रविवारी "किल्ला" (२०१५) पाहिला. अतिशय सुंदर अनुभव देणारा चित्रपट. १०/११ वर्षांचा चिनू आणि त्याची आई चिनूचे वडील नुकतेच गेल्यावर आयुष्याशी तडजोड करत आहे ती परिस्थिती स्वीकारायला शिकतात, त्यांच्या आयुष्यातल्या साधारण एका वर्षातल्या घडामोडीं या चित्रपटात आपल्याला बघायला मिळतात. चित्रपट प्रदर्शित होऊन आता बरेच दिवस झालेत त्यामुळे कथेचा काही भाग इथे त्यानिमित्ताने मनात आलेले विचार लिहिताना आला तर तो स्पॉयलर ठरू नये.
चित्रपटात फोनचा वापर, मुलांचे सुटीतले उद्योग आणि एका प्रसंगात ऑडिओ कॅसेट्सच्या टेपचा गुंतवळ सोडवणे हा प्रकार पाहता चित्रपट कथा १९९४-९५ च्या दरम्यान घडत असावी असे वाटते. चिनूच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले आहे आणि त्याच्या आईची बदली पुण्याहून गुहागरसारख्या एका लहान गावात झाली आहे. तिला ऑफिसात तिच्या स्वतःच्या अडचणी आहेत. चिनूला नवीन जागेत कोणी मित्र नाहीत. मामा आणि मामेभाऊ यांच्या ओळखीच्या सुरक्षित जगातून तो एकदम नव्या जागेत वेगळ्या वातावरणात येऊन पडला आहे. आपल्या मुळापासून उखडले जाणे आणि एकाकीपणा याचा त्याला आयुष्यात प्रथमच सामना करावा लागल्याने तो भांबावतो आणि आणि आपली नाराजी 'हे आवडत नाही, ते आवडत नाही' असे करून आईला दाखवून देतो. दोघांनाही या परिस्थितीशी जुळवून घेणे अवघड जाते आहे.
शाळेतल्या काही टग्या मुलांच्या ग्रुपशी चिनूची मैत्री जमू पाहते. तो स्वभावाने तसा थंड आहे, त्या मुलांनी कुत्र्याना त्रास देणे वगैरे प्रकार त्याला आवडत नाहीत. पण दुसरे कोणी मित्रही नाहीत. त्या मुलांशी काहिसे जमते तोपर्यंत त्या मुलांसोबत एका निर्जन किल्ल्यावर गेलेला असताना वादळ पावसात ते मित्र त्याला एकटा सोडून जातात आणि या प्रकाराने तो पुरता हादरून जातो. एकदा वेळ घालवण्यासाठी एका मासेमारी लाँचवरून तो खोल समुद्रात जातो. तिथे आणि किनार्यावर शेकोटीपाशी त्या मासेमारासोबत चिनूचा तुटपुंजा संवाद त्याला घरी आई आहे, सगळेच हरवले नाही याची जाणीव करून देतो आणि चिनू घरी येऊन आईला घट्ट गळामिठी मारतो तो हलवून टाकणारा क्षण आहे. तेव्हाच बंड्या हा त्याचा उनाड मित्र त्याला दिवसभर शोधत होता हे समजून येते आणि चिनू विरघळतो. परीक्षा संपताना त्यांची मैत्री पक्की होते आणि मग पुढचे काही दिवस ते खूप मजेत घालवतात.
नेमके तेव्हाच चिनूच्या आईची पुन्हा गुहागरहून सातार्याला बदली होते. सिनेमाच्या सुरुवातीला आईला "ही बदली रद्द नाही का होणार?" असे विचारणारा चिनू पुन्हा तोच प्रश्न विचारतो. मात्र यावेळी तो तेवढा उदास नाही. सातार्याला जाऊन बासरी शिकेन असे तो आईला सांगतो आणि सामान आवरायला उत्साहाने मदतही करतो. आपल्याला सतत असे विस्थापित होऊन दुसरीकडे जावे लागेल हे कदाचित त्याला आता उमजले आहे. आधीच समजूतदार असलेला चिनू अधिकच शांत झाला आहे.
चित्रपटाच्या शेवटच्या भागात चिनूला मित्र खर्या अर्थाने मिळतात मात्र त्याना सोडून त्याला लगेच पुढे जावे लागते. प्रत्यक्षात सुरुवातीला ज्या किल्ल्यावर वादळ पावसात त्याचे मित्र त्याला एकटा सोडतात त्या किल्ल्यावर चिनू पुन्हा जाऊ शकत नाही पण चित्रपट संपताना त्याच्या मनातल्या किल्ल्यावर मात्र वादळाचा मागमूस नाही. फुलं, पक्षी आणि लख्ख ऊन असलेल्या किल्ल्यात त्याचे मित्र मजेत बसलेले आहेत. आयुष्य पुढे निघून गेलं तरी त्याच्या मनातले त्याचे मित्र तिथेच तसेच असतील.
एक प्रसंग दीपगृह पाहण्याचा. त्याचे वर्णन चिनू मित्रांकडे करतो ते मुळातून ऐकण्यासारखे. दीपगृहाच्या पायर्या चढताना खूप त्रास होतो मात्र वर पोचल्यावर छान वाटते, एखादी बोटही दिसते; हेच सूत्र किल्ल्याच्या प्रसंगातही वापरले आहे. किल्ल्यातल्या भुयारात असताना चिनू प्रकाशाच्या दिशेने जायला निघतो पण विजेच्या कडकडाटाला घाबरून पुन्हा मागे पळतो आणि मग मित्रांपासून दुरावतो. शेवट मात्र त्याच भुयारातून वर आल्यावर त्याला त्याचे मित्र आपल्याच नादात बसलेले दिसतात. तीच जागा आणि तेच मित्र. फरक फक्त पायर्या चढून येण्याचा आहे. मात्र आता ते मित्र त्याला पाठमोरे असतात. कदाचित आपल्याशिवाय त्यांचे आयुष्य पुन्हा पहिल्यासारखे सुरू आहे याची चिनूला जाणीव होते.
