मक्केतील उठाव ३

हुप्प्या's picture
हुप्प्या in जनातलं, मनातलं
10 Oct 2016 - 5:28 am

मक्केतील उठाव १
मक्केतील उठाव २

२० नोव्हेंबरला मक्केचा ताबा अतिरेक्यांनी घेतला. पण सौदी सरकारने फार काही प्रतिकार केला नाही. त्यांचे सगळे उच्चपदस्थ राजपुत्र ट्युनिशिया, मोरक्को अशा जागी कुठल्याशा बैठकांकरता वा सुट्टीकरता गेलेले होते. सौदी राजा म्हातारा होता. काही ना काही तब्येतीच्या तक्रारीमुळे त्रासलेला होता. हळूहळू एक दोन दिवसांनी गृहमंत्री, सुरक्षामंत्री अशी पदे संभाळणारे लोक एकदाचे सौदी अरेबियात दाखल झाले. तमाम माध्यमांवर सौदी घराण्याची पोलादी पकड असल्यामुळे असे काही घडले आहे ह्याची कुठलीही बातमी बाहेर गेलेली नव्हती. सगळे काही आलबेल आहे असेच सांगितले जात होते. इंटरनेट, फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप असले काही अस्तित्त्वात नसल्यामुळे मक्केतील लोकांना काही गडबड असल्याचे जाणवले तरी ते बाहेर पोचवता आले नाही. सौदी अरेबियाने सगळे फोनही बंद केले.
जेद्दाच्या अमेरिकेच्या वकिलातीतले फोनही बंद पडले. त्यांनी आसपासच्या वकिलातीत चौकशी केली तर त्यांचेही फोन बंद असल्याचे कळले. मग थोडी संशयाची पाल चुकचुकली. वकिलातीतील कुणाला तरी असे कळले की मदिना शहरातील प्रेषिताची मशिद जी मक्केच्या खालोखाल आदराचे स्थान मानले जाते ती मशीद कडेकोट बंदोबस्ताने बंद करुन टाकली आहे. मग तो संशय अधिकच बळावला. त्यावेळेस अमेरिकेचा सौदी अरेबियातील राजदूत होता जॉन वेस्ट आणि त्यावेळ्चा राष्ट्रपती होता जिमी कार्टर. वकिलातीतल्या एका अरबी भाषेतील पारंगत अमेरिकन अधिकार्‍याने एका येमेनी माणसाकडून असे ऐकले की मक्केच्या मशीदीत गोळीबार झाला. पण जेव्हा त्यांनी सौदी अरेबियाच्या अधिकार्‍यांना विचारले त्यांना साफ उडवून लावले. असे काही झालेलेच नाही वगैरे सांगितले गेले. त्यात काही विसंगतीही होत्या. एक म्हणाला "काही नाही, हा सैन्याचा सराव चालू आहे". तर दुसरा म्हणाला "टायफॉईडची मोठी साथ आली आहे तिकडे!". काहीतरी गडबड आहे हे अमेरिकन सरकारला जाणवले.

दूतावासातील सगळे बिगर मुस्लिम असल्यामुळे मक्का वा मदिना शहरात जाऊन शहानिशा करणे शक्य नव्हते कारण ह्या शहरात मुस्लिम सोडून कुणालाही प्रवेश निषिद्ध आहे.

मग त्या अरबी भाषा जाणणार्‍या अमेरिकन अधिकार्याला एक गूढ फोन आला. (दूतावासाने अरबांच्या नकळत अशी एक फोन लाईन बसवून घेतली होती जी त्यांच्या फोन ब्लॅकआऊटच्या तावडीतून वाचली होती.)
"तू मला ओळखत नाहीस पण मी तुला ओळखतो." ती व्यक्ती म्हणाली. त्याने गुप्तपणे अमुक एक जागी भेटण्याची मागणी केली. ह्या अधिकार्‍याने (त्याचे नाव हँब्ली) ती मान्य केली. ही व्यक्ती हँब्लीचा लांबचा भाऊ निघाला. हा भाऊ व्हिएटनामच्या युद्धात पायलट होता. युध्द संपल्यावर नोकरीच्या शोधात तो सौदी अरेबियात नागरी विमानचालक (खरे तर हेलिकॉप्टर चालक) म्हणून कामाला लागला. भरपूर पगार होता. आणि मुस्लिम पायलटचा तुटवडा होता. एक अत्यंत सोपा धर्मांतराचा सोहळा करुन त्याला मुस्लिम बनवले आणि तो कामाला लागला. मंगळवारी २० नोव्हेम्बरला त्याला एक अत्यंत तातडीचा फोन आला. गृहखात्याच्या अधिकार्यांना मक्केच्या जवळ मीना नावाचे उपनगर आहे तिथे टेहळणीकरता हेलिकॉप्टर लागणार आहे. ठरल्याप्रमाणे त्यांनी उड्डाण केले. पायलटला शाही मशीदीजवळ जायला सांगितले. तिथे अगदी खाली नेऊन अधिकारी लोक टेहळणी करू लागले. मशीदीच्या मोकळ्या आवारात हजारो भाविक पायलटला दिसले. मशिदीच्या थोडे जास्त जवळ जायचा प्रयत्न करताच रायफल कडाडल्या. तात्काळ पायलटने योग्य त्या हालचाली करुन हेलिकॉप्टर उंचावर नेले. आता त्या मशिदीच्या मोकळ्या भागात सामसूम झाली होती. त्या पायलटने तेही मनात नोंदवले. सौदी अधिकार्याने पायलटला सांगितले की काही इराणी लोकांनी मक्केची मशीद बळकावलेली आहे.

