मोबाईल ऍपची कल्पकता आणि उपयुक्तता

कल्पक's picture
कल्पक in जनातलं, मनातलं
17 Apr 2017 - 1:09 am

युक्रेनमधल्या एका छोट्या खेड्यात एक यान कूम नावाचा मुलगा राहायचा. त्याची आई गृहिणी होती आणि वडील बांधकाम कंपनीत मॅनेजर होते. घरची परिस्थिती बेताचीच होती. मूलभूत सोयींचा तुटवडा होता. तो सोळा वर्षांचा असताना, १९९२ साली युक्रेनमधल्या अस्थिर राजकीय-सामाजिक परिस्थितीमुळे त्याची आई त्याला घेऊन अमेरिकेत कॅलिफोर्नियाला स्थलांतरित झाली, वडील मात्र येऊ शकले नाही. परिस्थिती इतकी बिकट होती की अमेरिकेत खर्च कमी व्हावा म्हणून त्याच्या आईने अभ्यासासाठी लागणाऱ्या वह्या-पेन असं शालेय साहित्य सुद्धा येताना आणलं. उदरनिर्वाहाचं साधन म्हणून त्याची आई पैसे मिळवण्यासाठी लहान मुलांना सांभाळायची आणि यान दुकानात फरशी पुसायचा. यानला इंग्लिश चांगलं येत असल्यामुळे रद्दीमधून काही वापरलेली पुस्तकं आणून तो काँप्युटर नेटववर्किंग शिकला. पुढे कॉलेजमध्ये शिकताना कॉम्पुटर हॅक करायला शिकला. याहू या कंपनीत एकदा तांत्रिक अडचण आली असताना यानने ती अडचण लीलया सोडवली आणि त्याला याहू मध्ये नोकरी लागली. ९ वर्षांनी त्यानी याहू सोडली आणि फेसबुकमध्ये नोकरीसाठी अर्ज केला पण तो नाकारला गेला. काही महिने नोकरी न करता काहीतरी नवीन शोधलं पाहिजे या भावनेने तो झपाटून गेला. अमेरिकन सरकारच्या बेकारी भत्ता कार्यालयासमोर रांगेत उभा राहून काही महिने उदरनिर्वाह केला. एका रशियन मित्राकडे जेवण आणि सिनेमा यासाठी अधून मधून मित्र जमायचे आणि तिथे नवनवीन कल्पनांवर चर्चा चालायची. त्यावेळी ऍप्पलचा आयफोन नुकताच बाजारात आला होता. ऍप्पलचं ऍप स्टोर फक्त ७ महिन्यांचं होत. त्यामुळे या ऍप स्टोरसाठी ऍप तयार करणं ही मोठी संधी आहे हे त्याने ओळखलं. यानला अशी कल्पना सुचली की फोनबुक मध्ये ज्यांचा नंबर आहे त्यांच्या नावापुढे त्यांचा स्टेटस मेसेज दिसला तर? म्हणजे 'मी आता हॉटेलमध्ये आहे' किंवा 'माझ्या फोनची बॅटरी कमी आहे' इत्यादी. मग यान दिवस रात्र कामाला लागला. त्यानी एक मोबाईल ऍप तयार करायला सुरुवात केली ज्यात असे स्टेटस मेसेज दिसतील. हे करता करता त्याला लोकांना या ऍपद्वारे एकमेकांशी गप्पा मारता याव्या अशी कल्पना सुचली. हेच ते 'व्हाट्सअँप' नावाचं ऍप जे जगभर प्रचंड लोकप्रिय झालं. इतकं लोकप्रिय की २०१४ मध्ये फेसबुकनं हे ऍप एकोणीस अब्ज डॉलर्सला विकत घेतलं! या विक्री व्यवहारावर स्वाक्षरी करण्यासाठी यान कूमनी एका खास जागेची निवड केली. ज्या बेकारी भत्ता कार्यालयासमोर यान भत्त्यासाठी रांगेत उभा राहायचा त्याच कार्यालयाच्या दारावर त्याने विक्री कागदपत्रांवर स्वाक्षरी केली. आज जगात एक अब्ज लोक हे ऍप वापरतात! केवळ एक अफलातून कल्पना एका माणसाला कुठून कुठे नेऊ शकते याचं हे जिवंत उदाहरण आहे. पुढे हे ऍप वापरकर्त्याला उपयुक्त अशा सोयींनी विकसित होत गेलं. आज यावरून ऍपवरून जगात कुठेही फुकट फोन करता येतो, संदेश, फोटो आणि विडिओ पाठवता येतो. 

