अखाडा - गझल

धोंडोपंत's picture
धोंडोपंत in जे न देखे रवी...
9 Dec 2007 - 2:53 pm

लोकहो !

बरेच दिवसांनी गझल लिहून झाली. तात्या, चित्तरंजन, मिलिंद, केशवसुमार आणि इतर मित्र फार मागे लागले होते गझल लिही, गझल लिही. मला लिहिते करण्यात त्यांचा वाटा आहे. म्हणून ही गझल या मित्रांना अर्पण.

केश्या,
आता या गझलेचे झकास विडंबन टाक पाहू ! तुला कच्चा माल दिला आहे. काफियाही विडंबनाला अनुकूल आहे. काहीतरी झणझणीत विडंबन येऊ दे. मिसळपावला शोभेल असं.

झ== हाही काफिया विडंबनात तुला वापरता येईल. गझलेवर असलेल्या बंधनांमुळे मी तो वापरू शकलेलो नाही. पण विडंबनात तो फिट बसतो. असो.

तर गझल अशी आहे:-

जिंदगी झाली अखाडा
रोज खस्ता, रोज राडा

गारवा नाही मिळाला
सोसला नुसता उकाडा

दु:खितांचे गीत माझे
हा न धेंडांचा पवाडा

सूर्य क्रांतीचा उगवला
खोल रे आता कवाडा !

काय मी मेलो कळेना?
भोवती पडला गराडा

हासतो माझ्यासवे मी
पाहुनी माझा चुराडा

वेदना शब्दात आली
तूच गझले कर निवाडा

--- धोंडोपंत

हे ठिकाण

प्रतिक्रिया

प्रमोद देव's picture

9 Dec 2007 - 3:07 pm | प्रमोद देव

गजल मस्त जमलेय.

दु:खितांचे गीत माझे
हा न धेंड्यांचा पवाडा च्या ऐवजी 'धेंडांचा'
केल्यास काही हरकत?
माफ करा! तुमच्या वृत्तात ते बसते की नाही माहित नाही. तसे नसल्याल ही एक रावसाहेबी सूचना आहे असे समजून सोडून द्या.

धोंडोपंत's picture

9 Dec 2007 - 5:22 pm | धोंडोपंत

धन्यवाद प्रमोदराव,

आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपल्याला गझल आवडली हे वाचून आनंद झाला.

सूचनेबद्दल मनापासून धन्यवाद. बदल केला आहे. असाच लोभ ठेवा.

आपला,
(आभारी) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

राजे's picture

9 Dec 2007 - 3:22 pm | राजे (not verified)

"काय मी मेलो कळेना?
भोवती पडला गराडा"

हे मात्र एकदम खास.

मस्त गझल जमली आहे.

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

धोंडोपंत's picture

9 Dec 2007 - 8:15 pm | धोंडोपंत

राजे,

अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपल्याला गझल आवडली हे वाचून आनंद झाला.

आपला,
(आनंदित) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

नंदन's picture

9 Dec 2007 - 6:25 pm | नंदन

सुंदर गझल धोंडोपंत. केशवसुमारांचे फर्मास विडंबन येईलच, तोवर माझा हा एक तोडका-मोडका प्रयत्न. वृत्तात वा यमकात कुठे चुका असतील तर कृपया सुधारणा सुचवाव्यात.

पाखरू आले शिवारा
मंद तारे, शीत वारा

काय सांगू मी तयाला
हाय जन्माचा कवारा

एकटा फिरतो जगी या
देऊ तुज कैसा निवारा

चित्र माझे म्लान का रे
भोवती रंगी फवारा

सागुतीची याद येई
आज खातो मी गवारा

सोनियाचे दिवस सारे
कोण रे पुसतो पवारा

जेथ मी रे राज्य केले
आज तेथे केरवारा

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

विसोबा खेचर's picture

9 Dec 2007 - 6:59 pm | विसोबा खेचर

सागुतीची याद येई
आज खातो मी गवारा

सोनियाचे दिवस सारे
कोण रे पुसतो पवारा

जेथ मी रे राज्य केले
आज तेथे केरवारा

वा नंदनकाका, वरील ओळी सर्वात ब्येष्ट! :)

मस्त!

