माझे आजोळ

हेमंत लाटकर's picture
हेमंत लाटकर in जनातलं, मनातलं
14 Mar 2016 - 2:08 pm

मी लहानपणी दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला जात असे. मामाचे गाव आंध्र प्रदेशातील आदिलाबाद येथे आहे. मी, आई, ताई व लहान बहिण असे चाैघेजण प्रथम परभणीला मावशीकडे जात असू. तेथून मावशी व मावशीच्या ३ मुली, १ मुलगा असे ९ जण पुर्णा जंक्शनला रात्री मुक्कामाला जात. रात्री भुरटे चोर असल्यामुळे पाळीपाळीने एकेक जण जागत असू. पुर्णा येथून सकाळी ४ वाजता आदिलाबादला रेल्वे असे.

रेल्वे कोळशावर चालणारी होती. रेल्वे नांदेड, मुखेड, किनवट मार्गे दुपारी २ वाजता आदिलाबादला पोहचे. आदिलाबाद येथील भाषा जरी तेलगु असली तरी आमची आजी महाराष्ट्र आंध्र सीमे वरील भैंसा या गावची असल्यामुळे मराठी भाषा दोन्ही मामा, मामी, मामाच्या मुलांना समजते. परभणी येथील मावशीचा मुलगा माझ्याच वयाचा असल्यामुळे खुप मजा यायची.

सकाळी १० वाजता सर्वजण जेवायला बसायचे. जेवणात भात, सांबार, वांग्याची भाजी असायची. आम्ही मराठवाड्यातील असल्यामुळे आजी पोळ्या करी. कधी आजी कन्या (ज्वारीच्या जाड पिठाची खिचडी) सुद्धा करत असे. मला कन्या अजूनही आवडते. कन्या सांबार व तुप टाकुन खुप छान लागते. जेवण झाल्यावर मी, ताई, लहान बहिण, मावशीचा मुलगा, मावशीची मुलगी सर्वजण अंगणात खेळत असू. रात्री सर्वजण अंगणात कापडी बाज टाकूण झोपत असू. बाजेवर पडून गप्पा गोष्टी करताना झोप लागून जाई.

आदिलाबादला काही दिवस राहून आंध्रात बोथ येथे राहणार्या मावशीकडे जात असू. मावशीचा वाडा चौसोपी आहे. वाड्याच्या मागे मोठे परस आहे. सकाळचे जेवण झाले की आम्ही चिल्लर पार्टी मागच्या परसात खेळायला जात असू. मागील परसात केळी, पेरूची झाडे होती. परसात एक विहिर होती. दुपारच्या वेळी आंब्याच्या खोलीतील पिकलेले आंबे खाण्याचा कार्यक्रम चाले. मावशीच्या घरचे दुध छान घट्ट पिवळे असायचे. स्वयंपाक घरात एका भिंतीत असलेल्या कोनाड्यात कोळशाच्या निखार्यावर दुधाचे भांडे ठेवलेले असे.

एखाद्या दिवशी मी व मावसभाऊ काका (मावशीचा नवरा) बरोबर छकड्यात बसून ४-५ किमी असलेल्या शेतात जात असे. शेतात जाताना रस्त्यात नदी लागे. शेतात एक कौलारू घर बांधलेले होते. घराच्या मागे डोंगर व जंगल होते. कधी आई, मावशी, आम्ही मुले गावाजवळ असलेल्या बालाजी मंदीरात जात असू. एखादे वेळेस मी, मावसभाऊ, काकाची (वडिलाचे भाऊ) २ मुले गावाजवळ असलेला धबधबा पाहायला जात असू. उन्हाळा असल्यामुळे पाणी नसायचे पण खाली जमलेले पाणी असायचे.

अशा तर्हेने उन्हाळ्यात दोन महीने मजा करून वापस गावाला परतत असू. लहानपणीच्या रम्य आठवणी अाताही आजच घडल्याप्रमाणे आठवतात.

मौजमजाअनुभव

प्रतिक्रिया

नाखु's picture

14 Mar 2016 - 2:12 pm | नाखु

आवडला, पण आखडता घेतला आहे(असे जाणवते). आजोळ असल्याने नक्कीच आणखी आठवणी/किस्से असतील.

स्मरणशील नाखु

श्रीरंग_जोशी's picture

14 Mar 2016 - 11:14 pm | श्रीरंग_जोशी

खास करून तेलुगु अन मराठी संवादांच्या चुकीच्या भाषांतरामुळे कधी ना कधी गमतीशीर प्रसंग नक्कीच घडले असतील.

संजय पाटिल's picture

14 Mar 2016 - 2:28 pm | संजय पाटिल

नव्हे, त्याला कण्या म्हण्तात. या ताकात कालवून लय भारी लागतात..

स्पा's picture

14 Mar 2016 - 2:51 pm | स्पा

लोल

जेपी's picture

14 Mar 2016 - 2:50 pm | जेपी

चांगलय..

निशांत_खाडे's picture

14 Mar 2016 - 7:57 pm | निशांत_खाडे

आणखीन वाचायला आवडेल!

होबासराव's picture

14 Mar 2016 - 8:53 pm | होबासराव

लाटकर काका लेख छान जमलाय.

छकडी म्हणजे एक छोटि बैलगाडी ना...त्याला विदर्भात डमनी सुद्धा म्हणतात.

अभ्या..'s picture

14 Mar 2016 - 11:07 pm | अभ्या..

लाटकर काका,
मिपाकर नाराज आहेत का ओ तुमच्यावर?
एवढे भारी लिव्हलाय आन प्रतिसाद फकस्त ५.
:(
कुछ तो गडबड है.

निशांत_खाडे's picture

14 Mar 2016 - 11:19 pm | निशांत_खाडे

काय कारण असेल बरे?

छानछान आठवणी लिहिल्याहेत लाटकरकाका.असेच लेख येऊ द्यात.मलाही कधीकधी सांगावेसे वाटते.

छान आठवणी काका.अजून लिहा.

मित्रहो's picture

16 Mar 2016 - 11:39 pm | मित्रहो

मला वाटते ते मुदखेड आहे, निदान स्पेलींग तरी तसे आहे. मुदखेड, किनवट, अदिलाबाद हा मार्ग आता ब्रॉड गेज झाला परंतु स्टेशन फार सुधारले नाहीत.
अदिलाबादच नाही तर सीमेवरील भागातील लोकांना दोन भाषा येतात. झहीराबाद हे महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटकच्या सीमेवरील गाव तिथे तिनही भाषा बोलल्या जातात.

अभ्या..'s picture

16 Mar 2016 - 11:58 pm | अभ्या..

मुखेड च. मुदखेड नाही.

मित्रहो's picture

17 Mar 2016 - 8:50 am | मित्रहो

द सायलेंट आहे तर.
धन्यवाद

गौरी लेले's picture

17 Mar 2016 - 9:52 am | गौरी लेले

सुंदर

प्रमोद देर्देकर's picture

17 Mar 2016 - 11:45 am | प्रमोद देर्देकर

छाना लेखा आहे काका. तुम्ही अजुन काही लेख लिहा. मस्त वाटतं वाचायला.

प्रत्येकाला आजोळ असते,
आठवणीत रमण्यासाठी,

बालपणीचा काळ सुखाचा,
एवढं तरी म्हणण्यासाठी.