यक्षप्रश्न

आतिवास's picture
आतिवास in जनातलं, मनातलं
20 Nov 2015 - 11:17 am

१.
गर्द जंगलात
निरुद्देश भटकताना
पाणी दिसले,
तेव्हा त्याच्या काठाशी
नकळत विसावले मी.
पापणीच्या
आतल्या पाण्याला
अचानक
बाहेरच्या पाण्याची ओढ.
मी ओंजळ पुढे करताच
कोठूनसा धारदार आवाज आला:
“माझ्या प्रश्नाचे
उत्तर दिल्याविना
पाण्याला स्पर्श करू नकोस.
अन्यथा प्राण गमवावे लागतील.”

२.
महाभारतातील
कूटप्रश्न विचारणाऱ्या
यक्षाची कथा
वाचली होती मी फार पूर्वी,
बहुधा त्याचाच वंशज असणार हा!
पण आता
अशा या सैलावलेल्या क्षणी
कोण माथेफोड करणार?
आणि ते करून
ना काही सिद्ध करायचे होते,
ना काही साधायचे होते.

प्राण, जीवन क्षणभंगुर आहे हे खरे,
पण ते उगाच
दुसरे कोणी म्हणते म्हणून
विनाकारण
उधळून देणेही
शहाणपणाचे नाही.
म्हणून मग
“यक्षबुवा,
तुमच्या विद्वत्तेला प्रणाम,”
म्हणत मी
दोन पावले मागे फिरले.

पाण्याचे एक बरे असते.
ते नेहमीच जवळ भासते.
आणि भिजणे, डुंबणे, ओलावणे
या साऱ्या क्रिया
तसे पाहिले तर
मनाच्या पातळीवरच
घडत असतात;
शरीर एक
साधनमात्रच असते अनेकदा.

शिवाय
समोर आलेली
सगळीच आव्हाने
हाती घ्यायची गरज नसते.
काहींना वळसा घालून
तर काहींना
तात्पुरते शरण जाऊन
काम भागते.

दूरचे ध्येय गाठायचे तर
ऊर्जा, शक्ती, संघर्षाची प्रेरणा
सारे काही टिकवून ठेवावे लागते.
मुख्य म्हणजे
आव्हान घ्यायचे की नाही
हे आपण स्वत: ठरवायचे असते
निर्णयाचा अधिकार
साक्षेपाने वापरून!

३.
मी मागे फिरल्यावर
का कोणास ठाऊक
यक्ष जरासा लटपटला.
आवाजातील
अधिकार, गुर्मी
कमी करत तो म्हणाला,
“येथे जवळ दुसरे पाणी नाही,
आहे ते हेच, इतकेच,
तृष्णा शमवणारे.
त्यामुळे माझ्या प्रश्नाकडे
दुर्लक्ष करण्याचा पर्याय
खरे तर तुला नाही.”

त्यावर गप्प राहत
मी स्वत:शीच हसले.
संदर्भ बदलला तरी
'पर्याय नसण्याचा' मुद्दा
पुन्हा समोर येतोच तर!

दोन क्षण वाट पाहून
यक्ष पुढे म्हणाला,
“किती वेळ विचार करणार आहेस?
कधी ना कधी
जे अटळपणे करणे भाग आहे,
ते लगेच का करत नाहीस?”

हा यक्ष
बऱ्यापैकी गप्पिष्ट होता तर!
बोलावे का याच्याशी मनातले?
मी जराशी घुटमळले.

घायकुतीला येत
यक्ष म्हणाला,
“हे आजवर असे कोणी केले नाही.
मी प्रश्न विचारायचे
आणि माणसांनी उत्तरे देत
जगण्याचे वा मृत्यूचे
मार्ग स्वीकारायाचे
अशीच हजारो वर्षांची
इथली परंपरा आहे;
त्याला सुरुंग लावण्याचा
तुला अधिकार नाही.”

हेही जुनेच.
परंपरा, अधिकार वगैरे.

४.
खरे तर
एवढे ऐकल्यावर
तेथे थांबायचे
काही कारण नव्हते.
पण त्या यक्षाबद्दल
माझे कुतूहल जागृत झाले.

