एक स्वप्न पूर्ण झाले!

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
30 Nov 2016 - 9:20 pm

जगज्जेता मॅग्नुस कार्लसन आणि आव्हानवीर सेर्गे कार्याकिन यांच्यातला जागतिक बुद्धीबळ विजेतेपद सामना नोवेंबर ११ ते ३० दरम्यान न्यू यॉर्क इथे होईल अशी घोषणा फिडेने एप्रिल २०१६ मध्ये केली आणि सामना बॉस्टनपासून तीन तासांच्या अंतरावर होतोय आणि तो प्रत्यक्ष बघायला जाता येणे शक्य आहे या विचाराने माझ्या आनंदाला पारावार उरला नाही! विशी यावेळच्या सामन्यात असता तर 'आनंद' द्विगुणित झाला असता हे खरेच परंतु हेही नसे थोडके!

सामन्याचे ठिकाण आणि संपूर्ण कार्यक्रमाची रुपरेषा प्रसिद्ध होण्यासाठी जवळपास जुलै-ऑगस्ट उजाडला.
वर्ल्ड ट्रेड सेंटरजवळच्या (डब्ल्यूटीसी) फुल्टन मार्केट या ठिकाणी स्पर्धा होणार हे नक्की झाले. न्यू यॉर्कमध्ये याआधीचा सामना गॅरी कास्पारोव आणि विशी आनंद यांच्यात १९९५ साली झाला होता तो वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या १०७ व्या मजल्यावर! (त्या सामन्यात पहिले आठ डाव बरोबरीत सुटल्यावर विशीने खाते उघडले होते परंतु नंतर कास्पारोवने सिसीलियन नॅज्डॉर्फचे खतरनाक हत्यार वापरुन विशीला १०.५ वि ७.५ असा जमीनदोस्त केला होता.)
आता डब्ल्यूटीसी नसल्यामुळे सामन्याचे ठिकाण प्रसिद्ध असणे जितके महत्त्वाचे, तितकेच ते मध्यवर्ती असणेही महत्त्वाचे त्याशिवाय अपेक्षित प्रेक्षकसंख्या मिळणे कठिण. फुल्टन मार्केट डब्ल्यूटीसीच्या जागेपासून चालत दहा मिनिटांवर आहे.

सामन्याचे वेळापत्रक प्रसिद्ध झाल्यावर लक्षात आले की थँक्सगिविंगच्या लांब वीकांताला शनिवारी २६ नोवेंबरला अकरावा डाव खेळला जाणार आहे त्या दिवशीची तिकिटे काढावीत. सामना दुपारी दोन वाजता सुरु होणार असल्याने आदल्याच रात्री न्यू जर्सीत जाऊन बसणे महत्त्वाचे होते. त्याप्रमाणे सर्व व्यवस्था लावली. २५ नोवेंबरला संध्याकाळच्या सुमारास जर्सीत पोचलो. दुसर्‍या दिवशी दुपारी १.१५ वाजता जर्सीतल्या एक्सचेंज प्लेस ह्या स्थानकावरुन पाथची सबवे घेतली आणि दहाच मिनिटात पुढल्या स्टेशनावरती डब्ल्यूटीसीला उतरलो देखील. मोबाईलवरुन दिशादर्शन करत आमचे चिरंजीव गाईड करत होते! दहाच मिनिटात फुल्टन मार्केटला पोचलो.

