बोलाचा हापूस!

समीरसूर's picture
समीरसूर in जनातलं, मनातलं
16 May 2016 - 5:17 pm

कुठल्याही विषयावर अखंड बोलणाऱ्या आणि तुम्हाला बोलण्याची अजिबात संधी न देणाऱ्या व्यक्तीच्या तावडीत तुम्ही कधी सापडला आहात काय? सध्या माझे ग्रह जरा पेंगुळलेले असल्याने माझ्या आयुष्यात असे दुर्मिळ योग वारंवार येत आहेत. माझे ग्रह तसे ही अर्धोन्मिलीत अवस्थेत एखाद्या मवाल्यासारखे कुठेतरी भटकत असतात हा मुद्दा वेगळा! जेव्हा नितांत गरज असते तेव्हा माझे ग्रह कुठे उलथलेले असतात कोण जाणे. बाबा पुता करून एकाला पकडून आणावे तर आधी आणून ठेवलेले पसार झालेले असतात. असो. तर सध्या अशा बोलून बोलून समोरच्याला नामोहरम करणाऱ्या बोलर लोकांच्या तावडीत मी सापडलो आहे. शब्दांची अथक अशी गोलंदाजी करून मला जेरीस आणण्याचा एककलमी कार्यक्रमच सध्या या लोकांनी हातात घेतला आहे.

यात पहिला क्रमांक पटकावलेला आहे माझ्या सोबत बसमध्ये असणाऱ्या एका म्यानेजरने. याचं नाव आपण उमाकांत समजू या. एक वक्त ऐसा आया था कि इस कंबख्त ने मेरा जीना हराम कर दिया था. हा नेमका मी कार्यालयातून संध्याकाळी ज्या बसने घरी जातो त्याच बसमध्ये चढतो. मी सगळ्यात मागच्या जागेवर जाऊन बसतो. थोडं खाली सरकून बसलं म्हणजे मी याला दिसणार नाही अशी माझी भाबडी आशा. पण उमाकांत वस्ताद आहे. त्याची नजर सावजाला शोधत असते. मी त्याला दिसतोच. मी मनातल्या मनात चरफडतो. मी त्याच्याकडे बघून क्षीण स्मित करण्याआधीच उमाकांतने तोंडाचा दरवाजा उघडून दिलेला असतो. एकवेळ धरणाचे दरवाजे ताबडतोब बंद करणे शक्य आहे पण उमाकांतच्या तोंडाचा दरवाजा बंद करणे दस्तुरखुद्द उमाकांतलादेखील शक्य नाही. उमाकांतचं तोंड त्याच्या आस-पास कुणीही नसतांनाच फक्त बंद राहू शकतं. आस-पास जर कुणीही किंचित बोलणं सुरु करण्यासारखं असेल तर उमाकांतला कुणीच माई का लाल रोखू शकत नाही.

उमाकांत बसता बसता म्हणतो:
"अरे काय म्हणतोस? मला वाटलं की आज नाहीस की काय बसमध्ये. आहेस की. अरे, काय सांगू तुला. आमचा डीएम (डिलीवरी म्यानेजर)...स्साला वायझेड आहे रे. मला म्हणतो १० मिलियन डॉलरपैकी तीन - चार मिलियन कमी कर. अरे शक्य आहे का? तूच मला सांग."
"कसले डॉ..."
"अरे, तू सांग. १५ मिलियनचं प्रपोजल आहे. माझे १० मिलियन आहेत कारण माझं तेवढं काम आहे. त्या मोबिलिटीचे ५ मिलियन आहेत. त्यांना कशाला पाहिजेत ५ मिलियन? सांग ना."
मी मान हलवून दात काढतो.
"हो ना..."
"अरे मग भोxxडीच्या, त्यांना सांग ना २-३ मिलियन कमी करायला. मी कसं काय कमी करणार?"
"मी?"
"तू नाही रे...डिलीवरी म्यानेजर म्हणतोय मी..."
"बरोबर आहे. त्यांनीच..."
"मला एक सांग, तू ऑन-साईटला छापतो आहेस ना ऑलरेडी? बायकोसोबत मजा मारतोयस ना?"
"नाही, मी तर इथेच..."
"अरे तू म्हणजे तू नाही रे. तो मोबिलिटीचा मुथ्थू. अरे मग साल्या, गप बस ना. कशाला माझ्या डीएमला पेटवतो?"

