राँग नंबर

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जनातलं, मनातलं
7 Jul 2016 - 10:10 pm

साध्या सर्दि तापापासून सुरवात होऊन न्युमोनियावर दुखणे गेले. रोज एकेक दिवस मोजता मोजता आज तीन आठवडे उलटून गेले होते. रांगणेकर हॉस्पिटलमधील भिंतीवरचा प्रत्येक डाग अन रेषा आजीला आता पाठ झालेल्या होत्या. तिचे शरीर म्हणजे तर नाही नाही ती औषधे रिचविण्याचे पिंपच झाले होते. नर्सने केव्हाही येऊन कुठलीही औषधे टोचून वा तोंडात कोंबून भरावीत. हे काय आहे, कशासाठी आहे, काही उपयोग होतो आहे की नाही, कोणाला विचारले तरी धड कळेल असे उत्तर मिळेल तर शपथ! मुलगी सकाळी ऑफिसला जातांना पाच मिनटासाठी येऊन जायची. तिने डब्यात आज काय आणले असेल त्याचेही आता औत्सुक्य उरले नव्हते. ती गेल्यावर बाकीचा दिवस रात्र सगळा नोकर माणसांच्या भरोशावर! नाही म्हणायला एखाद्या रविवारी शेजार पाजाऱ्यांपैकी कोणी एखादी चक्कर टाकलीच, तर त्यांच्याकडून आसपासची खबर मिळायची.

पण त्यांच्या देखील त्याच त्या चौकशा. “आता कशा आहात? मुलगा मुंबईहून कधी येणार आहे?” ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे आजीलाच माहीत नव्हती, तर ती काय सांगणार? मुलासाठी मात्र तिचा जीव तुटत होता. मुलीकडून देखील काही कळायची सोय नव्हती. तिला सांभाळण्यावरूनच बहीण भावात वितुष्ट आले होते, तेव्हापासून त्यांचे एकमेकांशी बोलणेच संपले होते. त्यामुळे आजी पलंगावर प्रत्येक क्षण मोजताना मुलगा भेटायला आला आहे अशी स्वप्ने पहात पडून रहायची! पाहतापाहता भिंती सिनेमाचा पडदा व्हायच्या. लहानपणीच्या मुलाला खेळवण्यात आजीचा तासन तास जायचा.

“हे पहा, तुम्ही यांच्या मुलाला आणि कोण जे जवळचे असतील त्याना लवकर बोलावून घ्या” डॉक्टर मुलीला सांगत होते.
---- वेडेच आहेत डॉक्टर! मुलगा तर रोज माझ्याजवळच असतो ना! आजच तर मी त्याला क्रिकेटची बॅट घेऊन दिली. केवढा खूष झाला होता!---
“काय झाले डॉक्टर?”
“अहो, त्यांचे बडबडणे खूप वाढले आहे. सोडियम खूप कमी झाले आहे. औषधाना सुद्धा दाद देत नाहीत. आता नव्वदीच्या पुढे काही भरोसा नाही.”
--- कोण नव्वदीच्या पुढे?--- आजीला काहीच कळले नाही. हॉस्पिटलमधले सगळेच लोक नेहमी असे अगम्य बोलतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून ती मुलाचा क्रिकेटचा खेळ पाहू लागली. –अरे जरा हळू मार चेंडू! काच फुटेल ना समोरच्या खिडकीची!
“अग आई, अशी काय करतेस. अग कसला चेंडू? कसली काच?”
“अग काही नाही. हा शशांक बघ ना! ऐकतच नाहीये. ओहो! सिक्सर! शशांकने सिक्सर मारला!”
“आई, अग त्याने ऐकले असते तर आज आज तुझी काळजी घ्यायला इथे असता नां!”
---- खूप दिवस आपण इथे असूनही मुलगा अजून आपल्याला बघायला सुद्धा आला नाही. आजीचे सुरकुतलेले हात टाळ्या वाजवताना लुळे पडले. पण तरीही ती सारे बळ एकवटून मुलाच्या खेळाला दाद देऊ लागली.
मुलीने कपाळावर हात मारला!

---- तू जा बाई! तुला ऑफिसला उशीर होत असेल.--- आजी पुन्हा शशांकच्या कौतुकात रमली.

@अरे त्या रांगणेकर मधल्या आजीना वेटिंग रुममध्ये ट्रान्स्फर करायला केव्हाचे सांगितले होते. अजून कां त्यांना हॉस्पिटलमधेच ताटकळत ठेवले आहेस?@
@सर अजून रिटन आदेश आलेले नाहीत.@
@रिटन आदेशची ऐसी तैसी! माझा शब्द म्हणजे तुझ्यासाठी आदेश आहे समजले!@
@ठीकाय सर. पण मग नंतर काही घोळ झाला तर मलाच निस्तरावा लागेल. म्हणून...@
@कसला घोळ होणारे? त्र्याण्णव पार केले म्हातारीने. मुलीला वेळ नाहीये. मुलगा विचारीत नाही. सारखे सारखे भिंतीवरच्या पडद्यातून बाहेरच्या जगात आतबाहेर करता करता तिचा त्राण नाहीसा झाला आहे. मलाच तिचे ते कन्फ्युजन पाहवत नाही. त्यापेक्षा सरळ वेटिंग रूम मध्ये नेऊन ठेव रिटन आदेश येईपर्यंत. निदान ती सुखात चार दिवस रमेल आठवणीत!@
@ओक्के सर.@

