रम्य त्या बालपणीच्या आठवणी.
सर्व सामान्य माणसाच्या जीवनाचे, विशेष असे कांही भाग किंवा टप्पे असतात. कमी अधिक फरकाने असेल पण बहुतेक त्यांच्या मध्ये समानता ही असतेच .उदहारण द्यायचे झाल्यास घराचा उंबरा प्रथम ओलांडल्या नंतर समवयस्कर मित्र मैत्रिणीच्या बरोबर व्यतीत केलेले ते बालपण, नंतर येते ते तारुण्याची सुरूवात.आपले करियर करणे ,पैसे कमवणे, उदरनिर्वाहाच्या जबाबदारीची जाणीव ,लग्न ,प्रपंच ,परिवार.संपत्तीच्या विभागणी साठी केलेला संघर्ष अर्थात वाटण्या, कांहीचा तर हा इतक्या जिव्हाळ्याचा विषय असतो कि आयुष्यातील बाराच मौल्यवान काळ "वाटण्या" यातच संपून जातो .या नंतर आपण जरा थोडेफार स्थिर झालो तर या नंतर येणारी वृध्दत्वाची चाहूल !
मी तर म्हणेन, हा तर एका बुलेट ट्रेन मध्ये बसून,या कालचक्रातुन केलेला हा आयुष्याचा प्रवास आहे .इथे कुणाला बसायला जागा मिळते तर कुणाला अडचणीत उभे राहून प्रवास करावा लागतो.यात म्हणाल तर आपल्या हातात कांहीच नसते. या विधात्याने एकदा का या गाडीत आपल्याला बसवले की आपण एकदम शेवटचा स्टॉपच गाठायचा .इथे आधी मधी स्टेशन लागतात पण ती खिडकीतून फक्त डोकावून पाहायची आणि मनाशी म्हणायचे आरे ! आपल बालपण सरले वाटत, अरे! आपल तरुण पण संपल वाटत. वगैरे वगैरे ....
पंधरा वीस वर्षा पूर्वी, आम्ही आमचे जुने घर सोडून दुसऱ्या ठिकाणी राहायला आलो होतो .वास्तविक माझा जन्म,माझे दहावी पर्यंतचे बालपण याच जुन्या घरात गेले.जुने घर रस्ता रुंदीत गेल्या मुळे आम्हाला इथून लांब असणाऱ्या, नवीन दुसऱ्या घरामध्ये स्थलांतरीत व्हावे लागले.ते जुने घर व आपल्यावर मनापासून प्रेम करणारे ते सभोवती असणारे बालमित्र ,याना सोडून जाताना अक्षरशः डोळ्यातून पाणी आले होते.ज्यांच्या बरोबर आपण खेळलो ,बागडलो ,खूप दंगा मस्ती केली. ज्यांच्या मुळे आपण या जगात कांही नवीन शिकलो ,ज्यांच्या बरोबर असणे हे आपल्याला नेहमीच सुरक्षित वाटले अशा ह्या बालमित्रांना कधीतरी सोडून जावे लागणार अशी कल्पना मी कधी मनात देखील केली नव्हती. हा बालपणीचा प्रवास मात्र फारच रमणीय असतो .त्या वेळी आपण एका वेगळ्याच विश्वात वावरत असतो .या वयात आपल्यावर फार मोठ्या जबाबदाऱ्या हि नसतात व सभोवती असणाऱ्या सर्व लोकांशी नाती हि निखळ नि:स्वार्थी प्रेमाच्या बंधनानी बांधलेली असतात . असे ते रम्य बालपणं सहसा आपण विसरत नाही . पण काय करणार , नाईलाज होता .या नंतर नवीन घरात जेमतेम दोन महीने राहिलो असेन तोच शिक्षणाचा पुढील भाग म्हणून मला परगावी राहावे लागले आणि ते पण चक्क पाच वर्षे . त्या नंतर नोकरीच्या निमित्याने कांही काळ बाहेर राहावे लागले आणि ते बालपणीचे दिवस या आयुष्याच्या घाई गडबडीत कधी मागे पडले हे लक्षातही आले नाही.
