तो राजहंस एक !

Primary tabs

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
11 Jan 2017 - 3:19 pm

२००४-०५ चा तो काळ. भारतीय क्रिकेट संघ बऱ्यापैकी स्थिरावलेला. आता या संघात नवीन कुणी नको असं वाटायचं. आणि तो आला ! बलाढ्य शरीर, पिंजारलेले लांब सोनेरी केस, डोळ्याला गॉगल,आणि विकेटकीपरचे हेल्मेट ह्या अवतरामुळे त्याचा चेहरा कधी नीट दिसताच नव्हता. तो म्हणे भारताचा नवीन विकेटकीपर होता. नाव -महेंद्रसिंग धोनी! भारतीय क्रिकेटला विकेटकीपरची समृद्ध आणि लांबलचक अशी परंपरा लाभली आहे. दर दोन-तीन महिन्याला नवीन कोणीतरी यायचा. त्याच कारण म्हणजे भारतात विकेटकीपर हे नेहमीच एक स्वतंत्र संस्थान असायचं. त्यांचा काम म्हणजे चेंडू थोपवणं एवढंच! ह्या संस्थानिकांच्या हाती एकदा जरी बॅट दिली की संस्थाने खालसा व्हायची. आता हे धोनी नामक संस्थानिक कधी खालसा होतात एवढंच बघायचं होतं! पण हळूहळू हे संस्थान भारतात नुसतं रुजलंच नाही तर पाळेमुळे घट्ट करून त्याने पूर्ण भारतावर वर्चस्व मिळवलं. मान्य करा अथवा करू नका,२००८ ते २०१५ ह्या कालखंडात महेंद्रसिंग धोनी हा भारतीय क्रिकेटचा अभिषिक्त सम्राट होता !

मान्य न करणाऱ्यांमध्ये काही काळ माझाही समावेश होता. कारण धोनी हे रसायन वेगळंच होतं. आदर्श खेळाडूच्या आमच्या व्याख्येत धोनी कुठेही बसत नव्हता. हा कसला कॅप्टन? कपिल देव,गावस्कर,सचिन,गांगुली,द्रविड ह्या माझी कप्तानांच्या चेहऱ्यावर खेळाप्रती,संघाप्रती जी निष्ठा दिसायची ती धोनीच्या चेहऱ्यावर कुठेही नसायची. पण निष्ठा दाखवावीच लागते हा आमचा गैरसमज धोनीने अलगद दूर केला. तो त्याच्या पद्धतीने खेळायचा. आणि बहुतांश वेळा आपण जिंकायचो. अँड इट्स ऑल दॅट मॅटर्स!

काही लोकांचा जन्मचं जिंकण्यासाठी होतो. धोनीसुद्धा त्यातलाच एक असं मला वाटायचं. पण असं काही नसतं. धोनी किती जिंकला, किती हरला ते महत्वाचं नाही. धोनीच्या आधीचे कर्णधार हे त्याच्यापेक्षा जास्त प्रतिभावान होते हे तोसुद्धा मान्य करेल.पण ते सगळे आणि धोनी ह्यांच्यात मला जाणवलेला एक मूलभूत फरक सांगतो. ते सगळे आपल्याला जिंकायचंच आहे ह्या भावनेने खेळायचे. धोनी, आपण जिकंलेलो आहो,फक्त अजून जाहीर व्हायचंय ह्या विचाराने खेळायचा. धोनी विजयश्री खेचून आणत नव्हता तर ती त्याच्याच घरी राहते अश्या आविर्भावात खेळायचा. माझ्या अगाध क्रिकेटज्ञानामुळे धोनी कुठे कुठे चुकला ह्याच तांत्रिक विश्लेषण मी करू शकणार नाही. त्यामुळे कोण बरोबर, कोण चूक हे ज्याचे त्याने ठरवावे. पण एक सामान्य क्रिकेटप्रेमी म्हणून बघताना मी असं म्हणेन की धोनी मैदानात असताना जिंकणं ही जगातली सगळ्यात सोपी गोष्ट वाटायची.