आज ऍपल कंपनीच्या आयओएस प्रणालीचे २० लाख ऍप्स बाजारात आहेत, गुगलच्या अँड्रॉइड प्रणालीचे २२ लाख ऍप्स आहेत आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीचे ६ लाख ७० हजार ऍप्स आहेत. आज जगभरात दर दिवशी ३ कोटी मोबाईल ऍप्स डाउनलोड होत असतात आणि हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यावरून ही ऍप्स तयार करण्यासाठी किती डिजाइनर्स आणि सॉफ्टवेअर डेव्हलपर्स लागत असतील याचा अंदाज येईल. शिवाय हे ऍप्स लोकांना वापरण्यासाठी उपयुक्त व्हावेत यासाठी युजर एक्सपीरिअन्स डिज़ाइनर्स सुद्धा खूप लागतात. एक महाप्रचंड जागतिक उद्योग या तंत्रज्ञानामुळे उदयाला आला आहे. आज पार्किंगची जागा शोधण्यापासून ते जगात कुठेही कोणतही विमान आता नक्की कुठे, किती उंचीवर उडत आहे याची माहिती मिळण्यापर्यंत विविध प्रकारची मोबाईल ऍप्स आहेत. बँकेचे व्यवहार करण्यासाठी, इंटरनेटवरून खरेदी करण्यासाठी, नोकरी मिळवण्यासाठी ते अगदी लग्न जुळवण्यासाठी मोबाइलला ऍप्स आहेत. प्रत्येक ऍपच्या मागे एक भन्नाट कल्पना असते कि ज्यामुळे लोकांच्या अडचणी सोडवून त्याचं आयुष्य अधिक सुलभ व्हायला मदत होते. 

पाश्च्यात्य जगात मोबाईल ऍप्स हे एका saturation अवस्थेला आले असताना इतर देशात मूलभूत नागरी सुविधांसाठी मोबाईल ऍप्स तयार होऊन लोकांच्या आयुष्यात सुधारणा होण्यास मदत होत आहे. २००७ साली आफ्रिकेतल्या केनियामध्ये  एम-पेसा नावाचं एक मोबाईल ऍप तयार करण्यात आलं ज्यामूळे सामान्य लोकांना केवळ SMS द्वारे एकमेकांना पैसे पाठवता यायला लागले. आज केनियात १ कोटी ७० लाख लोक हे ऍप वापरून आर्थिक व्यवहार करत आहे. २०१२ साली या ऍप द्वारे ४० अब्ज डॉलर्स इतके व्यवहार करण्यात आले. एका मोबाईल ऍपमुळे असंख्य लोकांचं आयुष्य बदलून गेलं. एक कल्पना आणि त्याला डिजाईन आणि तंत्रज्ञानाची जोड यामुळे कसं परिवर्तन होतं याचं हे जिवंत उदाहरण आहे. 

२०१२ साली भारतातल्या चेन्नई शहरात राहणाऱ्या ६ वी आणि ८ वी च्या वर्गात शिकणाऱ्या दोन भावांनी 'कॅच मी कॉप' नावाचे मोबाईल गेमिंग ऍप बनवले. असे ऍप बनवणारे ते भारतातले सगळ्यात लहान वयाचे प्रोग्रामर बनले! त्यानंतर या दोघांनी ११ कल्पक मोबाईल ऍप्स बनवले कि जे जगभरच्या ७० हजार लोकांनी डाउनलोड केले! आज या भावांनी स्वतःची कंपनी सुरु केली असून ते भारतातले वयानी सगळ्यात लहान सीईओ झाले आहेत!

