- डॉ. सुधीर रा. देवरे
तुम्ही एखाद्या मित्राला दिवाळीच्या शुभेच्छा पाठवल्या आणि पलिकडून उत्तर आले की, ‘मला तुमच्या दिवाळीच्या शुभेच्छा नकोत’, तर तुमच्या मनाची अवस्था काय होईल? माझ्या मनाची अवस्थाही तशीच झाली. दिवाळीच्या दिवशी मी माझ्या एका मित्राशी संवाद साधण्यासाठी काहीतरी निमित्त म्हणून दिवाळीच्या शुभेच्छांचा एसेमेस इतरांसोबत त्यालाही पाठवला. मित्राचे तिकडून जे उत्तर आले ते वाचून मी हादरलोच.
त्याने उत्तराच्या संदेशात म्हटले होते, मी हिंदू नाही. दिवाळी हा हिंदूचा सण आहे. म्हणून मला दिवाळीच्या शुभेच्छा देऊ नयेत.
बाप रे! उत्तर वाचून मला मुर्च्छा येण्याचेच बाकी राहिले. संदेश वाचून माझ्या पहिल्यांदा लक्षात आलं ते हे की, मी जन्माने हिंदू आहे आणि ज्याने हे उत्तर लिहिले तो इतर धर्मीय आहे. (सर्वच जातीधर्माचे माझे असंख्य मित्र असून हा अनुभव केवळ अपवादात्मक.) दिवाळीच्या शुभेच्छांचा असाही अर्थ काढला जाऊ शकतो हे मला आयुष्यात पहिल्यांदा लक्षात आलं.
खरं तर हा माझा नव्यानेच मित्र झालेला माणूस होता. मला जुजबी ओळखत होता. लहानपणापासून आणि विचारांनी त्याने मला ओळखले असते तर कदाचित त्याने असे उत्तर देताना शंभर वेळा विचार केला असता. माझ्या लिखाणाचे वाचन केलेला कोणीही वाचक असता तरी त्याने मला असे उत्तर दिले नसते. ते उत्तर वाचून मला राहवले नाही. मी त्याला समजावणीच्या सुरात पुन्हा एसेमेस केला: हिंदू आणि दिवाळी असा आजतरी काही संबंध मला दिसत नाही. दिवाळी आख्या जगात साजरी केली जाते. दिवाळी हा भारताचा सांस्कृतिक सण आहे. धर्माचा नाही. वगैरे. त्यानंतर त्याचे पुन्हा जे उत्तर आले ते तर अतिशय उध्दटपणाचे होते.
या उत्तरात त्याने म्हटले होते, तुम्ही जरा नीट अभ्यास करा, वाचन करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की दिवाळी का साजरी करतात. मला सल्ला देत त्याने पुढे म्हटले होते, सोबत मी तीन घटना देत आहे. त्या वाचा म्हणजे दिवाळी का साजरी करतात ते तुम्हाला कळेल. त्याने ज्या तीन गोष्टी सांगितल्या होत्या त्या अशा : अमूक एका धर्मीय भिक्षूचा अमूक ब्राम्हणाने खून केला म्हणून दिवाळी साजरी केली जाते. दुसर्या कथेतही त्याने असाच काहीतरी संबंध जोडून अमूक एक धर्म भारतातून हद्दपार झाला म्हणून दिवाळी साजरी करत असल्याचे म्हटले होते आणि तिसरी सर्वांना माहीत असलेली बळीराजाची कथा सांगितलेली होती... शेवटी तो म्हणाला, म्हणून बहुजनांनी दिवाळी साजरी करू नये.
अशा अतिशय उद्दाम पध्दतीने हा अनुभव मला सामोरा आला तरी या अनुभवावर मी चिंतन करू लागलो. आपण एखाद्याला दिवाळीच्या वा कुठल्याही सणाच्या शुभेच्छा कोणत्या अर्थाने पाठवतो. अशा शुभेच्छा पाठवताना या मित्राला अभिप्रेत असे सर्व अर्थ गृहीत धरून वाईट गोष्टींचे मी समर्थन करत होतो का? (जे सण जनमानसात आज शुभ समजले जातात त्याच सणांच्या शुभेच्छा दिल्या जातात. काही सणांच्या शुभेच्छा दिल्या जात नाहीत. उदा. मोहरमच्या शुभेच्छा दिल्या जात नाहीत.) समजा मला एखाद्या सणाच्या दंतकथेची पार्श्वभूमी माहीत आहे (उदाहरणार्थ दिवाळी) आणि तरी सुध्दा मी एखाद्याला त्या सणाच्या सहज शुभेच्छा पाठवल्या तर मी त्या माणसाचा उपमर्द करतो का? का एखाद्या अनिष्ट परंपरेचे समर्थन करतो. एखादा सण साजरा करण्यामागे असलेली कथा, लोककथा, दंतकथा, आख्यायिका या फक्त सांगिवांगीतून, कल्पनेतून वा विपर्यासातून निर्माण झालेल्या असतात का तो शंभर टक्के इतिहास असतो. ख्रिसमस साजरा करण्यामागे जितका स्पष्ट इतिहास असेल त्याच्या एक शतांशही इतिहास दिवाळी साजरा करण्यामागे नाही हे इथे आवर्जून लक्षात घ्यावे लागेल.
