बन्दे की मेहनत को किस्मतका सादर परनाम है प्यारे.. दंगल दंगल!

पिलीयन रायडर's picture
पिलीयन रायडर in जनातलं, मनातलं
5 Jan 2017 - 11:05 pm

Dangal

दंगल पाहिला. आवडलाच..

अगदी शतकोत्तर कलाकृती नसली तरी पिक्चर उत्तमच आहे. आणि मला आमीर खान देशद्रोही वाटत नाही, म्हणुन मला त्याचं कौतुक करायलाही काही त्रास नाही.

दंगल मध्ये आमिर, फातिमा, सान्या, सांक्षी तंवर आणि अपारशक्ति खुराणा म्हणजेच ओंकार.. सगळ्यांचेच काम उत्तम आहे. त्यांनी त्यांच्या लुक्सवर घेतलेली मेहनत, त्यासाठी केलेला व्यायाम.. हे तर महत्वाचं आहेच. पण खास करुन आमीरने वजन वाढवुन, ते पुन्हा कमी केलंय. आणि खरंच त्याच्या आयुष्याची २०-२५ वर्ष आपण पहातोय असं वाटावं इतका तो एकाच सिनेमात तरूणही दिसलाय आणि म्हाताराही. नुसतं शरीरच नाही, तर डोळे सुद्धा! आमीर भारी आहे.. वादच नाही..

एक गोष्ट नोंदवुन ठेवलीच पाहिजे. इंग्रजी सबटायट्ल्स फार विचार करुन लिहीलेले होते. अगदीच भाषांतराच्या पाट्या न टाकता, अर्थ समजुन घेऊन "भावांतर" केलंय. दंगल दंगल हे गाणंही जमुन आलंय..

पण ह्या सगळ्यात मला पिक्चर मध्ये सर्वात जास्त काय आवडलं..?

काय आहे की, मला जगात दोन प्रकारची माणसं "सेक्सी" वाटतात (हो..सेक्सी हा माझा आवडता शब्द आहे. मुव्ह ऑन!)

एक म्हणजे संपुर्ण स्वयंपाक करुन स्त्रियांना गरम गरम जेवण वाढु शकणारा पुरुष आणि दुसरं म्हणजे जिममध्ये वजनं उचलुन आपले "मस्कल्स" टरारुन फुगवु शकणारी स्त्री! थोडक्यात ती जनता, जी आपले स्टिरीओटाईप्स मोडुन अत्यंत आत्मविश्वासानी जगु शकते.. असले लोक मला भयंकर आकर्षक वाटतात.

इथेही महावीरसिंग आपल्या मुलींना "पोरींच्या जातीला.." मधुन बाहेर काढतो आणि आपल्याही डोक्यातले अनेक स्टिरिओटाईप्स खाळकन फोडतो. गीता जेव्हा मुलांसोबत कुस्ती खेळायला जाते, तेव्हा तिथे उभे असणारे अनेक पुरुष अर्थातच गलिच्छ कमेंट्स करतात. मला तर कुस्तीमध्ये असं आपल्या शरीराला दुसर्‍या मुलाला हात कसा लावु देणार, कपडे फाटले तर काय? इकडे तिकडे हात लागला तर काय? वगैरे भरपुर "टिपीकल" खयाल आले. पण पुढच्या सेकंदाला गीता ह्या सगळ्याच्या पलीकडे जाउन कुस्तीसाठी उठली आणि शांतपणे मैदानात गेली. मलाच माझी लाज वाटली. कितीही फेमिनिस्ट म्हणलं तरी स्वतःच्या शरीराचं भान सुटत नाहीच. अजुनही स्त्री अवयव काही तरी वेगळे आहेत. त्यांचं भान सांभाळतच आयुष्य जगायचं. कुणाचा स्पर्श झाला तर?? म्हणुन नकोच बाई.. वाली मानसिकता मोडून काढणं सोप्पं नाही. अशात बघणार्‍यांच्या गलिच्छ नजरा तुडवत कुस्तीला जाणं काही औरच!

हे जे गीता आणि बबितानी हरयाणासारख्या जागी, जिथे "छोरी हुई है" म्हणल्यावर तोंडं पडतात, तिथे करुन दाखवणं भारीच आहे.. वादच नाही.. आणि म्हणुनच मला "म्हारी छोरीयाँ छोरोंसे कम है के?" हे वाक्यही खटकलं नाही. हरयाणातला बाप असंच बोलत असतो. पुरुषाशी तुलना केली (पक्षी : आधीच स्त्रीला कमी लेखलं) म्हणुन तो स्त्रीवादी नाही असं म्हणणं असेल तर पिक्चर पुन्हा बघा.

ह्या पोरींनी केलेली बेसुमार मेहनत, खास करुन कुस्तीचे शॉट्स, मोठ्या पडद्यावर बघण्याची गोष्ट आहे. शेवटच्या शॉट मध्ये गीता ऑस्ट्रेलियन रणगाडा (म्हणजे तिची प्रतिस्पर्धी हो!) डोक्यावरुन उचलुन आपटते, ते जरं तिने खरोखर केलं असेल तर, साष्टांग नमन माझे!