आज मोबाईल ऍप्स विविध देशांच्या सरकारांना कामकाजासाठी उपयोगात येत आहे. एम-गव्हर्नन्सच्या रूपाने एक नवी यंत्रणा उभी राहत आहे. आज भारताच्या केंद्र सरकारची ५० पेक्षा जास्त ऍप्स आहेत ज्याद्वारे तक्रारी, आधार कार्ड, लायसन्स, जमिनीचे व्यवहार, कर व्यवहार इत्यादी गोष्टी नागरिकांना मोबाईल फोन द्वारे करता येतात. या शिवाय विविध राज्यसरकारांची अनेक मोबाईल ऍप्स उपलब्ध आहेत. अनेक लोकांनी, स्वयंसेवी संस्थांनी लोकोपयोगी ऍप्स तयार केले आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक ऍप्स गेल्या काही वर्षात तयार करण्यात आले. आरोग्य-योग या साठी अनेक ऍप्स आहेत. किराणा दुकानातल्या वस्तू घरबसल्या खरेदी करण्यासाठी, शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे पालक यांच्या सहकार्यासाठी, डॉक्टर आणि रुग्ण यांना व्यवहार करण्यासाठी अशी नानाविध ऍप्स आज उपलब्ध आहेत. कदाचित येत्या काळात भारताच्या संदर्भात दूधवाला, पेपरवाला, रिक्षावाला, प्लम्बर, मॅकेनिक, धोबी, अशा छोट्या व्यावसायिकांसाठी सुद्धा ऍप्स तयार होतील. जसं मोबाईल वापरण्याचं प्रमाण वाढत जाईल तसं त्या अनुषंगाने अनेक ऍप्स निर्माण होतील.   

काही वर्षांपूर्वी ऍमस्टरडॅम येथे भरलेल्या मोबाईल विषयक परिषदेत सहभाग घेता आला. तिथे जगभरातले डिजाइनर्स, वैज्ञानिक, तंत्रज्ञ, उद्योजक त्यांचे नाविन्यपूर्ण प्रयोग सादर करण्यासाठी आले होते. मोबाईल ऍप्स क्षेत्रात किती कल्पक आविष्कार येत्या काळात होणार आहेत याची झलक तिथे दिसली.

गेल्या काही वर्षात अमेरिकेतल्या बलाढ्य समजल्या जाणाऱ्या काही फॉर्च्युन ५०० कंपन्यांसाठी युजर एक्सपीरिअन्स डिजाईन करताना एक गोष्ट प्रकर्षानी जाणवली म्हणजे त्यांचं 'मोबाईल फर्स्ट' हे धोरण. केवळ पारंपरिक डेस्कटॉप/लॅपटॉप साठी ऍप्लिकेशन्स न बनवता मोबाईल फोनवर सोप्या पद्धतीनी वापरता येणारी ऍप्लिकेशन्स बनवण्यावर खूप भर देण्यात येतोय. दिवसेंदिवस लॅपटॉप हे उपकरण बाद होऊन त्याही जागा मोबाईल आणि टॅब्लेट घेत आहेत. त्यामुळे सहाजिकच डिजाइनर्सनी मोबाईल आणि टॅब्लेटसाठी डिजाईन करावं अशी मागणी केली जाते.

कोणत्याही ऍपचे वापरकर्त्याच्या बाबतीत दोन प्रकार पडतात. एक म्हणजे सामान्य ग्राहकांसाठी (consumer facing) तयार केलेलं ऍप आणि दुसरा प्रकार म्हणजे औद्योगिक वापरकर्त्यांसाठी (enterprise facing) तयार केलेलं ऍप. पहिल्या प्रकारचं उदाहरण म्हणजे फेसबुक, जीमेल, गुगल अशी कुणालाही वापरता येतील अशी ऍप्स आणि दुसऱ्या प्रकारचं उदाहरण म्हणजे विशिष्ट उद्योगात काम करणाऱ्या विशिष्ट लोकांसाठी असणारी ऍप्स जसं की बँक कर्मचाऱ्यांसाठी किंवा हॉस्पिटलमधल्या नर्ससाठी तयार केलेली ऍप्स. 

