चित्तथरारक अस्वल दर्शन

रानवेडा सचिन's picture
रानवेडा सचिन in भटकंती
27 Dec 2016 - 2:16 pm

दरवर्षी बुद्धपोर्णिमेदरम्यान वनविभागातर्फे घेतली जाणारी वन्यजीवगणना वन्यजीव प्रेमींसाठी पर्वणीचं असते. वर्षभर वन्यजीवप्रेमी ह्या गणनेची आतुरतेने वाट पाहत असतात. मी देखील त्याला अपवाद नाही. ह्या गणनेमुळे वन्यजीव प्रेमींना खरया अर्थाने जंगल जवळुन बघायला व अनुभवायला मिळते.

ह्या वर्षी 15 मे ते 22 मे दरम्यान वन्यजीव गणनेसाठी स्वयंसेवक म्हणुन मी व माझा मित्र इम्रान मलिक राधानगरी वन्यजीव अभयारण्यात गेलो होतो. कोल्हापुर जिल्ह्यातील पश्चिम घाटाच्या डोंगररांगांमधे राधानगरी अभयारण्य वसलेलं आहे. राधानगरी अभयारण्य म्हणजे जणु जैवविविधतेचा खजिनाच आहे. पश्चिम घाटाच्या डोंगररांगा, घनदाट झाडी, विस्तीर्ण मैदाने आणी राधानगरी, काळम्मावाडी व माळीवाडी या धरणांचे बॅकवाॅटर यामुळे राधानगरीचं जंगल वन्यजीवांसाठी एक उत्तम आधिवास आहे. या अभयारण्यात आजमितीस ३५ प्रकारचे वन्यप्राणी व २३५ प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद झाली आहे. अभयारण्यात वाघ ( वाघ दिसणं तस दुर्मिळ आहे परंतु २०११ साली वनविभागाने लावलेल्या कॅमेरयात वाघाचा फोटो आला आहे व ३१ जानेवारी २०१६ रोजी वनकर्मचारयांना वाघाचे दर्शन झाले आहे.) , बिबट्या, रानकुत्रा, अस्वल, गवा, सांबर, भेकर, चौसिंगा, रानडुक्कर, साळिंदर, उदमांजर, खवलेमांजर, शेकरू, लंगुर, माकड, ससा इ. प्राणी आढळतात तर मोर, अबलक धनेश, मलबारी धनेश, स्वर्गीय नर्तक, मधुबाज, निलगिरी कबुतर, हरेल, सिलोन फ्राॅग माउथ, सुतार, रातवा, तुरेवाला कोतवाल, रानकोंबडी, गरूड, घुबड, बुलबुल इ. पक्षी आढळतात. अभयारण्यात ३३ प्रजातींचे साप व १२१ प्रजातींचे फुलपाखरे देखील आढळतात.