उमाकांत तावातावाने बोलत असतो. मला ढेकळं काही कळत नाही. त्याच्याकडे बघून बघून माझी मान दुखायला लागते म्हणून मी जरा खिडकीच्या बाहेर बघतो. एखादं पोरगं सायकलवरून जात असतं.

"ते बघ च्यायला. एवढंसं पोरगं उलट्या दिशेने चाललंय. आई-बापांना फटके मारले पाहिजेत. अरे सातवी-आठवीचं पोरगं ते, खुशाल एवढ्या ट्रेफिकमध्ये उलट्या दिशेने चाललं आहे. दिला एखाद्या गाडीने धक्का, मग?"
"हो ना..."
"माझ्या पोराला सांगून ठेवलं आहे, मेन रोडवर जर सायकल घेऊन दिसलास तर सायकल बंद! म्हणजे काय? पुण्यातली ट्रेफिक म्हणजे चेष्टा वाटली काय? सेन्स आहे का लोकांना? आणि पोलिस तर नावालाच असतात. दहावीत आहे."
"कोण?" मी गोंधळून विचारलं.
"माझा मुलगा रे. चाळीस टक्के मिळाले तरी पार्टी देईन मी."
"का?"
"का? मला माहित आहे ना. त्याला वाटतं त्याला सगळं येतं. मी म्हणतो साल्या अभ्यास कर. तो म्हणतो बाबा मला सगळं येतं. पुणेरी आहे ना. आपल्याला सगळं येतं असंच वाटणार त्याला."
"ह्याह्याह्याह्या" मी दात काढतो. "हुशार असेल तो"
"हुशार? अरे त्याच्या बापाला कधी पंचावन्न टक्क्याच्यावर मार्क नाही मिळाले कधी, त्याला काय मिळणार?" असे म्हणून उमाकांत चष्मा सावरत हसतो.
"असं कसं, आज-कालची पोरं..."
"तुला किती मार्क होते दहावीला?"
"अठ्ठ..."
"दहावीच्या मार्कांना काही अर्थ नाही राहिला आता...आता बदललंय सगळं...."

माझे टक्के माझ्या तोंडातून बाहेर पडण्याआधीच उमाकांतने त्यांची रीतसर इज्जत काढली.

बस संथ गतीने जात असते. माझी मान प्रचंड दुखायला लागलेली असते. डोकं ठणठण दुखत असतं. शेजारच्या सीटवर बसलेली नुकतीच कंपनीमध्ये रुजू झालेली देखणी मुलगी अर्धवट झोपेत आमच्याकडे त्रासिक चेहऱ्याने बघत होती. तो मी नव्हेच अशा नजरेने मी तिच्याकडे पाहिलं. न जाणो मी बडबड करून तिची झोप घालवतोय असं तिला वाटलं तर? बिचारीला अधिक त्रास होऊ नये म्हणून मी पुस्तक बाहेर काढतो.

"बाप रे, पुस्तक वगैरे वाचतोस तू?"
"हो, जमलं तर..."
"च्यायला हा एक प्रकार साला कधी जमला नाही. तू सांग. विरारला किती डास होते तुला माहिती आहे?"
"नाही"

विरारच्या डासांचा आणि पुस्तकांचा काय संबंध असेल या विचारात मी पडलो. आजकाल काही भरोसा नाही. डेटा सांयंटिस्ट कशाचाही संबंध कशाशीही लावू शकतात असं मी ऐकलं होतं. अहमदनगरजवळच्या आगडगावच्या काळभैरवनाथाच्या मंदिराचा थेट व्हाईट हाऊसशी किंवा बर्नी सेंडर्सशी संबंध असू शकतो हे सिद्ध करू शकणारे आजकालचे तंत्रज्ञान! महाभारतात युधिष्ठिर हे मध्यवर्ती पात्र होते असा शोध नुकताच एका डेटा सायंटिस्टने लावला. हे शोधून काढण्यासाठी त्याने म्हणे क्लिष्ट अशी गणिती समीकरणे, सूत्रे, गृहीतके, प्रमेये, वगैरे वापरली. युधिष्ठिर महाभारताच्या केंद्रस्थानी होता हे कळल्याने नेमका काय फरक पडला हे मात्र त्याला अजून शोधून काढता आलेले नाही. असो. तर विरारचे डास! माझ्या चेहऱ्यावरचे प्रश्नार्थक भाव त्याने सरळ धुडकावून लावले.

