'सैराट'वर सध्या बरीच चर्चा होतेय. माझे मत नोंदवण्याचा मोह आवरत नाहीये म्हणून हा लेख-प्रपंच! आता हा विषय चघळून कंटाळा आला असल्यास क्षमस्व. लेख उडवला तरी नो हरकत!
काल 'सैराट' पाहिला. काही लोकांकडून अफाट स्तुती ऐकली होती तर काहींनी बेक्कार नाके मुरडली होती. अतिशय टोकाची मते 'सैराट'विषयी ऐकायला मिळत होती. 'सैराट'ने मराठी चित्रपटाच्या उत्पन्नाचे सगळे विक्रम मोडले असं ऐकलं होतं. चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात जोरात चालू आहे. इतकंच नव्हे तर अमेरिकेतदेखील काही चित्रपटगृहात 'सैराट' प्रदर्शित झालेला आहे आणि तुफान गर्दी खेचतो आहे असे दिसते. एका अमेरिकास्थित मित्राने फेसबुकवर तिथल्या चित्रपटगृहातील दृश्याचा फोटो टाकला होता. ऑन पब्लिक डिमांड, 'झिंगाट' त्या चित्रपटगृहात दोनदा वाजवण्यात आले होते आणि जनता बेभान होऊन नाचत होती. 'सैराट'ने एक निराळीच जादू तमाम महाराष्ट्रावर केली आहे हे नक्की. 'सैराट'ने दुष्काळात होरपळून निघणार्या महाराष्ट्राला तीन तासाचे सज्जड मनोरंजन देऊन रणरणता मे महिना थोडा का होईना सुसह्य करण्याचे पुण्य कमावले आहे हे निश्चित.
मी गेल्या आठवड्यातील मंगळवारपासून (ता. ३ मे २०१६) 'सैराट'च्या तिकिटांसाठी प्रयत्न करत होतो. कामाच्या दिवशीदेखील 'सैराट' संपूर्ण पुण्यातल्या चित्रपटगृहांमध्ये (मोजकी कॉस्मो भागांतली चित्रपटगृहे वगळता) सगळ्या खेळांना हाऊसफुल चालू होता. या आठवड्यातदेखील तशीच परिस्थिती असण्याची शक्यता आहे. शेवटी कसेबसे मला माझ्या आवडत्या नीलायमचे दुपारच्या ३;१५ च्या खेळाचे तिकिट मिळाले. नीलायमला अभूतपूर्व अशी गर्दी होती. चित्रपट बहुजन समाजाच्या पार्श्वभूमीचा असल्याने आणि दिग्दर्शक स्वत: त्या समाजाचा असल्याने ९५% जनता बहुजन समाजाची होती. जवळच्या निम्नस्तरीय वसाहतीमधून येणारी जनता मोठ्या प्रमाणावर होती.
'सैराट' मला बघायचाच होता. १ जानेवारी २०१६ (शुक्रवार) या दिवशी मी 'नटसम्राट' पाहिला होता आणि मध्यंतरामध्ये 'सैराट' ची झलक दाखवली होती. भन्नाट चित्रीकरण, मधुर संगीत, रांगडा नायक आणि तिखट तरीही मोहक अशी अर्ची - 'सैराट' बघणे मस्ट होते.
'सैराट' मला आवडला. अगदी मनापासून आवडला. नागराज मंजुळेचं दिग्दर्शन आणि कथा असलेला 'सैराट' प्रेक्षकांच्या हृदयाला हात घालण्यात कमालीचा यशस्वी होतो आणि माझ्या मते हेच 'सैराट'चं यश आहे. सुरुवातीपासून 'सैराट' वास्तवाला धरून चालतो. ग्रामीण महाराष्ट्रात रंगणारे क्रिकेटचे सामने, तिथलं राजकारण, तिथल्या तरुणांच्या जीवन जगण्याच्या संकल्पना, जातीच्या उतरंडीवर आधारलेले समाजजीवन, शाळा-महाविद्यालयात मुला-मुलींना एकमेकांविषयी वाटणारे नैसर्गिक आणि गोड असे आकर्षण, त्यातून जन्माला येणार्या प्रेमकहाण्या, त्यातून निर्माण होणारे सामाजिक प्रश्न, आणि संबंधित कुटुंबांनी अशा कहाण्यांची आपापल्या सामाजिक, आर्थिक, वैचारिक कुवतीनुसार आणि सोयीने लावलेली भली-बुरी तड हे वास्तव आपल्यासाठी नवीन नाही. आपल्या आसपास आपण नेहमीच हे वास्तव बघत असतो. मंजुळेंनी मोठ्या हुशारीने आणि कल्पकतेने हे वास्तव मांडले.