अभयारण्याच्या दाजीपुर रेंजमधील नानीवळे बीटात आम्ही दोघे प्राणीगणना करतं फिरतं होतो. सकाळचे नऊ वाजले होते, ट्रांसेक्ट लाईनवरची फिरती उरकुन आम्ही नानीवळेतील पावणेश्वर मंदिराकडुन सतीचामाळं या गावाकडे निघालो. चालताना दोघेही वन्यजीवांच दर्शन घडावं म्हणुन कसलाही आवाज न करता चालत होतो. थोडं चालुन झाल्यावर रस्त्याच्या उजवीकडच्या बाजुच्या झाडावर मला शेकरू व माकडं दिसली मी त्यांचे फोटो काढायला सुरूवात केली. इम्रान माझ्यापासुन पाच-सहा पाऊलं पुढे चालत गेला व अचानक जोरात मागे आला व समोरच्या झाडीकडे हात दाखवत म्हणाला ' सच्या वहां भालु है '. शेकरू व माकडं दिसल्यामुळे झालेल्या आनंदाच्या जागी आता मनात प्रचंड भीती निर्माण झाली, कारण अस्वल जिथं होत ती जागा आमच्या पासुन जेमतेम दहा फुट अंतरावर होती. अस्वल हा जंगलातील सगळ्यात बेभरवश्याचा प्राणी आहे व अस्वलाचा हल्ला ही भारतीय जंगलातील नियमित घटना आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात अस्वलाने एकाचं वेळी चौघांचा जीव घेतला होता तर म्हैसूरच्या जंगलात स्वातंत्र्यापूर्वी एका अस्वलाने तेरा जणांचा जीव घेतल्याचे कॅप्टन विलियम्सनने आपल्या ‘ओरिएंटल फिल्ड स्पोर्टस्’ या पुस्तकात लिहून ठेवले आहे. या अस्वलाला केनेथ अँडरसन नावाच्या शिकाऱ्याने गोळी घालून ठार केले होते. मरण्यापूर्वी त्या अस्वलाने तेवीस लोकांना जखमीही केले होते. चंद्रपूरच्या जंगलातही एका अस्वलाने दोघांचा जीव घेतल्याची घटना पन्नासच्या दशकात घडली असल्याच्या नोंदी आहेत. आम्ही फिरत असलेल्या नानीवळे भागात मागच्या वर्षी अस्वलाने वनविभागाने लावलेला कॅमेरा सतत पडणारया फ्लॅशला वैतागुन चावुन चावुन फोडुन टाकला होता. सुप्रसिद्ध वन्यजीव लेखक श्याम देशपांडे यांच्या ‘मेळघाटी सातपुडा’ पुस्तकाच्या अवलोकनात मेळघाटातील कोरकू आदिवासी रात्री-अपरात्री जंगलात जाताना, वाघ-बिबट्यांना घाबरत नाही, परंतु आपल्या साऱ्या देवतांना आवाहने करीत जंगलात अस्वल भेटू नये अशा प्रार्थना करीत धास्तावलेलाच प्रवास करताना दिसतो असे लिहीले आहे. इम्रानला ह्या गोष्टी माहिती नव्हत्या त्यामुळे तो निवांत होता. त्याला जंगलाबद्दल जास्त माहिती नाव्हती व हि त्याची पहिलीच जंगलवारी होती. अस्वल मला दिसलं नव्हत परंतु आपल्यापासुन जेमतेम दहा फुटांच्या अंतरावर अस्वल आहे ह्यामुळे माझी जाम तंतरली. विलंब न करता मी इम्रानला सांगितले ' इम्मा पिछे चल '. अस्वल ज्या झाडीत बसले होते त्या दिशेने तोंड करून आम्ही रस्त्यावर उलटं चालायला सुरूवात केली. अस्वलापासुन सुरक्षित अंतरावर गेल्यावर आम्ही थांबलो. मागे चालताना आमची नजर पुर्णपणे अस्वल बसलेल्या झाडीकडे होती. त्या झाडीतं थोडीथोडी हलचाल होत होती पण अस्वल आम्हाला बघुन तिथुन पळालं नव्हतं व जास्त हालचाल देखील करत नव्हतं, त्यामुळे माझ्या मनात शंका निर्माण झाली. मी इम्रानला माझ्या मोबाईल मधला रानडुक्कराचा फोटो दाखवत विचारलं ' भाई वहा सच्ची भालु ही है या फिर एैसा सुवर है ?'. ' अरे सच्या वहा भालु ही है बहुत बडा ' इम्रान म्हणाला. इम्रानने दोन दिवसांपुर्वीच राजिगरे नावच्या वनरक्षकासोबत फिरताना याच रस्त्यावर अस्वल जवळुन बघितल होतं त्यामुळे त्याच्या बोलण्यावर मी विश्वास ठेवला. वीस मिनीटं झाले आम्ही त्या झाडीकडे पापणी लवु न देता टक लावुन उभे होतो, अधुनमधुन हालचाल व्हायची. आमची उत्सुकता शिगेला पोहचली होती, अचानक त्या झाडीतुन अतिशय देखणं व रूबाबदार अस्वल बाहेर निघालं व आमच्याकडे लक्ष न देता विरूद्ध दिशेने चालायला लागलं.
image1 image2
आमच नशीब बलवत्तर ते आमच्या दिशेने चालत आलं नाही. अस्वल निवांत रस्त्यावर पडलेली गोडगोड जांभळं खात चालु लागलं आम्हीदेखील सुरक्षित अंतर ठेवुन त्याच्यामागे चालायला सुरूवात केली. मी मनसोक्त फोटो व व्हिडीवो काढुन घेतले. दहा-बारा मिनीटं चालुन झाल्यावर अस्वल आमच्याकडे बघुन उजव्याबाजुच्या घनदाट जंगलात शांतपणे निघुन गेल.
image3
अस्वल निघुन गेल्या नंतर आम्ही ते जिथं बसलं होत तिथं गेलो. अस्वलाने तिथं आपल्या धारदार नखांनी वाळवी (White Ant) खाण्यासाठी भलमोठं खड्डं केलेलं होतं.
image4
वाळवी हे अस्वलाच सगळ्यात आवडतं खाद्य. त्याने तिथं वाळवी खाऊन झाल्यावर आपली पाठपण खाजवली होती त्यामुळे खड्यात व आसपास त्याचे केसं पडलेले होते. अस्वलाच इतक्या जवळुन दर्शन झाल्यामुळे आमचा आनंद गगणात मावेनासा झाला होता. थोड्यावेळाने आम्ही सतीचामाळ गावात पोहचलो. वनकर्मचारी व गावकरयांना अस्वलाचे फोटो दाखवल्यावर त्यांनी अस्वलाच्या इतक्या जवळ जाऊन व त्याच्यामागे चालुन देखील त्याने आमच्यावर हल्ला कसकायं नाही केला यावर आश्चर्य व्यक्त केलं. मी त्यांना उत्तर दिलं कि ' कदाचित अस्वलाने ओळखलं असेल कि ही माणसं प्राणी व जंगलावर नितांत प्रेम करणारी आहेत म्हणुन त्याने आमच्यावर हल्ला केला नसावा.' :)