"अरे, विरारला हत्तीएवढा एक डास असायचा. मी विरारला होतो. माझं घर होतं तिथं. विरारहून मी अंधेरीला जायचो नोकरीसाठी. विरार स्टेशनवर डासच डास! मोठे मोठे डास! काळं कुत्रं नसायचं स्टेशनवर. तुमच्या घरी आहेत का डास?"
"नाही. आसपास..."
"नशीबवान आहेस लेका...आता माझ्या घरीपण नाहीयेत डास...पण विरारचे डास खतरनाक होते...कुठलं पुस्तक आहे?"
"फॉल ऑफ जायंण्ट्स'
"अरे केवढं आहे ते. एवढं सगळं खरंच वाचतोस तू? च्यायला, माझ्या धाकट्या पोराचं चित्रांचं पुस्तक वाचता वाचता पाच मिनिटात झोपतो मी. पोरगं बोंबलत त्याच्या आईकडे जातं. बाबा झोपला म्हणून बोंबलत बसतं. इकडे डास नाहीयेत ना, म्हणून बेक्कार झोपतो मी. विरारला असतांना घरी असलं की काहीच शक्य नसायचं. पुस्तक वाचणं नाही, अभ्यास करणं नाही. मित्राकडे जायचो अभ्यास करायला. आणि लोकलमध्ये बसलो की दुसऱ्या मिनिटाला झोपलेलो असायचो मी. त्यामुळे पुस्तक-बिस्तक वाचणं कधी जमलंच नाही.”

अच्छा, असा आहे तर डास आणि पुस्तकांचा संबंध! बघा, म्हटलं ना, जगात कुठल्याही गोष्टीचा कुठल्याही असंबद्ध गोष्टीशी संबंध असू शकतो.

दिवसेंदिवस उमाकांतसोबत बसून घरापर्यंत प्रवास करणं मला असह्य व्हायला लागलं. क्षणाचीही उसंत न घेता उमाकांत जी बडबड करत असे ती असह्य व्हायला लागली. माझी मान, डोकं दुखायला लागायचं. मध्यंतरी माझ्या परीक्षा सुरु असतांना मी बसमध्ये अभ्यास करत असे. मी अभ्यासाचं पुस्तक वाचत असतांनादेखील उमाकांत शेजारी बसून अशक्य बडबड करत असे. मग मी बस बदलली. त्याच्या घराकडे जाणारी एकाच बस होती. माझ्या घराकडे जाणाऱ्या बसेस बऱ्याच होत्या पण बाकीच्या थोड्या दूर उभ्या असत म्हणून मी या बसमध्ये येत असे. बस बदलल्याने मला काही दिवस बरे वाटले पण नंतर त्या बसेस मध्ये बसायला जागा मिळेनाशी झाली म्हणून मला पुन्हा माझ्या पूर्वीच्या बसमध्ये यायला लागले. पुन्हा माझी पूर्वीची बस सुरु केल्यानंतर मी पहिल्यांदा भीत भीत आत गेलो. दबक्या पावलांनी एक जागा पकडली आणि उमाकांत येऊ नये म्हणून प्रार्थना करत बसलो.

