#मिपाफिटनेस - मी आज केलेला व्यायाम - मे २०१७ - #व्यायामविडा

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जनातलं, मनातलं
1 May 2017 - 10:33 am

नमस्कार मंडळी,

दर महिन्याप्रमाणे या महिन्यातही आपल्या समोर एक मिपाकर आपली व्यायामगाथा सांगणार आहेत. ह्या महिन्याचे मानकरी आहेत "वेल्लाभट"!

मुंबईसारख्या ठिकाणी अत्यंत धावपळीच्या दिनचर्येतही रात्री उशीरा का होईना पण ठरवलेला व्यायाम केल्याशिवाय न झोपणारे हे मिपाकर! नोकरी, जाण्या येण्यात जाणारा वेळ, लहान मुल अशा आपल्याकडे असणार्‍यशासर्व सबबी त्यांच्याही आयुष्यात आहेतच. पण त्याचा बाऊ न करता नित्य नियमाने व्यायाम तर करतातच पण सोबतच मिपाफिटनेसच्या धाग्यावरही त्यांचे प्रतिसाद अत्यंत वाचनीय असतात. ह्या महिन्याचा मिपाफिटनेसचा धागाही असाच वाचनीय असेल ह्यात शंकाच नाही.

आपल्यालाही आपले अनुभव मांडायचे असतील तर आम्हाला जरुर व्यनि करा.

टीम #मिपाफिटनेस - मोदक, प्रशांत, डॉ श्रीहास.

-------------------------------------------------------------------------------------------

वरच्या परिच्छेदात 'व्यायामगाथा' असा उल्लेख आहे. माझी काही व्यायाम्गाथा वगैरे नाही; पण व्यायामबाता बर्‍याच आहेत. म्हणजे की एक किडा असल्यासारखा व्यायामाचा, फिटनेसचा विचार सतत डोक्यात वळवळत असतो आणि त्यामुळे पुस्तक किंवा बरेचदा जालावर आरोग्यविषयक वाचन चालू असतं. आणि त्या वाचनातून मिळालेलं ज्ञान मी पदोपदी वाटत असतो. म्हणून व्यायाम'बाता'. बाकी फिटनेस विषयात फार काही झेंडे मी स्वतः रोवलेले नाहीत. किंवा मग व्यायाम'बाधा' म्हणता येईल. कारण व्यायाम म्हणजे एक व्यसन असल्यासारखं झालंय. त्यातल्या त्यात आधुनिक व्यायामपद्धती जास्त भावते त्यामुळे जिममधे वजनं, उपकरणं घेऊन केले जाणारे व्यायाम, आणि आता ते जमत नसल्यामुळे बॉडीवेट म्हणजेच कुठलंही अतिरिक्त वजन न घेता केले जाणारे व्यायाम करायचा आणि पर्यायाने फिट रहायचा प्रयत्न नेहमी चालू असतो.

ही व्यायामबाधा मला बरेच वर्षांपूर्वी झाली. एका मित्राची सोबत मिळाली आणि सुरुवातीची तीन सव्वा तीन वर्ष दणकून व्यायाम झाला. प्रोटीन ऑब्सेशन झालं, मग सोयाबीन आणून स्वतःसाठी वेगळी भाजी बनवणं इथपासून ते व्हे प्रोटीन शेक ऑफिसमधे घेऊन जाणं इथपर्यंत सगळं केलं. त्या दरम्यान शरीरयष्टीत झालेला बदल आल्हाददायक होता. पुढे एक एक व्याप आले आणि जिम वरून घरचेघरी व्यायाम आणि पुढे मिळेल तसा व्यायाम असा प्रवास होत गेला. वरती म्हटल्याप्रमाणे मला जिममधे जायला नेहमीच आवडतं. स्ट्रेंग्थ ट्रेनिंग विषयी विशेष आस्था आहे आणि ते करून चांगले परिणाम स्वतःमधे दिसतात, त्यामुळे ते आवडतं.

मिपाफिटनेस सुरू होण्याआधीही व्यायाम जमेल तसा, जमेल तितका सुरु असायचा. घरचेघरी असल्याने बॉडीवेट व्यायामांवर भर होता. बॉडीवेट असो किंवा जिममधे वजन घेऊन, उपकरण वापरून असो, व्यायामाच्या या प्रकाराला रेजिस्टन्स ट्रेनिंग म्हणतात. रेजिस्टन्स म्हणजे स्नायू आकुंचित करताना तुम्ही वजन/उलट दिशेचा फोर्स वापरता. असं केल्याने स्नायूंची झीज होते (मसल ब्रेकडाऊन) आणि पुढे विश्रांती+आहार यातून ती भरून काढली जाते ज्याने स्नायूंची वाढ होते, ते बळकट होतात व फॅट बर्न होतात. रेजिस्टन्स ट्रेनिंग का? वयानुसार स्नायूंमधील तंतू कमी होत जातात. ३० वयापुढे तर दर दहा वर्षाला अडीच किलो स्नायू शरीरातून वजा होतात असं एका अभ्यासात म्हटलेलं आहे. रेजिस्टन्स ट्रेनिंग ने स्नायूंची वाढ होते, परिणामी ते कमी होण्याच्या प्रक्रियेचा वेग कमी होतो. रेजिस्टन्स ट्रेनिंग मुळे मेटॅबोलिजम वाढतो ज्याने वजन व त्याबरोबर येणारे इतर अनेक आजार नियंत्रणात राहतात.

यानिमित्ताने काही संकल्पना थोडक्यात उलगडून सांगतो. व्यायामाचे मुख्यतः चार प्रकार पडतात.

१) अ‍ॅरोबिक - अ‍ॅरोबिक व्यायामप्रकारात ठराविक हालचाल लयबद्ध व निरंतर केली जाते. याचा मूळ उद्देश ह्रदयाचं आरोग्य, स्टॅमिना सुधारणे हा असतो. उदा: धावणे, पोहणे, सायकल चालवणे
२) अ‍ॅनारोबिक - अ‍ॅनारोबिक म्हणजेच स्ट्रेंग्थ ट्रेनिंग किंवा रेजिस्टन्स ट्रेनिंग. याचा मूळ उद्देश स्नायूंची शक्ती व आकार वाढवणे हा असतो. यातील हालचाली कमी आवर्तनात व हळू केल्या जातात ज्यात स्नायूंच्या आकुंचन-प्रसरणावर भर असतो.
३) फ्लेक्झिबिलिटी - योगासने, स्ट्रेचिंग ही याची उदाहरणे. या व्यायामप्रकारांचा मुख्य उद्देश शरीराची लवचिकता वाढवणे असून यात स्नायूंना ताण देऊन ती अवस्था धरून ठेवण्यावर भर असतो.
४) स्टॅबिलिटी - यात मुख्यत्वे शरीराचा तोल सांभाळणारे स्नायू बळकट करणे हा उद्देश असून यातील हालचालीही संथ व कमी असतात. ताई-ची हे याचं उदाहरण म्हणता येईल. प्लँक हा व्यायाम स्टॅबिलिटी प्रकारात मोडतो.

आपल्या व्यायामात या चारही प्रकारातल्या व्यायामांचा अंतर्भाव असणं केंव्हाही सरस. कुठलाही व्यायाम करत असाल तर काही गोष्टींची काळजी घ्या.

१) प्री वर्काउट मील - व्यायामाआधी किमान २०-२५ मिनिटे एखादं फळ किंवा चटकन उर्जा देणारा आहार घेतलेला चांगला, तोही मोजकाच.