या अस्वल दर्शनानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले अस्वलं खरच माणसांची शत्रू आहेत का ? अस्वलं खरच खुनशी व हिंस्र असतात का? कि माणसाने भितीपोटी उगाचचं त्यांची हिंस्त्र प्रितिमा तयार केली आहे ? जसं साप दिसल्यावर माणसं जमीन धोपटायला सुरूवात करतात मग तो विषारी असो किंवा बिनविषारी....

मी लहान असताना गावोगावी वाघवाले लोकं ( प्राण्यांचे खेळ दाखवुन पैसे कमावणारी जात ) अस्वलं नाचवायचे व त्यांचे नखं व केसं विकुन पैसे कमवायचे. अस्वलाची कलाबाजी बघुन बालगोपाल खुश व्हायचे तर मोठी माणसं त्याची नखं व केसं विकत घ्यायची. ह्या खेळात अस्वलाला प्रचंड वेदना व्हायच्या पण त्याकडे कुणाचचं लक्ष जात नसत. जेव्हा जंगलाच्या आसपास राहणारे लोक गुरं चारण्यासाठी किंवा लाकडं तोडण्यासाठी जंगलात जातं तेव्हा जर त्यांना एखाद्या ठिकाणी अस्वलाची पिल्लं दिसली तर ते वाघवाल्यांना येवुन सांगत. 10-15 वाघवाले लोकं मिळुन त्या ठिकाणी जात व आग लावुन फटाके फोडुन अस्वलाच्या मादीला पळवुन लावतं व पिल्लं घेवुन येत. सहा-सात महिण्यांनंतर दाभण गरम करून त्या पिल्लांच्या नाकात आरपार घुसवुन छिद्र तयार करत व त्यात दोरी घालुन त्यांना वेसन घालत व वर्षभरानंतर त्या पिल्लांचे लोखंड कापायच्या यंत्राने दात कापुन टाकतं. नंतर पिल्लांना हाणुन-मारूण कधी कधी उपाशी ठेवुन त्यांना आपल्या इशारयावर नाचायला व कलाबाजी करायला शिकवत. अशाप्रकारे माणसाने अस्वलांवर प्रचंड अत्याचार केले आहेत. कदाचित या सगळ्यामुळे भितीपोटी अस्वलं माणसांप्रती हिंस्र झाली असावीत. अस्वलं हिंस्त्र असली तरी ती नरभक्षक होणं दुर्मिळ आहे. नशीब आता हे असे अस्वल नाचवायचे खेळ बंद झाले आहेत.