हँबलीशी भेट झाल्यावर पायलटने ही सगळी हकीकत त्याला कळवली. हे सगळे अत्यंत गुप्त ठेवण्याची कळकळीची विनंतीही केली. हँबलीने काही उच्चपदस्थ लोकांना हे कळवले. त्याही वेळेस इराणशी अमेरिकेचे राजकीय संबंध अस्तित्त्वात होते. त्यामुळे त्यांनी इराणच्या अधिकार्‍यांना विचारले. इराणच्या लोकांनी आम्ही असे काही केले आहे ह्याचा साफ इन्कार केला.

१९७९ हे वर्ष तसे जागतिक उलथापालथीचे होते. नुकतेच इराणमधे शहाला पदच्युत करुन खोमेनीने इस्लामी राजवट आणली होती. १९७९ नोव्हेंबरच्या सुरवातीला इराणच्या अमेरिकन दूतावासावर हल्ला करून तिथले ५२ अधिकारी ओलिस ठेवलेले होते. कार्टर प्रशासनाची ती एक मोठी डोकेदुखी बनलेली होती. पाकिस्तानात झियाने लष्करी राजवट आणलेली होती. पाकिस्तान हा एक इस्लामी देश आहे आणि त्याचा कारभार शरियत, कुराण ह्याला प्रमाण मानूनच केला पाहिजे असे फर्मान काढले होते. त्यानुसार जाहीर फटके, शिरच्छेद, हातपाय कापणे अशा शिक्षाही अमलात आणल्या जाऊ लागल्या होत्या. त्यामुळे तो देशही त्या उन्मादात होता.

सौदी अरेबियाच्या बातम्यांच्या ब्लॅकआऊट तंत्रामुळे आणि असल्या त्रोटक माहितीमुळे आणि शिवाय इराणविरुद्ध वातावरण तापलेले असल्यामुळे अमेरिकेचा तसा समज झाला. कुठल्यातरी मोठ्या वर्तमानपत्रात इराणने मक्केचा ताबा घेतल्याची एक बातमीही प्रकाशित झाली. इराणने ह्या बातमीचे तात्काळ खंडन केले आणि उलटा वार केला. की ज्यू लोक आणि अमेरिकन ह्यांचा हा कावा आहे. त्यांनीच मक्केवर हल्ला करून ती ताब्यात घेतली आहे.
ही बातमी पाकिस्तानात गेली आणि मोठी दंगल झाली. हजारो शस्त्रसज्ज लोकांचा जमाव इस्लामाबादेतील अमेरिकन दूतावासावर चालून गेला. पहिल्यांदा पाकिस्तानी पोलिसांनी गोळीबार केला त्यात एक पाकिस्तानी मारला गेला. त्याला अमेरिकन लोकांनीच मारला आणि आणखी काही पाकिस्तानी त्यांनी ओलिस ठेवल्याची अफवा उठली आणि जमाव अत्यंत हिंसक झाला. सगळे दूतावासातील लोक एका सुरक्षित कक्षात गेले. त्यातील संरक्षक दलाने उलटा गोळीबार करण्याची परवानगी मागितली पण अमेरिकेतील मंत्रालयाने ती नाकारली. सगळे लोक त्या सुरक्षा कक्षात जीव मुठीत धरून होते. बाहेरून गोळीबार, पेट्रोल बाँब फेकणे चालू होते. धूर आणि उष्णता ह्यामुळे लोक गुदमरून वा होरपळून मरतील की काय अशी परिस्थिती उद्भवली. उच्चपदस्थांनी झियाशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण झियाने दाद दिली नाही. खुद्द कार्टरने केलेला फोन त्याचेही उत्तर दिले नाही. सुदैवाने काही काळाने हे पिसाट आंदोलक थंडावले आणि दूतावासातील लोक सुटले. पण चार सहा लोक मारले गेलेच. झियाने नंतर कधीतरी तोंडदेखली क्षमा मागितली आणि ह्या भयंकर हल्ल्यावर पडदा पाडला. ह्या प्रकारामुळे कार्टरबद्दल सगळ्या दूतावासाचे मत अत्यंत प्रतिकूल झाले. आणि एकंदरीत कार्टरच्या नेभळटपणामुळे आणि निष्क्रियतेमुळे त्याला चार वर्षातच गाशा गुंडाळून पराभव स्वीकारावा लागला. १९८८ मधे झियाचा संशयास्पद अपघाती मृत्यु झाला त्यामागे दूतावासावर झालेल्या हल्ल्याकडे त्याने केलेले दुर्लक्ष हेही कारण असू शकेल.

