मिपा संपादकीय - आपले आरोग्य आपण कोणाच्या हातात सुपूर्त करतो?

संपादक's picture
संपादक in विशेष
8 Sep 2008 - 12:54 am
संपादकीय

मिपा व्यवस्थापन 'मिपा संपादकीय' हे सदर लोकमान्य टिळक यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित करत आहे. यापूर्वीचे संपादकीय लेखन येथे वाचायला मिळेल! धन्यवाद...

आपले आरोग्य आपण कोणाच्या हातात सुपूर्त करतो?

गेल्या एक-दोन महिन्यात दोन अतिशय वेगवेगळ्या घटनांचा योगायोग झाला, आणि एक विचारचक्र मनात सुरू झाले. पहिली घटना जगजाहीर होती. गेली बारा वर्षे फरार असलेल्या सर्बियातील युद्धातला क्रूरकर्मा रादोवान काराजिच यास जुलैमध्ये अटक झाली. या मोठ्या बातमीच्या एका यःकश्चित तपशिलाने माझे लक्ष वेधले. इतकी वर्षे तो कुठे लपला होता? पांडवांसारखा नाव-गाव-वेष बदलून सर्वांसमक्ष अज्ञातवासात तो होता! डॉक्टर द्रागान डेव्हिड दाविच हे नाव त्याने घेतले होते. लांब जटा वाढवल्या, आणि स्वतःची ओळख "वैकल्पिक वैद्यक (ऑल्टर्नेटिव्ह मेडिसिन) तज्ञ" म्हणून करून दिली. म्हणे चीन आणि भारतात जाऊन तेथील प्राचीन औषधोपचार पद्धती अभ्यासण्यात त्याने पूर्वायुष्य घालवले होते. या डॉ. दाविचने उघडउघड प्रॅक्टिस चालू केली. व्याख्याने, परिसंवादांत तो भाग घेत असे. इतकेच काय इंग्रजी आणि सर्ब भाषांमध्ये त्याचे छोटेखानी संकेतस्थळ अजून बघता येते (दुवा). "तो मी नव्हेच" म्हणणारा हा इसम कुशल नट असलाच पाहिजे, प्रश्नच नाही. पण काही श्रेय गंडले जाण्यास उत्सूक पेशंटनाही द्यायला पाहिजे. पितळ झाकण्याचे काही हुन्नर कल्हईवाल्याचे, काही गुण पातेल्याचा. खरे तर त्या रुग्णांनाही फार दोष देता येत नाही. आरोग्य आणि उपचार हे असे काही विषय आहेत, की मनुष्य डोळे मिटतो. आपल्याच मुठीत नाक धरून काय वाटेल ते घशाखाली ओतायला तयार होतो. आपण रुग्ण आपले आरोग्य नेमके कोणाच्या हातात सुपूर्त करत असतो?

दुसरी घटना तशी माझ्या घरातल्या घरातली आहे. काही आयुर्वेदिक औषधांची विषारी धातूंच्या अंशासाठी रासायनिक चाचणी झाली होती, त्याबद्दल माझ्या नात्यातल्या कोणी मला विचारले. त्याबद्दलचा शोधनिबंध माझ्या विद्यापीठाच्या ग्रंथालयात मिळेल का? तोवर अशी कुठली चाचणी झाली होती, याबद्दल मला काही माहितीही नव्हती. तो शोधनिबंध हुडकून वाचला (दुवा १, दुवा २). आणि असे कळले, की अमेरिकेत आयात झालेल्या कित्येक "शक्तिवर्धक" आयुर्वेदिक औषधांमध्ये आर्सेनिक, शिसे, पारा, या विषारी धातूंचे फार अधिक प्रमाण होते. खरे पाहाता, आयुर्वेदात अनेक धातूंची भस्मे वापरली जातात, सुवर्ण किंवा चांदी हे काही औषधांचे घटक आहेत, त्यामुळे हे धातू सापडणे योग्यच आहे. काही औषधी रसायनांमध्ये शिश्याचे, पार्‍याचे भस्म घालायची कृतीच असते. पण जे विषारी धातू त्या औषधांच्या कृतीमध्ये नाहीत, ते सापडूच नयेत. अमेरिकेत (कदाचित भारतातही) ही "वैकल्पिक औषधे" (ऑल्टर्नेटिव्ह मेडिसिन) खाद्यपदार्थ (न्यूट्रास्यूटिकल्स) मानली जातात. किंवा पारंपारिक असल्यामुळे सुरक्षित मानली जातात. भारतात यापैकी काही औषधे शेकडो-हजारो वर्षे वापरात आहेत. असेही शक्य आहे, की मोठ्या प्रमाणात व्यापारासाठी उत्पादन केलेली औषधांमध्येच विषारी धातूंचा अंश सापडत असेल. पण आपण हा विचार करावा, आज आपण आयुर्वेदिक औषधे कुठून विकत आणतो? मोठ्या कंपन्यांनी बाटल्यांमध्ये भरलेली, की माझ्या खापरपणजोबांनी (हे वैद्य होते) घरी खललेली? अमेरिकेत अन्न आणि औषध प्राधिकरणाचे (फूड अँड ड्रग ऍड्मिनिस्ट्रेशनचे) औषधविषयक सुरक्षिततेचे नियम या औषधांना लागू नाहीत. शोधनिबंधांत नमूद केले होते, की चाचणी केलेली कित्येक औषधे खास लहान मुलांच्या आरोग्यासाठी उपयोगी, म्हणून लेबलावर लिहिले होते! आपण रुग्ण आपले आणि आपल्या मुलांचे आरोग्य नेमके कोणाच्या हातात सुपूर्त करत असतो?

येथे कुठल्या पुरातन वारसा असलेल्या औषधपद्धतीला मला झोडपायचे नाही. म्हणून मुद्दामून पाश्चिमात्त्य पद्धतीत अयोग्य प्रॅक्टिस करणार्‍यांचे उदाहरण देतो. काही डॉक्टर कीटाणूजन्य रोगाची लागण झाल्याची पुसटशी शंका आली तरीही लगेच प्रतिजैविके (अँटिबायोटिक्स) देतात. अशा वागणुकीचे तोटे त्यांच्या वैद्यकीय शिक्षणात पुन्हापुन्हा सांगितले जातात. प्रतिजैविकांनी त्या रुग्णाला त्रास होऊ शकतो हे तर खरेच. पण त्या रुग्णाला त्रास झाला न झाला, तरी समाजाला तोटा असतो. एखादे प्रतिजैविक जितके अधिक वापरले जाते, त्याला न बधणारे कीटाणू उत्क्रांत व्हायची शक्यता तितकीच वाढते. मग पुढे कोणाला तशा कीटाणूची लागण झाली, तर ते प्रतिजैविक कुचकामी ठरते. हे डॉक्टर वाईट नसावेत - विसरभोळे असावेत. पण कधीकधी नाठाळ किंवा अडाणीपणेसुद्धा वागतात. मी जी थोडी प्रॅक्टिस केली तेव्हा मला असे दिसले की खेड्याकडचे कित्येक डॉक्टर इंजक्शने आणि सलाईन हे "निरुपद्रवी" मानत. "निरुपद्रवी" औषधे देऊन काय बिघडणार आहे? असा विचार करून काही डॉक्टर रुग्णाला सुया टोचत किंवा सुईने पाणी चढवत. ज्या ठिकाणी सुया उकळायला पाणी आणि वीज अपुरी आहे, त्या ठिकाणी सलाइन किंवा इंजेक्शन खरोखर निरुपद्रवी असते का? काही थोड्या प्रमाणात उपद्रव करूच शकते. ज्याला खरोखर गरज आहे, त्या रुग्णाबद्दल देखील विचार करावा लागतो. इंजेक्शन दिल्याने होणारा फायदा, हा सुई अस्वच्छ असण्याच्या धोक्यापेक्षा अधिक आहे का? ज्याला मुळात गरजच नाही त्याला "निरुपद्रवी" म्हणून सुई टोचणे, म्हणजे डॉक्टराने बळेच वेड पांघरणे होय. याचे थोडे हेसुद्धा कारण होते, की असा काही जंक्शन उपचार केल्याशिवाय इलाज झाला आहे, असे रुग्णांना पटत नसे. मग ते बिल भरण्याबद्दल कुरकुर करत. मी "पेशंटने मागितले म्हणून" कधीच सुया टोचत नसे, त्यामुळे "इंजेक्शन देण्याचे प्रशिक्षण नसलेला पुचाट डॉक्टर" अशी माझी अपकीर्ती होती! डॉक्टरने काही "जालिम" औषध द्यावे, ही अपेक्षा घेऊन तिथे जाणारे आपण रुग्ण आपले आरोग्य नेमके कोणाच्या हातात सुपूर्त करत असतो?

मला हे कोडे पडते : तन-मन-धन या तीन्ही गोष्टींची काळजी घेण्याची आपली जबाबदारी असते. मनाच्या बाबतीत बघावे - मान-अपमान, सुख-दु:ख, कामकाज-मौज या सर्व गुंतागुंतीच्या गोष्टींची अंतिम जबाबदारी स्वतःवर घेतो. धन कुठे खर्च करावे, कुठे नाही, कुठे गुंतवावे, हे सर्व क्लिष्ट निर्णय घ्यायची अंतिम जबाबदारी आपण आपल्याकडे राखतो. पण मग तनाची काळजी घेताना जबाबदारी आपल्याकडे का राखत नाही? जबाबदारी घेणे म्हणजे सर्व लोकांबाबत अविश्वास दाखवणे नव्हे. जबाबदारी घेणे म्हणजे डोळस विश्वास दाखवणे. (ट्रस्ट बट व्हेरिफाय! विश्वास ठेवा तरी तपास करा!) जगात आपल्या मनाला त्रास देणारे असतात, तसेच आपल्या मनाला सुखावणारे लोक असतात. आपल्याला लुबाडणारे असतात, तसे आपल्याला आर्थिक सहाय्य करणारेही असतात. तोलणे-पारखणे म्हणजे लुबाडणार्‍यांना दूर ठेवणे, आणि सुहृदांना जवळ करणे. मन आणि धनाच्या बाबतीत आपण हा नीरक्षीरविवेक करतच असतो. शरिराची काळजी घेतानाही आपण हा विवेक अंगीकारू शकतो, असे मला वाटते.

आपल्या आरोग्यविषयक वागणुकीच्या आवरणातच या समस्येवर मात करायची रामबाण बंडखोरी दडलेली आहे. पाश्चिमात्त्य देशांत पाश्चिमात्त्य औषधप्रणालीविरुद्ध कित्येक लोक बंड पुकारत आहेत. या औषधपद्धतीचा प्रयोग करणार्‍या डॉक्टरांची आणि औषधनिर्मात्या उद्योगांची अरेरावी म्हणा, जुलूम म्हणा, लोकांना मानवत नाही. त्याच प्रमाणे त्या दुरभिमानात जो काही एक सर्वज्ञतेचा आव लोकांना जाणवतो, त्या मानाने परिणाम करण्यात ही औषधपद्धती कमी पडते, असे लोकांना जाणवते. त्यामुळे कित्येक लोक ही औषधपद्धती झुगारून देत आहेत. "वैकल्पिक पद्धतींकडे" जात आहेत. आपल्या खेड्यापाड्यातील लोक वैदू आणि झाडफूंकवाल्यांबद्दल साशंक आहेत. त्यातून हवा तो गुण त्यांना मिळत नाही. म्हणूनच ते जालिम इंजेक्शनवाल्या डॉक्टराकडे जातात. हीसुद्धा त्याच मनःस्थितीची झलक म्हणावी. पण या सुज्ञ साशंकतेच्या बदल्यात दुसर्‍या कुठल्या औषधाबद्दल लोक अंधविश्वासू होत आहेत. आपल्या याच साशंकतेला आपण सन्मार्गी लावले, तर आपण आगीतून फुफाट्यात पडणार नाही.

आपल्या मनात विचार येईल - डॉक्टरकी, वैद्यकी, शल्यचिकित्सा, ही किती कठिण शास्त्रे आहेत. व्यवसाय सुरू करण्यापुरते ज्ञान मिळवायलाही त्या शास्त्रांतल्या तज्ञांना पाच-दहा वर्षे प्रशिक्षण घ्यावे लागते. त्यांची चाचणी करणारा मी कोण? असा विचार मनात येणे नैसर्गिक असले, तरी असे धैर्यस्खलन अनाठायी आहे. आपल्याला त्या तज्ञाइतके सर्वांगीण ज्ञान मिळवायचे नाही. फक्त आपल्या स्थितीला लागू पडेल इतकेच ज्ञान मिळवायचे आहे. बाजारात पैसे गुंतवताना आपल्याला रिझर्व बँकेच्या गव्हर्नरइतके ज्ञान लागत नाही, तशीच ही गोष्ट आहे.

तर या बाबतीत आपण आजच्यापेक्षा वेगळे असे काय वागू शकतो? डॉक्टराकडे, वैद्याकडे जादूगार म्हणून न बघता समुपदेशक म्हणून बघावे. बद्धकोष्ठासाठी चाटण किंवा गोळी त्यांनी दिली, तरी बसून कुंथावे आपल्यालाच लागणार आहे, हे विसरू नये. प्रश्न विचारावेत. आपल्या विशिष्ट संदर्भातले पुरेसे ज्ञान डॉक्टराला समजावून देता आले पाहिजे. संवादातून उपचारासाठी वेगवेगळे पर्याय समोर आले पाहिजेत. औषध घेतलेच नाही, तर काय फरक पडतो, ते डॉक्टराला समजावून देता आले पाहिजे. पर्यायी सौम्य औषधयोजना आहे काय? केवळ पथ्ये पाळून आपल्याला हवा तो फरक घडून येईल काय? हे पर्याय विचारात घेतले पाहिजेत.

