अथ काकापुराण.

रामदास's picture
रामदास in जनातलं, मनातलं
31 Aug 2008 - 3:02 pm

लग्न झालं आणि मी राव झालो.बायकोच्या धाकट्या बहिणीचं लग्न झालं आणि मी पंत झालो. काही वर्षापूर्वी काका पण झालो.नैसर्गीक क्रमानी माझी उत्क्रांती होतेआहे असं म्हणता म्हणता काकापण अचानक खुपायला लागलं.पन्नासाव्वा वाढदिवस झाला त्या दिवशी माझा पुतण्या आला होता. माझ्या हातात एक गुळगुळीत कागदात गुंडाळलेलं पुस्तक देत म्हणाला काका, आता रिटायरमेंट प्लॅनींग कर. ह्या पुस्तकात बघ सगळी माहिती दिलीय. माझी बायको नाक फेंदारत म्हणाली
"हे आणि रीटायर?"
"करेला और निमचढा. " "बाई बाई आताच घरी असतात तेव्हा हा धुडगुस घालतात ."
बोलता बोलता जीभ चावली खरी ....
पण पुतण्या टिर्‍या बडवत तासभर हसत होता.
पण आता काकापण जास्तच हुळहुळायला लागलं.
तसा आजकल भास होत होताच.कॉलनीतली पोरंटोरं त्याच्या समोरून गेलं की गप्प व्हायला लागली होती.आजकाल संडे क्रिकेटला पण बोलवेनाशी झाली होती. मी काका झाल्याची जाणिव दिवसेंदिवस अस्वस्थ करायला लागली होती. मुद्दाम पोराटोरात मिसळलो तर पाठ वळता वळता म्हातारा हिरवट आहे असंही ऐकू यायला लागलं.
काका होणं तसं फारसं वाईट नाही पण कधीकधी फिरकीतला मांजा संपल्यावर फिरकी हलकी लागायला लागते तसं फीलींग यायला लागलं होतं.
काका म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर ....
मऊ पडलेला पापड येतो.
साय धरलेला थंड चहाचा कप येतो.
सार्दळलेले वेफर येतात.
बँकेच्या बाहेर एक तारखेला हातात कापडी पिशवी आणि पासबुक घेऊन उभे राहीलेले पेन्शनर.
फॅक्टरीच्या स्टोअर्स मधला सरप्लस ऍण्ड नॉन मुव्हेबल आयटम आठवतो.
------------------------------------------------------------------------------------------------
काका होणं हा काही साधा प्रकार नाही. काका दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे काका-रेग्युलर बॅच आणि दुसरा काका- अकाली.
काका अकालीचे परत दोन प्रकार एक सु-काका आनि दुसरा होम्ममा काका.
आधी काका रेग्युलर बॅच पाहू या. हे काका इमानेतबारे नोकरी करून निवृत्त झालेले असतात. आपल्या नैसर्गीक कुवतीनुसार त्यांना दोन मुलगे आणि एक मुलगी अशी अपत्ये असतात.मुलांसाठी आधीच जागा घेउन ठेवलेली असते . सर्वसाधारण पणे धाकट्या मुलाकडे हे राहत असतात.अधून मधून मोठ्या मुलाकडे पण जातात पण ते म्हणजे कायमचं स्थलांतरण नव्हे.काही घरात काका-काकू फिरत्या ढालीसारखे असतात.
फणसासारखे किंवा अननसासारखे हळूहळू पिकत जातात.
काकूंची फाईल आधीच डिस्पॅच झाली तर मात्र काका डहाणू-विरार शटल सर्विस सारखे दोन स्टेशनांमध्ये फिरत राहतात. कुठल्यातरी एका ठिकाणी एक दिवस बाथरूममध्ये पाय घसरून पडतात.
ज्याच्या घरी पडतात तो मुलगा कपाळाला हात लावून ज्योतीषाकडे पळतो. कमरेचा सांधा मोडला तर तीन ते चार महिने हंतरूणात काढतात.
मुलगी अधून मधून बाबांसाठी प्रेमाचे दोन खणी डबे घेउन येते.बाबांसाठी आज रजा घेतली हे येणा-जाणार्‍याला सांगत राहते.