1

हडसन नदीच्या किनार्‍यावर ही मार्केटप्लेस आहे. पाठीमागे प्रसिद्ध ब्रुक्लिन ब्रिज, मधे हडसन नदी आणि पुढे हे मार्केट असा नयनरम्य देखावा होता. आम्ही १.५० वाजता पोचलो. मोबाईलवरचे तिकिट स्कॅन करुन, बॅगांची सिक्युरिटी तपासणी होऊन, दिलेले कागदी बँड्स मनगटाला बांधून आम्ही वरती हॉलमध्ये शिरलो. वरती जातानाच वेळ छापलेला कागदी चिटोरा हातात दिला होता तो कशासाठी ते वरती गेल्यावर समजले. लोकांनी वेळीच हजेरी लावून जागा पटकावल्या होत्या. डाव सुरु व्हायला साताठ मिनिटे होती. खेळाडू साउंडप्रुफ काचेच्या केबिनमध्ये बसून खेळणार होते शिवाय ही काच केवळ प्रेक्षकांच्या बाजूने पारदर्शी होती हे आंतरजालावरच्या बातम्या वाचून समजले होते त्यामुळे असे वाटत होते की आपल्याला खेळाडू सतत दिसत राहणार आहेत परंतु वरती गेल्यावर समजले की तसे नसून दर १५-२० मिनिटांनी प्रेक्षकांचा एक गट त्या केबिनपाशी सोडणार आहेत आणि तेवढाच वेळ खेळाडू प्रत्यक्ष पाहता येतील, अर्थातच थोडी निराशा झाली. फोटो सुद्धा विनाफ्लॅशच काढायचे, हे मात्र समजण्यासारखे होते. तो वेळ छापलेला कागदाचा चिटोरा होता त्यावेळीच आम्हाला आत सोडणार होते हे आता लक्षात आले.
2
मुख्य हॉलमध्ये ५ ठिकाणी मोठे स्क्रीन्स लावून त्यावरती पट आणि खेळाडू बघता येतील अशी व्यवस्था केली होती. साउंड सिस्टिम अतिशय चांगली होती. हॉलच्या दुसर्‍या बाजूला बरीच टेबले मांडून त्यावर पट आणि सोंगट्या ठेवलेल्या होत्या. तिथे बसून लहान मुले आणि इतर लोक खेळत होते आणि थोडे लोक चालू होणारा डाव त्या पटावर मांडून पुढील खेळ्या कोणत्या असतील ते शोधून काढण्याच्या तयारीत होते. दुसर्‍या बाजूला धावते समालोचन करणार्‍यांची काचेची केबिन होती. त्यात जूडिट पोल्गर (तीच ती हंगेरियन ग्रँडमास्टर) समालोचन करत होती.

3
चेस डॉट कॉम या वेबसाईटने आंतरजालावरती थेट प्रक्षेपण करण्याचे हक्क घेतलेले होते. (या सगळ्यातही आधी वाद झाले. सामन्याचे पुरस्कर्ते रशियाची अ‍ॅगॉन कंपनी आहे. ११ नोवेंबरला सामना सुरु होणार तर त्यांनी ८ तारखेला जाहीर केले की सामना कोणालाच थेट प्रक्षेपित करता येणार नाही फक्त आमच्याकडे ते हक्क राखीव आहेत. झाले न्यायालयाचे दरवाजे ठोठावले गेले. निकाल दिला की असे आयत्यावेळी हक्क राखून ठेवता येणार नाहीत फक्त एक करता येईल की प्रक्षेपण काही मिनिटे उशीरा सुरु करता येईल.) असो.

पहिले आठ डाव बरोबरीत सुटल्यानंतर कार्याकिनने नववा डाव जिंकून कार्लसनच्या तोंडचे पाणी पळवले होते. लगोलग दहावा डाव जिंकून कार्लसनने परतफेड केली. आज अकरावा डाव होता आणि कार्याकिन पांढर्‍या मोहोर्‍यांनी खेळत होता. काय होणार? डाव जिंकून कार्याकिन जगज्जेतेपदाच्या हाताइतक्या अंतरावर जाणार का? का कार्लसन पुन्हा एकदा त्याच्या टॉप फॉर्ममधे येऊन डाव घशात घालणार आणि मुकुट अपराजित राखण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे सरकणार? उत्सुकता शिगेला पोचली होती.
4
तुल्यबळ लढवय्ये आमनेसामने!

कार्याकिन कोणते ओपनिंग खेळणार, मॅग्नुसचे प्रत्युत्तर काय असेल वगैरे अंदाज बांधणे सुरु होते. लोक मोठमोठ्याने आपापसात चर्चा करत होते. 'मॅग्नुस कार्लसन' आणि 'सर्गे कार्याकिन' असे बिल्ले गळ्यात अडकवलेली मंडळी लगबगीने हिंडत होती. व्यवस्थापना पैकी असावीत. १.५८ वाजले. कॅमेर्‍याची नळकांडी सावरत पत्रकारांची फौज दरवाजाच्या दिशेने धावली. त्यांना आत दहा मिनिटे थांबून फोटो काढायची परवानगी होती. दोन्ही खेळाडूंचे वेगवेगळ्या मूडमधले, वेगवेगळ्या कोनातले फोटो टिपण्यासाठी एकच झुंबड उडणार होती.