तात्या.

धोंडोपंत's picture

9 Dec 2007 - 8:18 pm | धोंडोपंत

वा वा वा वा नंदनराव,

अप्रतिम विडंबन. क्या बात है !!

सोनियाचे दिवस सारे
कोण रे पुसतो पवारा

हा हा हा हा हा हा हा हा .............. बहोत ख़ूब. सुंदर.

आपला,
(हसरा) धोंडोपंत

आपल्याला गझल आवडली हे वाचून आनंद झाला. असाच लोभ ठेवा.

आपला,
(आनंदित) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

आजानुकर्ण's picture

9 Dec 2007 - 8:51 pm | आजानुकर्ण

मस्त नंदनशेठ!

विडंबन फर्मास.

सोनियाचे दिवस सारे
कोण रे पुसतो पवारा

ह्या ओळी मस्तच.

एकटा फिरतो जगी या
देऊ तुज कैसा निवारा

ह्म्म.. गुंडोपंतांशी संपर्क साधा. त्यांचा नवा जोडव्यवसाय आहे आता. ;)

- आजानुकर्ण

पुष्कर's picture

10 Dec 2007 - 9:41 am | पुष्कर

"एक प्रयत्न" खासच जमला आहे. विशेषकरून-
चित्र माझे म्लान का रे
भोवती रंगी फवारा

या ओळी खूपच आवडल्या.

पुष्कराक्ष

सर्किट's picture

11 Dec 2007 - 2:47 am | सर्किट (not verified)

मस्त रे नंदन !!

- सर्किट

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Dec 2007 - 6:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पंत,
गझल आवडली.

वेदना शब्दात आली
तूच गझले कर निवाडा

हे तर लै भारी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धोंडोपंत's picture

9 Dec 2007 - 8:22 pm | धोंडोपंत

धन्यवाद प्राध्यापक साहेब,

आपल्यासारख्या जाणकाराच्या पसंतीस गझल उतरली , हे वाचून आनंद झाला.

आपला,
(स्नेही) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

विसोबा खेचर's picture

9 Dec 2007 - 6:36 pm | विसोबा खेचर

वा धोंड्या! सुंदर गझल...

गारवा नाही मिळाला
सोसला नुसता उकाडा

वेदना शब्दात आली
तूच गझले कर निवाडा

या ओळी विशेष आवडल्या...

बरेच दिवसांनी गझल लिहून झाली. तात्या, चित्तरंजन, मिलिंद, केशवसुमार आणि इतर मित्र फार मागे लागले होते गझल लिही, गझल लिही. मला लिहिते करण्यात त्यांचा वाटा आहे. म्हणून ही गझल या मित्रांना अर्पण.

एखाद्या कलाकाराची अभिव्यक्ति कधी थांबू नये असं वाटतं म्हणूनच आग्रह होता. सुरवात केलीस, फार बरं वाटलं! पुढील लेखनाकरताही मनापासून शुभेच्छा...

तुझा कोकण्या मित्र,
तात्या.

धोंडोपंत's picture

9 Dec 2007 - 8:32 pm | धोंडोपंत

एखाद्या कलाकाराची अभिव्यक्ति कधी थांबू नये असं वाटतं म्हणूनच आग्रह होता. सुरवात केलीस, फार बरं वाटलं! पुढील लेखनाकरताही मनापासून शुभेच्छा...

तात्या,

तुझे म्हणणे खरे आहे. खूप मोठा ब्लॉक आयुष्यात आला होता. ते तुला सर्व माहित आहेच.

तुझ्यासारख्या मित्रांमुळे अडलेली लेखणी पुन्हा सुरू झाली. तुमच्या सातत्याने केलेल्या मागणीमुळे पाटातला तुंब निघाला. प्रवाहाला वाट मिळाली. पाझर सुरू झाला.