२) वॉर्म अप - अत्यंत गरजेचा. अन्यथा दुखापतीची शक्यता बळावते. वॉर्म अप मधे विशेषत्वाने अशा मूव्हमेंट्स असतात ज्या तुम्ही पुढे वर्काउटमधे करणार असता. आणि म्हणूनच प्रत्येक व्यायामप्रकाराचा वॉर्म अप वेगळा असतो. धावण्या आधी करायचा वॉर्म अप वेगळा, आणि अपर बॉडी आगोदर करायचा वॉर्म अप वेगळा. सूर्यनमस्कारालाही वॉर्म अप लागतो.

वॉर्म अप मधे सामान्यतः स्लो जॉग, जंपिंग जॅक्स किंवा तुम्ही पुढे करणार्‍या व्यायामाचं कमी तीव्रतेचं व्हर्जन असू शकतं. जसं की बॉडी वेट पुश अप्स हा बेन्च प्रेस साठी वॉर्म अप आहे. बॉडीवेट स्क्वॉट हा वेटेड स्क्वॉटचा वॉर्म अप आहे.

३) फॉर्म - कुठलाही व्यायाम करत असताना फॉर्म किंवा पद्धतीकडे बारीक लक्ष द्या. फॉर्म चुकला तर फायद्या ऐवजी तोटा होऊ शकतो, गंभीर दुखापत होऊ शकते. मग ते योगासन असेल किंवा हेवीवेट स्क्वॉट.

४) व्यायाम किती करावा? - वेट ट्रेनिंग पुरतं म्हणायचं तर
ग्रोथ साठी - ८-१० रिपिटिशन, २ सेट, ५-७ व्यायामप्रकार
मेंटेनन्स साठी - १२-१५ रिपिटिशन, २-३ सेट, ८-१० व्यायामप्रकार
स्नायूंच्या आखीव रेखीव पणा साठी - १५-२० रिपिटिशन, २-३ सेट, ८-१० व्यायामप्रकार.
हे नियम नव्हेत, ठोकताळे आहेत त्यामुळे हे डिबेटेबल आहेत.

ओव्हरट्रेनिंग मात्र टाळणं गरजेचं. उदा. वेट ट्रेनिंग रोज करणं चूक. त्यातही रोज वेगवेगळ्या स्नायूगटांचा व्यायाम होत असेल तर ठीक, पण एकाच स्नायूला ४८ तासाच्या आत पुन्हा व्यायाम देणे हे तितकंसं योग्य मानलं जात नाही. स्नायूची झीज भरून यायला ४८ तासांचा अवधी जावा लागतो.

५) स्ट्रेचिंग आणि कूलडाऊन - व्यायामानंतर स्नायूंना ताण देणे गरजेचे असते. वॉर्म अप आणि स्ट्रेचिंग/कूलडाऊन यात बरेचदा गल्लत केली जाते. मागे मिपाफिटनेस धाग्यावरच एक याबद्दलचा प्रतिसाद दिला होता.

अनेकदा वॉर्मअप म्हणून स्ट्रेचिंग केलं जातं. स्टॅटिक स्ट्रेचिंग हे जर व्यायामाच्या किंवा एखाद्या फिजिकल अ‍ॅक्टिविटीच्या आगोदर केलं तर मसल स्ट्रेंग्थ, पर्फॉर्मन्स कमी होतो अशी अनेक निरीक्षणं नोंदवलेली आहेत. याउलट, व्यायामानंतरचं स्ट्रेचिंग हे मसल फटीग कमी करायला मदत करतं, ब्लड सर्क्युलेशन वाढवून सोअरनेस कमी करायला मदत करतं. व्यायामादरम्यान मसल्स मधे लॅक्टिक अ‍ॅसिड तयार होतं, जे पोस्ट वर्काउट स्ट्रेचेस ने एलिमिनेट व्हायला मदत होते. क्रेंप्स येत नाहीत. मसलचा टोन चांगला होतो. स्ट्रेचेस चे असे अनेक फायदे आहेत. पण; व्यायामानंतर. थोडक्यात, वॉर्म अप शुड इन्क्लूड 'मूव्हमेंट्स' आणि स्ट्रेचिंग शुड इन्क्लूड 'होल्ड्स'

६) आहार - प्रथम पोस्ट वर्काउट मील बद्द्ल. पोस्ट वर्काउट मील हे व्यायामा नंतरचं लगेचचं खाणं असावं. व्यायामानंतर २० मिनिटाच्या आत शरीरात पटकन पचणारी प्रथिनं, जीवनसत्व जाणं अतिशय उत्तम. हे काम प्रोटीन शेक चांगलं करु शकतात. सर्वसाधारण आहाराबद्दल इथे डॉक्टर लोक सांगतीलच. पण तरीही प्रथिनं, कॉम्प्लेक्स कार्ब्स, विटॅमिन्स, फायबर हे घटक महत्वाचे.

७) आराम - दिवसाला ६-८ तास झोप खरं तर प्रत्येकानेच घेतली पाहिजे. पण व्यायाम करत असाल तर मात्र तिचं महत्व जास्त असतं. स्नायूंची खरी वाढ, फॅटची खरी घट ही व्यायाम करत 'नसता' त्या वेळी होत असते.

८) प्रोग्रेसिव ओव्हरलोड - व्यायामाचीही शरीराला कालांतराने सवय होते व शरीरावर त्याचा परिणाम होईनासा होतो. हे होऊ नये म्हणून प्रोग्रेसिव ओव्हरलोड गरजेचं आहे. म्हणजेच व्यायामाच्या काठिण्य पातळीत होत असलेली वाढ. उदा. बैठका मारत असाल तर तुम्हाला १५ रिपिटिशन आरामात जमत असतील तर बारवरचं वजन वाढवणं गरजेचं आहे; किती याला महत्व नाही पण वाढवणं गरजेचं. धावत असाल आणि ३ किमी सहज्ज जात असतील तर त्या ३ चे एक तर ४ व्हावेत किंवा सपाट रस्त्याऐवजी चढ असलेला रस्ता निवडावा. व्यायामात प्रगती झाली कीच परिणामात आणि तुमच्यात प्रगती होते.

तसं सांगण्यासारखं बरंच आहे. सर्वात जास्त आढळणारा एक स्वभाव म्हणजे धरसोड. व्यायामाचं एक सांगणं असतं, डोन्ट एक्स्पेक्ट टू मच टू सून. जिम लावलं की ३ महिन्यात रिप्ड होता येत नाही. मॅरेथॉन धावायची असेल तर आठवड्याभराचा सराव पुरेसा नाही. टीव्हीवर, यूट्यूबवर बघितलं आणि चार दिवस झपाझप श्वासोच्छ्वास केला की सगळी टॉक्झिन्स बाहेर फेक्कली वगैरे जात नाहीत. त्याला वेळ द्यावा लागतो, सातत्य लागतं आणि निष्ठा लागते. असो. मिपाफिटनेसकडे येतो.

तर, #मिपाफिटनेस या उत्तम उपक्रमाला मोदकभाऊंनी सुरुवात केली आणि आगोदरच चालू असलेल्या व्यायामाला नवा जोर मिळाला. पहिले दोन महिने घेतलेले चॅलेंज काही जमले नाहीत. म्हणजे पाच पन्नास जोर मारून आम्ही व्यायामबाता मारल्याच तरीही, पण विशेष गांभीर्याने नव्हे. दिवसाचे १३ तास घराबाहेर, त्यातले ४ तास बेक्कार प्रवास, आल्यावर फॅमिली ड्यूटी, मुलाशी खेळणं, जेवणं इत्यादी; या सगळ्यात रात्रीचे बारा वाजणं, मग सकाळी लवकर उठता न येणं, आणि रिपीट; असं थोडक्यात चक्र असल्याने व्यायाम मागेच पडत होता. पण एप्रिल महिन्यात 'फुल' सिरियस व्हायचं ठरवलं आणि स्टेअर्स / हाय स्टेप अप्स चा चॅलेंज घेतला.