शेवट चिनू सातार्याला जायला निघतो तो त्याने माया लावलेला भटका कुत्रा आणि सायकल बंड्यापाशी सोडून. एरवी कुत्र्यांचा कर्दनकाळ असलेला बंड्या आता मात्र त्या कुत्र्याच्या डोक्यावरून हात फिरवताना दिसतो. हा चिनूमुळे त्याच्यात घडून आलेला बदल आहे. कदाचित कुत्रा आणि सायकल हे दोन दुवे मित्रासोबत कायम ठेवून चिनू सातार्याला जातो आहे, कदाचित तो त्यांच्यानिमित्ताने पुन्हा कधीतरी गुहागरला येईलही. चिनूच्या आधीच्या आठवणींमधे आता किल्ला आणि गावातले मित्र यांची भर पडली आहे. आयुष्यातल्या अनेक थांब्यांवर आपण आपल्या आठवणी अशाच कोणाजवळ ठेवून पुढे जातो, आपल्याला जावे लागते आणि त्यांच्या आठवणी फक्त आपल्यासोबत येतात.
सबंध चित्रपटात एक उदासवाणे वातावरण भरून राहिले आहे. पाऊस आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गातला ओळखीचा निसर्ग ही या चित्रपटातली पात्रेच आहेत. चिनूची भूमिका करणारा अर्चित देवधर, बंड्या झालेला पार्थ भालेराव आणि अमृता सुभाष आपापल्या भूमिका अक्षरशः जगले आहेत. पण चित्रपटातल्या इतर कलाकारांनीही अतिशय नैसर्गिक अभिनय केला आहे. हे यश दिग्दर्शक अविनाश अरूण याचे. त्याचा पहिलाच चित्रपट आहे हे ऐकल्यावर खूपच कौतुक वाटले. प्रत्येक दृश्यात त्याच्यातला सिनेमॅटोग्राफर दिसतो. दुर्दैव की या चित्रपटाला डिस्ट्रिब्युटर्स मिळत नव्हते. बर्लिन चित्रपट महोत्सवात यश मिळाल्यानंतर चित्रपट वितरित होऊ शकला.
चित्रपटाच्या स्थळ-काळाचा विचार करता चित्रपटातली बोलीभाषा आणि काही पात्रांच्या कपड्यांचा नीट विचार करून वापर करणे अपेक्षित होते. पण नवीन दिग्दर्शकाचा पहिलाच चित्रपट असल्याने तेवढ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करता येते. त्याचवेळी चित्रपटातले अनेक प्रसंग पाहताना त्याला दाद दिल्याशिवाय रहावत नाही. वेळ घालवण्यासाठी चिनूने ऑडिओ कॅसेट्सच्या टेपचा गुंतवळ सोडवून पुन्हा कॅसेटमधे गुंडाळण्याचा प्रसंग पाहून एकाच वेळी हसू येत होते आणि भावुकही व्हायला होत होते. प्रत्येकाला आपल्या आयुष्यातल्या आठवणींच्या किल्ल्यावर परत नेणारा हा चित्रपट पाहताना कितीदा डोळे भरून आले सांगता येणार नाही.
अशाच अर्ध्या कच्च्या वयातल्या काही समांतर आठवणी, अनुभव गाठीला असल्याने सहजच चिनूच्या व्यक्तिरेखेशी स्वतःला जोडू शकले. केवळ लहान वय असल्याने तेव्हा खूपशा मायेच्या नात्यांकडे पाठ फिरवून गाव सोडून रत्नागिरीला जाऊन राहिले होते. आता ते इतके सहज शक्य होईल असे वाटत नाही. सिनेमा बघून चार दिवस झाले तरी जिथे आयुष्याचा एक तुकडा सोडून आले त्या रत्नागिरीजवळच्या एका खेड्यात पुन्हा पुन्हा मनानेच पोचते आहे. या माझ्या आठवणींच्या किल्ल्यात प्रत्यक्षात जावेसेही खूप वाटते. पण काळाच्या निष्ठूर हाताने या किल्ल्यात काय बदल झाले असतील याची भीतीही वाटते. स्वप्नातून जागे होण्यापेक्षा आठवणींचा किल्ला तसाच आहे तिथे राहू दे.
प्रतिक्रिया
2 Jun 2016 - 11:40 pm | सतिश गावडे
यामुळे कथा सशक्त असूनही चित्रपट अंगावर येतो. :(
2 Jun 2016 - 11:50 pm | प्रचेतस
चित्रपट पाहिला नाही पण परिचय आवडला.
3 Jun 2016 - 10:00 am | वपाडाव
मराठी ना सिनेमा... सिविल वॉर रांगेत लागुन पाह्यला नाही का?
ते मार्वल उचक्या लागुन लागुन मरुन जाइल एके दिवशी तुमच्यामुळे...!!!
3 Jun 2016 - 3:39 pm | किसन शिंदे
=)) =))
ते शेवटी तुमचं अजून एक पेटंट वाक्य राहीलं वपाडाव सर.
3 Jun 2016 - 4:53 pm | प्रचेतस
कुठलं हो?