संध्याकाळी आज आई असती तर ........हा प्रवेश वाचते आणि घरी जाते.
एके दिवशी पहाटे काका एकटेच उठायचा प्रयत्न करतात .असफल होतात. परत पडतात.
इनींग्ज डीक्लेर होतात.
दिवसवार संपतात. भावंड तेराव्याला एकदा गहिवरून रडतात.आपापल्या आयुष्यक्रमाला लागतात. एकत्र बांधून ठेवणारा शेवटचा धागाही तुटलेला असतो.
------------------------------------------------------------------------------------------------
आता काका अकाली पाहू या.: पहीला प्रकार सु-काका.
सु-काका हे अत्यंत सुस्थितीतले काका असतात.गोल्डन हँडशेक किंवा व्हिआरएस मध्ये घसघशीत रक्कम मिळालेली असते. घरचे मुळातच तसे बरे असतात. गावाकडलंही थोडसं उत्पन्न असतं.
काकू म्युनीसीपालीटी किंवा तत्सम शाळेत शिक्षीका असतात.
साहजीकच मुलांची संख्या एक किंवा दोन असते.
मुलगी देताना दहा वेळा घर बघून दिलेली असते. ही सोंगटी कटेवर बसली की मुलाचं लग्न .
आताशा सॉफ्टवेर मध्ये असल्यामुळे मुलगा लग्न झाल्यावर बंगळूर किंवा हैद्राबाद येथे असतो.
कुणिच कुणाच्या पायापायात येत नाही.
काका - (काकू घरात नसताना) घर सांभाळतात. काका अकाली यांच्या घरात पोळ्यावाली बाई. झाडू पोछावाली बाई आंटी घरात असतानाच येउन जातात.काका काकूला स्कूटरवरून स्टेशनवर सोडतात आणि परत घ्यायला पण जातात.बजाजची प्रिया किंवा चेतक .काका स्कूटरला फार संभाळून असतात. स्कूटरच्या मेंटेनंस वरून (जाणकार )काका काकूंची किती काळजी घेत असतील याचा अंदाज करू शकतात.
यथाकाल काकांचा हार्नीया किंवा हायड्रोसील कलेकलेने वाढून ऑपरेशनच्या योग्य होतो आणि काकांची प्रिया-चेतक ची साथ सुटते. बजाजची पाठची सिट काकूंना पुरेनाशी होते हे पण एक दुराव्याचं कारण असू शकतं . पण काका निराश होत नाहीत .ते रुंद सिट असलेली कायनेटीक नोव्हा घेतात.
वेळ घालवणे हाच एक दिवसभराचा कार्यक्रम असतो. काका जनरली काय करतात याचा आढावा घेतला तर खालील निरीक्षणे उपयोगी ठरतील.
१ रोज बँकेत जातात. पास बुक भरून घेतात.
२ आपली पत्रं पोस्टात जाउन घेउन येतात.
३ सोसायटीच्या वॉचमन बरोबर गप्पा मारतात.( काही काका वॉचमन कडून मुंबईसंध्या घेउन "ते"चौथे पान वाचतात असेही निदर्शनास आले आहे.)
४ दुपारी जेवणानंतर पोस्टाची प्रमाणपत्रं उलटी सुलटी करून वाचतात.डिव्हीडंड वॉरंटची काउंटर फॉईल पण ऐतीहासीक दस्तावेजासारखी जपून ठेवतात.
५ मॅच चालू असेल तर बॉल टू बॉल मॅच बघतात आणि त्यांच्या ऑफीसातल्या कलीग्जना धोणी शून्यावर आउट झाला असं काहीतरी सांगत राहतात.ते काही वेळानी यांचा फोन घेणं बंद करतात.पण यांना वाईट वाटत नाही.
६...
७.....
निरीक्षकांनी यात भर घालावी.
मुलगी अमेरीकेत असली तर बघायला नको. रोज मेल पाठवतात. सकाळी फोन करून मेल वाचली का म्हणून विचारतात.काकूंबरोबर मुलीच्या बाळंतपणाला अमेरीकेत वगैरे जातात. जावयाचा छळ मांडतात.परत आल्यावर नातवाचे फोटो आणि चॉकलेट-बदाम इत्यादीच्या पुरचुंड्या घेउन गावभर फिरतात.
एकूण सु-काका होणं चागलंच.पण प्रॉब्लेम एकच आहे की खरोखर निवृत्त होण्याची वेळ आली की ज्यूस संपलेल्या टेट्रापॅक सारखे अचानक कोलॅप्स होतात.
