टेडी-१ (भयकथा)

एकजटा अघोरी's picture
एकजटा अघोरी in जनातलं, मनातलं
12 Oct 2015 - 6:34 pm

अवघ्या ४ वर्षांची दिया आणि तिची आई वीणा कोर्टातून बाहेर पडल्या. वीणा थोडी धुसफुस करत होती, दियाला जवळजवळ खेचतच चालत होती. दुरुन तिचे वडील दुस-याच कुठल्यातरी स्त्रीबरोबर जाताना दियाला दिसत होते. तिच्या बालबुद्धीला याचं काही आकलन होत नव्हतं. अलिकडे पप्पा मम्मी सारखे भांडताहेत याची तिला जाणीव झालेली होती. पण हे सगळं काय असतं याचं मात्र तिला कोडं पडलेलं होतं.

तिच्या वडिलांनी तिच्या आईला हाताने तीनची खूण केली. दर तिस-या रविवारी तिचे वडील तिची भेट घेऊन तिच्याबरोबर वेळ घालवू शकणार होते, याची ती खूण होती. कोर्टानेच तसं निकालात नमूद केलेलं होतं. दियाच्या आईचा नुसता संताप संताप झाला ते बघून. दियाला जोराने खेचतच तिने कॉर्नरवर जाऊन रिक्षाला हात केला. रिक्षा थांबल्यावर वीणाने दियाला जवळजवळ कोंबलंच आत. दिया अजूनही वडिलांच्याकडे बघायचा प्रयत्न करीत होती. पण वीणाने पुन्हा पुन्हा “पप्पा बॅड आहेत.” असं सांगितल्यावर मग ती “हो, त्यांच्याशी बोलायचं नाही.” म्हणून गप्प बसली.

एव्हाना रिक्षा आनंदनगरच्या त्यांच्या प्रशस्त आरामशीर फ्लॅटकडे मार्गस्थ झाली. पण वीणाचं मन मात्र विचारांत भरकटलेलं होतं. कॉलेजमधलं सोनेरी प्रेमप्रकरण, घरच्यांचा विरोध पत्करुन लग्न करणे, दियाचं उशिरा झालेलं आगमन, तिच्या वडिलांचं बाहेरख्यालीपण, रोजचे वादविवाद, भांडणं! तिच्या हृदयात परत एक कळ उमटली. डोळ्यात आलेला एक चुकार अश्रू वा-याच्या फडफडीबरोबर कुठेतरी उडून गेला. रिक्षावाल्याने निर्विकार आवाजात “आपका घर आ गया.” अशी वर्दी दिली. कधी कधी अशा दुःखाच्या क्षणी ही अशी साधी माणसं देखील किती सुखी वाटतात नाही? यांना खरंच असेल का कुठलं दुःख? की सगळ्यांचं आयुष्य सारखंच असतं?

भाडं देऊन ती खाली उतरली. दिया तेवढ्यात पाय-या चढून लिफ्टपाशी पोहोचली पण होती आणि जोरजोरात बटण दाबत होती. घर्र..घर्र.. आवाज करत लिफ्ट खाली येत होतं. आतला दिवा बंद पडला असावा बहुतेक. काळागुडुप्प अंधार. वॉचमनला एक खणखणीत हाक मारुन याचा जाब विचरावा असं तिला वाटलं. पण ‘जाऊ दे! आपल्याला इथं राहणं परवडणार नाहीये आता’ हा विचार करुन तिनं आवंढा गिळला.

***

किती मानात राहिली होती ती इथं. पण गेल्या वर्ष दोन वर्षांत सगळ्याच्या अगदी चिंध्या उडाल्या होत्या. तिची चूक नाहीये हे सगळ्यांनाच पटत होतं. पण ती दिसली की लगेच दोन माना एकमेकांजवळ येऊन कुजबुजु लागत. कदाचित तिच्या नव-याच्या रंगेल गोष्टीच सांगत असाव्यात. तिच्याविषयी काय सांगून सांगून सांगणार? तिचं आयुष्य ती प्रामाणिकपणे जगत होती. एका चाकोरीत आयुष्य बंदिस्त करायला तिला फार आवडत असे. याच्या उलट त्याचा स्वभाव. अगदी खुशालचेंडू. पाण्यासारखा पैसा उडवणारा. एकेका रात्रीत महिन्याभराचा पगार उडवत असे तो. उसने मागायला आणि कर्जं घ्यायला एका पायावर तयार. इथपर्यंत ती त्याच्याशी केवळ भांडत होती. पण जेव्हा प्रकरण गुलाबी वळणं घेऊ लागलं, तेव्हा मात्र तिच्या पायाखालची जमीनच सरकली. मित्र-मैत्रिणी ‘सावध’चे इषारे देऊ लागले. पण सगळं काही हातातून सुटून गेलं होतं. एके रात्रि अगदी निर्लज्जपणे त्याने ‘ति’ला बेधुंद अवस्थेत घरी आणलं.