इतिहास असेल तर त्याला केवळ दंतकथा हा पुरावा होऊ शकत नाही. आणि तो तसा मानला तरी एकाच सणामागे तीन प्रकारच्या पार्श्वभूमी कथा कशा येऊ शकतात. मी वर ज्या मित्राचा उल्लेख केला त्याने बळीराजाच्या कथेसोबतच ज्या अजून दोन विशिष्ट धर्मिय अन्याय कथा सांगितल्या त्याच त्याच्या मताच्या विरूध्द जात होत्या. दिवाळी का साजरी केली जाते यावर त्याने तीन वेगवेगळ्या कथा सांगितल्या. या तीन कथांपैकी नक्की कोणत्या घटनेमुळे आधी दिवाळी साजरी झाली हे त्याला सांगता यायला हवे होते. का या तिन्ही घटना एकाच दिवसभरात घडल्या आणि या तिन्ही घटनांच्या विजयासाठी दिवाळी साजरी होते. म्हणजे बळी राजाला मारले म्हणून दिवाळी साजरी केली जाते. दुसरी कथा, अमूक एका भिक्षुचा एका ब्राम्हणाने खून केल्यामुळे दिवाळी साजरी केली जाते. आणि तिसरी कथा, भारतातून अमूक धर्म हद्दपार केल्यामुळे दिवाळी साजरी केली जाते असे हे तर्कट. कशातच कुठलाही ताळमेळ नाही. (समजा एखाद्या दिवाळीच्या दिवशी आपल्या घरात एखादी वाईट घटना घडली. तर फक्त त्या वर्षापुरती आपण दिवाळी साजरी करणार नाही, का कायमस्वरूपी आयुष्यात दिवाळीच येऊ देणार नाही? आणि आपल्या घरात अमूक एका दिवाळीत अशी वाईट घटना घडली म्हण़ून लोक दिवाळी साजरी करतात, असा समज करून आपल्याला तसा प्रचार करता येईल का?) त्याचे हे तर्कट स्वत:चे नसावे. एखाद्या संशोधनात्मक अभ्यासपूर्ण संदर्भ ग्रंथामध्येही ते त्याने वाचलेले नसावे. कुठल्यातरी भडकाऊ भाषणातून वा चटपटीत मासिकातून वाचून त्याने दिवाळीबद्दल आपले मत बनवलेले दिसले.
आज आपण दिवाळी साजरी करतो. दिवाळीला सर्वच धर्माचे लोक एकमेकांना शुभेच्छा देतात. आपण ख्रिसमस साजरा करतो. सर्व धर्माचे लोक एकमेकांना शुभेच्छा देतात. आपण रमजान ईद साजरा करतो. सर्वच धर्माचे लोक एकमेकांना शुभेच्छा देतात. आपण बौध्द पौर्णिमा आणि महावीर जयंतीही साजरी करतो. पैकी अनेकांना अशा सणांमागची पार्श्वभूमी माहीत असतेच असे नाही. पण आपण दिवसेंदिवस लोकपरंपरेच्या या सगळ्या सणांबाबतही सर्व धर्मिय ग्लोबल होत एकमेकांना या निमित्ताने शुभेच्छा देत एकमेकांच्या जवळ येऊ पहातो ही मानवतेची एक चांगली खूण आहे. माझा एक मुस्लीम धर्मिय बालमित्र आहे. तो मुस्लीम धर्मिय आहे असा उल्लेख आज मी पहिल्यांदा करतोय. कारण आमच्या मैत्रीत कधीही धर्म आडवा येत नाही. प्रत्येक रमजान ईदच्या दिवशी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी आधी त्याचा मला फोन वा एसेमेस येतो. नंतर मी त्याला शुभेच्छा देतो. त्याच्या शुभेच्छा आल्या तर मी मुसलमान नसूनही हा मित्र मला का एसेमेस करतो असे मला कधी वाटले नाही. कधी वाटणारही नाही. आणि कोणालाही तसे कधी वाटू नये.