3 Jun 2016 - 5:47 pm | सूड
सच्चं भणं गोदावरी का कायसं?
3 Jun 2016 - 6:10 pm | प्रचेतस
अरे काय, कुठल्याही मराठी पिक्चरला मी कधीही वाईट म्हणलेलं नसताना मला फुकट बदनाम केलंत.
हा चित्रपट अवश्य पाहीन.
4 Jun 2016 - 8:42 am | नाखु
म्हटलं म्हणून मन मारून बघू नका उगा मला, वप्या,किस्नाला पाप लागेल.
हा अता दुसरं कुणी आग्रहानी घेऊन जात असेल तर नक्की जा अजिबात अडविणार नाही.
खुलासा संपला.
मराठीच्या पण पिटातला नाखु
4 Jun 2016 - 8:55 am | यशोधरा
=)) =))
2 Jun 2016 - 11:59 pm | बोका-ए-आझम
चित्रपट visually खूपच सुंदर आहे. त्यामुळे कथा थोडीशी दबली जाते. अर्थात हे माझं मत. दिग्दर्शक फ्रेमच्या प्रेमात पडल्यासारखे अनेक प्रसंग आहेत. विशेषतः समुद्राचे. अर्थात तिथला समुद्र हा प्रेमात पडण्यासारखाच आहे.
3 Jun 2016 - 3:13 am | विजुभाऊ
.
सहमत. मूळचा कॅमेरामन जेंव्हा दिग्दर्शक होतो तेंव्हा हे अनुभव येतातच. पण काही म्हणा. तो मुले तळ्यात पोहायला उड्या टाकतात त्या एका शॉट साठी चित्रपट दहा वेळा पहावा. फोटोग्राफीचा वस्तू पाठ आहे तो सीन म्हणजे.
3 Jun 2016 - 12:02 am | जव्हेरगंज
जिथे आयुष्याचा एक तुकडा सोडून आले त्या रत्नागिरीजवळच्या एका खेड्यात पुन्हा पुन्हा मनानेच पोचते आहे.
येऊ द्यात की तिथल्या निसर्गरम्य आठवणी! (म्हणजे लिखाणाच्या स्वरूपात )
3 Jun 2016 - 9:13 pm | प्रदीप
पण कदाचित नकोच. आपल्या स्वतःच्या हळव्या, वैयक्तिक आठवणी स्वत:पाशीच रहाव्यात असे वाटणे साहजिक आहे.
लेख आवडला, त्यातील चित्रपटाच्या थीमचे इंटर्प्रीटेशन सुंदर लिहीले आहेत, प्रसंगांच्या कडाही छान उलगडून दाखवल्या आहेत.
चित्रीकरणाविषयी मी थोडा साशंक आहे, पण ते असूंदे.
3 Jun 2016 - 10:15 pm | पैसा
खरे तर तुमची खरडफळ्यावरची चर्चा वाचून हा सिनेमा मी अगदी लक्षात ठेवून पाहिला. मोठ्या स्क्रीनवर बघणार्यांना नक्कीच जास्त चांगला दृश्यानुभव आला असणार. मी पाहिला तो टीव्हीवर. मला त्यातले बरेचसे चित्रिकरण पात्रांच्या आणि प्रसंगाच्या मूडनुसार वाटले. एकूण मूड उदास असल्याने बरेचसे चित्रीकरण काळोखे वाटते. कोकणातली जुनी घरे अशीच काळोखी असतात आणि पाऊस भरून येतो किंवा कोसळत असतो तेव्हाही प्रकाश कमीच असतो. त्यांनी बहुधा जास्तीत जास्त नैसर्गिक प्रकाशात चित्रिकरण केले असावे. आणखीही काहीजणांचा आक्षेप आहे की दिग्दर्शक हाच छायाचित्रकार असल्याने फ्रेम्सच्या प्रेमात दिसतो. त्यामुळे संवादांपेक्षा दृश्यांवर जास्त भर वाटतो. याबद्दलही तुमची एकूण मते वाचायला आवडतील.
3 Jun 2016 - 10:46 pm | प्रदीप
खरे तर काळोखातील दृश्ये चांगली चित्रीत केली आहेत. पण मला वाटते, बाहेरील (आऊटडोअर) चित्रीकरणांत काँट्रास्ट बराच कमी आहे. ती बहुतेक सगळी दृश्ये मलातरी अगदी फ्लॅट वाटली. कदाचित तुम्ही म्हणता तसा उदास मूड आणण्यासाठी ते तसे केले हेतुतः केले असावे, अशीही शक्यता आहेच."आणि पाऊस भरून येतो किंवा कोसळत असतो तेव्हाही प्रकाश कमीच असतो. त्यांनी बहुधा जास्तीत जास्त नैसर्गिक प्रकाशात चित्रिकरण केले असावे". हे कारण बरोबर असावे असे वाटते. पण टी. व्हीवर लो काँट्रास्ट्ची चित्रे चांगली वाटत नाहीत*. मोठ्या पडद्यावर कदाचित ते इतके खटकणार नाही.
दुसरे म्हणजे सबंध चित्रीकरणात कुठेही क्लोजअप्स नाहीत हे मला खटकले. दोन पात्रांत, जसे आई व मुलगा-- ह्यांच्यातील प्रसंगांत तसे ते असते तर ते अधिक परिमाणकारक झाले असते. क्लोजप्स असावयासच पाहिजेत असा अट्टाहास कशाला, असा (रास्त) प्रश्न मला केला गेला. क्लोजप्सनी चेहर्यावरचे भाव, त्यात होणारे सूक्षम बदल हे झटकन व अतिशय परिणामकारक दाखवता येतात. म्हणून काही विशीष्ट प्रसंगी ते असावेत, त्यामुळे प्रसंगाची तीव्रता अधोरेखित होते. (आपल्या पारंपारीक सिनेमात गुरू दत्तने क्लोजप्स, तसेच लो- अँगल शॉट्स अतिशय परिणामकारक रीत्या वापरले आहेत).