--- हो नर्मदाकाकू... येईन हो . नक्की येईन. तुम्ही एवढे बोलावले आहे!---
--- सहाचा पाढा कसा म्हणतो बरोबर! मग साताचा काय अवघड थोडीच आहे?---
--- अहो, आता रीमाकडे बघावे लागते. तुम्ही जरा शशांकला पहा ना!---
--- या या उमावहिनी. नाही हो. माझे काही जमणार नाही. अहो दोन्ही मुलांकडे मलाच पहावे लागते. आमचे हे म्हणजे..----
--- वद जाऊ कुणाला शरण....----
--- अण्णा मला नवीन पेन हवाय---
--- आई बघना दादानी माझी बाहुली लपवली!---
--- मुरलीधर कृष्णा! तू स्वत: मला भेटायला आलास! अरे कां एवढे त्रास घेतलेस?---

“डॉक्टर, ही अशी काय बोलतेय?”
“हे होणारच. सोडियम खूप कमी झाले आहे. भ्रम झाल्यासारखे आहे. आम्ही प्रयत्न करतोच आहे. तुमचा भाऊ केव्हा येणार?”
“त्याला कळविले आहे. माहित नाही.”

@सर, अजून रिटन ऑर्डर नाही. किती दिवस आजीला वेटिंग रुममध्ये ठेवायचे? उगाच जुन्या गोष्टी उगाळत बसते.@
@जुन्या गोष्टींचे जाऊ दे! मला वेगळीच काळजी वाटते आहे.@
@कां सर, काय झाले?@
@अरे वेटिंग रुममध्ये चार घटका गेलेले दिवस पुन्हा अनुभवतेय ते ठीक आहे. पण वेटिंग रूम मधून कधी कधी पलीकडचे दिसते नां! काही लोक पडद्यापलीकडचे नेमके नको ते पाहू शकतात, आणि त्याचे कायकाय परिणाम होतात नंतर!@
@हो सर, मी देखील ऐकले आहे असे.@
@म्हणून तर वेटिंग रूम मध्ये चार पाच दिवसापेक्षा जास्त ठेवायचे नाही असा आदेश असतो!@
@मग सर आजींच्या बाबतीत घोडे कुठे अडले आहे? जायचे तर आहेच, पण अजून रिटन आदेश का येत नाही?@
@अरे भगवंतांचे मन कोण जाणणार! आपण हुकमाचे ताबेदार. असेल काही पुण्याई तिची.@
@मग आता काय करायचे? वेटिंग रुममधून वापस हॉस्पिटलात पाठवायचे?@
@तेही आता आपल्या हातात नाही. वेटिंग रूमचे कुलूप आतून बंद झाले आहे@
@ओके सर, तुम्ही सांगाल तसे! मला दुसरी कामे आहेत. बोलवा मला गरज पडली की@

---- अरे शशांक बेटा, किती दिवस झालेत तुला बोलावते आहे. तु केव्हा येणार? आला आला, माझा शशांक बेटा आला ----

“रीमा अग तू सांगितलं आहेस ना शशांकला की आई तुझी आठवण काढते आहे?”
“हो आई.”
“मग काय म्हणाला तो?”
“बोलतोय कुठे माझ्याशी? त्या मागच्या भांडणापासून अबोलाच तर धरला आहे. म्हणजे चुकी याची, आणि शिक्षा मलाच!”
“तुलाच कां गं? खर तर मीच शिक्षा भोगते आहे तुमच्या भांडणाची.”
“आई अस नको बोलू.”
“मग कसं बोलू? मला वाटते, आता तुम्हा दोघाना एकत्र बघितल्याशिवायाच मी जाणार. पण पायही निघत नाही मेला. अडकले गं मी तुमच्या भांडणात!”
----अरे सोडा मला...---- आजी खूप जोर लावून पलंगावरून खाली उतरली, आणि धावायला लागली. त्यात तिचा पाय मुरगळला. रीमाने कसेबसे तिला पलंगावर बसवले.
नर्स धावत आली. “मला वाटते, ह्याना वात झालाय. रात्री बांधून ठेवावे लागेल. नाहीतर कोठेही पाळायच्या.”
“अरे देवा!......”

@सर, आजीला लवकर वेटिंग रूम मधून बाहेर पाठवा. इकडे किंवा तिकडे. कुठेही. स्वत:ला खूप त्रास करून घेतेय ती.@
@हे पहा आता आपल्या हातात काही नाही.@
@मग?@
@बघु या. त्याच्या मनात जे असेल तेच तो करतो नां@

“आई बघ कोण आलंय”
“अरे शशांक! का रे इतका उशीर केलासs?”
“आई अग कामात अडकलो होतो.”
“आणि रीमा कुठंय?”
“मला नाही माहित”
“म्हणजे अजूनही तुम्ही बोलत नाही?”
“......”