खरे तर माझ्या मते आज कोणताच सण एखाद्या धर्मापुरता धार्मिक सण राहिलेला नाही. सण साजरा करणे या आज ग्लोबल लोकपरंपरा झाल्या आहेत. निदान भारतात साजरे होणारे अनेक सण हे हिंदू धर्माचे सण आहेत असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरेल. सण हे धार्मिक असण्यापेक्षा इथल्या अस्तित्वाच्या सांस्कृतिक खुणा आहेत, असे मला वाटते. दिवाळी ही भारताची सांस्कृतिक खूण आहे. हा प्रकाशाचा सण आहे. आपल्याला न्यूनगंडच पाळायचा झाला तर आपण बळीराजाच्या शुभ स्मृतीसाठीही तो साजरा करू शकतोच की. दिवाळी ही एकीकडे अनेक गोष्टींचे प्रतिक होताना दिसते तर दुसरीकडे अशा अनुभवाचा ठणठणीत सांस्कृतिक दुष्काळ सामोरा येताना दिसतो. मलेशिया- इंडोनिशिया हे मुस्लीम धर्मिय देश असूनही तिथे कलात्मक रामायण नाट्य साजरे केले जाते. पाकिस्तान हा मुस्लीम देश असूनही मकरसंक्रातीला अनेक ठिकाणी पंतग उडवले जातात. सारांश, आजचे सण हे लोकपरंपरेच्या सांस्कृतिक खुणा ठरत आहेत. धार्मिक उत्सव नव्हेत. धर्माच्या उन्मादाला विरोध करणे वेगळे आणि सांस्कृतिकता पाळणे या दोन्ही वेगवेळ्या गोष्टी आहेत.
(सदर लेख दिनांक 12-11-2015 च्या महाराष्ट्र टाइम्स (नाशिक विभाग) मध्ये प्रकाशित झाला आहे. लेखातील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)
- डॉ. सुधीर रा. देवरे
इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
प्रतिक्रिया
15 Nov 2015 - 3:48 pm | रामदास
ख्रिसमस साजरा करण्यामागे जितका स्पष्ट इतिहास असेल त्याच्या एक शतांशही इतिहास दिवाळी साजरा करण्यामागे नाही हे इथे आवर्जून लक्षात घ्यावे लागेल.
हे वाक्य नाही समजले आणि वाचताना थांबलेलो आहे
बाकी सुरुवातीला
अमूक एका धर्मीय भिक्षूचा अमूक ब्राम्हणाने खून केला म्हणून दिवाळी साजरी केली जाते. दुसर्या कथेतही त्याने असाच काहीतरी संबंध जोडून अमूक एक धर्म भारतातून हद्दपार झाला म्हणून दिवाळी साजरी करत असल्याचे म्हटले होते आणि तिसरी सर्वांना माहीत असलेली बळीराजाची कथा सांगितलेली होती... शेवटी तो म्हणाला, म्हणून बहुजनांनी दिवाळी साजरी करू नये.
हे संदर्भ स्पष्ट कराल का ?
15 Nov 2015 - 4:11 pm | डॉ. सुधीर राजार...
चर्चा करू यात. धन्यवाद.
15 Nov 2015 - 4:21 pm | आदूबाळ
इथेच कराल का?
तुमच्या ब्लॉगवर यायचं नाहीये आणि व्हॉट्सअॅपसाठी तुम्हाला नंबर द्यायचा नाहीये.
धन्यवाद.
19 Nov 2015 - 4:27 pm | माहितगार
१) दिपावली परंपरा ख्रिसमस पेक्षा जुनी असण्याची शक्यता वाटते तरीपण दिपावलीची परंपरा ख्रिसमस पेक्षा जुनी आहे का त्या नंतरची या बद्दल काही नेमके (साहित्यातील) संदर्भ कुणी देऊ शकेल का ?
२) धागा लेखकास दिपावलीच्या आख्यायिकांना प्रमाण संदर्भ उपलब्ध नाहीत असे म्हणावयाचे आहे का ?
३) बाकी त्या भिक्षू प्रकरणाबाबत यापुर्वी कुठेही वाचलेले नाही गूगलबुक्सवर चाळीस पुस्तके पालथी घातली कुठेही कुठलाही संदर्भ मिळालेला नाही त्या बाबत मात्र संदर्भ निश्चितपणे गरजेचा वाटतो
15 Nov 2015 - 3:54 pm | जव्हेरगंज
हिंदू आणि दिवाळी असा आजतरी काही संबंध मला दिसत नाही. दिवाळी आख्या जगात साजरी केली जाते. दिवाळी हा भारताचा सांस्कृतिक सण आहे. धर्माचा नाही.>>>>>>>>>
बास!!!
ईथपर्यंतच वाचलं साहेब,
ईथुन पुढं वाचायचं काय धाडस होईना.
नमस्कार!!
15 Nov 2015 - 4:12 pm | डॉ. सुधीर राजार...
धाडस का होईना. पुन्हा प्रयत्न करून पहा. धन्यवाद.