अस्वलाचे माणसावर हल्ले हे पहाटे किंवा तिन्हीसांजेला जास्त होतात कारण एकतर अस्वलाची दृष्टी अधू व कान मंद असतात यामुळे अस्वलाला माणसाचे अस्तीत्व लवकर समजत नाही व अस्वलाच्या काळ्या रंगामुळे अंधुक प्रकाशात माणसाला अस्वल दिसत नाही यामुळे अस्वलाचे हल्ले हे माणसाशी अचानक होणारी भेट यातुन निर्माण झालेल्या भितीमुळे स्वरक्षणासाठी केलेले असतात. नोव्हेंबर-डिसेंबर या कालावधीत अस्वलांच्या हल्ल्यांच प्रमाण जास्त असतं कारण हा काळ अस्वल माद्यांचा विणीचा काळ असतो. आपल्या पिलांच्या संगोपनाच्या संदर्भात माद्या अधिक आक्रामक व दक्ष असतात. पिल्ले असणारया क्षेत्राजवळ माणसं गेल्यास ती चवताळुन हल्ला करते. आपल्या पिलांना कुठलिही हानी पोहचु नये हि वृत्ती प्रत्येक प्राण्यामधे असते. अगदी आपण घरी प्रेमाने पाळलेली कुत्री किंवा मांजर सुद्धा तिला पिल्लं झाल्यावर सुरूवातीचा काही काळ आपल्याला जवळ येवु देत नाही. हे तर जंगली अस्वलं आहे ते कसकाय आपल्याला त्याची पिल्लं असलेल्या क्षेत्रात येवु देईल ? खर तर अस्वलं हि गोंधळी असतात, चालताना आणि भोजन करताना नेहमी काहीतरी आवाज करीत असतात, यामुळे जागरूक असल्यास माणुस अंधारातही अस्वलाचे अस्तीत्व जाणुन घेवु शकतो व अस्वलापासुन दुर जावुन संघर्ष टाळु शकतो.

आपल्याप्रमाणेच जंगली जिवांनादेखील भावना असतात. त्यांनादेखील जगायला जागा हवी आहे. आपल्या भावनांइतकच महत्व जर आपण वन्यजीवांच्या भावनेला दिलं तर माणुस आणि वन्यजीव नक्कीच सुरक्षित व सुखसमृद्धीने राहु शकतील.
image5

मित्रांनो मिपावर पहिल्यांदाचं लिहायचा प्रयत्न केलाय आशा करतो तुम्हाला आवडले असेल. भटकंती दरम्यान तुम्हाला देखील असे वन्यजीवांचे चित्तथरारक अनुभव आले असतील तर नक्की शेअर करा.

प्रतिक्रिया

फेदरवेट साहेब's picture

27 Dec 2016 - 2:34 pm | फेदरवेट साहेब

अल्टिमेट हाय हा लेख अँड द फोटोज , कीप इट अप

रानवेडा सचिन's picture

1 Jan 2017 - 8:09 pm | रानवेडा सचिन

धन्यवाद

एस's picture

27 Dec 2016 - 2:36 pm | एस

चांगला अनुभव.

रानवेडा सचिन's picture

1 Jan 2017 - 8:09 pm | रानवेडा सचिन

धन्यवाद

यशोधरा's picture

27 Dec 2016 - 2:39 pm | यशोधरा

भारी.

रानवेडा सचिन's picture

1 Jan 2017 - 8:10 pm | रानवेडा सचिन

धन्यवाद

वरुण मोहिते's picture

27 Dec 2016 - 2:42 pm | वरुण मोहिते

ह्या प्राण्याबद्दल माहिती कमी आहे . दाजीपूर ला बिबटे पण दिसतात कित्येकदा .वनविभागाचा रेस्ट हाऊस आहे आत . आमचे गावच कोल्हापूर . बघण्यासारखं अभयारण्य आहे .

रानवेडा सचिन's picture

1 Jan 2017 - 8:14 pm | रानवेडा सचिन

धन्यवाद....बिबट्याचं दर्शन थोडक्यात हुकलेल माझं....पुढच्या वेळेस त्याबद्दल लिहीन

सूड's picture

27 Dec 2016 - 2:45 pm | सूड

फोटो दिसेनात.

किसन शिंदे's picture

27 Dec 2016 - 2:49 pm | किसन शिंदे

विलक्षण अनुभव आला तुम्हाला. लिहीत रहा.

रानवेडा सचिन's picture

1 Jan 2017 - 8:15 pm | रानवेडा सचिन

धन्यवाद

पाटीलभाऊ's picture

27 Dec 2016 - 3:05 pm | पाटीलभाऊ

थरारक अनुभव आणि मस्त फोटो
अजुन असेच अनुभव येऊ द्या

रानवेडा सचिन's picture

1 Jan 2017 - 8:16 pm | रानवेडा सचिन

धन्यवाद

पुंबा's picture

27 Dec 2016 - 3:11 pm | पुंबा

उत्तम लेख.. तुमच्या जंगलसफारीबद्दल अजून वाचायला आवडेल.