मला वाटलं आता काही उमाकांत येत नाही. मी जरा सैलावलो, जागेवर जरा अस्ताव्यस्त फैललो. बुटाड काढून मांडी मारली. शॆजारच्या सीटवर मागे नियमितपणे बसणारी जानम आज नव्हती. तिच्या जागी एक दाढीचे खुंट वाढलेला अजस्त्र बाप्या बसला होता. संपूर्ण बसकडे तो खाऊ की गिळू नजरेने बघत होता. काय पण सालं नशीब! ह्याट साला! मी मनात एक शिवी देऊन पुस्तक काढले. बसमध्ये पुस्तक वाचणे किंवा गाणी ऐकणे यासारखा आनंद नाही. पुस्तकातून बुकमार्क काढून वाचायला सुरुवात करणार तेवढ्यात खांद्यावर हात पडला. मी वर पाहिले. उमाकांत कुरतडलेल्या मिशीआडून दात दाखवत हसत होता.

"अरे काय, दिसला नाहीस बरेच दिवस. च्यायला खांदा जाम दुखतोय आज"

आपण विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तराची अजिबात अपेक्षा न ठेवणारा उमाकांत हा एकमेव मानव असावा. नोकरीसाठी मुलाखती घेतांना तरी हा उमेदवारांना उत्तरे देऊ देतो की नाही असे त्याला विचारण्याची मला तीव्र इच्छा झाली. पण त्याच्या पुढच्या बोलण्याच्या धबधब्यात ती इच्छा वाहून गेली.

"खांदा?"
"अरे हो रे, जाम बेडमिंटन खेळलो रे आज पहाटे. च्यायला, सवय नाही राहिली. अमेरिकेत असतांना किती खेळायचो मी. नंतर दुबईमध्ये पण खूप खेळायचो. इथे च्यायला जमतच नाही. सकाळी उठवतच नाही. आणि उठलं तरी इतक्या लांब जायचं जीवावर येतं. आमच्या सोसायटीचा कोर्ट बंद आहे बरेच दिवस झाले. पण खेळायला पाहिजे रे. मस्त भूक लागते मग. सध्या तर भरपूर हापूस आहे. रस खायचा आणि झोपायचं. तू खातो की नाही आंबा?"
"हो म्हणजे..."
"अरे इथे मिळतो तो हापूस काही कामाचा नाही. माझ्या मित्राची वाडी आहे कोकणात. तू तो आंबा खाऊन बघ. येडा होशील. चारशे रुपयाला पेटी. कडक माल!"
"असं?"
"तुला पाहिजे का? सांग ना तू. किती पाहिजे? मला शनिवारी फोन कर. मी तुझा नंबर सेव करून ठेवतो. काय नंबर आहे?"
मी नंबर सांगतो.
"xxxxxxxxxx"
"नाव समीरच नं?"
"हो" मी आश्चर्याने उत्तर देतो. इतकी वर्षे झाली आम्ही एकमेकांना ओळखतो, एकमेकांशी डोकं फुटेस्तोवर बोलतो आणि याला माझं नावच माहित नाही.
"मला शनिवारी सकाळी फोन कर. दोन-तीन पेट्या सहज मिळतील. बाकी काय? लेटर्स आलेत का? काय लेटर्स असणार आहेत म्हणा. नेहमीचंच. मी तर बॉसला बोललो. नही मंगताय तुम्हारा इंक्रीमेंट...साला क्या देगा तुम दे देके...५%? ७%? नही मंगताय...कायको देताय? कायको इज्जत निकालाताय? कायको नमक चोळ..रगडताय हमारे जखम पे...काही बोलला नाही तो हसला फक्त...हेहेहेहे"
"ह्याह्याह्याह्या" मी माझं ठेवणीतलं उत्तर दिलं.

मी शनिवारी सकाळी १० वाजता उमाकांतला फोन केला. घरी पाहुणे होते. आंबे हवेच होते. तसा आदेशच होता. बायकोच्या माहेरचे पाहुणे असल्याने अपील नव्हतं. मी 'आज आम्रखंड आणू आणि उद्या आंबे...' असा प्रस्ताव मांडून पाहिला पण प्रस्ताव हे विरुद्ध पक्षाने फेटाळण्यासाठीच असतात या नियमाने हा ही प्रस्ताव गडगडाटाने ('एकमताने' च्या चालीवर) फेटाळून लावण्यात आला. मी निमूटपणे उमाकंतला फोन लावला.