------------------------------------------------------------------------------------------------
होम्ममा काका हा पण अकाली काकांचा एक प्रकार आहे. यांना ओळखणे फार कठीण नाही.
सकाळी साडेअकरानंतर बारा डबा गाडीची वाट बघत स्टेशनच्या शेवटच्या चार बाकावर हे बसलेले असतात.
"ये बारा डबा गयी तो बादमे बारा दस" असं न विचारता अनोळखी माणसाला सांगतात.
बाकड्यावर बाजूला कुणी बसलच तर आवश्यकता नसताना थोडसं सरकून बसतात
यांच्या मोबाईलचा उपयोग फक्त मिस्स्ड कॉल देण्यासाठी वापरतात.
फोन आला तर त्यांना फार आनंद होतो.दहा मिनीटं बोलतात.
दाढी रोज करतात.शर्ट इन करतात.
पण बेल्ट लावत नाहीत.
यांच्या खिशात फारसे पैसे नसतात. शंभराची एक नोट घडी घालून आत कुठेतरी ठेवलेली असते.
इच्छा नसताना कंपलसरी निवृत्त झालेली ही जमात डॉ.सामंतांनी गिरणी कामगारांचा संप यशस्वी केल्यावर मुंबई परीसरात अचानक वाढली. होम्ममा म्हणजे होरपळलेला मध्यमवर्गीय मराठी माणूस.ठाण्यात बंद कंपन्यांनी होम्ममाची संख्या वाढवतच नेली. बघा .वायमन गॉर्डन , एक्सेलो केबल, सिंघानीया हॉस्पीटल,सी.पी टूल्स,शक्ती डायींग,एफजीपी, इंदू फिल्म्स होचेस(हेक्स्ट) .होम्ममाची कमी नाही.
अकाली निवृत्ती आणि त्यानंतरची एखाद दोन फसलेली बिझीनेस वेंचर यांना घरात कायमची राईट ऑफ करतात.
यांची मुलं यांच्याशी बोलताना आठ्या घालूनच बोलतात.बायको नजरेनीच बोलते.
कंपनी गेट वर माजावर आलेल्या सांडासारखी डुरकणारी ही माणसं कंपनी बंद पडल्यावर आपला आत्मविश्वास कायमचा घालवून बसलेली असतात.
आपलं घरातलं अस्तीत्व घरात कसंबसं सांभाळून असतात.दोन टाईम जेवण आणि दोन जोडी कपडा या बेअर मिनीमम गरजेवर जगत असतात.सकाळी चहाची पण मागणी करत नाहीत. बसल्या जागी चुळबुळ करतात.नवाकाळ वाचतात.अग्रलेख वाचून स्वताशीच हसतात.
यांच्या आयुष्याचा कर्तरी प्रयोग संपून कर्मणी प्रयोग सुरु झालेला असतो.
आयुष्याचा दोर हातातून निसटत चालल्याची खंत कायम मनात घर करून असते त्यामुळे घरातसुद्धा चोरट्यासारखी राहतात
आपल्याशी कोणीतरी बोलेल अशी वाट बघतात.
हे आपणहून काही बोलले तर कुणाला ऐकूच येत नाही.
घरात आपला उपद्रव शक्यतो कमी व्हावा असा यांचा प्रयत्न असतो.सकाळची काम संपली की मुंबईला जातात. पाचच्या गाडीनी परत येतात.
लग्न मुंजी या समारंभात घरातर्फे जातात. यांचा दुसरा काही उपयोग नाही हे त्यांना रोज अप्रत्यक्षरित्या घरात सांगीतलं जातं.
सोसायटीत प्रत्येक मर्तीकाला उपस्थीत असतात पण तिरडी बांधायला पुढे होत नाहीत. आपण बांधलेल्या गाठी सुटतील अशी भिती मनात असते. इतका खालावलेला आत्मविश्वास !!!
दसरा दिवाळीला नवीन शर्ट घातल्यावर त्यांना अत्तराची आठवण होते.
हलकेच खूण करून बायको कडून जुनी अत्तराची कुपी मागवतात.अत्तर लावतात.
खरं म्हणजे अत्तर कधीच संपलेलं असतं पण उरलापुरला सुगंध उरल्यासुरल्या दिवसांसाठी पुरेसा असतो
------------------------------------------------------------------------------------------------

