बालगंधर्व.... भाग १

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
12 May 2016 - 10:08 am

महाराष्ट्र दिनानिमीत्त बालगंधर्वावरील हा लेख लिहिण्यास घेतला होता. उशीर झाला आहे मान्य ! यातील माहिती बर्‍याच जणांना माहीत असेलच पण मी लिहिले कारण मला या भारी माणसाला आदरांजली वहायची होती... लागोपाठ येणार्‍या माझ्या लिखाणाला तुम्ही सहन कराल अशी आशा आहे. यानंतर मात्र लगेच लेख टाकणार नाही याची खात्री बाळगा....

खालील लेख वाचताना एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवायला हवी
"त्या काळात एखाद्या कारकुनाचा पगार महिना ८ रुपये असायचा तर चांगल्या मास्तरांचा ३०-३५.''

बालगंधर्व.... भाग -१
Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire

बालगंधर्व आणि महाराष्ट्र या दोन शब्दांमधून एक शब्द वेगळा काढणे अशक्य. एकवेळ वेगळा विदर्भ, वेगळा मराठवाडा होईल पण या दोन शब्दांना वेगळे करण्याची ताकद कोणाकडे असेल असे मला तरी वाटत नाही. म्हणूनच महाराष्ट्रदिनी यातील एका शब्दावर लिहावे असे वाटले.

मला संगीत नाटके आजिबात आवडत नाहीत. नाट्य आणि संगीत यातील संगीताला जास्त महत्व देणारा हा प्रकार मला अत्यंत कृत्रिम वाटतो. म्हणजे एखाद्या नाट्यात ओढूनताणून गाण्याची ठिगळे लावण्याचा प्रकार वाटतो तो मला. अर्थात त्या काळात गाणे कळणार्‍या मंडळींची संख्‍या तुलनेने जास्‍त असल्‍यामुळे नाटकातील इतर उणिवांकडे लोक दुर्लक्ष करायचे. अभिनयाबद्दल तर बोलण्‍याचे कामच नाही. माझ्या या नावडीवर शिक्कामोर्तब झाले ते मी सोलापूरला एक संगीत नाटक पाहिले तेव्‍हा. हे कुठलेतरी पौराणिक नाटक होते. रंगमंचावर दुर्योधन व भिमाचे युद्ध होणार असते. दोघेही शड्‍डू ठोकून एकमेकांसमोर आपल्या गदा सावरुन उभे ठाकतात आणि एकदम दुर्योधनाला कंठ फुटला. ऑर्गन व तबल्याचा ठेका सुरु झाला. गाण्याचे बोल ऐकून मी पडायचाच बाकी होतो. दुर्योधन भिमाला आव्हान देण्यासाठी गात होता, ‘‘मज बलरामे गदा शिकविली...ऽऽऽऽऽऽ¸ मज बलरामे गदा शिकविली...’’ एकंदरीत दृष्य फारच विनोदी होते. आवेश युद्धाचा, पण गाण्याची चाल मिळमिळीत. त्यानंतर मी परत एकदा पडलो तो टाळ्यांच्या कडकटाने व वन्स मोअरच्‍या आरोळ्‍यांनी... पण नंतर मला उमजले...या नाटकांमधे गाण्याशिवाय दुसर्‍या कशालाही महत्व नाही आणि असलेच तर थोडेफार कथेला व नाट्‍य लेखनाला असावे. या गाण्यानंतर मी संगीतनाटकाचे नाव टाकले ते टाकलेच...मग आता संगीतनाटकाचे शिरोमणी श्री नारायण श्रीपाद राजहंस यांच्यावर लिहिण्याचे मी का ठरविले बरे.....

याला कारणे दोन. एक म्हणजे संगीत नाटक जरी आवडले नसले तरीही बालगंधर्वांची रंगभूमीवरची निष्ठा ही रामाच्या एकपत्नीव्रतासारखी होती व त्यांनी त्यांचे आयुष्य त्यासाठी वाहिलेले होते. आपल्याला आवडणार्‍या गोष्टीसाठी प्राण पणाला लावणे किंवा मरेपर्यंत ते काम करणे यासाठी फार मोठी हिंम्मत लागते. ती हिंम्मत बालगंधर्वांकडे होती आणि दुसरे म्हणजे आम्ही लहान असताना पुण्यात शुक्रवार पेठेत अकरामारुतीपाशी रहायचो. तेथे आम्ही या माणसाला त्यांच्या उतरत्या वयात प्रत्यक्ष पाहिले आहे. मला आठवते आहे ती त्यांची खाकी रंगाची अर्धी विजार व त्यांच्या डोक्यावरील टोपी. गल्लीतील कुत्रेही त्यांच्याकडे ढुंकून पहात नसे हे मी स्वत: अनुभवलेले आहे. आमचे त्यावेळी तसले काही समजण्याचे वयही नव्हते म्हणा. पण मनाला टोचणी लागली ती लागलीच... हे लिहून ती कमी होईल असाही एक उद्देश आहेच..... असो...

१८४३ साली मराठी नाटकाची मुहूर्तमेढ रोवली श्री.विष्णूदास भावे यांनी. नाटक होते सितास्वयंवर. नंतर बरोबर ३७ वर्षांनंतर संगीत नाटक हा प्रकार अस्तित्वात आणला अण्णासाहेब किर्लोस्करांनी. नाटक होते संगीत शाकुंतल. या नाटकाच्या पायावर पुढे संगीत नाटकांचा इतिहास रचला गेला असे म्हणायला हरकत नाही. नुसतेच नाटक नाही तर नाट्यसंगीत हाही प्रकार या नाटकांमुळे अस्तित्वात आला. तोपर्यंत सुगम संगीत, ठुमरी, गज़ल, कजरी, टप्पा असे संगिताचे हलके फुलके प्रकार अस्तित्वात होते नाही असे नाही पण शास्त्रीय संगित व या हलक्या फुलक्या संगिताच्या मधे कुठेतरी असलेले हे संगीत त्या काळातील संगीत जाणकार प्रेक्षकांना व कानसेनांना चांगलेच भावले असे म्हणता येईल. आत्ताच्या काळात जर नाट्यसंगिताने जन्म घेतला असता तर त्याची भ्रूणहत्याच झाली असती या बद्दल माझ्या मनात आजिबात शंका नाही. या उपक्रमाचा शेवट किर्लोस्करांच्या ‘‘किर्लोस्कर नाटक मंडळी’’ स्थापन करण्यात झाला ज्यात बाळकोबा नाटेकर, वाघोलीकर, भाऊराव कोल्हटकरांसारख्या अनेक नामवंत कलाकारांनी हजेरी लावली. कोल्हटकरांमुळे तर रसिकांना नाट्यसंगिताचे वेड लागले कारण त्यांचा आवाजच तसा होता. या सगळ्यांवर कर्नाटकी गायकीचा थोडाफार प्रभाव होता. थोडक्यात हिंदुस्थानी संगीत पण कर्नाटकी संगीताचा प्रभाव असा एक नवीन प्रकार या नाट्य संगीता मुळे उदयास आला असे मला वाटते. नाट्यगीतांना त्या काळात नाट्यपदे असे म्हणत. ही नाट्यपदे लोकांना इतकी आवडू लागली की करीमखाँसाहेब व मांजीखाँसाहेबासारखे थोर ख्याल गायकही त्यांच्या मैफिलीत नाट्यपदे गाऊन रसिकांचे मनोरंजन करु लागले. पण नाट्यसंगीतात व संगीत नाटकात खरी गंमत आणली बालगंधर्वांनी.
सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील नागठाणे नावाच्या बर्^यापैकी प्राचिन गावातील हे ब्राह्मण राजहंस घराणे. या घराण्यात परंपरागत कुलकर्णीपद चालत आले होते. श्रीपादरावांना अकरा मुले झाली. त्यांची गावात थोडी जमीन होती व एक छोटे घरही होते. (एकदा जाऊन ते घर आहे का ते पहायला पाहिजे.) एवढी मुले व कमविणारा एकटाच माणूस, यामुळे सगळ्यांची तशी आबाळच होत असावी. नशिबाने श्रीपादरावांना सरकारी खात्यात ड्राफ्ट्समनची नोकरी होती त्यामुळे त्यांना सतत फिरतीवर जावे लागे. त्यांच्या अशाच एका बदलीत नारायण श्रीपाद राजहंस पुण्यात जन्माला आले. तारीख होती २६ जून १८८८.