ऍपलनी आयओएस प्रणालीसाठी ऍप बनवण्यासाठी डिझाईनचे काही विशिष्ट नियम आणि दर्जाचे निकष ठरवले आहेत. त्या निकषांचं पालन करणाऱ्या ऍपला मान्यता देण्यात येते आणि ऍप स्टोरवर ते ऍप विक्रीसाठी उपलब्ध होतं. गुगलनी अँड्रॉइडसाठी आणि मायक्रोसॉफ्टनी विंडोजसाठी तशाच धर्तीचे निकष ठरवले आहेत. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या ऍपच्या संख्येमुळे संकल्पना आणि दर्जा बाबतीत ऍप तयार करणाऱ्यांसाठी खूप कठीण स्पर्धा आणि चढाओढ निर्माण झाली आहे. शिवाय लोकांच्या अपेक्षासुद्धा खूप वाढल्या आहेत. एकदा मी अमेरिकेतल्या औद्योगिक वापरकर्त्यांशी (enterprise users) बोलत होतो तेव्हा एक जण असं म्हणाला कि जर फेसबुक, अमेझॉन, इबे यांच्या ऍप्स इतक्या सोप्या, सुलभ आणि आकर्षक असतात तर औद्योगिक (enterprise facing) ऍप का नाही? आणि तो खरंच प्रामाणिक प्रश्न होता कि ज्याचं उत्तर युजर एक्सपीरियन्स डिज़ाइनर्सना शोधायचं होतं. संभाव्य वापरकर्त्यांशी बोलून डिजाईन विषयक अपेक्षा, अडचणी समजून घेणं हा युजर एक्सपीरिअन्स डिजाईनचा पाया आहे. लोकांना नक्की काय हवंय हे डिज़ाइनर्सना स्टुडिओ बाहेर पडून लोकांशी बोलल्याखेरीज समजणं कठीण आहे. गेल्या दहा वर्षात ७ देशातल्या ४५० वापरकर्त्यांशी बोलताना या गोष्टीचा मला वारंवार प्रत्यय आला आणि खूप काही शिकायला मिळालं.

गेल्या काही दशकात जसं तंत्रज्ञान बदलत गेलं तसंच येत्या काही दशकात आणखी वेगानी ते बदलत जाणार आहे. काही दशकांपूर्वी संगणक खूप महत्वाचे होते. आज मोबाईल आणि टॅब्लेट महत्वाचे आहेत. येत्या काळात smart watch, smart home, wearable devices, artificial intelligence, virtual reality, 3D printing, machine learning अशा तंत्रज्ञानामुळे क्रांतिकारी बदल होतील. पण उत्पादनाची कल्पकता आणि उपयुक्तता (युजर एक्सपीरिअन्स) हे सूत्र मात्र चिरंतन राहील.

निखिल वेलणकर
युजर एक्सपीरिअन्स स्ट्रॅटेजिस्ट
अल्फारेट्टा
Email: nikwel@gmail.com
Twitter: @nikhilwelankar

तंत्रविज्ञानमाहिती

प्रतिक्रिया

अत्रे's picture

17 Apr 2017 - 5:55 am | अत्रे

माहितीपूर्ण लेख.

आज भारताच्या केंद्र सरकारची ५० पेक्षा जास्त ऍप्स आहेत ज्याद्वारे तक्रारी, आधार कार्ड, लायसन्स, जमिनीचे व्यवहार, कर व्यवहार इत्यादी गोष्टी नागरिकांना मोबाईल फोन द्वारे करता येतात. या शिवाय विविध राज्यसरकारांची अनेक मोबाईल ऍप्स उपलब्ध आहेत. अनेक लोकांनी, स्वयंसेवी संस्थांनी लोकोपयोगी ऍप्स तयार केले आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक ऍप्स गेल्या काही वर्षात तयार करण्यात आले.

या सगळ्या/यातल्या काही ऍप्स ची इथे लिंक दिली तर बरे होईल.

अत्रे's picture

17 Apr 2017 - 11:23 am | अत्रे

धन्यवाद.

सतिश गावडे's picture

17 Apr 2017 - 9:38 am | सतिश गावडे

छान माहिती दिली आहे ऍप विश्वाची.

केवळ एक अफलातून कल्पना एका माणसाला कुठून कुठे नेऊ शकते याचं हे जिवंत उदाहरण आहे.

फक्त कल्पना? प्रज्ञाला विसरलात?

इरसाल कार्टं's picture

17 Apr 2017 - 10:07 am | इरसाल कार्टं

एखादं साधं, फक्त माहिती पुरवणारे ऍप बनवण्यासाठी काय आवश्यक आहे?
एखादी वेबसाईट वगैरे आहे जिथे मदत मिळेल?