विनोदलेख

प्रतिक्रिया

शैलेन्द्र's picture

31 Aug 2008 - 11:12 pm | शैलेन्द्र

"खरं म्हणजे अत्तर कधीच संपलेलं असतं पण उरलापुरला सुगंध उरल्यासुरल्या दिवसांसाठी पुरेसा असतो"..

खरय..

यशोधरा's picture

31 Aug 2008 - 11:19 pm | यशोधरा

छान लिहिलं आहेत एकदम...

मृदुला's picture

31 Aug 2008 - 11:24 pm | मृदुला

वा! उत्तम लिहिता तुम्ही. काळा विनोद की काय म्हणतात तसे वाटले.

प्रथमदर्शनी होम्ममा काका वाचकाची सहानुभूती प्राप्त करेल पण एकंदरित दोन्ही अकाली काका 'बिचारे' आहेत हे कळतेच. रेग्युलर काका सुद्धा तसेच.

घाटावरचे भट's picture

1 Sep 2008 - 2:20 am | घाटावरचे भट

एकूणातच काका होणं फारसं काही सुखावह नाही असं दिसतंय....
बाकी उत्तम जमलाय लेख!!

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

मदनबाण's picture

1 Sep 2008 - 3:47 am | मदनबाण

फारच सुंदर लिहले आहेत तुम्ही..

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

मेघना भुस्कुटे's picture

1 Sep 2008 - 6:38 am | मेघना भुस्कुटे

कसलं लिहिता हो तुम्ही! एकाच वेळी हे सगळं - दलाल स्ट्रीट, दोयुग्मा, काका, पीसी जेसी - कसं काय साधतं तुम्हांला?

सहज's picture

1 Sep 2008 - 7:44 am | सहज

असेच म्हणतो.

अफाट प्रतिभा, जबरदस्त निरिक्षण शक्ती.

रामदास, म्हणतात ना नावातच जादू आहे. जबरदस्त.

शिल्पा ब's picture

12 Apr 2011 - 10:06 am | शिल्पा ब

असेच म्हणते...वरील दोघांशी सहमत.

एकलव्य's picture

1 Sep 2008 - 7:07 am | एकलव्य

उतरले आहे. मनापासून रुचले.

आपली शीतल शैली बहारदार आहे.

नंदन's picture

1 Sep 2008 - 9:03 am | नंदन

>> यांच्या आयुष्याचा कर्तरी प्रयोग संपून कर्मणी प्रयोग सुरु झालेला असतो.

- काय भेदक वाक्य आहे! अप्रतिम.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

II राजे II's picture

1 Sep 2008 - 9:27 am | II राजे II (not verified)

:)

ह्यातले काही नमुने पाहीलेत... डोळ्यासमोरुन झरकन त्यांचे चेहरे गेले :(

जबरदस्त रामदास राव ... !

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

गणा मास्तर's picture

1 Sep 2008 - 9:36 am | गणा मास्तर

नेहमीप्रमाणे उत्तम

ऋषिकेश's picture

1 Sep 2008 - 10:37 am | ऋषिकेश

अपेक्षेप्रमाणे उत्तम.. काळा विनोद मस्त जमलाय

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

धमाल मुलगा's picture

1 Sep 2008 - 11:32 am | धमाल मुलगा

काका लोकांचा बर्‍याचदा आपल्याला त्रासच होतो, म्हातारे फुक्काट स्वतःची करमणुक करायला आपल्याला पिळतात, डोक्याला शॉट लावतात, इ.इ. विचारांनी असे काका लोक दिसल्यावर रस्ते बदलणार्‍या आमच्यासारख्या दिव्य कार्ट्यांना ही दुसरी बाजुदेखील दाखवुन दिल्याबद्दल धन्यवाद काका!

>> यांच्या आयुष्याचा कर्तरी प्रयोग संपून कर्मणी प्रयोग सुरु झालेला असतो.

>>काका होणं तसं फारसं वाईट नाही पण कधीकधी फिरकीतला मांजा संपल्यावर फिरकी हलकी लागायला लागते तसं फीलींग यायला लागलं होतं.

>>हलकेच खूण करून बायको कडून जुनी अत्तराची कुपी मागवतात.अत्तर लावतात.
खरं म्हणजे अत्तर कधीच संपलेलं असतं पण उरलापुरला सुगंध उरल्यासुरल्या दिवसांसाठी पुरेसा असतो

श्या: कस्सलं लिहिता हो,बेक्कार वाटलं.काळजात कुठेतरी काहीतरी झालं बॉ!!!

सर्किट's picture

1 Sep 2008 - 12:50 pm | सर्किट (not verified)

काका लोकांचा बर्‍याचदा आपल्याला त्रासच होतो, म्हातारे फुक्काट स्वतःची करमणुक करायला आपल्याला पिळतात, डोक्याला शॉट लावतात, इ.इ. विचारांनी असे काका लोक दिसल्यावर रस्ते बदलणार्‍या आमच्यासारख्या दिव्य कार्ट्यांना ही दुसरी बाजुदेखील दाखवुन दिल्याबद्दल धन्यवाद काका!

काय बोललास पुतण्या !!!

-- सर्किट (काका)

चिगो's picture

13 Apr 2011 - 9:08 pm | चिगो

श्या: कस्सलं लिहिता हो,बेक्कार वाटलं.काळजात कुठेतरी काहीतरी झालं बॉ!!!
<<

हेच म्हणतोय... काहीतरी हललं काका काळजात..

आनंदयात्री's picture

1 Sep 2008 - 12:17 pm | आनंदयात्री

उत्तम लिखाण. नेहमीप्रमाणेच आवडले.