स्टेअर्स हा व्यायाम कार्डियो सारखाही काम करतो व स्ट्रेंग्थ ट्रेनिंगसारखाही. गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध तुम्ही तुमचं शरीर उचलता त्यामुळे मांड्या, पोठर्‍या, व संपूर्णच लोअर बॉडीसाठी ते रेजिस्टन्स ट्रेनिंग होतं, आणि त्याचबरोबर शरीराचा तोल सांभाळता त्यात कोअर मसल्स चा व्यायाम होतो. गती वाढवलीत तर हा कार्डियो व्यायाम होतो, गती कमी ठेवून काठिण्य पातळी वाढवलीत (एक पायरी सोडून चढणे किंवा स्टेप अप असेल तर स्टेप ची उंची वाढवणे, पाठीवर वजन घेणे इत्यादी) तर लोअर बॉडीसाठी उत्तम स्ट्रेन्ग्थ बिल्डर. या शिवाय स्टेअर्स च्या व्यायामप्रकारात इतकं नाविन्य तुम्ही आणू शकता, की रोज नव्या प्रकारेही व्यायाम होऊ शकेल.

- स्टेअर्स हा जगात अनेक तज्ञांनी 'व्हिगरस' एक्सरसाइझ म्हणून गणलेला व्यायाम आहे, जो चालणे/धावणे या आणि इतर काही व्यायामांपेक्षा अधिक कॅलरी दर मिनिटाला बर्न करतो.
- याला विशेष प्रशिक्षण लागत नाही.
- पायांना दुखापत होऊ नये म्हणून उत्तम बसणारे बूट असले की त्याव्यतिरिक्त कुठलंही साधन याला लागत नाही.
- हा व्यायाम कुठेही करता येतो. माझ्या घराजवळ एक पादचारी पूल असल्याने मी तिथे केला. पण निव्वळ इमारतीच्या जिन्यावर किंवा तितकंही बाहेर जायचं नसेल तर घरी स्टुलावर (स्टेप अप्स) हा व्यायाम होऊ शकतो.
- कुवतीनुसार, इच्छेनुसार याची काठिण्यपातळी बदलता येते.

मी केलेला व्यायाम: मी प्रामुख्याने स्ट्रेंग्थ ट्रेनिंगच्या दृष्टिकोनातून हा व्यायाम केला. वॉर्म अप म्हणून सामान्य पद्धतीने १०० पायर्‍या झाल्यावर एक एक पायरी सोडून जिना चढला. एका जिन्याला ५० पायर्‍या या प्रमाणे ४-६ सेट केले. एक पायरी सोडून जिना चढताना जवळजवळ लंजेस हा व्यायामप्रकार होतो, किंवा तसाच परिणाम होतो. वरती म्हटल्यानुसार यात विविधता आणता येते आणि तीही आणायचा प्रयत्न मी केला; उदा. दोनही पायांनी जिना चढणे किंवा आडव्या दिशेने चढणे इत्यादी.

ही लिंक बघावी: https://www.bodybuilding.com/fun/givstrength1.htm

ओव्हरट्रेन होणार नाही याची काळजी घेतली व किमान एक दिवसाच्या अंतराने व्यायाम केला. अनेकदा ऑफिसमधून आल्यावर घरी न जाता त्याच कपड्यानिशी थेट तसाच जिन्यावर जाऊन व्यायाम करून घरी गेलो. लॅपटॉपचं २ किलोचं वजन त्यावेळी उपयोगाचं वाटलं. त्यासाठी वाटेत असताना अर्धा तास आधी केळं खाल्लं वगैरे वगैरे. थोडक्यात चंग बांधला होता.

हा चॅलेंज सुरू करत असताना शरीराचं मोजमाप करणं विसरलो त्यामुळे तुलना करायला शेवटी फक्त वजन हाच एक निकष उरला. बाकी सगळे निकष सापेक्ष असल्याने ते नमूद करण्यात तथ्य नाही. पण मला स्वतःला ताकद, स्टॅमिना यात बरीच वाढ जाणवत आहे. सुरुवातीच्या दिवशी १५० पायर्‍यांमधे धापा टाकत होतो ते पंधराव्या दिवशी २५० नंतर लगेच फोन आला तरीही समोरच्या व्यक्तीला मी व्यायाम करतोय, किंवा दमलोय असं माझ्या आवाजावरून जाणवलं नाही. वजन अर्थातच कमी झालंय पण बीएमआय वगैरे गोष्टी न बघता त्याने हुरळून जाण्यात अर्थ नाही. तरीही विशेष म्हणजे इतर वेळी बसून बसून किंवा गाडी चालवून दुखणारा गुडघा गेल्या महिन्याभरात दुखलेला नाही.

आहार. आहारात तसा काहीच बदल नाही. मी एरवीही तीन तासाने काहीतरी खाल्लं जाईल याची काळजी घेतो, शीतपेय पीत नाही, वेफर्स इत्यादी जाणीवपूर्वक टाळतो. पण वडापाव, समोसा, मिसळ, भेळ; मुळात खादाड असल्याने सगळंच खायला आवडतं आणि जे आवडतं ते मनसोक्त खाणं हे तत्व आहे जे मी या चॅलेंजदरम्यानही पाळलं. नसतं पाळलं तर कदाचित थोडा जास्त फायदा झाला असता पण दिल दा मामला है; मन मारून काही केलं की शरीरातल्या कॅलरीज वाढतात म्हणे :)

तुम्ही पण स्टेअर्स चा व्यायाम करावा का? हो हरकत नाही. पण गुडघ्याची काही तक्रार आगोदर असेल, तर नको. किंवा मग डॉक्टरांना विचारून.

फक्त स्टेअर्स करून चालेल का? चालेलही, पण तितकंसं स्वागतार्ह नाही. व्यायामात विविधता लागते शरीराला. शिवाय स्टेअर्स चा अतिरेक केलात तर सांध्यांसाठी वाईट. स्टेअर्स ने फक्त लोअर बॉडीचा व्यायाम झाला, बाकी नाही. तेंव्हा फक्त स्टेअर्स अयोग्य. मी चॅलेंज पुरत्या केल्या असल्या तरी मधल्या दिवशी जोर, पुश अप्स, इत्यादी व्यायाम किरकोळ प्रमाणात चालू होते.

हे माझं महिन्याभराचं प्रगतीपुस्तकः थोडं अजून शिस्तशीर होऊ शकलं असतं, पण वेळ! :) असो.
a

आता पुढे: माझा मे महिन्याचा चॅलेंज : बर्पी चॅलेंज !

-----------------------------------------------------------------------------------------

आणि हो, या महिन्यापासून #मिपाफिटनेस मधे एक नवीन प्रथा सुरू करायची आहे. यात आपण एक #व्यायामविडा समोर ठेवायचा व तीन सदस्यांना तो उचलण्यासाठी नामांकित करायचं. त्या तिघांपैकी कुणीही किंवा सगळ्यांनी तो विडा दिलेल्या अटींसकट पूर्ण करून पुढे त्यांच्या मनानुसार नवीन #व्यायामविडा ठेवायचा, आणि तीन मिपाकरांना नामांकित करायचं. अशाप्रकारे ही #आरोग्यसाखळी गुंफत जायची आणि #मिपाफिटनेस चा झेंडा उंच फडकवत ठेवायचा.

चला तर,
मी ठेवतोय हा #व्यायामविडा:

रनिंग/धावणे: ७ दिवसात एकूण १० किमी धावायचं. रोज १ धावा किंवा एका दिवसात १०, हरकत नाही. १० पेक्षा जास्त धावताय? अतिउतम. आणि ७ दिवसांनंतर तुम्ही एक चॅलेंज/विडा ठेवून ३ मिपाकरांना नामांकित करायचं.