"द नंबर यु आर ट्रायिंग इज करंटली स्विच्ड ऑफ"

अरेच्चा! असं कसं झालं? जिथे तिथे बोलण्याची संधी शोधत असणाऱ्या उमाकांतचा फोन बंद! बोलण्यासाठी जे साधन मानवी तोंडानंतर सगळ्यात जास्त वापरलं जातं ते उमाकांतने बंद ठेवावं? मी पुन्हा ट्राय केला. पुन्हा पुन्हा ट्राय केला. फोन बंद! याच्या फोनला विरारचे डास चावालेत की काय असा विचार माझ्या मनात येऊन गेला. शेवटी मी कंटाळून बाजारात जाऊन आंबे घेऊन आलो.

सोमवारी बसमध्ये आल्या आल्या उमाकांतने रविवार कसा लोळत घालवला याचे रसभरीत वर्णन सुरु केले.

"अरे काय सांगू लेका...असा रविवार वारंवार येवो. दुपारी येथेच्छ रस हाणला आणि तीन ते सहा डाराडूर झोप काढली. मजा आया. तू काय केलंस?"
"मी..."
"आयपीएल पाहिलं की नाही? काय जबरा झाली मेच...वा वा..."
"मी शनिवारी फोन केला होता तुम्हाला."
"कशाला? काही काम होतं का? शनिवारी काय फोन करायचा रे. वीकेंड बाबा!! बायको-पोरं याशिवाय काय नाय...हेहेहेहे"
"आंबे हवे होते म्हणून"
"अरे, मला इतके फोन यायला लागले की मी फोन बंद करून ठेवला होता. कुठे आपण मगजमारी करत बसा च्यायला. मित्राला म्हटलं तुझे आंबे आहेत, तू विक....काय? हेहेहेहे....फक्त माझे दोन पेटी दे लवकर म्हटलं...माझे उचलले आणि घरी आलो. दोन-तीन फोन आले. फोन बंदच करून ठेवला. हेहेहेहे. कुठे सुखाची सुटी खराब करा...पण आंबे मस्त होते हां. गोड रस! तुला सांगतो, आता कर्नाटक हापूस पण आहे बाजारात. पण त्याला चव नाही रे. खरा हापूस देवगडचाच. दापोलीचा रत्नागिरी पण मस्त असतो. रत्नागिरीचा देवगड असतो की नाही माहिती नाही........"

मी सहज शेजारच्या सीटकडे पाहिलं, ती देवगड हापूसइतकेच गोड हसून माझ्या जखमेवर मीठ चोळत होती...

विनोदअनुभव

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

16 May 2016 - 5:27 pm | आनन्दा

मस्तच.. छान लिहिता तुम्ही

सौंदाळा's picture

16 May 2016 - 5:35 pm | सौंदाळा

मस्त
जियो समीरसूर साहेब

सोत्रि's picture

16 May 2016 - 5:39 pm | सोत्रि

झक्कास

मस्त समीर'सूर' लागलाय :)

- (बोलाचाच) सोकाजी

पद्मावति's picture

16 May 2016 - 5:46 pm | पद्मावति

:) मस्तच!

चिनार's picture

16 May 2016 - 5:51 pm | चिनार

मस्तच...एक नम्बर जमलाय !

राजेंद्र मेहेंदळे's picture

16 May 2016 - 5:54 pm | राजेंद्र मेहेंदळे

नाही म्हणजे आय.टी कंपन्यांचा सुर लावलात म्हणुन विचारले हॅहॅहॅ.
बाकी असे बसमध्ये छ्ळणारे मित्र भरपुर भेटलेत. शेवटी बस सोडली आणि स्वतःच्या गाडीने (पुण्यात २ व्हीलरला गाडी म्हणतात) जायला लागलो.साले धड वाचु देत नाहित की गाणी ऐकु देत नाहित. वरती ईतक्या मोठ्या आवाजात बोलतात की पुर्ण बसचं पब्लिक आपल्याचकडे बघायला लागतं . आणि विषय?? मोदी,ईतिहास,भुगोल,मान्सुन,शेती,बाजारभाव,लोकसंख्यावाढ,कुटुंबनियोजन,मी यु.एस.ला होतो तेव्हा असे काहिही