औषधनिर्मात्यांबाबत मात्र एकट्या व्यक्तीला सहज ठोस कार्य करता येत नाही. पण निर्मात्यांच्यावर पाळत ठेवणारे कोणी असावे - याबाबत लोकशाहीतले सजग नागरिक म्हणून आपण काही करू शकतो. अन्न आणि औषध प्राधिकरणाला सशक्त केले पाहिजे आणि दैनंदिन राजकारणापासून दूर राखले पाहिजे. अशी मागणी आपण आपल्या लोकप्रतिनिधींच्या मार्फत करू शकतो. मोठ्या पाश्चिमात्त्य औषधे बनवणार्‍या उत्पादकांच्या धनदांडगेपणापासून हे प्राधिकरण सुरक्षित असले पाहिजे. त्यांना जाब विचारला पाहिजे. (उदाहरण या दुव्यावर बघावे.) पण त्याच प्रकारे आयुर्वेदिक, यूनानी, जडीबूटी-हर्बल, होमियोपॅथिक औषधांच्या सुरक्षिततेबद्दल चाचण्या घेण्याची, दखल घेण्याची मुभा या प्राधिकरणाला असली पाहिजे. कायद्याने प्रशासनाचे ते कर्तव्य केले पाहिजे. प्राचीन वारसा म्हणून अस्मितेचे स्तोम आपण माजवले तर निष्काळजी उत्पादकांचेच फावते. चोख देखरेख असली तर चांगले उत्पादक तगतीलच. अस्मितारक्षण आणि सुरक्षा, दोन्ही साधतील.

डॉक्टर, वैद्य, हकीम, औषधविक्रेता हे चमत्कारी धन्वंतरी नव्हेत म्हणजे काही आपले शत्रू नव्हेत. ते आपले मित्र आहेत, आणि आपले मार्गदर्शक आहेत. तरी आपल्या आरोग्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकून आपण हात झटकणे म्हणजे त्यांचा आदर नव्हे. प्रश्न विचारणे म्हणजे अविश्वास दाखवणे नव्हे. उलट द्रागान डेव्हिड दाविचवर चाचणी न घेता विश्वास ठेवला, द्रागान डेव्हिड दाविच मात्र सोकावतो. आपल्या सेवाभावी डॉक्टर-वैद्यावरही तसाच डोळे बंद करून विश्वास ठेवणे, म्हणजे माझ्या मते त्या प्रामाणिक डॉक्टराचा अपमानच आहे. आपल्या मदतीसाठी डॉक्टर हात पुढे करतो आहे, तो घ्यावा. पण त्याच्या खांद्यावर सर्व निर्णयांची जबाबदारी टाकून मोकळे होऊ नये. आपल्या देहाची काळजी आपणच घ्यायची आहे, शेवटी आपले आरोग्य आपल्याच हातात आहे.

पाहुणा संपादक : धनंजय.

प्रतिक्रिया

प्राजु's picture

8 Sep 2008 - 3:01 am | प्राजु

डॉक्टराकडे, वैद्याकडे जादूगार म्हणून न बघता समुपदेशक म्हणून बघावे.
एकदम पटले.
बर्‍याच औषधाबाबत सुरक्षिततेची चाचणी करणे आवश्यक असते. आपण डॉक्टरांवर पूर्णपणे विश्वास टाकतो आणि निश्चिंत होतो पण डॉक्टरांशी संवाद होणे खरंच गरजेचं आहे.
धनंजय, आपला लेख खरंच विचार करायला लावणारा आहे.
मध्यंतरी रामदेव बाबांच्या आश्रमात तयार होणार्‍या औषधांमध्ये मेलेल्या प्राण्यांच्या हाडाची भुकुटी मिसळलेली असते असा आरोप वृंदा करात यांनी केला होता. तेव्हाही लोकांमध्ये "रामदेव बाबा जे काही देतील ते आम्ही डोळे झाकून घेऊ" अशा प्रकारच सूर उमटत होता. त्यात कितपत तथ्य होते महिती नाही. पण त्या प्रकरणाची पुढे काहीच चौकशी झाली नाही.
औषध हे आपल्यासाठी आहे आणि ते आपल्या चांगल्या आरोग्यासाठीच आहे हे लक्षात घेऊन आपल्या प्रकृतीशी डॉक्टरना खेळण्याची परवानगी द्यावी.
आपला लेख आवडला.

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

वैशाली हसमनीस's picture

8 Sep 2008 - 6:23 am | वैशाली हसमनीस

आपण एका सामाजिक समस्येला ह्या लेखाद्वारे वाचा फोडली आहे.अभिनंदन! माझ्या घरात चार डॉक्टर असूनही (मुलगा,मुलगी,सून,जावई) मी आपल्या बहुतेक विचारांशी सहमत आहे.डॉक्टरांइतकीच रूग्णाची जागरुकता महत्त्वाची.इंजेक्शन देऊन झटपट बरे न करणारा डॉक्टर चांगला नाही असे अडाणी लोकांनाच नव्हे तर शहरातील ऊच्चभ्रू लोकांनाही हल्ली वाटते.बाळंतपण सहज होणारे असतानाही सिझेरियनचा आग्रह धरणारे महाभागही आपल्याकडे कमी नाहीत.औषधपाण्यावर किती पैसा आपण खर्च करू शकतो हे महत्त्वाचे,त्यांतच प्रतिष्ठा मानणारे अनेक! तसेच वैद्याच्या सल्ल्याशिवाय जाहिरांतीवर भाळून दुकानातून परस्पर औषधे घेणारेही अनेक.प्रतिबंधित औषधे आपल्याकडे सर्रास उपलब्ध असतात व दुकानदार ती सहजपणे विकताना दिसतात. ह्यावर लिहावे तितके थोडेच ! डॉक्टर हा समुपदेशक असावा,हे मान्य.पण समुपदेशन घेण्यार्‍याची मानसिकताही तेवढीच महत्त्वाची ! असे शेकडो अनुभव मला लिहीता येतील.पण सर्व काही लिहीता येणे शक्य नाही.विचारी डॉक्टर आणि विचारी रूग्ण असणे हे स्वास्थवर्धक.

सहज's picture

8 Sep 2008 - 7:21 am | सहज

बाळ झाले की ते त्याच्या आईच्या स्वाधीन, जरा मोठे झाले की शिक्षकांच्या स्वाधीन, मग जिथे काम करत आहोत त्यांच्या स्वाधीन, म्हातारे झाले की मुलाबाळांच्या स्वाधीन, व सर्व प्रवासात सतत स्पर्धेच्या, कुण्या बाबामहाराजाच्या /नशिबाच्या स्वाधीन.

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. आपल्या हातात काहीच नाही म्हणुन असंतुष्ट असलो तरी हीच जगाची रीत म्हणून मानले गेले आहे. बहुदा केवळ माहीत असलेल्या घरगुती उपायाने बरे न झाल्यामुळे डॉक्टरला "शरण" जाउन बरे झाल्यावर लगेच डॉक्टर म्हणजे देव हे समिकरण आले व परत जास्त विचार न करता स्वाधीन करण्यात धन्यता मानली गेली.

माणुस हवा, पाणी व अन्न ह्या तीन गोष्टी सतत घेत असतो प्रत्येक वेळी आपण आपल्या पोटात कुठले व किती अन्न घालत आहोत, फुफुस्सात किती व कशी हवा घालत आहोत ह्या गोष्टी जाणिवपुर्वक केल्या तरी सरासरी आरोग्य दर्जा झपकन वाढेल. डॉक्टरकडे गेल्यावर आपली बरे नसल्याची लक्षणे सांगण्याबरोबरच नक्की काय घडले [हवा, पाणी, अन्न, संसर्ग निदान] हे सांगीतले तर डॉक्टरला निदान करणे व शक्यतो योग्य मात्रा लागू पडेल असे उपचार करणे सोयीचे होईल.

गुगलबाबा जिंदाबाद! आजकाल कुठलेही औषध घ्यायची वेळ आली की ते नक्की काय आहे व त्यातील घटक काय याचा शोध घेणे शक्य आहे. तसेच डॉक्टरने दिलेला डोस योग्य वेळी व योग्य प्रमाणात घेणे देखील त्या औषधाच्या परिणामकारतेसाठी जरूरीचे आहे. एक डोस चुकला, लक्षात रहात नाही म्हणुन सर्व डोस रात्री एकदम घेणारे काही महानुभाव माझ्या पहाण्यात आहे.

अग्रलेख आवडला. तन, मन, धन नीरक्षीरविवेक विवेचन छान. एकंदर सबलीकरण [एम्पॉवरमेंट??] तत्वाला धरुन उत्तम अग्रलेख.

नंदन's picture

8 Sep 2008 - 10:21 am | नंदन

अग्रलेख. अतिशय आवडला.

>>>तन, मन, धन नीरक्षीरविवेक विवेचन छान. एकंदर सबलीकरण [एम्पॉवरमेंट??] तत्वाला धरुन उत्तम अग्रलेख.
- असेच म्हणतो.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

प्राजु's picture

9 Sep 2008 - 10:48 pm | प्राजु

एक डोस चुकला, लक्षात रहात नाही म्हणुन सर्व डोस रात्री एकदम घेणारे काही महानुभाव माझ्या पहाण्यात आहे.

या पेक्षा सुद्धा... माझ्या बघण्यामध्ये एक जण होता. त्याला होमिओ डॉक्टरांनी २-२ गोळ्या दिवसातून ८ वेळा घ्यायला सांगितल्या होत्या. त्याने ८ -८ गोळ्या २ वेळा घेतल्या आणि बेशुद्धा पडला. पुढे त्याचे काय झाले माहिती नाही पण लिहून दिलेल्या सूचना न पाळल्यानेही अशा समस्या उद्भवू शकतात.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मेघना भुस्कुटे's picture

8 Sep 2008 - 7:24 am | मेघना भुस्कुटे

लेख आवडला.
डॉक्टरपेक्षा आपल्याला जास्त कळते काय, असे विचारून स्वस्थ बसण्याची सवय मलाही आहे. ती बदलायलाच हवी. :)

प्रकाश घाटपांडे's picture

8 Sep 2008 - 10:00 am | प्रकाश घाटपांडे


पण या सुज्ञ साशंकतेच्या बदल्यात दुसर्‍या कुठल्या औषधाबद्दल लोक अंधविश्वासू होत आहेत. आपल्या याच साशंकतेला आपण सन्मार्गी लावले, तर आपण आगीतून फुफाट्यात पडणार नाही.


आमच्या शंकेखोर वृत्ती मुळे डॉक्टर आम्हाला टाळायला बघतात. स्पेशालिस्ट लोकांना प्रश्न विचारले कि एकतर त्यांच्या ज्ञानावर शंका घेतल्याचा भास त्यांना होतो. दुसरे म्हणजे शंकांची उत्तरे देण्यात आपण आपला फालतु वेळ घालवतो असे त्यांना वाटते. डॉक्टर तुम्ही का मी? असा भाव त्यांच्या चेहर्‍यावर असतो. जी औषध देतोय ती गप गुमान घ्या आन काय होतय तेवढच सांगा.
असल्या शंकेखोर वृत्तीने औषध देखील परिणाम करणार नाहीत असे सगे सोयरे ही म्हणतात. मग आम्हाला त्या औषधाच्या प्लासिबोत्वाची शंका यायला लागते. कधी कधी औषधांचे साईड इफेक्ट इतके जाणवतात कि रोग परवडला इलाज नको अशी परिस्थिती होते. डॉक्टर आपल्या असहायतेचा फायदा तर घेत नाही ना? अशी शंका यायला लागते. ट्रायल ऍण्ड एरर साठी आपण गिनी पिग तर नाही ना? औषध सूट होते की नाही हे घेतल्याशिवाय कसे कळेल? असे दुसरे मन सांगते. मला होणारा पोटाचा त्रास हा ऍसिट्रोम च्या साईड ईफेक्ट मध्ये लिहिला आहे असे मी जेव्हा डॉक्टरला सांगितले तेव्हा हे मानसिक आहे १ एम जी ने काय होणार आहे? असे विचारले. १ एम् जी ने काहीही होणार नाही तर मग सुपरिणाम तरी कसा होईल? ही आमची शंका परत आहेच. औषध बंद झाले तरी त्रास आहेच ना ? मग इर्रिटेबल बाउल सिंड्रोम नवीन रोग नावाने नवीन डॉक्टर
दुसर्‍या डॉक्टर चे मत घेतले आन ते पहिल्या डॉक्टर ला कळाले तर तो डूख तर धरणार नाही ना? अशी शंका यायला लागते. काही डॉक्टर सुरक्षीतता, काळजी , जागरुकता या नावाखाली भय निर्माण करतात.त्यासाठी मोफत शिबीर घेतात. नंतर त्या भयाला मुक्त करणार्‍याचे अधिकार स्वतःकडेच राखुन ठेवलेले असतात. त्या अमक्याने माझे ऐकले नाही त्याचे काय झाले? अशी उदाहरणे देउन आपल्या भयात भर घालतात. अंशतः निराकरण करुन शेष राशीत थोडी भर घालुन भयाचा कंटेंट कायम ठेवतात कि रुग्ण स्वखुषीने आपल्या कह्यात राहिला पाहिजे.
औषधांपासुन दुर ठेवण्याचा प्रयत्न करणार्‍या डॉक्टरला कालबाह्य किंवा गावंढळ अशी दुषण दिली जातात.
डॉ. राजीव शारंगपाणी या डॉक्टरांच्या मुखातुन "......नाहीतर बघा "अशा भिती घालणार्‍या डॉक्टर रुग्ण कथा विनोदी शैलीत ऐकली होती. डॉक्टर अमोल अन्नदाते यांचे वैद्यकिय बोधकथा ही लोकसत्तेतील सिरीयल पुस्तकरुपाने प्रकाशित झाली आहे.

