अश्वत्थामा एक सुरेख कविता

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
31 Jan 2017 - 8:03 pm

अश्वत्थामा एक सुरेख कविता

अनन्त यात्री यांची एक सुरेख कविता वाचनात आली आणि महाभारतातील एका अभागी व्यक्तीमत्वाची चालू काळातील फरपट डोळ्यासमोर आली. कवितेकडे वळण्याआधी जरा अश्वत्थाम्याची ओळख करून घेऊ.
अश्वत्थामा द्रोणांचा मुलगा. परशुरामाकडून मिळवलेली अस्त्रे द्रोणांनी अश्वत्थामाला शिकवली होती. द्रुपद व द्रोण गुरूबंधू. त्या वेळी द्रुपदाने मोठेपणी,राजा झाल्यावर, बरोबरीने वागविण्यचे वचन दिले पण जेव्हा द्रोण त्याच्या दरब्वारी आला तेव्हा त्याचा अपमान केला. रागावलेल्या द्रोणांनी त्याचा सूड घेण्याचे ठरविले. स्वत: द्रुपदाचा पराभव करणे सहज शक्य असूनही त्यानी तसे न करता शिष्यांकरवी द्रुपदाची खोड मोडण्याचे ठरविले. ते हस्तिनापुराला कृपाकडे (त्यांचा मेव्हणा) आले. त्यावेळी त्यांनी आपले रूप दाखविले नाही. त्या वेळी कृपांनंतर अश्वत्थामा राजपुत्रांना शिकवत असे.
त्यानंतर्च्या काळात द्रोण कौरवांकडेच राहिले. द्रुपदाचे अर्धे राज्य मिळाल्यावरही ते नीच कौरवांकडे अपमान सहन करत का राहिले हे एक कोडेच आहे. द्रोण राहिले म्हणून अश्वत्थामाही. पण प्रत्येक वेळी त्यांनी पांडवांची बाजू घेऊन त्यांचे गुणवर्णन केले. कर्णाच्या बढायांना विरोध केला. अर्जून व अश्वत्थामा यांचे एकमेकावर गुरूबंधू म्हणून फार प्रेम होते.
अश्वत्थामयाचे वर्णन करतांना भीष्म म्हणतात, " हा द्रोणपुत्र सर्व धन्व्यांहून वरचढ आहे. याचा पराक्रम वर्णन करण्यास मी असमर्थ आहे. या बुद्धिवानाला द्रोणांकडून दिव्यास्त्रांची पूर्ण प्राप्ति झाली आहे.याचे तोडीचा योद्धा आपल्या दोन्ही पक्षांकडील सैन्यात नाही." भीष्मांकडून अशी प्रशस्ति मिळवणे हे महत्वाचे. त्याच वेळी ते अश्वत्थामाचा एक मोठा दोषही सांगतात " हा जीवाला फार जपतो."
अश्वत्थाम्याच्या पराक्रमाचे वर्णन अनेक ठिकाणी केलेले असले तरी रात्री युद्धात घटोत्कच कर्णालाही पळवून लावतो, त्यावेळी अशत्थामा घटोत्कचाचा पराभव करतो. . .
द्रोणवधानंतर तो खरा पेटून उठतो. वडील युद्धात पडले तर त्याचा विरोध नाही. पण त्यांना फसवून, ते युद्ध सोडून बसले असतांना धृष्टद्युम्न्याने शेंडी पकडून त्यांचा वध करावा याचा राग येऊन तो नारायणास्त्र सोडतो. कृष्ण नसता तर पांडव संपलेच होते. त्यां नंतरच्या अर्जुनाबरोबरच्या युद्धात तो आग्नेयास्त्राचा उपयोग करतो पण अर्जुन ब्रह्मास्त्राने ते शांत करतो. कृष्णार्जुन अक्षत पाहून निराश झालेला अश्वत्थामा "धिक, धिक, सर्वच गोष्टी मिथ्या आहेत " असे म्हणत रथाखाली उतरून रणाच्या बाहेर पडतो.
