उगवता सूर्य आणि तो

अनिकेत कवठेकर's picture
अनिकेत कवठेकर in जे न देखे रवी...
2 Jul 2017 - 7:33 pm

उगवत्या सूर्याला पाहून तो छद्मीपणानं म्हणाला
तुझं उगवतं रूप फार फसवं आहे मित्रा
सकाळच्या किरणांना कोवळं म्हणण्यापेक्षा दुबळं म्हटलं पाहिजे
कारण मी तुझं हे शतकानुशतकाचं राहाट गाडगं पाहून कंटाळलोय
संध्याकाळी मावळताना हसलेलं आणि उगवताना वैतागलेलं पाहिलंय
तरीही तुझा उदयच लोकांना का आवडतो अस्त का नाही?
उगवत्याला दंडवत मावळत्याला का नाही?
सूर्य म्हणाला
ज्याच्याकडं काम असतं त्यालाच जग हात जोडते
काम संपत आलं की लगेच त्यालाच रद्दीत काढते
मग रक्त आटवलं तरी जग दखल घेत नाही
तुम्ही नष्ट झालात तरी जगाचं आडत नाही
कामाचा सूर्य थकल्यावर लोक पाठ फिरवतात
कामचुकारपणा जपण्यासाठी नव्या सूर्याला कवटाळतात

मुक्त कविताकविता