मुंबईहून पुण्याला जाण्यासाठी मी कल्याणला ट्रेन पकडते. एकदा आपल्या आसनावर स्थिरस्थावर झालं की बरोबर वाचण्यासाठी घेतलेलं पुस्तक मी काढते. मन एकाग्र व्हायला थोडा वेळ लागतोच कारण तोपर्यंत लोकांची उठ बस , ये जा चालू असते. पण पुस्तकात लक्ष घालून मी वाचण्याचा प्रयत्न करू लागते.
अंबरनाथ सोडले की माथेरान डोंगर रांग सुरु होते. मग पुस्तक बाजूला ठेवून ते डोंगर निरखण्यात मन गुंग होऊन जातं. ज्या डोंगरांवर गेले आहे ते पाहून मन हर्षभरित होते तर जिथे नाही गेले तिथे कधी जायला मिळेल या विचारात हरवून जातं.
मधून मधून पुस्तक वाचन चालूच असतं.
कर्जत सोडले की पुन्हा बोगदे आणि लुभावणाऱ्या डोंगर रांगा दिसू लागतात. पुन्हा त्या डोंगरांची ओळख पटवण्याचा मन प्रयत्न करू लागते. रस्त्याने जाताना जे डोंगर ओळखता येतात ते ट्रेन मधून ओळखता येत नाहीत. कारण ट्रेन मधून त्यांचे रूप थोडे वेगळे दिसते. मात्र ड्युक्स नोज किंवा नागफणी ट्रेन मधून खूप जवळून दिसतो .. अगदी नागाच्या फण्यासारखा .. कित्येक वेळा फोटो काढून घेण्याचा मोह होतो, पण ट्रेन झर्रकन पुढे निघून जाते. या मार्गात संपूर्ण वेळ मी अनिमिष नेत्रांनी बाहेर बघत राहते. मग येते खंडाळा.... सांग गो चडवा दिसता कसा खंडाळ्याचो घाट .... गाणे साहजिकच आठवते. हवेतील थंडावा ट्रेनमध्ये सुद्धा जाणवतो. खंडाळ्याचा डोंगर, त्यावर वसलेली घरे, हॉटेल्स दिसू लागतात. अगदी डोंगरमाथ्यावर सुद्धा या इमारती दिसतात.
तर याच डोंगररांगामधून जाणारा वळणावळणांचा एक्स्प्रेस हायवे दिसतो. रस्ता वाहत असतो. मानवनिर्मित सौंदर्य निसर्ग सौंदर्यात भर घालते.
मधून मधून पुस्तक वाचन चालूच असते.
पुस्तक वाचायचा कंटाळा आला की मी मोबाईल काढते. कानाला हेडफोन्स लावून गाणी ऐकत बसते. कधी मराठी, कधी हिंदी सिनेसंगीत तर कधी गझलस....!
कधी पद्मजा फेणाणी ' पाऊस कधीच पडतो ...' गात असते तर कधी ' त्या फुलांच्या गंधकोषी ......' बाहेर वाऱ्यावर डोलणारी फुले बघत ऐकत बसते. कधी ' ये दिल और उनकी निगाहो के साए....' म्हणत लता आभाळात घेऊन जाते. ' ये चाहों के साए ' या शब्दांचा 'येचाहोंके' असा एकाच शब्द असल्यासारखा उच्चार ऐकून मन खुळावते. कधी तलत आपल्या मुलायम आवाजात ' जाए तो जाए कहां' आळवत असतो. हे ऐकताना अगदी बिनदिक्कत पायाचा ठेका धरावा आणि मान डोलवावी. आणि कधी गाण्यासोबत गुणगुणावे सुद्धा! आजूबाजूचे प्रवासी बघू लागतात त्यांच्याकडे सरळ दुर्लक्षच करावे.
कधी मनाला गझला ऐकायची लहर येते. मेहदी हसन तयारच असतो. ' बात करनी मुझे मुश्किल कभी ऐसी तो ना थी ..!' कधी 'कोई बात करो ..' ऐकत प्रसन्न सकाळ अनुभवावी तर कधी ' ला पिला दे साकिया..' ऐकत जीवनाचे तत्त्वज्ञान समजून घ्यावे.
कधी कधी मात्र हे मन वेडे होते. विचारात हरवून जाते. आशा-निराशा, उदासी , खिन्नता मनात भरून जाते. तर कधी सुख दु:ख, आनंदाच्या डोहात डुबक्या मारते. कधी कधी डोळ्यात पाणीही जमा होऊ लागते. अशा वेळी मात्र आजूबाजूचे लोक भानावर आणायला मदत करतात. मग मनावरचे मळभ झटकून टाकून मी बाहेर बघते. उतरायचे ठिकाण यायला किती वेळ आहे , ते बघते.
असा हा मनाचा प्रवास चालूच असतो , चालूच असतो... कुठेही कुठल्याही प्रवासात मी एकटी असले कि माझ्या मनाची अवस्था अशीच होते. मनही एकेक थांबे घेत धावत असते.. कधी सावकाश तर कधी खूप वेगाने........
प्रतिक्रिया
23 Mar 2017 - 4:26 pm | संजय क्षीरसागर
प्रवास लवकर संपल्यासारखं वाटतं.
24 Mar 2017 - 9:28 pm | चौथा कोनाडा
वाह, छान लिहिलंय !
या प्रवासात इतरही अनुभव आले असतील, ते ही लिहा. आवडतील वाचायला.
25 Mar 2017 - 4:57 pm | ऋतु हिरवा
धन्यवाद ! अधिक विस्ताराने या किन्वा दुसर्या कुठल्या विषयावर सवडिनेलिहिन
24 Mar 2017 - 9:56 pm | सुमीत
प्रवास असाच करावा, क्षण अनुभवायचे, स्व्तःच्या मस्तीत
25 Mar 2017 - 4:57 pm | ऋतु हिरवा
धन्यवाद ! एकदम खरे !