स्वाती दिनेश's picture

1 Sep 2008 - 12:39 pm | स्वाती दिनेश

यांच्या आयुष्याचा कर्तरी प्रयोग संपून कर्मणी प्रयोग सुरु झालेला असतो.
खरं म्हणजे अत्तर कधीच संपलेलं असतं पण उरलापुरला सुगंध उरल्यासुरल्या दिवसांसाठी पुरेसा असतो
क्या बात है !
वेगवेगळे विषय त्याच सहजतेने तुम्ही लिहिता.तुमचे सगळेच लिखाण नेहमीच वाचते आणि नेहमीच आवडते.
स्वाती

विनायक प्रभू's picture

1 Sep 2008 - 2:54 pm | विनायक प्रभू

६. इ.डी. वरचे लेख न चुकता वाचतात.७. नव विवाहितांना उगाच आपल्या न केलेल्या पराक्रमाच्या गाथा सांगतात.
विनायक प्रभु

प्रभाकर पेठकर's picture

1 Sep 2008 - 3:11 pm | प्रभाकर पेठकर

चांगले निरिक्षण. पण हे फक्त निरिक्षण आहे. कोणी तरी काकांनी 'त्यांना काय वाटतं' तेही लिहावं म्हणजे वास्तव कळेल. कोणी नाहीच लिहीलं तर अजून १० वर्षांनंतर मीच लिहीन.

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Sep 2008 - 4:07 pm | बिपिन कार्यकर्ते

रामदास काका, तुम्ही 'सानेकाका' ही कॅटेगरी विसरताय. आपल्या ऍडी ने मस्त वर्णन केले आहे ह्या टाईपच्या काकांचे...

बिपिन.

लिखाळ's picture

1 Sep 2008 - 4:30 pm | लिखाळ

रामदास,
आपली शैली जबरदस्तच आहे.
काका रेग्युलर बॅच संपूर्ण आवडले, मांजा संपलेली फिरकी, टेट्रापॅक, कर्तरी-कर्मणी, शर्ट खोचणे पण बेल्ट न लावणे..इत्यादी...मान गये उस्ताद !
--लिखाळ.

हसरा सुहास's picture

1 Sep 2008 - 5:39 pm | हसरा सुहास

या शिवाय अजुन एक काका असतो. ज्याचि बायको वहिनी असते....आई काकु असते....वडील काका,,,,,,,,, तरीपण तो काकाच असतो ???????? सगळ्यान साठीच.

ब्रिटिश's picture

1 Sep 2008 - 8:54 pm | ब्रिटिश

रामदासभौ तुमी यकदम करेक्ट लीवता.

उद्या क कराच ह्य आजच्याला म्हाईत हव न्हाईत मान्साचा 'काकूस' बनत

माज्या आज्यान मराचे आदि वाजंत्री, मयताचे सामानवाला, दारूवाला,लाकूडवाला सगल्यांना पैस दिउन ठिवलेवते

आजा मेल्याचा कल्ल्यावर सगले हजर

परपेक्ट प्लानींग !!!

मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय )

प्रकाश घाटपांडे's picture

1 Sep 2008 - 10:09 pm | प्रकाश घाटपांडे

अदुगरच ज्यांन्च्याक पंचाग आन ज्योतिष आस्ल कि त्यान्ला काका म्हन्त्यात. त्यातुन आम्ही दोन तृतियांश व्हिआरएस घेतली. कालपोथोर ज्या पोरी आमाला दादा म्हनत व्हत्या त्या आता काका म्हनायला लाग्ल्या. डामरट कुठल्या? परवा तो न्हावी बी म्हनत व्हता सायेब केसान्ला डाय लाउ का ? तस आत्ता बी लग्नाच्या मार्केट मदी खपुन जाल. आता बाईला वय आन पुरुषाला पगार किती ईचारु नये म्हन्तात. अर्थस्य पुरुषो दासः
आता ल्वॉक इचारतात " आपण काय करता?"
बोंबलत फिरतो, झोपा काढतो,
मान्स इचित्र पघत्यात
मंग त्यान्ला सांगतो मी पोलिस बिनतारी विभागातुन नुकताच स्वेच्छानिवृत्त झालो .
अस अस होय? बरयं बुवा तुमचं! आमच्या मानेवर अजुन जू आहेच.
( काही उद्योग करुन तर बाहेर नाही पडला ना हा? आयुष्याची कमाई करुन ठेवली असेल! आता अडकायला नको म्हणुन घेतली असेल आपली व्हिआरएस)
द्या कि झुगारुन मग?
अहो कमावणारा घरात एकटाच आहे! तुमच्या सारखं नाही
( अल्पसंतुष्टी)
प्रकाश घाटपांडे

सर्वसाक्षी's picture

1 Sep 2008 - 10:19 pm | सर्वसाक्षी

रामदासबुवा,
काकागिरी आवडली!

