोहक, चित्ताकर्षक झाले असते का ? नक्कीच नाही !
बघा हं. लख्ख सूर्यप्रकाशाच्या दिवशी सुर्व्या देवांनी, ‘आजचा कोटा पूर्ण झाला’ म्हणून दोन वाजताच किरणांचा गाशा गुंडाळून पलायन केले. ‘इकडे पन्नास एमेम झाला, चला रे आता तिकडे’ म्हणून परजेन्नराजानं मेघांची मेंढरं हाकलून नेली. किंवा इंग्लंडात आज चार इंच बर्फ झालंय, तीच लेवल स्वित्झर्लंडात वढूया, चला, अशा मोजमापानं हिमवृष्टी होऊ लागली. कसं वाटेल ??
...सगळं औघड होईल राव !!
अन असं सगळं अघळपघळ अंदाजपंचे असूनही या सगळ्यांना एक माप निश्चितच आहे. निसर्गात ‘आडमाप’ आणि अतिरेकी असं कुणीही नाही ! सागराच्या लाटांनी किनाऱ्यावर कितीही लांब धाव घेतली तरी सागर आपली मर्यादा सोडणार नाही. घर महापुरात बुडालं तरी अंघोळीचा नळ सोडून व्हॉट्सॅपवर टीपी करत बसण्याचा बिनघोरपणा पर्जन्यराजा करणार नाही. वीज कितीही जोरात कडाडली, तरी, बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत, डेसिबेलची सर्व लिमिट्स निकालात काढून, कानांचे पडदे फाडणाऱ्या डॉल्बीसारखी चोवीस तास कडकडत राहणार नाही. महापूर कुठपर्यंत ताणायचा ते नदीला चांगलं ठाऊक असतं, आणि कडक उन्हात भाजून चराचर सृष्टीची कितपत काहिली झाल्यावर मेघ दाटून यायचेत, त्याचं मापही आधीच ठरलेलं असतं.
समुद्र कधी प्लॅस्टिकच्या कचऱ्याचे वारेमाप ढीग आपल्या किनाऱ्याला लावत नाही. झाडे भकाभका पेट्रोलचा धूर ओकत जंगलात फिरत नाहीत. रात्रीच्या पार्टीचे अवशेष रानपाखरे आणि वन्य पशु कधी रस्त्यावर फेकत नाहीत आणि ओढे-नाले वाहताना पर्वताच्या सांदीकोपऱ्यात, दुर्गंधीने वसवसणारी सांडपाण्याची डबकी तुंबवीत नाहीत.
..निसर्गात जर ना माप, ना हिशेब, आडमाप आणि अमर्याद, असं कुणी असेल तर माणूस !
‘बरं एवढं नि उगीच थोडं’ माणसाच्या मापात बसत नाही. त्याचं सगळं वारेमाप !

राहणीविचार

प्रतिक्रिया

अनन्त अवधुत's picture

6 Sep 2017 - 11:41 am | अनन्त अवधुत

चहात आले किती घालू नी साखर किती घालू, हे विचारल्यावर आजी अशीच म्हणाली होती. घाल रे अंदाजाने , कळेल स्वतःला .

ज्ञानोबाचे पैजार's picture

6 Sep 2017 - 11:47 am | ज्ञानोबाचे पैजार

कमला बाई ओगलेंच्या रुचिरा मधे पण चमचा आणि वाट्यांची, किंवा अंदाजे अशी मापे दिली आहेत.
पैजारबुवा,

खूप मस्त लिहीलेयत- विचार करायला लावणारे, (नेहेमीप्रमाणेच!)

यशवंत पाटील's picture

6 Sep 2017 - 11:51 am | यशवंत पाटील

अक्षी माझी आजी आठवली की हो.

पैसा's picture

6 Sep 2017 - 11:53 am | पैसा

कसलं छान लिहिलंय!

बाजीप्रभू's picture

6 Sep 2017 - 12:05 pm | बाजीप्रभू

मीही जेवण बनवतांना अंदाजपंचे धाओदरसे बनवतो... ९९ टक्के टेस्टी बनतं (असे घरचे म्हणतात)... कसं बनवलं या प्रश्नाला कृतीमध्ये मी नेहमी "दोन वाटी प्रेम" हा जिन्नस खूप महत्वाचा असं सांगतो.
लेखात निसर्गाचे रेफरन्स खूप आवडले. अप्रतिम शब्द रचना.

नाखु's picture

6 Sep 2017 - 12:11 pm | नाखु

माप त्याच्या पदरात पडेल असे लिखाण!!!
मापातला मोकळा ढाकळा नाखु

आनन्दा's picture

6 Sep 2017 - 12:19 pm | आनन्दा

मस्त

प्रीत-मोहर's picture

6 Sep 2017 - 12:33 pm | प्रीत-मोहर

मस्त!! हातात माप बसलं की जिंकलंच किचन.