15 Nov 2015 - 4:30 pm | मारवा
एक प्रश्न तुमचा मित्र संभाजी ब्रिगेड संघटनेशी संबंधित आहे का ?
कारण त्याने ज्या तीन घटना सांगितल्या त्यातील तिसरी बळीराजा संदर्भातील ती एक संभाजी ब्रिगेड या संघटनेकडुन मांडली जाणारी कथा आहे.
बळीवंश या डॉ. आ.ह.साळुंखे यांच्या पुस्तकात याची विस्तृत मांडणी आहे. मला वाटत तो संदर्भ ज्याचा संक्षेप वामन हे ब्राह्मण प्रतिक आहे व बळी हे बहुजनांच वामनाने विश्वासघाताने न्यायी बळी राजाचा बळी घेतला. अशा अर्थाची मांडणी आहे. त्या बळी या प्रतीकासंदर्भातुन तो तसे म्हणाला असावा.
दुसरी भिक्षु चा खुन कोणता ते काय माहीती नाही. पण तुम्ही भिक्षु म्हणतात तर माझ्या अल्प माहीतीनुसार तो बौद्ध च असणार. आणि बहुजनांनी करु नयेत म्हणतोय म्हणजे रोख बौद्ध भिक्षु असाच असण्याची दाट शक्यता
तिसरी भारतातुन अमुक धर्म हद्द्पार हाही निर्देश बौद्ध धर्माकडेच आहे असे वाटते पण तसे तर काही झालेले नाही.
अर्थात हे सर्व अंदाजच आहेत तुमच्या मित्राची भुमिका एकतर तुम्ही स्पष्टपणे न मांडता काहीतरी हातचं राखुन मांडलेली आहे. त्यात विषय स्फोटक असल्याने तुम्ही जपुन लिहीत आहात की
मित्राच्या आडुन तुमची स्वतःची काहीतरी मांडणी तुम्ही करत आहात यावीषयी प्रामाणिकपणे शंका वाटते
म्हणुन मी तुम्हाला स्पष्टपणे विचारतो
तुम्ही इतके अनभिज्ञ का बनत आहात ? तुमचं शिक्षण आणि एकंदर लेखन वाचुन तुम्हाला महाराष्ट्रातल्या प्रत्येक सुशिक्षीताला अगदी थोडस सामाजिक सांस्कृतिक भान असलेल्या माणसाला ज्या गोष्टी सहज समजतात माहीतीत असतात
त्या तुमच्या सारख्या वरच्या पातळीवरील व्यक्तीला माहीतीच नसतील असे असणे अशक्य वाटते.
बाकी शंका चुकीची असु शकते माझा अंदाज चुकीचा ही असेल कदाचित
आपण सरळ विचार मांडावेत असे म्हणतो. अस आडुन आडुन अर्धवट अर्धवट काही अर्थ नाही.
17 Nov 2015 - 1:00 am | उगा काहितरीच
प्रचंड अनुमोदन !
रच्याकने लेखकाचे मुद्दे जर वर अंदाज केल्या प्रमाणे असतील तर....
.
.
पॉपकॉर्न घेऊन बसलेले बरे!
15 Nov 2015 - 10:26 pm | माहितगार
पाकीस्तानच्या कराचीत मागच्या वर्षीच्या दिवाळीत पाकीस्तान पिपल्स पार्टीच्या मंडळींनी स्वतःची छायाचित्रे काढून घेतली, या वर्षी त्यांनी दिवाळी केली नाही का त्यांच्या बातम्या दाबल्या माहित नाही मागच्या दिवाळीत नवाझ शरीफांचा पक्ष नव्हता यावर्षिच्या दिवाळीत मात्र नवाज शरीफ आणि पार्टीने हिरहिरीने फोटो सेशन्स करून घेतलेली दिसतात. आंतरराष्ट्रीय कम्यूनीटीसमोर स्वतःचा चेहरा सोज्वळ करून दाखवण्याची तयारी चालू असण्याची आणि त्यासाठी रंगपंचमी खेळण्याची तयारीही असू शकते. एनी वे खालील दुव्यात हिंदूमित्र शरीफांचे आणि त्यांचा पक्ष सत्तेत असलेल्या लाहोरातील फोटोही पाहून घ्यावेत. (दुवे पाकीस्तानी वृत्तपत्रातील)
* Religious-harmony-PM-Nawaz-attends-Diwali-ceremony-in-Karachi
* Diwali at Governor’s House (लाहोर)
* Pakistani Hindus Celebrate Diwali in Karachi
16 Nov 2015 - 1:37 pm | बोका-ए-आझम
ही दोन विधानं परस्परविरोधी नाहीत का? मित्र झालेला माणूस तुम्हाला जुजबी ओळखत होता मग तो ' मित्र ' कसा काय? शिवाय दुस-या कोणीतरी तथाकथित रीतीने केलेल्या दुष्कृत्याबद्दल जर तुमचा हा ' मित्र ' तुमच्याकडून शुभेच्छा घेत नसेल तर तो मूर्ख किंवा टेंपोत बसवण्याच्याच लायकीचा आहे हे तुम्हाला कळलं नाही का?