महाभारताचा दाखला
ध्यानात घेतला तर
उणीपुरी पाच हजार वर्षे
(इतिहास पंडितांनो
चूकभूल माफ करावी
काळाला गणना नसते तसे पाहायला गेले तर!)
हा बेटा
प्रश्न विचारत येथे
अदृष्यपणे का होईना
पण उभा आहे -
हा किंवा याचे बापजादे!

इतक्या साऱ्या वर्षांत
याने प्रश्न तरी
काय विचारले असतील?
दहावी -बारावीच्या
बोर्डाच्या परीक्षेसारखे
हा तेच तेच प्रश्न
आलटून पालटून विचारतो?
की प्रत्येकाला नवा प्रश्न विचारतो?

समोरच्या व्यक्तीचा
संदर्भ लक्षात घेऊन
हा प्रश्न विचारतो?
की लॉटरी पद्धतीने?
एकदम चार-पाचांचा गट आला
तर प्रत्येकाने उत्तर द्यायचे?
की प्रतिनिधीचे उत्तर चालते याला
आपल्या लोकाशाहीसारखे?

प्रश्न गटाला असतो? की व्यक्तीला?

उत्तर बरोबर असले तर जीवन,
चुकले तर मरण.
म्हणजे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर
याला आधीच माहिती आहे.
मग तरीही
हा इतके सारे प्रश्न का विचारतो?

मी म्हटले,
“पण यक्षदादा,
तुम्ही प्रश्न का विचारता?
हे प्रश्न तुम्हाला खरोखर पडतात?
की कोणी तुम्हाला
प्रश्न विचारण्याचेच
काम लावून दिले आहे?”

स्वत:च्या भावना
काबूत ठेवत तो म्हणाला,
“लक्षात घे,
प्रश्न मी विचारायचे,
तू नाही.”

५.
मी आणखी दोन पावले
मागे सरकले.
तेव्हा माझी मनधरणी करत
यक्ष म्हणाला,
“घाबरू नकोस.
सोपा प्रश्न विचारेन मी अगदी.
वाटले तर
पर्यायपण मीच देईन,
त्यातला तू एक निवड.
पण थांब जराशी.
माझ्याकडे पाठ फिरवून
न बोलताच
अशी जाऊ नकोस.”

आता मला जरासा
राग येऊ लागला होता –
ही काय सक्ती?
प्रश्नाचे उत्तर देऊन
हाती काय -
तर जगणे किंवा मरणे.
ते तर तसेही आहेच.
जगणेही अपरिहार्य;
मरणेही अटळ.

शिवाय या क्षणी
जगण्याचा सोस नाही,
मरणाची आस नाही,
तहान नाही,
तृप्त आहे मी.
मग या यक्षाची
ही दादागिरी का?

नकळत
मीही हट्टास पेटले.
आता परत फिरायचे नाही
आणि या यक्षाला शरणही जायचे नाही.

माझा अंदाज घेत यक्ष म्हणाला,
“बस जरा निवांत.
दमली असशील प्रवासाने.
प्रश्न काय,
आणखी थोड्या वेळाने विचारला तरी चालेल.”

मग एक
हलका निश्वास टाकत म्हणाला,
“हल्ली इकडे कोणी फिरकत नाही फारसे.
जे येतात ते
काही बोलण्यापूर्वीच
प्राण त्यागतात.
एकटेपणामुळे
आणि
वय झाल्यामुळे
मी जरासा चिडचिडा झालो आहे.
मी तुझ्याशी
आधीच नीट बोलायला हवे होते.
मला माफ कर.”

प्रश्नांतून सुटका नसणाऱ्या
त्या यक्षाची
दया आली मला.
माफी मागून
माझ्या संवेदनशीलतेला
थोडे हलवले होते त्याने.

६.
जमिनीवर
ऐसपैस बैठक मारत मी म्हटले,
“यक्ष आजोबा,
मलाही पूर्वी हा शाप होता.
समोर जे कोणी येईल
त्याला मीपण प्रश्न विचारायचे,
खूप प्रश्न विचारायचे,
सतत विचारायचे.”

