इशकजादे – २

मांत्रिक's picture
मांत्रिक in जनातलं, मनातलं
21 Nov 2015 - 11:40 am

सकाळचे साडेआठ वाजत आलेले होते. रितू कॉलेजला जाण्यासाठी तयार होत होती. रेडिओवर गाणं लागलेलं, ‘हाय वो परदेसी मन में कौन दिशासे आ गया…’ थोडंसं थबकून ती मध्येच ते गाणं लक्षपूर्वक ऐकत होती. आज तिने मुद्दाम कालचाच तो गुलाबी ड्रेस घातलेला होता. उत्सुकता आणि एक हुरहुर! थोडंसं घाबरल्यासारखंच होत होतं तिला आज.
एवढ़्यात माई तिची गडबड बघून बाहेर आल्या. ‘काय गं रितू? एवढी कसली गडबड?’
‘काही नाही गं माई! आज जरा लायब्ररीत जायचंय. उशीर झाला तर पुन्हा रांगा लागतात मग.’
‘बरं! ठीक आहे.’

रितू श्रीरामपूरमधल्या नाना टाफळेंची कन्या. नाना त्या जिल्ह्यातील एक महत्वाचे राजकारणी म्हणून ओळखले जात. ग्रामपंचायतीपासून सुरुवात करून त्यांनी आता झेड. पी. सदस्यपदापर्यंत मजल मारलेली होती. दर दोन-तीन महिन्यांनी त्यांचे वाढदिवस असल्याचे भले मोठे होर्डींग्ज शहरभर लागत असत. त्यावरुन ते जनतेचा विकास करीत आहेत याची माहिती जनतेला समजून येई. बाकी त्यांची खरी जन्मतारीख सटवाईला पण माहीती नसेल असे लोक खाजगीत कुत्सित टोमणे मारीत. पण टाफळेंना फरक पडत नसे. असे बोर्ड्स लागले रे लागले की नानांच्याकडून कार्यकर्त्यांना साग्रसंगीत पार्ट्या झोडायला मिळत असत. नानाही खूष व कार्यकर्तेही खूष.

बाकी नानांविषयी खुद्द त्यांच्या कुटुंबातच कुणाचं मत चांगलं नव्हतं. गावभरच्या कुरापती काढणे व राजकारण करणे यामुळे नाना कधीच कुटुंबाला जास्त वेळ देऊ शकले नाहीत. वयात आलेला तरुण पोरगा नको नको त्या सवयी लागून बाद झाला व कमी वयातच गेला. हे दुःख माई कधीच विसरु शकल्या नाहीत. त्यामुळे नानांच्या अपरोक्ष माईंनी रितूमध्ये कायम स्वतंत्र विचार करण्याची वृत्ती निर्माण केली.

कधी कधी दोघी खूप वेळ गप्पा मारत बसत. माई अशा वेळीस खूप भावुक होऊन रितूला स्वतंत्र विचारानं जीवन जगण्याचा सल्ला देत. शिकून स्वतःच्या पायावर उभी रहा आणि नानांच्यावर कधीच अवलंबून राहू नकोस हे समजावून सांगत. कधी कधी माई गंमत देखील करत. मध्येच म्हणत ‘रितू तुझ्या नानांचा म्युझिकल स्वभाव मीच काय तो सहन केला बघ.’ रितू लगेच कातावून म्हणणार ‘माई, अगं म्युझिकल नव्हे व्हिम्झिकल’ मग माई म्हणत ‘अगं कधी कधी जड जेवण झालं की होतात ते म्युझिकल’ आणि असंच काहीतरी गंमतीशीर बोलून दोघी हसत बसत.

पण आज मात्र रितू माईंसोबत काहीच शेयर करणार नव्हती. हा तिचा स्वतःचा व्यक्तिगत कोपरा होता. इथे अजून तरी कुणालाच प्रवेश मिळणार नव्हता. अगदी जवळच्या मैत्रिणींनासुद्धा ती सांगणार नव्हती.

तेवढ्यात बाहेरून मैत्रिणींची हाक आली. ‘रितू चल लवकर.’ ती लगेच घराबाहेर पडली. रस्त्यावर चालत चालत एकमेकींशी गप्पा मारतानासुद्धा तिची नजर हळूच तो कुठे दिसतोय का याचा अंदाज घेत होती. आजूबाजूला नेहमीचे टोळभैरव उभेच होते. आपण असं इकडे तिकडे पाहिलं तर त्यांचा गैरसमज होईल, ही देखील भीति होतीच तिला. पण सुदैवाने तिच्या बापाचा दरारा सगळ्यांना माहीत असल्याने मुळात तिच्याकडे कुणी बघतच नव्हतं. संपूर्ण रस्ता संपला. आता कॉलेजचं गेटपण आलं. तो कुठेच नव्हता. तिला थोडंसं खट्टू झाल्यासारखं वाटलं.