अजून एक. अशा लोकांशी मैत्री तोडणं ही असहिष्णुता होईल की काय अशी तुम्हाला शंका किंवा स्पष्ट शब्दांत विचारायचं तर भीती वाटते आहे का?
16 Nov 2015 - 6:06 pm | डॉ. सुधीर राजार...
या लेखाचा उत्तरार्ध जरूर वाचावा. खरं तर त्या उत्तरार्धासाठीच हा लेख लिहिला आहे. कोणत्याही सणांबाबत आपण उदार दृषे्टीकोन ठेवावा. हा माझा सण हा तुमचा असे नसते. आणि मी सणांकडे लोकपरंपरा - लोकसंस्कृतीच्या दृष्टीकोनातून पहात असतो. असा दृष्टीकोन रूढ व्हावा आणि विविधतेत एकता निर्माण व्हावी हे सांगण्याच्या प्रयत्नासाठी मी हा लेख लिहिला आहे
- डॉ. सुधीर रा. देवरे
16 Nov 2015 - 6:14 pm | आदूबाळ
ते चर्चेचं काय झालं?
16 Nov 2015 - 6:19 pm | प्रसाद गोडबोले
ह्यॅ ह्यॅ ह्यॅ !
ह्यॅप्पी दिवाली रे आदुबाळा =))
16 Nov 2015 - 7:10 pm | आदूबाळ
=))
असं डिस्काऊंटमध्ये काढू नको काकांना. खरंच यायचे चर्चा करायला.
17 Nov 2015 - 3:29 pm | नाखु
"चाय पे चर्चा"
मग इथे काय नाव देणार "पाय" पे चर्चा
16 Nov 2015 - 6:23 pm | प्रसाद१९७१
तुम्ही कसले डॉक्टर आहात हो? जेन्युइन शंका म्हणुन विचारतोय. म्हणजे त्याप्रमाणे तुमच्या लेखांना प्रतिसाद द्यायला.
मॉडर्न मेडीसीन चे डॉक्टर आहात का?
16 Nov 2015 - 6:48 pm | नमकिन
एखाद्या विषयाचा खूपंच अभ्यास केला की त्याला डॅाक्टर असे म्हणायचे
16 Nov 2015 - 7:01 pm | प्रसाद१९७१
आमचे बारामतीचे काका पण डॉक्टर आहेत हो.
मेडीसिन चे ( ते सुद्धा मॉडर्न मेडीसीन चे च ) डॉक्टर असतील तर माझ्या कडुन वावगे बोलणे होणार नाही म्हणुन आधीच विचारले.
16 Nov 2015 - 7:50 pm | माहितगार
??..
17 Nov 2015 - 9:17 am | प्रसाद१९७१
साधे सरळ आहे हो. हे लेखक महाशय जे हिन दर्जाचे लेख पाडत असतात त्यावर काहीतरी उर्मट प्रतिसाद द्यावा असे मनात येते, पण त्यांचे "डॉ" बघुन थांबतो.
मेडीसन च्या डॉक्टर बद्दल मनात बाय डीफॉल्ट आदर येतो. बाकी डॉक्टर लावणार्या लोकांबद्दल तसे नाही.
17 Nov 2015 - 10:55 am | कानडा
असे का हो? [डोळा मारा]
---
प्रा. डॉ. कानडा (Ph.D. (CSE))
17 Nov 2015 - 11:21 am | प्रसाद१९७१
कानडा साहेब, अहो हे माझे वैयक्तीक आहे, तुम्ही ते वैयक्तीक घेऊ नका.
१. मॉडर्न मेडीसन च्या डॉक्टर बद्दल मनात बाय डीफॉल्ट आदर येतो. म्हणजे स्टार्टींग पॉईंट आदर हा असतो, कोणी डॉक्टर त्या आदराचे रुपांतर अनादरात करू शकतो.
२. बाकीच्या शास्त्रातल्या डॉक्टर बद्दल, बाय डीफॉल्ट थोडासा आदर, पण फार नाही. म्हणजे स्टार्टींग पॉईंट न्युट्रल असतो. पुढे काय होईल ते सांगता येत नाही.
३. साहीत्य, समाजशास्त्र ... असल्या विभागातल्या डॉक्टर बद्दल पहिले मत निगेटीव्ह असते. पुढे जसे होइल तसे.
