परीकथा - भाग पंधरा >> २.१० - ३ वर्षे

Primary tabs

तुमचा अभिषेक's picture
तुमचा अभिषेक in जनातलं, मनातलं
11 Jul 2017 - 10:04 pm

४ फेब्रुवारी २०१७

आमच्यावेळी पालकसभा व्हायच्या. पालकांना वर्गात बसवून आम्हा वर्गातल्या "निवडक" आठ-दहा मुलांना सर्व पालकांसमोर उभे केले जायचे. अश्या निवडक मुलांमध्ये नसल्यास तो आपला अपमान समजून मी नेहमीच त्यात असेन ही काळजी घ्यायचो. आणि मग आमची खर्‍या अर्थाने ‘शाळा’ घेतली जायची. त्यानंतर एक राऊंड घरीही व्हायचा तो वेगळा.

पण आज परीच्या शाळेत पॅरेंट टीचर मिटींगला गेलेलो. फेस टू फेस. टीचर दोन आणि पॅरेंट मी एकच. आणि सुरु झाला नुसता कौतुक एके कौतुकाचा पाढा. शी इज वेरी वेरी रेज टू वेरी वेरी ब्राईट स्टुडंट. ती हे करते आणि ती ते करते, तिला हे ही जमते आणि तिला ते ही जमते. पोएम असो वा एबीसीडी, किंवा अदर अ‍ॅक्टीविटीज पोरगी सगळ्यात पुढे. पोरगी गोड आहे, सर्वांचे स्माईल देऊन स्वागत करते. नुसते एवढेच बोलून थांबले नाहीत तर म्हणाले पोरगी "डिसिप्लिनड" आहे. मी तर हे ऐकूनच खपलो. शिक्षकांकडून एवढे कौतुक माझ्या अखंड शैक्षणिक कारकिर्दीत झाले नसावे. आणि तिची मस्ती बघून उगाचच मला वाटायचे की पोरगी माझ्यावर गेलीय.

थोड्यावेळाने मलाही राहवले नाही. तिचे थोडे कौतुक करायला, तिला आणखी काय काय येते हे सांगायला, मी सुद्धा सुरुवात केली. पण नंतर आठवले, आपल्याच पोरीचे आपणच कौतुक करायला हे काही फेसबूक नाही, आणि मग आवरते घेतले :)

.
.

५ फेब्रुवारी २०१७

स्मार्ट जनरेशन आणि एडवान्स टेक्नोलॉजी !

आज रविवारचे मी आणि परी दोघेच घरी होतो. सव्वा अकरा वाजता मी उठलो, पावणेबाराला तिला उठवायला गेलो. उठताना पोरगी रडत रडत उठू नये म्हणून तेवढेच चान्स मारत "पा" घेत उठवले. तसे गाल चोळत उठली आणि अर्धवट झोपेतच चिडून म्हणाली, "ए तू हे काय केलेस, थांब मी मम्माला फोन करते." लागलीच डावा हात आरश्यासारखा समोर धरला. त्यावर टिंग टिंग टिंग करत बटणे दाबली. आणि तो हात कानावर ठेवला, "हेल्लो मम्मा, मी परी बोलतेय. पप्पांची थोडी थोडी दाढी टोचते.. ओके बाय", पुन्हा टिंग टिंग करत हातावरची बटणे दाबत फोन कट ! पोरगी डोळे मिटून पुन्हा झोपी गेली.

.
.

६ फेब्रुवारी २०१७

काल रविवारचे परीला घेऊन गार्डनमध्ये गेलो होतो. या आधी गार्डन म्हटले की नुसते झोपाळा आणि घसरगुंडीकडे वेड्यासारखे धावत सुटायची. आता गार्डनभर कुठेही वेड्यासारखी धावत सुटते. वेड तर रक्तातच आहे. पण हल्ली फेरीवाल्यांकडे जे जे दिसेल ते ते मागायचा वेडेपणाही सुरू केलाय.