शंकेखोर रुग्ण
प्रकाश घाटपांडे

सहज's picture

8 Sep 2008 - 10:48 am | सहज

प्रकाशकाकांशी सहमत

उपलब्ध वेळ, रुग्णांची गर्दी व डॉक्टरची मनस्थीति, शेड्युल व ज्ञान यावर बरेचदा डॉक्टरला असा शंकेखोर पेशंट आवडतो किंवा नावडतो.

गुमान औषधे घेत बसण्यापेक्षा वेगवेगळ्या शंका व वेगवेगळे डॉक्टर हाच उपाय उत्तम असे माझे मत. तसेच पुर्णता ऍलोपाथीवर अवलंबून रहाण्यापेक्षा इतर उपाय, डॉक्टरची पुर्वपरवानगी घेउन / त्यांना सांगून केलेले चांगले. डॉक्टरचे ज्ञान, अनुभव चांगलेच पण सर्व औषधे डॉक्टर स्वता बनवत नाही तसेच मोठ्या इस्पीतळात डॉक्टर नोकर असतो व्यवस्थापन म्हणेल तीच औषधे चालवावी लागतात. काही डॉक्टरांना औषध कंपन्यांकडून फायदा होत असेल तर ती विशिष्ट औषधेच देतात. त्यामुळे औषधांवर लक्ष ठेवलेच पाहीजे.

तसेच काही संकेतस्थळे, आरोग्य खात्याकडून बंदी असलेल्या औषधांची यादी इ. उपलब्ध माहीतीचा वापर केला पाहीजे.

:-)

पिवळा डांबिस's picture

8 Sep 2008 - 10:26 am | पिवळा डांबिस

एका ऍलोपॅथिक औषध बनवणार्‍या कंपनीत व्यवसाय करणार्‍या माणसांचा प्रतिनिधी म्हणून या विषयावर एक प्रबंध लिहू शकतो......
पण आधीच डॉक्टरेट असल्याने पुन्हा नवीन प्रबंधाची गरज नाही....
:)
(ट्रस्ट बट व्हेरिफाय! विश्वास ठेवा तरी तपास करा!)
हे या अग्रलेखातील सर्वात महत्वाचे वाक्य!!
औषधांच्या बाबतीतच नव्हे तर आयुष्यातील सगळ्याच क्षेत्रात उपयोगी असलेले....
मी तर म्हणेन की व्हेरिफाय फर्स्ट, देन ट्रस्ट!!!!!!!!

ऍलोपॅथिक औषधंच्या बाबतीत एक पेशंट इन्फॉर्मेशन कार्ड असते. जेंव्हा तुम्ही औषध विकत घेता त्याबरोबरच मिळते.....
जरा ते काळजीपूर्वक वाचा........
जर तुमचा इतर (आयुर्वेदिक, होमिओपाथिक. युनानी, वैदू) औषधांवर विश्वास असला तरी हरकत नाही....
त्यांच्याकडून तुम्हाला अशी इन्फॉर्मेशन कार्डॅ मिळतायत का नाही याची चौकशी करा...
जर नसतील तर का नाही याचा विचार करा.....
मग काय तो निर्णय घ्या......
प्रत्येक ऍलोपॅथिक औषध बाजारात आणण्यापूर्वी आणि प्रत्येक क्लिनिकल स्ट्डी डिझाइन करण्यापूर्वी आम्ही काय यातनातून जातो याचा विचार करा....
ऍलोपॅथिक औषधे रोग बरा करण्याऐवजी सिम्प्टम्सवर उपाययोजना करतात हे तर सत्यच आहे....
पण ती तुम्हाला निर्धोक असल्याचे प्रूव्ह करण्यासाठी अनेक चाचण्यातून जातात हे विसरू नका.....
किंबहुना त्या सर्व चाचण्या या इतर औषधांकडून अपेक्षित करा......
हेच कळकळून सांगणे......

बाकी तुमचे नशीब.......

विसोबा खेचर's picture

8 Sep 2008 - 10:33 am | विसोबा खेचर

पण ती तुम्हाला निर्धोक असल्याचे प्रूव्ह करण्यासाठी अनेक चाचण्यातून जातात हे विसरू नका.....
किंबहुना त्या सर्व चाचण्या या इतर औषधांकडून अपेक्षित करा......
हेच कळकळून सांगणे......

डांबिसशेठशी सहमत...!

बाकी, अग्रलेखावर अभिप्राय सवडीने...

आपला,
(ऍलोपथीला खूप मानणारा!) तात्या.

प्रकाश घाटपांडे's picture

8 Sep 2008 - 10:38 am | प्रकाश घाटपांडे


बाकी तुमचे नशीब.......

ह्योच त खेळ हाय ना. या नशीबाविषयी पुल काय म्हन्तात पघा
प्रकाश घाटपांडे

सुनील's picture

8 Sep 2008 - 10:50 am | सुनील

लागोपाठ दोन पाहुण्या संपादकांनी आरोग्य हा विषय आपल्या संपादकीयासाठी निवडला आहे, तेव्हा मिसळपाव हे एक पौष्टिक खाद्य आहे यावर शिक्कामोर्तब होण्यास हरकत नसावी!

काही वर्षांपूर्वी वैद्यकसत्ता नावाचे एक पुस्तक वाचनात आले होते (लेखकाचे नाव आता आठवत नाही), त्याची आठवण लेख वाचताना झाली. मन आणि धन याप्रमाणे तनाचाही Onus आपल्यावरच आहे, हे धनंजयरावांनी सोदाहरण पटवून दिले आहे. आणि प्रत्यक्षात तसे घडत नाही याची कारणमिमांसादेखिल उत्तम केली आहे.

माझ्या लहानपणी आमचे फॅमिली डॉक्टर तापमापक लावून झाल्यावर, "ताप किती आहे", ह्या प्रश्नावरदेखिल भुवया वाकड्या करून पाहत. डॉक्टर तसे चांगले होते, हाताला गुणही होता पण "डॉक्टर मी की तुम्ही" हा भाव कायम चेहेर्‍यावर असायचा!

त्यामानाने परिस्थिती आता पुष्कळच बदलली आहे. नवी पिढी बरीचशी चौकस झाली आहे. निमूटपणे काही ऐकून घेत नाही. चार प्रश्न विचारतेच! वर सहजरावांनी म्हटल्याप्रमाणे गुगलबाबा मदतीला आहेतच! तरीही ते पुरेसे नाही.

आपल्या विशिष्ट संदर्भातले पुरेसे ज्ञान डॉक्टराला समजावून देता आले पाहिजे. संवादातून उपचारासाठी वेगवेगळे पर्याय समोर आले पाहिजेत. औषध घेतलेच नाही, तर काय फरक पडतो, ते डॉक्टराला समजावून देता आले पाहिजे. पर्यायी सौम्य औषधयोजना आहे काय? केवळ पथ्ये पाळून आपल्याला हवा तो फरक घडून येईल काय? हे पर्याय विचारात घेतले पाहिजेत.
हे व्हायलाच हवे.

औषधनिर्मात्यांबाबत मात्र एकट्या व्यक्तीला सहज ठोस कार्य करता येत नाही
हे खरेच. विशेषतः बलाढ्य बहुराष्ट्रीय औषधकंपनींच्या बाबतीत तर हे वास्तवच आहे.

पण त्याच प्रकारे आयुर्वेदिक, यूनानी, जडीबूटी-हर्बल, होमियोपॅथिक औषधांच्या सुरक्षिततेबद्दल चाचण्या घेण्याची, दखल घेण्याची मुभा या प्राधिकरणाला असली पाहिजे. कायद्याने प्रशासनाचे ते कर्तव्य केले पाहिजे
जागरूक नागरीक म्हणून लोकप्रतिनिधींवर दबाव आणणे शक्य आहे.

अजून एक मुद्दा या ठिकाणी मांडावसा वाटतो तो म्हणजे आहाराचा. आता उपचारातील पथ्ये सोडा, पण एरवी आपला आहार काय असावा ह्याबाबतीतही कित्येक लोक डॉक्टरांवर विसंबून राहतात. आहारशात्र हे एक वेगळे शात्र आहे आणि उपचार करणारा डॉक्टर हा त्यातील तज्ञ असतोच असे नाही, हेदेखिल बरेचदा ध्यानात घेतले जात नाही.

एका महत्त्वाच्या विषयावर इतका उत्तम अग्रलेख लिहिल्याबद्दल धनंजयरावांचे अभिनंदन!

(स्वारोग्यचिंतक) सुनील

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मनिष's picture

8 Sep 2008 - 11:25 am | मनिष

धनंजय यांनी लौकिकाला साजेसा सुरेख अग्रलेख लिहिला आहे. मी प्रकाश काका आणि पिडा काका यांच्याशी सहमत. 'ट्रस्ट बट व्हेरिफाय' हे तर फारच महत्वाचे वाक्य! दुर्दैवाने आपल्या सगळीकडे 'गप्प बसा' हेच शिकवले जाते, आणि माहितीपासून वंचित राहिल्याने आपले प्रचंड नुकसान होते - पण आपण शंकेखोर माणसाला उगाचच गप्प करतो. सुदैवाने वैद्यकिय व्यवसायात आता मोठया शहरात तरी खूप जागरुकता आली आहे!

धनंजय यांचे पुन्हा एकदा अभिनंदन!

विसोबा खेचर's picture

8 Sep 2008 - 12:18 pm | विसोबा खेचर

धन्याशेठ,

अग्रलेख चांगला वाटला परंतु....

परंतु वैयक्तिक माझ्याबद्दल बोलायचे झाले तर मी मात्र आजपर्यंत माझ्या फ्यॅमिली डागदरांकडून आजपर्यंत नेहमी विदाऊट व्हेरीफिकेशन, केवळ ट्रस्टवरच औषधे घेतली आहेत आणि वेळोवेळी पूर्ण बरा झालो आहे. याचे कारण माझा आमच्या फ्यॅमिली डागदरांवर असलेला पूर्ण विश्वास!

माझ्या मते डागदरांनी दिलेले कुठलेही औषध घेतांना "माझा डागदरांवर पूर्ण विश्वास आहे आणि त्यांनी दिलेले औषध घेऊन मला पूर्ण बरे वाटणार आहे!"हा विश्वासही मनामध्ये हवाच. त्यामुळे आपली प्रकृती सुधारायला खूप मदत होते. किंबहुना डागदरांवर असलेला पूर्ण विश्वास आणि "त्यांनी दिलेले औषध घेऊन मला पूर्ण बरे वाटणार आहे!" ही मानसिकतादेखील माझ्या मते अत्यंत आवश्यक आहे! शंकाकुशंका घ्यायला आपण स्वत: तेवढे शिकलेलो आहोत का? गुगलवरून वगैरे मिळालेल्या अर्धवट ज्ञानावर कितपत विश्वास ठेवायचा? काही वर्ष अभ्यास करून, अनेक केसस्टडीज,प्रॅक्टिकलस आपण केलेली आहेत का?

धन्यशेठ, एक लक्षात घ्या की कुठलाही डागदर हा देव नसतो, तोदेखील तुमच्याआमच्यासारखा माणूसच असतो. त्याचप्रमाणे एखाद्या विंजिनियरच्या हातून किंवा एखाद्या वकिलाच्या हातून जशी चूक घडू शकते तशीच ती एखाद्या डागदराकडूनही घडू शकतेच की! हां, आता नेमका तोच डागदर जर तुमच्या वाटणीला आला तर नशीब तुमच! दुसरं काय?

आणि ही संकेतस्थ़ळं, गुगल वगैरे सगळं आत्ता आलं हो! २० वर्षांपूवी कुठे उपलब्ध होती इतकी माहिती? तरीही डागदर मंडळी औषधे देतच होती ना? आणि तुम्ही बरे होतच होतात ना? समजा एखाद्या डागदराने तुम्हाला सांगितलं की तुम्हाला अबक हा रोग झाला आहे आणि त्याकरता कखग हे औषध मी तुम्हाला देत आहे. तर तुम्ही ते घेणार की घरी जाऊन गुगलून पाहणार? :)

समजा उद्या मला रस्त्यात अपघात झाला आणि बेशुद्धावस्थेत तातडीने रुग्णालयात हलवले गेले तर डागदर लोक काय करतात? ताबडतोब नाना प्रकारची विंजेक्शने देऊन पहिले उपचार सुरू करतात, आवश्यक तिथे त्यांना ऐनवेळेस शस्त्रक्रियाही करावी लागते! आणि हे सगळं होत असताना मी बेशुद्धावस्थेतअसतो! अश्या वेळेस आपत्कालीन परिस्थितीत डागदर लोक माझ्यावर कोणते उपचार करतात, कोणती औषधयोजना करतात हे मी कसं काय व्हेरिफाय करू शकतो इतकेच सांगा धन्याशेठ! :)

आपला,
(पहिला डागदरवर आणि दुसरा नशीबाबवर विश्वास असणारा! आणि बाकी "अल्ला मालिक!" या उक्तीवर विश्वास ठेऊन निर्धास्त असणारा!) तात्या.

ता क -

१) माझा वरील प्रतिसाद हा फक्त ऍलोपथीशी निगडीत आहे कारण माझा त्या पद्धतीवर विश्वास आहे!

२) धन्याशेठचा अग्रलेख थेअरॉटिकली, कागदोपत्री ठीक असेलही परंतु प्रॅक्टिकली ठीक वाटत नाही!

अहो, एखादी अडाणी मासळीवाली सकाळाच्या पारी आमच्या के ई एक मधल्या ओपीडीत दुनियाभरची गर्दी असते तेव्हा तापावर म्हणा, पोटदुखीवर म्हणा, औषध घेते तेव्हा ते औषध ती कसं काय व्हेरीफाय करणार, कुठे गुगलून पाहणार?