आज मला कामातून दोन तीन दिवस सुट्टी मिळाली होती. मी माझ्या मूळगावी बर्याच वर्षानी परत आलो होतो .आज काय कुणास ठाऊक ,मला माझ्या जुन्या घराची ,बालमित्रांची खूप आठवण येऊ लागली .मनाशी विचार केला चला आज जून्या घरच्या ठिकाणी फेरफटका मारून येऊ .कोणी मित्र भेटतात का पाहावे .
इथे आलो खरा ,मात्र इथली सर्व परिस्थिती पाहून ,मला एक विलक्षण धक्काच बसला .माझ्या ह्या जुन्या ठिकाणाचा सगळा चेहरा मोहराच बदलेला होता . आपण खेळत असणारे ते अरुंद रस्ते आता खूपच विस्तृत झाले होते .ज्या रस्त्यावर आपण बिनधास्त पणे क्रिकेट खेळत होतो तिथे तर कर्कश वाहनांची व लोकांची इतकी गर्दी झाली होती कि रस्ता ओलांडणे देखील अडचणीचे वाटत होते . खेळताना बाजूला असणारे लाईटचे पोल, त्यांनी देखील आपली जागा बदलेली होती. जी कांही थोडी फ़ार रस्त्याच्या कडेला जागा शिल्लक होती, ती सुद्धा दुचाकी व चार चाकी वहानानी पार्किंग करुन व्यापुन टाकली होती. जी आपल्या शेजारी शेजारी छोटी छोटी घरे होती ,ते सर्व माझे बालमित्र नोकरी किंवा व्यवसायाच्या निमीत्याने बहुतेक स्थलांतरित झाले होते .कांहींनी तर आपली जुनी घरे, रस्ता रूंदी मुळे अर्धी शिल्लक राहिल्याने ती बिल्डर लोकांना विकून, ते कुठे परागंदा झाले होते कुणास ठाऊक ? त्यांच्या घरच्या जागेवर आता वेगवेगळी काँक्रीटची घरे व अपार्टमेंट सिस्टिम्स झाल्या होत्या .सर्व गोष्टीची ओळखच बदलून गेली होती पण यातील कांही जागांची ओळख मात्र मी विसरलो नाही. त्यात कधी काळी आपण क्रिकेट खेळत असताना,ज्या ठिकाणी स्टम्स लावीत होतो, चिन्नीदांडू खेळताना, चिन्नी टोलवीत असणारी सही (गली) यांच्या जागा मात्र मला, मनात सारख्या खुणावीत होत्या. त्याही पेक्षा सर्वात मनाला लागून राहिलेली एकच खंत म्हणजे ,कधी काळी ह्याच ठिकाणी पाच सहा मुलांचा घोळका घेहून एखाद्या वनराजा प्रमाणे फिरणारे आपण ,त्याला एक हि साधा ओळखणारा माणूस इथे असू नये ? याची मला मात्र खुप खंत वाटत होती. सर्व घरे नविन लोकांनी व नविन येणार्या पिढीने व्यापून टाकली होती. नाही म्ह्णायला, तिथल्या एका जुन्या लॉड्रीवालेनी मला ओळखले. ते पण आता खुपच वृद्ध झाले होते. मोठ्या आदराने त्यांनी मला दुकानात बोलवून बसायला खुर्ची दिली व माझी चौकशी केली. मी पण त्याना अनेक प्रश्र्न विचारले पण ते देखील मला अभिप्रेत असणारी सर्व माहिती सांगू शकले नाहीत. आता मात्र माझी नजर तिथल्या प्रत्येक जागे मध्ये भूतकाळातील आठवणीचे वास्तव शोधू लागली आणि कांही काळा साठी मी जुन्या अठवणीच्या स्वप्नात रममाण झालो.
"अरे बंडू ! दहा वाजले ,आज शाळेला जाणार आहेस कि नाही ?" माझी आई.
इथे मात्र, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील होणाऱ्या वनडे क्रिकेट मॅचला देखील लाजवेल, असा आमचा खेळ रंगलेला असायचा . इतक्यात घरातून आईची परत जोरात हाक " अरे ! बंड्या शाळेला जाणार आहेस कि नाही ?