एंट्रीलाच एक फुगेवाला दिसला. तो फुगा सांभाळावा मलाच लागतो म्हणून मी जाताना घेऊया म्हटले. आधीच तिचा खाऊ, रुमाल, पाण्याची बाटली आणि गरज नसताना उगाच घेतलेल्या बाहुल्यांचे ओझे सांभाळत होतो. त्यात आणखी याची भर नको होती. मोठ्या मुश्कीलीनेच तिने माझे ऐकले. कारण मागे एकदोनदा नंतर घेऊया म्हणत मी तिला टांग दिली असल्याने तिचा विश्वास गमावला होता. पुढे तिला भेलवाला दिसला. तिथे शेव कुरमुरे घेतले. ते कुठेतरी बसून खाणे अर्थातच आम्हाला जमत नाही. त्यामुळे तिच्या मागेमागे पळत तिच्या मूडनुसार तिला ते भरवत होतो. अर्धे खाल्ले, अर्धे बॅगेत ठेवले. पण थोड्यावेळाने पळतापळताच आणखी एक भेळवाला दिसला. आता त्याच्याकडचे हवे झाले. आधीचे शिल्लक होते, पण तिला त्याच्याकडचेच हवे होते. मी तिला खेचतच दूर नेऊ लागलो, पण तो भेळवालाही आपले गिर्हाईक हेरून आमच्या मागे मागे येऊ लागला. त्यामुळे प्रॅक्टीकली आमच्यामधील अंतर काही कमी होत नव्हते. पण त्या नादात आम्ही आईसक्रीमवाल्याजवळ पोहोचलो. खेळ खल्लास. तिथे तर नुसता धिंगाणा सुरू झाला. सर्दी खोकल्याच्या त्रासामुळे तिला आईसक्रीम पासून शक्यतो दूरच ठेवतो. त्यामुळे असले काही बाहेरचे घेऊन द्यायचा प्रश्नच नव्हता. पण आधीच एकदोन नकार पचवल्याने आता ती सुद्धा हट्टाला पोहोचली होती. आपला पप्पा काहीच कसा घेऊन देत नाही, तिचीही ईज्जत पणाला लागली होती. तिथून तिला कसा बसा उचलून बाहेर पडलो तर गेटजवळ एक खेळणीवाला दिसला!

हे, हे, हे आणि हे.. तिला सगळंच हवं होतं. पोरीच्या प्रेमापोटी तिचे ऐकले असते तर दुसर्‍या दिवशी मलाच ती खेळणी घेऊन गार्डनबाहेर बसावे लागले असते. मग मी एकच घेणार म्हणालो तसे तिने एक छोटासा दोरीवाला बॉल सिलेक्ट केला. मी दहा रुपये पुढे केले, पण तो वीस रुपये मागू लागला. तो दहा रुपयांनाच मिळतो हे मला माहीत होते, पण त्या माहितीचा काही फायदा होणार नव्हता हे देखील माहीत होते. दहा रुपये एक्स्ट्रा गेल्याचे दु:ख नव्हते, पण आपल्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत कोणी आपल्याला फसवले की चीड येते. मी चिडून घेतले, तोपर्यंत ती पुढच्या फेरीवाल्यासमोर पाय रोवून उभी राहिली होती. आता या पेटीतही दक्षिणा टाकल्याशिवाय रांग पुढे सरकणार नाही हे समजून मी त्याच्याकडच्या बॉलचा रेट विचारला. तो पन्नास बोलला तसे उचलला पोरीला आणि रिक्षात कोंबले. ती लाथा झाडत होती, पब्लिक मजा बघत होती आणि माझी नजर गर्दीतही त्या टीचरला शोधत होती जी तिला कालच्या पॅरेंट मिटींगमध्ये "डिसिप्लिनड" म्हणाली होती.

.
.

७ फेब्रुवारी २०१७

काल रात्री परीची मस्ती थांबवायला लाईट गुल केली आणि अंधारात स्वत:च जाऊन स्टूलाला धडकलो. गुडघ्याला जोरदार फटका बसला. कशीबशी लाईट लावली आणि जमिनीवरच आडवा झालो. ते बघून परी लगेच धावत आली आणि माझा कळवळणारा चेहरा बघून विचारले, "ए काय झालं?"
मी म्हणालो, "पायाला लागलं."
तसे माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, "अरे पप्पा, उद्या बरं होईल तुझे. मला कसं काल ईथे लागलेलं, ते उद्या बरं झालं. तसं तुझही उद्या बरं होईल. हसून दाखव आता.. हीईईईssss" आणि त्यानंतर माझे पाय चेपू लागली :)
क्षणात कमालीचा हट्टीपणा आणि क्षणात कमालीचा समजूतदारपणा, हे असलं काही तीच जमवू शकते. जेव्हा तिचे नव्याण्णव अपराध भरतात तेव्हा असे काहीतरी वागते आणि सारे माफ करून घेते :)

.
.