(* तांत्रिक दृष्ट्या टेलिव्हिजनमध्ये मूळ चित्रातील काँट्रास्ट हुबेहुब दर्शवण्याची क्षमता, फिल्म्स्पेक्षा कमी आहे, व आपल्या डोळ्यांना दिसते त्यापेक्षा बर्याच पटींनी ती कमी आहे. म्हणून तर, UHDTV अथवा ज्याला सरसकट 4KTV असे संबोधले जाते, त्यातील एक अतिशय महत्वाचा भाग म्हणजे काँट्रास्ट (डायनॅमिक रेंज) वाढवणे, ह्याला HDR असे संबोधले जाते).
3 Jun 2016 - 10:54 pm | सतिश गावडे
छायचित्रणाच्या संदर्भात काँट्रास्ट चा नेमका अर्थ समजावून सांगू शकाल का?
आम्हाला अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाला "टेलिव्हिजन इंजिनीयरींग" असा विषय होता. त्यातही काँट्रास्टचा उल्लेख बरेच वेळा यायचा. तेव्हाही नेमका अर्थ कळला नव्हता. मात्र मी माझ्या सोयीसाठी त्याचा "काळ्या आणि पांढर्या रंगाचे एकमेकाशी असणारे गुणोत्तर" असा अर्थ काढला होता. ;)
4 Jun 2016 - 5:11 pm | प्रदीप
हे तांत्रिकी असल्याने इथे मराठीतून मला लिहीता येणार नाही. तेव्हा इंग्लिशमधून तुमच्या खरडवहीत उतर देत आहे.
3 Jun 2016 - 11:02 pm | पैसा
क्लोज अप्स नव्हते खरे. तेही काही कारणाने मुद्दाम केले असेल तर दिग्दर्शकाचे म्हणणे काय हे कुठेतरी आले असेल. दिग्दर्शक स्वतःच छायाचित्रकार असल्याने त्याच्या हातून तांत्रिक चुका होतील असे वाटत नाही. आज कुठेतरी वाचले की मसानचे चित्रीकरण त्यानेच केले आहे.
लो काँट्रास्टबद्दल तुम्ही म्हटल्याप्रमाणे हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहिल्यावर किती फरक पडतो बघावे लागेल.
4 Jun 2016 - 5:48 pm | प्रदीप
क्लोज अप्स नव्हते ही काही 'चूक' आहे असे मी म्हणत नाही. तसे म्हणणारा मी कोण, खरे तर? आपले टेकिंग कसे असावे ह्याविषयी अर्थात प्रत्येक सजग दिग्दर्शकाच्या काही कल्पना असणारच. तेव्हा त्यांनी क्लोज अप्स का वापरले नाहीत,ह्याची अनेक कारणे असू शकतात-- तसे त्यांना जरूरीचे वाटले नाही, येथपासून काही तांत्रिकी अडचणी (उदा. लेन्स उपलब्ध असणे) पर्यंत काहीही.
मी केवळ माझे मत मांडले, इतकेच.
4 Jun 2016 - 5:54 pm | पैसा
दिग्दर्शक स्वतः छायाचित्रकार असल्याने क्लोज अप्स जास्त प्रभावी ठरतात याची त्याला कल्पना असेलच. त्यामुळे दुसर्या काही कारणाने त्याने वापरले नसतील. पैसे खूप कमी होते असे त्याने एकीकडे म्हटले होते. तेव्हा लेन्स नसेल हे अगदी शक्य आहे.
4 Jun 2016 - 7:44 am | यशोधरा
हा सिनेमा कृष्णधवल असता, तर अधिक प्रत्ययकारी झाला असता का? आणि तसा असता तर क्लोजअप्सचा अभाव जरा कमी जाणवला असता का?
4 Jun 2016 - 5:43 pm | प्रदीप
आपली केवळ मते असू शकतात. अर्थातच ह्यात बरोबर अथवा चूक असे काही नाही. हा सिनेमा कृष्णधवल असता तर कदाचित तो (माझ्या मते) अधिक प्रत्ययकारी झाला असता. रंगांनी डिस्ट्रॅक्शन होते का? बहुधा तसे असेलही. अर्थात कृष्ण्धवल नुसते असून उपयोग नाही, दिग्दर्शक, सिनेमाटोग्राफर, व इतर संबंधित तंत्रज्ञ तो कसा हाताळताहेत त्यावर बरेच काही अवलंबून असेल. ह्यात लायटिंग, शॉट्सचे टेकिंग, तसेच सेट्सवरील सामानाचे रंग व पोत, कॉस्च्युम्स इत्यादी अनेक बाबी आल्या.
अवांतरः ह्या कृष्णधवलवरून आठवले, गौतम राजाध्यक्षंचा एक लेख वाचनात आला होता. त्यात ते व अमिताभ बच्चन एकदा पोर्ट्रेट्स फोटोग्राफीवरून काही चर्चा करीत होते. तेव्हा कृष्णधवल पोर्ट्रट्सचा विषय निघाला. राजाध्यक्षांनी त्यांची काही कृष्णधवल पोर्ट्रट्स दाखवली. हे अॅप्रिसिएशन सुरू असतांना अचानक तिथे सौ. बच्चन आल्या व त्यांनी नाक मुरडून त्यांना कृष्णधवल फोटोग्राफी अथवा सिनेमाटोग्राफी अजिबात आवडत नसल्याचे जाहीर केले. त्यावर, अमिताभने सुस्कारा सोडत बायकोकडे केवळ एक कटाक्ष टाकला, असे राजाध्यक्षांनी नमूद केले आहे.