दुर्योधनाचा अधर्माने घात झाल्यावर अश्वत्थामा रात्री झोपले असलेल्या धृष्टद्युम्न, उत्तमौजा, शतानिक, युधामन्यु, शिखंडी इत्यादि पांचाल, सर्व द्रौपदिपुत्र, आदि सर्वांचा वध करतो व कृतकृत्य होऊन ते वृत्त मरणासन्न दुर्योधनाला सांगून त्याचेही समाधान करतो.
नंतर मात्र तो पुढील परिणामाला घाबरतो व व्यास करित असलेल्या यज्ञात सहभागी होतो. इकडे हे वृत्त कळल्यावर द्रौपदी क्रोधाने अश्वत्थामाचा वध झालाच पाहिजे असा हट्ट धरते व भीम अश्वत्थाम्याला मारावयास रथातून निघतो. अश्वत्थाम्याकडील ब्रह्मशिरास्त्रापुढे भीमाचा निभाव लागणार नाही म्हणून कृष्ण अर्जुन व युधिष्टीर यांना घेऊन आपला रथ काढतो.
पांडव आलेले पाहून घाबरलेल्या अश्वत्थाम्याने " अस्त्रा, जा, पांडवांचा नि:पात कर " असे शब्द उच्चारून ब्रह्मशिरास्त्र सोडले. त्याला विरोध म्हणून अर्जुनाने, प्रथम" अश्वत्थाम्याचे कल्याण असो" असे म्हणून व नंतर इतर सर्वांचे अभिष्ट चिंतून केवळ अस्त्र परिहारार्थ ब्रह्मशिरास्त्र सोडले.. अस्त्रे एकमेकांना भिडून सर्व जग जळण्यास सुरवात झाली. नारद व व्यास त्या अस्त्रांच्या मध्ये उभे राहिले व त्यांनी अस्त्रे मागे घेण्यास सांगितले. अर्जुनाने त्या प्रंमाणे आपले अस्त्र मागे घेतले पण अश्वत्थाम्याला ते जमले नाही. त्याने ते सर्व पांडवांच्या ऐवजी उत्तरेच्या (अभिमन्यूची पत्नी) गर्भावर सोडले. पांडवांच्या वंशातील एकमेव शिल्लक असलेल्या त्या गर्भावर सोडलेल्या त्या अस्त्रामुळे कोपलेल्या कृष्णाने अस्वत्थाम्याला शाप दिला. कृष्ण म्हणाला
"तू सोडलेल्या अस्त्रामुळे मेलेले मुल जन्मास येईल पण मी त्याला जिवंत करीन व तो साठ वर्षे राज्य करेल. तुला मात्र सर्व ज्ञाते पुरुष दुष्ट व पापी समजतील. हा बालहत्या करणारा असे मानतील. अरे, तीन हजार वर्षे तू भ्रमण करीत राहशील निबिड अरण्यात राहून रक्त-पूं यांच्या दुर्गंधीने शरीर व्यापून नाना प्रकारचे रोग भोगशील "
आश्वत्थाम्याच्या मस्तकावरील मणी काढून घेऊन पांडव परतले. आजही जखमेकरिता तेल मागत चिरजीवी अश्वत्थामा फिरत असतो अशी जनसामान्यांची समजुत आहे.
ही झाली महाभारतातील अश्वत्थाम्याची चित्तरकथा.
अश्वत्थाम्याला मिळालेला खरा शाप कोणता ? जखम घेऊन अरण्यात हिंडणे हा ?
नाही, खरा शाप आहे "नाकारलेले मरण ".मरण हा मानवाला मिळालेला शाप नसून ती एक सुटका आहे. जरा विचार करा, तुम्हालाही पटेल की मरण नसेल तर आयुष्य किती उध्वस्त होईल. मागे "कभी तनहाईयोंमे हमारी याद आयेगी " या धाग्यात आपण थोडी चर्चा केली होती. असो.
आता अनन्त यात्री यांच्या कवितेकदे वळू