भडकमकर मास्तर's picture

1 Sep 2008 - 10:29 pm | भडकमकर मास्तर

खुसखुशीत की काय तो लेख होता होता उदास उदास करून गेला...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

2 Sep 2008 - 9:11 am | विसोबा खेचर

काकापुराण उत्तम!

परंतु काही काका मात्र मनानं अगदीच कद्रू असतात! :)

(सर्व काकांना ओळखून असणारा!) तात्याकाका.

रामदास's picture

2 Sep 2008 - 11:32 am | रामदास

नैवेद्याची एकच वाटी
अता दुधाची माझ्या गाठी
देवपूजेस्तव ही कोरांटी
बाळगी अंगणी कशी तरी.
मधूमागसी माझ्या सख्या परी
मधुघटची रीकामे पडती घरी.

विसोबा खेचर's picture

2 Sep 2008 - 11:36 am | विसोबा खेचर

रामदासकाकांनी आपल्याजवळची जी काही नेवेद्याची दूधवाटी असेल, त्यांच्याजवळ जी काही कोरांटी असतील ती मिपाला अवश्य वहावी! मिपाकरता ती खूप मोलाची आहेत!

असो,

तात्या.

धोंडोपंतांनी मधु मागशी... वर लिहिलेला सुरेख लेख आठवला. त्यांनी दोन भागांनंतर थांबवलेली ही मालिका, पुन्हा सुरू केली तर बहार येईल.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

विसोबा खेचर's picture

2 Sep 2008 - 12:09 pm | विसोबा खेचर

त्यांनी दोन भागांनंतर थांबवलेली ही मालिका, पुन्हा सुरू केली तर बहार येईल.

नंदनसायबाशी सहमत..!

स्वगत : हा धोंड्या फोकलिचा अलिकडे कुठे उलथलाय देव जाणे! :)

तात्या.

अनिल हटेला's picture

2 Sep 2008 - 11:59 am | अनिल हटेला

छान लिहीलये!!

खरच अष्टपैलू कामगिरी करताये तुम्ही !!

आपण बांधलेल्या गाठी सुटतील अशी भिती मनात असते. इतका खालावलेला आत्मविश्वास !!!

बाप रे !!

मस्त वर्णन !!

असा एक काका पाहीलाये मी अगदी जवळून !!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

मृत्युन्जय's picture

11 Apr 2011 - 4:32 pm | मृत्युन्जय

जुने लेख वरती आणण्यावर असलेल्या आक्षेपाला योग्य ठिकाणी मारुन प्रतिसाद देत आहे की हा लेख उच्च आहे.

मृत्युंजया,
सहीच रे!! एक पार विस्मृतीत गेलेला लेख पुन्हा जीवंत करुन स्वत:चंच नाव सार्थ केलंस.
हा लेख म्हणजे अनेक आयुष्यांची 'थोडक्यात उत्तरे द्या' प्रश्नमालिका आहे. च्यायला, काही ओळी वाचल्या नव्हत्या तेच बरं होतं!

--असुर

पुन्हा एकदा वाचला. ह्या खेपेस वाचनखूण साठवली आहे.
मृत्यूंजय ह्यांचे आभार.

प्रीत-मोहर's picture

11 Apr 2011 - 5:10 pm | प्रीत-मोहर

मस्त लेख!!!!!

टारझन's picture

11 Apr 2011 - 5:16 pm | टारझन

क्लासिक रामदास ..

सुकाका म्हणजे अगदी तंतोतंत ... मला तर जालिय सुकाका आठवले ;)

हे पिडां काका कोणत्या सदर्‍यात मोडतात म्हणे ? ;)

- (खुशालचेंडु) काकाबुरा

साबु's picture

11 Apr 2011 - 6:04 pm | साबु

अजुन एक काका रहिला...
ह्याच लग्न झालेल नसत ... पण मोठ्या भावाच्या अपत्याचा हा काका असतो.... हे काकापण खुप सु़खावणार ..असत....

जय जय रघुवीर समर्थ!!!

(काका होउन ......आता काका नसलेला) :(

रेवती's picture

11 Apr 2011 - 6:47 pm | रेवती

हा लेख वाचायचा राहिला होता.
काका लोकांची ओळख आवडली आणि पटलीही.
आता काकूंची ओळख येऊ द्या.
होम्ममा काकांबद्दल वाचून वाईट वाटले.
अशीच काकू क्याट्यागरीही असेल्.......म्हणजे आहे पण त्याबद्दल लिहावं ते रामदासांनीच.

परिकथेतील राजकुमार's picture

11 Apr 2011 - 6:59 pm | परिकथेतील राजकुमार

मृत्युंजया धन्यु रे सायबा :)

मस्त मस्त मस्त !