4 Jun 2016 - 5:51 pm | पैसा
कृष्णधवल चित्रपट खरेच अगदी जादुई वाटतात. कृष्णधवल सिनेमातली वहिदा रेहमान किंवा मधुबाला या रंगीत सिनेमापेक्षा खूपच जास्त जादुई वाटतात.
4 Jun 2016 - 6:15 pm | यशोधरा
मलाही तसेच वाटले होते सिनेमा पाहताना. :)
3 Jun 2016 - 12:11 am | रेवती
चित्रपट परिचय आवडला.
3 Jun 2016 - 12:55 am | खटपट्या
खूप छान लीहीले आहे.
तुम्ही उगाच संपाद्कपदाच्या जबाबदारीत पडून न रहाता ललीत लेखन करत रहावे असे वाटते..
3 Jun 2016 - 1:07 am | स्रुजा
वाह पै ताई. फेबु वर तुझी पोस्ट वाचुन च किल्ल्या बद्द्ल उत्सुकता होती. त्या पोस्ट मध्ये भर घालुन तू धागा केल्यावर अजुन च वाढली आहे. सुरेख परिक्षण !
3 Jun 2016 - 1:18 am | निओ
सुंदर चित्रपटाचे सुंदर परीक्षण
खूप छान लिहील आहे. मुळात चित्रपटात संवाद कमी आहेत. दिग्दर्शकाचा पात्रांच्या भावना टिपण्यावर भर आहे. indoor असो कि out door प्रत्येक frame काटेकोरपणे निवडली आहे.
3 Jun 2016 - 1:30 am | पद्मावति
फार सुरेख लिहिलंय. आता खूप पहावासा वाटतोय हा चित्रपट. पाहणार नक्कीच.
3 Jun 2016 - 2:33 am | चावटमेला
किल्ला नितांतसुंदर चित्रपट आहे.
मला १९९४-९५ चा काळ वाटला कारण एका प्रसंगात बंड्या च्या तोंडी चंद्रकांता मालिकेचे शीर्षकगीत ऐकू येते
3 Jun 2016 - 9:51 am | पैसा
बरोबर आहे. आणखी काही ठिकाणी बंड्याच्या तोंडी "यक्कु" हा संवाद आहे. मला एग्झॅक्ट वर्ष पिनपॉइंट करता आले नव्हते. आता लेखात बदल करत आहे.
3 Jun 2016 - 9:18 pm | प्रदीप
कुठलाही असेना का? तो तपशिल झाला. तो थोडाफारच काय अगदी एखादे शतक जरी इथेतिथे झाला, तरी त्यामुळे चित्रपटाच्या गाभ्यास काहीच धक्का पोहोचत नाही. स्थलकालाबाधित जी टिकून रहाते, ती चांगली कलाकृति असते, त्या कॅटेगरीमधे ह्या चित्रपटाचा समावेश व्हावा.
3 Jun 2016 - 6:11 am | आतिवास
परिचय आणि त्या निमित्ताने सांगितलेल्या (काही) गोष्टी आवडल्या.
3 Jun 2016 - 6:56 am | चांदणे संदीप
बऱ्याच दिवसांनी लिहिलंत... पण एकदम सुरेख!
किल्ला चित्रपट नाही पाहिला पण तुम्ही कथा सुंदररित्या उलगडून समोर ठेवलीत!
पुढील लेखनासाठी शुभेच्छा!!
Sandy
3 Jun 2016 - 8:31 am | नाखु
कन्येला आणि मुलाला सिनेमा आल्या आल्या दाखविला होता. लेकीलाही आवडला.
पाऊस अंगावर येणे म्हणजे काय त्याच्या अनुभुतीसाठी मोठ्या पडद्यावर बघणे अनिवार्य.
शहरातल्या किल्ल्यातला नाखु
3 Jun 2016 - 8:54 am | जेपी
लेख आवडला.
3 Jun 2016 - 9:40 am | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर चित्रपट परिचय !
या ना त्या कारणाने बघायचा राहिला हा चित्रपट. काही तरी करून बघायला हवा.
3 Jun 2016 - 9:45 am | मुक्त विहारि
सिनेमा बघीनच असे नाही....
3 Jun 2016 - 9:58 am | समीरसूर
छान परीक्षण!
'किल्ला' मी टीव्हीवर पाहिला. सिनेमाटोग्राफी उत्कृष्टच आहे. सुरुवातीचा पाऊण तास खूप संथ आहे चित्रपट. पण मग नंतर अमृताची एका आरोपामुळे होणारी बदली, त्या मुलाचं मित्रांवर चिडणं वगैरे भाग जरा उत्कंठावर्धक वाटतो. मोस्टली लोकांना फारसा पसंत पडला नाही 'किल्ला'. मी ज्यांना ज्यांना विचारलं त्यांना चित्रपटातून नेमकं काय म्हणायचं आहे आणि जे म्हणायचं आहे ते इतकं एनक्रिप्ट करून का सांगीतलं आहे हेच कळलं नाही. अभिनय सगळ्यांचा छानच आहे. कोकणातली घरं, समुद्र खूप सुंदर दाखवलं आहे. प्राथमिक टारगेट प्रेक्षक जर मुलं असतील तर त्यांना कसा आवडणार इतका संथ आणि गहन चित्रपट? थोडा सोचना चाहिये था....अर्थात दिग्दर्शकाच्या व्हिजनला आपण चेलेंज नाही करू शकत.