पु.लंचा एक मस्त लेख आहे यावर..रस्त्यात भेटुन हॉटेलात चहा प्यायला नेणारे आणि २-३ तास बरबाद करणारे
लोक यावर

नाखु's picture

16 May 2016 - 6:04 pm | नाखु

फर्मास

अश्यांना कटवायचा एक जालीम पण रामबाण उपाय आहे आपणच त्यांच्या वाक्य धब्धब्यात घरच्या गोष्टी विचारून हैराण करायचे, गुमान पडायला सुरुवात होते आणि फक्त बसमध्ये नाही तर इतर ठिकाणीही (पोराचे मार्क विचार्,त्याला मिळालेल्या मेमोबद्दल विचार असे).

लोहा लोहेको काटता है वाला नाखु

हॅहॅहॅहॅ! खत्री लेख लिहिलाय!

साहेब..'s picture

16 May 2016 - 6:28 pm | साहेब..

मस्त!!!

अगदी हापूस आंब्यासारखा रसाळ लेख :D

माहितगार's picture

16 May 2016 - 6:49 pm | माहितगार

:) हा हा हा मस्त ! व्यक्ति चित्रण मस्त जमलंय :) बडबड्या व्यक्तिंना स्टोर्‍या देण्यासाठी दुसर्‍या बडबड्या व्यक्ति फारशा चालत नाहीत, कमी बोलणारे मान उगीचच डोलवून ऐकणारे/ अथवा तसे भासवणारे सावज लागतात. :)

माहितगार's picture

16 May 2016 - 6:51 pm | माहितगार

सटिक हा शब्द आठवला नव्हता, व्यक्तीचित्रण सटिक झालय.

सुखीमाणूस's picture

16 May 2016 - 6:53 pm | सुखीमाणूस

अशी स्वतापलीकडे जग नसलेली आणि स्वत:वर कारण नसताना खुश असलेली माणस लई पीडा आणतात.छान केले आहे व्यक्तिचित्रण:):)

टवाळ कार्टा's picture

16 May 2016 - 7:32 pm | टवाळ कार्टा

=))
कोणी मिपाकरसुध्धा या कॅटेगरीतले आहेत???

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 May 2016 - 8:11 pm | डॉ सुहास म्हात्रे

ही ही ही ! फक्कड व्यक्तीचित्रण !!

पैसा's picture

16 May 2016 - 8:51 pm | पैसा

मस्त खुसखुशीत लेख!

हुप्प्या's picture

16 May 2016 - 9:06 pm | हुप्प्या

पुलंचा मी आणि माझा शत्रूपक्ष आठवला! आग्रहाने आपण बांधत असलेले घर दाखवायला नेऊन त्यातले बारकावे सांगत बसणे. ऐकणार्‍याची मनःस्थिती काय आहे, त्याचा उत्साह कितपत आहे ह्याची कुठलीही जाणीव नसणे. सगळे तसेच!
काही वेळा भीड विसरून अशा लोकांशी रोखठोक बोलून त्यांना ठीक करणेच योग्य.

एकदम खुसखुशीत लिहिलंय! असे नाॅनस्टाॅप बडबडे एक पेशंट डोळ्यासमोर आले!

सतिश गावडे's picture

16 May 2016 - 9:13 pm | सतिश गावडे

>> कुठल्याही विषयावर अखंड बोलणाऱ्या आणि तुम्हाला बोलण्याची अजिबात संधी न देणाऱ्या व्यक्तीच्या तावडीत तुम्ही कधी सापडला आहात काय?

होय.

आमच्याही हापिसच्या बसमध्ये बरेच उमाकांत आहेत. वात आणतात अगदी.

चाणक्य's picture

16 May 2016 - 11:09 pm | चाणक्य

भारी. अगदी डोळ्यासमोर (बोलत) ऊभा राहिला तुमचा उमाकांत.

रातराणी's picture

16 May 2016 - 11:50 pm | रातराणी

मस्तच!