अजुन एक मुद्दा म्हणजे, पिक्चर पहाण्याआधी फेसबुकवर खुप काही चर्चा वाचली होती. अर्थात पिक्चर बहुतेकांना आवडलेलाच आहे. पण आपली स्वप्नं अशी मुलांवर लादावीत का? वगैरे चर्चाही वाचल्या. अनेकांना ह्या कारणासाठी पिक्चर पटलेला नाही.

मला पिक्चर पाहुनही त्या कथेत तसं काही घडलं असं वाटत नाही. महावीरसिंगने सगळ्याच आशा सोडुन दिलेल्या असतात. त्याला त्या मुलींमध्ये कुस्ती शिकु शकण्याची चमक दिसते म्हणुन तो त्यांच्यावर वर्षभर मेहनत घ्यायचं ठरवतो. इथुन पुढचा भाग अनेकांना "जुलुम" वाटत असेल. तो पोरींना अबरचबर खाऊ देत नाही, सकाळी पाचला उठुन पळवतो, व्यायाम करायला लावतो, केस कापतो. हे बघतानाही त्या मुलींसारखाच मलाही राग आला होता. पण ह्या जगात कोणताही यशस्वी खेळाडु हे सगळं न करताच मेडल मिळवु शकलेला नाही. हो मुलांना त्रास होतो.. त्यांना झोपावं वाटतं ८ पर्यंत, त्यांना खावं वाटतं तळकट, त्यांना पहावा वाटतो टिव्ही. पण "जे मुलांना हवंय ते करु देणं" हेच सुजाण पालकत्व असतं का?

आजकाल "तू जे हवं ते करं. ताण घेऊ नकोस. आपल्याला स्पर्धेतला उंदीर व्हायचं नाही" हे पालकांच मुलांसाठी असलेलं धोरण आहे. उगाच उर फुटुस्तोवर धावणं मलाही मंजुर नाही, पण म्हणुन स्पर्धाच नको?? ताणच नको घेऊस?? ते बाळ १५-१७ वर्ष राहिल तुमच्या पदराखाली, पण कधी तरी तर बाहेर पडेल ना? कधी तरी तर त्याला स्वतःचा नोकरी धंदा शोधावा लागेल ना? तिथे काय पायघड्या टाकलेल्या असतात का? शंभरातुन दहा घेतात, ती स्पर्धा नसते? डेडलाईन्सवर काम करुन द्यायची असतात, तो ताण नसतो?

अरे ताण कसा घ्यायचा, कधी घ्यायचा, किती घ्यायचा हे पोरांना शिकवा की! स्पर्धेत उतरुच नकोस हे काय नाटक आहे?

आणि तुला जे हवं ते कर काय? मला माझ्या ८-१० वर्षाच्या मुलात अमुक एक स्किल दिसतंय, तर मी त्यावर मेहनत घेऊ नको? "आठ" वर्षाच्या मुलाला सांगु की "तू ठरव"? मुलांमध्ये नसलेला कल आणि बळंच निर्माण केलेली आवड त्यांच्यावर लादुन त्यांना "सर्वांगीण विकासा"च्या नावाखाली राबवणं चुक आहे हे मलाही कळतं. पण मी त्या पोरापेक्षा २५ वर्षानी मोठी आहे ना? मी सांगायला नको का त्याला की बाबारे हे तुला जमतंय, ह्याचा आयुष्यात तुला उपयोग होईल, हे कर. पोरांवरच १००% निर्णय सोडायचे तर तुम्ही कशाला हवे मग? काय पोरांना ठरवु द्यायचं आणि काय पालकांनी ठरवायचं हे "पालकांना" समजायला हवं. जगातलं कोणतंही मुल सकाळी पाचला उठुन व्यायाम करत नसतं किंवा पोळीभाजीच खात नसतं. तिथे मायबापच लागतात.. करडी नजर रोखुन उभे..

इथे असंही अर्ग्युमेंट होऊ शकतं की हे महावीरसिंगने स्वतःच्या स्वप्नांना मुलींवर लादणं आहे. पण कसंय की माणुस म्हणुन मला ठराविकच गोष्टींची माहिती असते. माझ्या समजुती-विचार-माहिती ह्यातुनच मी मुलांसाठी निर्णय घेणार. आपल्याला तरी १०-१५ प्रोफेशन्स सोडून काय फार महिती असतं? मग हरयाणातल्या पैलवान बापाला पोरींना पैलवानच करायचं सुचणार ना?