ह्याचा कार्यकारण भाव जो काय असेल तो असेल. पण मेडीसीन च्या डॉक्टर ला मी जालावर सुद्धा वावगे बोलत नाही.
17 Nov 2015 - 1:15 pm | कानडा
अहो, मी गमतीनेच म्हटले आहे. [डोळा मारा] हे बघितले नाही का? आणि तुम्ही मुळात वैयक्तीक बोललाच नव्हता त्यामुळे मी ते तस घेण्याचा प्रश्नच नव्हता.
बाकी तुम्ही जे १,२,३ पॉईंट दिले आहेत ते सर्वांचेच असतात फक्त त्याचा क्रम बदलत असतो.
---
कानडा
अवांतर : च्यायला, मिपावर slimey टाकण शिकावच लागेल.
17 Nov 2015 - 1:48 pm | जव्हेरगंज
17 Nov 2015 - 1:54 pm | कानडा
फक्त smiley टाकू नका हो. कशी टाकायची ते ही सांगा की...
---
कानडा
19 Nov 2015 - 3:51 pm | माहितगार
@ प्रसाद१९७१, मी कठोर (पण सभ्य) टिकेचा समर्थक आहे, तुमचा प्रतिसाद वाचून मला आल्या त्या शंका अश्या
१) आपण त्यांच्या एका पेक्षा अधिक लेखांचा संदर्भ देत आहात तेव्हा आपण त्यांच्या आधीच्या इतर लेखातून पुर्वग्रहदुषित होऊन त्यांच्या इतरही लेखना बद्दल मत बनवत आहात काय?
२) आपली टिका व्यक्तीच्या लेखन आणि विचारांपुरती मर्यादीत न राहता व्यक्तीगत होते आहे का ? 'अबकड' व्यक्तीने 'हळक्षज्ञ' विचार मांडला तर त्या ह,ळ,क्ष,ज्ञ पैकी तुम्हाला न पटलेला नेमका विचार काय आहे त्यावर नेमके बोट ठेऊन टिका स्वागतार्हच असेल, पण व्यक्तीगत टिकेमुळे किंवा केवळ तुम्ही मनातल्या मनत एखादा विचार हिन म्हणून विचार व्यक्त करणार्या व्यक्तीला व्यक्तीगत टिकेचे लक्ष केले तर फारतर ती व्यक्ती पुन्हा येणार नाही पण मुळातून तुम्हाला नको असलेला विचार शिल्लकच राहतो. न पटणार्या विचारांशी लढा विचारांनीच द्यावा लागतो गोष्ट व्यक्तीगत करून एखाद्या व्यक्तीचा न पटणार्या गोष्टीमुळे व्यक्तीगत अपमान करून कसे जमते ?
३)
व्यक्तिलक्ष्य तर्कदोष
मुळ युक्तिवादास बगल देऊन, युक्तिवाद करणाऱ्या व्यक्तिस नकारात्मक लक्ष्य बनवण्याच्या उद्देशाने अथवा अप्रस्तुत विषयाकडे लक्ष वळवण्यारा, अप्रस्तुत मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तर्कदोषास(तार्कीक उणीवेस) व्यक्तिलक्ष्य तर्कदोष अथवा व्यक्तियुक्ती[१] अथवा Ad hominem [मराठी शब्द सुचवा] असे म्हणतात.यास अप्रस्तुत अथवा अनौपचारिक तर्कदोष असेही समजले जाते.
व्यक्तिगत आरोप व्यक्तिलक्ष्य तर्कदोष ("व्यक्तिगत आरोप " अथवा "व्यक्तिगत हल्ला") सहसा विरोधकांचा युक्तीवाद अग्राह्य ठरावा या उद्देशाने विरोधकाच्या दाव्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला जातो; यात विरोधकाच्या युक्तिवादाशी संबंधीत नसलेल्या कृती अथवा विरोधकाच्या चारीत्र्यातील खऱ्या (पण सदहुर युक्तिवादाशी संबंधीत नसलेल्या) उणीवांकडे लक्ष वेधणे याचा आंतर्भाव केला जातो.
एखाद्या व्यक्तिच्या समर्थ युक्तिवादाची तुलना त्या व्यक्तिच्या चारीत्र्यविषयक इतर गुणांशी, अथवा संबंध नसलेल्या कृतीशी करणे हा एक तर्कदोष असतो.
बाकी जसे धागा लेखकास अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तसे आपल्यालाही अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहेच.
उदाहरणे:
*" महापौरपदाच्या उमेदवाराचा विभागीकरण विषयक प्रस्ताव हास्यास्पद आहे. २००३ मध्ये त्यांच्यावर करचुकवेगिरीचे आरोप झाले होते."