बालगंधर्वांचा वाडा...
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

घरात गरीबी होती पण संगीतही होते. नारायणाचे वडील स्वत: गायचे व सतारही वाजवायचे. पहाटे भूपाळी आळविणे हा त्यांचा आवडता उद्योग होता. आई व मावशी सुरेल आवाजात भजने व ओव्या आळवीत. मामांनी म्हणजे वासुदेवराव पुणतांबेकरांनी त्या काळात एक नाटक कंपनी काढली होती. तिचे नाव होते ‘‘नाट्यकला प्रवर्तक नाटक मंडळी.’ नारायणाच्या पुढच्या आयुष्याला दिशा मिळाली ती अशा वातावरणात. तशातच नारायणाच्या एका चुलत बहिणीच्या नवर्‍याने त्‍याला जळगावला पुढील शिक्षणासाठी नेले. त्‍या काळात जळगाव छोटे होते व आबासाहेब म्‍हळस एक प्रतिष्ठीत वकील होते. या आबासाहेबांना संगितात अतोनात रस होता व अनेक कलाकार जेव्हा जळगावला येत तेव्हा यांच्या घरीच मुक्काम टाकत. नारायणाला त्यामुळे या कलाकारांना जवळून पाहता आले. त्यात एक होते गणपतराव जोशी व स्त्रीपार्ट करणारे बाळाभाऊ जोग. गणपतराव त्या वेळी शेक्सपिअरचा अथेल्लो करुन चांगले प्रसिद्धी पावले होते. छोटा नारायण या कलाकरांच्या नकला उतरवू लागला. त्याचा संगीताकडे असणारा ओढा पाहून आबासाहेबांनी जळगावातील एक संगीत शिक्षक नेमले. त्यांचे नाव होते मेहबूब खान. थोडक्यात नारायणरावांचे पहिले गुरु हे इस्लामधर्मीय होते. पुढच्या आयुष्यात त्यांच्या आयुष्यात हा धर्म वादळ उठवणार होता हे तेव्हा कोणाच्या ध्यानीमनीही नसेल. मेहबूबखान हे काही फार चांगले गायक नसावेत पण ते चांगले शिक्षक होते हे निश्चित. ही शिकवणी सुरु असतानाच नारायणला त्याच्या यशवंतराव कुलकर्णी नावाच्या काकांकडे पुण्यात राहण्याचा प्रसंग आला. बहुधा सुट्टीसाठी ते पुण्याला गेले असावेत. हे कुलकर्णी केसरीमधे नोकरीस होते. याच मुक्कामात दहा वर्षाच्या या मुलास प्रत्यक्ष लोकमान्य टिळकां समोर गाण्याची संधी मिळाली आणि पुढचे आपल्याला सगळे माहीतच आहे.. याच कार्यक्रमात त्यांना लोकमान्यांनी बालगंधर्व हे नाव दिले.याच काळात त्यांना घरातील ज्येष्ठांनी नाट्यकला प्रवर्तकमधे काम करण्याबाबत सुचवले पण त्यांना ते जमले नाही. का जमले नाही या बाबतीत काही माहिती मिळत नाही. नारायणाचे अभ्यासात लक्ष नव्हतेच अशातच त्यांच्यावर एक संकट कोसळले. संकटे कधीच एकटी येत नाहीत. त्यांच्यामागे त्यांची भुते रांगेत उभी असतात. नारायणाच्या वडीलांना तो साधारणत: १५ वर्षाचा असतानाच एक अपघात झाला ज्यात त्यांचा एक पाय कापावा लागला. हालचालींवर मर्यादा आल्यामुळे नोकरी सुटली व ते पुण्यातच अंथरुणाला खिळले. दुष्काळात तेरावा महिना म्हणावे तसे नारायणाच्या आईलाही कसला तरी आजार होऊन तीही अंथरुणाला खिळली. त्याच सुमारास नारायणालाही एक पिसाळलेले कुत्रे चावले. त्या वर त्या काळात यावर पुण्यात उपचार उपलब्ध नव्हते ( असे म्हणतात आजही श्र्वानदंशावरची लस पुण्यात बहुतेक वेळा उपलब्ध नसते ) पण संस्थानामुळे कोल्हापूरला ती सोय होती. नारायणाचे अजून एक नातेवाईक आप्पाशास्त्री बाळेकर, कोल्हापूरला असत. त्यांच्या यजमानांच्या, बाबामहाराज पंडीतांच्या ओळखीने उपचार झाल्यामुळे नारायणावरील ते संकट दूर झाले. भळभळणार्‍या जखमेतून होणारा रक्‍तप्रवाह जसा जखमेतीलच रक्त गोठल्यामुळे अचानक थांबतो तशीच ही भळभळणारी संकटांची मालिका या एका संकटानेच कोल्हापूरला अचानक थांबली. कोल्हापूरला असताना नारायणाने अय्यप्पा बुवांची संगीत शिकवणी चालू ठेवली होती. पंडीत महाराजांमुळे नारायणाची एक दिवस शाहूमहाराजांकडे हजेरी लागली. ते गाणे ऐकून महाराज एवढे प्रभावीत झाले की त्यांनी त्यांचे दरबार गायक अल्लादियाखाँसाहेबांना या मुलाला त्यांच्या पंखाखाली घेण्यास सांगितले. पण दैवाच्या मनात तसे नव्हते. एके दिवशी महाराजांच्या लक्षात आले की या मुलाला थोडे कमी ऐकू येते आहे. विचारण्या केल्यावर नारायणाने खरे काय ते सांगितले,
‘‘माझ्या उजव्या कानात जंतूसंसर्ग झाला असल्यामुळे मला कमी ऐकू येते हे खरे आहे’’

शाहू महाराजांना या रत्नाची पारख होती. त्यांनी ताबडतोब उपचाराची सोय करायला फर्मावले. पण सगळ्यात चांगली सोय मिरजेच्या वानलेस इस्पितळात असल्यामुळे त्याची रवानगी मिरजेला करण्यात आली. शिवाय तेथे त्या काळातील वैद्यकीय तज्ञ डॉ. व्हेल होते. त्यांच्याकडे उपचार करण्याचे ठरले पण राहण्याची सोय कुठे करावी या विचारात महाराज पडले. त्याच काळात किर्लोस्कर नाटक मंडळींचा मुक्काम मिरजेला होता. शाहू महाराजांचा त्यांनाही उदार आश्रय असल्यामुळे राहण्याचा प्रश्न सुटला. उपचारादरम्यान नारायणाची सोय याच नाटक मंडळीच्या मुक्कामावर करण्यात आली.

या निर्णयाने किर्लोस्कर नाटक मंडळींचे नशीब उजळले व नारायणाच्या नशिबाला पाऊलवाट सापडली.

या काळात किर्लोस्कर नाटक मंडळींची आर्थिक स्थिती डबघाईलाच आलेली होती. आण्णासाहेबांच्या मृत्युनंतर त्यांचेच एक शिष्य श्री. देवल यांनी कंपनीचा गाडा हाकण्यास घेतला होता व त्यांच्या कुवतीप्रमाणे ते चांगलेच काम करीत होते. हे एक चांगले नाट्यलेखकही होते. संगीत शारदा त्यांनीच लिहिले आहे. देवल व कोल्हटकर यांच्या जोडीने जवळजवळ सतरा आठरा वर्षे रंगभूमी गाजवली. मला वाटते १९०१ साली कोल्हटकरांचा मृत्यु झाला आणि देवल खचले. कंपनीत नाटकापेक्षा वैयक्तिक हेवेदावे आणि क्षुद्र कुरबुरींना महत्व आले. उबग येऊन त्यांनी कंपनीच्या कारभारातील लक्ष हळूहळू कमी केले म्हणा किंवा त्यांचे लक्ष उडाले म्हणा.