“मग आता?”
यक्ष जिज्ञासेने म्हणाला.

मन उलगडत मी सांगितले,
“दुसऱ्यांनी दिलेली उत्तरे
पुरत नाहीत,
कितीही प्रगल्भ असली तरी.
आपली वाट आपल्यालाच
निर्माण करावी लागते नव्याने
हे समजले आहे मला.
तेव्हापासून जणू
प्रश्न विचारण्याची गरज संपली आहे
जरी प्रश्न आहेत खूप तरीही ...”

माझे बोलणे तोडत
खूष होऊन
स्वत:शी हसत म्हणाला,
“माझ्या प्रश्नाचे बरोबर उत्तर दिल्याबद्दल
(हाच त्याचा प्रश्न होता हे मला कळले नाही;
हुषार आहे बेटा!)
जगण्यासोबत आणखी एक
वरदान देतो मी तुला.
शेवटच्या श्वासापर्यंत
तुला प्रश्न पडत राहावेत
यासाठी माझा एक अंश
तुझ्यात रुजवून देत आहे मी.”

'आता कशाला आणखी प्रश्न?
पुरेसे आहेत माझ्याजवळ
या जगण्यासाठी...'

माझ्या चेहऱ्यावरचे भाव वाचत
हळव्या मायेने यक्ष म्हणाला,
“तुझी वाट तुलाच शोधावी लागेल,
पण इतरांनाही प्रश्न विचार.
कारण
एका प्रश्नाचे एकच उत्तर
अन तेही अचूक
असे कधीच नसते.
दुसऱ्यांचीही उत्तरे समजून घेशील
गर्भगृहासह
तर अंतर्ज्योत उजळेल.”

आणि यक्ष अंतर्धान पावला
त्या पाण्यासह.

७.
तसे निरर्थक, निरुद्देश
असे आयुष्यात
काहीच असत नाही.
प्रवास थांबण्यानेही
नवे काही हाती लागते
हादेखील रंजकच अनुभव!

यक्षप्रश्नांचे
एक गुंतागुंतीचे चक्र असते
सत्याच्या एका स्तरावरून
उच्चतर सत्याकडे नेणारे,
वाटचालीस साहाय्य करणारे.

रितेपणाच्या
एका अमर्याद टप्प्यानंतर
माझ्यातच रुजलेले
ते घनदाट अरण्य,
ते निळेसावळे पाणी
ते यक्षप्रश्न
सापडले आहेत मला
आता
पुन्हा एकदा!

अन्यत्र पूर्वप्रकाशित

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

पण हे प्रश्न का बरे पडतात आपल्याला हा प्रश्न मला कित्येक वर्षांपासून पडला आहे.

उत्तरांचंही तसं बरंच असतं म्हणायला. त्यांच्या मनात असलं तरंच ती प्रश्नकर्त्याला गवसतात.

पण प्रश्नांवाचून उत्तरांचं वेगळं असं अस्तित्त्व असतं का हाही एक प्रश्न मला पडलाय. बर्‍याच वर्षांपासून.

आतिवास's picture

20 Nov 2015 - 3:38 pm | आतिवास

पण प्रश्नांवाचून उत्तरांचं वेगळं असं अस्तित्त्व असतं का हाही एक प्रश्न मला पडलाय
आणखी एक यक्षप्रश्न.

इडली डोसा's picture

21 Nov 2015 - 8:08 am | इडली डोसा

उत्तरांचंही तसं बरंच असतं म्हणायला. त्यांच्या मनात असलं तरंच ती प्रश्नकर्त्याला गवसतात.

छान विचार. कधी कधी उत्तर गवसलेलं असतं प्रश्नकर्त्याला पण त्याला योग्य उत्तर नकोचं असतं फक्त जे सोयीस्कर असेल तेच उत्तर हवं असतं.

नूतन सावंत's picture

21 Nov 2015 - 8:36 am | नूतन सावंत

अगदी,अगदी.

“तुझी वाट तुलाच शोधावी लागेल,
पण इतरांनाही प्रश्न विचार.
कारण
एका प्रश्नाचे एकच उत्तर
अन तेही अचूक
असे कधीच नसते.
दुसऱ्यांचीही उत्तरे समजून घेशील
गर्भगृहासह
तर अंतर्ज्योत उजळेल.”