हा काका अफाट आहे. हात लावतो त्या विषयाच सोनं करुन सोडतो. :)

चतुरंग's picture

11 Apr 2011 - 7:54 pm | चतुरंग

एकेक निरीक्षणं हुच्च आहेत! __/\__

हा निसटून गेलेला लेख पुन्हा वर काढल्याबद्दल धन्यु रे मृत्युंजया!

-(फिरकीतला मांजा पुन्हापुन्हा तपासून पाहणारा)रंगाकाका

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

11 Apr 2011 - 8:57 pm | निनाद मुक्काम प...

काका म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर ....
मऊ पडलेला पापड येतो.
साय धरलेला थंड चहाचा कप येतो.
सार्दळलेले वेफर येतात.
बँकेच्या बाहेर एक तारखेला हातात कापडी पिशवी आणि पासबुक घेऊन उभे राहीलेले पेन्शनर.
फॅक्टरीच्या स्टोअर्स मधला सरप्लस ऍण्ड नॉन मुव्हेबल आयटम आठवतो.

अगदी अगदी
सारांश मधील खेर साहेब आठवले .

खरं म्हणजे अत्तर कधीच संपलेलं असतं पण उरलापुरला सुगंध उरल्यासुरल्या दिवसांसाठी पुरेसा असतो

विनोदी वाटता वाटता.. हळवे करून गेले लेखन!

काय म्हणावे या लेखनाला?

टुकुल's picture

11 Apr 2011 - 9:44 pm | टुकुल

एवढा चांगला लेख वाचायचा राहुन गेला होता, आताच वाचला
नेहमीसारख उच्च् लेखन __/\__

--टुकुल

स्मिता.'s picture

12 Apr 2011 - 2:09 am | स्मिता.

काका, फारच सुरेख वर्णन केलंय वेगवेगळ्या काकांचं! सुरुवातिला खुसखुशीत, विनोदी वाटणार्‍या लेखाने शेवटी उदास वळण कसे घेतले कळलेच नाही. शेवटच्या ४-५ ओळी पार हळव्या करून गेल्या :(

सेरेपी's picture

12 Apr 2011 - 5:09 am | सेरेपी

अतिशय सुरेख...लेख वर काढल्याबद्दल धन्यु!

गवि's picture

12 Apr 2011 - 7:14 am | गवि

जबरदस्त.
Fan jhaalo tumcha. Ata june sarv likhan vaachoon kadhnar.

क्राईममास्तर गोगो's picture

12 Apr 2011 - 9:38 am | क्राईममास्तर गोगो

नाद खुळा भाऊ!

मराठमोळा's picture

12 Apr 2011 - 10:19 am | मराठमोळा

हा लेख वाचनात आला नव्हता.
उत्खननाबद्दल आभार आणि रामदास काकांना सलाम!! :)

शब्द अपुरे पडतात.

llपुण्याचे पेशवेll's picture

12 Apr 2011 - 10:58 am | llपुण्याचे पेशवेll

छान छान. रामदासकाकांनी फारच छान लिहीले आहे. मृत्युंजया धन्यवाद रे.

sneharani's picture

12 Apr 2011 - 11:01 am | sneharani

मस्त लिहलय काकापुराण!

उल्हास's picture

13 Apr 2011 - 3:18 am | उल्हास

हा लेख वाचायचा राहुन गेला.......

लहान मुले काका म्हणायला लागलीत पण काका झाल्याचे मन मानत नाही (दिल तो बच्चा है जी)
लेख वाचुन आमच्या भविष्यकाळाचेच चित्र पाहत्तोय असे वाटले. हसता हसता काळजाला चटका लावून जाणारा लेख. .........टेट्रापॅक, मांजा संपलेली फिरकी, कर्तरी-कर्मणी..... अप्रतिम.

वाचनखूण साठवली आहे.

सुनील's picture

13 Apr 2011 - 4:34 am | सुनील

खुशखुशीत काकापुराण!

सुनील मामा

विनीत संखे's picture

13 Apr 2011 - 8:00 am | विनीत संखे

आवडलं एकदम.

काकांचा विजय असो.

विनायक बेलापुरे's picture

13 Apr 2011 - 9:47 am | विनायक बेलापुरे

मस्त आहे लेख.

पर्नल नेने मराठे's picture

13 Apr 2011 - 4:29 pm | पर्नल नेने मराठे

सुरेख लिहिलय !!!

