तापोळा -२ : तांब्या बुडूक

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
1 Jun 2016 - 9:26 pm

घरं पेटवणारा माणूस रात्रीचं बाहेर पडायचा. ऊस तोडणाऱ्या नगऱ्यांची खोपटी पेटवून द्यायचा. राकेलचं डबडं आणि काडेपेटी घेऊन हिंडायचा. दिवसा बाजरीच्या ताटात, कडवाळात, फडात लपून बसायचा.

छपराला एक ठिकरी जरी लागली तर एका रातीत जळून खाक. कवाडं घट्ट लावून वाडी झोपायची. कडी कोयंड्यात सांडशी, उंबऱ्यात दगडं ठेवून चिमणी विझवली जायची. मिट्टं काळोखानं उरात धडक्या भरायच्या. भिताडाबाहेरची भेसूर शांतता वळचणीला येऊन लपायची. वैऱ्याची रात्र वाडीला गिळून टाकायची.

दगडी रस्त्यानं गाडी खडखडत चालते. डेरेदार झाडं पांघरुन मोठाले राक्षस डोळे मिटून घेतात. दाटिवाटीच्या रानातून त्यांच्या तलवारी सळसळत बाहेर येतात. कंदिलाचा टेंभा वाढवला जातो. ठरल्या मार्गानं बैलं चालत राहतात. त्यांच्या गळ्यातल्या घंटीनं एक ताल पकडलाय. मध्येच आडव्या गेलेल्या खडग्यात गाडीचं चाक घुसतं. हिसडा बसतो. चिखलात चाक रुतत जातं. गाडी उरळी होते. औताच्या सापटीत बैल फरफटत जातो. मामा जू वरनं खाली उडी मारतो. रजईतली दोघं उतरंडीवर घसरतात. संब्याचा गुडघा खरवडून निघतो. दगडावर डोकं आपटून तोही सुन्न.

ढणाण वाऱ्यात रडण्याचीही चोरी. उभ्या चिंचेखालचा भयाण काळोख त्याच्याकडं बघून सावज हेरतो. कपाळातून भळभळ वाहणारं रक्त आता त्यालाही जाणवतंय. संब्याचा चिरका सुर काळीज धडाडून सोडतो.

अंदाजानंच पाय टाकत दोघे वर येतात. कंदिलाच्या उजेडात लालभडक कपाळ दिसतं. स्वतःलाच शिव्या घालत मामा जखमेवर चुना लावतो. मग बराच वेळ मामा कंदिल घेऊन बैलांचं पाय चापचत राहतो. गाडी तिथंच सोडून बैलांना घेऊन पायीच निघतो. मागोमाग दोघे चालत राहतात. लिंबाच्या उंच झाडाखालून जाताना हात पसरून कवेत घेणारी हाडुळीण त्याला दिसते. डोळे गच्च मिटून चालता येईल का? डोळे मिटून तो चालतही राहतो.

ही वाट कधीच संपणार नाही. ह्या काळोखात आभाळ बुडून जाईल. ही झाडं काळीच राहतील. बहिरी ससाणा आता शोधायचा तरी कुठे. पण त्याला चालतच राहावे लागणार. त्याशिवाय काही पर्यायच नाही.

घरं पेटवणारा माणूसपण आता कुठूनतरी बाहेर येईल. तो दिसतो तरी कसा बघायला हवा. दुपारी माळावर चेटकीणीचं घर त्यानं बघितलं होतं. पण लांबून. खूप लांबून. एवढ्या लांबून की नीट त्याला दिसलंही नव्हतं. उन्हाच्या झळयात तरंगून गेलेलं. कुसळात पळणाऱ्या काळवीटासारखं. लांबवर जावून ती पण अशीच तरंगायची.

गुडघा खरवडला म्हणूनच संब्या आज गपगार आहे? त्यालापण आंधाराचं भ्या वाटत आसणार. पाय तुटून गेले तरी तो चालतच राहणार. पण तो लंगतोय का? दिसत नाही.

नागमोडी पायवाट पसरत जाते. चढावर जाऊन पुन्हा खाली उतरत राहते. वगळीवरची बाभळ ओळखीच्या खुणा सांगते. तिचं वळदार खोड नजरेत भरतं. खाली केक्ताडात म्हातारं भुत राहतं. बाजू बदलून तो चढणीला लागतो. बाभळ पिसारा फुलवून जवळ येते. गर्द केक्ताडं कुजबूज करतात. मामाच्या पुढे जावून तो पाय उचलत राहतो. बाभळीच्या खोडाकडे डोळे रोखून पाहतो. काळं म्हातारं दात विचकून हसतं. घरंगळीवर राजा कुत्रं अचानक भुंकत. बैलांच्या मधून वाट काढत दोघे पळत सुटतात.
काळं काळं छप्पर वर आल्यावर दिसू लागतं. मधल्या घरात मिणमिणता दिवा लागतो. आणि त्यांचं आसमंत उजळून निघतं.

"नाना, वगळीत गाडी उरळी झालती"

क्रमश:

तापोळा एक

कथा

प्रतिक्रिया

आसा सम्दा परकार झाल्ता तर

जव्हेरगंज's picture

1 Jun 2016 - 10:01 pm | जव्हेरगंज

नायतर काय

:(