प्रकाशवाट

ओ's picture
in जे न देखे रवी...
22 Mar 2017 - 9:49 am

एका मग्न तळ्याला होता आठवणींचा गहिरा डोह
भौवतालच्या पर्वत रंगांना आकाश शिवण्याचा होता मोह

ह्या पर्वत रांगांच्या दरीत होते साठवणींचे कवडसे
कुठे होते तापवणारे ऊन तर, कुठे झोंबणारे गार वारे

कुठे तरी लपून बसल्या होत्या काळ्याकुट्ट रहस्यांच्या गुहा
तर कुठे होता पठारावर फिरणारा उनाड मनमोकळा स्वछंदी वारा

त्या तळ्याच्या काठून एक पायवाट भविष्यात जाणारी
तर एक होती विसाव्याची जागा क्षणभर विश्रांती देणारी

विसावा घ्यावा म्हणून जरासा त्या ठिकाणी थांबलो
न राहवून गहिऱ्या डोहाच्या पाण्यात जरा डोकावलो

पाण्याने काळ्या गर्द रंगाचा साज चढवला होता
निळ्याशार पाण्याला काळ करणारा मेघ भरून आला होता

गर्द काळे ढग बघता बघता बरसून रिक्त झाले
आणि पाण्यात विसावलेले प्रतिबिंब माझे विस्कळीत होऊन गेले

पुन्हा पाणी स्थिरावले पण प्रतिबिंब विरून गेले
शोध घेतला जेव्हा भविष्याच्या पायवाटेवर दिसले

मला म्हणे चाल पुढे ,गरज नाही इथे थांबण्याची
वेळ आहे आता पुढच्या गंतव्या वर जाण्याची

मन मात्र तयार नव्हते ,तिथून पाउल निघत नव्हते
आणि आठवांचे झोके सुद्धा उंचच उंच जात होते

इतक्यात दिवस मावळून अंधाराचा सर्वत्र संचार झाला
आणि त्या काळोखात मात्र जीव घाबराघुबरा झाला

भविष्याच्या वाटेवर तेव्हा एक प्रकाश शलाका दिसली
मनाला हायसे वाटून पाऊले आपोआप त्या दिशेला वळली

आजही त्या वाटेवर मी असाच निरंतर चालतो आहे
एक एक आठवण मागे ठेऊन माझी प्रकाशवाट शोधतो आहे

---© ओंकार जोशी

मुक्त कविताकविता

प्रतिक्रिया

शार्दुल_हातोळकर's picture

22 Mar 2017 - 4:48 pm | शार्दुल_हातोळकर

सुंदर आशय !!