टेडी (भाग-3)

एकजटा अघोरी's picture
एकजटा अघोरी in जनातलं, मनातलं
19 Nov 2015 - 1:25 pm

क्षणार्धात वीणा आणि चव्हाण आवाजाच्या दिशेनं पळत सुटले. हॉलच्या डाव्या बाजूच्या बेडरूममधून आलेला होता आवाज. वीणा झटकन खोलीत शिरली. डाव्या कोप-यात एक जुनं लाकडी कपाट होतं. त्याच्या दरवाज्याशी आतून कुणीतरी झटत होतं. बाहेर यायचा प्रयत्न करत होतं. वीणाने पटकन दरवाजा अगदी जीव खाऊन ओढला. त्यासरशी दिया एकदम बाहेर येऊन फरशीवर पडली. आता तर ती अगदी जोरजोरात रडत होती. अगदी फ्रॅंटिकच झालेली होती. वीणानं तिला उचलून घेऊन थोपटायला सुरुवात केली, तशी ती थोडी शांत झाली.

काय झालं असावं ते आता त्यांच्या लक्षात आलं. त्या कपाटात एका कोप-यात एक मळकट टेडी बेअर ठेवलेला होता. कदाचित तो घ्यायलाच दिया आत शिरलेली असावी आणि ती आत गेल्यावर गंजलेल्या बिजागिर्‍या परत करकरत बंद झाल्या असाव्यात, ज्यामुळं दिया घाबरली असेल. आता तिला आणि चव्हाणला झाल्या प्रसंगाचं हसूच यायला लागलं. दिया अजून मुसमुसत होती. चव्हाणने तो टेडी उचलून तिच्या हातात दिला. त्याला छातीशी घट्ट धरुन दिया गपचुप बसून राहिली.

या अचानक उडालेल्या गडबडीनंतर वीणा हॉलमध्ये एक मोठा सोफा होता, त्यावर दियाला घेऊन थोपटत बसली. चव्हाण खाली चहा-कॉफी काही मिळतेय का ते बघायला गेला. थोड्याच वेळात दिया गाढ झोपी गेली. तिला सोफ्यावरच ठेवून वीणा बेडरूम्स पहायला गेली. तसं तर आता तिला काही तक्रार नव्हती घराबद्दल, थोडासा बाहेरचा माहौलच बरा वाटत नव्हता. पण थोडे दिवस इथं काढले की, पुन्हा नवीन ठिकाणी नोकरी बघावी, थोडा ज्यादा पगार असेल तर अजून चांगलं घर बघता येईल, असं गणित तिच्या डोक्यात चालू होतं.

चव्हाण चहावाल्याला घेऊन वर येत होता. त्याच्याही डोक्यात विचारांचा गोंधळ उडालेला होता. त्याला नक्की आठवत होतं, की ते कपाट लॉकच केलेलं होतं. ते अचानक उघडलं कसं काय? यापूर्वीसुद्धा त्यानं हा फ्लॅट भाड्याने अनेक वेळा दिलेला होता. पण ते एक चमत्कारिक बंगाली कुटुंब राहून गेल्यापासून ह्या फ्लॅटचे दिवसच बदलले होते जणू. तिथं राहिलेलं कुठलंच गिर्‍हाईक 6-7 महिन्यांवर टिकत नव्हतं. तशी तक्रार तर कुणीच काहीच केलेली नव्हती. पण प्रत्येकानं मात्र इथं बरंच वाटत नाही, असे उद्गार काढलेले होते. हे नवीन गिर्‍हाईक घेऊन आलो तर हा लफडा झाला. देवा काही झालं तरी हे गिर्‍हाईक सुटू नये हातातून, चव्हाण मनोमन प्रार्थना करत होता. हा अपशकुनी फ्लॅट खपवायला मालक त्याला अलिकडे जास्तच कमिशन देत असे.

पण चव्हाणच्या सुदैवानं तो आत आल्या आल्या वीणानं त्याला रेंटविषयी विचारलं. चव्हाणचा जीव भांड्यात पडला. शेवटी हो-नाही करता करता साडेआठ हजार भाडं आणि 30,000/- डिपॉझिट ठरलं. दोघेही आता तिथून बाहेर पडले. चव्हाणनेच तिला घरी सोडलं. आया घरात वाट पाहतच होती. तिच्याकडे ज्यादाची चावी अगोदरच दिलेली होती. वीणाने दियाला तिच्याकडे दिलं आणि आता ते नवीन ठिकाणी रहायला जाणार असल्याबाबत सांगितलं. आया थोडीशी अस्वस्थ झाली. वीणानं तिला नवा पत्ता सांगितला आणि विचारलं “तुला इथं यायला जमेल का? पाहिजे तर तिकिटाचे पैसे तेवढे वाढवून देते. आत्ता जास्त काही पगारवाढ नाही करु शकत. तुला तर माहितेच, सध्या अडचणी किती आहेत ते.”

क्षणार्धात आयाचा चेहरा उजळला. “अहो ते काही मला लांब नाही पडणार. इथे यायला जेवढा खर्च होइल साधारण तेवढाच खर्च होईल. जास्त काही होत असेल तर मग मी नक्कीच तुम्हांला सांगते. तेवढा फक्त मला द्या मग.” हे ऐकून वीणाला पण हायसं वाटलं. मंदा तिच्याकडे दोन वर्षांपासून कामाला होती. मराठी कुटुंबातीलच होती ती. अतिशय स्वच्छ राहणी, प्रेमळ स्वभाव व थोडी खमकी पण. दियाला तिच्याकडे सोपवून जाताना वीणाला कधीच कसलीच भीति वाटत नसे. चला, देवानं एक दार बंद केलं तरी दुसरी मात्र उघडली! गाढ झोपलेल्या दियाला तिच्याकडे सोपवून वीणा ऑफिसला निघाली.

