तापोळा

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
29 May 2016 - 7:45 pm

फुटलेल्या अंगठ्यावर तिनं चिरगुट बांधल.
"ठणका मारतुय का?"
"लय दुखतय"
"आसूदी आता, घरी गेल्यावर हाळद लावू"
"हू.." डबडबलेल्या डोळ्यांनी तो मागोमाग चालत राहिला.
"आयं, सरकार लय मोटं आसतं का ग?"
"हू.. लय मोटं आसतं"
"मजी आपल्या रामनाना पेक्शाबी उच्ची?"
"हू.. लय उच्ची आसतं, आता गप चाल"

तांबूरस्त्यानं चालत गेल्यावर रुकड्यायचं बारकं देवाळ लागलं. त्याच्या जरासं म्होरं कटावर वाट बघत बसलेल्या बाया दिसल्या. पाठीमागे हिरव्यागार गवतात खळाळून चारी वाहत होती

"आयुव, आज सोन्याबी आलाय का?, कशाला आणलवं यवढ्या उनातानात"
"आलाय म्हागं लागून, चला, उटा आता"
"चिखुल झालाय मायंदाळा, कटावरनंच जाव लागल खाली, चलै सोन्या"

फुटलेल्या अंगठ्याकडं कुणाचं लक्ष जात नाही. त्याला ते कुणाला दाखवायचंही नाही. चिरगुट मात्र लालभडक झालंय. भुसभूशीत मातीत टाचा रुतवून तो सगळ्यांच्या मागोमाग चालू लागला.

"आयं, पीठ कसं तयार हुतं गं?" काल रात्री भाकऱ्या खाताना पडलेला प्रश्न त्याने आत्ता विचारला होता.
"कसं मजी, गिरणीत"
"आयं, गिरण मजी काय आसतं गं?"
समोरच्या रांगेत बाया खोखो हसल्या. तसा जरा तो खजीलच झाला.

हेक्टरी ऊस संपता संपत नव्हता. मधोमध घुसलेला कट त्यांना दुसऱ्या टोकाला घेऊन आला. 'नळाच्या खाल्ल्या बाजूला काय आसंल?' हे त्याचं बऱ्याच दिवसांपासूनचं कुतूहल होतं. तो धुक्यात हरवलेला पऱ्यांचा प्रदेश मुळीच नव्हता. तेथे सफरचंदाची झाडेही नव्हती. उंचावरुन कोसळणारे धबधबेही तिथे कुठेच नव्हते.

एका खुरट्या झुडूपाला तिनं फारी बांधली. खाली आडोश्याच्या सावलीत तो बसून राहिला. चार दगडं जमवून मग दगडांचा खेळ करत बसला. भूक लागल्यावर फडकं उघडलं. चार घास खाऊन घेतले. दिपवणारं उन बघत कधी डोळा लागला त्याला समजलंच नाही.

आडोश्याची सावली जाऊन कललेलं उन त्याच्या आंगाखांद्यावर आलं. तिनं येऊन फारी सोडली. एखाद्या भयंकर स्वप्नातून बाहेर आल्यासारखा तो जागा झाला.

"आये, मलाबी यक गठुडं दी" तो तिच्या मागोमाग गेला.
फारी हातरुन ती खुरपलेलं गवत टाकत राहिली. टावेलात त्याच्यासाठीही थोडसं.
"आजून दि की उलिकसं"

गवताच्या भाऱ्याची तिनं जीव खाऊन गाठ मारली. न पेलवणारं ओझं डोक्यावर घेतलं. बाकीच्या बायांनीही आपापला भार उचलला.
बारकं गाठोडं घेऊन तोही तयार.

पुन्हा सगळ्या हेक्टरी उसात.
कटावरून वाट काढत दुसऱ्या टोकाला.
आता तो प्रश्न विचारत नव्हता. 'आपल्या भाऱ्यात एखादं हत्तीचं पिल्लू आहे की काय' एवढं त्याला ते जड वाटत होतं.

तांबूरस्त्यानं टोळकं चालत राहतं. खळखळ वाहणारी चारी तो कसाबसा पाहत राहतो. आतापर्यंत न जाणवलेले उन्हाचे चटके आता त्याच्याही पायाला बसू लागले.

घरी आल्यावर त्यानं आवडत्या गायीच्या दावणीत इवलंसं गाठोडं रिकामं केलं. खरंतर तो दमला होता. गायीचं कान गोंजारत दावणीच्या दगडावर बसून राहिला.