महावीरसिंग मुलींमधला गुण हेरतो, त्याच्या मुलींवर मेहनत घेतो आणि पोरी त्या मेहनतीच चीज करुन दाखवतात, तर ह्यात चुक काय? पैलवानानी पोरींना पैलवानच का बनवलं ही? जर ही कथा पुढे जाऊन मुली नैराश्यात गेल्या वगैरे दाखवत असती तर ते चुकच होतं. पण गीता स्वतःहुन त्याला येऊन विचारते की पुढची कुस्ती कधी लढायची. इथे ती मुलगी गोल्ड मेडल घेतेय तरी केवळ पैलवान बापाने आपले स्वप्न मुलीमार्फत पुर्ण केले म्हणुन हे सगळा जबरदस्तीचा मामला? मुलांनी क्षेत्र "निवडलेलं" नसलं तरी पालक सुद्धा व्यवस्थित निर्णय घेत असतात. प्रत्येक वेळेस "तुला काय करायचंय ते कर" हीच पद्धत बरोबर असेल असं नाही.

आणि तसंही, आपले वडील आपल्यालासाठी जे कष्ट करतात, त्याची जाणीव ठेवुन, त्यांच्या आनंदासाठी एखाद्या क्षेत्रात यशस्वी होणं हे वाईट आहे का? पालक तर कायमच आपल्या पाल्याचा विचार करतात. पण असा विचार मुलांनीही आईवडीलांचा करायला हवा. मुलांना कसे वाढवावे ह्यावर जशा चर्चा होतात, तसंच मुलांनीसुद्धा काही किमान गोष्टी आईबापासाठी करायला हव्यात.

पालकांनी मुलांच्या आयुष्यात किती ढवळाढवळ करावी किंवा करु नये ह्यापेक्षाही मुलांनी आपल्या आईवडीलांसाठी एक ध्यय जोपासणं, त्यांच्या आनंदासाठी मेहनत घेणं हे ह्या कथेत मला जास्त भावलं. "हो, माझ्या तुझ्याकडुन काही अपेक्षा आहेत, कारण तुझ्यात ती क्षमता आहे." हे एका पालकानी आपल्या मुलाला सुनावणं भावलं.. कितीही त्रास होत असला तरीही आपल्या मुलींना "मेहनतीला पर्याय नाही" हे ठासुन सांगणारा बाप मला भावला..

पण हे सगळं सोडुनही, दोन अडीच तास एक चांगली कथा मांडणारा हा चित्रपट आहे. बघायला नक्कीच हरकत नाही.

चित्रपटविचार

प्रतिक्रिया

संदीप डांगे's picture

5 Jan 2017 - 11:26 pm | संदीप डांगे

छान लिहिलंय.. माझेच विचार मांडलेत, त्यामुळे पुनरुच्चाराचे श्रम टळलेत! :-)

पिच्चर बघितलेला नाही. पण लेख वाचून कदाचित बघायला जाईन सुद्धा.

लेख चांगला जमलाय पिरा.

रेवती's picture

5 Jan 2017 - 11:53 pm | रेवती

चित्रपटाची ओळख आवडली. त्यावरील तुझे मत आवडले. स्टिरिओटाईप्स मोडत कुस्तीबिस्ती जाऊ देत, आणखी साधं काही केले तरी लोक्स वेड्यागत बघत बसतात. नंतर त्यांनाही सवय होते. "जौ द्या राव! हे येडं असलंच आहे." म्हणत आपापल्या कामाला लागतात. तोवर जरा वैताग आणतात. बाकी काही नाही.
खरंतर हा शिनेमा नाताळाच्या सुट्टीतच बघायचा होता पण जमले नाही. आता उद्याच्या विकांती जमलं तर बघते. अर्थातच मुलाला बरोबर घेऊन जाणार.
याचा प्रिमियर आमच्या येथे झाला म्हणे! तेलुगु पब्लिक गेलं होतं बघायला.

पिलीयन रायडर's picture

5 Jan 2017 - 11:55 pm | पिलीयन रायडर

गाण्याविषयी लिहायचं राहु गेलंय खरं तर.

बापु सेहत के लिये.. कैसी धाक्कड आहे.. मस्तच आहेत.

ह्या पोरींची मेहनत ह्या व्हिडीओत आहे बघा.

आणि हा आमीरचा

९७ किलो ते ६०-६५ किलो आणि अतिशय पीळदार शरीरयष्टी बनवायचा प्रेरणादायी व्हिडीयो बघून बर्‍याच बायकांनी आपल्या नवर्‍यांना ६ महिन्याच्या मेंबरशीपवर जिमला जुंपलेला समजले . उनकतर्फे आमीरचा टीव्र निशेद !
या संदर्भामधला एक चांगला व्हिडीयो

पद्मावति's picture

6 Jan 2017 - 12:21 am | पद्मावति

मस्तं जमलीय ओळख. हा चित्रपट नक्की पाहणार.

एस's picture

6 Jan 2017 - 8:01 am | एस

आमिर खानला सलाम!