मंदाने दियाला बेडवर अलगदपणे झोपवलं. तो मळकट टेडी अद्याप तिच्या हातात होता. तिने हलकेच तो सोडवला आणि दोन्ही हातांत त्याला उंच धरुन गंमतीने बघू लागली. तसा व्यवस्थित होता अजून, कुठे फाटलेला वगैरे नव्हता. पण बराच मळकट दिसत होता. याला स्वच्छ धुतलं तर दियाला नक्कीच आवडेल ते. मग छान दिसेल अजून तो टेडी. तिला स्वतःच्याच विचाराची गंमत वाटली. वीणाताई तिच्याकडून इतर कुठल्याही कामाची अपेक्षा करत नसत. केवळ आणि केवळ दियावर लक्ष ठेव एवढंच सांगणार कायम. त्यात नव-याबरोबर जशी भांडणं वाढू लागली तशा वीणाताई फार काकळ झाल्या स्वभावाने. तिला अगदी पाठच्या बहिणीसारखंच मानायच्या. देवानं खरंच अन्याय केला त्यांच्यावर, असं व्हायला नाही पाहिजे होतं. मंदाला सुद्धा फार वाईट वाटत होतं.

दिया आज अवेळीच झोपलेली होती. ही तिची नेहेमीची झोपायची वेळ नव्हती. शेवटी कंटाळा आल्यावर स्वयंपाकघरात जाऊन तिनं दियासाठी वरण भात लावला. दूध तापवून ठेवलं. फ्रीझमधून भाजी काढून चिरुन ठेवली. वीणाताईंना सोपं पडेल संध्याकाळी म्हणून. तो टेडी स्वच्छ धुतला बाथरूममध्ये जाऊन आणि खिडकीत वाळत ठेवला. विशेष काही काम वाटतच नव्हतं आज. दिया जरा जास्तच वेळ झोपलेली होती. एरवी नुसता घरभर धिंगाणा चालू असतो तिचा. थोडं कंटाळल्यासारखं वाटल्यावर तिनं टी.व्ही. लावला. तिचं आवडतं सीरियल ‘कसौटी कुसुम की’ लागलेलं होतं. आज महाएपिसोड चालू होता. तो बघण्यात ती एकदम रंगून गेली.

किती वेळ गेला कुणास ठाऊक? दिया उठल्याची तिला चाहूल लागली. तिने बेडकडे वळून बघितलं. अद्याप डोळ्यांची आळशी उघडझाप करत दिया इकडे तिकडे बघत होती. ती अगदी लाडाने तिच्या जवळ गेली. ‘गुड मॉर्निंग बेटा.’ त्याकडे दुर्लक्ष करीत दियाने विचारलं ‘माझा टेडी कुठं आहे?’ मंदा एकदम चपापलीच. आज अशी काय बोलतेय ही. एरवी झोपेतून उठल्या उठल्या मी पाहिजे असते तिला. असो, जाऊ देत. ‘बेटा इकडे ये. मी दाखवते तुला टेडी.’ मंदाने तिला उचलून घेतलं. आज दिया जरा जडच वाटत होती. तिला घेऊन ती खिडकीकडे गेली.

खिडकीत अगदी करकरीत उन्ह त्या टेडीवर पडलेले होतं. आता अगदी स्वच्छ आणि गोंडस दिसत होता तो. दिया आश्चर्याने बघत होती त्याच्याकडे. मंदाला स्वतःचा थोडा अभिमान वाटला. ती दियाला म्हणाली ‘बघ तुझा टेडी मी किती छान छान धुऊन ठेवलाय.’ दियानं रागीट नजरेनं तिच्याकडे पाहिलं आणि सण्णकन एक कानफटात ठेवून दिली तिला.
‘कु* का हात लावलास माझ्या टेडीला?’
मंदाचा विश्वासच बसला नाही स्वतःच्या कानावर. डोळे फाडफाडून ती दियाकडे बघत राहिली…

(क्रमशः)

कथा

प्रतिक्रिया

अमृत's picture

19 Nov 2015 - 1:41 pm | अमृत

पूभाप्र.

टवाळ कार्टा's picture

19 Nov 2015 - 2:15 pm | टवाळ कार्टा

लव्कर टाका पुढला भाग

बाबा योगिराज's picture

19 Nov 2015 - 5:22 pm | बाबा योगिराज

पुढील भाग लवकर एउद्या.

एक एकटा एकटाच's picture

19 Nov 2015 - 6:20 pm | एक एकटा एकटाच

मस्त जमलाय

फक्त थोडे मोठे भाग टाका
आणि लवकर टाका

अश्या गोष्टी मध्ये "क्रमश:" जास्त भयावह असतो

विशाखा राऊत's picture

19 Nov 2015 - 7:36 pm | विशाखा राऊत

पुभाप्र

इडली डोसा's picture

19 Nov 2015 - 10:25 pm | इडली डोसा

तुम्ही लेखनातुन प्रसंग डोळ्यासमोर उभे करता. छान लेखनशैली आहे. जरा लवकर लवकर भाग टाकलेत तर कथेची लिंक तुटणार नाही. धन्यवाद!

चिमी's picture

20 Nov 2015 - 11:37 am | चिमी

खुप दिवसांपासुन वाट बघत होते. छान जमलाय.
आधीच्या भागांची लिंक नवीन भागांमध्ये देत जा.
पुभाप्र.