कंपनीतील ज्येष्ठ मंडळींनी बालगंधर्वांना त्यांच्यासाठी गाण्यास सांगितले. परिक्षाच म्हणा ना ! अर्थात बालगंधर्व ही परिक्षा उत्तमरित्या उत्तीर्ण झाले. शिवाय एवढा देखणा मुलगा स्त्रीच्या भूमिकेत सहज सामावून गेला असता असे एकमताने ठरले. स्त्रीभूमिका करणार का अशी विचारणा झाल्यावर बालगंधर्वांनी ताबडतोब होकार दिला कारण त्यांच्या घराचीही आर्थिक स्थिती ढासळलेली होती त्यामुळे ही संधी दवडण्याचा प्रश्र्नच नव्हता. तो काळ मोठा मजेशीर होता. स्त्रिया रंगमंचावर येत नसत त्यामुळे रंगमंचावर पुरुषांचेच राज्य असे. स्त्रीभूमिकाही पुरुषच करीत. ती भूमिका पाहण्यास प्रेक्षक गर्दीही अलोट करीत, पण त्या नटाच्या घरात मात्र गहजब माजे. म्हणजे आपल्या नटरंग चित्रपटात दाखविले आहे तसे. थोडक्यात नारायणाच्या घरच्यांची परवानगी काढणे आवश्यक होते. त्यावेळी त्यांचे वय असेल १६ किंवा १७. किर्लोस्कर नाटक मंडळी हा समाजाचा अविभाज्य व महत्वाचा घटक असल्यामुळे समाजाचा व समाज धुरिणांचा मंडळींवर अप्रत्यक्ष हक्क चालत असे व तो हक्क व हस्तक्षेप मानला जात असे कारण तो चांगल्यासाठीच असणार अशी सर्वांची खात्री असे. या प्रकरणातही छत्रपती शाहू महाराज, लोकमान्य, दादासाहेब खापर्डे यांच्यासारख्या मंडळींनी या कल्पनेला पाठिंबा दिला. अपेक्षेप्रमाणे नारायणाच्या घरातून विरोध झालाच पण लोकमान्यांनी त्यांना नारायणाच्या उज्ज्वल भवितव्याची खात्री दिल्यावर हा विरोध मावळला व बालगंधर्वांचा नाट्यसराव सुरु झाला. पहिले नाटक होते संगीत शारदा ! याच्या तालमीच्या प्रयोगाला त्यांच्या आईलाही एकदा आमंत्रित करण्यात आले. नशिबाने त्यांच्या आईला ती भूमिका आवडली व घरच्यांचा उरलासुरला विरोधही मावळला.

बालगंधर्वांचा किर्लोस्कर नाटक मंडळीत प्रवेश हा असा झाला व एका नव्या युगाच्या पहाटेची लाली मराठी रंगमंचावर अवतरली.

पण देवलांनी या नवीन स्त्रीपार्ट करणार्‍या कलाकाराला त्‍यांच्‍या तालमीत तयार केले. भूमिकेच्‍या तालमी अगदी कसून चालत व अखेरीस शाकुंतल या नाटकातून बालगंधर्वांना रसिक प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आले. नारायणाचे भाग्यच म्हणायला हवे की त्यांना देवलांसारखा अनुभवी व कलेची उत्तम जाण असलेला गुरु लाभला. नट अभिनय करतोय असे प्रेक्षकांना वाटणे हा ते रंगभुमीचा अपमान समजत. संगीत त्या प्रसंगाला साजेसे असे व ओढून ताणून त्या प्रसंगात बसविले आहे असे वाटू नये याची ते पुरेपूर काळजी घ्यायचे आणि नारायणाचे नशिब, या सर्व जेष्ठांना विद्‍यादान करण्‍याची भरपूर हौस होती.
मिरजेला शाकुंतलचा पहिला प्रयोग पार पडला. नारायणराव राजहंस हे शकुंतलेची भूमिका करणार आहेत याची अगोदरच भरपूर प्रसिद्धी करण्यात आली होती. पडदा वर गेला आणि बालगंधर्व शकुंतलेच्या वेषभूषेत मैत्रिणींच्या घोळक्यात पाहून सगळीकडून दाद आली. बालगंधर्वांनी तेथेच ती रंगभूमी जिंकली. अर्थात त्यांच्या मनावर दडपण होतेच पण प्रत्येक प्रसंगानंतर ते कमी होत गेले आणि नंतर तर हा पहिलाच प्रयोग चांगलाच बहरला. त्यांचे विविध भावनांचे सादरीकरण, चेहर्‍यावरील भाव बघून प्रेक्षक खूष झाले असे म्हणायला हरकत नाही.

किर्लोस्कर मंडळीत तर कोल्हटकरांच्या मृत्युनंतर प्रथमच आनंद पसरला. म्हणजे जवळजवळ चार वर्षांनी. सगळे चांगले होणार हे दिसत असताना मराठी माणसाच्या घातक सवयीने परत एकदा घात केला. देवलां व मुझुमदार यांच्यातील मतभेद विकोपास गेल्यावर देवलांनी कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला. मतभेद असतानाही ते सुटेपर्यंत धंदा चालवता येतो हे मराठी माणसाला केव्हा कळणार कोणास ठाऊक.... पण यामुळे बालगंधर्वांची तालीम मात्र थांबली. पण सुदैवाने देवलांच्या तालमीतच तयार झालेले दोन कसलेले नट अजुनही कंपनीत होते. चिंतोबा गुरव व हणपतराव बोडस. त्यांनी ही जबाबदारी उचलली, पुढे काय झालं ते पाहून ती त्यांनी चांगल्या रितीने पार पाडली असे म्हणणे भाग आहे. याच काळात त्यांनी बालगंधर्वांकडून अनेक स्त्रीभूमिका बसवून घेतल्या.

यानंतर कंपनी मोठ्या उत्साहाने पुण्याला आली. पुण्याच्या प्रेक्षकांनाही बालगंधर्वांनी भुरळ पाडली. येथेच त्यांची गाठ अजुन एका नाटक वेड्या व थोर कलाकराशी पडली. गोविंदराव टेंभे. पुढे अनेक वर्षं ते बालगंधर्वांना साथ करीत असत. बालगंधर्वांच्या तालमी चालू होत्या आणि तेही स्वत: त्यात नवनवीन भार घालत होते. एकंदरीत ते आता परिपूर्ण नाट्यकलाकार बनण्याच्या मार्गावर चालत होते. याच काळात म्हणजे १९०७ च्या आसपास कंपनीतील ज्येष्ठांनी नारायणाचा विवाह करण्याचे ठरवले. त्या काळात रंगभूमीवर काम करणार्‍या कुठल्याही कलाकाराचा विवाह होणे कर्मकठीण असे. या क्षेत्रात काम करणार्‍या कलाकरांना मग लग्नाचे वय झाल्यावर, स्वत:ची आवडनिवड बाजूला ठेऊन तडजोड करावी लागत असे. त्याचे दुष्परिणामही नंतर होत असत. म्हणजे बघा एखाद्या कलाकराला योग्य जोडीदार मिळाला नाही की मग उरतो तो फक्त व्यवहार..किंवा एकमेकांची काळजी घेणे. काळजी ज्याला बरेच लोक प्रेम समजतात. अर्थात बर्‍याच काळानंतर अशा काही जोडप्यांमधे प्रेम निर्माण होऊन ती लग्नं टिकत. पण त्याचे ९०% टक्के श्रेय त्या जोडप्यातील स्त्रीलाच द्यावे लागेल. अशा वातावरणात स्त्रीपार्ट करणार्‍यांचे तर विचारुच नका.

नारायणाच्या विवाहास अडचणी असुनही घरच्यांचा पाठिंबा होता हे एक आश्चर्यच म्हणावे लागेल. पण तसे झाले खरे. एका गरीब ब्राह्मण घरातील रंगाने सावळी व दिसायला यथातथाच असणार्‍या मुलीशी त्यांचे लग्न लाऊन देण्यात आले. तिचे नाव होते लक्ष्मीबाई पारगांवकर. या बाईने पुढे जे सहन केले ते भयंकर होते. त्यासाठी परमेश्र्वरही बालगंधर्वांना क्षमा करेल की नाही याची मला तरी शंका आहे.