आता यावर तुम्ही म्हणाल की ह्याच तर शिक्षणाची आवश्यकता आहे! अहो परंतु लोकशिक्षण हा तर माझ्या मते ऑल द वे वेगळाच मुद्दा आहे. लोकशिक्षणाबद्दलच बोलायाचं असेल तर आधी प्राथमिक शिक्षणाबद्दल बोललं पाहिजे! मेडीकल सायन्स हा विषय तर खूप दूर राहिला! अहो एखाद्या चांगल्या सुशिक्षित माणसाला देखील "बॅक्ट्रिम डी एस" ह्या गोळीतले बेसिक ड्रग वाचून त्याची माहिती गुगलून समजून घ्यायला काही काळ लागेल! तिथे त्या के ई एम च्या गर्दीतली ती अशिक्षित कोळीण बॅक्ट्रिम डी एस ची गोळी काय कप्पाळ व्हेरीफाय करणार?! :)

बोला धन्याशेठ! :)

तात्या.

स्वाती दिनेश's picture

8 Sep 2008 - 12:19 pm | स्वाती दिनेश

सर्वप्रथम अग्रलेख अतिशय आवडला.
ट्रस्ट बट व्हेरिफाय!
अगदी खरे..
एवढेच नाही तर व्हेरिफाय फर्स्ट, देन ट्रस्ट!!!!!!!! हे सुलेशबाबूंचे मत तर आणखीच पटले.
तन, मन, धन नीरक्षीरविवेक विवेचन छान. एकंदर सबलीकरण [एम्पॉवरमेंट??] तत्वाला धरुन उत्तम अग्रलेख.
- सहजरावांसारखेच.
स्वाती

अमेयहसमनीस's picture

8 Sep 2008 - 12:59 pm | अमेयहसमनीस

लेख वाचला.

ईथे नमूद केलेले मूद्दे "एवीदेंस बेस्ड मेडीसीन " या नावा खाली बरेच आधी पासून प्रचलित आहेत.

डॉ.अमेय

एका महत्वाच्या विषयाला धनंजयांनी वाचा फोडली आहे. शिवाय त्यांनी वेगवेगळया चिकित्सा पद्धतींची उदाहरणे देऊन वैद्यकाचा गुलदस्ता उलगडून दाखवला आहे. अग्रलेखात दिलेली समस्यापूर्ती प्रत्यक्षात उतरली तर किती छान आहे.

पण तात्या म्हणतात तसे ती 'प्रॅक्टिकल' होणं शक्य नाही. तथाकथित प्रगत देशांत नाही. याउप्पर भारतात तरी नाहीच नाही.

ज्या (प्रगत) देशांमध्ये वैद्यकविमा (हेल्थ इन्सुरन्स), औषध कंपन्या, वैद्यकीय संशोधक आणि मोठाली इस्पितळे यांचे एक पक्के मायाजाल निर्माण झाले आहे तिथे डॉक्टर आपल्यावर काय उपचार करतो त्याची काळजी/चिकित्सा बहुसंख्य जनता करू शकत असेल असे वाटत नाही. एकदा एफ डी ए अथवा तत्सम शासकीय संघटनेने मान्यता दिली म्हटल्यावर ते औषध अथवा ती चिकित्सा/उपचार पद्धती /औषध पूर्ण निर्दोष आणि रामबाण आहे असे सर्रास मानले जाते. तो अंधविश्वास इतका आहे की प्रत्यक्ष डॉक्टरही त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतात. त्यातूनच नंतर 'व्हायॉक्स' घडतात.

भारतात तर वैद्यक क्षेत्र म्हणजे 'आंधळे दळते आणि कुत्रे पीठ खाते' अशी अवस्था आहे.
उदा. एखादा बाप आपल्या आजारी मुलीला घेऊन बालरोगचिकित्सकाकडे गेला आणि तपासणीनंतर तिला काय झालेले आहे असे विचारता झाला तर "हु:, गिव्ह धिस सिरप फॉर थ्री डेज - टू टाईम्स डेली" असे तुच्छतापूर्ण उत्तर मिळते. ते जेनेरिक औषध काय आहे ते कळते. त्याचा कमी खर्चाचा पर्याय (कधी कधी १/१०) उपलब्ध असतो. तो विकत घेतला आणि डॉक्टरला दाखवला तर "नो, धिस वोंट डू" असे तो सांगतो. कारण विचारले तर "इट्स नॉट ऍज इफेक्टीव्ह " अशी थाप ऐकू येते. दुसर्‍या डॉक्टरकडे जावे तर तिथेही थोड्याफार फरकाने तोच प्रकार. एखाद्या मोठ्या 'चिल्ड्रन हॉस्पिटल'मध्ये तर साध्या सर्दीसाठीही अल्ट्रासॉनिक नेब्युलायझर विकत घेण्याचा सल्ला दिला जातो.
मोठ्यांचे तर विचारायलाच नको. दोन दिवस फ्लू झाला तरी असंख्य चाचण्या केल्या जातात. मृतप्राय व्यक्तींना महिनोनमहिने हार्टलंग मशीनवर ठेवले जाते.
सुशिक्षित शहरी माणसांची ही अवस्था असेल तर खेडोपाडी पसरलेल्या बहुसंख्य अशिक्षित जनतेची काय कथा?
(उदा. ऐकीव गावगप्पा - विद्वाननगरीच्या एका जगप्रसिद्ध हृदयरोग चिकित्स/उपचार इस्पितळाचे जाळे इतके हीन आहे की दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातील खेडोपाडी असलेल्या त्यांच्या हस्तक डॉक्टरांना दर महिन्याला अमूक केसेस अँजिओप्लास्टीसाठी पाठवण्याचे टारगेट दिलेले असते. तिथे गेलेला कोणताही रुग्ण किमान एक आणि जास्तीत जास्त ७ स्टेंट हृदयात घालूनच बाहेर पडतो.)

हे पाहिले की धनंजयांनी प्रतिपादन केलेले गृहितक , "डॉक्टर, वैद्य, हकीम, औषधविक्रेता हे चमत्कारी धन्वंतरी नव्हेत म्हणजे काही आपले शत्रू नव्हेत. ते आपले मित्र आहेत, आणि आपले मार्गदर्शक आहेत" हेच मुळात तपासून पाहिले पाहिजे असे वाटू लागते.
याचे महत्त्वाचे कारण म्हणजे 'प्रिय व्यक्तीला होणारा आजार आणि त्यातील भावनीक गुंतागुंत' हे आहे. या भावनीक गुंतवणुकीचा गैरफायदा डॉक्टर घेतात. जे बहुसंख्य त्यांना परमेश्वर मानतात त्यांना हे अपेक्षित नसते.
त्यामुळे हा 'भावनांचा व्यापार' असाच सुरू राहणार असे खेदाने म्हणावेसे वाटते.

प्रकाश घाटपांडे's picture

8 Sep 2008 - 3:30 pm | प्रकाश घाटपांडे


वेगवेगळया चिकित्सा पद्धतींची उदाहरणे देऊन वैद्यकाचा गुलदस्ता उलगडून दाखवला आहे.


वैद्यराज नम्स्तुभ्यं यमराज सहोदरम|
यमस्तु हरति प्राणान वैद्यः प्राणान्धनानि च ||
अर्थ- हे वैद्यराज तुम्हाला नमस्कार असो. आपण यमाचे सख्खे भाउ आहात. यम फक्त प्राण हरण करतो पण वैद्य मात्र प्राण आणि धन दोन्ही घेउन जातो.
प्रकाश घाटपांडे

विकास's picture

8 Sep 2008 - 8:31 pm | विकास

अग्रलेख आवडला. मात्र "ट्रस्ट बट व्हेरीफाय" हे कायम शक्य असते असे वाटत नाही. याचा अर्थ तसे करू नये असा नक्कीच नाही, पण वर तात्यांनी म्हणल्याप्रमाणे अशा वेळा असू शकतात जेंव्हा त्यातून जाणार्‍या व्यक्तीस (अथवा जिची नातलग) केवळ डॉक्टरवर भरवसा ठेवण्याशिवाय पर्याय नसतो आणि तेंव्हा तो निर्णय योग्य पण ठरून शकतो... मात्र त्याला घाटपांडे साहेबांनी ज्यावर पुलंचा दूवा दिला ते "नशिब" लागते :-)

बाकी मूळ अग्रलेखासंदर्भात अजून काही:

आयुर्वेदातील पार्‍याच्या वापरासंदर्भात कायम बोलले जाते. कारण अधुनिक शास्त्राप्रमाणे पारा हा विषारी आहे. आता आमच्याकडे (मॅसॅच्युसेटस मधे) पारा असलेले अनेक प्रकार हे नेहमीच्या कचर्‍यात जाण्यापासून वेगळे करणे बंधनकारक केले आहे. या संदर्भात धनंजयची काय माहीती आहे? (थोडे अवांतर) मधे एकदा राज्य सरकारमधे या संदर्भातील प्रमुख व्यक्तीशी गप्पा मारत होतो. तेंव्हा तीने मला "पारद शिवलींगा" संबंधी विचारले. म्हणले मला असले काही माहीत नाही! नंतर समजले की भारतातून अशी पार्‍याची शिवलींगे येथे आणली जातात....

डॉक्टरांकडून योग्य माहीती करून घेणे महत्वाचे असते. पण या संदर्भात देखील अमेरिकेत अतिरेकीपणा होतो असे वाटते. त्यात पेशंट कडूनच होतो असे नाही तर कायद्यांमुळे डॉक्टरांकडून पण होतो: एकदा एका जवळच्या माहीत असलेल्या ज्येष्ठ व्यक्तीच्या काही टेस्टस चालू होत्या म्हणून त्यांच्याबरोबर बॉस्टन भागातील प्रसिद्ध हॉस्पिटलच्या बाहेरील रुग्ण विभागात बसलो होतो. आमच्या अशाच गप्पा चालू होत्या. बाह्यरुग्ण विभाग असल्याने तेथे इतरही रुग्ण तसे जवळ जवळ खाटांवर होते. त्यात एक गोरी बाई एका जवळच्या खाटेवर पडून होती. मला वाटते तीची काहीतरी शस्त्रक्रीया होणार होती त्यासाठी नेण्यासाठी ती वाट पहात होती. अंदाजे ७०च्यावरची असावी. तीच्याशी गप्पा मारायला आणि सोबत म्हणून त्याच वयोगटातील अजून एक बाई होती. दोघी छान गप्पा मारत होत्या काही गंभिर नव्हत्या. तितक्यात एक डॉक्टर आणि नर्स तेथे आले. तीचा रीपोर्ट वगैरे पाहीला आणि शस्त्रक्रीयेला जाण्याआधी सर्व माहीती वगैरे सांगू लागला. ती प्रसन्न भाव ठेवून ऐकत होती. असे वाटले तीच्या दृष्टीने काही काळजी नव्हती. पण तितक्यात तो डॉक्टर तीला म्हणाला की, "जर ही शस्त्रक्रीया होताना तुझे हृदय अथवा मेंदू बंद पडले आणि शास्त्रीय (क्लिनिकली) तू मृत्यू पावलीस तर आम्ही तुला लाइफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवायचे का?" बघता बघता त्या दोघी बायका एकदम गंभीर झाल्या. त्याने सांगीतले की हे नेहमीचे प्रश्न आहेत म्हणून पण त्या अवस्थेत अशी माहीती सर्व काही "डीस्टर्ब" करून गेली...

बाकी मला कमी सुया आणि औषधे देणारे डॉक्टर्स भेटले की त्यांच्यावर पटकन विश्वास बसतो आणि तो बर्‍याचदा योग्य असतो असे जाणवले आहे!

विसोबा खेचर's picture

8 Sep 2008 - 11:25 pm | विसोबा खेचर

वर तात्यांनी म्हणल्याप्रमाणे अशा वेळा असू शकतात जेंव्हा त्यातून जाणार्‍या व्यक्तीस (अथवा जिची नातलग) केवळ डॉक्टरवर भरवसा ठेवण्याशिवाय पर्याय नसतो आणि तेंव्हा तो निर्णय योग्य पण ठरून शकतो...

योग्य पण ठरू शकतो?? व्हॉट डु यू मीन सर?!

अहो बर्‍याचदा योग्यच ठरतो! जे डॉक्टर तुमच्यावर उपचार करत असतात त्यांनाही काही एक सेन्स असतो, ज्ञान असतं, जबाबदारीची जाणीव असते! त्यांच्या निदानानुसार त्यांना जे औषध योग्य वाटतं तेच ते देत असतात. तुम्ही ते व्हेरिफाय करणार आहात किंवा नाहीत याच्याशी त्याला काहीही देणंघेणं नसतं!

माझ्या माहितीत तरी बरेचसे डॉक्टर त्यांच्या निदानाप्रमाणे जे औषध त्यांना योग्य वाटतं तेच देतात आणि त्यामुळे रुग्ण बरेही होतात!

असो, एकंदरीत अग्रलेखाचा आणि काही प्रतिसादाचा सूर असा दिसतो आहे की डॉक्टर म्हणजे एकदम कंडम माणूस आणि त्यानी दिलेलं औषध रुग्णानं तपासून घेतलं नाही तर जणू काही त्या औषधाचा काही उपेगच होणार नाही!

माझ्या मते हे अत्यंत चुकीचे आहे. ठीक आहे, आपले डॉक्टर आपल्याला कोणत्या ब्रँडनेमचे औषध देत आहेत, त्याचं बेसिक ड्रग काय, रोगाची इन्डिकेशन्स् काय, औषधाची कॉन्ट्रा-इन्डिकेशन्स् काय, डोसेजचं प्रमाण काय, साईड इफेक्टस् कोणते आहेत, इत्यादी प्राथमिक माहिती समजून घेणे किंवा विचारणे इतपत ठीक आहे. त्यामुळे आपल्या सामान्य ज्ञानात थोडीफार भर पडू शकेल! परंतु याचा अर्थ तुम्ही डॉक्टरइतके तज्ञ आहात आणि जळ्ळ्या त्या तुमच्या गुगलनुसार ते औषध योग्य आहे किंवा नाही हेही ठरवायचा अधिकारही तुम्हाला प्राप्त झाला आहे हा साक्षात गैरसमज आहे आणि तो योग्य नव्हे!