3 Jun 2016 - 10:17 am | पैसा
चित्रपट मुलांसाठी नाहीये. सतत विस्थापित होणार्या, एकट्या पडणार्या जिवांचा प्रवास दाखवायचा असावा असं वाटलं. त्यासाठी लहान मुलगा नायक असल्याने त्याला न कळणार्या अनेक गोष्टींमुळे ते अधिकच कठीण होते. चित्रपट तसा संथ वाटेलच. कारण चित्रपटात तसे फारसे काही घडत नाही. परिस्थितीशी जुळवून घेण्याची आई आणि मुलाची धडपड केंद्रस्थानी दिसते.
चित्रपटाचा जास्त भर संवादांपेक्षा दृश्यांवर आहे असे मला वाटले. त्यामुळे ज्यांनी चित्रपटाशी मिळतेजुळते अनुभव घेतले आहेत त्यांना चित्रपट अधिक भावेल.
3 Jun 2016 - 10:48 am | समीरसूर
तुम्ही म्हणता तसे शक्य आहे. 'किल्ला' मला अगदी आवडला असं जरी मी म्हणणार नाही तरी उत्सुकतेने पाहिला आणि त्या मुलाची आणि त्याच्या आईची व्यावहारिक जगात शिरून सराईतासारखे जीवन जगण्याची ओढ, या प्रयत्नांच्या आड येणारा मनस्वीपणा, स्वकेंद्रितपणा, भीड, आणि त्यामुळे त्यांची होणारी घुसमट या भावना नीटपणे पोहोचल्या.
6 Jun 2016 - 8:19 am | नमकिन
चित्रपट थेटरात पाहिला होता.
पुरस्कार प्राप्त कलाकृती आहे म्हणून ऊत्साहाने व उत्सुकतेने गेलो होतो. जो कालावधी ९२-९४चा वाटतोय तेव्हाचे आम्ही आम्हाला दिसलो.
परवा TV वर पाहताना आईचा अभिप्राय हाच होता की लहान मुलांसाठी कुठेय हा सिनेमा, तेव्हा त्या लहान मुलाचे भावविश्व, भावनात्मक स्थिति, मित्र व नाते अनुभव, नवीन जागा, माणसे, परिसर तसेच परिस्थितियांना सामोरे जातानाचे भाव बघायचे, चित्रण पहायचे.
असो,निरीक्षण छान.
3 Jun 2016 - 9:59 am | वपाडाव
मी खुप भारावलो होतो सिनेमा पाहताना. इतक्या लहान वयात माझ्यावर कधी ही वेळ नाही आली.
पण जब से होश संभाला है, १२ गांव का पाणी पी रहे है.
पैतै, लय णॉस्टॅल्जिक करुण सोडले की हो तुमी.
मित्र, मैत्री, शहर अन आठवणी पावसात वाहुन नदीला अन तिथुन समुद्राला मिळत जातात.
कदाचित म्हणुनच ते पाणी (आसवांच्या प्रमाणामुळे) खारे होत असावे. जीवनाच्या क्षणाक्षणावर प्रेम करत आलो आहे.
असो. निरोप घेतो. स्क्रीन दिसत नाहीये नीट.
पैतै, लय णॉस्टॅल्जिक करुण सोडले की हो तुमी...
पैतै, लय णॉस्टॅल्जिक करुण सोडले की हो तुमी...!! :(
3 Jun 2016 - 10:23 am | सतिश गावडे
अब रुलायेगा क्या "स्कॉलरशीप"?
5 Jun 2016 - 8:34 pm | नमकिन
म्हणजे?
"काय शिष्यवृत्ती!" केसातुन बोटे फिरवुन गुणी बाळ आहें ते.
3 Jun 2016 - 10:07 am | जयंत कुलकर्णी
मस्तच ! प्रतिक्रियाही अत्यंत बोलक्या आहेत...
3 Jun 2016 - 10:13 am | स्पा
मस्त लिहिले आहे, सेम अशाच भावना दाटून आल्यात , एक एक फ्रेम म्हणजे पेंटींग आहे सिनेमातली, जियो
3 Jun 2016 - 10:17 am | ए ए वाघमारे
छान लिहिलंय !
तुम्ही टीव्हीवर जाहिरातीसकट सिनेमा बघितला. धन्य आहे तुमची !
असो, आता तुमच्या धाग्यात आमची घुसखोरी उर्फ आमची जाहिरात: किल्लाबद्दल माझा लेख इथे वाचता येईल.
3 Jun 2016 - 10:25 am | पैसा
तुमचा हाच लेख सकाळी मायबोलीवर वाचला. तिथे कोणीतरी 'किल्ला' बद्दल लिहिले असेल तर शोधू म्हणून हा लेख पोस्ट करण्यापूर्वी सकाळीच शोध घेतला, तेव्हा सापडला. आता तिथे पुन्हा लिहीत नाही.
तुम्ही छान लिहिले आहे. चित्रपटाचा सर्वांगीण विचार तुम्ही केला आहे. त्यामुळे तुमचे परीक्षण आवडले. यावर तिथल्या प्रतिक्रिया वाचूनही बरे वाटले, की मला हा चित्रपट बराच कळला!
3 Jun 2016 - 10:44 am | ए ए वाघमारे
तो लेख काहींना रूचला नाही.जास्त टीकात्मक वाटला.मुळात एखाद्या कलाकृतीबद्दल काही लिहावसं वाटणं हीच तिच्या गुणवत्तेची पहिली खूण असते असं माझं मत आहे.असो.