पुण्यानंतर कंपनीचे दौरे चालू झाले. ज्या गावात कंपनी जाई तेथे बालगंधर्वांवा बोलबाला होई. पुणे-मुंबई-बेळगाव-हुबळी-सोलापूर-बार्शी-कोल्हापूर-अहमदनगर-नशिक-जळगाव-अकोला अशा अनेक गावातून नाटकांचे प्रयोग होऊ लागले. या दौर्‍यांमधे बालगंधर्वांचे नाव झाले, त्यांच्या पुढील कारकिर्दीची मुहूर्तमेढ याच दौर्‍यात रोवली गेली असे म्हणायला हरकत नाही. कंपनीलाही पैसे मिळाले. या काळातील आठवणी सांगणारे सांगतात की बालगंधर्व तरुण वर्गाशी कायम संपर्कात असत. त्यांना भेटत. हे तरुण त्यांना गाण्याची फर्माईश करीत व तेही त्यांची इच्छा पूर्ण करीत. कदाचित ते भावी प्रेक्षक वर्ग तयार करीत असावेत. हे जर खरे असेल तर त्यांची दूरदृष्टीच यात दिसून येते. मित्र जोडण्याची त्यांच्याकडे अद्‌भूत शक्ती होती. एवढी लोकप्रियता मिळूनही त्यांना ‘ग’ ची बाधा य:किंचितही झाली नव्हती याला अनेकजण साक्षी आहेत. कंपनीतील जेष्ठांचा ते नेहमीच आदर करीत व त्यांना विचारल्याशिवाय कुठल्या मैफ़िलीचे आमंत्रणही घेत नसत. अर्थात अण्णासाहेब किर्लोस्करांच्या संस्कारात तयार झालेल्या या मंडळींनी तोच वारसा पुढे चालू ठेवला होता व कंपनीतही तसे वातावरण होते.
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर किंवा काकासाहेब खाडिलकर या अजून एक मातब्बर माणसाची कंपनीशी गाठ पडली. १९१० पासून त्यांनी कंपनीसाठी नाटके लिहिण्यासही सुरु केले. हा एक मोठा फ़ायदाच झाला कंपनीला. हे लोकमान्यांचे सहाध्यायी होते व केसरीच्या संपादकपदीही होते. जेव्हा काकासाहेब कंपनीच्या प्रमुख नटांना अभिनय शिकविण्यास जात असत तेव्हाच त्यांची गाठ बालगंधर्वांशी पडली. हे संबंध व बंध पुढे अनेक वर्षे वाढत जाणार होते. काकासाहेबही त्यांच्या तालिमी घेत. त्या दिवसभर चालू असत. प्रेमशोधनच्या वेळेस बहुधा इतरांसमोर स्त्रीसुलभ हावभाव शिकविणे काकासाहेबांना अवघड वाटे. असे म्हणतात ती तालीम ते रात्री चौपाटीवर घेत. त्यांच्या गायकीबद्दल आपण लिहिणे हे फ़ार मोठे धाडस होईल पण त्यांचा आवाज फार म्हणजे फार गोड होता असे म्हणतात.

अल्लादियाखॉंसाहेब जे शक्यतो कुणाच्या मैफिलीला जायचेही टाळत ते म्हणत, “मला गाणे ऐकावेसे वाटले की मी बालगंधर्वांच्या नाटकाला जाऊन बसतो. वो मिठी जबानके गलत सूर भी मुझे प्यारे लगते है. इनकी निषाद भी कितनी मिठी, मेरेसे भी नही निकलती...” तर तिरखवाँसाहेब म्हणत, “सिर्फ दो नबाब मै मानता हूं. गानेवालेमें रामपूरका नबाब और मराठी नाटकका गानेवाला नबाब.” हे जरा अवांतर झाले खरे..

काकासाहेबांनी आत्तापर्यंत गद्य नाटकेच लिहिली होती. त्यांनी मानापमान हे संगीत नाटक बालगंधर्वांना डोळ्यासमोर ठेऊन लिहिले. त्यातील पदांना चाली लावण्याचे काम अनुभवी गोविंदराव टेंभ्यांना देण्यात आले. गोविंदरावांवर फार मोठ्या व्यक्तिंचा प्रभाव होता. उदा. गोहरजान, (गोहरजान कर्नाटकी नव्हे), अल्लादियाखाँ व भास्करबुवा बखले इ.इ. गोविंदरावांनी पद्यांना अशा चाली लावल्या की त्या अजुनही लोकांच्या कानात गुंजत आहेत.

नाटकाचा पहिला खेळ लागला पुण्याला १२ मार्च १९११ या दिवशी. बालगंधर्व भामिनीची प्रमुख भूमिका करणार होते. तशी जहिरातही झाली होती. खेळाची सर्व तिकिटे विकली गेली होती आणि ती दु:खद बातमी आली. बालगंधर्वांची पहिली कन्या “इंदुमती” वारल्याची बातमी. मोठा बाका प्रसंग उभा राहिला. काकासाहेबांचे पहिले संगीत नाटक, व प्रमुख भुमिकेत बालगंधर्व. किर्लोस्कर नाटक मंडळीतील सर्वांनी बालगंधर्वांना नाटक पुढे ढकलू असे समजाविण्याचा प्रयत्न केला. एवढेच काय जेव्हा प्रेक्षकांना हे कळले तेव्हा त्यांनीही नाटक पुढे ढकलण्याचा आग्रह केला पण बालगंधर्वांनी सगळ्यांना नम्रपणे नकार दिला. “जे व्हायचे ते होऊन गेले. पण प्रयोग होणार. माझ्यावर नितांत प्रेम करणार्‍या प्रेक्षकांना मी निराश करणार नाही” आणि असे म्हणतात त्यांनी तो प्रयोग इतका समरस होऊन केला की एका क्षणी प्रेक्षकांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या. मला या माणसाच्या मनाचे मोठे आश्चर्य वाटते. याला निष्ठूर म्हणावे का कर्तव्य कठोर ? निरिच्छ म्हणावे का व्यवहारी ? त्या क्षणी त्यांच्या मनात काय वादळे उठली असतील ? त्यांच्या मनात त्यांच्या पत्नीचा विचार आला असेल का ? आला असेल तर त्यांना हेही कळले असेल की तिला त्यावेळी सगळ्यात जरुरी असेल तर त्यांच्या सोबतीची. जर कळले असेल तर मग कुठल्या भावनांनी कुठल्या भावनांवर मात केली असेल ? का या माणसाला भावनाच नव्हत्या ?
अनेक प्रश्र्न ! पण उत्तरे मात्र काळाच्या उदरात गडप झाली.

रंगभूमीच्या या तेजस्वी प्रकाशाच्या मागे लपलेले बालगंधर्वांच्या कुटुंबाचे अंधारविश्र्व कधीच प्रकाशात आले नाही. त्यांच्या प्रत्येक नाटकाच्या वेळी त्यांचे एक अपत्य काळाने त्यांच्यापासून हिरावून नेले आणि ते रंगभूमीची सेवा करीत राहिले. श्री.रविंद्र पिंगे यांनी त्याची यादीच दिली आहे. मानापमानच्या वेळी त्यांची मुलगी इंदुमती वारली. स्वयंवर रंगभूमीवर येतानाच मुलगा कृष्णा वारला. संयुक्त मानापमानच्यावेळी दुसरा मुलगा वारला. कान्होपात्रा रंगभूमीवर आलं आणि दुसरी मुलगी कमला वारली. द्रौपदी नाटक आले आणि तिसरा म्हणजे शेवटचा मुलगा वारला. ते मात्र अलिप्तपणे नाटक करीत राहिले. ते प्रेक्षकांना मायबाप म्हणत. या मायबापांची नातवंडे मात्र या जगात टिकली नाहीत हे खरे.