*" तू एवढा काय दिडशहाणा लागून गेला आहेस की इश्वराचे अस्तीत्वसुद्धा नाकारू शकतोस ? तुझे शालेय शिक्षण सुद्धा अजून पूर्ण झालेले नाही."
*"डॉ.स्मीथ एवढे नावाजलेले हृदयरोग तज्ञ आहेत, तरीही त्यांना जुगार खेळण्याच्या कारणावरून अटक का केली गेली?"
*"तुमचे फॅशन बद्दलचे मत अवैध आहे ;कारण तुम्हाला साधी नवे बूट घेणे देखील परवडत नाही."
*"सरकारच्या आर्थीक स्थितीवर मत मांडावयास मोहन आहे तरी कोण? त्याला स्वत:ला साधी नौकरी सुद्धा नाही!"
@ प्रसाद१९७१, प्रथम दर्शनीतरी त्यांच्या डॉक्टर असण्या नसण्यावरूनची कॉमेंटे १) व्यक्तीलक्ष्य तर्कदोष २) बघा मी कसा उर्मटपणाचे प्रदर्शन करू शकतो या गटांमधली वाटते आहे.
बाकींच्या प्रमाणेच अद्यापावेतो आपल्याही प्रतिसादात इतर चर्चाविषयातून येणारे पुर्वग्रह, निष्कर्ष घाईचा दोष संभवतो असे वाटते आहे. असो.
19 Nov 2015 - 4:49 pm | मारवा
माहीतगारजी
ही एन्ट्री मराठी विकीपेडीयात घेण्यासाठी अनेक धन्यवाद !
माझ्याकडुनही अशीच चुक वरील धागालेखकास प्रतिसाद देतांना काही प्रमाणात झालेली आहे याच्यासाठी मी
वरील धागालेखकाची अगदी प्रामाणिकपणे माफी मागतो माझ्या हातुन चुकच झाली यात शंका नाही.
आता ज्या कारणाने असे घडले तो माझा मुळ आक्षेप असा होता की
डॉ. साहेब जी उदाहरणे देत आहेत त्याचा संदर्भ स्पष्ट होत नाही म्हणुन मला अशी शंका जी वाटते की डॉ. साहेबांना जे म्हणावयाचे आहे ते नक्कीच व्यक्त करण्यात ते कुठेतरी कमी पडलेले आहेत कींवा मी समजण्यात कमी पडलेलो आहे.
जरी दोन्ही संभावना गृहीत धरल्या तरी या दोन्ही पैकी कुठल्याही एका कारणासाठी
वरील आक्षेप कायम ठेवत मी त्यांना अधिक विस्तृत मांडणी करण्याची नम्रतापुर्वक विनंती करतो.
व माझ्या हातुन झालेल्या व्यक्तीलक्ष्यी विधानाविषयी पुनश्च माफी मागतो.
19 Nov 2015 - 5:27 pm | माहितगार
मला धागा लेखावरून जाण्वले ते या प्रमाणे: मारवाजी एक वेगळे उदाहरण देतो. रांगोळी आहे. रांगोळी एक भारतीय सांस्कृतीक परंपरा आहे. सांस्कृतीक परंपरा आणि धर्म बर्याचदा एवढे सोबत असतात की ते एकच आहेत समजून लोक गल्लत करत राहतात. रांगोळीत फक्त हिंदू असण्यासारखे काय आहे ? भारतातल्या इतर धर्मीयांनी रांगोळीसारखी सुंदर कला आत्मसात करून आपल्या परंपरांना अधिक सौंदर्याने विकसीत का करू नये ? बहुतांश पारंपारीक रांगोळी डिझाइन्स अमुर्तकला प्रकारात मोडता त्यामुळे रांगोळीतील अमुर्त डिझाईन्स मुर्तीपुजा न करणार्या समुदायांना पण चालून जावयास हवीत तरीही रांगोळीसारखी साधी गोष्ट धार्मीक संकुचिततेस पार करून पुढे जाऊ शकत नाही कारण संस्कृतीची धर्मा सोबत केलेली अनावश्यक गल्लत. दिवाळी सणाचा केवळ दिव्यांचा प्रकाशाचा सण म्हणून हिंदूंशिवाय इतर भारतीयांनी स्विकारण्यास हरकत नसावी असे काहीसे या धागा लेखातून लेखकास सुचवायचे असावे.
दुसरा भाग त्यांनी पुर्वपक्ष - उत्तरपक्ष अशा प्रकारच्या मांडणीचा प्रयत्न केला असावा पुर्वपक्ष म्हणजे त्यांना न पटणारे मत त्यांनी मित्राचे मत म्हणून दिले असावे. न पटणार्या व्यक्तीला मित्र म्हणणे हा त्यांच्या व्यक्तीगत सौजन्याचा भाग झाला. एखाद्या व्यक्तीने विचार न पटणार्या व्यक्तीशी किती सौजन्यपुर्वक विनम्रपुर्वक त्याला संबोधीत करावे हा ज्याच्या त्याच्या व्यक्तीगत चॉईसचा भाग आहे.