(अजुन हातात माप न बसलेली) प्रीमो

संजय पाटिल's picture

6 Sep 2017 - 12:42 pm | संजय पाटिल

अतिशय सुंदर लिखान!

संजय पाटिल's picture

6 Sep 2017 - 12:42 pm | संजय पाटिल

अतिशय सुंदर लिखान!

वकील साहेब's picture

6 Sep 2017 - 12:50 pm | वकील साहेब

रुचकर लेख

पद्मावति's picture

6 Sep 2017 - 1:32 pm | पद्मावति

अतिशय सुरेख लेख. खुप आवडला.

मीता's picture

6 Sep 2017 - 2:45 pm | मीता

मस्त लेख

चाणक्य's picture

6 Sep 2017 - 3:03 pm | चाणक्य

मस्त लेख. शेवट तर फक्कड जमलाय.

संग्राम's picture

6 Sep 2017 - 3:22 pm | संग्राम

मस्त लेख

लेख आवडलाच. अगदी मापात आहे !

यशोधरा's picture

6 Sep 2017 - 3:50 pm | यशोधरा

लेख आवडला.

कविता१९७८'s picture

6 Sep 2017 - 3:54 pm | कविता१९७८

छान लेख, मीही जेवण बनवताना सर्व पदार्थ अंदाजेच घेते त्यामुळे रीलेट करु शकले

आईशप्पथ! असेच प्रश्न, हीच उत्तरे! या मापात काही फरक नाही पण असा प्रत्येक शब्द तोलून मापून लिहिलेला लेख आवडला. आज्जी आणि मी असे अनेक प्रसंग आठवले. उगीच एवढं आणि उलिसं हे शब्द तर हमखास असत. तरी मी मापाची फार टिवटिव केली की "सासरी कसं होणार?" या प्रश्नानं हैराण झालेली आजी आठवते.
ग्रेट लिहिलय स्नेहा. आता माझा प्रतिसाद इथे आवरता घेतला नाही तर लांबत जाईल.

दुर्गविहारी's picture

6 Sep 2017 - 5:33 pm | दुर्गविहारी

खुपच मस्त!!! खुप दिवसांनी तुमचा लेख वाचायला मिळाला. या अश्या अंदाजाने केलेल्या स्वयंपाकाला आगळी चव येते.

पगला गजोधर's picture

6 Sep 2017 - 7:24 pm | पगला गजोधर

छान लेख, आवडला !

इशा१२३'s picture

6 Sep 2017 - 7:27 pm | इशा१२३

मस्त!हे असेच आणि असेच चालते.माप बिप कधि आजीने वापरताना पाहिलेले आठवत नाहि ना कधि आईने.त्यांना नविन पदार्थ विचारताना कसा करायचा म्हणजे मापबिप हे कधि कुणाला विचारतानाहि पाहिलेले आठवत नाहि.हेच काकु,आत्या मावशी बाबत.कुठलाही आणि कितीही लोकांसाठी करायचा पदार्थ असाच अंदाजाने करणार आणि नेमक्या चविवाच होणार हे ठरलेल.आताशा मलाही माप लागत नाहि अंदाजाने आणि वासाने तिखट ,मीठ समजत. आता मुलांना शिकवताना त्यांनाही असेच प्रश्ण पडतात, किति प्रमाणात काय वापरायच.घ्या म्हणते जरा अंदाजानेच.

इशा१२३'s picture

6 Sep 2017 - 7:27 pm | इशा१२३

मस्त!हे असेच आणि असेच चालते.माप बिप कधि आजीने वापरताना पाहिलेले आठवत नाहि ना कधि आईने.त्यांना नविन पदार्थ विचारताना कसा करायचा म्हणजे मापबिप हे कधि कुणाला विचारतानाहि पाहिलेले आठवत नाहि.हेच काकु,आत्या मावशी बाबत.कुठलाही आणि कितीही लोकांसाठी करायचा पदार्थ असाच अंदाजाने करणार आणि नेमक्या चविवाच होणार हे ठरलेल.आताशा मलाही माप लागत नाहि अंदाजाने आणि वासाने तिखट ,मीठ समजत. आता मुलांना शिकवताना त्यांनाही असेच प्रश्ण पडतात, किति प्रमाणात काय वापरायच.घ्या म्हणते जरा अंदाजानेच.

छान लिहिलं आहे. शेवट करताना फारच सुरेख पद्धतीने सत्य सांगितलं आहे. लेख आवडला.

कौशिकी०२५'s picture

6 Sep 2017 - 8:48 pm | कौशिकी०२५

आवडला.. आणि शेवटाकडे येताना मापात सांगितलेल्या गोष्टी मस्तच..अगदी स्वयंपाक ते डॉल्बी.