तिकडे सौदी अरेबियात हल्ल्याबद्दल आणीबाणीची चर्चा चालू होती. एक मुख्य अडथळा हा धार्मिक नेत्यांचा होता. त्या परमपवित्र मशिदीत शस्त्रबळाने हल्ला करणे धर्मसंमत नव्हते. कदाचित काही प्रमाणात त्या धुरीण लोकांना जुहेमान आणि त्याच्या सहकार्याबद्दल अनुकंपाही असेल. कारण एक शुद्ध इस्लाम पुन्हा एकदा पुनरुज्जिवित करण्याचा त्यांचा मानस हा अनेक इमाम आणि मुल्लांना आवडणाराच होता.
तरी सौदी राजाने ह्या उलेमांशी वाटाघाटी सुरू केल्या. त्याचा सगळा तपशील आजही कळलेला नाही. पण सौदी अरेबियाने टीव्ही वरून बायका दिसणार नाहीत. पुन्हा कडवा इस्लाम सगळ्या सौदी अरेबियात पाळला जाईल. स्त्रियांना स्वातंत्र्य मिळणार नाही अशा अटी कबूल केल्या असाव्यात. कारण त्यानंतर हे सगळे बदल त्या देशात अंमलात आणले गेले. त्याच्या बदल्यात त्यांना मशीदीत सैन्य पाठवून बळाने ती पुन्हा आपल्या ताब्यात द्यायला उलेमा तयार झाले. पण त्याआधी मशीद बळकावणार्यांचा नेता हा खराखुरा माहदी तर नाही ना ह्याची खातरजमा करण्याची उलेमांवर जबाबदारी टाकण्यात आली. मग त्या भाकितातील बारकावे शोधले गेले आणि ते हे नाहीतच वगैरे सिद्ध केले गेले.
भाकितात असे म्हटले गेले की माहदी इस्फाहान भागातून येईल. तिथल्या ७०००० ज्यू लोकांची कत्तल करून तो अरेबियात येईल. पण इराणमधे इतके ज्यूच नाहीत त्यामुळे आजच्या घटकेला हे शक्यच नाही. त्यानंतर माहदी दमास्कसला जाईल तिथे भिंतीच्या आडोशाला लपून ख्रिस्ताची वाट पाहील. मग ख्रिस्ताच्या मदतीने तो दुश्मनाचा पाडाव करायला सिद्ध होईल. पण आज दमास्कसभोवती भिंतच नाही. त्यामुळे हा माहदी खरा असणे शक्य नाही. वगैरे वगैरे. तर अशी सगळी खुसपटे काढून हा माहदी नाही हे एकदाचे ठरले. त्यानंतर सौदी घराण्याचे राज्य हे शुद्ध इस्लामी विचारांवर आधारित आहे असे प्रमाणपत्र उलेमांकडून देण्यात आले आणि धार्मिक अडथळे एकदाचे दूर झाले.

क्रमशः

इतिहासमाहिती

प्रतिक्रिया

मराठमोळा's picture

10 Oct 2016 - 5:56 am | मराठमोळा

छान चालली आहे लेखमाला.
एकंदरीत धर्माची जटीलता आणि लोकांच्या मनावर त्याचा पगडा ही नोंद घेण्याजोगी गोष्ट आहे.

हुप्प्या's picture

10 Oct 2016 - 6:12 am | हुप्प्या

सौदी सरकारने भरपूर पैसा वापरुन जगभरात आपला अस्सल (म्हणजे सलाफी/वहाबी) इस्लाम जगभर पसरेल असे प्रयत्न करायचे कबूल केले. १९७९ नंतरच्या ३०-३५ वर्षात त्यांनी अनेक देशातले धार्मिक नेते सौदी अरेबियात बोलावून घेतले, त्यांना प्रशिक्षित केले, मशिदींना मोठ्या प्रमाणात पैसा पुरवला. त्यामुळे अनेक बिगर अरबी देशात कडवा मुस्लिम धर्म आकार घेऊ लागला. भारत, पाकिस्तानात इस्लामवर सुफी पंथाचा प्रभाव आहे. त्यामुळे दर्गे पीर मझार ह्या स्वरूपात मूर्तीपुजा होते. अफ्रिकेत जादूटोणा, मंत्रतंत्र ह्या प्रकाराचा इस्लामवर प्रभाव आहे.
अरबी धर्मप्रसारामुळे हे सगळे भ्रष्टाकारी आहे आणि खरा इस्लाम ह्या सगळ्या प्रकाराचा, संगीताचा, कलेचा तिटकारा करतो असे शिकवले जाते. झाकीर नाईक आणि तत्सम पिलावळ ह्या प्रयत्नातूनच जन्माला आलेली आहे. त्यामुळे १९७९ च्या ह्या उठावाचे परिणाम आजही आपण भोगत आहोत.