ते काहीही असो संगीत मानापमानने मराठी रंगभूमीवर इतिहास रचला. या नाटकाने अजून एक मोठे काम केले म्हणजे मराठी नाटकाची लोकप्रियता मराठी भाषेबाहेर पसरविली. गुजराथी, पारशी, सिंधी व कर्नाटकी मंडळी या नाटकांना आवर्जून हजेरी लावू लागली. पारशी व गुजराथी समाजात त्या काळातील पिढीजात श्रीमंत मंडळी असत. त्या समाजातील युवक मंडळीमधे बालगंधर्वांची नाटके पाहणे ही फॅशनच झाली. ग्रामोफोन कंपन्यांनी बालगंधर्वांच्या रेकॉर्ड काढल्यावर तर त्यांची किर्ती पार पंजाबपर्यंत पोहोचली. कदाचित अफगाणिस्थानपर्यंतही पोहोचली असावी कारण मी त्या बद्दल मधे कुठल्या तरी फोरमवर वाचले होते. हे शक्य आहे कारण त्या काळात त्या देशातून अनेक गवय्ये दिल्लीत गाणे शिकण्यासाठी यायचेच. (ग्रामोफोनच्या रेकॉर्ड काढण्यास त्यांचा कट्टर विरोध होता. पण सोलापूरला शेठ माणिकचंद शहा यांच्या आग्रहाखातर त्यांनी एका "मद्य'रात्री रेकॉर्ड काढण्यास होकार दिला. ग्रामोफोन कंपनीने लगोलग मुंबईहून येऊन सोलापूरला अनेक नाट्यसंगीताच्या रेकॉर्डस काढल्या. त्याच सोलापूरात पुढे केव्हातरी बालगंधर्वांनी शेठजींच्या विनंतीला मान देऊन मद्यपान कायमचे बंद केले असे म्हणतात).

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

१९०१ साली कंपनीचे एक आधारवड श्री. नानासाहेब जोगळेकर यांचा मृत्यु झाला. तेव्हा त्यांचे वय अवघे ३५-३६ असेल. याच जोगळेकरांनी श्री. मुझुमदारांबरोबर कंपनीची धुरा सांभाळली होती. त्यांच्या मृत्युनंतर नेहमीप्रमाणे कंपनीत कुरबुरी सुरु झाल्या. बहुधा वरिष्ठ सदस्यांमधील मतभेद हे कंपनी कोण चालविणार यावरुन असाव्यात. अर्थात खाडीलकरांनी बालगंधर्वांच्या देवयानी व रुक्मिणीच्या तालमी काही थांबविल्या नव्हत्या. या दोन्ही नायिका त्यांच्या विद्याहरण व स्वयंवर या दोन नवीन नाटकातील होत्या. मानापमानाबरोबर याही नाटकांचे प्रयोग होणार होते. अंतर्गत कटकटी नवीन भागीदार घेऊन मिटविण्यात आल्या. ते होते शंकरराव मुझुमदार, गणपतराव बोडस, आणि बालगंधर्व.

कंपनीच्या दुर्दैवाने संगीत विद्याहरणाच्या पहिल्या प्रयोगावेळी विंगेत मानापमानाचा खरा खेळ चांगलाच रंगला.... शंकररावांनी निवडलेल्या वेषभूषेला बालगंधर्वांनी कडाडून विरोध केला. त्यांनी शंकररावांवर स्पष्टच आरोप केला की हे असले कपडे म्हणजे मोरीला बोळा लावून पैसे वाचविण्यासारखे आहे. हा वाद विकोपाला गेल्यावर काकासाहेब खाडीलकरांनी बालगंधर्वांची बाजू घेतली. एकमेकांचा अपमान होण्याइतपत भांडणात भाषा वापरली गेली. वास्तविकत: यात शंकररावांची काही चूक असेल असे वाटत नाही. त्यांनी कंपनीच्या स्थापनेपासून कंपनीसाठी जीव ओतून काम केले होते. किर्लोस्करांविषयी वाटणार्‍या प्रेमापोटी त्यांनी पुण्यात एक किर्लोस्कर नाट्यगृह बांधले व त्याचे उद्‌घाटनही १९०९ साली केले होते. यात बरेच पैसे गुंतल्यामुळे व कर्ज झाल्यामुळे त्यांनी कंपनीत खर्चावर थोडे निर्बंध आणले होते हे खरे पण त्यात खरोखरीच भांडण्यासारखे काही नव्हते. त्यांनी कंपनीचे बरे वाईट दिवस पाहिले होते. त्यांचे असे प्रामाणिक मत होते की कंपनीची आर्थिक परिस्थिती सावरेपर्यंत जरा काटकसर केली पाहिजे आणि ते त्याबाबतीत स्वत: प्रामाणिक होते. त्यांची ही आर्थिक शिस्त न पाळल्यामुळे पुढे बालगंधर्वांवर दिवाळं काढायची वेळ कशी आली ते आपण पाहणारच आहोत.

इतर कारणेही असतील पण या भांडणांचा पर्यावसान बालगंधर्व, काकासाहेब गाडगीळ व बोडस यांनी कंपनीला रामराम ठोकण्यात झाला. दिवस होता १३ जून, १९१३. या बातमीने महाराष्ट्रात खळबळ उडाली. न. चि. केळकरांनी दोन्ही पक्षांमधील मतभेद मिटविण्याचा बराच प्रयत्न केला पण पालथ्या घड्यावर पाणी. मराठी माणसाला उद्योगधंदे काढण्याची भारी हौस व ते बंद पाडण्याची त्याहूनही जास्त हौस. ते स्वत: तरी ते बंद पाडतात किंवा त्यांच्या कामगार संघटना तरी बंद पाडतात. या तिघांनी नवीन कंपनी स्थापन केली, : गंधर्व नाटक मंडळी. या कंपनीबरोबर नारायणरावांच्या आयुष्यातील दुसरा अध्याय चालू झाला.

दुसर्‍याच दिवशी केसरीमधे खालील जहिरात झळकली.

गंधर्व नाटक मंडळी
काही अपरिहार्य अडचणींमुळे ’ किलोस्कर संगीत मंडळींशी असलेला कित्येक वर्षांचा संबंध सुटला जाऊन, संगीत नाट्याची सेवा अव्याहत घडावी म्हणून “ गंधर्व नाटक मंडळी ” या नावाची नवी संस्था किर्लोस्कर मंडळीतील नावाजलेले प्रमुख गायनकुषल व अभिनयपटू नट रा. बालगंधर्व, रा. टेंबे व रा. बोडस यांनी काढली आहे. कै. रा. आण्णासाहेब किर्लोस्करकृत शाकुंतल, सौभद्र, रामराज्यवियोग, रा. देवलकृत शारदा, मृच्छकटिक, शाप संभ्रम, रा. कोल्हटकरकृत मूकनायक, वीरतनय, प्रेमशोधन, मतिविकार व रा. खाडिलकरकृत मानापमान,विद्याहरण वगैरे खेळ ही मंडळी मुंबई येथे एल्फिस्टन थिएटरात तारीख २३ आगष्ट १९१३ पासून करुन दाखवील. मंडळीत येऊ इच्छिणार्‍या नटांनी खालील पत्यावर लिहावे अगर समक्ष भेटावे,
सेक्रेटरी,
गंधर्व नाटक मंडळी.
बुधवार पेठ, ढमढेरे यांचा बोळ,
माळ्याची धर्मशाळा,
पुणे शहर.