एवढ्यात पडद्यावर दिसले की कार्याकिन पटासमोर येऊन बसला. सगळ्या सोंगट्या योग्य जागी बसल्या आहेत की नाही त्याने खातरी केली. इतक्यात मॅग्नुसदेखील आला. हस्तांदोलन झाले. त्यानेही सोंगट्या सारख्या केल्या. खेळी लिहायच्या कागदावरती बहुदा त्याने तारीख टाकली असावी आणि तो सज्ज होऊन बसला. कॅमेर्‍यांचा क्लिकक्लिकाट सुरु होता. जवळपास १०० देशांमध्ये आंतरजालीय प्रक्षेपण बघितले जात होते असा अंदाज आहे! विशी आनंद आणि मॅग्नुसच्या चेन्नैच्या सामन्यापासून बुद्धीबळाची जागतिक लोकप्रीयता झपाट्याने वाढीस लागली आणि त्यात आंतरजालाचा फार मोठा वाटा आहे.

कोणत्यातरी प्रसिद्ध व्यक्तीला बोलावून त्या व्यक्तीच्या हस्ते पहिली खेळी करायची असा रिवाज आहे त्यानुसार कोणा मोठ्या व्यक्तीने कार्याकिनसाठी पहिली खेळी केली. पुन्हा एकदा दुसर्‍या डावात खेळल्या गेलेल्या रॉय लोपेझने सुरुवात झाली! समोर पडद्यावरती डाव बघत असताना देखील लोक हातातले स्मार्टफोन्स सोडत नव्हते. तिथेही डाव उघडून बघत लोकांची चर्चा सुरु होती :)
सुरुवातीला आम्हाला उभेच रहायला लागले. साधारण अर्ध्या तासाने लोकांना गटागटाने आत खेळाडूंच्या केबिनकडे सोडायला सुरुवात झाली तसे लोक उठले आणि मग आम्हाला जागा मिळाली. (सवाई गंधर्वला जसे लोक त्यांचे मफलर, कोट, टोप्या टाकून चहा प्यायला जाताना जागा राखून ठेवतात तसेच 'सवाई' इथेही दिसले! :) )
आपण अंदाज वर्तवलेली एखादी खेळी झालेली दिसली की लोकांच्या चर्चांना अगदी उधाण यायचे. खरेतर आपणच चॅलेंजर होणार होतो पण थोडक्यात हुकले राव... अशा थाटात बोलताना लोक ऐकले की मजा वाटे. मानवी स्वभाव सगळीकडे सारखाच.

पहिल्या ३० मिनिटात १५ खेळ्या झाल्या कारण दोघेही त्यांच्या घरच्या तयारीत (होम प्रिपरेशन) मध्ये होते. अठराव्या खेळीला सेर्गे एच३ अशी हत्तीच्या प्याद्याची खेळी खेळला. ही पॅसिव आणि अशक्त खेळी मॅग्नुसच्या पथ्थ्यावर पडली त्याने लगेच त्याचे सी प्यादे तिसर्‍या पट्टीपर्यंत दामटले. सेर्गेने प्यादे मारले. आता मॅग्नुसने तो जगज्जेता का आहे हे दाखवणारी खेळी केली, लगोलग डी४ प्याद्याने सी३ प्यादे न मारता डी स्तंभातलेच मागचे प्यादे डी५ असे रेटले (त्याचं डबल पॉन होतं)! असलेल्या पोझीशनमधून जास्तितजास्त तेल काढणे हा त्याच्या खेळाचा आत्मा आहे!
5

विचारमग्न मॅग्नुस!