उठाव करणार्‍या लोकांनी ओलिस ठेवलेल्या काही लोकांना सोडून दिले. अरबीचा ओ का ठो न कळणारे कित्येक भाविक, अन्य म्हातारे कोतारे, रोगी लोक ज्यांच्याकडून काही हातभार लागणे शक्य नाही अशांना जुहेमानच्या लोकांनी सोडले. ह्या संधीचा फायदा घेऊन मशिदीचा इमाम ह्याने आपला अरब वेश त्यागून, एका अफगाणी माणसाकडे मागून अफगाणी वेष चढवला आणि सुटका केलेल्या अफगाणी जथ्यात सामिल झाला. आणि वेषांतर यशस्वी झाल्याने तो मशिदीतून बाहेरही पडला. आता ह्या माणसाला मशीद बळकावणार्‍यांचा नेता आणि त्याचे काही सहकारी ओळखीचे होते. हे लोक शिया वा इराणी नाहीत उलट हे अत्यंत कडवे सुन्नी सलाफी* आहेत हे त्याला माहित होते. त्याने हे सौदी सरकारलाही सांगितले होते. पण त्यांनी ही बाब जगाला सांगितली नाही. त्यातून पाकिस्तानी वकिलातीतले महाभारत घडले.

(सलाफी वा वहाबी ही विशेषणे आपण कडव्या सुन्नी लोकांना लावतो. पण खुद्द त्या गटाला अशा विशेषणांचा प्रचंड तिरस्कार आहे. आपला इस्लाम हाच खरा इस्लाम आहे अशी त्यांची खात्री आहे त्यामुळे त्याला असे काही पंथवाचक विशेषण लावून तो इस्लामचा एक नवाच प्रकार आहे असे सुचवणे त्यांना पूर्णपणे नामंजूर आहे.)

तुषार काळभोर's picture

10 Oct 2016 - 6:24 am | तुषार काळभोर

सौदी ने कम्युनिकेशन ब्लॅकआउट करणे
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष यांचा फोन पाकिस्तान प्रामुख्याने नाकारणे
अमेरिकेची इतके अधिकारी अडकलेले असताना अमेरिकेने फक्त वाट बघणं
सगळंच विचित्र!

एस's picture

10 Oct 2016 - 8:32 am | एस

वाचतोय. पुभाप्र.

प्रसाद_१९८२'s picture

10 Oct 2016 - 10:03 am | प्रसाद_१९८२

छान लेखमाला.
वाचतोय,..

गणामास्तर's picture

10 Oct 2016 - 12:34 pm | गणामास्तर

माहितीपूर्ण लेखमाला !
येउद्या पटापटा. .

वाचते आहे. सुरेख चालली आहे लेखमालिका.
प्रत्येक भागामध्ये आधीच्या सर्व भागांच्या लिंका असल्यास बरे पडेल.

मिपानिगोता यांच्याशी सहमत !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Will breach LoC to hunt terrorists, India tells Pakistan

एक कथा whatsapp वर वाचली होती कि एक भारतीय सौदी मधे बायकोला
घेऊन लोकल कलिगच्या घरी बोलावलेम्हणून गेला, त्याच्या बायकोला आत बायकांच्या
कक्षात नेण्यात आले , आणि ती कधीच बाहेर आली नाही,अशी कोणी आलीच नाही
कलिग ने कानावर हात ठेवले , आणि भारतीय प्रुव्ह करु शकला नाही.अशा भयंकर गोष्टी
तिथे घडतात.

फार माहितीपूर्ण लेखमाला आहे.

स्वाती दिनेश's picture

11 Oct 2016 - 11:36 pm | स्वाती दिनेश

वाचते आहे, पुभाप्र.
स्वाती

मदनबाण's picture

12 Oct 2016 - 1:32 pm | मदनबाण

वाचतोय...
पुढचा भाग लवकर टाका.

आजची स्वाक्षरी :- Campaign to boycott Chinese products gains momentum
Indian public wants to ban China products, but how would PM Modi, the “brand ambassador” of Reliance Jio reacts

मी-सौरभ's picture

14 Oct 2016 - 7:31 pm | मी-सौरभ

पु भा प्र