मला एक ऍप बनवायची इच्छा आहे ज्यात मी माझ्या परिसरातील नोकरिचया तसेच इतर सरकारी नोकरीच्या संधींबद्दल लिहू शकेन.
माझ्या परिसरातल्या तरुणाईची नोकरी शोधण्यासाठी होणाती ससेहोलपट बघवत नाही.
परिसरातच नोकऱ्या असतात पण संधी त्याच्यापर्यंत पोचताच नाहीत.

आयओएससाठी ऍप तयार करण्याची माहिती इथे मिळेल- https://developer.apple.com/library/content/referencelibrary/GettingStar...

अँड्रॉइडसाठी ऍप तयार करण्याची माहिती इथे मिळेल- https://developer.android.com/training/basics/firstapp/index.html

कंजूस's picture

17 Apr 2017 - 12:24 pm | कंजूस

ios आणि androidवर दहापंधरा जाऊदे तीनचार लाख अॅप्समधून शोधणार कशी?
फक्त म्युझिक प्लेअर्स सर्च मारले तर पाचशेच्या वर असतील.
वर्तमानपत्रांची न्युप अॅप्सचे रिव्ह्यु/रेटिंग ६/१०पेक्षा जास्त नसते कारण बातम्या लगेच अद्यायावत होत नसाव्यात.

ऍप्सच्या प्रचंड संख्येमुळे ऍप्स तयार करणाऱ्यांना ते वापरकर्त्यांपर्यंत पोचवणे किंवा वापरकर्त्यांना चांगले ऍप्स मिळणे हे दुरापास्त झाले आहे. त्यासाठी विविध विषयांच्या मासिकांमध्ये किंवा ब्लॉग्स वर चांगल्या रेटिंग्सची ऍप्स शोधणे हा एक पर्याय असू शकतो. जसं चित्रकलेशी संबंधित मासिकांमध्ये त्याविषयीच्या ऍप्स ची प्रकाशित झालेली माहिती. शिवाय mouth publicity, social media सुद्धा चांगल्या ऍपला प्रसिद्धी मिळवून देते.

रुपी's picture

18 Apr 2017 - 4:50 am | रुपी

छान माहिती.

पैसा's picture

18 Apr 2017 - 11:53 am | पैसा

अतिशय माहितीपूर्ण आणि मनोरंजक!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Apr 2017 - 12:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेख माहितीपूर्ण आणि माणसाच्या कर्तुत्वाला प्रोत्साहन देणारा आहे. धन्स....!

-दिलीप बिरुटे

आदूबाळ's picture

18 Apr 2017 - 1:46 pm | आदूबाळ

फार छान लिहिलं आहे. प्रोग्रॅमर नसलेल्या लोकांना अ‍ॅप बनवणं कितपत अवघड असतं. (बावळट प्रश्न आहे याची कल्पना आहे, पण तरीही...)

सतिश गावडे's picture

18 Apr 2017 - 2:51 pm | सतिश गावडे

>>प्रोग्रॅमर नसलेल्या लोकांना अ‍ॅप बनवणं कितपत अवघड असतं.

खुपच अवघड असते :)

सध्या आय ओएस, विंडोज आणि अँड्रॉइड हे स्मार्टफोन प्लॅटफॉर्म आहेत. या प्लेटफॉर्मच्या निर्मात्यांचे स्वतः:चे ऍप निर्मितीचे डेव्हलपमेंट स्टुडिओज (प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर्स) आहेत.

काही थर्ड पार्टी कँपन्यांचे क्रॉस प्लॅटफॉर्म स्टुडिओज आहेत. यात एकच ऍप एकापेक्षा अधिक प्लॅटफॉर्मवर चालेल अशा पद्धतीने बनवता येते.

जावा प्रोग्रामिंगचा पूर्वानुभव असल्यास अँड्रॉइड ऍप बनवणे तुलनात्मक सोपे आहे.

ऍप तयार करण्यासाठी कोडिंग येणं आवश्यक आहे. किंवा तुमच्याकडे चांगली कल्पना असेल आणि कोडिंग येत नसेल तर एखाद्या प्रोग्रामरला हाताशी घेऊन ऍप तयार करू शकता. मी सुद्धा प्रोग्रामर नाही आणि मला कोडिंग येत नाही. पण काही एन्टरप्राईज ऍपसाठी युजर एक्सपीरिअन्स डिजाईन केलं आहे.