"थांब हं आई ,आलोच! आम्हाला फक्त पंधरा बॉलला बारा रना हव्या आहेत ". त्या काळी टीव्ही ,मोबाईल याचा वापर होत नसे तरी पण या क्रिकेटने आम्हा मुलांच्यावर काय जादू केली होती कुणास ठाऊक ? क्रिकेट म्ह्णजे जीव कि प्राण.एरवी देखील घरात, ह्या क्रिकेटच्या अॅक्शन्स हवेत चालूच असायच्या.सहज कुणाशी बोलता बोलता मध्येच कव्हर ड्राइव्ह ठिक केला जात आसे. घराच्या शेजारी राहणाऱ्या पण आमच्या पेक्षा मोठ्या असणाऱ्या मुली म्हणजे आमच्या मानलेल्या ताई अक्का, आम्हाला कधी कधी संध्याकाळी , त्यांच्या कामासाठी सोबती म्हणून बरोबर फ़िरायला घेऊन जात असत .त्यावेळी रस्त्याच्या कडेने त्या ठुमकत ठुमकत चालत असायच्या व आमचे त्यांच्या बरोबर चालता चालता हवेत गोलाकार हात फिरवत फास्ट बॉलिंगचे प्रॅक्टिस अविरत चालूच असायचे .क्रिकेटचा बॉल दुसऱ्याच्या घरात मारला कि रोज वाद हे असायचे्च.
संध्याकाळी कट्टयावर बसून अगदी एकाग्रतेने ऐकलेल्या चित्रपटातील कथा व त्या पण रंगवून सांगणारे, आमच्यातील जेष्ठ मित्र असायचे .कधी कधी भयपटाच्य कथा, तर कधी कधी पराक्रमाच्या कथा ,तर कधी कधी नायक आणि नायिका यांच्यातील प्रेम संबधाच्या कथा ते आम्हाला फार खुलवून सांगत असत . या कथा ऐकल्याने या जगातील बरीच नवनवीन माहिती या बालमनाला मिळत असे .
याच रस्त्यावर मला माझ्या मित्रानी सायकल चालवायला शिकवली .डोक्यावरचे केस भूर भूर उडवीत ,वाऱ्याच्या गतीला आव्हान देत, वेगाने रस्त्यातून जाणारी ती सायकल फारच आनंददायी वाटे . सुरवातीला मी सायकलच्या मध्ये पाय घालून हाफ पॅडल सायकल चालवीत असे . नवीन, लहान शिकाऊ सायकल स्वार असल्यामुळे ,कुठेतरी पडेल ,सायकल मोडेल या भीतीने मला कोणी सहसा सायकल देत नसे . कधी घरातील दादाची नजर चुकवून तर कधी मित्रांच्या सायकलची फेरी मिळाली कि माझा आनंद गगनात मावत नसे. एकदा तर या सायकलच्या वेडापायी,मी दारात लावलेली पोस्टमनची सायकल,टपाल सहित घेऊन, फेरी मारली होती व या कारणा साठी आईचा मार देखील खाल्ला होता . याच बालमित्रांनी मला, टॅंक मध्ये पोटा खाली हात घालून पोहायला शिकवले. शिकवताना "हात मार ! पाय मार " या वाक्याचा त्यांचा सारखा उदघोष चालू असे.पण मी नविन, शिकावू असल्या मुळे कधी कधी पाणी नाका तोंडात जायचे. पाण्याची भिती वाटायची.या भिती पोटी कधी कधी जोरात ओरडायला ही होत असे .मग ही मुले " हात मार ! पाय मार आन, भिती वाटली की शंख मार " अशी घोषणा द्यायचे.