मी नामांकित करत असलेले सदस्यः टवाळ कार्टा, सृजा, हेमंत८२

व्यायामविडा ठेवायची कल्पना सुचवणारे मिपाकरः Sagarpdy

जीवनमानआरोग्यविरंगुळा

प्रतिक्रिया

झक्कास रे, सध्या ही नुसतीच पोच.

निवांत प्रतिसाद देतो आहेच.

धडपड्या's picture

1 May 2017 - 10:42 am | धडपड्या

वेल्लाभाऊंचा धागा अत्यंत अपेक्षेने उघडला, आणि अपेक्षापूर्ती झालीच...

प्रतिसादांप्रमाणेच अत्यंत माहितीपूर्ण आणि प्रेरक धागा..
विड्याची कल्पना अत्यंत आवडली आहे...

Dr prajakta joshi's picture

1 May 2017 - 11:04 am | Dr prajakta joshi

छान कल्पना

दशानन's picture

1 May 2017 - 12:30 pm | दशानन

#व्यायामविडा
हा प्रकार आवडला!
मी ही प्रयत्न करतो :)

इडली डोसा's picture

1 May 2017 - 12:43 pm | इडली डोसा

स्टेपर आणि स्टेप्स वापरुन काही ट्रेक्ससाठी तयारी करताना व्यायाम केला आहे. शिवाय जीम मधे सुद्धा बर्‍याच चकरा झाल्यात. सध्या काही न काही कारण निघुन नियमीत व्यायाम होत नाही. तुम्ही लिहिलेल्या बर्‍याच गोष्टी रिलेट करता आल्या.

मला इथे नॉमीनेट केलं नसलं तरीही मला हे चॅलेंज पूर्ण करायला आवडेल.
धावण्याच्या ट्रॅकिंगसाठी कोणतं अ‍ॅप इथे सगळे वापरतात?

मी सॅमसंग हेल्थ वापरतोय.

वेल्लाभट's picture

1 May 2017 - 2:39 pm | वेल्लाभट

मला इथे नॉमीनेट केलं नसलं तरीही मला हे चॅलेंज पूर्ण करायला आवडेल.

स्वागत!

टवाळ कार्टा's picture

1 May 2017 - 3:08 pm | टवाळ कार्टा

मी पयला

challenge accepted

टवाळ कार्टा's picture

1 May 2017 - 3:10 pm | टवाळ कार्टा

बाकी "टवाळ कार्टा, सृजा, हेमंत८२" हेच्च आयडी का आणि आयडींचा क्रम कोणत्या निकषांवर लावलाय त्याबाबतीत उत्सुकता आहे ;)

वेल्लाभट's picture

1 May 2017 - 3:24 pm | वेल्लाभट

तिघांचे प्रतिसाद बघितले आजवरचे. टकाशी कायप्पावरूनही बोलणं होतं.

कारणं आणि क्रम
टका - करू शकतो म्हणून
सृजा - करते म्हणून
हेमंत - सध्या करू शकत नाहीये म्हणून

हे जस्ट वाटलं म्हणून बरं का. :) मी जज करत नाहीये कुणाला.

टवाळ कार्टा's picture

1 May 2017 - 4:28 pm | टवाळ कार्टा

खिक्क...मला वाटले स्रुजा(पण) आळशी आहे =))

हे अगदी बरोबर आहे. तरीपण तुम्ही नॉमिनेटे केला हेच खूप छान आहे प्रयत्न करायला हरकत नाही पण या दोन आठवड्यामध्ये जमेल हे काही सांगता येत नाही.. कारण २ दिवस मुंबई दौरा आहे, ३ दिवस शेगाव आहे.. शेवटच्या २ आठवड्यात नक्क्की प्रयत्न करेन आणि कुणाला तरी नॉमिनेटे करेन हे नक्की.

पिलीयन रायडर's picture

1 May 2017 - 4:41 pm | पिलीयन रायडर

काय सुंदर लेख लिहीला आहेस!! वाखु म्हणून साठवलाय.

शक्यतो ह्या धाग्यावर येणारा प्रत्येक #व्यायामविडा उचलणारच! १० किमीचाही उचलत आहे. कुणी तरी मला नॉमिनेट करा रे पटकन. म्हणजे मी पण लगोलग ते चॅलेंज पूर्ण करुन कुणाला तरी नॉमिनेट करेन. (हे वाक्य लिहीताना मागे उगाच हिहीहॉहॉहॉ असा आसुरी आनंदाचा आवाज का येतोय?!)

मिपावर लोकांना टारगेट करायचंच आहे तर हे असं करुया ना =))

वेल्लाभट's picture

2 May 2017 - 12:46 pm | वेल्लाभट

१० किमीचाही उचलत आहे

शाबास!

पिलीयन रायडर's picture

2 May 2017 - 6:29 pm | पिलीयन रायडर

सुरुवात केली. १ किमी पळणे झाले. गॅप पडल्याने दम लागतोय चटकन पण १-२ दिवसात परत सवय होईलच. शिवाय आजवर जिममध्ये पळत होते, आता बाहेर जातेय पळायला. त्याची सवय नाही. चढ उतार तीव्र आहेत इथे जरा. पण उलट चांगलय!

नीलमोहर's picture

1 May 2017 - 5:11 pm | नीलमोहर

सातत्याने व्यायाम करणाऱ्यांबद्दल खरंच खूप आदर वाटतो, आणि त्यात हे असे मिपा फिटनेसचे धागे वाचून आपण नक्की काय करतोय (स्टेअर्स चढणे उतरणे, घरकाम सोडून) असं वाटतं, पण ते असो,
मस्त लिहिलेय,

राघवेंद्र's picture

1 May 2017 - 9:18 pm | राघवेंद्र

धागे निघाल्यापासून एप्रिल पर्यंत व्यायामाचे धागे उघडले पण नाही.

विटेकर काकांचे स्टेप्स चॅलेंज मागील महिण्यात वाचले आणि आत्ता वेल्ला भट यांचा अनुभव वाचला. बघू कसे जमते ते ?

एप्रिल महिन्यात दर सोमवार ते शुक्रवार सकाळी २ मिनिटे असे प्लॅन्क चॅलेंज पूर्ण केले. २ चे ३ मिनिटे करणे खूप अवघड वाटत आहे. मे अखेरीस अपडेट करेल.

साधा मुलगा's picture

1 May 2017 - 10:15 pm | साधा मुलगा

रनिंग/धावणे: ७ दिवसात एकूण १० किमी धावायचं. --- याचे पुढल्या रविवारी निकाल टाकतो.
ही लिंक बघा कशी वाटते आहे.
धावण्याचा विडा झाला कि ह्याचा विडा उचलावा म्हणतो.

इडली डोसा's picture

1 May 2017 - 11:37 pm | इडली डोसा

तुम्ही दिलेली लिंक पाहिली. छान आहे ते पण चॅलेंज.

वेल्लाभट's picture

2 May 2017 - 12:48 pm | वेल्लाभट

#व्यायामविडा उचलत आहे.

शाबास! होऊन जाऊदे.

आणि हो, तुम्ही दिलेली लिंक पण छान आहे. पुश अप चॅलेंजही कराच. शुभेच्छा!

रेवती's picture

1 May 2017 - 10:27 pm | रेवती

छान लिहिलय.

विड्याची कल्पना भारीच. मी पण उचलतो हा विडा. 7 दिवसात 15 किमी पळणे.

अवांतर - मिपाकर कुठला स्मार्टबँड वापरतात? ऑफिसमधे सध्या सगळे फिट्बीट वापरतात.