__/\__

घाटावरचे भट's picture

20 Nov 2015 - 12:16 pm | घाटावरचे भट

मस्त! ७ विशेष आवडले.

प्रसाद१९७१'s picture

20 Nov 2015 - 12:34 pm | प्रसाद१९७१

उजव्या बाजूचे मार्जीन खूप च जास्त झालय का? प्रत्येक ओळीवर जस्तीत जास्त ५-६ शब्द्च दिसतायत):-(

स्क्रोल करुन थकलो

आतिवास's picture

20 Nov 2015 - 3:35 pm | आतिवास

क्षमस्व.

भाऊंचे भाऊ's picture

20 Nov 2015 - 12:55 pm | भाऊंचे भाऊ

कं लिवलयं क लिवलयं...

तिमा's picture

20 Nov 2015 - 1:00 pm | तिमा

सर्वच भाग आवडले. आणि ते आवडणारच, याची आधीपासूनच खात्री होती.

पाण्याचे एक बरे असते.
ते नेहमीच जवळ भासते.
आणि भिजणे, डुंबणे, ओलावणे
या साऱ्या क्रिया
तसे पाहिले तर
मनाच्या पातळीवरच
घडत असतात;

हे खूपच आवडले.
माझी तर याहून वेगळी स्थिती आहे. माझ्या मनांतला यक्ष, मलाच प्रश्न विचारत असतो.

यक्ष बरेचदा आतच असतो हे मात्र खरे!

सस्नेह's picture

20 Nov 2015 - 1:10 pm | सस्नेह

छान मुक्तक.
बाकी, आम्ही आमचे व्यवहारातले प्रश्न विचारले तर यक्षबुवा कुठल्याकुठे पळून जातील याची खात्री आहे...
HDFC चा व्याजदर कधी फिक्स होणार ?
तूरडाळीचा दर कधी उतरणार ?
इन्कमटॅक्सचे भूत (फक्त) नोकरदारांच्या मानगुटीवरून कधी उतरणार ?
सर्कारी भ्रष्टाचार कधी थांबणार ?
...आणि हो, अच्छे दिन कधी येणार ?
हम्म... विचारून दम लागला !

आतिवास's picture

20 Nov 2015 - 3:32 pm | आतिवास

म्हणूनच यक्ष म्हणतो आहे -
स्वत:च्या भावना
काबूत ठेवत तो म्हणाला,
“लक्षात घे,
प्रश्न मी विचारायचे,
तू नाही.”

सस्नेह's picture

20 Nov 2015 - 3:39 pm | सस्नेह

=))

कंजूस's picture

20 Nov 2015 - 1:45 pm | कंजूस

???????????/?????????/????????/?????????
???????????/???????//????????///???????
???//////??????///////??????/////????
???///////////////////??//////////////??
??///////////////////////////////////??
?////////////////////////////////////?
////////////////////////////////////
>>>>>>>>>>>>>>>>>
----------------------------

आतिवास's picture

20 Nov 2015 - 3:41 pm | आतिवास

?/

कंजूस's picture

20 Nov 2015 - 8:12 pm | कंजूस

तुमच्या कवितेचे भाषांतर-भाषा नसलेले.
प्रथम प्रश्न होते खूप,
नंतर कमी झाले,
आता कोणतेच नाहीत,
चालू पडलो/पडले.
>>>>>>>>>>

आतिवास's picture

22 Nov 2015 - 12:46 pm | आतिवास

प्रश्न आहेत की, ते विचारण्याची ऊर्मी नाही इतकंच.

आनंद कांबीकर's picture

20 Nov 2015 - 2:28 pm | आनंद कांबीकर

छान लिहिता तुम्ही.

प्रचेतस's picture

20 Nov 2015 - 2:44 pm | प्रचेतस

उत्कृष्ठ

मारवा's picture

20 Nov 2015 - 3:22 pm | मारवा

When we close the windows and doors of our house and stay inside, we feel very secure, we feel safe, unmolested. But life is not like that. Life is constantly knocking at our door, trying to push open our windows that we may see more; and if out of fear we lock the doors, bolt all the windows, the knocking only grows louder. The closer we cling to security in any form, the more life comes and pushes us. The more we are afraid and enclose ourselves, the greater is our suffering, because life won’t leave us alone. We want to be secure but life says we cannot be; and so our struggle begins.