या नवीन कंपनीत सर्वात तरुण भागीदार होते बालगंधर्व. त्यावेळेस त्यांचे वय २५ असावे. या सगळ्या मंडळींच्या मनात एकच धाकधूक होती ती म्हणजे रसिक प्रेक्षकवर्ग किर्लोस्कर कंपनी फोडून बाहेर पडलेल्या या तिघांना आपले म्हणतो की नाही ती. पण बालगंधर्वांच्या जादूची या लोकांना कल्पना नव्हती असेच म्हणावे लागेल. रसिक प्रेक्षकांची किर्लोस्कर मंडळींची परंपरा या मंडळींच्या हातात सुरक्षित आहे हे उमगल्यावर मग गंधर्व नाटक मंडळीने मागे वळून पाहिले नाही. आता प्रश्र्न होता भांडवलाचा. तो सोडवला बाळासाहेब पंडितांनी. हे या नवीन नाट्यसंस्थेचे व्यवस्थापक होते. त्यांनी त्या काळात बालगंधर्वांच्या एका चाहत्याकडून ७००० रुपयांचे कर्ज मिळवले. हे कोण होते हे मला माहीत नाही. गंधर्व नाटक मंडळींनी किर्लोस्करांचीच नाटके सादर करण्याचे ठरविल्यावर दुसरा प्रश्र्न आला परवानगीचा. शंकरराव मुझुमदारांनी अगोदरच ही नाटके करु नयेत अशा स्वरुपाची नोटीस पाठवली होती. पण महत्‌प्रयासाने परवानगी मिळाली व नाटके करण्याचा मार्ग मोकळा झाला. या नवीन कंपनीचे कामकाज सुरळीत व काटेकोरपणे चालावे म्हणून भागीदारांनी एक समितीही नेमली. त्यात स्वत: न. चि. केळकर, सॉलिसिटर लाड व वैद्य, आबासाहेब विंचुरकर, बाळासाहेब धारकर व बाळासाहेब पंडित याना घेण्यात आले. अशी सगळी व्यवस्था झाल्यावर कंपनीची घोडदौड सुरु झाली. सामान्य जनतेचा कंपनीला कौल मिळालाच पण अनेक संस्थानिकही गंधर्व नाटक कंपनीला उदार राजाश्रय देऊ लागले. उदा. बडोद्याच्या राजांनी कंपनीला सालिना ५००० चा तनखा सुरु केला. त्यात त्यांच्या राज्यात त्यांच्या उपस्थितीत नाट्यप्रयोग करणे ही एकच अट होती.

गंधर्व कंपनी चालू लागल्यावर किर्लोस्कर कंपनीतील अनेक मान्यवर ती कंपनी सोडून या कंपनीत रुजू झाली. गंधर्व नाटक मंडळींनी तरुण रक्तालाही वाव देण्याचे धोरण अनुसरले. त्यातील एक म्हणजे आपणा सर्वांना माहीत असलेले कोल्हापूरचे श्री. वनकुद्रे जे व्ही. शांताराम म्हणून प्रसिद्ध झाले. त्यानंतर खुद्द श्री. देवलच गंधर्व कंपनीत सामील झाले. त्यांनी गंधर्वसाठी त्यांचे एक नाटक देऊ केले ज्याचे नाव होते ’फाल्गुनराव’. त्यात त्यांनी बालगंधर्वांसाठी काही पदे टाकून त्याचे बारसे केले
“ संशयकल्लोळ ” हे नाटक फ्रेंच नाटक गानारेल - इंग्लिश नाटक ALL in wronng या नाटकावर बेतले होते. त्यांनीच नंतर मृच्छकटिक नावाचे संस्कृत नाटक मराठीत आणले.

या काळात श्री. पंडित हे जवळजवळ कंपनीचे सर्वेसर्वा झाले होते. त्यांना उत्पन्न व खर्च याचा मेळ घालता येईना. त्यांनाही बालगंधर्वांसारखं सगळं भव्यदिव्य करण्याची अत्यंत मोठी हौस. अनाठायी खर्चाची तमा ते दोघेही बाळगत नसत. कंपनी कशी चालविण्यात यावी याबद्दल श्री. बोडस व टेंबे यांच्या काही ठाम पण चांगल्या कल्पना होत्या. पंडितांच्या मनमानी कारभारास त्यामुळे खीळ बसू लागली. त्यांनी या तीन भागीदारात गैरसमज होतील याची काळजी घेतली असे म्हणतात. पण हे सहन न होऊन टेंबे यांनी कंपनीचा राजिनामा दिला व ते बाहेर पडले.

पंडितांनी कंपनीत इतकी जरब बसविली होती की असे म्हणतात त्यांना विचारल्याशिवाय बालगंधर्वांना कोणासही भेटता येत नसे. एवढेच नाही तर खुद्द बालगंधर्वांनाही बाहेर मैफ़ील करण्यासाठी त्यांची परवानगी काढायला लागे.

मोठी गंमत आहे. व्यवसाय नाटकाचा म्हणजे सगळे नकलीच की ! किंवा भासमय. शेवटी कागदावर लिहिलेल्या पात्रांची नक्कल करुन त्यांना रंगमंचावर सादर करणेच, म्हणजे तीही नक्कलच, पण रंगरंगोटी नकली, वेषभूषा नकली. अंबाडा खोटा, पुरुषाने केलेली स्त्री भूमिका म्हणजे तेही खोटे पण बालगंधर्वांना दागिने मात्र खर्‍या सोन्याचे लागायचे. कपडे, साड्या खर्‍या जरीच्या लागायच्या. अत्तरे महागडी लागायची.... शेवटी शेवटी त्यांच्या या वेडाच्या आख्यायिका झाल्या. ऐशी रुपायाची पादत्राणे, वीस हजाराचे गालिचे, हजार रुपायाचा मुकुट, दागदागिने, हजार दोन हजाराचे शालू, पैठण्या, पॅरिसहून मागविलेले केसाचे विविध टोप, हे नकली रुप कसे दिसते हे सारखे पाहण्यासाठीविंगेत बेल्जियमहून आणलेले आरसे हे सगळे काय होते ? ( त्या काळात एखाद्या कारकुनाचा पगार महिना ८ रुपये असायचा तर मास्तरांचा ३०-३५.) त्यांनी तो प्रश्र्न त्यांच्या प्रतिष्ठेचा केला. जणू खोटे दागिने घातल्यावर त्यांच्या आभिनयाला कमीपणा येणार आहे. हे मला काही उलगडत नाही. बरं त्यांच्या सारख्या हुशार माणसाला हे उमगत नसेल असे म्हणवत नाही. मग असे का ? त्यांनाच माहीत.... मी हे लिहिल्यानंतर, श्री. टेंब्यांनी लिहिलेला खालील परिच्छेद माझ्या वाचनात आला आणि मला काय म्हणायचे आहे हे या माणसाने फार पूर्वीच थोडक्यात लिहिले आहे हे लक्षात आले.

टेंबे म्हणतात, “नाटक कंपनी नेपथ्याच्या दृष्टीने फार थोड्या भांडवलात उभी करता यावी अशी माझी प्रथमपासून कल्पना होती आणि शिवराज कंपनीत ती मी अमलात आणू शकलो. काटकसर केली म्हणून कपड्यांची, वाद्यांची, पडद्यांची कमतरता भासू दिली नाही हे कोणीही सांगेल. पण नाटक ही संस्थाच मुळी नकली. त्यात अस्सल वस्तूंचे प्रयोजन काय असे मला वाटे. अभिनय अस्सल वाटला असे म्हटले, तरी ती नक्कलच आणि रंगभूमीपुरतीच त्याची प्रतिष्ठा. अशा नकली व्यवसायासाठी निष्कारण खरी, बहुमोल व महागडी उपकरणे वापरल्याने खर्‍या कलेचा गौरव होत नाही पण पैशाचा अपव्यय मात्र होतो व नाट्यव्यवसाय हा हत्तीचे कलेवर होऊन बसतो.”

तर या हत्तीचे कलेवर होण्यास सुरुवात झाली की काय अशी शंका येण्याची परिस्थिती लवकरच निर्माण झाली. गंधर्वमंडळी परत आर्थिक अडचणीत सापडली पण यावेळी बालगंधर्वांची उधळपट्टी एवढेच एक कारण नव्हते. श्री. पंडितांनी कंपनीत येण्यापूर्वी कुठेतरी बॅंकेत आर्थिक गैरव्यवहार केला होता व त्यांच्यावर फ़ौजदारीही झाली होती. याच सुमारास बहुदा तो खटला उभा राहिला होता व वकिलांची भरमसाठ फी चुकविता चुकविता त्यांच्या नाकीनऊ आल्यामुळे त्यांनी कंपनीतून कुणालाही न सांगता पैसे उचलण्यास सुरुवात केली होती. काही जण म्हणतात पंडितांना या दुष्कर्मात इतर भागीदारांची अडचण वाटत होती त्यामुळे त्यांनी त्यांचा काटा काढला. खरे खोटे तेच सगळे जाणोत.