सपे-पुणे-३०'s picture

2 May 2017 - 3:22 pm | सपे-पुणे-३०

अतिशय मुद्देसूदपणे लिहिलं आहे. आवडलं.
व्यायामामध्ये जिन्यांचा उपयोग अनुभवला आहे. जिने चढताना पायऱ्या उलट्या चढल्यावर सुद्धा अधिक चांगला फायदा होतो. तसंच चार पायऱ्या धावत चढून आपल्या शक्ती नुसार चार पुशअप्स, पुन्हा ४ पायऱ्या धावत चढणे असं कॉम्बिनेशन करू शकतो.

वेल्लाकाकांचा धागा म्हणून उघडला, नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण.

आषाढ_दर्द_गाणे's picture

2 May 2017 - 9:57 pm | आषाढ_दर्द_गाणे

धन्यवाद!

सुंदर धागा आणि उत्तम माहिती!

स्रुजा's picture

3 May 2017 - 5:01 am | स्रुजा

बाब्बो !!वेल्ला दंडवत घे. मला वाचायला जरा उशिर झाला पण वेळ काढूनच वाचल्याचं सार्थक झालं. इतकं प्रेरणादायी लिहील्यावर चॅलेंज न घेणं म्हणजे लानत च ! फक्त एक आहे, मी काही कारणामुळे अजुन एखाद महिना धावू शकणार नाही पण मी रोज ३ कीमी चं चॅलेंज घेते - चालायचं. चालेल का?

आणि टका, तूच आहेस आळशी गोळा :P

वेल्लाभट's picture

3 May 2017 - 6:33 pm | वेल्लाभट

चालेल की. शक्यच नसेल तर हरकत नाहीच.

प्रीत-मोहर's picture

3 May 2017 - 8:38 am | प्रीत-मोहर

मीही हा व्यायामविडा उचलायचा प्रयत्न करतेय.

वेल्लाभट's picture

3 May 2017 - 1:35 pm | वेल्लाभट

१ मे - १० बर्पी
२ मे - १५ बर्पी

इरसाल कार्टं's picture

3 May 2017 - 9:38 pm | इरसाल कार्टं

मस्त आणि माहितीपूर्ण लेखन!
आणि विड्याची कल्पना भारी बरंका पाध्ये.

वेल्लाभट's picture

3 May 2017 - 10:20 pm | वेल्लाभट

१ मे - १० बर्पी
२ मे - १५ बर्पी
३ मे - २० बर्पी (१८-२० करताना कठीण गेलं, आता उद्या २५ करणं खरी कसोटी ठरणारंय)

राघवेंद्र's picture

4 May 2017 - 7:52 pm | राघवेंद्र

पुश-अप knee की toe ???

बर्पी ला knee पुश-अप चालतो का ??

वेल्लाभट's picture

4 May 2017 - 10:15 pm | वेल्लाभट

knee पुश-अप चालायला हरकत नाही पण एक स्टेप वाढेल ना? करून बघा, ते सोपं वाटल्यास ते करा !

मी पुश अप वालं व्हर्जन करतो. यात पण बरेच फेरफार होऊ शकतात.

वेल्लाभट's picture

4 May 2017 - 10:16 pm | वेल्लाभट

१ मे - १० बर्पी
२ मे - १५ बर्पी
३ मे - २० बर्पी (१८-२० करताना कठीण गेलं, आता उद्या २५ करणं खरी कसोटी ठरणारंय)
४ मे - २५ बर्पी (जमल्या! दम निघाला पण जमल्या.)

राघवेंद्र's picture

5 May 2017 - 8:55 pm | राघवेंद्र

मस्त एकदम!!!

छान लेख. धावायच्या जागि चालायचे चॅलेंज घेते.

स्रुजा's picture

5 May 2017 - 10:05 pm | स्रुजा

मी कालपासून चॅलेंज ला सुरुवात केली आहे.

वेल्लाभट's picture

5 May 2017 - 10:59 pm | वेल्लाभट

१ मे - १० बर्पी
२ मे - १५ बर्पी
३ मे - २० बर्पी (१८-२० करताना कठीण गेलं, आता उद्या २५ करणं खरी कसोटी ठरणारंय)
४ मे - २५ बर्पी (जमल्या! दम निघाला पण जमल्या.)
५ मे - ३० बर्पी

विंजिनेर's picture

6 May 2017 - 3:16 am | विंजिनेर

रनिंग/धावणे: ७ दिवसात एकूण १० किमी धावायचं. रोज १ धावा किंवा एका दिवसात १०, हरकत नाही. १० पेक्षा जास्त धावताय? अतिउतम. आणि ७ दिवसांनंतर तुम्ही एक चॅलेंज/विडा ठेवून ३ मिपाकरांना नामांकित करायचं.

१० किमी = ७.५ मैल ना? मग माझे झालेय्त ह्या आठवड्यात आत्ता पर्यंत - उद्या अजून ५ मैल होतील.
कुणाला नॉमिनेट करायचं?

विंजिनेर's picture

6 May 2017 - 9:36 am | विंजिनेर

ते आपलं ... ६ मैल पण एनिवे. झालेत.

वेल्लाभट's picture

6 May 2017 - 11:09 pm | वेल्लाभट

ग्रेट की मग...

आता तुम्ही नामांकित करा एखाद्याला, 'तुमच्या' मनाने एखादा #व्यायामविडा ठेवून! रनिंगच पाहिजे असं काही नाही.

वेल्लाभट's picture

7 May 2017 - 12:30 am | वेल्लाभट

१ मे - १० बर्पी
२ मे - १५ बर्पी
३ मे - २० बर्पी (१८-२० करताना कठीण गेलं, आता उद्या २५ करणं खरी कसोटी ठरणारंय)
४ मे - २५ बर्पी (जमल्या! दम निघाला पण जमल्या.)
५ मे - ३० बर्पी
६ मे - ३५ बर्पी (१० नंतर १० सेकंद गॅप घेतली पण त्या दहा सेकंदात इतर वॉर्म अप सदृश व्यायाम केले, सो अ‍ॅज टू कीप मूव्हिंग कॉन्स्टंटली.)

सप्तरंगी's picture

7 May 2017 - 2:45 am | सप्तरंगी

मस्त, खूप उपयुक्त माहिती...

वेल्लाभट's picture

7 May 2017 - 1:17 pm | वेल्लाभट
इडली डोसा's picture

8 May 2017 - 12:01 pm | इडली डोसा

मी केलेला व्यायाम खालील प्रमाणे-
नकाशा, आकडे, ट्रेल चा काही भाग

challenge

वेल्लाभट's picture

8 May 2017 - 12:53 pm | वेल्लाभट

a

उत्तम. मग तुम्ही कुठला #व्यायामविडा ठेवताय 'ईडली डोसा'?

इडली डोसा's picture

9 May 2017 - 4:50 am | इडली डोसा

टबाटा

दहा दिवस - एक आड एक दिवस पळणे (दर दिवशी २ किमी) आणि टबाटा करु शकतो. मी हा व्यायाम करताना रिपिटिशन्स आणि विश्रांतीचा वेळ मोजण्यासाठी मनातल्य मनात आकडे मोजते.

बोला कोण आहे तयार?