Life Ahead, p 54

रातराणी's picture

20 Nov 2015 - 3:37 pm | रातराणी

अप्रतिम!!

पलाश's picture

20 Nov 2015 - 6:56 pm | पलाश

फार आवडलं !!!!

तात्या's picture

20 Nov 2015 - 7:06 pm | तात्या

लोकरीची गोल गोल गुंडी गुंडाळावी तसे शब्द फिरवले आहे !
मुक्तक म्हणले की छंद , सूत्र यांचे सोयर पाळावे लागत नाही पण अर्थाचे सुतकही सोडले आहे.

सूड's picture

20 Nov 2015 - 7:08 pm | सूड

सुंदर!

शिवाय
समोर आलेली
सगळीच आव्हाने
हाती घ्यायची गरज नसते.
काहींना वळसा घालून
तर काहींना
तात्पुरते शरण जाऊन
काम भागते.

हे विशेष आवडलं!!

हो. ह्याच ओळी भावल्या जास्त. अर्थात आवडलेच लेखन सारे.

नूतन सावंत's picture

20 Nov 2015 - 7:13 pm | नूतन सावंत

अतिवासताई,दंडवत स्वीकारा.

चाणक्य's picture

20 Nov 2015 - 7:18 pm | चाणक्य

आवडलं मुक्तक.

सुंदर ... खूप छान लिहिलंय

सुबोध खरे's picture

20 Nov 2015 - 7:29 pm | सुबोध खरे

जीवनाचे आरस्पानी दर्शन असे काहीसे वाटले.

दुसऱ्यांनी दिलेली उत्तरे
पुरत नाहीत,
कितीही प्रगल्भ असली तरी.
आपली वाट आपल्यालाच
निर्माण करावी लागते नव्याने
हे समजले आहे मला.

तुझी वाट तुलाच शोधावी लागेल,
पण इतरांनाही प्रश्न विचार.
कारण
एका प्रश्नाचे एकच उत्तर
अन तेही अचूक
असे कधीच नसते.
दुसऱ्यांचीही उत्तरे समजून घेशील
गर्भगृहासह
तर अंतर्ज्योत उजळेल.

तसे निरर्थक, निरुद्देश
असे आयुष्यात
काहीच असत नाही.
प्रवास थांबण्यानेही
नवे काही हाती लागते

सुरेख लिहिलेय हे लिहायचेच राहिले!

यशोधरा's picture

20 Nov 2015 - 8:23 pm | यशोधरा

हे पण खूप आवडले, लिहिलेलं खरंय अगदी.

यक्षप्रश्नांचे
एक गुंतागुंतीचे चक्र असते
सत्याच्या एका स्तरावरून
उच्चतर सत्याकडे नेणारे,
वाटचालीस साहाय्य करणारे.

रितेपणाच्या
एका अमर्याद टप्प्यानंतर
माझ्यातच रुजलेले
ते घनदाट अरण्य,
ते निळेसावळे पाणी

रेवती's picture

20 Nov 2015 - 8:50 pm | रेवती

सुरेख लिहिलय.

मधुरा देशपांडे's picture

20 Nov 2015 - 9:18 pm | मधुरा देशपांडे

मुक्तक खूप आवडलं.

शिव कन्या's picture

20 Nov 2015 - 11:48 pm | शिव कन्या

खूप दिवसांत इतके सखोल लेखन वाचनात आले नव्हते.
प्रत्येक भाग परत परत विचार करायला लावणारा.
आवडले.

स्रुजा's picture

21 Nov 2015 - 12:01 am | स्रुजा

असेच म्हणते .शब्दाशब्दाशी सहमत.