त्या रात्री वीणा हमसून हमसून रडली. दिया शेजारी निवांत झोपलेली. तिला या सर्वाचा काहीच अर्थ कळत नव्हता. ती रात्र तिनं तळमळत घालवली. दुस-या दिवशी त्याने कोरडेपणाने वीणाला सांगितले, “मी हे घर सोडून जातोय. मला दुसरं आयुष्य सुरु करायचंय. कोर्टात भेटूच. तुझी काही अपेक्षा आहे का सांग माझ्याकडून?” वीणा कडाडली “अरे हलकट माणसा, माझ्या मुलीला सांभाळायला मी खंबीर आहे. तुझा दमडाही नकोय मला. आत्ताच्या आत्ता चालता हो बाहेर ती घाण घेऊन.” अपमानाच्या जाणीवेने त्याचा चेहरा वेडावाकडा झाला, पण तो क्षणभरच! लगेच चेहरा कठोर करुन तो आणि ‘ती’ बाहेर पडले.

***

घराचं लॉक उघडून दोघी आत आल्या. दारातच लाईटचं बिल पडलेलं होतं. इथून बाहेर पडण्यापूर्वी सगळी सारवासारव करावी लागेल, याची वीणाच्या मनाने नोंद घेतली. घराच्या भिंती का कुणास ठाऊक आज फारच उदासवाण्या दिसत होत्या. वातावरणातच एक प्रकारची मरगळ होती. हातपाय धुऊन तिनं दियाला कार्टून चॅनल लावून दिलं आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागली. डाळ-तांदूळ धुऊन कुकरला लावला नसेल तेवढयातच मोबाईलची रिंग वाजली. थोड्याश्या नाराजीनेच तिनं फोन उचलला.

“हॅलो?”

“नमस्कार वीणा मॅडम. मी चव्हाण बोलतोय. काल तुम्ही आमच्या सुप्रीम इस्टेट एजन्सीत आलेला होतात ना चौकशीला? हां, तर तुम्हाला परवडेल असा एक अगदी स्वस्त फ्लॅट आहे. तुम्ही जिथं नोकरी करता त्या शांती नगर पासून चालत अगदी वीस मिनिटांवरच आहे. जवळच एक उत्तम नर्सरी स्कूल देखील आहे. मुलीची सोय झाली जवळच्या जवळ. बाकी फ्लॅट तर तुम्हांला नक्कीच आवडेल. १०,००० रु. भाडं सांगताहेत. पण तोडपाणी होईल. कधी येताय बघायला? आत्ता येताय?”

“नको! आता अंधार पडू लागलाय. उद्या शार्प ९.१५ ला येते तुमच्या ऑफिसात. तेव्हां असाल नं तुम्ही? याहून जास्त उशीर मला परवडणार नाही. मला परत ऑफिस गाठायचं आहे.”

“हो, नक्कीच मॅडम. मी वेळ चुकवणार नाही. तुम्ही या बरोबर ९.१५ ला.”

“ठीक आहे. धन्यवाद.” मनातला आनंद कष्टानंच दाबत वीणा कोरडेपणाने उद्गारली. ब-याचशा गोष्टी जुळून आलेल्या होत्या तिच्या मनासारख्या. भाडं पण ठीक आहे. त्यात इकडं-तिकडं होईल थोडंसं. अगदी खुशीत येऊन ती दियाजवळ गेली. प्रेमानं तिच्या डोक्यावर थोपटू लागली. टी.व्ही.वर छोटा भीम चेटकिणीला मारत होता. दिया अगदी खळखळून हसत होती. आत कुकरच्या शिट्ट्या वाजत होत्या.