संजय क्षीरसागर's picture

6 Jan 2017 - 10:05 am | संजय क्षीरसागर

संगोपनाच्या दृष्टीकोनाबद्दलच अती चर्चा झाली आहे.

पिलीयन रायडर's picture

6 Jan 2017 - 10:40 am | पिलीयन रायडर

कोण म्हणलं रसग्रहण आहे?

संजय क्षीरसागर's picture

6 Jan 2017 - 11:40 am | संजय क्षीरसागर

विचार प्रदर्शन आहे वाटतं.

किसन शिंदे's picture

6 Jan 2017 - 12:10 pm | किसन शिंदे

एखाद्या कलाकृतीच्या रसग्रहणाची नेमकी व्याख्या काय असू शकते.?

संजय क्षीरसागर's picture

6 Jan 2017 - 12:23 pm | संजय क्षीरसागर

तीचा नक्की इंपॅक्ट काय आहे, तिची आस्वादकाला भावलेली सौंदर्य स्थळं कुठली , संगीताची काय वैशिष्ठ्य आहेत (लिरिक्स, सुरावटी), पिक्चर फ्रेमवाईज क्लायमॅक्सपर्यंत कसा नेलायं, कलाकारांची कामं किती नाविन्यपूर्ण आहेत, या अँगलनं रसग्रहण व्हायला हवं.

नै सर.. पण पिराकाकू कुठे म्हणाल्या आहेत की हे रसग्रहण आहे म्हणून...

"भेळ खाताना, ही जिलबीसारखी गोलाकार का नाही?" किंवा "बिडी जलाईले.. बघताना, ओशोंचे विचार यात का नाहीत?" अशी तक्रार करून कसे चालेल..?

किसन शिंदे's picture

6 Jan 2017 - 1:45 pm | किसन शिंदे

धागा शतकी करायचा आहे का? :)

रच्याकने, संक्षी सरही तक्रार करत नसून, त्यांनी त्याचं मत मांडलंय अस मला वाटतं.

आजकाल "तू जे हवं ते करं. ताण घेऊ नकोस. आपल्याला स्पर्धेतला उंदीर व्हायचं नाही" हे पालकांच मुलांसाठी असलेलं धोरण आहे.

आजकाल ही परिस्थिती खरंच आहे का ? मलातरी तसं वाटत नाही.

किसन शिंदे's picture

6 Jan 2017 - 10:29 am | किसन शिंदे

माझी बायको काम करत असलेल्या टॉपच्या क्लासमध्ये जेव्हा पालक दोन ते तीन लाख रूपये फीस (सीईटी, जेईई, सायन्स, मॅथ्स..यांव न त्यँव) देवून आपल्या पाल्यांना बळंच कोंबत असतात त्यावरून तरी मला "तू हवं ते कर.." या वाक्यात प्रचंड विरोधाभास जाणवतो.

चिनार's picture

6 Jan 2017 - 10:34 am | चिनार

हेच्च म्हणतो...आपल्याला स्पर्धेतला उंदीर व्हायचं नाही असा ज्यादिवशी पालक म्हणतील तो सुदिन

पिलीयन रायडर's picture

6 Jan 2017 - 10:38 am | पिलीयन रायडर

दोन्ही गट प्रबळ आहेत. मुलांच्या अति मागे लागणारेही खुप आहेत आणि आम्ही आमच्या मुलांना कोणताही ताण देणार नाही म्हणणारेही खुप आहेत.

"तू तुला हवं ते कर" वाला ट्रेन्ड थोडा कमी प्रबळ असला तरी आहे हे नक्की. माझ्याच आजुबाजुला पुष्कळ आहेत.

पिलीयन रायडर's picture

6 Jan 2017 - 10:43 am | पिलीयन रायडर

आणि हो.. माझा मुद्दा हा मुख्यतः "पालकांनी आपली स्वप्नं मुलावर लादणं" ह्याबद्दल आहे. ह्या अनुषंगाने पिक्चरवर बरीच टिका झाली. खास करुन "आम्ही आम्च्या मुलांवर असं कधीच लादणार नाही, त्याला जे हवं ते करु देत." हा सुर खुपच जाणवला. पण पालक जेव्हा मुलांसाठी निर्णय घेतात तेव्हा ते "लादणं"च असतं असं नाही.

खेडूत's picture

6 Jan 2017 - 10:19 am | खेडूत

ओळख आवडली.
थेटरात बघायचा विचार आधी नव्हता, पण आता पहाणार म्हणतो.
बाकी 'जो जीता' पासूनच आमीर अश्या प्रकारच्या चित्रपटांत माहीर आहेच..

दंगलविषयी वाचलेलं सर्वात सुंदर स्फुट. त्या बुद्धीप्रामाण्याच्या अभ्यासकाचा लेख वाचून जो मनस्ताप झाला होता तो या अप्रतिम रसग्रहनाने दूर झाला.

शंभरातुन दहा घेतात, ती स्पर्धा नसते? डेडलाईन्सवर काम करुन द्यायची असतात, तो ताण नसतो?