हल्ली शेजारची मुले मला आन्टी म्हणल्यावर नवरा त्यांना म्हणतो "ए आन्टी मत कहो ना"
आम्ही गमतिने घेत असतो पण आज हा लेख वाचल्यावर वाटतेय त्यालाही कुठेतरी काका व्हायची भिती वाटत असावी ;)

मराठे आंटींशी सहमत :)

- बंटी

प्रकाश घाटपांडे's picture

13 Apr 2011 - 5:08 pm | प्रकाश घाटपांडे

अकाली काकत्व एकवेळ पचवणे सोपे आहे पण अकाली ऑन्टीत्व पचवायला लई औघाड. काहींना तर नावा आधि सौ. हा उल्लेख देखील खपत नाही. अग्दी सौ सौजन्यात॑ला असला तरी बी. परत अहो ऑण्टी म्हनायच की ए ऑण्टी असा बी प्रश्न.

एक's picture

14 Apr 2011 - 2:23 am | एक

झकास लेख..हळवा करणारा..

यातला कुठलाही काका होण्याची वेळ येउ नये असं वाटतं..

तरूण तूर्क मधला काका व्हायला नक्की आवडेल.

-एक

अप्रतिम ... बस्स शब्दच नाहित बाकी

प्रकाश घाटपांडे's picture

15 Apr 2011 - 2:08 pm | प्रकाश घाटपांडे

आता एखाद अथ ऑण्टीपुराण येउं द्यात!

प्राजक्ता पवार's picture

15 Apr 2011 - 4:59 pm | प्राजक्ता पवार

छान लिहिलंय .

हा लेख पुन्हा वाचताना देखील मझा देउन गेला

मैत्र's picture

5 Oct 2011 - 3:44 pm | मैत्र

या व्याख्यांमध्ये न बसणार्‍या रामदास काकांनी जरा मनावर घेऊन बरंच लेखन केलं तर रामदास असा एक वेगळा विभाग करावा मिपावर म्हणजे अशा अप्रतिम लेखांची रत्नं शोधायला लागणार नाहीत एका जागीच मिळतील सहज !

मी-सौरभ's picture

9 Oct 2011 - 10:16 am | मी-सौरभ

मस्त..

विशाखा राऊत's picture

11 Oct 2011 - 4:15 pm | विशाखा राऊत

छान लिहिले आहे

रामदासांच्या लेखणीने सध्या विश्रांती घेतली आहे.
मारुतीचे शौर्य जागृत करण्यासाठी त्याला पूर्वपराक्रमाची आठवण करून द्यावी लागते म्हणे
म्हणून रामदास भो हे तुमच्यासाठी

रुपी's picture

4 Jun 2015 - 12:27 am | रुपी

फारच छान लिहिले आहे..

मिपावर खोदकाम करताना अचानक हा लेख गावला नि जाणवलं वर विजुभौ म्हणतायत तसं रामदासकाकांना पुन्हा एकदा त्यांच्या पूर्वपराक्रमाची आठवण करून द्यावी, म्हणून लेख वर काढत आहे.

आनंद घ्यावा....

उत्तम लेख. वर काढल्याबद्दल धन्यवाद.

बोका-ए-आझम's picture

27 Sep 2015 - 8:54 pm | बोका-ए-आझम

हे बाप लेखन आहे. __/\__

चांदणे संदीप's picture

27 Sep 2015 - 9:10 pm | चांदणे संदीप

काय प्रतिसाद देऊ कळेना या लेखनावर!!
कुठल्या शब्दांनी वाहवा करू? माझ्या भात्यात ते शब्दच नसतील! :(

रामदास "काका " म्हणजे रामदास काका .
खूप लिहायचं आहे .शब्द सुचत नाहीयेत . मनाला मरगळ आलीय .
तेंव्हा रामदास "काकांचे "लेख उघडावेत .
सचीन नी मारलेला कव्हर ड्राईव्ह पहिल्यावर क्षणात फलंदाजी सोपी वाटते .
सानिका स्वप्नील च्या पाककृती पाहिल्यावर स्वैपाक एकदम सोपा वाटतो . तसंच काहीसं .
किती साधे सोपे शब्द ?
पण रामदास "काकांनी " त्यांची मोट बांधली की ; अमृत पाझरतात .

नया है वह's picture

29 Sep 2015 - 11:27 am | नया है वह

सहमत

हेमंत लाटकर's picture

29 Sep 2015 - 1:35 pm | हेमंत लाटकर

छान काकापुराण.

चिनार's picture

29 Sep 2015 - 4:16 pm | चिनार

अप्रतिम लिखाण !!

बॅटमॅन's picture

30 Sep 2015 - 12:24 pm | बॅटमॅन

अति उच्च!

अजया's picture

30 Sep 2015 - 12:54 pm | अजया

__/\__

भाग्यश्री कुलकर्णी's picture

2 Oct 2015 - 7:37 pm | भाग्यश्री कुलकर्णी

_/\_ नेहमीसारखेच मस्त

रातराणी's picture

6 Oct 2015 - 5:13 am | रातराणी

मस्त!