मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिपा संपादकीय - आपले आरोग्य आपण कोणाच्या हातात सुपूर्त करतो?

संपादक · · विशेष
विशेष
मिपा व्यवस्थापन 'मिपा संपादकीय' हे सदर लोकमान्य टिळक यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित करत आहे. यापूर्वीचे संपादकीय लेखन येथे वाचायला मिळेल! धन्यवाद...
आपले आरोग्य आपण कोणाच्या हातात सुपूर्त करतो?
गेल्या एक-दोन महिन्यात दोन अतिशय वेगवेगळ्या घटनांचा योगायोग झाला, आणि एक विचारचक्र मनात सुरू झाले. पहिली घटना जगजाहीर होती. गेली बारा वर्षे फरार असलेल्या सर्बियातील युद्धातला क्रूरकर्मा रादोवान काराजिच यास जुलैमध्ये अटक झाली. या मोठ्या बातमीच्या एका यःकश्चित तपशिलाने माझे लक्ष वेधले. इतकी वर्षे तो कुठे लपला होता? पांडवांसारखा नाव-गाव-वेष बदलून सर्वांसमक्ष अज्ञातवासात तो होता! डॉक्टर द्रागान डेव्हिड दाविच हे नाव त्याने घेतले होते. लांब जटा वाढवल्या, आणि स्वतःची ओळख "वैकल्पिक वैद्यक (ऑल्टर्नेटिव्ह मेडिसिन) तज्ञ" म्हणून करून दिली. म्हणे चीन आणि भारतात जाऊन तेथील प्राचीन औषधोपचार पद्धती अभ्यासण्यात त्याने पूर्वायुष्य घालवले होते. या डॉ. दाविचने उघडउघड प्रॅक्टिस चालू केली. व्याख्याने, परिसंवादांत तो भाग घेत असे. इतकेच काय इंग्रजी आणि सर्ब भाषांमध्ये त्याचे छोटेखानी संकेतस्थळ अजून बघता येते (दुवा). "तो मी नव्हेच" म्हणणारा हा इसम कुशल नट असलाच पाहिजे, प्रश्नच नाही. पण काही श्रेय गंडले जाण्यास उत्सूक पेशंटनाही द्यायला पाहिजे. पितळ झाकण्याचे काही हुन्नर कल्हईवाल्याचे, काही गुण पातेल्याचा. खरे तर त्या रुग्णांनाही फार दोष देता येत नाही. आरोग्य आणि उपचार हे असे काही विषय आहेत, की मनुष्य डोळे मिटतो. आपल्याच मुठीत नाक धरून काय वाटेल ते घशाखाली ओतायला तयार होतो. आपण रुग्ण आपले आरोग्य नेमके कोणाच्या हातात सुपूर्त करत असतो? दुसरी घटना तशी माझ्या घरातल्या घरातली आहे. काही आयुर्वेदिक औषधांची विषारी धातूंच्या अंशासाठी रासायनिक चाचणी झाली होती, त्याबद्दल माझ्या नात्यातल्या कोणी मला विचारले. त्याबद्दलचा शोधनिबंध माझ्या विद्यापीठाच्या ग्रंथालयात मिळेल का? तोवर अशी कुठली चाचणी झाली होती, याबद्दल मला काही माहितीही नव्हती. तो शोधनिबंध हुडकून वाचला (दुवा १, दुवा २). आणि असे कळले, की अमेरिकेत आयात झालेल्या कित्येक "शक्तिवर्धक" आयुर्वेदिक औषधांमध्ये आर्सेनिक, शिसे, पारा, या विषारी धातूंचे फार अधिक प्रमाण होते. खरे पाहाता, आयुर्वेदात अनेक धातूंची भस्मे वापरली जातात, सुवर्ण किंवा चांदी हे काही औषधांचे घटक आहेत, त्यामुळे हे धातू सापडणे योग्यच आहे. काही औषधी रसायनांमध्ये शिश्याचे, पार्‍याचे भस्म घालायची कृतीच असते. पण जे विषारी धातू त्या औषधांच्या