आमच्या लहानपणी चित्ररूपी मासिके प्रकाशित होत असत व ती आम्ही मनापासून आवडीने वाचत असू . या मासिकातील जे कथा नायक असायचे, त्यांच्या जिवाभावाचा मित्र म्हणजे एक कुत्रा असायचा आणि हा कुत्रा ह्या नायकांना नेहमीच संकट काळी मदतीला धावून येत असे . या सारखा एखादा इमानदार वाघ्या , आपला देखील जिवाभावाचा मित्र असावा व तो आपल्या देखील संकट काळी मदतीला धावून यावा ,असे मला फार वाटायचे . मात्र कुत्रा पाळण्यास आमच्या घरातील मोठ्या माणसांचा फारच विरोध असे ." त्याची उसाभर कोण करणार व त्याने केलेली घाण कोण काढणार ? " या सारखे प्रश्र्न उपस्थित करून , आम्हा मुलांना गप्प बसवले जायचे. पण कुणाच्या घरी लहान कुत्र्याचे पिल्लू मिळाले कि आम्ही मुले घरातल्यांच्या नकळत, त्याला गुपचूप घेऊन येत असूं .सर्व मित्र मिळून घराच्या बाहेर त्याच्या साठी खास छोटेसे विटांचे घर बांधत असू . त्याला थंडी वाजू नये म्हणून बारदानाचे उबदार अंथरूण तयार केले जाई. त्याच्या समोर पाण्या साठी एक व दुधासाठी वेगळी प्लेट ठेवली जात असे . त्याचे बारसे देखील केले जायचे .त्याच्या नावाने हाक मारली, की मोठ्या आंनदाने तो आमच्या मागून दुड दुड पळत येत असे व आपली स्वप्नपूर्ती पूर्ण होत आहे, याचा आंनद ही वाटे . अशा कुत्र्यांचा आम्हाला फारच लळा लागायचा . घरातल्याची नजर चुकवून ,घरातील दूध ,बिस्किटे,चपाती हळूच आणून त्या कुत्र्याला घालण्याचा आमचा नित्य उपक्रम चालूच असायचा .मात्र आमचे हे कारनामे फार काळ लपून राहत नसत .कधी कधी रात्री, हा मूर्ख कुत्रा ओरडून इतका दंगा घालत असे कि आमचे हे "गुपचुप कारनामे" बाहेर येत असत. दुसऱ्याच दिवशी कुणाला तरी बोलवून ह्या कुत्र्याला बाहेर सोडण्याचे फर्मान निघालेले असायचे . सकाळी तो माणूस या कुत्र्याला जबरदस्तीने पकडून बास्केट मध्ये घालताना ते पिल्लू जीवाचा इतका आकांत करायचे कि शेवटी जड अंतःकरणांनी " जा मित्रा जा ! तुझ्या कडून आम्ही मैत्रीची अपेक्षा केली ,मात्र आमच्या मैत्रीचा शब्द आम्ही पाळू शकलो नाही. आम्ही आज तुला आमच्या मैत्रीच्या बंधनातून मुक्त केले आहे" असा त्याला निरोप ध्यावा लागे, अशी कुत्री पाळण्याचे अनेक प्रसंग माझ्या जीवनात येऊन गेले .
पावसाळा हा तर बालपणातला फारच रमणीय असा ऋतू असायचा आणि आम्ही खरोखरच भाग्यवान आहोत कि त्या वेळी पाऊस देखील हमखास वेळेवर पडत असे .त्यात शाळेच्या नवीन वर्षाची सुरवात हि, याच पावसाळ्यात होत असे .मग काय, नवीन युनिफॉर्म ,नवीन पुस्तके ,नवीन वह्या व आवडीचा तो नवीव प्लॅस्टीकचा रेनकोट व टोपी .आमच्या घराच्या बाहेर एक मोठे अंगण होते . पावसाळ्यात त्यात खूप पाणी साठवायचे व ते बाहेर जाण्या साठी एक सिमेंटची पाईप बसवली होती.त्या पाण्यात उड्या मारणे ,एकमेकांच्या अंगावर पाणी उडवणे हा आमचा नित्याचा कार्यक्रम असायचा.असे हे पावसाचे पाणी अंगणातून बाहेर जाऊ नये म्हणून आम्ही त्या सिमेंटच्या पाईप मध्ये कापडाचा बोळा घालून ठेवीत असत . या पावसात खेळताना माझे कपडे, युनिफॉर्म इतकेंदा भिजत असायचे कि बऱ्याच वेळेस शाळेत ओले कपडे घालून जायची पाळी यायची . या दिवसात कपडे लवकर वाळत हि नसत. या वर मी एक नामी युक्ती काढली होती.पावसात भिजताना आत बनियन व छोटी चड्डी घालायची व बाहेर प्लास्टीचा रेनकोट व डोक्यावर टोपी घातली, कि झाले . आत काय घातले आहे हे सहसा कुणाच्या लक्षात येत नसे . अशाच अवतारात एकदा मी खेळता खेळाता अनवधानाने एका मित्राच्या घरा जवळ येउन पोहचलो. मला व माझ्या मित्राला बाहेर पाहताच, त्याची आई कौतुकाने, कांही तरी खाऊ देण्या साठी मला घरात बोलवू लागली . माझा ओला रेनकोट काढून सोफ़्यावर बसण्याचा सारखा आग्रह करू लागली .आपले हे रेनकोट चे गुपित फुटू नये म्हणून मी इकडे तिकडे न पाहता घरी धूम ठोकली .अर्थात ही फारच लहान पणीची गोष्ट आहे .