रानवेडा सचिन's picture

1 Jan 2017 - 8:16 pm | रानवेडा सचिन

धन्यवाद

वन्दना सपकाल's picture

27 Dec 2016 - 3:16 pm | वन्दना सपकाल

अभयारण्याचा चांगली माहिती आणि फोटो पण छान।

रानवेडा सचिन's picture

1 Jan 2017 - 8:17 pm | रानवेडा सचिन

धन्यवाद

उत्कृष्ट. राधानगरी हे अतिशय समृद्ध जंगल आहे. त्या जंगलात रात्रंदिवस भटकण्याचा प्रचंड अनुभव आहे.

हीच फॉरेस्ट विभागाची जनगणना वीस वर्षांपूर्वी तरुणपणी मी पार्टनर न घेता केली होती. तेव्हा शेळप ब्लॉक वाट्याला आला होता. तीन दिवस सतत रात्रंदिवस घनदाट जंगलाच्या मध्यभागी राहणं अन फिरणं हा जगावेगळा अनुभव असतो.

निघण्यापूर्वी वनविभागाने दिलेला जॅम ब्रेड मी खालती वस्तीवरच्या झोपडीघरात दिला आणि त्यांच्या घरची कोरडी भाकर चटणी घेऊन जंगलात शिरलो तो आतच मुक्काम टाकला. पाणवठे शोधले. पानं जमिनीवर पसरुन रातव्याच्या संगतीत रात्री जमिनीवर पसरलो. हातात एक काठी होती फक्त. मी आणि त्या जंगलातली लाकडं, पानं, माती यांत त्या रात्री कणभर फरक नव्हता इतका एकरुपतेचा अनुभव. प्राणी तर दिसलेच दिसले. गवा अंगावरही आला आणि बरंच काही. पण ते रात्री किर्र काळोखात सर्वात दूर अन दाट जंगलात असलेल्या ओढ्याकाठी धरतीवर अंग टाकून जो अनुभव आला तसा केवळ तोच.

शेळप ब्लॉकमधे प्रचंड चढउतार आहेत. वरुन जी काही दृश्यं दिसली अन जे काही अनुभव आले ते कधीच विसरणार नाही. ते उरी घेऊन मी वर जाणार.

बरंच लिहीत बसलोय. पण तुम्ही आठवणी जाग्या केल्यात अन् राहावलं नाही.

असेच भटकत आणि लिहीत रहा. धन्यवाद.

बाय द वे.. गवे मोजण्याला वस्तीवरची माणसं गहू मापणं म्हणतात.. ;-)

तुमचे अनुभव उरी घेऊन वर जाण्याअगोदर इथे शेअर करा, आम्हाला वाचायला नक्कीच आवडतील

रानवेडा सचिन's picture

2 Jan 2017 - 2:02 pm | रानवेडा सचिन

+1

रानवेडा सचिन's picture

2 Jan 2017 - 1:56 pm | रानवेडा सचिन

मी देखील राधानगरीत ही गणना दोनदा एकट्याने जाऊन केली आहे. रात्रीच जंगल अनुभवनं हा जाम भारी अनुभव असतो. सावराई सड्यावर लक्ष्मी तलावाजवळ गव्यांच्या कळपाचे फोटो काढताना जवळच्या झाडीतुन आचानक नर गवा माझ्यासमोर आलेला. माझ्याकडे बघुन त्याने जोरात हांबरून नाकातुन जेव्हा फेस काढला तेव्हा माझी जाम तंतरली होती....आजपेक्षा विसवर्षांपुर्वी राधानगरीच जंगल आधिक समृद्ध होत आणी त्या काळात ह्या जंगलात वाघांच अस्तित्व देखील आधिक होतं त्यामुळे तुम्हाला भारी वन्यजीव दर्शन झालं असणार. तुमचे अनुभव वाचायला खुप आवडेल कृपया तुमचे अनुभव येथे लिहा.

जवळच्या झाडीतुन आचानक नर गवा माझ्यासमोर आलेला.

अगदी अशाच प्रसंगी दाट झाडीतून धावणारा गवा बेसावध अवस्थेत (गव्याची बेसावध अवस्था, गविची नव्हे) अंगावर आला बिथरुन. तेव्हा फॉरेस्टगार्डने सांगून ठेवलेला खच्चून ओरडण्याचा उपाय* कामी आला. गव्याचं धूड दचकून काटकोनात वळून पसार झालं अँड गवि'ज सोल फेल इन युटेन्सिल.