कुठेही जातीचा उल्लेख न करता केवळ वास्तववादी चित्रणातून मंजुळेंनी 'सैराट'मध्ये जाती-जातींमधल्या भक्कम भिंती अतिशय प्रगल्भपणे अधोरेखित केल्या. ऊस, कुटुंबाचे आडनाव, त्या कुटुंबाचे राजकारणमधले महत्वाचे स्थान, घरात असणारी आमदारकी, घराच्या भिंतीवर असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मोठी तसबीर, कुटुंबातल्या पुरुष सदस्यांची मग्रुर वागणूक, स्वत:च्या ऐश्वर्याची आणि सत्तेची वागण्या-बोलण्यातून ओसंडून वाहणारी धुंदी अशा कित्येक डिटेल्समधून मंजुळे एका सुस्थापित आणि राज्यकर्त्या असणार्या कुटुंबाची ओळख करून देतात. त्याचबरोबर खोपटासारखे घर, उन्हातान्हात मासेमारी करणारे कुटुंब, चेहऱ्यावरचे दीन भाव यातून मंजुळे शोषित जातीचे आणि त्यांच्या डळमळीत अस्तित्वाचे चित्रण करतात. बहुजन समाजाला कितीतरी दशकांपासून महाराष्ट्रातल्या या सामाजिक, राजकीय, आणि आर्थिक दरीचा प्रचंड राग आहे आणि तो रास्तही आहे. 'सैराट'शी ही जनता लगेच कनेक्ट होऊ शकली.
'सैराट'चा सुरुवातीचा एक-सव्वा तास हा धमाल मनोरंजनाचा आहे. नुकतीच महाविद्यालयात जाऊ लागलेली पोरे आणि त्यांचे रेशमी भावविश्व या भागामध्ये दाखवले आहे. कुठल्याही प्रेक्षकाने छातीवर हात ठेवून सांगावं की 'सैराट'मधल्या पर्श्यासारखं किंवा अर्चीसारखं त्यांना त्यांच्या शाळा-महाविद्यालयातल्या दिवसांत वाटलं नाही. असा प्रेक्षक असणं जवळ-पास अशक्य आहे. चित्रपटाचा हा भाग पाहतांना मला माझ्या शाळेतले दिवस आठवत होते. आपल्याला आवडणार्या मुलीला बघण्यासाठी पायपीट करणं, वाट्टेल ते बहाणे शोधणं...हे मी शाळेत असतांना केलं होतं. नंतर महाविद्यालयात गेल्यानंतर त्या मुलीला दुसऱ्या गावात जाऊन भेटून आलो होतो आणि नंतर एक भेट-कार्डदेखील पाठवलं होतं. त्या भेट-कार्डामुळे पुढे रामायण झालं आणि आमची ती एकतर्फी प्रेमकहाणी अस्थिविसर्जनाचा एखादा कलश डुबूक करून नदीत बुडावा तशी जगरहाटीच्या विशाल नदीत बुडाली. नंतर बराच काळ वर बुडबुडे येत राहिले पण तोपर्यंत समोरच्या पार्टीला एका थर्ड पार्टीने टेक ओव्हर करून टाकलं होतं. हे सारं 'सैराट'चा पहिला तास-दीड तास बघतांना आठवत होतं. एक मुलगा आणि एक मुलगी यांच्यात जर आकर्षण निर्माण झालं तर ते (कितीही चुकीचं असलं किंवा वाटत असलं किंवा त्रासदायक वाटत असलं किंवा खरोखर समस्या निर्माण करणारं असलं तरी) मोहकच वाटतं. ते चोरटे कटाक्ष, एकमेकांना बघण्याची ओढ, चिठ्ठ्या-चपाट्या, मुलाने मुलीच्या मागे फिरणं...नैसर्गिकच असतं हे सगळं. आणि म्हणूनच हजारदा बघूनदेखील ताजं वाटतं, गोड वाटतं. 'सैराट'मध्ये हा भाग रंगला आहे. आजचा मराठी तरुण या भागाशी लगेच कनेक्ट होऊ शकला.