१० फेब्रुवारी २०१७

तो मोरंच काय ज्याला पिसारा नाही
आणि ते पोरंच काय ज्याचा पसारा नाही

- फिलींग अस्ताव्यस्त
...डूईंग कोंबाकोंबी

पण सांगतो कोणाला, पोरगी या बाबतीतही बापावरच गेलीय ;)

.
.

१३ फेब्रुवारी २०१७

सध्या आमचे हिंदी फॉर्मला आहे.
कधी मस्ती करताना तिला धरले तर, "अरे मेरे को छोड, मेरे को छोड .." असे बंबैय्या हिंदी येते.
तर कधी, "अरे थांबो थांबो.." असे टिपिकल महाराष्ट्रीय हिंदी निघते.
मुंबईत रिक्षावाल्यांशी हिंदीतच बोलायचे असते हे लवकरच समजल्याने त्यांनाही, "आगेसे राईट लेना.." अश्या सूचना हिंदीतच दिल्या जातात.
काल असेच रविवारचे नेहमीसारखे तिला गार्डनमध्ये घेऊन जात होतो. रिक्षावाल्याला हात दाखवला आणि ‘मिनी सीशोअर’ बोलून आत बसलो. आता हे गार्डन मिनी सीशोअरलाच आहे. पण ती दुसरेच नाव ऐकून बावचळली. आपला पप्पा गार्डन बोलून आपल्याला कुठे घेऊन चाललाय, असा काहीसा विचार तिच्या मनात आला, आणि लागलीच त्या रिक्षावाल्या्च्या खांद्याला थपथप करत म्हणाली.., "ए गार्डनपे लेके चल.. :P
त्या रिक्षावाल्यालाही कळले नसेल पोरगी मराठी आहे :)

.
.

१९ फेब्रुवारी २०१७

सुख सुख म्हणजे काय असतं..
शनिवारची रात्र आणि रविवारची सुट्टी..
कानात हेडफोन आणि सैराटची गाणी..
सोबत सारभात आणि माश्याची तुकडी..
आणि चक्क्क बाराच्या आत....
शांsssत झोपलेली परीराणी :)

.
.

१३ मार्च २०१७

एनकाऊण्टर !
आज झालाच असता..

नाही, होळी किंवा रंगपंचमीशी काही संबंध नाही. ती आटोपल्यावरच आज संध्याकाळी आम्ही राणीच्या बागेत गेलो. मी आणि परी दोघेच. धावून पळून थकल्यावर, सुका खाऊ खायला एका कोपरयातल्या छोट्याश्या गार्डनमध्ये शिरलो. आम्ही शिरताच तिथे जे एक प्रेमी युगुल बसले होते ते उठून निघून गेले. आमच्यामुळे की त्यांची वेळ संपली होती कल्पना नाही. तसेही संध्याकाळचे सहा वाजलेले, ते गार्डन एका कोपरयात असल्याने आणि वर घनदाट झाडांनी आच्छादलेले असल्याने अंधारून आलेले. पण शांत निवांत जागा आम्हाला पोटपूजा करायला छानच वाटली. बाकड्यावर बसलो, बिस्कीट काढले आणि खाणार तोच समोर एक कावळा उडत येऊन बसला. मोठ्या आशेने आमच्याकडे बघू लागला. माझी भूतदया जागी झाली आणि मी परीला काऊसोबत बिस्कीट शेअरींगचा सल्ला दिला. अशी ती पटकन कोणाला आवडीचे देत नाही, पण काऊला द्यायचेय म्हणताच अगदी उठून त्याच्या जवळ जाऊन एक तुकडा त्याच्या समोर टाकला. लागलीच अजून एक कावळा दत्त म्हणून हजर झाला.