वेल्लाभट's picture

9 May 2017 - 12:24 am | वेल्लाभट

१ मे - १० बर्पी
२ मे - १५ बर्पी
३ मे - २० बर्पी (१८-२० करताना कठीण गेलं, आता उद्या २५ करणं खरी कसोटी ठरणारंय)
४ मे - २५ बर्पी (जमल्या! दम निघाला पण जमल्या.)
५ मे - ३० बर्पी
६ मे - ३५ बर्पी (१० नंतर १० सेकंद गॅप घेतली पण त्या दहा सेकंदात इतर वॉर्म अप सदृश व्यायाम केले, सो अ‍ॅज टू कीप मूव्हिंग कॉन्स्टंटली.)
७ मे - आराम
८ मे - ४० बर्पी

वेल्लाभट's picture

10 May 2017 - 11:12 am | वेल्लाभट

१ मे - १० बर्पी
२ मे - १५ बर्पी
३ मे - २० बर्पी (१८-२० करताना कठीण गेलं, आता उद्या २५ करणं खरी कसोटी ठरणारंय)
४ मे - २५ बर्पी (जमल्या! दम निघाला पण जमल्या.)
५ मे - ३० बर्पी
६ मे - ३५ बर्पी (१० नंतर १० सेकंद गॅप घेतली पण त्या दहा सेकंदात इतर वॉर्म अप सदृश व्यायाम केले, सो अ‍ॅज टू कीप मूव्हिंग कॉन्स्टंटली.)
७ मे - आराम
८ मे - ४० बर्पी
९ मे - ६० जोर, ३ मिनिट प्लँक, बुलवर्कर (हे एक उपकरण असतं ज्याने आयसोमेट्रिक प्रकारातला व्यायाम करता येतो)

झक्कास व्यायाम सुरु आहे...!!

प्रसन्न३००१'s picture

11 May 2017 - 12:01 pm | प्रसन्न३००१

फायनली, काल जिम मध्ये ऍडमिशन रिन्यू केली.. गेले २ महिने या ना त्या कारणाने राहत होतं (टाळाटाळ).. म्हटलं, बेटर लेट द्यान सॉरी

आता आज पासून रोज वर्कआउट करायलाच हवा

पिलीयन रायडर's picture

11 May 2017 - 8:14 pm | पिलीयन रायडर

घरात वातावरणच नाही व्यायामाचं. आई येतेय, बहीण आली आहे. अजुन १ महिना काही विचारु नका आता! (I am not even sorry! )

वेल्लाभट's picture

11 May 2017 - 9:53 pm | वेल्लाभट

असं कसं असं कसं! रूटीन आहे ते. जसं जेवण तसा व्यायाम.

विडा ना उचललात? मग?

प्रसन्न३००१'s picture

12 May 2017 - 9:07 am | प्रसन्न३००१

काल जवळपास २.५ महिन्यानंतर जिम मध्ये गेलो.

ट्रेडमिल - १५ मिनिटे
क्रॉस-ट्रेनर - ११ मिनिटे
इनडोअर सायकल - ५ किमी/११ मिनिटे
स्टेप-अप - १०*२
बर्पी - ५*२

एकूण कॅलरी बर्न - ४४५

फिलिंग एनर्जेटिक

इट्स गुड टू बी बॅक

आज सकाळी १० बर्पी

वेल्लाभाऊ, तुम्ही ४०-४० बर्पीस कश्या मारता राव... इथे १० मारताना घामट्या निघाला

वेल्लाभट's picture

13 May 2017 - 1:00 am | वेल्लाभट

एक्दम नाही जमल्या. रोज ५ ५ वाढवल्यात. स्लो जावा. होईल आपोआप शक्य.

अनिल कपूर's picture

12 May 2017 - 2:40 pm | अनिल कपूर

बेस्ट .......like the way this is introduced.....
Will also love to take it....I have not nominated though...

वेल्लाभट's picture

13 May 2017 - 12:59 am | वेल्लाभट

१ मे - १० बर्पी
२ मे - १५ बर्पी
३ मे - २० बर्पी (१८-२० करताना कठीण गेलं, आता उद्या २५ करणं खरी कसोटी ठरणारंय)
४ मे - २५ बर्पी (जमल्या! दम निघाला पण जमल्या.)
५ मे - ३० बर्पी
६ मे - ३५ बर्पी (१० नंतर १० सेकंद गॅप घेतली पण त्या दहा सेकंदात इतर वॉर्म अप सदृश व्यायाम केले, सो अ‍ॅज टू कीप मूव्हिंग कॉन्स्टंटली.)
७ मे - आराम
८ मे - ४० बर्पी
९ मे - ६० जोर, ३ मिनिट प्लँक, बुलवर्कर (हे एक उपकरण असतं ज्याने आयसोमेट्रिक प्रकारातला व्यायाम करता येतो)
१० मे - काहीही नाही
११ मे - काहीही नाही
१२ मे - ४५ बर्पी (हापसातून घरी यायला ११ वाजले. नो एक्स्क्यूज)

प्रसन्न३००१'s picture

13 May 2017 - 1:00 pm | प्रसन्न३००१

११ मे २०१७
ट्रेडमिल - १५ मिनिटे
क्रॉस-ट्रेनर - ११ मिनिटे
इनडोअर सायकल - ५ किमी/११ मिनिटे
स्टेप-अप - १०*२
बर्पी - ५*२
एकूण कॅलरी बर्न - ४४५

१२ मे २०१७
बर्पी - ५*२

१३ मे २०१७
ट्रेडमिल - १५ मिनिटे
क्रॉस-ट्रेनर - १२ मिनिटे
इनडोअर सायकल - १२ मिनिटे
इनडोअर रोईंग - ३०*३
स्टेप-अप - १५*२
बर्पी - ५*२
एकूण कॅलरी बर्न - ६००

बऱ्याच दिवसांपासुन काही कारणांनी मिपा पासुन लांब असल्याने प्रतिसाद देऊ शकलो नाही. तसे सायकलींग पण अधे मधे दांड्या मारत का होईना चालूच आहे. पहिल्याप्रमाणे दररोज सायकल फेरी होत नाही.

साधारण एक महिन्यापुर्वी, गेल्या दोन वर्षांपासुन बंद पडलेले चालणे आणि धावणे पुन्हा एकदा चालू केले. सुरुवात अगदी तीन किमी चालण्यापासुन केली. हळुहळु अंतर एक-एक किमी ने वाढवत पाच किमी पर्यंत वाढवले. नंतर पळायला चालू केले. साडे तीन ते चार किमी चालणे व एक किमी पळणे. आठवडाभरात धावण्याचे अंतर पण वाढवले आणि सध्या तीन किमी चालणे व दोन किमी धावणे असा क्रम चालु आहे. रोज सकाळी चालणे, धावणे व दोन दिवसाआड संध्याकाळी २६ किमीची सायकल फेरी असा क्रम होता.

चार दिवसांपुर्वी याला व्यायामशाळेची (जीम) जोड दिली. खरे तर व्यायामशाळेची सवय पाच वर्षांपुर्वी लागली पण यात सुद्धा दोन वर्षांपासुन खंड पडला होता. त्याआधी तीन वर्षे नियमितपणे व्यायामशाळेत जात होतो. आता पुन्हा लातूर क्रिडासंकुलवरच्या त्याच व्यायामशाळेत दाखल झालो. सुरुवात पुशअप्स, अर्धबैठका व मल्टीजिम मशीनवर हलकी वजने लावून केली आहे.

यामुळे चार दिवसांपासुन सकाळी पाच वाजता उठुन साडेपाचला क्रिडासंकुलवर हजर होणे, ३ किमी चालणे, २ किमी धावणे, २२ पायऱ्यांच्या जिन्यावर चढणे उतरणे, १५ ते २० मिनिट स्ट्रेचिंग पद्धतीचे व्यायाम व साधारण अर्धा ते पाऊण तास मल्टीजिम वर सर्व अवयवांचे व्यायाम असा दिनक्रम आहे. यात दोन दिवस संध्याकाळी २६ किमी सायकल फेरी पण झाली.

आता मात्र या दिनक्रमात सातत्य राखण्याचे जोरदार प्रयत्न करणार हे नक्की.

