अर्थ- शबानाचा... आणि रोहिणीचाही !

आदित्य कोरडे's picture
आदित्य कोरडे in जनातलं, मनातलं
25 Dec 2016 - 8:47 am

आमच्या वडलांना जुने मराठी हिंदी इंग्रजी चित्रपट पाहण्याचा षौक फार. त्याकाळात त्यांनी खास त्यासाठी घरी VCR घेतला होता जेव्हा tv च काय फोनसुद्धा अक्ख्या चाळीत मिळून १-२ घरात असे व तो सार्वजानिक मालकीचा मानला जात असे. ते स्वतः निरनिराळे जुने सिनेमे आणून बघत आणि मलाही दाखवत, त्यांच्यामुळे मला खूप चांगले चांगले सिनेमे बघायला मिळाले .
एकदा त्यांनी असाच " अर्थ" हा महेश भट्ट चा सिनेमा आणला ८ वी मध्ये असेन मी त्यावेळी. सिनेमा बरा वाटला. बाबा म्हणाले,काय कळलं हा सिनेमा पाहुन. मी आपला नेहमी सारखा गाणी चांगली आहेत, शबानाचा अभिनय ग्रेट आहे, स्त्री मुक्ती आणि सक्षमी करण वगैरे क्याय्च्या क्याय बोललो असेल. देशपांडे म्हटले ते ठीक आहे पण खर सांगायचं तर हि कथा जशी पुजाची (शबाना) आहे तशीच ती तिच्या कामवाल्या बाईची पण आहे.( मला वाटतंय तिच्या पात्राला नाव पण नाहीये ह्या सिनेमात किंवा असेल तर आता मला आठवत नाही) मला काहीच कळेना. ते म्हटले बघ शबाना हि एक शिकलेली स्वतः काम करून स्वतःच्या पायावर समर्थ पणे उभी राहू शकणारी बाई आहे पण तिला नवऱ्याचा नाहीतर दुसऱ्या कुणा पुरुषाचा आधार लागतो. ती स्मिता पाटील वर चिडते पण सुरुवातीला तरी ती इंदर (तिचा नवरा कुलभूषण खरबंदा)ला समजावून अगदी गयावया करून परत आणायचं प्रयत्न करते या उलट रोहिणी हट्टन्गडीने साकारलेली कामवाली बाई बघ. ती स्वतः काम करते आणि दारुड्या नवर्याला पोसते.त्याने दुसरी बाई ठेवलेली आहे पण तरी पण त्याला सोडून जात नाही. ती अशिक्षित आहे , अडाणी आहे आणि तरी स्वतःच्या पायावर उभी आहे स्वतः कमावती आहे पण मुक्त नाही.तिच्या सगळ्या आशा तिच्या मुलीवर केंद्रित झाल्या आहेत, तिला शिकवणं मोठ करण स्वतःच्या पायावर उभं करण हे तिच स्वप्न आहे. नवरा तिला मारतो तेव्हा शबाना चकित होते हे असलं काही मी कधी सहन करणार नाही असं म्हणते तेव्हा ती हसते आणि मारणं हा त्याचा म्हणजे नवर्याचा हक्कच आहे असं म्हणते . तेव्हा शबानाचा नवरा तिला अजून सोडून गेलेला नसतो पण जेव्हा तो शबानाला सोडून जातो तेव्हा ती नुसता हा अपमान सहन करत नाही तर अगदी आत्मसन्मान बाजूला ठेवून स्वतःचा संसार वाचवण्याचा प्रयत्न करते. आपण चकित होऊन हा तिचा downfall पाहत असतो, पुढे तिच्या आयुष्यात राजकिरण येतो आपल्याला वाटतं आता हि नवऱ्याला सोडून याच्याबरोबर लग्न करेल. बरोबर ना शेवटी तिच्या कपाळी कुणाच्या न कुणाच्या नावाचं कुंकू लागलं पाहिजेच नाही का? पण तेवढ्यात होतं काय कि रोहिणी हट्टन्गडी तिच्या नवऱ्याचा खून करते आणि तुरुंगात जाताना मुलीला शबानाच्या हवाली करून तिला शिकवायची,स्वतःच्या पायावर उभी राहील अशी समर्थ करायची विनंती करते. हे अस का होते? नवरा मारतो, दुसरा घरोबा करतो हा त्याचा हक्कच आहे म्हणणारी रोहिणी नवऱ्याचा खून का करते? तर तो नवरा तिच्या मुलीच्या शाळेच्या admission साठी जमा केलेले पैसे चोरतो. इथे फार मोठा अर्थ आहे पण तो लपलेला आहे.रोज नवऱ्याचा मार खाणारी आणि तो त्याचा हक्कच आहे असं म्हणणारी बाई १०००-१२०० रुपयांकरिता त्याचा खून कसा काय करते? प्रश्न हजार रुपयांचा नाही तर ती कोणत्या गोष्टीला जीवन मरणाचा प्रश्न मानते, कसल्या गोष्टीवर तिच्या आयुष्याचा डोलारा उभा आहे ? कोणता प्रश्न तिच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे ? यावर अवलंबून आहे. रोहिणी ने साकारलेली कामवाली बाई हे अत्यंत सशक्त स्त्रीचे पात्र आहे. ती स्वतःच्या पायावर उभी तर आहेच पण आपण कशाकरता जगतो आहोत आणि आपल्या आयुष्याचे ध्येय काय आहे याची तिला स्पष्ट कल्पना आहे. तिथे ती कोणतीही तडजोड करत नाही बाकीच्या गोष्टींनी तिला फरक पडत नाही, रोजच नवऱ्याचा मार खाणारी बाई ते आपलं प्राक्तन म्हणून स्वीकारते पण मुलीच्या भविष्याला तो नख लाऊ पाहतोय असा तिला नुसता संशय आल्यावर त्याला या जगातून उठवायला कमी करत नाही. खूप शिकलेली शबाना लाचारच असते.
(स्मिता पाटीलच्या कविता बद्दल मुद्दाम इथे लिहित नाही, मला तरी ते पात्र फार बटबटीत वाटलं. स्मिताच्या मला आवडलेल्या कामात हा चित्रपट येत नाही, अनेक ठिकाणी स्मिता आणि शबानाच्या कामाची तारीफ आणि तुलना करणारी परीक्षण मी वाचली पण रोहिणीच्या कामवालीचा तर बऱ्याच जणांनी उल्लेखहि केला नाही)
शिक्षण माणसाला निर्भय बनवते असे म्हणतात पण मग शिकलेली माणसे अशी लाचार का दिसतात? सुशिक्षित स्त्रिया नोकरी करून सासर कडच्यांची गुलामी का करतात? माझी एक नातेवाईक M. Pharm झालीये. पण ती अनेक वर्ष कॉलेजमध्ये २५००० रु पगारावर सही करून, आणि हातात १२००० पगार घेऊन नोकरी करत होती. तिच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती म्हणून तिला नाईलाजाने असे करावे लागत होते असे काही नाही. पण मग हि लाचारी का? शिक्षणाने निर्भयता का येत नाही? या सारखे अवघड प्रश्न विचारून,आधुनिक काळात वावरणाऱ्या पण मनाने गतानुगतिकच असलेल्या स्त्रियांच्या सद्यस्थितीवर एक उदास कवडसा टाकून सिनेमा संपतो .
मुक्त रोहिणी नाहीच पण मुक्त शबानाही नाही, आजही,अजून तरी …