अगदी खरंय..

प्रचेतस's picture

6 Jan 2017 - 11:12 am | प्रचेतस

लेखन आवडलं.

गीता नॅशनल अ‍ॅकेडमी मधून सुट्टीसाठी म्हणून काही दिवसांसाठी परत घरी येते तेव्हा ती आणि महावीर ह्यांदोघांमधील कुस्तीचा प्रसंग सबंध चित्रपटाचा हाय पॉइन्ट आहे. जुन्या आणि नव्या ट्रेनर्सच्या तंत्राचा एकमेकांशी संघर्षच.

किसन शिंदे's picture

6 Jan 2017 - 11:21 am | किसन शिंदे

तू चक्क हिंदी चित्रपट बघितला? सूर्य पुण्याच्या दक्षिणेकडे तर नाही उगवला ना!? ;)

प्रचेतस's picture

6 Jan 2017 - 11:37 am | प्रचेतस

पाहिला भो =))

बन्दी की रसग्रहन को भी सादर प्रनाम हे ;) आवडेश पिच्चर पहानार ,कारन आमिर आवडतोच पन ह्या मुलिसाठी ़ खास करुन :)

वेल्लाभट's picture

6 Jan 2017 - 11:23 am | वेल्लाभट

छान.

मराठी कथालेखक's picture

6 Jan 2017 - 12:24 pm | मराठी कथालेखक

मी थिएटरलाच पाहिला. चित्रपट कुठे कंटाळवाणा नाही, उलट हलके फुलके विनोद करुन मध्ये मध्ये थोडंस हसवतच रहतो पण एक प्रेक्षक म्हणून चित्रपटाशी समरस होता आलं नाही तर मी तरी चित्रपटाला अप्रतिम म्हणत नाही.
सध्या अनेक सिनेमांच्या पटकथा आणि चित्रभाषा एका साच्यातल्या वाटतात..धोनी पण असाच वाटलेला.. थोडेसे हलके फुलके विनोद टाका, थोडं भावनिक करा ई ई.. का कुणास ठावूक मला अशा पटकथांचा कंटाळा आला..खरा संघर्ष समोर आलाच नाही असं वाटतं.. झालंच तर ती चित्रभाषा..क्लायमॅक्सच्या वेळी नायक्/नायिकेला जुने संवाद /दृष्य आठवणं , क्लायमॅक्स हा स्लो मोशन मध्ये दाखवला पाहिजे का ?.. अरे कशाला ? आम्हाला माहितीये की हा क्लायमॅक्स आहे आम्ही श्वास रोखूनच बघत आहोत की कशाला हवीये स्लो मोशन ?...असो. हे फक्त दंगलपुरतं बोलत नाहीये मी.
पण दंगलच्या कथानकापुरतं म्हंटलं तर कोचबद्दल सगळं खरंच दाखवलं आहे का ? शंका वाटते .. खास करुन शेवटी अमिरला खोलीत कोंडण्याचा प्रकार.. चित्रपटाची कथा/पटकथा लिहिताना त्या कोचला भेटून त्याची पण बाजू जाणून घेतली असेल अशी आशा करतो.

संदीप डांगे's picture

6 Jan 2017 - 12:54 pm | संदीप डांगे

कोच बद्दल दाखवलेलं सगळं खोटं आहे, एकंदर सरकारी यंत्रणेत कशी माणसे असू शकतात ते दाखवण्याचा प्रयत्न असावा,

खऱ्या कोचने नाराजी व्यक्त केली आहे, काँट्रॅव्हर्सि निर्माण करण्यासाठी काहीतरी गिमिक असावं!

बर्‍याच गोष्टींमधे सिनेमॅटीक लिबर्टी घेतलेली आहे. कोच ड्रामा वाढवण्यासाठी घेतलेला आहे, तर फायनल देखील प्रत्यक्ष फायनल पेक्षा वेगळी दाखवली आहे. पण एकूण कलाकारांची कामे चांगली झालेली असल्याने आणि चित्रपटातील ३ पात्रे वगळता सर्व प्रसंग व पात्रे सत्यघटनांवर आधारीत नसल्याची सूचना आधीच दिल्याने याविषयी फारसा आक्षेप नाही.

मराठी कथालेखक's picture

11 Jan 2017 - 11:17 am | मराठी कथालेखक

चित्रपटातील ३ पात्रे वगळता सर्व प्रसंग व पात्रे सत्यघटनांवर आधारीत नसल्याची सूचना आधीच दिल्याने

पण ती ३ पात्रं ,कॉमनवेल्थ मधलं ते मेडल या गोष्टी खर्‍या असल्याने बाकीच्या गोष्टीसुद्धा बहुतांश प्रेक्षकांना खर्‍या वाटण्याचा धोका आहे. म्हणजे यांच्या सिनेमॅटीक लिबर्टी मुळे तो कोच उगाच बदनाम !!
अशी खर्‍या खोट्याची सरमिसळ करण्यापेक्षा संपुर्ण काल्पनिक बनवून , नावं पण वेगळी वापरुन आणि फक्त 'महावीर, गीता, बबिता फोगट यांच्या जीवनावरुन प्रेरित' अशी सूचना दिली असती तर ते जास्त योग्य ठरलं असतं.