था॑ब, आलोच
आतले कढ आवरून सावरून
ठसठसणार॑ मेमरी कार्ड फॉरमॅट करून
शहाणा मुखवटा चपखल बसवून
आलोच.
येतो- झाकून तू दिलेल्या भळभळत्या जखमा
येतो- क्षणभर विसरून की मी चिर॑जीव अश्वत्थामा

आता अश्वत्थाम्याला माणसांत येण्याची आस लागली आहे. आपल्या तुटपुंज्या आयुष्यात आपण
बर्‍याच वेळी मागील सगळे विसरून आयुष्याची हार्ड डिस्क फॉरमॅट करावयाची इच्छा करत असतो .इथे तर आयुष्यच न संपणारे ! आठवणी तर क्लेशकारक, कवी म्हणतो "ठसठसणार्‍या" जास्त परिणामकारक. विशेषण..

पण या बालहत्यार्‍य़ाला कोण जवळ करणार ? तो म्हणतो आहे, एक चपखल मुखवटा चढवून जनात मिसळावे. हा मुखवटाही शहाण्या माणसाचा. सर्वसाधारण जनता शहाणा वाटणार्‍याची फार चौकशी करत नाही. भळभळत्या जखमा झाकून त्याला आता एक सामान्य माणुस म्हणून जगावयाची इच्छा आहे. एका असामान्याला सामान्य व्हावयाची इच्छा व्हावी, नव्हे तशी गरज भासावी, नियतीचा काय खेळ आहे बघा !

कथा फक्त अश्वत्थाम्याची असती तर कविता तशी एकसुरी वाटली असती. पण तसेच आहे कां ? नाही, एका अर्थाने ही कविता तुमची आमची आहे, सगळ्या मानव जातीची आहे. मला सांगा, तुम्हाला मनाचे कढ आवरून सावरून, ठसठसणार्‍या आठवणी विसरून, खोटे मुखवटे धारण करून, जगाला सामोरी जावे लागतेच ना ? कवितेची खरी लज्जत यात आहे.
आणखी एक मजा पहा. अश्वत्थाम्याला शाप मिळाला वणवण भटकण्याचा व कवीचे नाव आहे अनन्त यात्री !
अनन्त यात्री, मिपावर आपले स्वागत. अशाच कविता वाचावयास मिळू द्यात.

शरद

कविताआस्वाद

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

31 Jan 2017 - 8:25 pm | यशोधरा

विवेचन अतिशय आवडले.

अत्रुप्त आत्मा's picture

1 Feb 2017 - 2:46 pm | अत्रुप्त आत्मा

प्लस वण .

आदूबाळ's picture

31 Jan 2017 - 9:04 pm | आदूबाळ

मस्त लिहिलंय!

प्रचेतस's picture

1 Feb 2017 - 8:53 am | प्रचेतस

उत्तम लेख आणि रसग्रहण.
सवडीने अधिक लिहिनच.

शरद, धन्यवाद. तुमच्या लेखाने ही कविता लिहिण्यामागच्या माझ्या मनोवस्थेला / प्रेरणेला नेमक॑ शब्दरूप मिळाल॑. जवळच्या व्यक्तीकडून झालेल्या प्रतारणेत होरपळणाऱ्या माझ्या एका सुहृदाची रोजच्या वास्तवाला सामोर॑ जाताना होणारी तगमग मा॑डण्याचा प्रयत्न मी "अश्वत्थामा" मध्ये केलाय. अशा तगमगीची, तडजोडीची व्यापकता व सार्वकालिकता तुम्ही नेमकी टिपलीत.

प्रचेतस, तुमच्या लिखाणाची प्रतिक्षा करतोय.

पैसा's picture

1 Feb 2017 - 11:31 am | पैसा

सुरेख लिहिलंय

बापू नारू's picture

1 Feb 2017 - 12:52 pm | बापू नारू

मस्त लिहलंय

सानझरी's picture

1 Feb 2017 - 1:39 pm | सानझरी

मस्त विवेचन..

अत्रुप्त आत्मा's picture

1 Feb 2017 - 2:48 pm | अत्रुप्त आत्मा

थोडावेळ व्यासांचे शिल्प वाचतोय असं वाटलं. शैलीमुळे !

पुंबा's picture

1 Feb 2017 - 5:14 pm | पुंबा

सुंदर रसग्रहण..

ज्योति अळवणी's picture

3 Feb 2017 - 2:18 am | ज्योति अळवणी

खूप छान विवेचन. परत एकदा अश्वत्थामा वाचायची इच्छा झाली. धन्यवाद