अजुन एक सांगायचे म्हणजे मध्यंतरी आपले मिपाकर श्री चंबा मुतनाळ यांनी त्यांचे छायाचित्र सायकल समुहावर टाकुन एकच धूम उडवुन दिली. त्यांचे दणदणीत व्यक्तीमत्व बघून आम्ही सगळेच हबकुन गेलो. त्यामुळे सध्या आमच्या सायकल समुहाची प्रेरणा चंबा मुतनाळ सरांकडे गेली आहे व ती बहुतेक कायमची तिकडेच राहणार अशीच चिन्हे आहेत.

इथुन पुढे माझ्या व्यायामाबद्दल नियमितपणे प्रतिसाद टाकत राहीन.

चंबा मुतनाळ's picture

15 May 2017 - 11:05 am | चंबा मुतनाळ

काय अरिंजयराव, लाजवताय का आता !

अरिंजय's picture

15 May 2017 - 7:32 pm | अरिंजय

तुम्ही इथे पण तुमचा फोटो टाका अन् बघा कशी खळबळ उडते. पण एक गोष्ट प्रामाणिक पणे सांगतो, तुमच्याकडे बघुन खरंच उत्साह वाढला, प्रेरणा मिळाली.

चंबा मुतनाळ's picture

15 May 2017 - 11:09 am | चंबा मुतनाळ

ईथे वेल्लाभटांच शेड्युल बघून हबकलोच !

अरिंजय's picture

15 May 2017 - 7:35 pm | अरिंजय

आज ३ किमी वॉकींग,
२ किमी रनिंग,
स्टेप्स (२२×५),
स्ट्रेचिंग वगैरे १५ मिनीट,
पुशअप्स ३० (५×६), दंड जाम अकडल्यामुळे ५-५ चे ६ सेट मारावे लागले.
स्क्वाट्स ३० (१०×३),
मल्टीजिम वर चेस्ट, बॅक, लॅटरल्स, शोल्डर्स, थाईज, काव्ह्ज, बायसेप्स, ट्रायसेप्स, आणि बारबेल्स वापरुन फोरआर्म & रीस्ट.

वेल्लाभट's picture

16 May 2017 - 12:43 am | वेल्लाभट

माझं काही मोठं शेडुल नाही हो चंबा मुतनाळ भाऊ. तुमचा 'तो' फोटो बघायची मात्र उत्सुकता आहे.

१३ मे - काहीही नाही
१४ मे - काहीही नाही
१५ मे - ५० स्क्वॉट्स
१६ मे - बुलवर्कर, ३० जोर, १*१० डंबेल वन-आर्म प्रेस, १*१० ट्रायसेप ओव्हरहेड एक्स्टेन्शन, १*१० बायसेप कर्ल , १०० स्किपिंग

अप्पा जोगळेकर's picture

16 May 2017 - 1:40 pm | अप्पा जोगळेकर

ते ६० वर्षांचे आहेत आणि दररोज ५० पुशप, १०० स्क्वॅट, १०० सीटअप आणि बरेच काय काय करतात.
सेम टू सेम हुल्क हॉगन.

प्रसन्न३००१'s picture

16 May 2017 - 9:45 am | प्रसन्न३००१

१४ मे २०१७
बर्पी - ६*२
स्प्रिंट वॉक - ५.८५ किमी / १ तास, १८ मिनिटे
एकूण कॅलरी बर्न - ३१४

१५ मे २०१७
स्प्रिंट वॉक - १.७२ किमी / २३ मिनिटे
ओव्हरहेड पुली - १५*२
लॅटरल पुली - १५*२
फ्लॅट बेंच प्रेस - २०*२
चेस्ट फ्लाय - २०*२
शोल्डर प्रेस - १५*२
शोल्डर फ्लाय - १५*२
बायसेप्स कर्ल - २०*२
ट्रायसेप्स - २०*२
श्रग्स - २०*२
क्रॉस-ट्रेनर - ११ मिनिटे
स्टेप-अप - १५*१
बर्पी - ५*१
एकूण कॅलरी बर्न - ४२७

चंबा मुतनाळ's picture

16 May 2017 - 2:09 pm | चंबा मुतनाळ

सायकल - १६ कीमी
स्क्वॅट्स - १००
पुश अप्स - ६५ (३५; ३०)
प्लॅंक्स - १०५ सेकंद
सिट अप्स - ११५
बर्पीज पण चालू केल्या आहेत - १० मारल्या

चंबा मुतनाळ's picture

16 May 2017 - 2:46 pm | चंबा मुतनाळ
अरिंजय's picture

16 May 2017 - 7:45 pm | अरिंजय

सरजी __/|\__

प्रसन्न३००१'s picture

16 May 2017 - 3:18 pm | प्रसन्न३००१

मिपा चे हल्क होगन ;-) (clap)

वेल्लाभट's picture

16 May 2017 - 3:39 pm | वेल्लाभट

बाब्बो....

#रिस्पेक्ट #आदर #दंडवत
_/\_

एकदम प्रामाणिकपणे सांगतो. मला प्रच्चंड कौतुक वाटतं तुमच्यासारख्या मंडळींचं. खतरनाक.

अरिंजय's picture

16 May 2017 - 7:45 pm | अरिंजय

आज सकाळी उठायलाच उशीर झाल्यामुळे फक्त ३ किमी चालण्याचा व्यायाम केला.

चंबा मुतनाळ's picture

17 May 2017 - 6:38 am | चंबा मुतनाळ

१६ मे २०१७ :
सायकल - १६ की मी (ऑफिसला जाउन/येउन)
स्क्वॅट्स - १००
पुश अप्स - ६० (३५; २५ )
प्लॅंक्स - १२० सेकंद
सिट अप्स - ११५

प्रसन्न३००१'s picture

17 May 2017 - 8:59 am | प्रसन्न३००१

काल काही नाही झाला व्यायाम.... निव्वळ आळस :-(

अरिंजय's picture

17 May 2017 - 7:51 pm | अरिंजय

आज ३ किमी वॉकींग,
२ किमी रनिंग,
स्टेप्स (२२×५),
स्ट्रेचिंग वगैरे १५ मिनीट,
पुशअप्स ३० (१०×३),
स्क्वाट्स ३० (१०×३),
मल्टीजिम वर चेस्ट, बॅक, लॅटरल्स, शोल्डर्स, थाईज,
बायसेप्स, ट्रायसेप्स, आणि बारबेल्स वापरुन
फोरआर्म & रीस्ट.

चंबा मुतनाळ's picture

18 May 2017 - 8:00 am | चंबा मुतनाळ

११ मे २०१७
रोजचे ऑफिस्ला जाणे येणे - १६ किमी सायकल
आणी ६ किमी चालणे/पळणे

हेमंत८२'s picture

18 May 2017 - 10:24 am | हेमंत८२

आजचा व्यायाम
२ किमी चालने

वेल्लाभट's picture

18 May 2017 - 1:08 pm | वेल्लाभट

१७ मे - २७५ स्टेअर्स

अरिंजय's picture

19 May 2017 - 7:52 pm | अरिंजय

आज पण नेहमी प्रमाणे ३ किमी वॉकींग,
२ किमी रनिंग,
स्टेप्स (२२×५),
स्ट्रेचिंग वगैरे १५ मिनीट,
पुशअप्स ३० (१०×३),
स्क्वाट्स ३० (१०×३),
मल्टीजिम वर चेस्ट, बॅक, लॅटरल्स, शोल्डर्स, थाईज, बायसेप्स, ट्रायसेप्स, आणि बारबेल्स वापरुन फोरआर्म & रीस्ट.

अरिंजय's picture

20 May 2017 - 8:31 pm | अरिंजय

आज फक्त ५ किमी चालण्याचा व्यायाम केला.