(क्रमशः)

***

कथाआस्वाद

प्रतिक्रिया

एक एकटा एकटाच's picture

12 Oct 2015 - 6:47 pm | एक एकटा एकटाच

सुरुवात मस्त झालीय

सर्वपित्रीचा मुहूर्त साधलात काय???

पद्मावति's picture

12 Oct 2015 - 8:06 pm | पद्मावति

मस्तं सुरूवात. वाचतेय.

इन कम's picture

12 Oct 2015 - 9:27 pm | इन कम

इंटरेस्टिंग कथा…भयरस

सानिकास्वप्निल's picture

12 Oct 2015 - 9:39 pm | सानिकास्वप्निल

वाचतेय.

बोका-ए-आझम's picture

12 Oct 2015 - 11:39 pm | बोका-ए-आझम

पुभाप्र.
ता.क. - आयडी लय भारी हाय. असल्या आयडीच्या लेखकाने प्रेमकविता लिहिली तरी लोक्सना भीती वाटेल. (ह.घ्या)

एक एकटा एकटाच's picture

13 Oct 2015 - 7:02 pm | एक एकटा एकटाच

हां हां हां

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

31 Oct 2015 - 1:34 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ख्या ख्या ख्या....भुतं रोमान्स करत नैत असं म्हणायचय का बोकोबा तुम्हाला =))

अभय म्हात्रे's picture

13 Oct 2015 - 7:16 am | अभय म्हात्रे

खुपच छाण लिहिले आहात पुढिल भाग लवकर येईल हि अपेकशा

अजया's picture

13 Oct 2015 - 9:38 am | अजया

वाचतेय.पुभाप्र

प्रीत-मोहर's picture

13 Oct 2015 - 9:46 am | प्रीत-मोहर

सुरवात छाने. पुभाप्र

तुषार काळभोर's picture

13 Oct 2015 - 1:41 pm | तुषार काळभोर

पुभाप्र

सुरवात छान . पुभाप्र . बर्याच दिवसांनी भयकथा आली .

रे हलकट माणसा, माझ्या मुलीला सांभाळायला मी खंबीर आहे. तुझा दमडाही नकोय मला.

का म्हणून ? चांगला पैसा उक्लायचा त्याच्याकडून. अश्या हलकट माणसांना शिक्षा करताना इमोशनल होवून नसता अभिमान दाखवायचा नसतो . कारण तिच्या जन्माला तो सुधा जबाबदार आहे आणि त्याने जबाबदारी घेतलीच पाहिजे

पैसा's picture

13 Oct 2015 - 7:39 pm | पैसा

यातून भयकथा काय असेल याबद्दल उत्सुकता आहे. ती छोटी आणि तिच्या आईला अजून त्रास होणार का?

एकजटा अघोरी's picture

15 Oct 2015 - 8:46 pm | एकजटा अघोरी

हं! प्रश्न बरोबर आहे. पण भयकथेचे नायक नायिका व्हायचे म्हणजे त्रास तर ठरलेलाच! पण मी हाॅलीवूड स्टाईल लिहित नाही. माझ्या कथेत मानवी प्रयत्न जिंकतातच! हाॅलीवूडची भुते काहीही करा, परत परत उठत राहतातच! मला तरी ते पटत नाही. मी मानवी प्रयत्न व ईश्वरी शक्ती श्रेष्ठ मानतो! आणि ती असतातच!!!

प्रश्नलंका's picture

13 Oct 2015 - 8:11 pm | प्रश्नलंका

चांगली सुरुवात. पुभाप्र

ज्योति अळवणी's picture

14 Oct 2015 - 8:43 am | ज्योति अळवणी

सुरवात आवडली.

सौन्दर्य's picture

14 Oct 2015 - 9:14 am | सौन्दर्य

तरी अजून भय वाटेल असे काही आढळले नाही, पुढे येईल ही आशा आणि अपेक्षा आहे.

ब़जरबट्टू's picture

14 Oct 2015 - 10:06 am | ब़जरबट्टू

वाचतोय...

भिंगरी's picture

31 Oct 2015 - 1:20 pm | भिंगरी

पुढचा भाग कधी?

विजुभाऊ's picture

2 Nov 2015 - 6:13 pm | विजुभाऊ

अरेच्चा हे वाचायचे राहिले होते की