कॅशलेस

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture
डॉ. सुधीर राजार... in जनातलं, मनातलं
5 Dec 2016 - 5:25 pm

‘देशभक्‍ताची व्याख्या’ या ब्लॉगचा ताजा कलम:

- डॉ. सुधीर रा. देवरे

1975-77 च्या आसपासचा काळ. तेव्हाही माझ्या लहानपणी आमचं गाव बर्‍यापैकी कॅशलेस होतं. दुकानात कोणाला काही घ्यायला जायचं असलं की घरातलं धान्य- बाजरी, गहू, नागली, हरभरा, मका असं दुकानात घेऊन जायचं. दुकानदार तो त्याच्या मापाने मोजायचा. माप भरून भरपूर धान्य खाली पडू द्यायचा. आणि त्याच्या हिशोबाने सांगायचा, ‘इतके इतके पैसे झाले. काय देऊ?’ मग रोज लागणार्‍या जिनसा गुळ, दाळ, चहा, साखर, तेल असं थोडं थोडं खरेदी करायचं. हिशोब जास्त व्हायला लागला तर काही वस्तू दुकानदाराला परत करून घरी यायचं.
शेतात सालदार ठरवायचा तोही कॅशलेस. वर्षाचे दोन पोते बाजरी, दोन पोते गहू, शेतात रहायला झ्याप, आखाजी दिवाळीला घरादारासह सगळ्यांना कपडेलत्ते. शेतीसाठी अवजारं तयार करून देणार्‍या सुतारालाही वर्षभराचे धान्य ठरवलं जायचं. याच पध्दतीने लोहार, शिंपी, न्हावी अशा बारा बलुतेदारांना धान्य दिलं जायचं. मागायला येणार्‍या भिक्षुकांनाही धान्यच दिलं जायचं.
चावडी जवळ काही कोकणा बाया बोरं, करवंदं, शिताफळं, आवळा अशी फळं ‍ विकायला बसाचची. ही फळं कांद्यांच्या बदल्यातही मिळायची. चार पाच कांदे देऊन दोन चार फळं मिळायची. आपल्याला प्रश्न पडला असेल की हे सर्व सांगण्याचं कारण काय? काल गावागडचा विद्यार्थी आला. त्याला म्हटलं, ‘गावात व्यवहार कसे होताहेत? लोकांकडे पैसे आहेत का?’ तो म्हणाला, ‘हातात चालणारे पैसे नाहीत म्हणून लोक धान्याच्या बदल्यात वस्तू खरेदी करताहेत.’
पुन्हा जुन्या पध्दतीने व्यवहार सुरू झाले. लोक घरातले धान्य दुकानात देऊन किराणा आणायला लागले. बॅक टू नेचर. बॅक टू प्रिमिटीव्ह. पूर्वी ग्रामीण भाग असाच कॅशलेस व्यवहार करत होता आणि आता ते दिवस पुन्हा आले पहा. या धान्याचं मूल्य बाजारभावानेच असतं की नाही याचा विचार ग्रामीण अशिक्षित लोक करत नाहीत. आपली नड भागण्याशी मतलब. म्हणून ही प्रगती का अधोगती असं कोणी विचारू नये!
(‘देशभक्‍ताची व्याख्या’ या ब्लॉगचा ताजा कलम. ब्लॉगचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)
– डॉ. सुधीर रा. देवरे
इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

वाङ्मयविचार

प्रतिक्रिया

असंका's picture

5 Dec 2016 - 8:20 pm | असंका

चांगलंय.

धन्यवाद.

श्रीगुरुजी's picture

5 Dec 2016 - 9:12 pm | श्रीगुरुजी

म्हणून ही प्रगती का अधोगती असं कोणी विचारू नये!

तुम्ही पण विचारू नका.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

6 Dec 2016 - 5:27 pm | डॉ. सुधीर राजार...

धन्यवाद

अमर विश्वास's picture

6 Dec 2016 - 5:42 pm | अमर विश्वास

हे कुठले गाव ? जरा अधिक माहिती द्याल का ?

अशा गावाला भेट द्यायला आवडेल

ज्योति अळवणी's picture

9 Dec 2016 - 12:15 pm | ज्योति अळवणी

खरच योग्य अयोग्य आणि प्रगती अधोगती यापलीकडे जाऊन गरज पूर्ण होत आहेत आणि सुखी आहात ना फक्त याला महत्व असलं की असं होऊ शकत