खूप खूप सुरेख लिहिलंय!

आजीबरोबर स्वयंपाकघरात फार लुडबूड नाही करायला मिळाली, पण आईचंही सगळं असंच अंदाजाने असतं आणि आता माझंही. त्यामुळे पाकृ लिहिताना सगळं साहित्य प्रमाणात लिहिणं हा सगळ्यात जास्त अवघड भाग वाटतो ;)

आवडला लेख. आजीची रेसिप्या सांगायची पद्धत आठवली.

मितान's picture

7 Sep 2017 - 12:08 pm | मितान

ब्येष्ट लिहिलंय ग !!!
हे माप फक्त रांधतावाढताच नाही तर आयुष्यात सगळीकडेच तारतम्याने वापरता आलं तो जिंकला !!

हे माप फक्त रांधतावाढताच नाही तर आयुष्यात सगळीकडेच तारतम्याने वापरता आलं तो जिंकला !!

अगदी अगदी !

नंदन's picture

7 Sep 2017 - 2:26 pm | नंदन

छान लिहिलंय.

या खेपेला आजीकडून कच्च्या केळ्यांची भाजी शिकायचा प्रयत्न केला होता. एवढंसं मीठ, जराशी हळद आणि केळी किती जून आहेत, यावर पाण्याचं प्रमाण इत्यादी पाहून तो नाद सोडून दिला :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Sep 2017 - 2:56 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर लेख ! ‘बरं एवढं नि उगीच थोडं’ मापात बनवलेल्या रुचकर स्वयंपाकासारखा :)

अभ्या..'s picture

7 Sep 2017 - 3:35 pm | अभ्या..

छान.
कुठल्याही कामात एकदा हात बसला की ते हातात बसतं.
हॉटेलातील वस्तादाकडे पाहून पाहून ते प्रचंड वेगाने, अंदाजाने आणि सराईतपणे हँडल करणे जमनार नाही असे वाटलेले. धाडस केले अन जमले लगेच. त्यानंतर घरातला गॅस स्लो वाटू लागला, चमचे, भारंभार भांडी अन मापाची कधीच गरज वाटली नाही. फक्त वस्तू हाताशी ठेवण्याची कला आहे. ती जमली की झालं.
हपिसातल्या कामातही असेच असते. अंदाजानेच होतात परफेक्ट कामे. प्रत्येकवेळी साईज फॉर्म्याट आणि इतर डीटेल्स चेक करावे लागत नाहीत. पाहणारे नवल करतात पण आपला हात बसलेला असतो.

ज्योति अळवणी's picture

7 Sep 2017 - 7:01 pm | ज्योति अळवणी

मस्त लिहिलं आहात.

माझी आजी देखील सुगरण होती. तिला तर चमच्याने किंवा वाटी भांड्याने मोजलेलं आवडतच नसे. तस केलंच तर ती ते परत करायला लावायची. तिने मला पाट्या-वरवंट्यावर चटणी वाटायला शिकवली ते आठवलं. पाट्यावरचा ऐवज वरवंट्याच्या ह्या बाजुकडून त्याबाजूकडे कसा सरकला पाहिजे ते तिनेच शिकवलं. जेमतेम चार बोटांवर पाणी घे पुरेल ते चटणीला अस तीच कायम म्हणणं होतं. घरात मिक्सर असूनही अनेक वर्षे तिने चटणी पाट्या-वरवंट्यावर करायला लावली. आणि आजही माझं मत आहे की त्या चटणीची चव मिक्सर मधल्या चटणीला नक्कीच नाही.

धर्मराजमुटके's picture

7 Sep 2017 - 8:16 pm | धर्मराजमुटके

ते पालेभाज्या न धुता खाणे सोडून बाकी सगळ्याबद्द्ल सहमती !

खरंय. भाज्या धुतल्या शिवाय घेणं डेंजरच.
त्या काळात भाज्यांवर भाराभर पेस्टिसाईड्स मारली जात नव्हती, बहुधा त्यामुळे न धुतल्या तरी आरोग्य बिघडत नसे

स्मिता.'s picture

9 Sep 2017 - 5:23 am | स्मिता.

सुगरणीने बनवलेल्या पदार्थासारखा खमंग आणि खुसखुशीत लेख!

अगदी असेच संवाद आमच्याकडेही झालेले आहेत. कधीतरी भाजी बनवायची हौस जागृत झाली की मी आईला किती मिरच्या, किती लसूण पाकळ्या, किती चमचे मीठ असले प्रश्न विचारून भंडावून सोडायचे. बिचारी मनातल्या मनात हिशोब करून मिरच्या- लसूणपाकळ्यांची अंदाजे संख्या सांगायची. मीठ मात्र स्वतःच टाकायची :D