मी त्यावेळी कदाचित मिपावर जास्त अॅक्टीव्ह नसेल त्यामुळे तो लेख इथे टाकायचा राहिला.आणि आता इतक्या उशीरा टाकण्यात अर्थ नाही.
3 Jun 2016 - 10:59 am | सस्नेह
लेख सुबक, पण परिचय काहीसा अस्वस्थ करून गेला. चित्रपट आवर्जून पाहावा, असं परिचय वाचून नाही वाटलं.
पैताईचे लेखन फारच कमी असते पण दर्जेदार.
3 Jun 2016 - 11:00 am | शान्तिप्रिय
छान परीक्षण. मीहि पाहिला टीव्हीवर आवडला.
कथा जरा जटील वाटते.पण "विहिर" चित्रपटाइतका अनाकलनीय नक्कीच नाही.
3 Jun 2016 - 11:23 am | मराठी कथालेखक
विहीर तर अजिबातच झेपला नव्हता.
3 Jun 2016 - 6:00 pm | जव्हेरगंज
'विहीर' भयंकर आवडला होता.
4 Jun 2016 - 7:10 am | रेवती
मलाही विहीर फार आवडला होता पण एका मर्यादेनंतर बंद केला.
3 Jun 2016 - 11:01 am | शान्तिप्रिय
छान परीक्षण. मीहि पाहिला टीव्हीवर आवडला.
कथा जरा जटील वाटते.पण "विहिर" चित्रपटाइतका अनाकलनीय नक्कीच नाही.
3 Jun 2016 - 11:06 am | मारवा
सुंदर वेध घेतलाय सिनेमाचा
लेख वाचतांना नकळत लेखिकेची संवेदनशीलता व चित्रपटाच्या अनुभवाशी झालेली समरसताही जाणवत राहते.
हे त्या भौगोलिक परीसराशी असलेल्या जवळिकीमुळे देखील होत असावे का ?
हा चित्रपट बघायला हवा
3 Jun 2016 - 11:12 am | मारवा
तो वरीलच प्रश्न असा की समजा एक शिवाजी महाराजांवरील चित्रपट आहे. व त्यात सह्याद्री गड किल्ले यांच चित्रीकरण आहे. तर एक महाराष्ट्रीयन प्रेक्षक असेल व त्याच्या ते चांगल परीचयाच असेल व तो हा चित्रपट पाहत असेल तर ती बॅकग्राउंड त्याच्या चित्रपट पाहतांनाच्या अनुभवावर कसा प्रभाव टाकते व एक समजा इटालियन माणुस आहे या सर्वांशी अपरीचीत तर त्यावर कसा प्रभाव पडत असेल ? तो मग कथानकात फोकस होत असेल
काय होत असेल
3 Jun 2016 - 11:18 am | पैसा
तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे. आपले जुने अनुभव नव्या अनुभवांवर प्रभाव टाकतात. सिनेमात दृश्य संवाद अभिनय दिग्दर्शन याचा समतोल असेल तर तो सगळ्यांना आवडेल. पण तसे नसेल तर ज्यांना असे काही समांतर अनुभव असतील त्याना सिनेमा जास्त भावेल. काहीजणांना जवळचे अनुभव नसतील तर त्यातली सुंदर दृश्ये किंवा नाट्यमयता याचा तुकड्या तुकड्यानी जास्त प्रभाव पडेल.
3 Jun 2016 - 11:21 am | मराठी कथालेखक
लहान मुलांचे भावविश्व वगैरे दाखविणारे चित्रपट बघण्यात रस नसल्याने किल्ला पाहिला नाही.. मराठीत असे चित्रपट खूपच मोठ्या संख्येने येतात आणि एलिझाबेथ एकादशी वगैरे कंटाळवाणे चित्रपट पाहून आता असे चित्रपट बघायची इच्छा नाही.
तुमचा लेख चांगला आहे.
3 Jun 2016 - 11:26 am | उल्का
छान लिहिले आहेस. शेवटच्या वाक्यातील 'आठवणींचा किल्ला' हा शब्द्प्रयोग खास आवडला.
3 Jun 2016 - 12:46 pm | सतिश पाटील
एलिझाबेथ एकादशी आवडला.
पण किल्ला ने अपेक्षाभंग केला.
3 Jun 2016 - 1:09 pm | सतिश गावडे
अशा चित्रपटांचे कथानक, त्यातली पात्रं, प्रसंग प्रेक्षकांच्या व्यक्तीगत आयुष्याशी कितपत रेझोनेट होतात यावरुन चित्रपट आवडतो किंवा आवडत नाही.
आमच्या एका मित्राला "फाईंडिंग फॅनी" आवडला होता. कारण त्या चित्रपटातील ख्रिश्चन माई त्याच्या बालपणीच्या आठवणींशी रेझोनेट झाली. खुद्द या धाग्याच्या लेखिकेने हा चित्रपट तिच्या व्यक्तीगत आयुष्याशी रेझोनेट होत असल्याचे म्हटले आहे.
3 Jun 2016 - 1:42 pm | अनुप ढेरे
सुंदर सिनेमा आणि तेवढाच सुंदर लेख!
3 Jun 2016 - 2:30 pm | मित्रहो
चित्रपट बघितला नाही आता बघायला हवा. मला स्वतःलाही तरी असा अनुभव आला नाही. कधी कधी वाटायचे आपण पण वेगळ्या गावात वगेरे का जात नाही. माझ्या दहा वर्षाच्या मुलाने गावातल्या गावात घर बदलायला नकार दिला.