२६ व्या खेळीला मॅग्नुसचे ई प्यादे सातव्या घरात आले. सेर्गेचा हत्ती आणि वजीर दोन्ही त्याला आठव्या घरात पोचण्यापासून रोखण्याच्या कामी जुंपले होते. ए५ खेळून मॅग्नुसने क्वीनसाईडला पास पॉन करायचे स्वप्न बघितले परंतु सेर्गेने सी प्यादे हलवून त्याला मोडता घातला. पुढल्या तीन खेळ्यात एकमेकांचे हत्ती मारुन दोघांनी त्यांचे वजीर पटावर ठेवले.
सेर्गेने पर्पेच्युअल चेक (शह) देऊन काळ्या राजाला पकडले. सातव्या घरातले प्यादे बिनजोरी सोडून मॅग्नुसचा वजीर शह थांबवण्यासाठी मधे जाऊ शकत नव्हता कारण सेर्गेच्या वजिराने सातव्या घरातले प्यादे मटकावले असते.
6

डावात पूर्ण बुडालेला सेर्गे!

अशा रीतीने तीन तास आणी चौतीस खेळ्यांनंतर डाव बरोबरीत सुटला. दोघांची गुणसंख्या ५.५ झाली.
सामना थरारक नसला तरी उत्कंठावर्धक नक्कीच झाला. मुख्य म्हणजे जगज्जेता खेळाडू अणि आव्हानवीर प्रत्यक्ष पाहता आले. लगेचच पत्रकार परिषद सुरु झाली.
7

डाव बरोबरीत सुटेल असा अंदाज होता का? असा प्रश्न सेर्गेला विचारला. तो म्हणाला की मी आज आणखीन आक्रमक खेळ करायला हवा होता, माझा डाव तितकासा चांगला झाला नाही. काळ्या मोहोर्‍यांनी खेळताना बरोबरी झाल्याने मॅग्नुस मात्र खुशीत होता.
शेवटल्या बाराव्या डावात तुमची स्ट्रॅटेजी काय असेल असा प्रश्न दोघांना विचारला. लोक असा प्रश्न का विचारतात मला समजत नाही, अरे अशी जाहीररीत्या कोणी स्ट्रॅटेजी सांगेल का? दोघांनीही काहीतरी ठेवणीतली उत्तरे दिली!
फारसे डोकेबाज प्रश्न कोणी विचारले नाहीत. दहा मिनिटात प्रश्न संपले मॅग्नुस लगोलग उठून गेला. सेर्गेला मात्र बोलायला आवडते असे दिसले कारण तो पुढे दहा मिनिटे प्रश्नांना हसतमुखाने उत्तरे देत होता.
8

दोघांच्या सह्या घ्यायचा मानस मात्र पूर्ण होऊ शकला नाही. गिफ्ट शॉपमध्ये हिंडून काही खरेदी करावी म्हणून बघत होतो परंतु वस्तूंच्या किमती भलत्याच जास्त वाटल्याने तो बेत रद्द केला.

तिथून निघण्याच्या तयारीत होतो इतक्यात एकजण सांगत आला की ग्रँडमास्टर मॉरिस अ‍ॅशलेचा सह्यांचा सेशन सुरु झालाय. म्हंटले राजाची नाही तर नाही निदान घोड्याची तरी सही घेऊन जाऊयात! ;) रांगेत उभा राहिलो. मॉरिस बॉडीबिल्डर सुद्धा आहे. त्याचे कमावलेले बायसेप्स आणि ट्रायसेप्स बघून चिरंजीव म्हणाले की "वॉव डॅड, हा वर्कआउट सुद्धा करतो!" ताबडतोब शरीर तंदुरुस्ती बुद्धीबळाला कशी उपयोगी असते वगैरे खास बापाला साजेल असे छोटे लेक्चर मारण्याचा उमाळा आला होता तितक्यात माझा नंबर आल्याने ते राहूनच गेले.

9
बरोबर नेलेल्या लाकडी पटावरती मॉरिसची सही घेतली आणि त्याला धन्यवाद देऊन निघालो.

खाली उतरून बाहेर पडतोय तोच समोर चक्क चक्क फॅबियानो कारुआना उभा!! सध्याचा जागतिक क्रमवारीतला दोन नंबरचा खेळाडू!! त्याचं बोलणं संपायची वाट बघितली. लगोलग पुढे होऊन त्याचे अभिनंदन केले, चेस ऑलिंपियाड जिंकणार्‍या अमेरिकन चमूचा तो सदस्य आहे. फोटो देशील का म्हणून विचारले. आणि त्याच्या बरोबर एक फोटो काढला!!
10

(हा बोनस मात्र भलताच खास आणि मुख्य म्हणजे अनपेक्षित होता!)