असो. तो कोच न्यायालयात गेला आणि जिंकला तर मला आनंद वाटेल :)

शान्तिप्रिय's picture

6 Jan 2017 - 1:30 pm | शान्तिप्रिय

छान लिहिलय!

आमिर खान निश्चितच चांगला अभिनेता आहे,
पण हा पिक्चर टी व्ही वर बघु म्हणतो.
आधी "ती सध्या काय करते पाहायचा आहे."

पैसा's picture

6 Jan 2017 - 1:38 pm | पैसा

सिनेमा बघणार आहेच.

पाटीलभाऊ's picture

6 Jan 2017 - 1:42 pm | पाटीलभाऊ

सुंदर लिहिलंय.

अद्द्या's picture

6 Jan 2017 - 3:49 pm | अद्द्या

दोनदा बघून आलो सिनेमा .. जबरदस्त आहे .

शेवटच्या शॉट मध्ये गीता ऑस्ट्रेलियन रणगाडा (म्हणजे तिची प्रतिस्पर्धी हो!) डोक्यावरुन उचलुन आपटते, ते जरं तिने खरोखर केलं असेल तर, साष्टांग नमन माझे!

हो .. हे खरं आहे.. शेवटच्या सेकंदात अक्षरश उचलून आपटलंय तिने.

मला आटा नक्की आठवत नाही .. पण बहुदा युगेश्वर दत्त ( कि सुशील कुमार ? ) ने हि ऑलम्पिक मध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्याला दोन्ही हातानी उचलून धरला होता तीन सेकंद . ( वेट लिफ्टर उचलतात बार तसं) आणि तिथून तसाच खाली आपटला होता .

विअर्ड विक्स's picture

6 Jan 2017 - 4:29 pm | विअर्ड विक्स

चित्रपट चांगला आहे. गिरीश कुलकर्णी नेसुद्धा उत्तम भूमिका वठवली आहे. चित्रपटाबद्दल विस्ताराने लिहीन लवकरच...

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

6 Jan 2017 - 4:47 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

खूप छान पिरा.रिव्हू नाही हा,पण चित्रपट पाहून झाल्याने पटलं.थोडं पालकांनी पण मुलांना गाईड केले पाहीजे या मताचा मी आहे.शेवटी स्वतःच्या हाडामासाच्या गोळ्यावर पालकांचा हक्क बनतोच की.

व्हाटेवर, असो ते असो... आवल्डं!

फेदरवेट साहेब's picture

6 Jan 2017 - 6:26 pm | फेदरवेट साहेब

इट सीम्स टू कम फ्रॉम द बॉटम ऑफ योर हार्ट मॅडम, आय रेज माय फेल्ट हॅट टू ऑनर यु.

साला, धिस इंडिया आय टेल यु चीजच डिफरंट हाय, काही महिना बॅक, काई सो कॉल्ड पेट्रीअट इंडियन पोरेलोक आमी त्या मुल्लाचा सिनेमा पाहनार नाय अँड स्टफ लैच अँगरीली बोलते होते, साला इथं पिच्चर ३ डेज मंदी ३०० करोड का किती तरी रेकॉर्ड अर्निंग करते हाय, व्हॉट एक्झेक्तली इज इंडिया?

खटपट्या's picture

6 Jan 2017 - 8:15 pm | खटपट्या

छान लेख. चित्रपट पाहीन की नाही माहीत नाही...

बोका-ए-आझम's picture

6 Jan 2017 - 8:21 pm | बोका-ए-आझम

पिक्चर तर खल्लास आहेच. त्यातलं आमीरचं काम तर अजून भारी आहे. बाकी मुलांच्या संगोपनाबद्दल बोलायचं तर ते काही science नाही त्यामुळे त्याचा १+१ = २ असा formula असू शकत नाही. ती कला आहे. त्यावर प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो, किंवा असायला हवा, कारण प्रत्येक मूल वेगळं असतं. बाकी लगान (२००१) पासून खेळ केंद्रस्थानी असलेले अनेक छान चित्रपट आले. त्याची सुरूवात करणारा आमीरच होता. हा चित्रपट करून त्याने एक वर्तुळ पूर्ण केलं आहे. त्याला आता १० धूम ३ माफ आहेत!

अस्वस्थामा's picture

6 Jan 2017 - 8:25 pm | अस्वस्थामा

त्याला आता १० धूम ३ माफ आहेत!