बरं मला एक सांगा, समजा, एखाद्या रुग्णाला बॅक्टेरियल डायरिया आहे असं डॉक्टरनं निदान केलं आणि जर त्या डॉक्टरने त्यावर नॉर्फ्लॉक्स टीझेड दिली तर तुम्ही त्याने नॉर्फ्लॉक्स टीझेड ऐवजी मेट्रोनिडॅझोल का नाही दिली हे त्याच्याशी व्हेरिफाय करणार किंवा हुज्जत घालणार??

आपला,
डॉ तात्या अभ्यंकर.

"डॉक्टर म्हणजे समुपदेशक" आणि "डॉक्टर म्हणजे करणी-करणारा" यांच्यापैकी समुपदेशकाची भूमिका निवडावी असा अग्रलेखाचा तरी रोख आहे. तसे नाते जुळवण्याची जबाबदारी रुग्णावरही आहे, अशा काही विचारांचा पुरस्कार अग्रलेखात आहे.

सर्व प्रतिसादांचा विस्ताराने आढावा नंतर घेतो. मूळ लेखात तरी कोणाला 'कंडम' म्हटलेले नाही हे स्पष्टीकरण लवकरच दिलेले बरे - बाकी चालू द्या...

(तसे द्रागान डेव्हिड दाविचला कंडम म्हटले आहे, हे खरे आहे. पण आपला फ्यामिली डॉक्टर असा नसावा हे बर्‍याच वेळा स्पष्ट केले आहे, असे मला वाटले.)

विकास's picture

9 Sep 2008 - 12:35 am | विकास

योग्य पण ठरू शकतो?? व्हॉट डु यू मीन सर?!

अहो डॉक्टरांना सेन्स असतो, ज्ञान असतं, जबाबदारीची जाणीव असते वगैरे सर्व मान्य आहे पण तरी देखील, "डॉक्टर आहे का हजाम" असे म्हणायची पण कधीतरी वेळ येते, म्हणून तर तशी म्हण आहे. तशी उदाहरणे देखील ऐकली आहेत. ठाण्यात माझा संबंध चांगल्या डॉक्टरांशी आला आणि तसाच तो तुमचापण आलेला असल्याने हे थोडेफार "वन पॉइंट एक्स्ट्रापोलेशन" असू शकेल. पण ठाण्यातच माहीतीत घडलेले एक दंत वैद्याचे उदाहरण आहे ज्याने चुकीचा दात काढला... इतके कशाला श्रीदेवीच्या आईच्या मेंदूवरील शस्त्रक्रीया चुकीच्याच भागात केल्याची घटना न्यूयॉर्क मधे झालेली आहे. पण मुद्दा तो नाही आहे. हे सर्व विषयाला अवांतर आहे.

धनंजयने म्हणल्याप्रमाणेच माझा हेतू देखील डॉक्टरांना सरसकट शिव्या घालणे हा नक्कीच नव्हता/नाही. तरी देखील कधीतरी चूक होऊ शकते तर कधी कधी जेंव्हा चॉईसेस असतात त्यातील कशाचे काय परीणाम आहेत, कशाने काय गूण मिळू शकतो वगैरे समजावून देण्यास तसा "इन्फॉर्मड डिसिजन" घेयला मदत करणारा चांगला डॉक्टर लागतो.

प्रकाश घाटपांडे's picture

9 Sep 2008 - 8:59 am | प्रकाश घाटपांडे

असो, एकंदरीत अग्रलेखाचा आणि काही प्रतिसादाचा सूर असा दिसतो आहे की डॉक्टर म्हणजे एकदम कंडम माणूस आणि त्यानी दिलेलं औषध रुग्णानं तपासून घेतलं नाही तर जणू काही त्या औषधाचा काही उपेगच होणार नाही!

असा सुर मला कोठेही जाणवला नाही. एकतर धनंजय चे लेख मला कमीतकमी दोनदा वाचावे लागतात. विषय आरोग्याचा त्यातुन धनंजय मूलतः डॉक्टर.

माझ्या मते हे अत्यंत चुकीचे आहे. ठीक आहे, आपले डॉक्टर आपल्याला कोणत्या ब्रँडनेमचे औषध देत आहेत, त्याचं बेसिक ड्रग काय, रोगाची इन्डिकेशन्स् काय, औषधाची कॉन्ट्रा-इन्डिकेशन्स् काय, डोसेजचं प्रमाण काय, साईड इफेक्टस् कोणते आहेत, इत्यादी प्राथमिक माहिती समजून घेणे किंवा विचारणे इतपत ठीक आहे. त्यामुळे आपल्या सामान्य ज्ञानात थोडीफार भर पडू शकेल


आमच ही हेच मत आहे.पण हे सुद्धा कुणी करत नाही. ती जागरुकता निर्माण व्हावी हाच तर अग्रलेखाचा विषय.
प्रकाश घाटपांडे

सहज's picture

9 Sep 2008 - 9:14 am | सहज

डॉक्टरवर अविश्वास, कंडम आहे असे अजिबात वाटले नाही. उलट पेशंटने देखील जितके जागरुक होता येईल तितके व्हावे असा सुर जाणवला.

शेवटी हे एक ज्ञान आहे. संगणक, मोबाईल फोन हे आपल्याला किती उशीरा कळले पण आज २ , ४ वर्षाची चिमुरडी पोरे मोबाईल हाताळायला शिकत आहेत. पण अजुनही काही जुने लोक फक्त कॉल घ्यायचे व करायचे बटण लक्षात ठेवतात. दर दोन चार महिन्यानी येणारे नवे मोबाईल मॉडेल कसे आहे त्याची चर्चा सर्व शालेय, कॉलेज विद्यार्थ्यात होत असते.

थोडेफार आरोग्याबद्दल, औषधवापराबद्दल अशीच जागरुकता, ज्ञान वाढावे ही अपेक्षा.

रामदास's picture

9 Sep 2008 - 10:01 am | रामदास

आपल्या लौकीकास साजेसा असा अग्रलेख झाला आहे.
काही मुद्दे पटले.काही पटूनही प्रॅक्टीकल नाहीत असे वाटले.विशेषेकरून भारतात ते प्रॅक्टीकल नाहीत असे वाटले.वैद्यकीय सल्ल्यावर सजग विश्वास ठेवणे आवश्यक आहे परंतू आमचेकडे एक गाव आणि एकुलता एक डॉ़क्टर अशी परीस्थीती आहे.त्यामुळे व्हेरीफाय करणे अगाऊपणा ह्या सदराखाली मोजला जातो.पूर्ण चौकशी करावे म्हटले तर डॉ़क्टरला राग येतो.तो हात राखून सल्ला देतो.
आयुर्वेदीक औषधात हेवी मेटलचे प्रमाण ही चिंतेची बाब आहे खरी.पण रोगी उरलेले ३६५ दिवस त्यापेक्षा जास्त प्रमाणात अन्नातून हेवी मेटल खात असतो.गुटख्यात हे प्रमाण जास्तीत जास्त आहे हे कळूनही लोकं गुटखा खातात. इतर दुष्परीणाम वेगळेच.
खाण्याच्या पदार्थात भारतात रंग वापरले जातात. ह्या रंगात शिसे पारा आर्सेनीक जस्तं यांचे प्रमाण भरपूर असते. लहान मुलांच्या औषधात सन सेट येलो नावाचा रंग वापरला जातो. बर्‍याच कंपन्यांमध्ये हे अंश चेक करण्याची व्यवस्था नाही.औषध आणि अन्न प्रशासन मॅनेज केले जाते.
आपण म्हणता ते खरे आहे की तन सांभाळताना आपण गंभीर विचार करत नाही.समस्या मुळात हीच आहे की आम्ही विचार करत नाही.
ह्या विषयावर आपले हे लिखाण पुरेसे वाटले नाही.एका मोठ्या लेखाची अपेक्षा आहे.

http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.

मनीषा's picture

9 Sep 2008 - 10:21 am | मनीषा

लेख ..
ट्रस्ट बट व्हेरिफाय.. हे सुद्धा पटले.
पण व्हेरिफाय कसे करायचे .. कितीही उच्च शिक्षित व्यक्ती असेल तरी त्याचे वैद्यकीय ज्ञान अल्प असते..
या साठी मला वाटते की आपल्याला काही आजार असेल तर न घाबरता त्याची संपूर्ण माही ती करुन घ्यावी .. आणि शक्यतो माहितीतल्या डॉ कडेच जावे..
औषधां बाबत सुद्धा तुमचे म्हणणे पटते .. पण त्या औषधांवर लिहिलेलेली माहीती वाचून त्याची योग्यता/अयोग्यता कळणे माझ्यासारख्या सामान्य रुग्णांसाठी अवघडच आहे.
माझ्या माहीतीत काही शंकेखोर व्यक्ती आहेत ज्या स्वतःला काही आजार झाला की वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जाउन सेकंड, थर्ड... इ. ओपिनियन घेतात आणि नंतर त्यांनाच नक्की कळत नाही कि यातले कुठले मत योग्य. आणि असा स्वताच्या आरोग्याचा घोळ घालून परत त्यांच्या ओळखीच्या कोणा रुग्णाला तेच करण्याचा सल्ला देतात.
मला माझा मुलगा लहान असताना असा अनुभव आला... त्याच्या नेहमीच्या बालरोगतज्ञां कडून औषधे आणल्यावर ...परत दुस-या डॉ कडे नेण्याचा सल्ला मिळायचा.
माझ्या बाबत सुद्धा हा अनुभव आला ... अगदी ऑपरेशन दोन दिवसांनी करायचे त्या साठी सगळ्या वैद्यकीय चाचण्या केलेल्या तरी दूस-या डॉ ला एकदा दाखवून ये... असा सल्ला मिळाला.. मला वाटते असे करणे घातक आहे. काही वेळा डॉ वर विश्वास ठेवावाच लागतो... आणि काही अपवाद वगळता बहूतेक डॉ हे आपल्या रुग्णांबद्दल जागरुक असतात .(माझ्या घरातील डॉ च्या उदाहरणावरुन तरी मला असेच वाटते)
आणि मला वाटते कि एकाच डॉ कडे नेहमी जाण्याचा फायदाच असतो कारण त्याला आपल्या आरोग्याची सर्व माहिती असते जी एखाद्या नविन डॉ ला अनेक चाचण्या करुन मिळवावी लागते .

लिखाळ's picture

9 Sep 2008 - 3:59 pm | लिखाळ

धनंजयराव,
लेख आवडला.

इतर सर्व गोष्टीत चिकित्सा करणारे आपण डॉक्टरच्या बाबतीत चिकित्सा करत नाही हे खरे. चिकित्सा तारतम्याने करावी हे सुद्धा खरेच. अगदी आई-वडिलांचे सांगणे सुद्धा आपण जसे आहे तसे अनेकदा स्विकारत नाही. तोच न्याय डॉक्टरला. गुगल आणि वैद्यकिय पुस्तके सहज उपल्ब्ध असताना ती सोय वापरणे चांगलेच. तसेच हे तत्व फक्त ऍलोपथीसाठी आहे असे नसून इतर चिकित्सा पद्धतींसाठी सुद्धा आहे असे आपण लेखात लिहिले आहेच. प्राणिक हिलींग, रेकी अश्या प्रकारच्या पद्धतींचा प्रयोग करणार्‍यांवर सुद्धा लोक प्रश्न न विचारता भरवसा ठेवतात तो अनेकदा डोळस असतो का असा प्रश्न पडतो. त्याही बाबतीत जागरुक असले पाहिजे हे योग्यच.

लेखाचा विषय आणि लेख आवडला.
--लिखाळ.

"ट्र्स्ट, बट वेरिफाय!" कळीचा मुद्दा.
इंजिनियरिंग किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात वेरिफाय करायची पद्धती खूप जुनी आहे. प्रोजेक्ट्साठी कोटेशन्स मागवणे, दर्जा आणि किंमत तपासून बघणे. पटेल तिथेच काम देणे हे चालते/जमते/तसेच करायचे असते. एखादे काम पटले नाही तर पुढच्या वेळी काम दुसरीकडे देता येते.
पण त्या इतर ठिकाणी आणि तब्बेतीच्या बाबतीत मूलभूत फरक असा आहे की डॉक्टरबरोबर थेट गाठ आपल्या जिवाशी असते. डॉक्टर-पेशंट हे नाते विक्रेता-ग्राहक इतके व्यवाहारिक होऊ शकतच नाही.
भावना, विश्वास, अनुभव, श्रद्धा अशा अमूर्त गोष्टींचा संबंध असल्याने तुम्ही डॉक्टरला चॅलेंज कसं करणार हा मोठा प्रश्न आहे. बरं तुम्ही चॅलेंज कराल हो, पण डॉ. ऐकून घेईल का? तो म्हणणार तुम्ही डॉ. का मी? मग इतके सल्ले/प्रश्न ही काय भानगड आहे? तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही दुसरीकडे जाऊ शकता! सामान्य माणसाने काय करायचे? विश्वास ठेवणे भाग असते. प्रश्न तब्बेतीचा आहे. बरं दरवेळी वेरिफाय काय आणि कसं करणार? एम.आर.आय., कॅट स्कॅन अशा एकदम मोठमोठ्या टेस्ट्स सांगितल्या तर खर्च फार होतोय असे वाटल्यास सेकंड ओपिनियन घेऊ पण त्यापलीकडे काय करणार?
औषधांना तर चॅलेंज करणे वेडेपणाच ठरेल.