कृतीमध्ये नाहीत, ते सापडूच नयेत. अमेरिकेत (कदाचित भारतातही) ही "वैकल्पिक औषधे" (ऑल्टर्नेटिव्ह मेडिसिन) खाद्यपदार्थ (न्यूट्रास्यूटिकल्स) मानली जातात. किंवा पारंपारिक असल्यामुळे सुरक्षित मानली जातात. भारतात यापैकी काही औषधे शेकडो-हजारो वर्षे वापरात आहेत. असेही शक्य आहे, की मोठ्या प्रमाणात व्यापारासाठी उत्पादन केलेली औषधांमध्येच विषारी धातूंचा अंश सापडत असेल. पण आपण हा विचार करावा, आज आपण आयुर्वेदिक औषधे कुठून विकत आणतो? मोठ्या कंपन्यांनी बाटल्यांमध्ये भरलेली, की माझ्या खापरपणजोबांनी (हे वैद्य होते) घरी खललेली? अमेरिकेत अन्न आणि औषध प्राधिकरणाचे (फूड अँड ड्रग ऍड्मिनिस्ट्रेशनचे) औषधविषयक सुरक्षिततेचे नियम या औषधांना लागू नाहीत. शोधनिबंधांत नमूद केले होते, की चाचणी केलेली कित्येक औषधे खास लहान मुलांच्या आरोग्यासाठी उपयोगी, म्हणून लेबलावर लिहिले होते! आपण रुग्ण आपले आणि आपल्या मुलांचे आरोग्य नेमके कोणाच्या हातात सुपूर्त करत असतो? येथे कुठल्या पुरातन वारसा असलेल्या औषधपद्धतीला मला झोडपायचे नाही. म्हणून मुद्दामून पाश्चिमात्त्य पद्धतीत अयोग्य प्रॅक्टिस करणार्‍यांचे उदाहरण देतो. काही डॉक्टर कीटाणूजन्य रोगाची लागण झाल्याची पुसटशी शंका आली तरीही लगेच प्रतिजैविके (अँटिबायोटिक्स) देतात. अशा वागणुकीचे तोटे त्यांच्या वैद्यकीय शिक्षणात पुन्हापुन्हा सांगितले जातात. प्रतिजैविकांनी त्या रुग्णाला त्रास होऊ शकतो हे तर खरेच. पण त्या रुग्णाला त्रास झाला न झाला, तरी समाजाला तोटा असतो. एखादे प्रतिजैविक जितके अधिक वापरले जाते, त्याला न बधणारे कीटाणू उत्क्रांत व्हायची शक्यता तितकीच वाढते. मग पुढे कोणाला तशा कीटाणूची लागण झाली, तर ते प्रतिजैविक कुचकामी ठरते. हे डॉक्टर वाईट नसावेत - विसरभोळे असावेत. पण कधीकधी नाठाळ किंवा अडाणीपणेसुद्धा वागतात. मी जी थोडी प्रॅक्टिस केली तेव्हा मला असे दिसले की खेड्याकडचे कित्येक डॉक्टर इंजक्शने आणि सलाईन हे "निरुपद्रवी" मानत. "निरुपद्रवी" औषधे देऊन काय बिघडणार आहे? असा विचार करून काही डॉक्टर रुग्णाला सुया टोचत किंवा सुईने पाणी चढवत. ज्या ठिकाणी सुया उकळायला पाणी आणि वीज अपुरी आहे, त्या ठिकाणी सलाइन किंवा इंजेक्शन खरोखर निरुपद्रवी असते का? काही थोड्या प्रमाणात उपद्रव करूच शकते. ज्याला खरोखर गरज आहे, त्या रुग्णाबद्दल देखील विचार करावा लागतो. इंजेक्शन दिल्याने होणारा फायदा, हा सुई अस्वच्छ असण्याच्या धोक्यापेक्षा अधिक आहे का? ज्याला मुळात गरजच नाही त्याला "निरुपद्रवी" म्हणून सुई टोचणे, म्हणजे डॉक्टराने बळेच वेड पांघरणे होय. याचे थोडे हेसुद्धा कारण होते, की असा काही जंक्शन उपचार केल्याशिवाय इलाज झाला आहे, असे रुग्णांना पटत नसे. मग ते बिल भरण्याबद्दल कुरकुर करत. मी "पेशंटने मागितले