(एक मात्र मलाही वाटतेकी केवळ एका व्यक्तिच्या वाक्यावर त्यास एकही एक्स्ट्रा दुजोरा अथवा संदर्भ नसताना उधृत करणे होता होईतो टाळले पाहीजे कारण एका व्यक्तिच्या मतावरून एखाद्या मोठ्या गटाचे मत तसे आहे का अशी भ्रांती निर्माण होऊ शकते.)
धागा लेखकाची दुसरी गल्लत/घाई तुम्ही म्हणता तसे मांडणी संदर्भाने ख्रिसमससोबत तुलना करताना होत असावी. लेखकास दिपावलीच्या पौराणीक आख्यायिकांना प्रमाण ऐतिहासीक संदर्भ नाहीत असे म्हणावयाचे असेल तर त्यात तेवढे वावगे काही नाही. भारतातल्या बर्याच लोकपरंपरा खुप आदीम आहेत त्यांना पौराणिक आख्यायिकाचे संदर्भ नंतरच्या काळात जोडलेले असू शकतात तसे दिपावलीच्या बाबतीत आहे असे लेखकाचे व्यक्तीगत मत असेल तर त्यात खूप वावगे काही नाही.
ख्रिसमसपेक्षा दिवाळीचा सण नवा आहे असे लेखकास म्हणावयाचे असेल तर त्यासाठी मात्र त्यांनी संदर्भ आणि दाखले द्यावयास हवेत असे मलाही वाटते.
16 Nov 2015 - 11:38 pm | दिवाकर कुलकर्णी
लेख सब मन गढत आहे.
19 Nov 2015 - 3:57 pm | माहितगार
१) मला वाटते लेख शीर्षकात प्रश्नचिन्ह असावयास हवे होते का ?
२) भिक्षू हत्येची कथा कुठेही या पुर्वी वाचनात नाही तेव्हा त्याचा नेमका संदर्भ देणे जमू शकेल का ? की वरच्या प्रतिसादात म्हटल्या प्रमाणे धागा लेखकाच्या मित्राने खरेच मनगढंत स्टोरी दिलेली असण्याची शक्यता आहे ?
19 Nov 2015 - 4:42 pm | माहितगार
१) माझ्या वाचनात आलेल्या दिवाळी आख्यायिकांमध्ये धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपुजन या आख्यायिका लक्ष्मीपुजना संबंधित आहेत.
२) नर्कचतुर्दशीच्या भारतात दोन आख्यायिका येतात एकात श्रीकृष्णपत्नी सत्यभामा श्रीकृष्णाच्या साहाय्याने अथवा स्वतः नरकासुराचा वधकरून १६ हजारस्त्रीयांचे संरक्षण करवते/सोडवते पर्यायी कथा आसामातील कामाख्या देवीची आहे त्यातही ती स्व(स्त्री)संरक्षणार्थ नरकासुराचा वध करते या दोन्ही आख्यायिका सुस्पष्टपणे स्त्री संरक्षणासंदर्भाने येतात.
३) भाऊबीज हा दिवसही केवळ भाऊ बहीण या नात्याचे भावबंध जपण्यापलिकडे काही नसावा
४) बलीप्रतिपदा एक आख्यायिका 'बली' चा आदरच करते त्याच प्रतिपदेला काही ठिकाणी श्रीकृष्ण गोवर्धनपुजा केली जाते ज्यात इंद्रदेवता आणि इंद्राच्या कोपाला बाजूला ठेऊन जनतेस उपयुक्त असलेल्या गोवर्धनाची पुजा करण्यास कृष्णाने परावृत्त केले हि कृष्णाचीकृती काळानुसार बदलण्याची आणि बहुजनवादी असण्याची वाटते.
स्त्री संरक्षण, भावाबहीणेचे नाते जपणे, बलीप्रतिपदा, आणि लक्ष्मीपुजन यासर्वच गोष्टी बहुजन सुखकर असाव्यात. कोणत्याही समुह गटास दुखावणारे दिपावलीच्या सणामागे कोणत्याही प्रचलित आख्यायीकेत कधीही आढळलेले नाही.
संदर्भांशिवाय द्वेषपसरवण्यासाठी काही बाही बोलणारे सर्वत्रच असतात पण मलातरी दिपावलीचा प्रकाश निर्भेळ आणि सात्विकच प्रतीत होतो
19 Nov 2015 - 4:48 pm | भाऊंचे भाऊ
ओह. चालायचं मिपावर तो अजुनही अप्रकाशित करता येउ शकेल.