-आदित्य

चित्रपटसमीक्षा

प्रतिक्रिया

पैसा's picture

25 Dec 2016 - 9:36 am | पैसा

छान लिहिलंय. स्मिता पाटीलचं काम भडक वाटलं असेल पण ते खर्‍या आयुष्यावर आधारित आहे आणि तिने जशी आवश्यकता होती तसेच रंगवले आहे. स्मिता आणि शबाना दोघीही खर्‍या आयुष्यात दुसरी पत्नी म्हणून जगल्या. याला काय म्हणावे!

नगरीनिरंजन's picture

25 Dec 2016 - 9:58 am | नगरीनिरंजन

कोण आहे मुक्त आणि निर्भय? मी मुक्त आणि निर्भय नाही हे कबूल करणेसुद्धा शिकलेल्या लोकांना जड जाते.
लेख आवडला; पण शबानाने संसार सावरण्यासाठी प्रयत्न करण्यामागे कसले भय आहे ह्यावरही थोडे चिंतन हवे होते. जनुकीय प्रेरणा, सर्वमान्य सुखाच्या कल्पना आणि चारचौघांसारखं असण्याची, चौकटीत फिट होण्याची आस आणि त्यातून निर्माण झालेली सिस्टिमॅटिक मानसिक बंधने व त्या बंधनांचा फायदा उचलणारी सिस्टीम तोडण्यासाठी आपण घेतो ते शिक्षण उपयोगी आहे का? की उलट त्या शिक्षणातून ही बंधने बळकट होतात? की त्या बंधनांपोटीच हे शिक्षण घेतले जाते?
अजून जरा मुळाशी जाणारे लिहिण्यासाठी शुभेच्छा!