म्हणून" कधीच सुया टोचत नसे, त्यामुळे "इंजेक्शन देण्याचे प्रशिक्षण नसलेला पुचाट डॉक्टर" अशी माझी अपकीर्ती होती! डॉक्टरने काही "जालिम" औषध द्यावे, ही अपेक्षा घेऊन तिथे जाणारे आपण रुग्ण आपले आरोग्य नेमके कोणाच्या हातात सुपूर्त करत असतो? मला हे कोडे पडते : तन-मन-धन या तीन्ही गोष्टींची काळजी घेण्याची आपली जबाबदारी असते. मनाच्या बाबतीत बघावे - मान-अपमान, सुख-दु:ख, कामकाज-मौज या सर्व गुंतागुंतीच्या गोष्टींची अंतिम जबाबदारी स्वतःवर घेतो. धन कुठे खर्च करावे, कुठे नाही, कुठे गुंतवावे, हे सर्व क्लिष्ट निर्णय घ्यायची अंतिम जबाबदारी आपण आपल्याकडे राखतो. पण मग तनाची काळजी घेताना जबाबदारी आपल्याकडे का राखत नाही? जबाबदारी घेणे म्हणजे सर्व लोकांबाबत अविश्वास दाखवणे नव्हे. जबाबदारी घेणे म्हणजे डोळस विश्वास दाखवणे. (ट्रस्ट बट व्हेरिफाय! विश्वास ठेवा तरी तपास करा!) जगात आपल्या मनाला त्रास देणारे असतात, तसेच आपल्या मनाला सुखावणारे लोक असतात. आपल्याला लुबाडणारे असतात, तसे आपल्याला आर्थिक सहाय्य करणारेही असतात. तोलणे-पारखणे म्हणजे लुबाडणार्‍यांना दूर ठेवणे, आणि सुहृदांना जवळ करणे. मन आणि धनाच्या बाबतीत आपण हा नीरक्षीरविवेक करतच असतो. शरिराची काळजी घेतानाही आपण हा विवेक अंगीकारू शकतो, असे मला वाटते. आपल्या आरोग्यविषयक वागणुकीच्या आवरणातच या समस्येवर मात करायची रामबाण बंडखोरी दडलेली आहे. पाश्चिमात्त्य देशांत पाश्चिमात्त्य औषधप्रणालीविरुद्ध कित्येक लोक बंड पुकारत आहेत. या औषधपद्धतीचा प्रयोग करणार्‍या डॉक्टरांची आणि औषधनिर्मात्या उद्योगांची अरेरावी म्हणा, जुलूम म्हणा, लोकांना मानवत नाही. त्याच प्रमाणे त्या दुरभिमानात जो काही एक सर्वज्ञतेचा आव लोकांना जाणवतो, त्या मानाने परिणाम करण्यात ही औषधपद्धती कमी पडते, असे लोकांना जाणवते. त्यामुळे कित्येक लोक ही औषधपद्धती झुगारून देत आहेत. "वैकल्पिक पद्धतींकडे" जात आहेत. आपल्या खेड्यापाड्यातील लोक वैदू आणि झाडफूंकवाल्यांबद्दल साशंक आहेत. त्यातून हवा तो गुण त्यांना मिळत नाही. म्हणूनच ते जालिम इंजेक्शनवाल्या डॉक्टराकडे जातात. हीसुद्धा त्याच मनःस्थितीची झलक म्हणावी. पण या सुज्ञ साशंकतेच्या बदल्यात दुसर्‍या कुठल्या औषधाबद्दल लोक अंधविश्वासू होत आहेत. आपल्या याच साशंकतेला आपण सन्मार्गी लावले, तर आपण आगीतून फुफाट्यात पडणार नाही. आपल्या मनात विचार येईल - डॉक्टरकी, वैद्यकी, शल्यचिकित्सा, ही किती कठिण शास्त्रे आहेत. व्यवसाय सुरू करण्यापुरते ज्ञान मिळवायलाही त्या शास्त्रांतल्या तज्ञांना पाच-दहा वर्षे प्रशिक्षण घ्यावे लागते. त्यांची चाचणी करणारा मी कोण? असा विचार मनात येणे नैसर्गिक असले, तरी असे धैर्यस्खलन अनाठायी आहे. आपल्याला त्या तज्ञाइतके सर्वांगीण ज्ञान मिळवायचे