नंतरचा जग आणि वास्तव प्रखरपणे समोर आल्यानंतरचा प्रवास वास्तवावर आधारलेला असला तरी श्वास रोखून धरायला लावणारा आहे. प्रेक्षक नकळत नायक-नायिकेच्या बाजूने उभे राहतात. काही प्रसंगांमध्ये डोळ्याच्या कडा हलकेच ओलावतात. शेवट माझ्या मते एका खर्या घटनेवर आधारित आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी बहुधा सातारा की कुठल्याशा जिल्ह्यात अगदी अशीच घटना घडली होती. तो प्रसंग जसाच्या तसा चितारला आहे.
अभिनयाच्या बाबतीत सगळेच अव्वल आहेत. पण जीव ओवाळून टाकावा अशी एकच आणि ती म्हणजे अर्ची म्हणजेच अकलूजची रिंकू राजगुरू! काय जबरदस्त अभिनय केलेला आहे या मुलीने म्हणून सांगू! मी तर पंखाच झालो. आणि दिसते पण सुरेख! प्रत्येक फ्रेममध्ये जो अभिनय रिंकूने केलेला आहे त्याला तोड नाही. पाटलाच्या घरची पोरगी कशी असावी? बिनधास्त, तिखट, झणझणीत, ठसकेबाज, देखणी, बेडर...अर्ची अशीच आहे. पाहताक्षणी आवडणारी, हृदयावर राज्य करणारी, जीव लावतांना जीव ओवाळून टाकण्याची तयारी ठेवणारी, प्रेमासाठी जीव घ्यायलादेखील तयार असणारी, धाडसी अशी ही अर्ची रिंकूने अविस्मरणीय करून ठेवलेली आहे. तिची कॅमेराची समज अफलातून आहे. तिचं स्मित कातिल आहे. तिचे डोळे विशाल आणि बोलके आहेत. टपोर्या डोळ्यांमधून ती लज्जा, प्रेम, संताप, लाचारी, खोडसाळपणा लीलया व्यक्त करते. ती सहजपणे बुलेट आणि ट्रेक्टर चालवते. मोठ्या विहिरीत धाडकन उडी टाकते. अवघ्या महाराष्ट्राला अर्चीनं याड लावलंय ते उगीच नाही. अर्ची हा 'सैराट'चा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे.
परश्या पण काही कमी नाही. परश्या म्हणजेच आकाश ठोसर कोवळा आहे, बुजरा आहे पण धाडसी आहे. एका उच्च घराण्यातल्या मुलीवर प्रेम करण्याची आणि तिच्यासाठी वाट्टेल ते करण्याची त्याची तयारी आहे. आकाश ठोसरने नीट समजून अभिनय केला आहे. त्याचे मित्र प्रदीप (तानाजी गलगुंडे), सल्या ऊर्फ़ सलीम (अरबाज शेख) यांनी शंभर नंबरी अभिनय केलेला आहे. अगदी १००% खरे वाटावेत असे हे मित्र यांनी वठवले आहेत. अर्चीच्या मुजोर भावाच्या म्हणजेच प्रिन्सच्या भूमिकेत सूरज पवारने दृष्ट लागण्याजोगे काम केले आहे. राजकारणी घराण्यातला, सत्तेचा, पैशाचा, जमीनदारीचा अशक्य कोटीतला गुंठामंत्री-छाप माज असलेला प्रिंन्स सूरज पवारने पुरेपूर उतरवला आहे. अर्चीचा बाप एक नंबर जमला आहे. नागराज मंजुळेंचा अभिनय दाद देण्यासारखा आहे.