बाकी सगळं मान्य हो बोक्का भौ.. पण १० धूम-३ नको.. १ केला तेवढा माफ करा हो. उगी अजून ९ करायला घेतले तर (आणि बायकोमुळे पहावे लागले तर) काय घ्या. ;)

कैलासवासी सोन्याबापु's picture

6 Jan 2017 - 9:59 pm | कैलासवासी सोन्याबापु

वाचनमात्र मोड मधून बाहेर पडलोय, मनापासून लिहिलेत तुम्ही फार, त्यावर उस्फुर्त प्रतिक्रिया द्यायला हवी आहे, अगोदर एका ठिकाणी लिहिली आहे तीच परत देतो, बाकी 'पोरांना मोकळे सोडा अन पोरांना ओझ्याने बैल बनवा' ह्याच्या मधोमध असलेला विचार फारच भावला आहे.

साधारण 2 महिने अगोदर युट्यूब वर दंगलचा ट्रेलर पाहिला, दलेर मेहंदीच्या आर्त अन अतिशय जबऱ्या (प्रसंगानुरूप) आवाजात 'रे भेड कीं हाहाकार के बदले शेर एक दहाड है प्यारे दंगल दंगल' ऐकले अन नखशिखांत सरसर काटा आला अंगावर, मग हा चित्रपट पाहणे एक मिशनच झाले, पण एकटा नाही, वडिलांच्या सोबत

आमचे पिताजी स्वतः उत्तम मल्ल, अमरावतीच्या प्रख्यात श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे विद्यार्थी अन स्वतः एमपीएड मध्ये कुस्ती स्पेशलायझेशन असलेले व्यक्तिमत्व, संयुक्त नागपूर विद्यापीठाचे (त्याकाळी अमरावती विद्यापीठ नव्हते) ३ टाइम्स अनबिटन चॅम्पियन, त्यांच्या वजनगटातले. फादर आमच्याकडे आलेले असता एकदा दोघ बाप बेटेच सिनेमा पाहायला गेलो, सुरुवातीला बाबांना 'सुलतान' चा खराब अनुभव आठवून नकोसे होत होते पण आग्रह करून नेलेच, त्या दिवशी मी चित्रपटगृहात माझ्या 67 च्या बापाला परत एक हरखलेले पोरगे झालेलं पाहिलंय, कुस्ती लागली की बाबा यांत्रिकपणे जणूकाही डोक्याच्या फिक्स रॉम मध्ये असलेल्या कुस्तीच्या फाईल्स उघडून बसले होते, भावूक प्रसंगी डोळे पाणावले असले तरी कुस्तीच्या वेळी मात्र वडील प्रचंड घुसून जात सिनेमात, गंमत म्हणजे त्या कुस्तीत पुढली चाल कुठली असेल ते बाबा अतिशय साधेपणाने धावते समालोचन करत होते अन खरंच पुढच्या फ्रेम मध्ये गीता तोच डाव वापरत होती! अन तो वापरल्यावर बाबांच्या चेहऱ्यावर आलेला आनंद माझ्यासाठी पैसा वसूल होता, मधेच बाबा माझा हात धरून excitment ने 'बघ बघ आता कात्री लावेल ती, हा!!! लावली बघ कात्री, कात्री लावली न बापू का लगेच कमरेची ढुशी मारून चितपट होतो बघ गेम' असे काही काही सांगत असत, एकदम लहानपण आठवले, बारका वरवंटा गळ्यात बांधून वडील मला पळवत किंवा हनुमान जयंतीला लाल मातीत 10 लिटर ताक, हिरडा, नागरमोथा, शिकेकाई, रिठा पावडर सोबत अर्धा तोळा चंदन तेल घालून माती मळून मळून तयार करत नंतर रोज अर्धातास आखाडा तयार करत ते सगळे आठवलं, दंगल माझ्यासाठी बायोपिक सोबतच लहानपणीच्या आठवणवाड्यात एक चक्कर होती नक्कीच, बाकी दिग्दर्शन किंवा तांत्रिक बाजू पक्की असल्याची ग्वाही वडिलांचा आनंद होता, बाकी काही नको.

आनंदयात्री's picture

6 Jan 2017 - 11:32 pm | आनंदयात्री

प्रतिसाद आणि स्मरणरंजन आवडले. मूळ लेखही छान आहे.

संजय क्षीरसागर's picture

7 Jan 2017 - 12:00 am | संजय क्षीरसागर

सॉलीड प्रतिसाद आहे ! जिओ !!

राही's picture

7 Jan 2017 - 12:16 am | राही

प्रतिसाद आवडला. कुस्तीशिक्षणाच्या आठवणी फारश्या वाचायला मिळत नाहीत. लिहा एकदा सगळं ट्रेनिंग. तुमच्या सुरुवातीच्या लेखमालेसारखं.
लेख आवडला.
चित्रपट तर फारच आवडला. अ‍ॅवार्ड घेऊन जाईल नक्की.
बाकी, कोणाचा पाहायचा राहिला असेल तर प्लीज थिएटरमधेच पाहा. टीवीवर नको. मजा नाही येणार त्या चपळ हालचाली आणि पवित्रे पाहताना.