* टीप: उपाय माहीत नसता तरी मी वेगळं काय केलं असतं म्हणा..

एस's picture

3 Jan 2017 - 5:57 am | एस

गवि विरुद्ध गवा या जंगी सामन्यात शेवटी गविंचा गवगवा झाला म्हणायचा! ;-)

सानझरी's picture

27 Dec 2016 - 5:08 pm | सानझरी

झकास लिहीलाय लेख, उत्तम..
दुर्गा भागवतांचं 'अस्वल' हे पुस्तक वाचलं नसेल तर जरूर वाचा.
http://www.bookganga.com/eBooks/Books/details/4912559987288404016?BookNa...

रानवेडा सचिन's picture

2 Jan 2017 - 1:57 pm | रानवेडा सचिन

धन्यवाद

प्रचेतस's picture

27 Dec 2016 - 5:14 pm | प्रचेतस

छान लिहिलंय.
जंगल अनुभवणं म्हणजे सुख असतं.

रानवेडा सचिन's picture

2 Jan 2017 - 2:04 pm | रानवेडा सचिन

धन्यवाद

पैसा's picture

27 Dec 2016 - 5:36 pm | पैसा

लिखाण आवडले. अजून भरपूर अनुभव येऊ द्यात!

रानवेडा सचिन's picture

2 Jan 2017 - 2:26 pm | रानवेडा सचिन

धन्यवाद....हो नक्की

रानवेडा सचिन's picture

2 Jan 2017 - 2:27 pm | रानवेडा सचिन

धन्यवाद....हो नक्की

अजया's picture

27 Dec 2016 - 5:38 pm | अजया

बापरे! थरारक आहे हे.
प्रकाश आमट्यांनी अस्वलाने पूर्ण सोललेल्या माणसाचे वर्णन केले आहे.तुम्ही चांगलेच बचावलात.जंगल फिरणार्या माणसाचे नाक डोळे कान अगदी तीक्ष्ण हवेत!

मग ते काही करत नाही.

रानवेडा सचिन's picture

6 Jan 2017 - 9:27 am | रानवेडा सचिन

नशीब चांगल होत आमचं आणी अस्वल दिसल्यावर इम्रानने घाबरून आरडाआेरड न करता मला सावध केलं, म्हणुन बचावलो.

Nitin Palkar's picture

27 Dec 2016 - 6:11 pm | Nitin Palkar

अस्वलांचे खेळ करणाऱ्यांचा 'वाघवाले' असा उल्लेख तुम्ही केला आहे. त्यांना 'दरवेशी' म्हणतात. माकडांचे खेळ करणारे मदारी तसे अस्वलांचे खेळ करणारे दरवेशी.

रानवेडा सचिन's picture

6 Jan 2017 - 9:29 am | रानवेडा सचिन

आमच्या भागात अस्वलांचा खेळ करणारयांना वाघवाले म्हणतात.

तिकडे नागेश्वरला गेलेलो. उतेकरवाडीतून एकटाच जाणार होतो पण एक गावकरी म्हणाला एकटे जाऊ नका.अजून वाघ आहे. तो बरोबर आला. आता कोयनेतली अस्वलं पाळल्यासारखी झालीत म्हणाला. वनखात्याने जागोजागी पाण्याचे कुंड बांधलेत. तिथे खाणंही ठेवतात. त्यामुळे गप्प असतात.

रानवेडा सचिन's picture

6 Jan 2017 - 9:35 am | रानवेडा सचिन

अस्वलं पाळल्यासारखी होण शक्य नाही.....अस्वलाचा मानवावर हल्ला हा खाण्याच्या कमतरते मुळे नव्हे तर भीतीपोटी होतो.

कंजूस's picture

27 Dec 2016 - 7:45 pm | कंजूस

फोटो आवडले.

रानवेडा सचिन's picture

6 Jan 2017 - 9:35 am | रानवेडा सचिन

धन्यवाद

अल्पिनिस्ते's picture

27 Dec 2016 - 9:06 pm | अल्पिनिस्ते

आम्हाला पण घेउन चला एकदा गणनेला :)

रानवेडा सचिन's picture

6 Jan 2017 - 9:38 am | रानवेडा सचिन

धन्यवाद....गणनेच्या वेळेस कळवेल तुम्हाला.