आता सात वाजून गेले होते. अंधार पडला होताच शिवाय गार वारेही सुरु झाले होते. परतण्याची घाई होती. समाधानाने डब्ल्यूटीसी स्टेशनकडे वाटचाल सुरु केली.
11
भरपूर दिव्यांनी डब्ल्यूटीसी स्टेशनचा अंतर्भाग सजला होता त्याचे फोटो काढण्याचा मोह अनावर होता.
12
लोक अक्षरशः झुंडीने उभे राहून फोटो, सेल्फी घेत होते.
13
पुढल्या अर्ध्या तासात आम्ही हॉटेलवर परत आलेलो होतो.
अशा रीतीने बर्‍याच महिन्यांचे एक स्वप्न पूर्ण झाले!

-------------------------------
ताजा कलम -

हा लेख प्रकाशित होईपर्यंत सोमवारी २८ तारखेला बारावा डाव बरोबरीत सुटला आहे. आता ६-६ अशी गुणसंख्या आहे. बुधवारी दुपारी दोन वाजता (न्यू यॉर्क प्रमाणवेळ) ४ रॅपिड (२५ मिनिटांचा एक) आणि गरज पडल्यास १० पर्यंत ब्लिट्झ राउंड्स (५ मिनिटांचा एक) खेळले जातील आणि विजेता ठरेल. त्यामुळे उद्याचा दिवस धुमश्चक्री असणार आहे!

https://worldchess.com/nyc2016/
इथे सामना बघता येईल. परंतु बहुतेक पैसे भरावे लागतील.
www.chess.com
इथे आतापर्यंत झालेल्या सगळ्या डावांचे विश्लेषण आहे.

क्रीडालेख

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

30 Nov 2016 - 9:52 pm | प्रचेतस

क्या बात...!

आखों देखा हाल खूप आवडला. भाग्यवान आहात.

ह्या खेपेला मात्र तुमच्या मिपावरील विश्लेषणाची कमतरता भासली.

बाकी पांढरी मोहरी घेऊन सुरुवात करणाऱ्याला ४ मिनिटे व काळी मोहरी असणाऱ्याला ५ मिनिटेभे ब्लिट्झ मधेच असते का ब्लिट्झसुद्धा बरोबरीत सुटल्यावर उरलेल्या टायब्रेकमध्ये?

चतुरंग's picture

30 Nov 2016 - 10:15 pm | चतुरंग

ह्यावेळी डाव ऐन दुपारी दोन वाजता सुरु होत आहेत त्यावेळी हाफिसात असल्याने काहीच शक्य नाही.
याआधी एकतर अगदी पहाटे किंवा रात्रीचे सामने होते त्यामुळे समालोचन शक्य झाले.

रॅपिड आणि ब्लिट्झ डावांनंतर होतो तो आर्मागेडॉन (सडन डेथ) यात पांढर्‍याला ५ मिनिटे मिळतात परंतु डाव जिंकावाच लागतो. काळ्याला ४ मिनिटे मिळतात परंतु डाव बरोबरीत सोडवला तरी काळ्याला विजेता घोषित केले जाते! :)

प्रचेतस's picture

30 Nov 2016 - 10:43 pm | प्रचेतस

राईट. आर्मागेडॉनच. हेच नाव आठवत होतो पण ब्लिट्झ आणि ह्यात गल्लत होत होती.

तुमच्या मते आर्मागेडॉनच्या ह्या पद्धतीत कुणाला अधिक संधी असते का ह्या पद्धतीने टेक्निकली दोघे खेळाडू एकाच पातळीवर येतात आणि मुख्य म्हणजे पांढरी मोहरी कुणाची ह्याचा निर्णय कसा घेतला जातो?

याचाच अर्थ खेळाडू तुल्यबळ आहेत. रॅपिड आणि ब्लिट्झ मध्ये सुद्धा बरेच डाव बरोबरीत असले तर बरोबरी व्हायची शक्यता अधिक असते त्यामुळे काळ्याला संधी किंचित जास्त असते. परंतु वेळाचा विचार केला तर २०% वेळ कमी मिळतो त्यामुळे काही सेकंदांना एक मूव अशा वेगाने खेळताना ३० सेकंदापेक्षा कमी वेळ राहिला की चुका व्हायची शक्यता अधिक!