नाही. फक्त आपल्या स्थितीला लागू पडेल इतकेच ज्ञान मिळवायचे आहे. बाजारात पैसे गुंतवताना आपल्याला रिझर्व बँकेच्या गव्हर्नरइतके ज्ञान लागत नाही, तशीच ही गोष्ट आहे. तर या बाबतीत आपण आजच्यापेक्षा वेगळे असे काय वागू शकतो? डॉक्टराकडे, वैद्याकडे जादूगार म्हणून न बघता समुपदेशक म्हणून बघावे. बद्धकोष्ठासाठी चाटण किंवा गोळी त्यांनी दिली, तरी बसून कुंथावे आपल्यालाच लागणार आहे, हे विसरू नये. प्रश्न विचारावेत. आपल्या विशिष्ट संदर्भातले पुरेसे ज्ञान डॉक्टराला समजावून देता आले पाहिजे. संवादातून उपचारासाठी वेगवेगळे पर्याय समोर आले पाहिजेत. औषध घेतलेच नाही, तर काय फरक पडतो, ते डॉक्टराला समजावून देता आले पाहिजे. पर्यायी सौम्य औषधयोजना आहे काय? केवळ पथ्ये पाळून आपल्याला हवा तो फरक घडून येईल काय? हे पर्याय विचारात घेतले पाहिजेत. औषधनिर्मात्यांबाबत मात्र एकट्या व्यक्तीला सहज ठोस कार्य करता येत नाही. पण निर्मात्यांच्यावर पाळत ठेवणारे कोणी असावे - याबाबत लोकशाहीतले सजग नागरिक म्हणून आपण काही करू शकतो. अन्न आणि औषध प्राधिकरणाला सशक्त केले पाहिजे आणि दैनंदिन राजकारणापासून दूर राखले पाहिजे. अशी मागणी आपण आपल्या लोकप्रतिनिधींच्या मार्फत करू शकतो. मोठ्या पाश्चिमात्त्य औषधे बनवणार्‍या उत्पादकांच्या धनदांडगेपणापासून हे प्राधिकरण सुरक्षित असले पाहिजे. त्यांना जाब विचारला पाहिजे. (उदाहरण या दुव्यावर बघावे.) पण त्याच प्रकारे आयुर्वेदिक, यूनानी, जडीबूटी-हर्बल, होमियोपॅथिक औषधांच्या सुरक्षिततेबद्दल चाचण्या घेण्याची, दखल घेण्याची मुभा या प्राधिकरणाला असली पाहिजे. कायद्याने प्रशासनाचे ते कर्तव्य केले पाहिजे. प्राचीन वारसा म्हणून अस्मितेचे स्तोम आपण माजवले तर निष्काळजी उत्पादकांचेच फावते. चोख देखरेख असली तर चांगले उत्पादक तगतीलच. अस्मितारक्षण आणि सुरक्षा, दोन्ही साधतील. डॉक्टर, वैद्य, हकीम, औषधविक्रेता हे चमत्कारी धन्वंतरी नव्हेत म्हणजे काही आपले शत्रू नव्हेत. ते आपले मित्र आहेत, आणि आपले मार्गदर्शक आहेत. तरी आपल्या आरोग्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकून आपण हात झटकणे म्हणजे त्यांचा आदर नव्हे. प्रश्न विचारणे म्हणजे अविश्वास दाखवणे नव्हे. उलट द्रागान डेव्हिड दाविचवर चाचणी न घेता विश्वास ठेवला, द्रागान डेव्हिड दाविच मात्र सोकावतो. आपल्या सेवाभावी डॉक्टर-वैद्यावरही तसाच डोळे बंद करून विश्वास ठेवणे, म्हणजे माझ्या मते त्या प्रामाणिक डॉक्टराचा अपमानच आहे. आपल्या मदतीसाठी डॉक्टर हात पुढे करतो आहे, तो घ्यावा. पण त्याच्या खांद्यावर सर्व निर्णयांची जबाबदारी टाकून मोकळे होऊ नये. आपल्या देहाची काळजी आपणच घ्यायची आहे, शेवटी आपले आरोग्य आपल्याच हातात आहे. पाहुणा संपादक : धनंजय.

वाचन 23401 प्रतिक्रिया 0