चांदणे संदीप's picture

21 Nov 2015 - 12:10 am | चांदणे संदीप

हे म्हणजे यक्षांच्या पुढच्या पिढ्यांबरोबर वाढत वाढत राहून आपण त्यालाच प्रश्न करण्याइतके सुधारलो आहोत किंवा त्याने प्रश्न विचारावे किंवा नाही हेही आपणच ठरविण्याची धमक मिळवून गेलो आहोत!

पण आता हे यक्षप्रश्न मोडीत निघणार बहुतेक नव्या मनुष्यप्रश्नांच्या उदयामुळे!

यक्षप्रश्नांचं एक बरं होत पण! उत्तर दिले की प्रश्न संपायचा. मनुष्यप्रश्नात असे नसते बरंका.... एका प्रश्नाचं उत्तर दिलं की त्यातूनच नवीन प्रश्न निर्माण होतो किंवा मनुष्यप्रश्नाला प्रतिमनुष्यप्रश्न असाही उत्तराचा पर्याय असतो म्हणजेच प्रश्न विचारणारी बाजू फक्त एकाचीच असेल असं काही नाही! शिवाय मनुष्यप्रश्नांच उत्तर बरोबर आल काय किंवा चुकल काय पुढचा मनुष्यप्रश्न हा ठरलेलाच!

हे मनुष्यप्रश्न कधी सुटतील का? हाच खरा "यक्षप्रश्न!"

(च्यायला, रात्री झोप येत नसेल तर हे असलं काहीबाही येत!)

मुक्तक आवडले हेवेसांन :-))
Sandy

आतिवास's picture

22 Nov 2015 - 12:42 pm | आतिवास

हे बहुधा यक्ष मंडळींना पडत असतील :-)

अरुण मनोहर's picture

21 Nov 2015 - 3:02 am | अरुण मनोहर

खूप छान लिहीले आहे!. प्रश्नच नाही!
इक सवाल तुम करो, एक सवाल मैं करू
हर सवाल का जवाब, ही सवाल हो!
मस्तच!

आतिवास's picture

22 Nov 2015 - 12:44 pm | आतिवास

इक सवाल तुम करो, एक सवाल मैं करू
हर सवाल का जवाब, ही सवाल हो!

हे समजलं नाही.
इथं प्रश्न एकतर्फी आहेत.

अरुण मनोहर's picture

21 Nov 2015 - 3:05 am | अरुण मनोहर

एका प्रश्नबंबाळने ( http://www.misalpav.com/node/33759 )
आतीवास ह्यांचा लेख जरूर वाचावा !

कवितानागेश's picture

21 Nov 2015 - 7:23 am | कवितानागेश

खूपच भावले !

एक एकटा एकटाच's picture

21 Nov 2015 - 7:48 am | एक एकटा एकटाच

मस्तच

इडली डोसा's picture

21 Nov 2015 - 8:11 am | इडली डोसा

तुम्ही तुमच्या मनातले संवाद, आणि विचार किती स्पष्ट्पणे मांडता. तुम्हाला काय म्हणायचयं ते अगदी पोहोचतं समोरच्यापर्यंत. त्यामुळे तुमचं नेहमीच खूप कौतुक वाटतं. मुक्तक छानचं जमलयं.

मुक्त विहारि's picture

21 Nov 2015 - 8:58 am | मुक्त विहारि

विशेषतः

एका प्रश्नाचे एकच उत्तर
अन तेही अचूक
असे कधीच नसते.
दुसऱ्यांचीही उत्तरे समजून घेशील
गर्भगृहासह
तर अंतर्ज्योत उजळेल.”
-----------------------
तसे निरर्थक, निरुद्देश
असे आयुष्यात
काहीच असत नाही.
प्रवास थांबण्यानेही
नवे काही हाती लागते
हादेखील रंजकच अनुभव!