इकडे बालगंधर्वांचे अव्यवहार्य, उत्तमातील उत्तमाचे वेड काही कमी होण्याची लक्षणे दिसेनात. द्रौपदी या नाटकातील कौरवांच्या दरबाराच्या एका प्रसंगासाठी साहेबांनी तब्बल ७५००० रुपये खर्च करुन रंगमंच सजवला. त्याच काळात श्री. गडकर्‍यांनी बालगंधर्वांसाठी ‘एकच प्याला‘ लिहिले. ते मंचावर आले तेव्हा फाटक्या कपड्यातील बालगंधर्वांचे अभिनय गुण काही लपून राहिले नाहीत. गंमत म्हणजे १९३१ साली रंगमंचावर २५ वर्षे पूर्ण झाल्याप्रित्यर्थ रत्नाकर मासिकाने बालगंधर्व गुणगौरव विशेषांक काढला त्यात बालगंधर्वांची सर्वोत्कृष्ट भूमिका कोणती असा कौल घेण्यात आला. त्यात दागिन्यांनी मढलेल्या रुक्मिणीपेक्षा दुप्पट मते फाटक्या वेषातील सिंधूला पडली. त्या मताचा मान राखून या विशेषांकावर सिंधूचे तैलचित्र छापण्यात आले. दुर्दैवाने हे नाटक गडकरींच्या मृत्युनंतर एक महिन्याने रंगमंचावर आले. गडकर्‍यांना जर अजून आयुष्य लाभले असते तर मराठीजनांस एकसोएक नाटके पहावयास मिळाली असती हे नि:संशय.

बालगंधर्वांची लोकप्रियता ही अशी वाढत होती. रसिकजन दूर दूरुन केवळ नाटक नघण्यासाठी येऊ लागले. त्यात भाषा, प्रांत आड येत नव्हते ना पैसा. कित्येकांनी तारा पाठावून आपली आसने राखून ठेवली तर कित्येकांनी त्या काळात १०० रुपयेही एका तिकिटासाठी मोजल्याचे उल्लेख आहेत. प्रेक्षकांसाठी खास गाड्या सोडण्यात आल्या. उदा. ही खालची गोव्यातील जहिरात पहा – यातील काही उल्लेख आपल्याला मजेशीर वाटतील.
p {}
p.ex {margin-left: 80px;}शनिवार रात्रौ व रविवार दिवसा
नाटक बघण्यास येणार्‍या लोकांस प्रयोग संपल्यावर बेतीं व बेरें येथे परत जाण्यासाठी गंधर्व नाटक मंडळींने स्वखर्चाने बोटीची खास व्यवस्था केली आहे.
कॉम्प्लिमेंटरी पासेस असणार्‍या इसमास केव्हाही सवडीप्रमाणे “ जागा “ मान्य करावी लागेल
श्रीमंत महाराज सयाजीराव गायकवाड राज्य बडोदे यांच्या खास आश्रयाखालील-
गंधर्व नाटक मंडळी.
रा. रा. कृ. प्र खाडिलकर कृत
स्वयंवर
पणजी – एडन सिनेमा थिएटर
शनिवार ता. २७ फ़ेब्रुवारी सन १९३२ रोजीं रात्रौ ९॥ वाजतां
तिकीटाचे दर : खुर्ची ५, ४, ३, २॥, २, १॥ बांक : १ ग्यालरी: ॥। कु. स्त्रिया : ॥। वेश्या: १ रु

क्रमशः
बालगंधर्व....भाग - २
जयंत कुलकर्णी.
हा लेख बराचसा श्री नाडकर्णी यांनी लिहिलेल्या बालगंधर्वांच्या चरित्रावर बेतलेला आहे. इतर जणांचे श्रेय त्या त्या ठिकाणी दिलेलेच आहे. सर्व छायाचित्रे इंटर्नेटवरुन व पहिली दोन माझ्या संग्रहातील..

कथालेख

प्रतिक्रिया

खेडूत's picture

12 May 2016 - 10:26 am | खेडूत

लेख अतिशय आवडला.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

अवांतरः
आपले लेख लागोपाठ आले तरी आनंद्च आहे.
असे चांगले चुंगले वाचायलाच आमच्यासारखे अनेक जण मिपावर येत असतात.

हकु's picture

12 May 2016 - 11:06 am | हकु

सहमत

नंदन's picture

12 May 2016 - 10:29 am | नंदन

लेख आणि ओळख. पुढील भागांची वाट पाहतो आहे.

यानंतर मात्र लगेच लेख टाकणार नाही याची खात्री बाळगा....

याचा मात्र निषेध! सध्याच्या चर्चाळ वातावरणात तर तुमच्या लेखमालांइतके दिलासादायक दुसरे क्वचितच काही असेल.

नाखु's picture

12 May 2016 - 11:32 am | नाखु

फक्त एक शब्द बदलण्याची विनंती वजा गुस्ताखी करीत आहे.

सध्याच्या चर्चाळ ऐवजी सध्याच्या वाचाळ

मिपा नित वाचक नाखु

सौंदाळा's picture

12 May 2016 - 11:33 am | सौंदाळा

+१००

हेच म्हणते. लिहिणे थांबवू नये, ही विनंती.

लेख अतिशय माहितीपूर्ण! छान.

अभ्या..'s picture

12 May 2016 - 11:13 am | अभ्या..

अहाहाहाहाहा.
नंतर निवांत शिस्तीत वाचायचा राखीव लेख. तूर्तास आमच्या गावांशी बालगंधर्वांचे जुने ऋणानुबंध वाचून अहं झाले आहे.
शतशः धन्यवाद जयंतराव

काय छान लेख लिहीला आहे. मस्तच....

अनुप ढेरे's picture

12 May 2016 - 11:49 am | अनुप ढेरे

छान लेख!

हि एक एरर आहे ...
फ्रेंच नाटक गानारेल - इंग्लिश नाटक ALL in wronng -> संशयकल्लोळ
असा प्रवास आहे

जयंत कुलकर्णी's picture

12 May 2016 - 1:17 pm | जयंत कुलकर्णी

तुम्ही म्हणता तो उल्लेख मीही वाचला आहे. ओअण मी श्री. नाडकर्णींच्या लेखावर विश्र्वास ठेवला. मी ना संशय कल्लोळ वाचले आहे ना कॉमेडी ऑफ एरर ना गानारेल... आपल्याला जर खात्री असेल तर मी तशी दुरुस्ती जरुर करेन..
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

अत्रन्गि पाउस's picture

12 May 2016 - 5:16 pm | अत्रन्गि पाउस

मी नुकतेच एका तज्ञ व्यक्ती कडून खातरजमा केलेली आहे

पैसा's picture

12 May 2016 - 5:29 pm | पैसा

मी संशयकल्लोळ आणि कॉमेडी ऑफ एरर्स दोन्ही वाचलेत. संशयकल्लोळ पाहिले आहे. खरे तर फार्सिकल कथा आहे इतकेच. कथेत साम्य प्रथमदर्शनी वाटत नाही. कॉमेडी ऑफ एरर्स मधे जुळे मालक आणि त्यांचे जुळे नोकर यांची विनोदी कथा आहे. त्यावर संजीवकुमारचा अंगूर सिनेमा आधारित होता.

जयंत कुलकर्णी's picture

12 May 2016 - 5:31 pm | जयंत कुलकर्णी

बदल केला आहे.
धन्यवाद !

अत्रन्गि पाउस's picture

12 May 2016 - 10:25 pm | अत्रन्गि पाउस

ह्या बदला मुले आता माझा प्रतिसाद असंबद्ध आहे ...कृपया उडवावा हि विनंती

भारी व विस्तृत लिहिलेय. पुभाप्र असे म्हणवत नाही कारण बालगंधर्वाचा पडता काळ ही एक कटू आठवण म्हणावी लागेल.