माझ्या वैयक्तिक अनुभवात मी असे करतो. आपले शरीर १००% वेळा आपल्याला सूचना देते. तब्बेत बरी नसेल तर लगेच जाणीव होतेच. फार वेळ न घालवता ताबडतोब उपचार सुरु केल्यास माझा मार्ग हा घरगुती, होमियोपथी/आयुर्वेदिक आणि शेवटी अगदीच गरज भासली तर अलोपॅथी असा आहे. मला अमेरिकेतल्या ६ वर्षांच्या वास्तव्यात फक्त ५ ते ६ वेळाच माझ्यासाठी डॉ. कडे जावे लागले आहे. त्यातल्या दोनवेळा त्यांनी प्रतिजैवके दिली (त्यातल्या एकदा मी ती घेतली नाहीत;)). एरवी साध्या औषधांनी बरा झालो. औषध न घेता/ साधेच (कमी तीव्रतेचे) घेऊन चालेल का हे मी डॉ. ना विचारतो. (सुदैवाने माझे इथले डॉ.सुद्धा भारतीयच आहेत आणि दिसला पेशंट की ठोक औषधे असे ते करत नाहीत/नसावेत. त्यांना मी घरगुती आणि आयुर्वेदिक औषधे घेतो हे सांगितलेले आहे!)

आयुर्वेदिक औषधात पारा वापरतात त्यावर बरीच ओरड ऐकू येते. ह्यातला बराच ओरडा (खरेतर मी कांगावा म्हणेन) हा बहुराष्ट्रीय औषध कं.चे राजकारण आहे असा माझा विश्वास आहे! पारा त्यावर विशिष्ठ प्रक्रिया करुन औषधांमधे वर्षानुवर्षे वापरात आहे आणि त्याचे तीव्र दुष्परिणाम असते तर लोकांवर दिसले असते. ऍलोपथी औषधांबरोबर येणार्‍या बारीक टाईपच्या पेपरवरची साईडइफेक्ट्सची यादी पाहिली की रोग बरा पण औषध आवर असे म्हणावेसे वाटते! (हे माझे वैयक्तिक मत आहे पण अतिशय तीव्र आहे.) श्री.बालाजी तांबे ह्यांनी ह्यासंबंधी सकाळच्या आरोग्यविषयक पुरवणीमध्ये आयुर्वेदिक औषधांबद्दल मागे लेख लिहिला होता. (मला सापडला तर दुवा देतो).

चतुरंग

होय. असे दुष्परिणाम दिसलेले आहे.

शिसे दीर्घकालिक-विषबाधा झाल्याची उदाहरणे बरीच आहेत. (मला वाटते वेगवेगळ्या देशांत ५० एक केसेसचे अहवाल उपलब्ध आहेत. खाली बघावे) परंतु हा विदा संकलित करण्याचा कायदा अमेरिकेत (आणि भारतात) नाही. ही औषधे औषधे अन्न आणि औषध प्रशासनाच्या अख्त्यारीतली नाहीत, आणि औषधांबद्दलचे सक्तीचे सर्वेक्षण करण्याचे कायदे आयुर्वेदिक औषधांना लागू नाहीत.

शिस्याच्या दीर्घकालिक विषबाधेची लक्षणे निदान करण्यास बर्‍यापैकी कठिण असतात. (साधारणपणे सर्व प्रकारच्या जड-धातू दीर्घकालिक विषबाधेची लक्षणे निदान करण्यास कठिण असतात.) त्यामुळे असे सर्वेक्षण मुद्दामून केल्याशिवाय फक्त कमालीची तीव्र विषबाधा झाली, तरच ती "आपोआप" कोणाच्या लक्षात येईल.

"पाश्चिमात्त्य" औषधांच्या अप-परिणामांची (साइड-इफेक्ट किंवा ऍड्व्हर्स इफेक्टची) यादी वाचताना गरगरायला होते - तुमच्यासारखा अनुभव कित्येकांना आलेला आहे. पण ती यादी द्यायचा कायदा फक्त पाश्चिमात्त्य औषधांसाठीच लागू आहे. दुसर्‍या कुठल्याही पद्धतीत तशी यादी द्यायची कायदेशीर सक्ती नसते, तशा अप-परिणामांचे सर्वेक्षण करायची सक्ती नसते. कधीकधी एखादे औषध योगायोगाने दोन वेगवेगळ्या औषधपद्धतीत वापरले जाते, तेव्हा तुलनात्मक विचार करता येतो. उदाहरणार्थ, सर्पगंधेचा अर्क आयुर्वेदातही वापरतात, आणि ऍलोपॅथीतही. पण त्याच्या अप-परिणामांची यादी केवळ ऍलोपॅथीच्या बाटलीबरोबरच येईल. पण बाटलीचे लेबल बदलले (आयुर्वेदिक रसशाळेचे लेबल लावले) म्हणून सर्पगंधेचे अप-परिणाम होणार नाहीत, असे मानणे धाडसाचे होईल.

आयुर्वेदिक औषधांमधून शिसे दीर्घकालिक-विषबाधा -- काही अहवालांचे दुवे :
१. Centers of Disease Control and Prevention. Lead poisoning associated with use of Ayurvedic medications—five states, 2000-2003. MMWR Morb Mortal Wkly Rep. 2004;53:582-584.
२. Centers of Disease Control and Prevention. Lead poisoning: associated death from Asian Indian folk remedies—Florida. MMWR Morb Mortal Wkly Rep. 1984;33:638,643-645.
३. Tait PA, Vora A, James S, Fitzgerald DJ, Pester BA. Severe congenital lead poisoning in a preterm infant due to a herbal remedy. Med J Aust. 2002;177:193-195.
४. Moore C, Adler R. Herbal vitamins: lead toxicity and developmental delay. Pediatrics. 2000;106:600-602.
५. Ernst E. Heavy metals in traditional Indian remedies. Eur J Clin Pharmacol. 2002;57:891-896.
६. Lecours S, Osterman J, Lacasse Y, Melnychuk D, Gelinas J. Environmental lead poisoning in three Montreal women of Asian Indian origin. Can Dis Wkly Rep. 1989;15:177-179.
७. Ibrahim AS, Latif AH. Adult lead poisoning from a herbal medicine. Saudi Med J. 2002;23:591-593.
८. Traub SJ, Hoffman RS, Nelson LS. Lead toxicity due to use of an Ayurvedic compound [abstract]. J Toxicol Clin Toxicol. 2002;40:322.
९. Weide R, Engelhart S, Farber H, Kaufmann F, Heymanns J, Koppler H. Severe lead poisoning due to Ayurvedic Indian plant medicine. Dtsch Med Wochenschr. 2003;128:2418-2420.
१०. Spriewald BM, Rascu A, Schaller KH, Angerer J, Kalden JR, Harrer T. Lead induced anaemia due to traditional Indian medicine: a case report. Occup Environ Med. 1999;56:282-283.
११. Prpic-Majic D, Pizent A, Jurasovic J, Pongracic J, Restek-Samarzija N. Lead poisoning associated with the use of Ayurvedic metal-mineral tonics. J Toxicol Clin Toxicol. 1996;34:417-423.
१२. McElvaine MD, Harder EM, Johnson L, Baer RD, Satzger RD. Lead poisoning from the use of Indian folk medicines. JAMA. 1990;264:2212-2213.
१३. Aslam M, Davis SS, Healy MA. Heavy metals in some Asian medicines and cosmetics. Public Health. 1979;93:274-284.

त्यात असे दिसते की बर्‍याच वेळा "आयुर्वेदिक औषध = हर्बल रेमेडी, प्लांट रेमेडी, फोक मेडिसिन" ह्या गैरसमीकरणातून वाटेल ती 'औषधे'(?) खपवली जातात. घेतलेले औषध/द्रव्य आयुर्वेदिकच आहे की नाही ह्याचीच खात्री नसेल तर ह्यात मुळातच योग्य औषध/उपचार हे न वापरले जाताच बदनाम होतात.
अर्थात आयुर्वेदिक औषधेही योग्यप्रकारे बनवली नसतील तर निश्चितच वाईट परिणाम होऊ शकतील.
आयुर्वेदिक औषध निर्मिती प्रक्रिया त्यातल्या घटकांची शुद्धता, योग्यता हे निश्चित करणारी अन्न आणि औषध प्रशासन प्रभावी करणे, त्यांच्या परिणामकक्षांत वाढ करणे, जबर दंड आणि औषधनिर्मिती परवाना रद्द करण्याची शिक्षा असणे ह्या प्रकाराने गैरप्रकारांना आळा बसू शकेल असे वाटते.

तुम्ही सर्पगंधेचे उदाहरण दिले आहे. ऍलोपॅथीत असलेले दुषपरिणाम हे सर्पगंधा ह्या घटकाने आहेत, कोणत्या दुसर्‍या घटकाने आहेत की सर्पगंधा+दुसरा/रे घटक ह्यांच्या एकत्रित येण्याने झालेले आहेत? ह्यात दोषी कोण हे ठरवणे अवघड काम आहे.

चतुरंग

प्रकाश घाटपांडे's picture

11 Sep 2008 - 9:37 am | प्रकाश घाटपांडे

ट्र्स्ट बट व्हेरिफाय ही गोष्ट भारतात विशेष करुन ग्रामीण वा निमशहरी भागात अवघड आहे. विश्वास ठेवू नका तर मरा हा दुसरा भयंकर पर्याय उपलब्ध असतो. अशावेळी चिकित्सेची मनोभुमिका निर्माणच होत नाही. जिथ जगण्या पेक्षा मरण स्वस्त आहे तिथ दुसर काय होणार? श्रद्धेवर बरीच माणसे जगतात. भोंदु डॉक्टर्स ही समस्या नसुन योग्य पद्धतीने हाताळला तर उपाय आहे. कंपाउंडरचे डॉक्टर झालेल्यांच्या पाठीशी खुप अनुभव असतो. जिथे 'अधिकृत ' डॉक्टर्स जायला तयार होत नाहीत अशा दुर्गम भागात हेच उपयोगाला येतात. बेअर फुट डॉक्टर्स ची गरज आहे. डॉ अभय बंग यांनी अशा दाया तयार करुन अनेक बालमृत्यु वाचवले आहेत.
प्रकाश घाटपांडे

यशोधरा's picture

9 Sep 2008 - 10:58 pm | यशोधरा

संपादकीय आवडले. विश्वास ठेवण्याआधी पारखलेले उत्तमच.

ऋषिकेश's picture

10 Sep 2008 - 10:18 am | ऋषिकेश

छान अग्रलेख. संपादक मंडळींनी मिपाला आरोग्यपूर्ण करायचा विडा उचलेला दिसतोय ;)
टेस्ट बट व्हेरीफाय हे पटले पण दरवेळी शक्य होणार नहि हे ही खरेच.
मी वैयक्तीकरित्या डॉ. कडे जायचे टाळतो. आजारी पडतो आहे असे वाटताच घरगुती औषधे घेतो. ८०% वेळा ठणठणीत होतो :)
उरलेल्या २०% वेळा मात्र माझ्या नेहमीच्या डॉ. वर पूर्णपणे विश्वास ठेवतो. अजून तरी विश्वासघात झालेला नाहि. :)

परंतू एखाद्या नव्या डॉ. कडे गेलो तर मात्र चौकस रहावे हे पटले.

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

सर्किट's picture

10 Sep 2008 - 9:59 pm | सर्किट (not verified)

आमच्या वर्गातली ढं पोरं डाक्टर झालेली पाहून, आमच्या त्या व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोण बदलला आहे. त्यामुळे "व्हेरिफाय, व्हेरिफाय, व्हेरिफाय, डोण्ट एव्हर ट्रस्ट", हे आमचे बोधवाक्य आहे.

वेब एम डी जिंदाबाद !

-- सर्किट

अण्णा हजारे's picture

11 Sep 2008 - 7:45 pm | अण्णा हजारे

आमच्या वर्गातली ढं पोरं डाक्टर झालेली पाहून, आमच्या त्या व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोण बदलला आहे.

ह्याच बरोबर ती कशी झाली हे बघून तर सर्किट म्हणतात त्या प्रमाणे "व्हेरिफाय, व्हेरिफाय, व्हेरिफाय, डोण्ट एव्हर ट्रस्ट" हा योग्य पवित्रा!!!

राळेगणचा अण्णा

चित्रा's picture

11 Sep 2008 - 1:13 am | चित्रा

असे समीकरण पूर्वी माझ्या घरातील लोक करीत. आता तसे होत नाही याचे कारण कधी अगदी ओळखीच्या डॉक्टरांच्या बदललेल्या प्रॅक्टिसचे आलेले अनुभव. हल्ली सावध होऊन एखादे औषध घेण्याआधी स्वत:ची खात्री होईपर्यंत डॉक्टरांना प्रश्न विचारावे, एवढे मी करते. आता ती खात्री जवळच्या एखाद्या डॉक्टरबद्दल पटकन होईल तशी कोणी सांगितले म्हणून जावे लागलेल्या डॉक्टरच्या बाबतीत होत नाही. म्हणजे ओळखीच्या डॉक्टरसंबंधाने थोडा विश्वासाचा भाग येतो. पण तो अगदीच वृथा नसावा एवढी काळजी घेतली पाहिजे. ट्रस्ट बट व्हेरिफाय हे सूत्र लक्षात ठेवण्यासारखे आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Sep 2008 - 7:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अग्रलेख आवडला.

डॉक्टराकडे, वैद्याकडे जादूगार म्हणून न बघता समुपदेशक म्हणून बघावे.

लाख मोलाचे बोललात !!!

लेखातील कल्पनांबाबत सारासार विचार करून प्रतिसाद देणार्‍या सर्वांना मनापासून धन्यवाद. सहज आणि अमेय हसमनीस यांनी ओळखलेल्या इंग्रजी कल्पना योग आहेत. हा लेख सबलीकरणा(एम्पावरमेंट)बद्दल आहे. आणि ही प्रमाणाधिष्ठिक वैद्यकाची (एव्हिडन्स-बेस्ड मेडिसिनची) ओळख आहे. एव्हिडेन्स-बेस्ड मेडिसिन वगैरे काही भन्नाट कल्पना नाहीत - सामान्य मराठीत उच्चारू शकणार्‍या आपल्या नेहमीच्या विचारातल्याच कल्पना आहेत.