टवाळ कार्टा's picture

28 Dec 2016 - 10:27 am | टवाळ कार्टा

खत्रा

रानवेडा सचिन's picture

6 Jan 2017 - 9:38 am | रानवेडा सचिन

धन्यवाद

बोका-ए-आझम's picture

28 Dec 2016 - 10:52 am | बोका-ए-आझम

आणि थरारक अनुभव.

रानवेडा सचिन's picture

6 Jan 2017 - 9:39 am | रानवेडा सचिन

धन्यवाद

प्रत्येकाचे आभार मानत नका बसू हो. एकदाच सर्वांचेएकत्र आभार माना.
होतं काय, आम्ही नवीन प्रतिसाद बघून अपेक्षेने धागा उघडतो आणि दर वेळेला तुमचेच आभार दिसतात.

पियुशा's picture

28 Dec 2016 - 12:51 pm | पियुशा

अजुन पण असेच अनुभव असतील तुमच्या गाठीशी, वाचयला आवडतील येउ द्या अजुन :)

रानवेडा सचिन's picture

6 Jan 2017 - 9:40 am | रानवेडा सचिन

धन्यवाद....हो नक्की

इडली डोसा's picture

28 Dec 2016 - 1:10 pm | इडली डोसा

फारच थरारक अनुभव आहे... लेख आवडला.

जंगलातल्या अनुभवांवर अजुन लिहा.

रानवेडा सचिन's picture

6 Jan 2017 - 9:41 am | रानवेडा सचिन

धन्यवाद....नक्की लिहीनार

नरेश माने's picture

28 Dec 2016 - 1:15 pm | नरेश माने

एकदम खतरनाक अनुभव! अजून असतील तर येऊद्या....

रानवेडा सचिन's picture

6 Jan 2017 - 9:42 am | रानवेडा सचिन

धन्यवाद....हो नक्की

शलभ's picture

28 Dec 2016 - 2:15 pm | शलभ

मस्त अनुभव..
२००६-०७ ला आम्ही वासोटा भागात व्याघ्रगणनेत भाग घेतला होता त्यच्या आठवणी जाग्या झाल्या.

रानवेडा सचिन's picture

6 Jan 2017 - 9:46 am | रानवेडा सचिन

धन्यवाद.....तुमचा व्याघ्रगणनेचा अनुभव वाचायला अावडेल. कृपया येथे लिहा.

स्वीट टॉकर's picture

28 Dec 2016 - 4:50 pm | स्वीट टॉकर

तुमचा शेवटचा फोटो पाहून पोटात गोळा आला. तुम्ही नशीबवान आहात आणि धीट देखील!

आपण शहरवासी जंगलात जवळजवळ आंधळे असल्यासारखेच असतो. आपल्याला प्रत्येक गोष्ट उशीराच दिसते.

सिरुसेरि's picture

28 Dec 2016 - 5:53 pm | सिरुसेरि

एकदम खतरनाक अनुभव .+१००

अभिजीत अवलिया's picture

30 Dec 2016 - 11:38 am | अभिजीत अवलिया

मस्त.कसा भाग घ्यायचा ह्या गणन मोहिमेत ?

रातराणी's picture

31 Dec 2016 - 2:52 pm | रातराणी

खरंच नशीबवान आहात!

Marathi pustak premi's picture

1 Jan 2017 - 8:29 pm | Marathi pustak premi

Nice.
Keep it up.

All the nature & jungle lovers ... Must read... Kenneth Anderson & Jim corbett books.

रेवती's picture

2 Jan 2017 - 9:49 am | रेवती

थरारक अनुभव आला आहे.

नंदन's picture

3 Jan 2017 - 6:52 am | नंदन

सुरेख लेख. अजूनही वाचायला आवडेल.

प्रमोद देर्देकर's picture

4 Jan 2017 - 6:34 am | प्रमोद देर्देकर

मस्त अनुभव

लोनली प्लॅनेट's picture

6 Jan 2017 - 12:18 pm | लोनली प्लॅनेट

फार छान अनुभव व तितकेच छान लिखाण वाचून आनंद झाला अस्वलावर झालेले अत्याचार वाचून फार वाईट वाटले
तुमच्यासारखाच प्राणिप्रेमी लोनली प्लॅनेट