सिरुसेरि's picture

12 May 2016 - 1:11 pm | सिरुसेरि

छान लेख व माहिती . संशयकल्लोळमधील सर्वात शेवटी असलेले "चिन्मया सदया" हे गाणे बालगंधर्व चित्रपटात खुबीने वापरले आहे .

अनिरुद्ध प्रभू's picture

12 May 2016 - 1:15 pm | अनिरुद्ध प्रभू

यानंतर मात्र लगेच लेख टाकणार नाही याची खात्री बाळगा....

याचा मात्र जाहिर निषेध..

लवकर लिहा...पुभाप्र

(प्रतिक्षेत असलेला)
अनिरुद्ध

चाणक्य's picture

12 May 2016 - 2:40 pm | चाणक्य

वाचतोय. पुभाप्र.

प्रचेतस's picture

12 May 2016 - 2:42 pm | प्रचेतस

उत्कृष्ट लेख.
संगीत नाटकाची कदापिही आवड नसणार्‍या किंवा बालगंधर्वांचे एकही गाणे माहित नसलेल्या माझ्यासारख्यालाही हा लेख वाचावासा वाटला तो तुमच्या लेखणीमुळेच.

लेखन थांबवू नका. कुडे-गांधारपाले-पन्हाळेकाजीच्या पुढच्या भागाची वाट पाहातो आहेच.

शेवटी दिलेल्या गोव्यातील प्रयोगाच्या जाहीरातीत वेश्यांना वेगळ्या दराने तिकिटे हा स्पष्ट उल्लेख रोचक आहे. त्या आधी कु. स्त्री लिहिलेय ते कुलीन स्त्रियांसाठी आहे की कुमारी? असे वेगळे दर का?

संजय पाटिल's picture

12 May 2016 - 4:24 pm | संजय पाटिल

ते कुलीन स्त्री असेच असावे. त्या काळी बहुतेक कुलीन स्त्रीया नाटक पहत नसव्यात. म्हणुन त्यांना सवलत- बारा आणे!
तसेच वेश्या म्हण्जे नाच गाणी करणारी, त्यामुळे त्यांच्या कडे भरपूर संपत्ती असावी असे ग्रुहीत धरून त्याना १ रु.!
मझा आपला एक अंदाज हं!

बबन ताम्बे's picture

12 May 2016 - 3:07 pm | बबन ताम्बे

एका दिवाळी अंकात आचार्य अत्र्यांनी बालगंधर्वांवर लिहीलेला लेख वाचण्या आला होता. त्यात अत्र्यांनी बालगंधर्वांच्या राजेशाही राहणीमानावर आणि उधळ्पट्टीवर सडकून टिका केली होती. तसेच त्यांच्या उतारवयात देखील स्त्री भूमिका करण्याच्या अट्टाहासाबद्द्ल उपहास केला होता.

अत्रन्गि पाउस's picture

12 May 2016 - 10:26 pm | अत्रन्गि पाउस

वाचायला ...

बबन ताम्बे's picture

13 May 2016 - 12:06 pm | बबन ताम्बे

वाचनालयातील दिवाळी अंकात वाचले होते. विषय बालगंधर्व आणि त्यावेळच्या इतर दिग्ग्जांनी मराठी नाटयकला वुर्द्धींगत करण्यासाठी काय केले असा होता. सिनेमाच्या आगमनामुळे नाटक त्यावेळी मरणपंथाला लागले होते. पण आचार्य अत्र्यांचे म्हणणे होते की फक्त सिनेमाला दोष देऊ नका. तुम्ही नाट्यकला पुढे नेण्यासाठी काय केले ते सांगा. कुणी नाट्यक्षेत्राला वाहीलेले विद्यापीठ काढले नाही की पुढ्च्या पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी काही केले नाही. त्यांचे म्हणणे होते की एकटया बालगंधर्वांना त्यावेळी मराठी रसिकांनी ३५ लाख दिले. पण त्यांनी त्याचे काय केले हे वरील लेखात आलेलेच आहे. त्यांनी असेही लिहीले होते की १९११ साली तिच रुक्मिणी आणि १९४५ साली पण तिच रुक्मिणी. मराठी बापड्या रसिकांनी कीती अन्याय सहन करायचा. का नाही ते सिनेमाकडे वळणार ? शिवाय ती करमणूक नाटकापेक्षा स्वस्त ! त्यांनी असेही लिहीले होते की हे स्त्री पार्टी नावाचे सोंग आता नाटकांतून बंद केले पाहीजे.

मारवा's picture

12 May 2016 - 3:24 pm | मारवा

अप्रतिम !

पैसा's picture

12 May 2016 - 4:31 pm | पैसा

_/\_

नाटकाचे तिकीट ५ रुपये म्हणजे कायच्या काय तेव्हाच्या काळात. आजी सांगायची तेव्हा ५ रुपयात तांदुळाची गोण यायची. लोकांचा अख्ख्या महिन्याचा पगार पण तितका नसे. गोवा तेव्हा पोर्तुगीज अमलात असल्याने दर अधिक चढे असतील.

उगा काहितरीच's picture

12 May 2016 - 7:51 pm | उगा काहितरीच

नंतर निवांत वाचीन! जेवढा वाचला तेवढा लेख अप्रतिम आहे.

किलमाऊस्की's picture

12 May 2016 - 11:52 pm | किलमाऊस्की

खूप आवडला. योगायोगाने मी सध्या 'एक होता गंधर्व'(डॉ. राम म्हैसाळकर) वाचतेय.

कुणाला वाचायचं असल्यास पिडीएफ कॉपी इथे मिळेल.

बोका-ए-आझम's picture

12 May 2016 - 11:56 pm | बोका-ए-आझम

जयंतकाका, पुभाप्र!

रातराणी's picture

13 May 2016 - 12:11 am | रातराणी

सुंदर लेख! पुभाप्र.

लिओ's picture

22 May 2016 - 1:19 pm | लिओ

पुण्‍यापासून १२६ कि. मी अंतरावर सातार्‍याच्‍या (सध्या रस्त्यावर जे लागते तेच असावे बहुधा) पुढे एक नागाठणे नावाचे छोटे गाव आहे तेथील हे ब्राह्मण राजहंस घराणे.

वरती उल्लेख केलेले नागठाणे हे साताराजवळील नसुन सध्याच्या सांगली जिल्ह्यातील वाळवा गावाजवळिल ( तालुका वाळवा) नागठाणे आहे. सांगली वर्तमान पत्रात नागठाणे येथील रखडेल्या बालगंधर्व स्मारकाची बातमी वाचनात आली होती.

बालगंधर्व चित्रपटातील एक प्रसंग ( शेवटचा)

कोल्हापुरचे छत्र्पती शाहू महारा़ज यांनी कर्जमुक्तीसाठी बालगंधर्व यांना किंमती भेटवस्तू दिल्या होत्या व या भेटवस्तू बालगंधर्व यांनी परतताना एका दर्ग्यावर अर्पण केल्या.

हे खरे आहे काय ?

जयंत कुलकर्णी's picture

22 May 2016 - 4:45 pm | जयंत कुलकर्णी

बरोबर आहे. ! दुरुस्ती केली आहे.
धन्यवाद !
जयंत कुलकर्णी.

बबन ताम्बे's picture

23 May 2016 - 4:50 pm | बबन ताम्बे

चित्रपटात ते बडोदयाचे श्रीमंत सयाजीराव गायकवाड महाराज दाखवलेत.

जयंतराव सर्व लेख अप्रतिम झाले आहेत. लेखातील माहिती ,संदर्भ खूपच छान. आता खर्या अर्थाने बाबालगंधर्व उमगले. पुलेशु

स्वीट टॉकर's picture

22 May 2016 - 5:28 pm | स्वीट टॉकर

नेहमीप्रमाणेच अतिशय माहितीपूर्ण आणि वाचनीय लेख. 'घाईने पुढचा लेख टाकणार नाही' असं का म्हणताय?

मी-सौरभ's picture

23 May 2016 - 6:19 pm | मी-सौरभ

नेहमी प्रमाणेच ऊत्तम लेखन काका

तुमचा पुतण्या क्र. ६४४०
सौरभ