ह्या खेपेला मात्र तुमच्या मिपावरील विश्लेषणाची कमतरता भासली.

तुमचा लेख नाहीतर समजलेच नाही स्पर्धा चालू झाल्याचे. नंतर बातम्यांवरून समजले.
लेख मस्तच.

पिलीयन रायडर's picture

30 Nov 2016 - 10:01 pm | पिलीयन रायडर

मस्तच हो!! तुम्हाला एवढं तुमच्या आवडीच्या गोष्टीतलं काही पहायला मिळालं, हे पाहुन मलाच आनंद झालाय!

चतुरंग's picture

30 Nov 2016 - 10:17 pm | चतुरंग

श्रियुत पिरा यांनी दिलेल्या मेट्रोपासमुळे आणि अचूक मार्गदर्शनामुळे पाथचा प्रवास सुरळित झाला आणि आम्ही वेळेत सामन्याच्या ठिकाणी पोचू शकलो. त्यांना धन्यवाद कळवा!

पिलीयन रायडर's picture

1 Dec 2016 - 2:17 am | पिलीयन रायडर

नक्कीच! :)

तुम्हाला एवढं तुमच्या आवडीच्या गोष्टीतलं काही पहायला मिळालं, हे पाहुन मलाच आनंद झालाय!

+१११११११११

आदूबाळ's picture

30 Nov 2016 - 10:02 pm | आदूबाळ

झकास!

पहिले आठ डाव बरोबरीत सुटल्यानंतर कार्याकिनने नववा डाव जिंकून कार्लसनच्या तोंडचे पाणी पळवले होते.

कार्याकिन आठवा डाव जिंकला ना?

कार्याकिनने आठवा आणि कार्लसनने दहावा डाव जिंकला!
(कास्पारोव-आनंद सामन्यात आठ डाव बरोबरी झाल्यावर नववा आनंदने आणि लगेच दहावा कास्पारोवने जिंकला होता.)

रुस्तम's picture

30 Nov 2016 - 10:14 pm | रुस्तम

World Chess Championship २०१६ सुरु आहे आणि तुमचा धागा अजून आला कसा नाही हाच प्रश्न पडला होता.

@आदूबाळ हो कार्याकिन आठवा डाव जिंकला.

खटपट्या's picture

30 Nov 2016 - 10:48 pm | खटपट्या

आवडला धागा आणि फोटो. पण चिंग्याचा एक पण फोटो नाही...

चतुरंग's picture

30 Nov 2016 - 10:54 pm | चतुरंग

एकतरी फोटो काढतो म्हणून मागे लागलो होतो, पण नाहीच काढू दिलान....

खटपट्या's picture

1 Dec 2016 - 4:23 am | खटपट्या

ओके

रेवती's picture

1 Dec 2016 - 12:59 am | रेवती

फोटो आवडले. पहिल्यांदाच पाहिले. वृत्तांत ऐकला होता. वाचायलाही आवडला.
इतके दिवस मनात हाच प्रश्न यायचा की बरेच लोक आजूबाजूला असताना हे प्लेअर्स फोकस कसे करू शकणार? त्यांना बंद खोलीत बसवलय हे बरं केलं.

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Dec 2016 - 2:31 am | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं वर्णन. बुद्धिबळात फार बुद्धी नसलेल्यालाही रोचक वाटेल !

मिपावर बुद्धिबळ = चतुरंग हे समिकरण पक्के झाले आहे.

नंदन's picture

1 Dec 2016 - 3:33 am | नंदन

मस्त वृत्तांत! 'काशीस जावे नित्य वदावे' म्हणतात, तसा एखाद्या आवडत्या गोष्टीचा घेतलेला ध्यास आणि ती प्रत्यक्षात उतरल्यावर झालेला आनंद लेखातून जाणवतो. फोटोही छान आलेत.

मिहिर's picture

1 Dec 2016 - 5:01 am | मिहिर

खूपच छान.

संजय पाटिल's picture

1 Dec 2016 - 10:54 am | संजय पाटिल

मस्त वृत्तांत! आणि फोटो पण छान.