अप्पा जोगळेकर's picture

22 May 2017 - 12:02 pm | अप्पा जोगळेकर

मी ७ वाजताच चांदणी चौकला पोचलो काल रात्री. आयोजकांनी टेल लाईट, हेड लाईट वगैरे चेक करून ब्रेवे कार्ड ओके केले. मग निवांत वडापाव, चहा वगैरे सोपस्कार झाले तोवर इतर सायकल पटू आले होते. त्यांच्या उच्च सायकलीपुढे माझी ६ गियर ची सायकल अगदीच गरीब वाटत होती. ते सगळे उगाचच इंग्रजी भाषेत बोलत होते. यो असतील. पण कसलेले खेळाडू वाटत होते सगळे. एकदम ऍथलेटिक फिजिक वाले. तेवढ्यात माझे मित्र संग्राम आणि अक्षय देशपांडे आले. देशपांडे मामांनी २००,३०० किमी च्या चिक्कार ब्रेवे केल्या आहेत. यावेळी त्यांना १० तासात पूर्ण करायची होती. असो.
८ ला सुटलो. मस्त वातावरण एकदम. थंड वारा. पाषाण लेक, रंगला पंजाब हॉटेल, हरबिंजर कंपनी, वाकड, स्वागत बिअर शॉप क्रमाने मागे पडत गेले. सेंटोसा रिसॉर्ट पाशी १ ब्रेक घेतला. १ तास २२ किमी. नॉट बॅड. तळेगाव टोल नाक्यावर पहिला कंट्रोल पॉईंट होता. कार्ड स्टॅम्प करून घेतले आणि निघालो. परत चांदणी चौक ला जायचे होते. वाटेत बालेवाडी जवळ एकाच tyre फ्लॅट झाला होता. एकटाच खुडबुडत होता अंधारात. थांबलो. दोघानि मिळून चाक काढले आणि दुसरी टयूब टाकली. चाक बसवून कल्टी मारली. स्क्रू वगैरे त्याने पिळले असते पुढे एकट्याने. या भानगडीत १५ मिनिटे गेली. चांदणी चौक ला पोचलो. बघतो तर घड्याळात ११:१०. भूक पण लागली होती भयानक. तसेच रेटले पण ११:३० पर्यंत अशक्य झाले. शिवाय वारजे नंतर जेवण मिळणार कुठे. ब्रेवे गेली खड्ड्यात आधी जेवण. पटकन एके ठिकणी डाळ खिचडी खाल्ली. निघालो. कात्रज घाट आला तेंव्हा १२ वाजून गेले होते. भयाण अंधार. हेड लाईट अगदी केविलवाणा वाटत होता. एकही सायकल स्वार दिसेना. तशीच हाणली सायकल. १ वाजता ससेवाडी चा उतार उतरलो आणि पोटरीत जबर cramp आला. २ इलेक्ट्रोल संपली होती. आणखीन २ खंबाटकी घाटात पाहिजेतच. काय करायचे. एका धाब्यावर घुसलो आणि वेटरकडे मीठ मागून नुसतेच खाल्ले. पाणी ढोसले घटाघट. थोडे stretching केले. चलो आगे. ३ वाजता शिरवळ आले. १ चिक्की खाल्ली. पुन्हा एकदा खंबाटकी घाटात भयाण अंधार. तसाच गेलो सायकल दामटत मिणमिण हेडलाईट मध्ये. घाट चढून वर आलो तर डाव्या बाजूला सुरेख चंद्रकोर आणि खाली मिणमिण दिवे. ते छान दृश्य पाहत बसायला वेळ नव्हताच. ४:१० ला सुरूर फाटा. इथे दुसरा कंट्रोल पॉइंट होता आणि कट ऑफ टाइम होता ४:३४. थोडा उशीर झाला असता तर disqualify झालो असतो. असो. थोडा वेळ थांबून निघालो. ५ केळी, ४ electral, चिक्की सगळे खतम्. १ life saver पार्ले जी होते शिल्लक. घाट सुसाट उतरला आणि शिरवळ ला जे हेड विंड सुरु झाले, सायकल पुढे सरकेचना . शिरवळ- चांदणी चौक रस्ता वायव्य- आग्नेय असा जातो. पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्याने पार जखडून टाकले. ६ वाजून गेले होते. पळपुटे विचार मनात यायला लागले. या सगळ्याची काय गरज आहे, अति ambition वाईट वगैरे अध्यात्मिक विचार सुचू लागले. शेवटी ठरवले साडेनऊचा कट ऑफ टाइम आहे. तोवर cycle चालवायची. साडेआठ ला खेड शिवापूर आले तेंव्हा खात्री झाली disqualify होण्याची.अजून ससेवाडीचा चढ बाकी आहे मग कात्रज घाटाचा उतार. सुसाट चालवली cycle. पावणे नऊ ला कात्रज टनेल. जमेल जमेल. नऊला वारजे.नक्की जमेल. हाण अजून. सव्वा नऊ. पोचलो. cycle टाकून दिली आणि खालीच बसलो. आयोजकांनी अभिनंदन केले. अति श्रमाने डोके बधिर झाले होते. थँक्स म्हणायचेही मला सुचले नाही. थोड्या वेळाने ब्रेव्ह कार्ड stamp करून जमा केले आयोजकांकडे. देशपांडे मामांचा मेसेज वाचला. त्यांनी पावणे सहालाच पूर्ण केली. धन्य तो वेग. असो.
गेल्या वर्षीपासून ठरवलेले एक अवघड आव्हान मी पूर्ण केले होते. ब्रेव्ह वेळेत झाली पूर्ण की बिअर प्यायची ठरवले होते. पण इतका आनंद झाला होता की त्या नादात विसरलोच. आता जेंव्हा प्यायला बसेन तेंव्हा ग्लासकडे पाहात मी मोठ्या अभिमानाने पुलंच्या भाषेत म्हणेन की तुझ्यापेक्षाही अव्वल दर्जाची झिंग देणाऱ्या अवघड घाटाला मी भेटून आलो आहे.
- (randonneur) अप्पा

मोदक's picture

22 May 2017 - 1:24 pm | मोदक

अभिनंदन हो अप्पा...!

दशानन's picture

22 May 2017 - 1:29 pm | दशानन

क्या बात है! सलाम!

जगप्रवासी's picture

22 May 2017 - 2:22 pm | जगप्रवासी

अभिनंदन

सूड's picture

22 May 2017 - 3:05 pm | सूड

भारीच!

वेल्लाभट's picture

22 May 2017 - 4:20 pm | वेल्लाभट

दणदणीत अभिनंदन....
कयच्या कय गोष्ट वाटतेय ऐकूनच. करणं लांबच म्हणायला लागेल.
वाह! मनापासून कौतुक.

- एक पाच-पन्नास जोर मारून बाता मारणारा

अरिंजय's picture

24 May 2017 - 10:20 pm | अरिंजय

ब्रम्हराक्षस झाल्याबद्दल अप्पांचे दणकुन अभिनंदन.

राघवेंद्र's picture

24 May 2017 - 10:21 pm | राघवेंद्र

एकदम भारीच हो !!!

कलंत्री's picture

29 May 2017 - 4:50 pm | कलंत्री

एकंदरीतच वृतांत खुपच छान आणि रोचक वाटला.

सप्तरंगी's picture

22 May 2017 - 5:41 pm | सप्तरंगी

काल २६km सायकलिंग केलं. नेहमीचा walk तर सुरु आहेच.

ट्रेडमिल वर आणि बाहेर केलेल चालणे आणि सायकलिंग चा नोट करणारे कोणते मोबाईल अँप आहे का? फिटबीट वर पैसे घालवायची इच्छा नाहीये.