अजय-अतुल यांचे संगीत चांगले आहे. गाणी नीट प्रवाहात येतात. झिंगाट गाणे खूप हिट झालेले आहे. चित्रपट्गृहात या गाण्यावर प्रचंड शिट्ट्या होत होत्या आणि बर्याच प्रेक्षकांनी हे गाणे सुरु झाल्यावर आपले पारंपारिक (पतंग, नागीन, गणपती वगैरे शास्त्रोक्त नृत्य) नृत्य करण्याचा मनसोक्त आनंद लुटला.
'सैराट' मधून दिग्दर्शक एका महत्वाच्या सामाजिक विषयाला हात घालतो परंतु त्यावर मत देण्याचं टाळतो. आणि मत देण्याचं टाळलेलं असतांना आजच्या वाढलेल्या जातीभेदावर एक घणाघाती आघात करण्याचं मात्र दिग्दर्शक विसरत नाही. ऑनर किलिंग ही गेल्या वीस वर्षातली संकल्पना. काळ जसा जसा पुढे सरकतो तसे तसे समाजाने अधिकाधिक प्रगल्भ आणि खेळकर होणं अपेक्षित असतं. दुर्दैवाने महाराष्ट्रात हा प्रवास उलट्या दिशेने सुरु आहे. महाराष्ट्राच्या मातीतून ऑनर किलिंगसारख्या हिडीस प्रकारावर चित्रपट निघेल असं कधी स्वप्नातदेखील वाटलं नव्हतं. दुर्दैवाने तशी वेळ आज येऊन ठेपलेली आहे. बोधामृत, मेसेज, योग्य-अयोग्य वगैरे भानगडीत न पडता जे सत्य आहे ते दिग्दर्शकाने अतिशय समर्थपणे आणि रंजक पद्धतीने समोर ठेवलं आहे. कुणाला काय धडा घ्यायचा तो ज्याने त्याने घ्यावा. अशा प्रकारचे स्फोटक प्रेम करून समस्या निर्माण करायच्या की धाडसाने प्रेम करून समस्यांना तोंड देऊन आपले प्रेम सिद्ध करून दाखवायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे. हा निर्णय सर्वस्वी प्रेक्षकांचा. अशा प्रेमाला समाजाने कसे रिएक्ट व्हायचे हे देखील विचारपूर्वक ठरवण्याची नितांत गरज दिग्दर्शक ठासून सांगतो.
बर्याच लोकांनी चित्रपटावर आक्षेप घेतले. हा चित्रपट बघून मुले बिघडतील असाही आक्षेप मी ऐकला. या विधानात काही तथ्य आहे असे मला वाटत नाही. चित्रपट हा समाजाचा आरसा असतो. जे समाजात घडते ते चित्रपटात दाखवतात. आणि चित्रपट नव्हते तेव्हादेखील अशी प्रेमप्रकरणे होतच असत. पालकांच्या मार्गदर्शनाखाली मुले या चित्रपटाचा आस्वाद नक्कीच घेऊ शकतात. त्यांना त्यातून नक्कीच शिकायला मिळेल. आणि शेवटी चित्रपट हे मनोरंजनाचे साधन आहे. त्याचा वाईट परिणाम मुलांवर होणार नाही असे संस्कार मुलांवर असणे आवश्यक आहे. आज घरोघरी टीव्हीवर पाहिले जाणारे कार्यक्रम किती सोवळे असतात हे आपण सगळेच जाणतो. मोबाईल, इंटरनेट, व्हिडिओ गेम्स या माध्यमांमधून मुले काय बघतात आणि शिकतात आणि यावर पालकांचे किती नियंत्रण आहे हादेखील एक प्रश्न आहेच. अर्थात कुठले चित्रपट बघायचे आणि कुठले टाळायचे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे हे तितकेच खरे! मला मात्र एक गंभीर विषय रंजक पद्धतीने हाताळणारा सशक्त चित्रपट म्हणून 'सैराट'चे कौतुक वाटते.