पाटीलभाऊ's picture

1 Dec 2016 - 1:07 pm | पाटीलभाऊ

छान फोटो

स्वीट टॉकर's picture

1 Dec 2016 - 2:08 pm | स्वीट टॉकर

अन् फॅबियानो कारुआनाच्या खांद्याला खांदा लावून उभं राहायला मिळालं! आमची जळजळ होतिये राव!

वर मजा म्हणजे तुमच्याबरोबर फोटो काढायला मिळाल्यामुळे फॅबियानोच जास्त खूष आहे असं फोटोत दिसतंय! ;)

चार रॅपिड डावातले १ व २ बरोबरीत सुटले. ३ आणि ४ मधे मॅग्नुसने असा काही खारनाक खेळ केलाय की बास!
२ नंबरच्या डावातच कार्याकिन हरायला आला होता. मॅग्नुसचे दोन उंट आणि राजा अधिक तीन प्यादी विरुद्ध एक हत्ती, राजा आणि तीन प्यादी असा सामना होता. कार्याकिनच्या राजाला पार कोपच्यात गाठून उंटांनी साठमारी चालवली होती.
शेवटी एका भन्नाट काँबिनेशने कार्याकिनने स्वतःवरती स्टेलमेट करवून घेतलीन पण डाव गमावण्यापासून वाचवला! अत्त्युत्तम बचावाचा तो वस्तुपाठ होता. त्यानंतर मॅग्नुस स्वतःवरतीच कमालीचा भडकला होता. पुढचे दोन डाव तो तुफान आक्रमक खेळला आणि दोन्ही डाव कार्याकिनला मान वर करायला देखील उसंत न देता त्याने चीतपट मारले. शेवट्चा चौथा डाव तर भन्नाट कॉम्बिनेशने चेकमेट केलान! __/\__
काल मॅग्नुसचा वाढदिवस होता. स्वतःला जगज्जेतेपदाची भेट दिलीन त्याने!
अभिनंदन मॅग्नुस!!

1

प्रचेतस's picture

1 Dec 2016 - 5:42 pm | प्रचेतस

भारी.
मॅग्नसला सध्या हरवणं कुणालाही अशक्यप्राय दिसत आहे.

ज्ञानोबाचे पैजार's picture

1 Dec 2016 - 5:16 pm | ज्ञानोबाचे पैजार

फारच मजा आली वाचताना. तुमचे बुध्दिबळावरचे प्रेम आणि अभ्यास शब्दा शब्दात जाणवतो आहे.
फोटो सुध्दा सढळ हाताने टाकले आहेत.
असेच भरभरुन लिहीत रहा.
पैजारबुवा,

मराठी कथालेखक's picture

1 Dec 2016 - 5:26 pm | मराठी कथालेखक

खेळाडू साउंडप्रुफ काचेच्या केबिनमध्ये बसून खेळणार होते

अरेरे.. म्हणजे चिअरींग वगैरेची मजा नाही का ? चिअरगर्ल्सपण नाहीत ... अशाने कसं मिळणार ग्लॅमर या खेळाला :)

पैसा's picture

1 Dec 2016 - 5:34 pm | पैसा

वृत्तांत आवडला!

अनन्न्या's picture

1 Dec 2016 - 5:36 pm | अनन्न्या

फोटोपण झकास!

अजया's picture

1 Dec 2016 - 5:48 pm | अजया

मस्त वृत्तांत.

चतुरंगजी - मजा आली वाचताना आणि थोडा हेवा पण वाटला तुमचा.

मदनबाण's picture

1 Dec 2016 - 7:03 pm | मदनबाण

वॄतांत आणि फोटो आवडले ! :) बियानो कारुआना बरोबरचा आपला फोटो विशेष आवडला ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तेरे गीतों कि में दिवानी...ओ दिलबर जानी.तुने कही और मैंने मानी...ओ दिलबर जानी. :- Prem Geet

विशाल कुलकर्णी's picture

2 Dec 2016 - 4:22 pm | विशाल कुलकर्णी

क्या बात है..
लकी यू !

संजय क्षीरसागर's picture

2 Dec 2016 - 11:45 pm | संजय क्षीरसागर

.