गेटमधून त्या सर्वजणी आत आल्या. स्टॅंडला सायकली उभ्या करुन ठेवल्या. आभाळ थोडंसं काळवंडलेलं होतं. हलकासा मंद वारा देखील सुटलेला. तिचे केस खट्याळपणे वा-याबरोबर स्वैर नाचू लागले. ते पुन्हा पुन्हा मागे सारत तिने सहज लायब्ररीकडे पाहिलं. तो तिथे उभा होता. त्याच्या मित्रांशी गप्पा मारत. अचानक त्याचीही नजर तिच्याकडे गेली. त्याने क्षणभरच तिच्याकडे पाहिलं आणि पुन्हा मित्रांशी बोलण्यात मग्न झाला. तिला नकळत थोडं दुखावल्यासारखं झालं. विचाराच्या तिरमिरीत ती क्लासमध्ये कधी येऊन बसली तिला देखील कळलं नाही.

आज कुठल्याच विषयात तिचं लक्ष लागत नव्हतं. लेक्चरर येऊन बडबड करुन जात होते. बस तेवढंच कळत होतं. हे काय आहे काय प्रकरण? मेंदूला एखाद्या डिंकासारखं घट्ट चिकटून बसणारं? मी का म्हणून त्याचा इतका विचार करतेय? जितक्या तीव्रतेनं फेकून द्यावं त्याच्या दसपट जोरात माघारी येऊन पुन्हा डोक्यावर बसणारं हे आहे तरी काय? थोड्या वेळाने तो विचार बाजूला ठेवायला तिला थोडं का होईना यश मिळालं. मग जसं मन शांत होऊ लागलं तसं तिच्या लक्षात तिची चूक येऊ लागली. कदाचित आपल्या मनातील खळबळ त्याला कळालेली सुद्धा नसेल. किंवा मग तिच्या वडीलांविषयी त्याला माहिती पडलं असेल का? हा विचार मनात येताच तिला थोडी गंमत वाटली. नानांच्यासमोर तिला मागणी घालायला तो येईल का डेयरींग करुन? काय घडेल अशा वेळीस?

इकडे विवेकच्या मनातदेखील थोडी खळबळ चाललेली होती. रितू पुढं गप्पगप्प बसलेली त्याला दिसत होती. त्यानं मघाशी जास्तच भावखाऊपणा केला असं त्याला वाटायला लागलं. पण त्याच्या उत्साही मित्रांनीच त्याला तसा सल्ला दिलेला होता. त्यातूनच प्रेमाची आग पेटत जाते असं डॉ. दिवटेंच्या ‘प्रेमः एक हार्मोनल(Hormonal) भडका’ या संशोधनात्मक पुस्तकात कुणालनं वाचलेलं होतं, आणि त्या पुस्तकात दिलेल्या सल्ल्यांवर त्याची खूप श्रद्धा होती. अनेक ठिकाणी नकारघंटा मिळूनसुद्धा बिचारा त्या लेखकाचा जबरदस्त फॅन होता. अचानक कॉलेज संपल्याची बेल वाजल्यानं त्याचं विचारचक्र थांबलं.

प्रत्येकजण भराभर सॅक्स उचलून बाहेर पडायची घाई करीत होता. तो थोडासा थांबला. नकळत रितूदेखील थोडी थांबलेली आहे हे त्याच्या लक्षात आलं. आता मुद्दाम काहीतरी कारण काढून मागे थांबणं आलं. पण नाही, रितू तिच्या मैत्रिणींसोबत बाहेर पडली. ती त्याच्यासाठी थांबलेली नव्हती. विवेक ती बाहेर पडूपर्यंत तिच्याकडे पहात होता. तिच्यामागे अजून दोन तीन मुली होत्या. एकसलग बडबड चाललेली त्यांची. काहीतरी चुकीचं घडलं हे त्यांच्या कुणाच्याच लक्षात आलं नाही. पण विवेकने ते पाहिलं. त्याला ही संधी पाहिजेच होती. तो लगेच खुशीत धावला.

एव्हांना त्या सर्वजणी ग्रंथालयापर्यंत पोहोचलेल्या सुद्धा होत्या. रितू आज थोडी रेंगाळत मागेच चालत होती. तो पटकन तिच्यापर्यंत पोहोचला.
‘थांबा जरा कृपया.’
*****
.
.