पैसा's picture

21 Nov 2015 - 7:03 pm | पैसा

खरे तर प्रत्येक उत्तर शोधण्याची गरज नसतेच, किंवा एखाद्या प्रश्नाच्या उत्तरावर आयुष्य अवलंबून नसतं. हे ज्या दिवशी उमजते त्या दिवशी कोणताच प्रश्न त्रास देत नाहीसा होतो! :)

गामा पैलवान's picture

21 Nov 2015 - 9:04 pm | गामा पैलवान

अतिवास,

मस्त रचना. आवडली. यक्ष जरासा गंडलेला वाटतो. एकीकडे म्हणतो की दुसऱ्यांची उत्तरं समजावून घेतलीस तर गर्भगृह उजळेल. ठीकाय. मग कवयित्रीचे प्रश्न ऐकून पहिल्यांदा तिला धमकावलं आणि मग विनवण्या केल्या त्या कशासाठी? तिची उत्तरं समजावून घ्यायला काय झालं होतं? हा एक यक्षप्रश्न पडलाय! :-)

आ.न.,
-गा.पै.

आतिवास's picture

22 Nov 2015 - 12:50 pm | आतिवास

तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे का?
प्रश्न यक्ष विचारतोय, मी नाही. (कवितेतली 'मी')

गामा पैलवान's picture

22 Nov 2015 - 2:55 pm | गामा पैलवान

अतिवास,

आता असं बघा की, यक्ष अतिवासला अगोदर दरडावतोय. मग जरा नरमलाय आणि शेवटी घायकुतीला आलाय. तरीही हट्ट कायम आहे की प्रश्न तोच विचारणार. हे अतिवासच्या बोकांडी बसल्यागत वाटंत नाही काय? मग कबुली देतो की उतारवयामुळे चिडचिडा झालोय. शेवटी तिला उपदेश देतो की उत्तरं ऐकत जा.

आता, म्हाताऱ्या माणसांची हीच सार्वकालिक व्यथा नव्हे काय? हा यक्ष आहे की वार्धक्याने खचलेला माणूस? पात्र गंडलेलं वाटतंय. पण कविता सुंदरच आहे. पोहोचायची तिथे पोहोचतेय. धन्यवाद! :-)

आ.न.,
-गा.पै.

आतिवास's picture

23 Nov 2015 - 11:13 am | आतिवास

:-)

पद्मावति's picture

21 Nov 2015 - 10:04 pm | पद्मावति

फारच सुरेख मुक्तक.

आतिवास's picture

22 Nov 2015 - 12:51 pm | आतिवास

सर्व वाचकांचे आणि प्रतिसाददात्यांचे आभार.

नीलमोहर's picture

23 Nov 2015 - 11:27 am | नीलमोहर

“दुसऱ्यांनी दिलेली उत्तरे
पुरत नाहीत,
कितीही प्रगल्भ असली तरी.
आपली वाट आपल्यालाच
निर्माण करावी लागते नव्याने
हे समजले आहे मला.
तेव्हापासून जणू
प्रश्न विचारण्याची गरज संपली आहे
जरी प्रश्न आहेत खूप तरीही ...”

हे कळतं पण वळत नाही..

ज्ञानोबाचे पैजार's picture

23 Nov 2015 - 12:16 pm | ज्ञानोबाचे पैजार

कविता वाचली आणि आवडलीही.
त्या वर विचार करत असतानाच
दारात १०० रु किलो ने तुरडाळ विकणारा टेंपो आला.
मी सगळे विचार झटकुन टाकले
पटकन पिशवी उचलली
आणि चटकन लायनीत जाउन थांबलो.
मी पिशवी पुढे करताच
कोठूनसा एक आवाज आला:
“किती किलो पाहिजे?"
मी गंभीर पणे या प्रश्नाचे उत्तर शोधू लागलो
खरच माणसाला किती तुरडाळ हवी?
खरच हवी की नको?
तुरडाळिचा खरा भाव किती?

मी विचार करता असतानाच
परत एकदा आवाज आला
"उत्तर द्यायचे नसेल तर
उगाच टाइमपास करू नकोस .
तुझ्या मागे बरेच से लोक उभे आहेत."
मी खिशाचा अंदाज घेत सांगितले
"तीन किलो द्या"
विचार काय हो नंतरही करता येईल.
पण १०० रुपयाने तुरडाळ
परत कधी मिळेल ते सांगता येत नाही.

पैजारबुवा,

आतिवास's picture

23 Nov 2015 - 12:39 pm | आतिवास

आवडले.