अवांतरः लहान मुलांच्या मनातल्या भावना, त्यांच्या गरजा हा विषय सतत येतोय असे वाटते. येनारा गणवेष तसाच वाटतो, २० म्हणजे २० पण मुलांची शाळा वगेरे त्यातच मोडनारा.
3 Jun 2016 - 3:24 pm | पूर्वाविवेक
सरकारी नोकरी असल्यामुळे माझ्याही आई-बाबांच्या बदल्या व्हायच्या. मला कळते यातली वेदना. झाड रुजायला लागल की त्याला उपटून दुसरीकडे न्यायचं, असाच हा प्रकार आहे काहीसा.
3 Jun 2016 - 3:38 pm | किसन शिंदे
चित्रपटाची ओळख अगदी नेमक्या भाषेत दिलीये.
3 Jun 2016 - 3:48 pm | सूड
रिलीज झाला त्याच वीकेंडला जाऊन पाह्यला होता. ह्याबद्दल काय वाटलं ते शब्दात सांगणं कठीण आहे.
3 Jun 2016 - 10:52 pm | एस
लेख सात वेळा वाचून झाला आहे. 'फारच छान' - टाईप लिहिण्यापेक्षा नंतर प्रतिक्रिया देईन सविस्तर. तूर्तास मनातल्या किल्यात फेरफटका मारून येतो जरा.
4 Jun 2016 - 10:11 am | अभ्या..
आवडलेला चित्रपट पण अगदी मनापासून असे नाही. बरा वाटला. काहीतरी कमीय हे जाणवत होते. काय ते कळले नाही. प्रदीपदांच्या प्रतिसादाने थोडासा अंदाज आला पण परत पाहू शकणार नाही हा चित्रपट.
4 Jun 2016 - 10:16 am | सानिकास्वप्निल
छान परीक्षण, मस्तं लिहिले आहेस. चित्रपट पाहिलाय, बरा वाटला फारसा रूचला नव्हता,पण तुझा लेख उत्तम आहे, आठवणींचा किल्ला हे फार आवडले.
4 Jun 2016 - 6:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चित्रपट परिक्षण पोहचलं. धाग्यावरचे प्रतिसादही चांगले आले आहेत.
चित्रपट मी थेट्रात पाहिलाय मला आवडलाय चित्रपट.
लिहित राहा. हल्ली तुमचं लेखन कमी झालंय, अशी तक्रार करतो.
पुलेशु.
-दिलीप बिरुटे
5 Jun 2016 - 11:15 am | भरत्_पलुसकर
परीक्षण आवडलं.
5 Jun 2016 - 10:19 pm | अजया
सुरेख परिचय.पिक्चर बघतेच आता.
6 Jun 2016 - 8:34 am | सखी
परीक्षण आवडलं होतच पैताई, आज वेळ मिळताच पाहीला हा चित्रपट. उदास वातावरण असलं तरी काहीतरी सकारात्मक पाहतेय असं जाणवत होतं कदाचित तो आईच्या भूमिकेतला अटीट्युड मुलामध्ये आला असावा.
मला ते दीपगृहाचे वर्णन तसेच सागराची कविताही खूप आवडली.
6 Jun 2016 - 12:39 pm | मार्मिक गोडसे
छान परीक्षण.
लो बजेट व लो लाइटमध्ये क्लोज अप शॉट घेणे हे तांत्रिकदृष्ट्या कठीण काम असते. क्लोजअप लेन्स नसेल तर टेली लेन्सनी क्लोज अप शॉट फोकस करणे फार त्रासदायक असते. मिडिअम शॉटमुळे चेहर्यावरील हावभावाबरोबर पात्रांची देहबोलीही टिपता येते. चेहर्यावरील सु़क्ष्म हावभाव दाखवण्याचा नादात बर्याचदा शॉटमधील सलगपणास बाधा येते. क्लोज अप शॉटमुळे प्रेक्षकापर्यंत हावभाव थेट पोचतात परंतू मिडिअम शॉटमुळे प्रेक्षकाला हावभाव, संवाद व पात्रांची देहबोली टिपणे थोडे जिकिरीचे होते.
6 Jun 2016 - 1:13 pm | वेल्लाभट
बघायचा राहिलाच. आधीही आत्ताही. बघायला हवा पण.
6 Jun 2016 - 11:12 pm | मनिष
चित्रपट आवडलाच, आणि हे लिखाणही मस्त झालंय!!!
माझेही तसेच झाले. त्यामुळेच मला लिहीता नाही येणार याविषयी....तुम्ही खूप छान लिहिलंय!!
8 Jun 2016 - 1:48 pm | पैसा
सर्व वाचक आणि प्रतिसादकांना मनापासून धन्यवाद! 'किल्ला' सिनेमा पाहिल्यानंतर फेसबुकवर एक छोटी पोस्ट लिहिली होती. ती लोकांना आवडली, पण माझे मात्र समाधान झाले नव्हते. तिच्यात भर घालून मिपावर लिहिले आणि त्याला इथे उत्तम प्रतिसाद मिळाला. सिनेमा थोडा उदास, गंभीर असला तरी आशावादी शेवट आहे. ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी जरूर बघा!
11 Jun 2016 - 1:24 pm | संदीप डांगे
लेखन आवडले. किल्ला पहिल्या फटक्यात आवडला नव्हता. तिसर्यांदा आत "उतरला".
माझी दोन्ही मुले ( वय ६ + २ ) लॅपटॉपवर पाहतात बरेचदा. त्यांना काय आवडतं त्यात हा प्रश्न मला पडतो.