गणपतीच्या काळात प्रत्येक गणेश मंडळाने केलेले देखावे,रोषणाई पहाण्याच्या निमित्ताने, आम्ही सर्व मित्र रात्रीच्या रात्री जागुन काढत असूं, मात्र घरातुन बाहेर पडताना " हा फ़ार धांदरट मुलगा आहे. याचा हात सोडू नका रे !" असे वारंवार मित्रांना काळजीपोटी बजावून सांगणार्या आईचे शब्द अजूनही कानानी साठवून ठेवले आहेत. या काळात मोठी मुले नृत्य ,नाटिका सारखे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करीत असत .या नाटका मध्ये कोणी श्रीमंत सावकार ,तर कोणी फळांचा राजा ,तर कोणी फुलांचा राजा या सारखी पात्रे साकारीत असत."आपण या नाटकात मुख्य भूमिका करणार आहोत", म्हणून यातील हि सर्व पात्रे, आमच्या पुढे मोठी प्रौढी मिरवीत असत.आम्ही लहान व भसाड आवाजाचे असल्या मुळे या नाटकातून आम्हाला कायम डावलले जायचे. नाट्कात काम न मिळाल्या मुळे खुप वाईट वाटे. फळांचा राजा ,फुलांचा राजा राहू द्या हो ! पण कमित कमी आम्हाला " भिकाऱ्याच्या राजा " तरी करा म्हणून आम्ही त्यांना सारखी विनवणी करीत असूं .
दिवाळीची महिन्याची सुट्टी, म्हणजे वर्षातील एक मोठी आनंदाची भेट आहे असे आम्हा मुलांना सदैव वाटे .कधी एकदा शेवटचा सहामाही परीक्षेचा पेपर संपतो व कधी या अभ्यासाच्या बंधनातून कांही काळ मुक्त होतो असे वाटायचे . त्या काळी सुट्टीत 'संस्कार शिबीर " किंवा "क्रीडा शिबीर " अशा सारखी सुट्टीतील शिबिरे भरत नसत .जो तो सुट्टीत आपण काय करायचे किव्हा कांहीही करायचे नाही हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येकाला असायचा . दिवाळीत नवनवीन कपडे घालणे ,फराळावर मनोसोक्त पणे ताव मारणे, कुठल्याही प्रकारचा अभ्यास न करणे व भरपूर फटाके उडवणे, हे आमचे ठरलेले काम असायचे . फटाके संपत आले कि मग न उडालेल्या फटाक्यांची दारू काढून ती पेटवण्याचे काम चालू असायचे . दिवाळीतील केलेला किल्ला हा एक जिव्हाळ्याचा विषय असायचा . किल्ला बांधण्याची तयारी फारच आधी पासून केलेली असायची .बुरुजावरील रक्षणा साठी असलेले सर्व मावळे दिसायला एक सारखे असायचे आणि काय कुणास ठाऊक सगळ्यांनी डाव्या हातात तलवारी धरलेल्या असायच्या .किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज देखील दोन दोन असायचे . घोड्या पेक्षा अंगाने मोठा असणारा ससा देखील स्वराज्यच्या संरक्षणा साठी सिद्ध झालेला असायचा . दिवाळी झाल्यावर बहुतेक माझी सर्व मोठी भावंडे सुट्टीला परगावी नातेवाईकांच्या कडे जात असायची .मी थोडा व्रात्य स्वभावाचा असल्या मुळे माझी आई सहसा मला कुठे पाठवण्याचे धाडस करीत नसे .