कित्येकांना लेखातील बहुतेक मुद्दे भावले. बाकीच्यांनी काही मुद्द्यांमधली कमतरता सांगितली, किंवा एखादा मुद्दा अधिक स्पष्ट करून सांगितला. मुद्दे न पटणार्‍यांपैकी दोन अगदी विसंवादी गट पडतात. वाचकांचा एक गट म्हणतो की विश्वास ठेवल्याशिवाय गत्यंतर नाही. (पैकी सविस्तर प्रतिसाद तात्यांचा) दुसरा गट म्हणतो की विश्वास ठेवण्यासारखे काही राहिलेच नाही (पैकी सविस्तर प्रतिसाद विसुनाना यांचा). ट्रस्टनेच भागते, आणि ट्रस्ट शक्यच नाही या टोकांच्या मतांतून "ट्रस्ट बट व्हेरिफाय" वाक्याबद्दल एकच निष्कर्ष काढला गेला की हे वाक्य व्यवहार्य नाही.

सुरुवातीलाच सांगितले आहे, की विषय सबलीकरणाबद्दल आहे. म्हणजे जे सबल नाहीत, त्यांनी सबल व्हावे. जे लोक आताच सबल आहेत, त्यांना काही बदल करण्याची आवश्यकता नाही. कोणी आधीच सबल आहे की नाही, हे कसे कळते? सबल व्यक्ती संतुष्ट असते, कमीतकमी आपल्या आवडीवेगळे काही झाल्याबद्दल तक्रार करत नाही. तक्रार केली तर सबल व्यक्ती काव्यात्मक आनंद म्हणून तक्रार करते. कारण व्यक्ती खरोखर सबल असती तर आवडीविरुद्ध काही होत असेल तर बळ वापरून बदल करून घेईल. पाऊस पडणे थांबवता येत नाही, तरी छत्री घेतल्याचे त्या व्यक्तीचे समाधान असते. छत्री न घेतली असली, सबल व्यक्ती भिजली तर जबाबदारी स्वतःची म्हणून जाणते. कोणी काही वेगळे करावे, अशी तक्रार करत नाही.

प्रमाणाधिष्ठित निर्णय हे सबल निर्णय असतात. ज्या गोष्टी स्वतःच्या हिमतीवर बदलल्या जाऊ शकतात, त्यांच्यापैकी सप्रमाण पर्याय निवडला जातो. जे निर्णय स्वतःच्या हिमतीवर बदलले जाऊ शकत नाहीत, त्या बाबतीत भविष्याची अशाश्वती कितपत आहे, याबाबत प्रामाणिक अपेक्षा असतील. प्रामाणिक अपेक्षा, यासुद्धा सबल करणार्‍याच आहेत.

तात्या विश्वास+नशीब जोडीत संतुष्ट आहेत, म्हणजे ते सबल आहेत. याउप्पर सबलीकरणाची त्यांना गरज नाही. त्यांचे सर्व मुद्दे मग त्यांचे म्हणून बिनाशर्त मान्य आहेत. तरी सबल नसलेल्या कोण्या व्यक्तीने त्यांचे मुद्दे सांगितले तर... म्हणून त्यांची चर्चा करूया. पिवळा डांबिस यांना प्रतिसाद देताना तात्या "पण ती तुम्हाला निर्धोक असल्याचे प्रूव्ह करण्यासाठी अनेक चाचण्यातून जातात हे विसरू नका..... किंबहुना त्या सर्व चाचण्या या इतर औषधांकडून अपेक्षित करा......" या मुद्द्यांना सहमती दर्शवतात. याच चाचण्या करायच्या पद्धतीला मी तपास="व्हेरिफाय" शब्द वापरला. तेव्हा तात्या "तिथे त्या के ई एम च्या गर्दीतली ती अशिक्षित कोळीण बॅक्ट्रिम डी एस ची गोळी काय कप्पाळ व्हेरीफाय करणार?!" असे म्हणतात तेव्हा "तपास करू नये" असा सार्वत्रिक मुद्दा मांडत नसावेत, असा माझा कयास आहे.

तपास करणे व्यवहार्य नसते याबद्दल ते दोन परिस्थितींबद्दल बोलतात, ते पटण्यासारखे आहे - (१) बेशुद्धावस्था आणि (२) घाईगर्दीत वेळेचा अभाव (के.ई.एम.मधील गर्दी).
(१) बेशुद्धावस्थेचा प्रथम मुद्दा इतका टोकाचा आहे, की त्यावरून सामान्य वागणुकीचे नियम शक्यतोवर काढू नयेत. म्हणजे योग्य ठिकाण बघून विजारीची बटणे सोडूनच धार सुरू करावी, असा सामान्य वागणुकीचा सल्ला लोक देतात. बेशुद्धावस्थेत विजारीची बटणेही सोडवता येत नाही, आणि जागा योग्य आहे की नाही तेही बघता येत नाही. अशा वेळी विजार ओली झाली, तरी व्यक्तीने सामाजिक जबाबदारी पाळली नाही, वैयक्तिक स्वच्छता पाळली नाही असे म्हणता येत नाही. पण म्हणून काही शुद्धीवर असतानाही विजार ओली केली तर ते शहाणपणाचे वर्तन ठरत नाही. त्याच प्रमाणे मी पूर्णपणे मानतो, की बेशुद्धावस्थेत काय इलाज होतो, त्याची जबाबदारी रुग्णाची नसते - म्हणून काही शुद्धीतही नसते असे म्हणू नये.
(२) घाईगर्दीत वेळेचा अभाव असतो, हा मात्र टोकाचा मुद्दा नाही. रामदासही वेगळ्या तर्हेने हा मुद्दा उपस्थित करतात. "आमचेकडे एक गाव आणि एकुलता एक डॉ़क्टर अशी परीस्थीती आहे." (अवांतर : "आमचेकडे" असे परकेपणाने म्हणू नका हो! कुठल्यातरी पंचक्रोशीतला एकुलता एक डॉक्टर मीही एके वेळी होतो...) जेव्हा तपास करण्याची सामग्री नसते, किंवा तपास करून-करूनही निवडण्यासाठी एकच पर्याय असतो, तेव्हा तपास करणे अव्यवहार्य आहे, असे मत विचारपूर्ण आहे. या बाबतीत सबलीकरणामध्ये "योग्य अपेक्षा करणे" हा भाग येतो. बाहेर पडताना आकाशात पावसाचे ढग आहेत की नाही हे बघणे कित्येकदा फायद्याचे असते. घरी असलो तर छत्री घेण्याचा पर्याय असतो. कुठे अडनाडी ठिकाणी असतो तर तो पर्याय नसतो. तरी सबलीकरण म्हणजे पाऊस थांबवने नव्हे. पण आपण पावसात बहुधा भिजू अशी सुयोग्य अपेक्षा असली तर आपल्या वाटेत कुठे आडोसा आहे हे विचारचक्र सुरू होते. घरी गेल्यावर अंग आणि कपडे सुकवण्यासाठी काय उपाययोजना करावी लागेल, त्याबद्दल आधीच विचार करता येतो. गर्दीत डॉक्टराला आपल्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळणार नाही, के.ई.एम.मध्ये पर्याप्त व्यवस्था नाही, हे तपासून ठाऊक असले, तर आपले निदान बहुधा ठीक होणार नाही, उद्या अपल्याला बाजारात जाता येणार नाही, मुलांच्या जेवणाची काही सोय करावी लागेल, वगैरे, उपयोगी विचार कोळीण करेल. गावात एकुलता एक डॉक्टर असला तर तो मुजोर असतो, ही कल्पना बरोबर नाही. काहीतरी गल्लत केल्यानंतर गावातल्या लोकांनी डॉक्टराची धुलाई केल्याच्या (दंत)कथा सर्वच डॉक्टरांनी ऐकलेल्या असतात. गावाकडे काहीच केले जाऊ शकत नाही हा विचार योग्य नाही. माझे मित्र डॉक्टर माधव गोयल यांनी उत्तरप्रदेशातील अनेक गावांत एक वैद्यक-लोकशिक्षणाचा कार्यक्रम राबवला. गावातल्या लोकांना पंचायतीत, गावसभा बोलावून वगैरे "सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्राची काय आरोग्य सेवा पुरवायची जबाबदारी आहे" याबद्दल माहिती दिली. ज्या गावांत त्यांनी हे शिक्षण पुरवले, त्या गावांत मग दाया खरोखरच गरोदर स्त्रियांना घरी जाऊन अधिक प्रमाणात तपासू लागल्या... त्यांच्या या कामाबद्दल संक्षिप्त माहिती मी अन्यत्र लिहिली आहे (दुवा) डॉ. गोयल यांच्यापाशी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचार्यांना काम करण्यास उद्युक्त करायची काहीच शक्ती नव्हती. गावकर्यांना "अमुक सेवा मिळणे आहे" असे कळले, तेव्हा गावकर्‍यांनीच कर्मचार्‍यांना धारेवर धरले म्हणून फरक पडू शकला. आरोग्याचे नंदनवन झाले नाही, म्हणून काही जो थोडा फरक पडला तोही आव्हेरू नये.

तात्या पुढे एक वाक्य लिहितात, ते मला आश्चर्यकारक वाटले

"बरं मला एक सांगा, समजा, एखाद्या रुग्णाला बॅक्टेरियल डायरिया आहे असं डॉक्टरनं निदान केलं आणि जर त्या डॉक्टरने त्यावर नॉर्फ्लॉक्स टीझेड दिली तर तुम्ही त्याने नॉर्फ्लॉक्स टीझेड ऐवजी मेट्रोनिडॅझोल का नाही दिली हे त्याच्याशी व्हेरिफाय करणार किंवा हुज्जत घालणार??"

(इथे "हुज्जत घालण्याचा" उल्लेख कसा आला हे माहीत नाही, पण तो काव्यात्मक वापर आहे, असे मानूया. पण "बॅक्टेरियल", "डायरिया", "नॉर्फ्लॉक्स टीझेड", "मेट्रोनिडॅझोल" हे तांत्रिक शब्द माहीत नसले म्हणजे रुग्णाला कळीची "'कळ" कळत नाही असे थोडेच. तांत्रिक शब्दांची नुसती फेकाफेक करणार्या तज्ञांना कुठेतरी "ढुड्ढाचार्य" म्हणून तात्यांनी जागा दाखवली आहे, तोच स्वतंत्र बाणा रुग्णाने दाखवावा. "वर्तमानकालवाचक धातुसाधित" शब्द माहीत नाही म्हणून मराठी बोलता येत नाही, असे थोडेच. डायरियाच्या विविध प्रकाराचे तांत्रिक शब्द माहीत नाही म्हणून रुग्णाला कुंथता येत नाही, असे थोडेच. आतडी पिळून कोणाची येत आहेत - रुग्णाची की "नॉर्फ्लॉक्स" शब्द माहीत असणार्या तज्ञाची? संडासावर बसून रक्त पडताना कोणाला अनुभवायचे आहे - रुग्णाला की "बॅक्टेरियल" शब्दाचा अर्थ ठाऊक असणार्याला? औषधामुळे तोंड तुरट होऊन अन्नावरची वासना कोणाची उडणार आहे - रुग्णाची की मेट्रोनिडॅझोल शब्द ठाऊक असणार्याची?
तांत्रिक शब्द, आणि तांत्रिक कल्पना या शास्त्र शिकताना तज्ञाला फार उपयोगी पडतात, मग ते शास्त्र वैद्यक असो, की व्याकरण असो, की हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत. पण त्या शास्त्राचा उपयोग करताना - म्हणजे आरोग्यदायी व्यवहार करताना, मराठी बोलताना, गाणे गाताना, त्या तांत्रिक शब्दांची अडगळ कधीच थेट गरजेची नसते.

तात्या म्हणतात की :

..."त्यांनी दिलेले औषध घेऊन मला पूर्ण बरे वाटणार आहे!" ही मानसिकतादेखील माझ्या मते अत्यंत आवश्यक आहे!

येथे तात्या "डोन्ट ट्रस्ट, अँड व्हेरिफाय" असे म्हणणार्या कोणाविरुद्ध मुद्दा सांगत आहेत, तो ठीकच आहे. माझा मुद्दा "ट्रस्ट बट व्हेरिफाय" असा असल्यामुळे त्यांची "देखील-आवश्यक-मानसिकता" मूळ लेखातही स्वीकरलेली आहे, असे वाचकाने ओळखावे.

-------
ऋषिकेश यांनी थोडक्यात प्रतिसाद दिला आहे, पण अन्यत्र त्यांनी सविस्तर चर्चा केली आहे (दुवा)
येथे ते म्हणतात :

उरलेल्या २०% वेळा मात्र माझ्या नेहमीच्या डॉ. वर पूर्णपणे विश्वास ठेवतो. अजून तरी विश्वासघात झालेला नाहि.

अन्यत्र :

असे रोग जे अजिबात जीवघेणे नाहित (एका मर्यादेपर्यंत अर्थात) त्यांचं काय?.... पुर्वी एका डोसात बर्‍या होणार्‍या गोष्टींसाठी आता आठवडा जाऊ लागला आहे. हल्ली डॉक्टर (साईड इफेक्ट टाळण्यासाठी आणि काहि प्रमाणात व्यावसायिक दृष्टीकोनातून) कमी तिव्रतेची औषधे देतात त्यामुळे असेल का?