आपला,
(प्रवाही) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

आजानुकर्ण's picture

9 Dec 2007 - 8:34 pm | आजानुकर्ण

सुरेख गझल धोंडोपंत.

हासतो माझ्यासवे मी
पाहुनी माझा चुराडा

या ओळी तर विशेष आवडल्या.

-(खूष) आजानुकर्ण

बेसनलाडू's picture

10 Dec 2007 - 4:36 am | बेसनलाडू

पंत,
गझल छान आहे. बर्‍याच मोठ्या कालावधीनंतर आपली लेखणी ही अनमोल भेट घेऊन आली, असेच म्हणावे लागेल.

दु:खितांचे गीत माझे
हा न धेंडांचा पवाडा

हासतो माझ्यासवे मी
पाहुनी माझा चुराडा

हे शेर विशेष आवडले.

(आपला चाहता)बेसनलाडू

खोल च्या ऐवजी उघड चालेल का?
(सूचक)बेसनलाडू

केशवसुमार's picture

10 Dec 2007 - 5:33 am | केशवसुमार

धोंडोपंत,
बोळा निघाला आणि आपण प्रवाही झालत हे बेस झाले..( चला चांगल्या कच्या मालाची काळजी मिटली ;) कसे.) बाकी बेसनलाडूंशी सहमत..
सुरेख गझल वाचायचा आनंद दिल्या बद्दल आपला आभारी.. आता खंड न पडता वरचे वर असा आनंद आम्हा सगळ्यां वाचकांना मिळण्याची व्यवस्था करावी ही विनंती..
(आपला चाहता)केशवसुमार.

आपल्या आज्ञे नुसार 'झ**' काफिया वापरून केलेले विडंबन इथे वाचा
(आज्ञाधारक)केशवसुमार

चित्तरंजन भट's picture

10 Dec 2007 - 3:55 pm | चित्तरंजन भट

गझल आवडली हो.

जिंदगी झाली अखाडा
रोज खस्ता, रोज राडा
क्या बात है. सहज आणि मस्त.

काय मी मेलो कळेना?
भोवती पडला गराडा
क्या बात है.

हासतो माझ्यासवे मी
पाहुनी माझा चुराडा
हे शेर नेहमी लक्षात राहतील. आता इंजिन गरम झाले आहे. थांबू नका.

सर्किट's picture

11 Dec 2007 - 2:48 am | सर्किट (not verified)

हासतो माझ्यासवे मी
पाहुनी माझा चुराडा

जबर्दस्त ओळी !!!

क्या बात है धोंडोपंत !

सुंदर गझल !

- सर्किट

देवदत्त's picture

11 Dec 2007 - 7:34 am | देवदत्त

छान गझल...

हासतो माझ्यासवे मी
पाहुनी माझा चुराडा

स्वतःची चुकी उमगल्यावर /स्वत:वरील दुखावर हसणे हेही वेगळेपणच आहे.

(सध्या सिनेमातील वाक्ये आठवतात म्हणून आणखी एक..
मि. नटवरलाल मध्ये अमिताभ स्वतःवरच हसत असतो. तो कादर खान ला हेच सांगतो, की मी स्वतःच्या चुकीवर हसत आहे.)

किमयागार's picture

11 Dec 2007 - 9:17 am | किमयागार (not verified)

जमलीय हो गझल.

काय मी मेलो कळेना?
भोवती पडला गराडा
हे बाकी भलतेच हो! आवडले!!
-कि'गार
**************************************************
अल्कोहोलचा परिणाम दुसरे काय?

विजय पाटील's picture

11 Dec 2007 - 3:57 pm | विजय पाटील

जिंदगी झाली अखाडा
रोज खस्ता, रोज राडा

गारवा नाही मिळाला
सोसला नुसता उकाडा

दु:खितांचे गीत माझे
हा न धेंडांचा पवाडा

या ओळी विशेष आवडल्या !
- विजय