हे मात्र सत्य आहे कि जो पर्यंत माणसाचा सहवास असतो तो पर्यंत हे मैत्रीचे संबध घट्ट बंधनात बांधले असतात .जस जसा याच्या मध्ये, कालाचे अंतर पडत जाते तस तसे हे बंधनाचे धागे थोडे सैल होत जातात .कधी काळी ज्या मित्रांच्या बरोबर असताना, मला नेहमी असे वाटायचे, कि मी यांच्या शिवाय राहूच शकत नाही ,पण कालातंराने त्याच व्यक्ती स्मरणातून धुसर होऊ लागतात. हा कदाचित माणसाचा नैसर्गिक स्वभाव असू शकेल. वास्तव आपण नाकारू शकत नाही ,पण मी मात्र ठरवले आहे , कि आयुष्यात एकदा ना एकदा तरी, मी या सर्व बालमित्रांना जरूर भेटेन. मग तो चतुर पणे चेंडू पकडणारा आमच्या संघाचा डावखुरा विकेटकिपर असेल, नाहीतर प्रत्येक चेंडूला लेगला सिक्स मारणारा कोणी फ़लंदाज असेल. आपली महत्वाची कामे बाजूला ठेऊन मला अभ्यासात सदैव मदत करणारा कोणी असेल, तर बोटाला धरून शाळेत नेहणारी माझी एखादी ताई असेल किंव्हा माझ्या अनुपस्थितीत वर्गात काय काय घडले हे सांगणारी माझी मैत्रीण असेल .एक ना एक दिवस मी या सर्वाना एकत्रित जमवून, या बालमित्रांच्या सहवासात व्यतीत केलेले माझे कांहि क्षण, हेच माझ्या आयुष्यातील परमोच्च आनंदाचे अविस्मरणीय असे क्षण असतील !!
प्रतिक्रिया
16 Aug 2016 - 4:52 pm | शान्तिप्रिय
छान आठवणी. लेख आवडला.
प्रत्येकाने बालपणीच्या आठवणी जगण्यासाठी
बालपणीच्या ठिकाणी जायचा प्रयत्न करावा. घरे बदललेली असली तरी जिवाभावाची माणसे भेटतातच!
17 Aug 2016 - 10:50 pm | अभिजीत अवलिया
मस्त लिहिलय ...
17 Aug 2016 - 11:01 pm | पद्मावति
मस्तं!!
18 Aug 2016 - 8:43 am | विवेकपटाईत
कालाय तस्मे नम: आठवणी आवडल्या. जुन्या दिवसांची आठवण झाली. एक एक करून जुने मित्र कसे अलग होतात कळत नाही. जुने दिवस परतून कधीच येत नाही. हेच सत्य.
19 Aug 2016 - 10:02 am | प्रभाकर पेठकर
रम्य ते बालपण आणि अगम्य असे तरूणपण. दोन्ही अवस्था पुढे जाऊन मनाला हुरहुर लावतातच. काळचक्र उलटे फिरवता येत नसले तरी आठवणींच्या डोहातील तरंग मनाला गुदगुल्या केल्यावाचून राहात नाहीत. तेव्हढंच आपलं आयुष्य पुन्हा जगल्याचा अवर्णनिय आनंद मिळतो. प्रत्येकाच्या बालपणीच्या खास आठवणी, खास खास रहस्य असतातच. बालमित्र पुन्हा भेटल्यावर जे गप्पानां उधाण येते, ज्या टाळ्या दिल्या/घेतल्या जातात जी, डोळ्यातून पाणी येईपर्यंतची, हास्याची कारंजी उडतात ते वर्णना पलीकडे असते. ते अनुभवायचे असते.
खुप छान लेख आहे.
घोड्या पेक्षा अंगाने मोठा असणारा ससा देखील स्वराज्यच्या संरक्षणा साठी सिद्ध झालेला असायचा .
हे तर लई भारी.
19 Aug 2016 - 12:42 pm | Sanjay Uwach
श्री प्रभाकर पेठकर
आपल्या सारख्या जेष्ठ व सर्वांचे
लाडके मिपा करांनी दिलेल्या प्रतिक्रिये बद्दल मी आपला मनापासून आभारी आहे