संतापाचा रीटेक

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जे न देखे रवी...
17 Feb 2017 - 11:44 am

अडखळत अडखळत चालताना फार पारा चढतो
असं वाटतं जो तो येऊन माझ्याच पुढ्यात अडतो
ट्रॅफिकमधे गाडी स्कूटर, गर्दीमधे माणसं
हॉर्न वाजवून, ओरडून बिरडून बदलत नाही फारसं
वाटतं एकेकाला कुदवावं, किंवा सरळ साला उडवावं
काय म्हणजे मला चायला ज्याने त्याने अडवावं?
पण कुदवताही येत नाही, उडवताही येत नाही
मनाला जे हवं ते घडवताही येत नाही
आता आम्ही सलमान खान नाही, की कुणी लोकल डॉन नाही
आणि बघताच जगाने बाजू व्हावं, अशी आमची शान नाही
बरं उडत बिडत जाऊ शकू तर आम्ही ब्याट म्यान नाही
मग आहेच आपली चरफड, शिव्या-शाप नि खळखळ
यंत्रवत गर्दीमधे आम्हीच होतोय अडगळ
मग कुणीतरी म्हणून जातं, इथे असंच असतं
जखमेवरती मीठ टाकावं, तसं हे वाक्य झोंबतं
असंच असतं म्हणजे काय आपण तेच करायचं का
सगळ्यांसारखंच चूक वागायचं, वेगळं नाही ठरायचं का?
गाडीची लेन बदलता तशी स्वतःची का नाही बदलत तुम्ही?
प्रॉब्लेमनुसार बदलत जाता, प्रॉब्लेम का नाही बदलत तुम्ही?
या प्रश्नांनीही त्रासच होतो, घुसमट होते आपलीच
कालसारखाच उद्या येतो, पुन्हा तडफड आपलीच
कुदवावं वाटतं, कुदवत नाही
उडवावं वाटतं, उडवत नाही
आम्ही ठरवत नाही, आम्हाला करवत नाही
आम्हाला सोडवत नाही, आम्हाला धरवत नाही
केलं काही तर फुकटची लफडी
नुसतं म्हटलं तरी भुवई वाकडी
'असं मी करेन का???' हेही पटवावं लागतं
त्याच्यासाठीही रक्त आटवावं लागतं
'उडवून टाकेन' असं नुसतं म्हणणं सुद्धा एवढी चोरी
आमच्या संतापाचा रोजच रीटेक, पुढेच सरकत नाही स्टोरी

- अपूर्व ओक

वीररसकवितामुक्तक

प्रतिक्रिया

बरखा's picture

17 Feb 2017 - 12:02 pm | बरखा

आवडली कविता. मस्त केलय वर्णन.

आदूबाळ's picture

17 Feb 2017 - 2:09 pm | आदूबाळ

झकास लिहिलीय!

चांदणे संदीप's picture

17 Feb 2017 - 8:10 pm | चांदणे संदीप

मस्त लिहिलंय! आवडली कविता!

Sandy

चतुरंग's picture

17 Feb 2017 - 8:20 pm | चतुरंग

एकदम झकास!

पैसा's picture

17 Feb 2017 - 10:30 pm | पैसा

छान लिहिलंय! पण शांती को धरो!

फारएन्ड's picture

18 Feb 2017 - 3:10 am | फारएन्ड

मस्त. तू राहतोस तेथे ट्रॅफिक पोलिस, स्थानिक मनपा व आरटीओ यांच्याबरोबर काम करणारी व त्यांच्याशी बर्‍यापैकी कनेक्शन असणारी कोणती संस्था आहे का ते चेक करून त्यांच्याबरोबर काम केले तर यावर काहीतरी केल्याचे समाधान मिळेल. आणि यात थोडाफार फरकही पडू शकेल. मी हा उद्योग 'सेव्ह पुणे ट्रॅफिक मूव्हमेण्ट' बरोबर पुण्यात असताना एक वर्षभर केलेला आहे. जस्ट एक खारीचा वाटा. इतर काहीनाही तरी या सगळ्या 'मेस' मधे कोणाची काय जबाबदारी आहे, काही तक्रार असेल तर किमान आपली दखल घेतली जावी याकरता ती संस्था उपयोगी पडणे, आणि मुळात एक नागरिक म्हणून आपली ढोबळ माहिती असते त्यापेक्षा जरा सखोल माहिती होणे इतके फायदे तरी आहेत. त्याकरता दर आठवड्याला एक तास फक्त द्यायचा असे. तू राहतोस तेथे असे काहीतरी आहे का बघ.

पिलीयन रायडर's picture

18 Feb 2017 - 8:52 am | पिलीयन रायडर

मस्त लिहीलंयस... वैताग टोटली पोहचतोय.. दुर्दैवाने फक्त कवितेमुळेच नाही तर मशीनगन घेऊन उडवुन टाकावं असे खूपच जास्त लोक रस्त्यावर भेटलेत म्हणुन...

कधीकधी असं वाटतं खरं.

अभिजीत अवलिया's picture

19 Feb 2017 - 12:21 pm | अभिजीत अवलिया

मस्त लिहिलंय.

स्रुजा's picture

20 Feb 2017 - 8:36 am | स्रुजा

ह्म्म.. होतं असं ! तू पुण्याला शिफ्ट हो बघू .. पुण्याची गर्दी पण लय भारी असते ;)

वेल्लाभट's picture

20 Feb 2017 - 11:07 am | वेल्लाभट

पुण्याची गर्दी पण लय भारी असते ;)

पुणेरी पुणेकर :)
बघूयात. कै कै होतंय पुढे ते.