पोरगी कावळ्यांना भरवतेय आणि कावळे मिटक्या मारत खाताहेत. वाह! काय फ्रेम आहे, म्हणत मी माझा कॅमेरा सरसावला. ईतक्यात चार कावळे अजून जमले. मी काही विचार करायच्या आधीच परीने आणखी एक तुकडा तोडून टाकला. तसे ते चार कावळे त्याच्यावर तुटून पडले आणि पुढच्याच क्षणाला आजूबाजूच्या झाडांवरून तब्बल चाळीसेक कावळे आमच्या दिशेने झेपावले. त्यांच्या कावकावने भानावर येईपर्यंत ते छोटेसे गार्डन जसे निवडणूकीच्या निकालानंतर देशभर भाजपाचे कमळ फुलावे तसे कावळ्यांनी भरून गेले. मी घाईघाईतच कॅमेरा खिश्यात टाकला आणि परीला उचलून घेतले. गार्डनबाहेर पडायचा एकच रस्ता आणि तो देखील ब्लॅक कारपेट अंथरावे तसे कावळ्यांनी भरलेला. परीच्या हातात बिस्किटाचा एक तुकडा अजून शिल्लक होता. त्यावर कोणी झेपावू नये म्हणून तो तिच्या हातातून घेत दूरवर भिरकावला. तसे सारे कावळे त्या दिशेने उडाले आणि सुदैवाने आमचा रस्ता थोडा मोकळा झाला. हे प्रसंगावधान वगैरे काही नव्हते फक्त नशीब होते. कावळे आले होते, पण काळ आला नव्हता. झपझप चार पावलात गेटबाहेर पडलो. पण त्याही वेळात दोनचार कावळे समोरून येत डोक्यावरून उडून मागे गेले. अगदी थ्रीडी ईफेक्ट सारखी तंतरली. सुखरूप बाहेर पडल्यावर मागे वळून त्या कावळ्यांच्या गुच्छाचा फोटो घ्यावासा वाटला पण मोह आवरला. कारण परी सोबत होती, आणि त्यांची संख्या एवढी होती की त्यांनी एकीचे बळ दाखवले असते तर सहज आम्हा दोघांनाही कवेत उचलून घेऊन गेले असते. मोजून दोनचार मिनिटांचेच नाट्य, पण असे वाटले एक एनकौऊंटर होता होता राहिला...

पण हा किस्सा ईथेच संपला नाही. तिथून लांबवर आम्ही दुसरया जागी गेलो. तिथे खेळता खेळताच ती बिस्किट खाऊ लागली. मी जरा लांबवरच होतो. अचानक तिच्या जवळच्या दांडीवर दोन कावळे येऊन बसले. मी तिला गंमतीतच म्हणालो, "परी ईकडे ये, ते बघ काऊ आले परत बिस्कीट खायला". पण माझे बोलणे संपते न संपते तोच चार अजून आले. त्यांना बघून जी पोरगी आजवर कावळ्यांच्या अंगावर सुसाट धावत सुटायची ती स्वत: घाबरून मला येऊन बिलगली. तोपर्यंत खरेच चारचे चौदा झाले होते. आता हे आधीचेच कावळे होते की एक पोरगी कावळ्यांना मोनॅको बिस्कीट वाटत फिरतेय ही खबर पुर्ण राणीबागभर पसरली होती याची कल्पना नाही, पण मी परीला सरळ खांद्यावर टाकले आणि सटकलो तिथून.
पण एक गोष्ट मात्र मनाशी पक्की केली, यापुढे कावळ्यांना जी काही भूतदया दाखवायची आहे ती आपल्या घराच्या खिडकीवरच ! :)

प्रकटनबालकथा

प्रतिक्रिया

एस's picture

11 Jul 2017 - 11:40 pm | एस

:-)

राजाभाउ's picture

12 Jul 2017 - 12:37 pm | राजाभाउ

नेहमी प्रमाणे मस्त !!!

तुमचा अभिषेक's picture

12 Jul 2017 - 9:01 pm | तुमचा अभिषेक

धन्यवाद, एस आणि राजाभाऊ :)