राही's picture

23 Nov 2015 - 1:07 pm | राही

प्रश्न मिटतो, मिटवता येतो असं जेव्हा म्हणतात तेव्हा विधानातले शब्द मिटले, पण शेवटचं प्रश्नचिह्न तसंच राहिलं असं काहीसं होत असावं. उत्तरं मिळाली तरी या खुणा मागे राहातातच. मिटत नाहीत. प्रश्नातून प्रश्न वजा केला, तरी हे चिह्न उरतं, प्रश्नाला प्रश्नाने भागलं तरी शेष (प्रश्न)चिह्न उरतंच. नि:शेष असं काही असतं का, हा पुन्हा एक प्रश्न.
काही प्रश्न हे नुसतेच प्रश्न असतात, उत्तरांची अपेक्षा नसते, किंवा उत्तरे नसणार ह्याची जाणीव असते. काहींची उत्तरे प्रश्नातच असतात किंवा काही उत्तरांमध्ये पुन्हा प्रश्न असतात.
"प्रश्न हा, प्रश्न तो, प्रश्नातून निघती प्रश्न ते,
प्रश्न उणे प्रश्न, प्रश्नमेवावशिष्यते!"
आणखी :
जिज्ञासेपोटी प्रश्न असतात, ज्ञान मिळवण्यासाठी प्रश्न असतात, ज्ञान मिळाले की प्रश्न संपतात म्हणे. पण पूर्ण ज्ञान मिळालंय हे समजायचं कसं? तर ज्ञानातच ज्ञातेपणाची जाणीव असते का? ज्ञातेपणाची जाणीव म्हणजे ज्ञानाचा एक भाग? की प्रश्न मिटले ही खूण ज्ञात्याची? की प्रश्न आहेत, पण विचारायचं नाही, इतरांना भंडावून सोडायचं अथवा वेठीस धरायचं नाही, उत्तरं शोधत राहायची, मिळाली तर मिळाली, नाही तर नाही, हे कवयित्रीचं उत्तर हेच ज्ञान?
खूप मोठी व्याप्ती आहे या रूपकाची. तोंड दाबून गप्प बसायला लावणारी आर्थिक, सामाजिक, (कधी कधी) धार्मिक परंपरा, कुटुंबसंस्था, अंतर्गत विद्रोह, मानवी नाती अशा कितीतरी बाबींचा वेध घेता येईल या मुक्तकातून.
अर्थात मुक्तक अतिशय आवडलेच.

आतिवास's picture

23 Nov 2015 - 2:29 pm | आतिवास

प्रतिसाद आहे. तुमचे प्रतिसाद नेहमीच आवडतात.
तुम्ही स्वतंत्र लेखन करत नाही अशी तक्रार पुन्हा एकदा नोंदवते.

अभिजीत अवलिया's picture

23 Nov 2015 - 7:17 pm | अभिजीत अवलिया

दंडवत ...

मन उलगडत मी सांगितले,
“दुसऱ्यांनी दिलेली उत्तरे
पुरत नाहीत,
कितीही प्रगल्भ असली तरी.
आपली वाट आपल्यालाच
निर्माण करावी लागते नव्याने
हे समजले आहे मला.

हे विशेष आवडले.

पिशी अबोली's picture

24 Nov 2015 - 12:25 pm | पिशी अबोली

एका प्रश्नाचे एकच उत्तर
अन तेही अचूक
असे कधीच नसते.
दुसऱ्यांचीही उत्तरे समजून घेशील
गर्भगृहासह
तर अंतर्ज्योत उजळेल.

लाखमोलाची गोष्ट सांगितलीत ताई. रोज वाचतेय हे यक्षप्रश्न. :)

हेमंत लाटकर's picture

15 Dec 2015 - 11:56 pm | हेमंत लाटकर

यक्षप्रश्न आवडले.

अत्रुप्त आत्मा's picture

16 Dec 2015 - 12:21 am | अत्रुप्त आत्मा

सल्लाम!

जव्हेरगंज's picture

16 Dec 2015 - 5:03 pm | जव्हेरगंज

+१

सतिश गावडे's picture

16 Dec 2015 - 5:20 pm | सतिश गावडे

सुंदर... खुप दिवसांनी चांगलं मुक्तक वाचलं.