अगदी काहीच नाही तर आपापल्या मनातली रेशमी आठवणीत जपून ठेवलेली अर्ची किंवा आपापल्या मनातला सुगंधी कुपीत जपून ठेवलेला परश्या पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी तरी 'सैराट' बघा असे सांगावेसे वाटते.
अर्चीच्या डोळ्यातील मस्ती पाहून हा शेर मनात रुंजी घालतोय:
मैं तेरी मस्त निगाही का भरम रख लुंगा
होश आया भी तो कह दुंगा मुझे होश नही
ये अलग बात हैं साकी के मुझे होश नही
वरना मैं कुछ भी हूं एहसान फरामोश नही
प्रतिक्रिया
16 May 2016 - 7:54 pm | anilchembur
बायकोला सोडुन नवरे प्रधानसेवक बनतात.
तुझा नवरा षिनिमावाला झाला तर लगेच पेप्रात बातमी ?
17 May 2016 - 10:35 am | रमेश भिडे
सैराट बघितला. (कसा बघितला हे नका विचारु)
तेलुगू चित्रपट बघणारांना अजिबात च नवा वाटणार नाही. अगदीच सामान्य (कॉमन या अर्थाने) वाटला....
यशामध्ये मार्केटिंग आणि संगीत याचा जास्त भाग आहे असं वाटतंय. अर्थात कॅमेरा बोलतो , दिग्दर्शन छान भाष्य करतं वगैरे आहे यात वाद नाही. याच्या पेक्षा fandry कितीतरी उजवा, खरा आणि टू द पॉईंट होता.
माझ्या मते आकाश ठोसर (परश्या) जास्त कॅलिबर वाला आहे.
17 May 2016 - 10:57 am | खटपट्या
बरं !!
17 May 2016 - 11:10 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ओके.
-दिलीप बिरुटे
17 May 2016 - 11:05 am | पिलीयन रायडर
नक्की कोणत्या धाग्यावर लिहावे हे कळेना म्हणुन अक्कड बक्कड बंबे बो.. करुन हा निवडला..
सैराट पाहिला. बरा आहे. संथ आहे. लांबी कमी केली असती तर जास्त परिणामकारक वाटला असता. स्लो मोशनचा वापर जास्त झालाय. दोन्ही कलाकार गुणी आहेत. पण राष्ट्रिय पुरस्कार मिळण्यासारखा अभिनय वाटला नाही. शेवट माहिती असल्याने धक्का बसला नाही पण वाईट वाटले. एकंदरित जेवढी हवा आहे तेवढं काही भारी वाटलं नाही.
गाण्यांबद्दल मत कायम आहेत. चांगली असली तरी नाविन्य नाही.
17 May 2016 - 11:49 am | समीरसूर
२ तास ५४ मिनिटांचा आहे 'सैराट'. लांबी जरा जास्त आहे हे खरं. १५-२० मिनिटे नक्कीच कमी करता आला असता.
दोन्ही नवखे आहेत आणि शिवाय ग्रामीण भागातले आहेत. चित्रपटांशी अगदी दुरान्वयेही संबंध नसतांना त्यांनी चित्रपट या मोठ्या माध्यमाची जी समज दाखवली आहे ती वाखाणण्याजोगी आहे. कदाचित या पार्श्वभूमीवर रिंकूला 'विशेष दखल' मिळाली असावी. तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला नाहीये; स्पेशल मेंशन मिळालं आहे. अर्थात तो ही मोठा मान आहेच.
संथ असला तरी कथानक पुढे सरकत राहतं आणि उत्सुकता वाढत राहते. शेवट माहित असला तरी त्या वळणापर्यंत चित्रपट कसा पोहोचतो हे जाणून घेण्याची उत्सुकता जाणवते.
सैराट मध्ये नेमकं काय आवडलं हे तपासून बघायला मी सैराट पुन्हा बघणार आहे. :-) बरंच काही सापडतं पुन्हा पाहिला की. मी तलाश, परिंदा, बीपी, जॉनी गद्दार, सरफरोश आणखी असे बरेच चित्रपट लगेच दुसऱ्या दिवशी पुन्हा पाहिले होते.