-----अरे त्या कावळ्याला हाकला रे कोणी... माझ्या पापड्या खातोय”----
-----नाहीतर मीच हाकलते त्याला. एक पाय मुरगळला आहे. दुसरा पण होऊदे.-----

आजीने पलंगावरून खाली उडीच मारली. शशांकला काय होतेय तेच कळेना. आजी खोलीच्या बाहेर जोरात धावली. बाहेरून येणाऱ्या रीमाने तिला धरले. “अरे शशांक हे काय, तिला तु बाहेर कसे येऊ दिलेस?”
“अग मला कळलेच नाही. ही अचानकच धावली.”
“अरे वा! शशांक, रीमा, तुम्ही दोघे बोलायला लागला एकमेकांशी?”
“आई अग हो. कालच मी त्याला फोन केला व खूप समजावले. म्हटले आईसाठी तरी आपण ही भांडणे संपवून एक होऊ या.”
“मघा याला विचारले की अजूनही तुम्ही बोलत नाही, तर चूप राहिला?”
“आई अग मलाच लाज वाटत होती माझ्या वागण्याची.”
“चल, वेडा कुठला.”

@सर, ट्रान्स्फर करायचेय कां आजीला.? रिटन आदेश आलाय?@
@होनां! पण पलीकडचा रिटन आदेश नव्हे, तर रिटर्नचा आदेश आहे. तिच्या मुलांनी तिला परत बोलावून घेतले आहे. आणि वात्सल्यमुर्ती भगवंत ममतेच्या आड नाही येऊ शकले!@
@ठीकाय, जशी तुमची आज्ञा!@
@होहो. आणि ह्या वेटिंग रुमच्या वास्तव्याची राँग नंबर अशी नोंद करायला विसरू नकोस!@
@ओक्के सर!@

वावरप्रतिभा

प्रतिक्रिया

लालगरूड's picture

7 Jul 2016 - 10:41 pm | लालगरूड

છાન ળમલે.... પુલેશુ

लालगरूड's picture

7 Jul 2016 - 10:41 pm | लालगरूड

છાન ળમલે.... પુલેશુ

नीलमोहर's picture

7 Jul 2016 - 10:44 pm | नीलमोहर

शेवटपर्यंत आमचाही जीव वेटिंग रूमच्या आतबाहेर करत टांगणीला लागला होता,
छान वेगळी कथा, आवडली.

रातराणी's picture

7 Jul 2016 - 11:25 pm | रातराणी

सहमत. कथा आवडली.

किसन शिंदे's picture

8 Jul 2016 - 9:38 am | किसन शिंदे

कथा आवडली.

एक एकटा एकटाच's picture

7 Jul 2016 - 11:34 pm | एक एकटा एकटाच

आवडली

नाखु's picture

8 Jul 2016 - 8:49 am | नाखु

गुंफण आणि शेवट मस्त. एखादी नाट्यछटा होऊ शकेल इतका चांगला कथाविस्तार आहे.

पुलेशु

सौंदाळा's picture

8 Jul 2016 - 9:35 am | सौंदाळा

+१
कथा आवडली

विवेकपटाईत's picture

8 Jul 2016 - 9:40 am | विवेकपटाईत

तरुण मुलींनी अवश्य वाचावी. मस्त आवडली.

सस्नेह's picture

8 Jul 2016 - 10:43 am | सस्नेह

गल्ली चुकले काय पटाईतकाका ?

सस्नेह's picture

8 Jul 2016 - 10:43 am | सस्नेह

छान कथा. पॉझिटिव्ह !

बोका-ए-आझम's picture

8 Jul 2016 - 10:59 am | बोका-ए-आझम

एकच सुचवावंंसं वाटतं - पूर्ण संवादात्मक केली असती तर अजून प्रभावी झाली असती. वरती नाखुकाकांनी म्हटल्याप्रमाणे नाट्यछटेच्या अंगाने करायला हवी होती. पण तशीही चांगलीच आहे.

अरुण मनोहर's picture

8 Jul 2016 - 11:05 am | अरुण मनोहर

सूचनेसाठी आभारी आहे.

स्पा's picture

8 Jul 2016 - 11:29 am | स्पा

आव्ड्ली

जगप्रवासी's picture

8 Jul 2016 - 12:13 pm | जगप्रवासी

छान आहे

मराठी कथालेखक's picture

8 Jul 2016 - 12:33 pm | मराठी कथालेखक

छान

राजाभाउ's picture

8 Jul 2016 - 12:43 pm | राजाभाउ

छान आहे गोष्ट !!!

सुबक ठेंगणी's picture

8 Jul 2016 - 1:06 pm | सुबक ठेंगणी

मला राहून राहून "Rules-Pyaar ka Superhit formula" मधल्या आज्जीची आठवण येत होती.

जागु's picture

8 Jul 2016 - 1:09 pm | जागु

छान आहे.

५० फक्त's picture

8 Jul 2016 - 2:46 pm | ५० फक्त

मस्त लिहिलंय, आवडलं.

पैसा's picture

15 Feb 2017 - 7:46 pm | पैसा

कथा खूप आवडली.