तिनंही डोक्यावरचा भारा ओट्याच्या कडंला उतरवला. मग न्हानीतलं भगुणं आणून रांजणातलं दोन तौल्या पाणी ओतलं. त्यात पाय बुडवून ओट्यावरच बसून राहिली.

ती अशी रोजच बसते. गायीचं कान गोंजरताना फुटलेल्या अंगठ्याकडं त्याचं लक्ष गेलं. चिरगुट सुटून गेलं होतं. ओली जखम रक्ताळली होती.
"तायडे, हाळद टाक गं थुडी त्येज्या आंगट्यावर, लागलय बग त्येज्या पायाला"

"कुटं लागलय सोन्या तुला" म्हणून तायडीही त्याला आत घेऊन चालली.
जाता जाता त्याला पाण्यातले पाय दिसले. नेहमीसारखेच होते. तरी मनाला चटका बसलाच.

"तायडे तुला म्हायतेय का, सरकाराच मुंडकं आभाळाला थडाकतं, लय उच्ची आसतं"
"व्हय.."
"लय पैशं आसत्यात सरकाराकडं, लय शिरमंत आसतं."

कथाप्रतिभा

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

29 May 2016 - 8:10 pm | चांदणे संदीप

जव्हेरभौ आवडली स्टुरी! :(

Sandy

जव्हेरगंज's picture

29 May 2016 - 8:56 pm | जव्हेरगंज

कथेचा उद्देश गरिबी दाखवणे मुळ्ळीच नाही.

':(' या स्मायलीमुळे तसे वाटले म्हणून हा खुलासा.

धन्यवाद sandy

चांदणे संदीप's picture

29 May 2016 - 9:36 pm | चांदणे संदीप

पण छानच लिहिली आहे!

Sandy

तापोळा म्हणजे काय? वर्णन नेहमीप्रमाणेच रानात नेतं अलगंद

जव्हेरगंज's picture

29 May 2016 - 9:15 pm | जव्हेरगंज

'उन्हात तळपलेला प्रदेश' असा मीच त्याचा अर्थ घेतलाय!

धन्यवाद कंजूसराव!

आयुव, आम्हास्नी वाटल प्रवास वर्णन हाय म्हुन...एन्ट्री केलि
असुन दे.

अभ्या..'s picture

30 May 2016 - 12:07 am | अभ्या..

लिव्हताव लै उच्चीचं.

रमेश भिडे's picture

30 May 2016 - 12:15 am | रमेश भिडे

अस्सल बावनकशी आणि अनुभवातनं आलेलं लिखाण.

एक आग्रह म्हणजे असं तुकडा तुकडा नका लिहू... काहीतरी थीम घेऊन सगळ्याला एकत्र छान रूप द्या. एखादा गाव घेऊन त्यातले हे सगळे लोक, त्यांचे अनुभव असं काही. काहीतरी चित्र उभं राहाता राहता फिस्कटतंय बघा..

बाकी रूपक कथा मात्र येऊ द्याच. एक नंबर असतात त्या.

काहीतरी थीम घेऊन सगळ्याला एकत्र छान रूप द्या.

+११११
बाकी तुमच्या कथा नेहमीच आवडतात.

रमेश भिडे's picture

30 May 2016 - 12:15 am | रमेश भिडे

अस्सल बावनकशी आणि अनुभवातनं आलेलं लिखाण.

एक आग्रह म्हणजे असं तुकडा तुकडा नका लिहू... काहीतरी थीम घेऊन सगळ्याला एकत्र छान रूप द्या. एखादा गाव घेऊन त्यातले हे सगळे लोक, त्यांचे अनुभव असं काही. काहीतरी चित्र उभं राहाता राहता फिस्कटतंय बघा..

बाकी रूपक कथा मात्र येऊ द्याच. एक नंबर असतात त्या.

तापोळ्यावरून आधी वाटलं की महाबळेश्वरच्या खालच्या तापोळ्याबद्दल असेल.

बाकी छान लिहिलेय.

नाखु's picture

30 May 2016 - 8:32 am | नाखु

ट्रेक वाल्या लोकांनी तोच तापोळा प्रसिद्ध केलाय ह्या तापोळ्याच कुणालाच आठवत नाहीय.

जव्हेरगंज शैली पंखा नाखु

आनंद कांबीकर's picture

4 Jun 2016 - 4:01 pm | आनंद कांबीकर

एकदम सेम टू सेम वर्णन
डोळ्यासमोर चित्र उभा राहिले
+1

जव्हेरगंज's picture

4 Jun 2016 - 4:26 pm | जव्हेरगंज

dh