हीच उत्तम साशंकता आहे - यातच ऋषिकेश स्वत:चे सबलीकरण करत आहेत. याबद्दल ऋषिकेश अधिक ज्ञान मिळवतील, आणि त्यांच्या डॉक्टराला सांगतील - "मला वैयक्तिकरीत्या अमुक साईड इफेक्ट मान्य आहे, मला पूर्वीचे डॉक्टर देत तेच औषध द्या" - किंवा "जो साईड इफेक्ट टाळला जात आहे, तो बराच त्रासदायक आहे, त्यामुळे एका दिवसात बरा नाही झालो तर बेहत्तर - एक आठवडा का लागेना..." मग जो काही उपचार ऋषिकेश घेतील, तो स्वतःच्या परिस्थितीला सर्वात अनुरूप असा घेतील. डॉक्टराने ऋषिकेशसाठी अयोग्य निर्णय घेतला का - ही शंका खात राहाणार नाही.
(विशेष - ऋषिकेश यांचे वरील वाक्य मी केवळ उदाहरणासाठी घेतले आहे. त्यांच्या वर्णनावरून पूर्वी एका दिवसात बरा होणारा रोग, आणि आज आठवडा लागणारा रोग हे वेगवेगळे रोग असावेत, अस माझा कयास आहे. ते विचारचक्र ऋषिकेश चालवतील तेव्हा पूर्वीचा-आजचा रोग एकच की वेगवेगळे याचा निर्णय ते करतीलच - उदाहरणासाठी तो एकच रोग आहे, असे मानले आहे.)

विसोबा खेचर's picture

13 Sep 2008 - 9:02 am | विसोबा खेचर

पिवळा डांबिस यांना प्रतिसाद देताना तात्या "पण ती तुम्हाला निर्धोक असल्याचे प्रूव्ह करण्यासाठी अनेक चाचण्यातून जातात हे विसरू नका..... किंबहुना त्या सर्व चाचण्या या इतर औषधांकडून अपेक्षित करा......" या मुद्द्यांना सहमती दर्शवतात. याच चाचण्या करायच्या पद्धतीला मी तपास="व्हेरिफाय" शब्द वापरला.

अहो पण हे तपास शास्त्रज्ञांनी करायचे असतात आणि ते तो करतातच. संबंधित रुग्ण सदर तपास कसा काय करू शकणार हा माझा मुद्दा होता.

तेव्हा तात्या "तिथे त्या के ई एम च्या गर्दीतली ती अशिक्षित कोळीण बॅक्ट्रिम डी एस ची गोळी काय कप्पाळ व्हेरीफाय करणार?!" असे म्हणतात तेव्हा "तपास करू नये" असा सार्वत्रिक मुद्दा मांडत नसावेत, असा माझा कयास आहे.

सार्वत्रिक मुद्दा नक्कीच नाही त्यामुळे आपला कयास बरोबर आहे. आणि अहो शास्त्रज्ञच कशाला, रॅनिटिडाईन १५० हे ऍसिडिटीचे औषध आहे हा तपास एकवेळ माझ्यासारख्या आंतरजाल उपलब्ध असणार्‍या काही मंडळींना करताही येतो आणि तो मी करतोही! परंतु एखाद्या अशिक्षित को़ळणीला हा तपास करता येणे शक्य नाही आणि म्हणूनच ती व्हेरिफाय न करता केवळ ट्रस्ट ठेवून ती गोळी घेते आणि बरीही होते हा माझा मुद्दा होता. हां, आता तिला केवळ एखादी करपट ढेकर आली तर डायजिनची गोळी (स-दु-सं) द्यायची, की रॅनिटिडाईन १५० ची गोळी (स-सं) द्यायची की एकदम ओमेझ द्यायची हे नीटपणे ठरवू शकणारा डॉक्टर तिला मिळणे हा झाला तिच्या नशीबाचा भाग! :)

पण म्हणून काही शुद्धीवर असतानाही विजार ओली केली तर ते शहाणपणाचे वर्तन ठरत नाही.

शब्दश: विजार ओली करण्याच्या बाबतीत हे ठिकच आहे परंतु वर सांगितल्याप्रमाणे अशिक्षित जनता जेव्हा शुद्धीत असतांनाही एखादे औषध व्हेरिफाय करू शकत नाही आणि तरी ते औषध घेते म्हणजे ती नको तिथे विजार ओली करते आणि म्हणूनच तिचे वर्तन शहाणपणाचे ठरत नाही असे आपल्याला म्हणायचे नसावे असे धरून चालतो! :)

असो,

धन्याशेठ, खुलाश्याबद्दल धन्यवाद...

आपला,
(ऍस्प्रो, ऍनालजिन देणारा डॉक्टर!) डॉ तात्या अभ्यंकर. :)

विनायक प्रभू's picture

13 Sep 2008 - 8:19 am | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
सात वर्ष दिवस रात्र आरोग्य क्षेत्रात काम करुन मी एका निर्णयाप्रत पोहोचलेलो आहे. तुम्ही आजारी पड्ल्यानंतर तुम्हाला बरे करणारा डॉक्टर मिळ्णे हा दैवी योगायोग असतो.
विसोबांशी सहमत. अल्ला,येशु,क्रुष्ण मालिक- बाकी सब झूठ.
वि.प्र.

यातील अत्यंत थोडक्यात सांगणारे सर्किट :

त्यामुळे "व्हेरिफाय, व्हेरिफाय, व्हेरिफाय, डोण्ट एव्हर ट्रस्ट"

माझ्या मते असा आपला प्रत्यक्षात व्यवहार नसतो. सामान्यपणे तापास करण्यासाठी आपल्यापाशी मर्यादित वेळ असतो, त्यापुढे कार्य करणे आवश्यक असते. जमेल तितका तपास (पण पूर्ण खात्री होईपर्यंत तपास नव्हे) केल्यानंतर जे कार्य केले जाते, ते काही प्रमाणात ट्रस्ट वर असते. तो किचकट तर्क सोडा.

"डोन्ट ट्रस्ट" मध्ये संबंध येणार्‍या व्यक्तींमध्ये वैमनस्य जाणवते. असे वैमनस्य बहुधा कार्यसिद्धीत आडथळा बनू शकेल. येथे समुपदेशकाकडून ज्या मैत्रीपूर्ण तर्‍हेने माहिती काढली जाते, त्याला मी "तपास" म्हटले आहे.

विसुनाना यांच्याशी व्यनिपत्रव्यवहार झालेला आहे. फक्त एक-दोन मुद्दे येथे घेत आहे. विसुनानांचा वैद्यकीय सेवेबद्दल अनुभव इतका वाईट आहे, की वैद्यकसेवेतले लोक रुग्णाचे शत्रू आहेत की नाहीत अशी शंका त्यांच्यात उत्पन्न झाली आहे. कुठल्याही व्यवसायातले लोक स्वतःच्या पोटापाण्याची सोय बघतात, काही आर्थिक मिळकत करू इच्छितात, यात काही शत्रुत्व मानता येत नाही. रुग्णास रोगमुक्ती आणि बदल्यात डॉक्टराला आर्थिक मिळकत असा हा बाजार आहे - तत्त्वतः यात दोघांचा फायदा आहे. त्यामुळे दुसर्‍याची हानी करून फायदा करून घेणे आवश्यक नसावे.

ज्या (प्रगत) देशांमध्ये वैद्यकविमा (हेल्थ इन्सुरन्स), औषध कंपन्या, वैद्यकीय संशोधक आणि मोठाली इस्पितळे यांचे एक पक्के मायाजाल निर्माण झाले आहे तिथे डॉक्टर आपल्यावर काय उपचार करतो त्याची काळजी/चिकित्सा बहुसंख्य जनता करू शकत असेल असे वाटत नाही. एकदा एफ डी ए अथवा तत्सम शासकीय संघटनेने मान्यता दिली म्हटल्यावर ते औषध अथवा ती चिकित्सा/उपचार पद्धती /औषध पूर्ण निर्दोष आणि रामबाण आहे असे सर्रास मानले जाते. तो अंधविश्वास इतका आहे की प्रत्यक्ष डॉक्टरही त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतात. त्यातूनच नंतर 'व्हायॉक्स' घडतात.

यातील काही निष्कर्ष पटण्यासारखे नाही. व्हायॉक्स आधी मान्यता पावूनही संशोधक आणि एफ डी ए त्यावर पाळत ठेवून होते. व्हायॉक्स घेणार्‍यांमध्ये काही अत्यल्प टक्केवारीत दुष्परिणाम झाले. "रामबाण आहे असे सर्रास" मानत असते तर हा सूक्ष्म धोका लक्षात आला नसता. पोलिसांनी दरवडेखोराला पकडले, तर त्याचा असा अर्थ नाही होत की पोलीस-चोर मिळून एक पक्के मायाजाल आहे. प्रत्यक्ष डॉक्टर "रामबाण" म्हणून विश्वास ठेवतात हे निरीक्षण खरे आहे. पण मान्यता प्राप्त होताना, त्याआधीच्या संशोधनात असे कधीच दिसून येत नाही की कुठलेही औषध १००% काम देते. हेच काय सिद्ध होते की "काम देईल" याची शक्यता "काम देणार नाही" याच्या शक्यतेपेक्षा बलवत्तर असते.

डॉक्टर शक्यतांचे गणित करण्याच्या बाबतीत कित्येकदा अनभिज्ञ असतात (११वी-१२वीत ज्या विद्यार्थ्यांना डॉक्टरकीकडे जायचे असते, ते गणित विषय बहुधा सोडूनच देतात!), म्हणून उपचारांच्या उपयुक्ततेची धूसर शक्यता जोखण्याची कला त्यांच्यापाशी नसते. उपचार "रामबाण" मानण्याचा आळशीपणा ते करतात. त्यानंतर रुग्ण "उपचार रामबाण" मानतात, आणि उपचार लागू पडेल की नाही त्याच्या शक्यतेबद्दल जाणायचा प्रयत्न करत नाही. हा प्रश्न सबल-नसलेल्या विचरसरणीचा आहे.

उपचार १००% रामबाण मानल्याने "नाही काम दिले तर काय करायचे" याविषयी योग्य अपेक्षा राहत नाही, पण फायदा हासुद्धा आहे की तो विचार करायचा ताण डोक्याला द्यावा लागत नाही. मग १००% फायदा झाला नाही तर तक्रार करत बसायची. सबलीकृत रुग्ण डोक्याला किती ताण द्यायचा किती द्यायचा नाही ते ठरवतो. तात्यांसारखा एखदा ० ताण देतो [गुण निश्चित येणार असा पूर्ण विश्वास ठेवतो] आणि मग ० तक्रार करतो ["नशीब" असे मानतो]. दुसरा एखादा थोडा अधिक ताण देईल, म्हणेल "या कॅन्सरविरोधी औषधाने माझे आयुष्य कदाचित वाचेल, नाहीतर ३-१० वर्षे आयुष्य असू शकेल. काही थोड्या प्रमाणात लवकर मरायची तयारी असावी - म्हणजे मुलांसाठी सोय म्हणून विमा वगैरे, बहुतेक सोय मध्यम-लांबीच्या आयुष्याकरिता असावी, पण जख्ख म्हातारपण येईपर्यंत जगेन अशी सोय करायची फार-फार गरज नाही..." या रुग्णाला हा विचार सबलीकृत करेल.

मनाची ठेवण बदलली नाही तर योग्य सल्ला कसा मागितला जाईल? कसा दिला जाईल? मैत्रीपूर्ण साशंकतेने सबल निर्णय घ्यावेत असा लेखाचा रोख आहे.

दोन वाक्ये पुन्हापुन्हा दिसतात - हे सहज जमणार नाही! हे भारतात जमणार नाही!
सहज जमणारी गोष्ट असती तर ऊहापोहात्मक लिहायची वेळच नव्हती. कष्टसाध्य पण महत्त्वाच्या गोष्टीच खूप विचारविनिमयाच्या लायकीच्या असतात.
भारतात जमणार नाही असे कसे? भारत काय विशेष मठ्ठ लोकांचा देश आहे काय? तर नव्हे. भारतीय लोकांची सामान्य बुद्धिमत्ता अन्य कुठल्या देशापेक्षा कमी नाही. भारतातील लोकांची सबल होण्याची ऊर्मी अन्य कुठल्या देशापेक्षा कमी नाही.
------

येथे अभ्यासपूर्ण प्रतिसाद दिलेल्यांपैकी दोन टोकांनाच मी गोषवार्‍यात घेतले आहे. मध्यवर्ती प्रतिसादांनी माझे काही मुद्दे आणखी स्पष्ट केले आहेत, काही नवीन मुद्दे समजावून सांगितले आहेत. प्राजु, वैशाली हसमनीस, नंदन, मेघना भुस्कुटे, प्रकाश घाटपांडे, विकास, लिखाळ, यशोधरा, अण्णा हजारे, चित्रा, प्राडॉ, विनायक प्रभू, मनीषा, सुनील, मनिष, स्वाती दिनेश सर्वांचा नामोल्लेख माझ्या वरील प्रतिसादांत आलेला नाही, परंतु त्यांचे प्रतिसाद मी काही-काही शिकत-शिकत वाचले आहेत. माझे अनेक-अनेक धन्यवाद.

भडकमकर मास्तर's picture

13 Sep 2008 - 3:30 pm | भडकमकर मास्तर

धनंजय ,
आपले संपादकीय आणि सर्व प्रतिसाद , मुद्देसूद खंडन बेष्ट....
वैयक्तिक अनुभव :
डॉक्टर म्हणून मी तरी प्रश्न विचारणार्‍या रुग्णाला जास्तीतजास्त माहिती देऊन ( प्रश्न विचारण्याबद्दल) प्रोत्साहन देतो... माझ्या दृष्टीने रुग्णाने उपचारातील (शक्य असलेली) गुंतागुंत साध्या शब्दांत समजून घेणे , डॉक्टरच्याही फायद्याचेच असते. व्हेरिफाय करणारा रुग्ण बराच...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/