सही रे सई's picture

7 Jan 2017 - 12:31 am | सही रे सई

लाखात एक प्रतिसाद.
आणि लेख पण छान जमला आहे हे.वे.सां.न.ल.

Jack_Bauer's picture

6 Jan 2017 - 10:36 pm | Jack_Bauer

"तू जे हवं ते करं. ताण घेऊ नकोस. आपल्याला स्पर्धेतला उंदीर व्हायचं नाही" हे पालकांच मुलांसाठी असलेलं धोरण आहे. उगाच उर फुटुस्तोवर धावणं मलाही मंजुर नाही, पण म्हणुन स्पर्धाच नको?? ताणच नको घेऊस?? ते बाळ १५-१७ वर्ष राहिल तुमच्या पदराखाली, पण कधी तरी तर बाहेर पडेल ना? कधी तरी तर त्याला स्वतःचा नोकरी धंदा शोधावा लागेल ना? तिथे काय पायघड्या टाकलेल्या असतात का? शंभरातुन दहा घेतात, ती स्पर्धा नसते? डेडलाईन्सवर काम करुन द्यायची असतात, तो ताण नसतो?

अरे ताण कसा घ्यायचा, कधी घ्यायचा, किती घ्यायचा हे पोरांना शिकवा की! स्पर्धेत उतरुच नकोस हे काय नाटक आहे?

ह्या साठी +१

चाणक्य's picture

7 Jan 2017 - 7:01 am | चाणक्य

छान लिहिलं आहे पिरा.

रातराणी's picture

7 Jan 2017 - 1:26 am | रातराणी

चित्रपट ओळख आवडली, नक्की पाहणार.

माबो वरचाच प्रतिसाद ईथे पेस्ट करतोय.

अप्रतिम सिनेमा आहे.

गिरीश कुलकर्णी ची पर्सनॅलिटी मला सुटेबल नाही वाटली त्या रोल साठी. स्वतः कुस्ती खेळलेला (कधी काळी), आणी आता कोचिंग करत असलेला (फिटनेस रूटीन सुटलेला) अशी देहयष्टी नाही वाटली त्याची. कॅरेक्टरही थोडं जास्त खलनायकी वाटलं. डावपेच सुद्धा सातत्यानं ईतके परस्परविरोधी (महावीर फोगट पेक्षा) नसते तरी चाललं असतं कदाचित, कारण खेळातली एक्स्पर्टीज दोघांकडे असणं अपेक्षित आहे. वरिष्ठ अधिकार्यांसमोरची लाचारी मात्र त्याने छान दाखवली आहे.

मला ईक्बाल मधला गिरीश कर्नाड आठवला, भारदस्त शरीरयष्टी, पोट सुटलेलं, कोच म्हणून खेळाविषयी / खेळाडूंविषयी आस्था आणी भ्रष्ट व्यवस्थेचा एक भाग म्हणून भ्रष्ट, असूया असं सगळं काँबिनेशन तिथे जमलं होतं. कदाचित बोमन ईराणी जास्त सूट झाला असता.

सगळ्यांच्या सगळ्या अपेक्षा एका सिनेमात पूर्ण होणार नाहीत. जे सगळं पॅकेज जमलय, त्याला मनापासून दाद!! आवर्जून पहावा असा सिनेमा आहे आणी शक्य झाल्यास मोठ्या स्क्रीन वरच पहावा. तूफान ईफेक्ट येतो. शेवटच्या राष्ट्रगीताला थिएटर मधे लोकं उत्स्फूर्तपणे ऊभे राहिले होते ही त्या ईफेक्ट ला मिळालेली पावती आहे. चांगल्या कलाकृती ची माझी छोटीशी टेस्ट आहे, त्याचा हँगओव्हर राहीला पाहीजे (चांगल्या स्कॉच च्या अगदी उलट डोळा मारा ). आणी दोन आठवड्यापूर्वी पाहिलेल्या दंगल चा हँगओव्हर आज सुद्धा टिकून आहे.

नंदन's picture

7 Jan 2017 - 8:11 am | नंदन

लेख आवडला; बापूसाहेबांचा प्रतिसादही खासच. अन्य चर्चेवरुन हे पुस्तक आठवले.

केडी's picture

7 Jan 2017 - 8:47 am | केडी

चित्रपट तर छान आहेस, पण लेख खरंच सुंदर जमलाय....

वरुण मोहिते's picture

7 Jan 2017 - 12:26 pm | वरुण मोहिते

लेख पण तितकाच छान . आपण तर काय कुस्ती वैग्रे खेळू नाही शकणार त्यामुळे बघण्यात आनंद .
अवांतर - बायकोला गरम गरम जेवण वाढणारे पुरुष ह्या कॅटेगरीत आम्ही पण आहोत त्यामुळे होणारी बायको खुश असते .