सचिन,लक्ष्मण,गांगुली,द्रविड आणि अश्याच कितीतरी आंतराष्ट्रीय फलंदाजांची तंत्रशुद्ध फलंदाजी बघण्याची सवय असल्यामुळे धोनी हा आमच्यासाठी एक धक्का होता. पण मुळात शुद्धता वगैरे सगळ्या कविकल्पना असतात. कुठलाही एक चेंडू तुम्ही पायचीत न होता,जायबंदी न होता,जास्त श्रम न घेता आणि इतर कुठल्याही प्रकारे बाद न होता,जर त्याच्या मुक्कामी पोहोचवू शकत असाल तर तुम्ही तंत्रशुद्ध फलंदाज आहात! धोनी नेमकं हेच करायचा. जगातल्या कोणत्याही गोलंदाजाने त्याला फार काळ सतावलेले मी तरी बघितलेले नाही. उलट त्याला आऊट कसे करावे ह्यावर खलबतं व्हायची. फार कमी फलंदाजांच्या नशिबात अशी खलबतं असतात.

'गुरु' सिनेमातल्या शेवटच्या प्रसंगात गुरुभाई कोर्टाला ठणकावून सांगतात,"यहातक पोहोचने के लिये बहोत कुछ खोया है मैने. और ये केस खतम होने तक शायद मेरी आवाज,मेरा दिमाग और मेरा सबकुछ खो दूंगा.पर एक चीज आप मुझसे नही छिन पायेंगे..और वो है मेरी हिम्मत !!"

वर्ल्डकप क्रिकेटच्या फायनलमध्ये सचिन,सेहवाग,कोहली परतल्यावर, फॉर्मात असलेल्या युवराजला थांबवून स्वतः मैदानात येण्यासाठी अपार हिम्मत असावी लागते. ही सामान्य बाब नव्हे. क्रिकेटविषयी,संघाविषयी आणि स्वतः विषयी अतुलनीय निष्ठा असणारा व्यक्तीच हे करू शकतो.ती हिम्मत दाखवून धोनीने तो सामना तिथंच जिंकला होता. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं त्यानं जिंकला होतं ते करोडो भारतीयांचं मन !

धोनी, तुझ्या असण्याला,घडण्याला,कर्तुत्वाला आणि सयंमाला मनापासून सलाम !!

-- चिनार

प्रकटनक्रीडा

प्रतिक्रिया

मंदार भालेराव's picture

11 Jan 2017 - 4:49 pm | मंदार भालेराव

लेख भारी, पर आम्हाला बावा अजून बी कॅच पकडण्याचा प्रयत्न करणारा मोंगियाच आवडतो. Wink

mayu4u's picture

12 Jan 2017 - 11:44 am | mayu4u

आता धोनी भक्त चालून येणार तुमच्यावर!

मोंगिया च्या ब्याटिंग विषयी पण लिवा की!

एस's picture

11 Jan 2017 - 7:25 pm | एस

छानच लिहिलंय.

धोनीने केलेली सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे त्याने सगळी संस्थानं खालसा केली आणि स्वतःच संस्थान निर्माण होऊ दिलं नाही.
दिग्गजांना बाहेरचा रस्ता दाखवला आणि त्यांच्या शिवाय सुद्धा विजय मिळवता येतो हि भावना रुजवली.
लक्ष्मण, सेहवाग आणि गंभीर यांना फॉर्म आणि फिटनेस या कारणांमुळे बाहेर काढणं सोपी गोष्ट नाही.
त्याच्या जागी खरं तर युवराज कॅप्टन व्हायचा पण धोनीला संधी मिळाली ती सचिन, द्रविड आणि गांगुली यांच्या मुळें. आणि धोनीने त्यांचा विश्वास सार्थ केला.