मला वाटतं एक असं काहीतरी असतं ज्याला चित्रपट भिडला की मग तो चित्रपट मजबूत आवडतो. चित्रपटात उणीवा असतील तरी असा चित्रपट आवडतो. पुन्हा पुन्हा बघायला आवडतो. माझी सोपी चाचणी आहे. जर एका आठवड्याच्या आत जर मी एखादा चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये जाऊन पाहू शकलो तर तो चित्रपट मला आवडला आहे असे मी बेलाशक समजतो. आणि हे दुसर्यांदा चित्रपट बघणं फक्त इमेजीन केलं तरी निर्णय मिळतो.
तुम्ही काही दिवसांनी पुन्हा बघा सैराट किंवा तसे इमेजीन करून बघा. कदाचित आवडेल... :-) अर्थात तुमच्या आवडी-निवडीचा पूर्ण आदर आहेच.
17 May 2016 - 11:56 am | पिलीयन रायडर
हं.. असा ट्राय करता येईल.
पण फक्त जेवढा उदो उदो होत आहे तेवढं नक्की काय विशेष आहे हे समजले नाही.
17 May 2016 - 12:10 pm | समीरसूर
माझ्या मते:
१. रिंकू राजगुरू ऊर्फ़ अर्ची - ही आवडली नाही असं मला कुणीच भेटलं नाही. मराठी चित्रपटात अशी बिनधास्त डेअरिंगबाज पोरगी खूप वर्षांनंतर आली. तिचा रांगडेपणा, धष्टपुष्ट शरीरयष्टी, तरुणांना जसं आवडतं तसे विभ्रम करणं वगैरे भलतंच आवडून गेलं लोकांना. मलादेखील ती खूप आवडली. ती का आवडली याचं नेमकं उत्तर सांगणं अवघड आहे पण पुरुष प्रेक्षकांना ती जास्त आवडली आहे हे नक्की.
२. गाणी तुफान हिट झालीत. वेड्यासारखी गाणी आवडली लोकांना.
३. साधी प्रेमकथा आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे तरुण - तरुणीमधली आंबट-गोड देवाण-घेवाण बघायला, ऐकायला आवडतेच.
४. अभिनय, चित्रीकरण, कथा-पटकथा, कलादिग्दर्शन, इत्यादी तांत्रिक बाबींवर चित्रपट नक्कीच उजवा आहे. एक-एक फ्रेम काय सुंदर आहे!
५. आपल्या आस-पासची कथा आहे असं वाटतं. कदाचित आपली स्वत:ची! रिलेट होणं खूपच सोप्प होतं.
नीटनेटकी मांडणी, दमदार हिरोईन, सुरेल गाणी, सगळ्यांच्या जिव्हाळाचा विषय, आणि छान अभिनय अशी भट्टी जुळून आल्यावर चित्रपट हिट नसता झाला तरच आश्चर्य वाटलं असतं.
17 May 2016 - 12:15 pm | पिलीयन रायडर
मुद्दे पटण्यासारखे आहेत. पण तरीही अति हाईप झाली आहे असे मत आहे. इथेच किती धागे निघाले पहा ना. म्हणुन माझ्याही अपेक्षा फार उंचावल्या होत्या. अशानेही मला फार काही भारी वाटले नसेल. अर्थात माझ्यासारखे मत असणारेही अनेक आहेत. ज्यांना हा पिक्चर सामान्य वाटला. पण मायनोरिटी!
मला असं राहुन राहुन वाटतंय की जे लोक गावात राहिलेले आहेत, ज्यांनी हे वातावरण पाहिले आहे, त्यांना जास्त आवडतोय. आम्च्या सारख्या जन्मल्यापासुन शहरातच राहिलेल्या लोकांना कदाचित एवढा नाही भावला. (अंदाज आहे..)
पण असो.. तुम्हाला आवडला ना! गुड!
17 May 2016 - 1:00 pm | धनावडे
भाषेमुळे ही आवडला असेल लोकांना कारण उगाच
जीभ वाकडी करुन कुणी ग्रामीण भाषेत बोलण्याचा
प्रयत्न करत नाय
17 May 2016 - 3:06 pm | समीरसूर
शक्यता आहे.
