अखाडा - गझल
लेखनविषय:
लोकहो !
बरेच दिवसांनी गझल लिहून झाली. तात्या, चित्तरंजन, मिलिंद, केशवसुमार आणि इतर मित्र फार मागे लागले होते गझल लिही, गझल लिही. मला लिहिते करण्यात त्यांचा वाटा आहे. म्हणून ही गझल या मित्रांना अर्पण.
केश्या,
आता या गझलेचे झकास विडंबन टाक पाहू ! तुला कच्चा माल दिला आहे. काफियाही विडंबनाला अनुकूल आहे. काहीतरी झणझणीत विडंबन येऊ दे. मिसळपावला शोभेल असं.
झ== हाही काफिया विडंबनात तुला वापरता येईल. गझलेवर असलेल्या बंधनांमुळे मी तो वापरू शकलेलो नाही. पण विडंबनात तो फिट बसतो. असो.
तर गझल अशी आहे:-
जिंदगी झाली अखाडा
रोज खस्ता, रोज राडा
गारवा नाही मिळाला
सोसला नुसता उकाडा
दु:खितांचे गीत माझे
हा न धेंडांचा पवाडा
सूर्य क्रांतीचा उगवला
खोल रे आता कवाडा !
काय मी मेलो कळेना?
भोवती पडला गराडा
हासतो माझ्यासवे मी
पाहुनी माझा चुराडा
वेदना शब्दात आली
तूच गझले कर निवाडा
--- धोंडोपंत
वाचन
17934
प्रतिक्रिया
0