वगिश's picture

17 May 2016 - 12:23 am | वगिश

मस्त

रेवती's picture

17 May 2016 - 4:48 am | रेवती

लेखन आवडले.
अनेक वर्षे घरच्यांसाठी मी उमाकांत होते पण शेराला सव्वाशेर भेटतातच ना!
तश्या अनेक उमाकांता भेटायला लागल्या. एका मर्यादेनंतर पेंग यायला लागली. बरे, तक्रार कशी करणार? आपण घरच्यांना असेच पिडत असतो. मक्काय, धडा शिकले. नुकताच एका मैत्रिणीने प्रश्न विचारला ज्यावर मोठ्ठे उत्तर देऊ शकत होते पण गप्प बसण्यात यशस्वी झाले. "हम्म....तो खूऽऽप मोठ्ठा विषय आहे, नंतर बोलू" असे सांगितले. मागील महिन्यात एका मैत्रिणीने अचानक विचारले "तुझे लग्न कसे ठरले?" पटकन शेजारणीकडे बोट दाखवून सांगितले की हिची कथा ऐकणे जास्त इंटरेस्टींग आहे. मग सगळ्या तिच्याकडे वळल्या. आजकाल नवर्‍याने (न मागताच) सर्टिफिकेट दिलय की मी काही अगदीच उमाकांत नाहीये, माझ्यापेक्षा भारी भेटातायत. मनातल्यामनात हुश्श्य केले. आता इथला प्रतिसाद आटोपता घेते. ;)

चांदणे संदीप's picture

17 May 2016 - 5:09 am | चांदणे संदीप

ब्येक्कार प्रकरण आहे हे बोलंदाजी करणारी माणसे म्हणजे! =))

ऐकायचा व्यायाम सुरू करा, सगळं सुरळीत होईल!

Sandy

वपाडाव's picture

17 May 2016 - 9:57 am | वपाडाव

छान... आडौल्या गेले आहे...

मस्त.. खुसखुशीत..

स्मिता श्रीपाद's picture

17 May 2016 - 12:03 pm | स्मिता श्रीपाद

एकच नम्बर लिहिलय
मी आणि माझ्या शत्रुपक्ष ची आठवण झाली....

रमेश भिडे's picture

17 May 2016 - 12:11 pm | रमेश भिडे

दिवाळी अंकात शोभेल असे लिखाण

इशा१२३'s picture

17 May 2016 - 12:29 pm | इशा१२३

मस्तच!

मराठी कथालेखक's picture

17 May 2016 - 12:42 pm | मराठी कथालेखक

मस्त...

बबन ताम्बे's picture

17 May 2016 - 12:44 pm | बबन ताम्बे

आमच्या ऑफीसमधे पण अशी एक वल्ली होती. कुठल्याच विषयाचे वावडे नव्ह्ते. मी माझ्या खालील लेखांत "वाशा" नावाचे पात्र रंगवले आहे ते याच व्यक्तीवरून घेतले आहे. बघा आवडले तर.
http://misalpav.com/node/27735
http://misalpav.com/node/27763
http://misalpav.com/node/27793
http://misalpav.com/node/27859
http://misalpav.com/node/27911

पथिक's picture

17 May 2016 - 12:58 pm | पथिक

मस्त लिहिलंय ! हाहा

मुक्त विहारि's picture

18 May 2016 - 10:28 am | मुक्त विहारि

आवडला....

सस्नेह's picture

18 May 2016 - 10:53 am | सस्नेह

बोलबच्चन हापूस खाल्लात म्हणा !

अभिजीत अवलिया's picture

28 May 2016 - 11:04 am | अभिजीत अवलिया

फक्कड ....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 May 2016 - 11:35 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त, खुसखुशीत. लेख आवडला. नादच-खुळा असतो एकेकाचा. ;)
एकदा माईक घेतला की दुसर्‍याला माईक देतच नाहीत ही माणसं.
-दिलीप बिरुटे

विवेकपटाईत's picture

28 May 2016 - 3:34 pm | विवेकपटाईत

मस्त लेख आवडला.

चतुरंग's picture

28 May 2016 - 6:02 pm | चतुरंग

लै भारी दिसतोय की हा उमाकांत!
म्हणजे इतके दिवस डोकं खाऊन शेवटी तोंडाला आंब्याची पानं देखील पुसली नाहीत की हो!! ;)

-रंगाक्लांत