.
.
.
(क्रमशः)

हे ठिकाण

प्रतिक्रिया

नाखु's picture

21 Nov 2015 - 12:20 pm | नाखु

पुढचा भाग येऊ द्या... आणि जरा मोठे भाग टाका.

राकु धुराळीने हा खाली जाऊ नये हीच आकाशातल्या बाप्पाकडे प्रार्थना.

पुभाप्र

बाबा योगिराज's picture

21 Nov 2015 - 12:32 pm | बाबा योगिराज

अस णै ना करु. ज़रा मोठे भाग येऊ द्या की वो.
पुलडा भाग लवकर येऊ द्या.

चांदणे संदीप's picture

21 Nov 2015 - 1:10 pm | चांदणे संदीप

एक घाव दोन तुकडे,
अर्धे इकडे अर्धे तिकडे!

अवांतर : नाना टाफळेंवरून 'नानासाहेब नेफळे' असा काहीतरी आयडी मिपावर पाहिल्याचे आठवले!

('अवधूत'चीही वाट पहात आहे!)
Sandy

केवळ गंमतीने नाव ठेवलंय. नाना - माई जोडी सध्या हिट आहे नं!

रातराणी's picture

21 Nov 2015 - 1:11 pm | रातराणी

वाचतेय. पुभाप्र.

शिव कन्या's picture

21 Nov 2015 - 2:26 pm | शिव कन्या

डॉ. दिवटेंच्या ‘प्रेमः एक हार्मोनल(Harmonal) भडका’ :):):)
पुभाप्र.

एक एकटा एकटाच's picture

21 Nov 2015 - 6:55 pm | एक एकटा एकटाच

चांगली चाललीय

पोचली गाडी ओळखीपर्यंत! बरं झालं :)पुभाप्र.

आदूबाळ's picture

21 Nov 2015 - 7:33 pm | आदूबाळ

या बात! यव द्या लौकर.

मांत्रिक's picture

21 Nov 2015 - 7:42 pm | मांत्रिक

Pls someone help me to upload youtube video of a very romantic song:
Hi woh perdesi man mein...
I have tried a lot but could not do it...

अमृत's picture

21 Nov 2015 - 7:52 pm | अमृत

रम्य ते कॉलेजचे दिवस!

बाबा पाटील's picture

21 Nov 2015 - 9:16 pm | बाबा पाटील

म्हणजे शक्ती कपुरच्या पोटी श्रद्धा कपुरच म्हणा की हो

मांत्रिक's picture

22 Nov 2015 - 9:00 pm | मांत्रिक

हा हा! झक्कास विनोद!!!

पद्मावति's picture

21 Nov 2015 - 10:02 pm | पद्मावति

दोन्हीही भाग छान जमले आहेत. पु.भा.प्र.
अवधूतची सुद्धा वाट बघत आहे.

जातवेद's picture

21 Nov 2015 - 11:49 pm | जातवेद

पुभाप्र.

अमृत's picture

22 Nov 2015 - 7:46 am | अमृत

कथा कॉलेज जिवनावर असल्याने विशेष आवडतेय. एक सूचना देऊ एछितो कृपया राग मानू नका. लिखाणात जर थोडं पात्रांच वर्णनसुध्हा टाकलत तर अजुन चित्रस्पर्शी होईल उदा - तिचे निळे डोळे,कुरळे/ लांबसडक केसं किंवा त्याची ६ फूट उंच भारदस्त शरीरयश्टी वगैरे वगैरे. तसच थोडं कॉलेज परीसराचं वर्णन उदा - विस्तृत मैदान, जुनी काळ्या दगडांची इमारत.जमल्यास कॉलेज रस्त्याविशयी थोडं. तुम्ही हे करू शकता हा विश्वास आहे म्हणूनच मागणी करतोय. ही केवळ सूचना ऐकावीच हा अट्ठास नाही.

पुलेशु व पुभाप्र.

इडली डोसा's picture

22 Nov 2015 - 7:56 am | इडली डोसा

नेहमीच्या वळणाने जाणारी सुखद प्रेमकथा वाचायला मिळणार असे दिसते. पुभाप्र.

माहीराज's picture

23 Nov 2015 - 10:09 am | माहीराज

छान ...मनमोहक

पैसा's picture

23 Nov 2015 - 4:32 pm | पैसा

लिहा पटापट!

उगा काहितरीच's picture

23 Nov 2015 - 5:25 pm | उगा काहितरीच

अगोदरच्या भागाची लिंक टाकत चला .
-एक नम्र सुचना!