मी गावात राहिलो वाढलो पण आमच्या लहानपणी असे वातावरण नव्हते पण आम्ही होतो आणि मुली पण होत्या...आणि असे बरेच पर्श्ये आणि अर्च्या होत्या. ;-) त्यामुळे रिलेट होणे अवघड नाही वाटले. आणि महाराष्ट्रात ग्रामीण भाग हा सगळीकडे सारखा नाही. प्रत्येक भागातील ग्रामीण जीवन निराळे आहे. लोकांच्या मनाला भिडली ती त्या दोघांची निरागस, बेधडक, कडक, रोकडा प्रेमकहाणी...
17 May 2016 - 9:53 pm | खटपट्या
हेच माझेही मत आहे. माझ्या घाटावरच्या मित्रांशी बोलतोय तर प्रत्येकजण स्वतःच्या गावचं चित्रण असल्यासारखा बोलतोय.
17 May 2016 - 12:16 pm | रमेश भिडे
हम्म्म! बरोबर.
17 May 2016 - 10:09 pm | भक्त प्रल्हाद
इतक्या ताकदीने स्री व्यक्तीरेखा चितारलेल्या अभावानेच पहायला मिलतात.
१. मुलगी पोहोताना दाखवन्यासाठी सुद्धा इथे बिकिनिचा वापर करावासा वाट्लेला नाहि.
२. सिगरेट आणि दारु न पिता बंडखोरी करता येते हे दाखवणरी मुलगी इथे दाखवली आहे.
रिंकु चे विशेष म्हणजे तिने डोळ्यांनी केलेला अफलातुन अभिनय.
परश्या विहिरितुन बाहेर पडताना तिच्याकडे बघतो, आणि पुढे निघतो. त्या क्षणी तिने डोळ्यात जे भाव दाखवलेत, ते निव्वळ अप्रतिम.
केवळ या शॉट साठी हा चित्रपट परत पाहणार आहे.
17 May 2016 - 4:13 pm | सप्तरंगी
तुमचे observation , review सैराट पेक्षा चांगले आहे असे वाटले. कलाकृती म्हणून चांगलाच आहे सैराट पण खूप काही खटकत राहिले movie पाहताना.. अश्या विषयाची movie लोकांचे मनोरंजन करते / किंबहुना मनोरंजनासाठी बनवली जाते, लोक गाणी डोक्यावर घेतात आणि मग मुख्य गाभा दुर्लक्षित राहतो हेच मुळी पटत नाही :(
18 May 2016 - 8:06 pm | डायवर
सैराट मध्यंतरापर्यंत खूपच आवडला. वास्तविक जीवनाचे चित्रण बघायला मिळाले ते असे कि 'पाटील ' आडनावाच्या बहुसंख्य मुला मुलींचा रंग हा हुबेहूब अभिनेत्रीच्या रंगासारखा असतो आणि दुसरे असे कि लंगडा हे पात्र वास्तविक जीवनात देखील अपंग आहे हे पाहून धक्काच बसला. परंतु मंजुळे यांचा वास्तविकतेच्या जवळ जाण्याचा हा नक्कीच एक भाग असला पाहिजे.जे आजवर ना 'bollywood' ना 'hollywood' ना 'Tollywood' किंवा अजून कुठे बघायला मिळाले ती सर्वांत विशेष गोष्ट म्हणजे मुख्य अभिनेत्रीलाच मंजुळे यांनी टमरेल घेवून हागायला जाताना दाखवले आहे, तेदेखील एक सोडून दोन वेळा.
जात पंचायत, ओनर किलींग यामुळे वास्तविकतेच्या सर्व पैलुना स्पर्श झाला आहे, असे वाटले. 'याड लागल ' आणि ' सैराट झाल जी ' हि गाणी प्रचंड आवडली. पाच सात वर्षांपूर्वी मी मराठी चित्रपट कधीच पाहणार नाही, असा पण केला होता जो सैराट मुळे बर्या अर्थाने मोडला. पैसा वसूल चित्रपट.