आपण देशपांड्यांचे पाचवर गरागरा फिरणारे फॅन आहोत. लेख पण आवडला. छान आहे. मला रोहिणीताईंबरोबर काम करायची संधी मिळाली होती. त्यांना स्वतःलाही ही भूमिका आवडते. त्यांनी त्याची तुलना 'एकच प्याला' मधल्या गीताच्या व्यक्तिरेखेशी केल्याचं आठवतंय.

एस's picture

25 Dec 2016 - 6:20 pm | एस

लेख आवडला.

पद्मावति's picture

25 Dec 2016 - 6:21 pm | पद्मावति

+१

ज्योति अळवणी's picture

26 Dec 2016 - 9:19 pm | ज्योति अळवणी

लेख खूप सुंदर लिहिला आहे. रोहिणी हट्टंगडी यांचं काम अप्रतिम आहे. मी देखील हा सिनेमा लहानपणी बघितला होता. तेव्हासुद्धा कामवालीच पात्र मनाला स्पर्शून गेलं होतं. पण का ते आत्ता तुमचा लेख वाचल्यावर लक्षात आलं. मात्र शबानाने आपला संसार वाचवायचा प्रयत्न करणं देखील संयुक्तिक आहे. हा सिनेमा बराच जुना आहे. त्याकाळातील स्त्रियांची मानसिकता दबून राहण्याचीच होती... किंबहुना आजही आहे! स्मिता पाटील यांचा अभिनय त्या पात्राला न्याय देतो हे मान्य करायलाच हवं

अनुप ढेरे's picture

27 Dec 2016 - 10:33 am | अनुप ढेरे

खूप छान लिहिलय!

रोहिणी हट्टंगडींबद्दल वाचुन मला आमच्या कामवालीचं आणि बायकोचं बोलणं आठवलं. नवरा मारतो, काम करत नाही, दारू पितो, कुणाची तरी गाडी घेऊन गेला आणि अ‍ॅक्सिडेंट करुन आला, त्या झालेल्या नुकसानीची भरपाई हिने लोकांकडुन उसने पैसे घेऊन केली. तिच्या माहेरची लोकं तिला घरी येऊन रहा असं सांगतात. पण हिचं म्हणणं तेच आहे, कितिही केलं तरी नवरा आहे तो, असं वागणारच.

कामवाली २५ वर्षांचीही नसेल, २ मुलांची आई आहे. सासूने ७-८ खोल्या नेरुळ मध्ये भाड्याने दिल्या आहेत पण मुलगा दारू पितो म्हणुन आई त्याला काहीच हिस्सा देत नाही.

सांगायचा उद्देश हाच होता की अर्थ १९८२ मध्ये आला, आणी आज डिसें. २०१६ सुरु आहे, तरीही परिस्थितित फरक नाही.

स्वीट टॉकर's picture

29 Dec 2016 - 3:09 pm | स्वीट टॉकर

परीक्षण मी वाचली पण रोहिणीच्या कामवालीचा तर बऱ्याच जणांनी उल्लेखहि केला नाही>>
मला देखील रोहिणी हतंगडींची कामवाली आठवत नाही. अतिशय महत्वाच्या पैलूवर प्रकाश टाकल्याबद्दल धन्यवाद. सिनेमा पुन्हा पाहायला हवा.

शान्तिप्रिय's picture

29 Dec 2016 - 5:29 pm | शान्तिप्रिय

मी पाहिला नाही आहे हा चित्रपट
परन्तु हा सुन्दर लेख वाचल्यावर जरुर पाहायला हवा.

गामा पैलवान's picture

29 Dec 2016 - 9:25 pm | गामा पैलवान

ADITYA KORDE,

परीक्षण आवडलं. कामवालीची व्यक्तिरेखा आणि पात्र सशक्त दिसतंय.

तुम्ही विचारलेला हा प्रश्न विचारचक्रास चालना देऊन गेला :

शिक्षण माणसाला निर्भय बनवते असे म्हणतात पण मग शिकलेली माणसे अशी लाचार का दिसतात?

थोडक्यात उत्तर असं की, शबानाचं शिक्षण एक स्त्री म्हणून तिच्यात असलेल्या सामर्थ्याची तिला जाणीव करवून देत नाही. या शिक्षणात माणसाला निर्भय बनवण्याची तरतूद नाही. हे शिक्षण क्लार्क लोकं पैदा करण्यासाठी उत्पन्न झालेलं आहे. क्लार्क नेहमीच परावलंबी असतो.

आ.न.,
-गा.पै.