मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अथ काकापुराण.

रामदास · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
लग्न झालं आणि मी राव झालो.बायकोच्या धाकट्या बहिणीचं लग्न झालं आणि मी पंत झालो. काही वर्षापूर्वी काका पण झालो.नैसर्गीक क्रमानी माझी उत्क्रांती होतेआहे असं म्हणता म्हणता काकापण अचानक खुपायला लागलं.पन्नासाव्वा वाढदिवस झाला त्या दिवशी माझा पुतण्या आला होता. माझ्या हातात एक गुळगुळीत कागदात गुंडाळलेलं पुस्तक देत म्हणाला काका, आता रिटायरमेंट प्लॅनींग कर. ह्या पुस्तकात बघ सगळी माहिती दिलीय. माझी बायको नाक फेंदारत म्हणाली "हे आणि रीटायर?" "करेला और निमचढा. " "बाई बाई आताच घरी असतात तेव्हा हा धुडगुस घालतात ." बोलता बोलता जीभ चावली खरी .... पण पुतण्या टिर्‍या बडवत तासभर हसत होता. पण आता काकापण जास्तच हुळहुळायला लागलं. तसा आजकल भास होत होताच.कॉलनीतली पोरंटोरं त्याच्या समोरून गेलं की गप्प व्हायला लागली होती.आजकाल संडे क्रिकेटला पण बोलवेनाशी झाली होती. मी काका झाल्याची जाणिव दिवसेंदिवस अस्वस्थ करायला लागली होती. मुद्दाम पोराटोरात मिसळलो तर पाठ वळता वळता म्हातारा हिरवट आहे असंही ऐकू यायला लागलं. काका होणं तसं फारसं वाईट नाही पण कधीकधी फिरकीतला मांजा संपल्यावर फिरकी हलकी लागायला लागते तसं फीलींग यायला लागलं होतं. काका म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर .... मऊ पडलेला पापड येतो. साय धरलेला थंड चहाचा कप येतो. सार्दळलेले वेफर येतात. बँकेच्या बाहेर एक तारखेला हातात कापडी पिशवी आणि पासबुक घेऊन उभे राहीलेले पेन्शनर. फॅक्टरीच्या स्टोअर्स मधला सरप्लस ऍण्ड नॉन मुव्हेबल आयटम आठवतो. ------------------------------------------------------------------------------------------------ काका होणं हा काही साधा प्रकार नाही. काका दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे काका-रेग्युलर बॅच आणि दुसरा काका- अकाली. काका अकालीचे परत दोन प्रकार एक सु-काका आनि दुसरा होम्ममा काका. आधी काका रेग्युलर बॅच पाहू या. हे काका इमानेतबारे नोकरी करून निवृत्त झालेले असतात. आपल्या नैसर्गीक कुवतीनुसार त्यांना दोन मुलगे आणि एक मुलगी अशी अपत्ये असतात.मुलांसाठी आधीच जागा घेउन ठेवलेली असते . सर्वसाधारण पणे धाकट्या मुलाकडे हे राहत असतात.अधून मधून मोठ्या मुलाकडे पण जातात पण ते म्हणजे कायमचं स्थलांतरण नव्हे.काही घरात काका-काकू फिरत्या ढालीसारखे असतात. फणसासारखे किंवा अननसासारखे हळूहळू पिकत जातात. काकूंची फाईल आधीच डिस्पॅच झाली तर मात्र काका डहाणू-विरार शटल सर्विस सारखे दोन स्टेशनांमध्ये फिरत राहतात. कुठल्यातरी एका ठिकाणी एक दिवस बाथरूममध्ये पाय घसरून पडतात. ज्याच्या घरी पडतात तो मुलगा कपाळाला हात लावून ज्योतीषाकडे पळतो. कमरेचा सांधा मोडला तर तीन ते चार महिने हंतरूणात काढतात. मुलगी अधून मधून बाबांसाठी प्रेमाचे दोन खणी डबे घेउन येते.बाबांसाठी आज रजा घेतली हे येणा-जाणार्‍याला सांगत राहते. संध्याकाळी आज आई असती तर ........हा प्रवेश वाचते आणि घरी जाते. एके दिवशी पहाटे काका एकटेच उठायचा प्रयत्न करतात .असफल होतात. परत पडतात. इनींग्ज डीक्लेर होतात. दिवसवार संपतात. भावंड तेराव्याला एकदा गहिवरून रडतात.आपापल्या आयुष्यक्रमाला लागतात. एकत्र बांधून ठेवणारा शेवटचा धागाही तुटलेला असतो. ------------------------------------------------------------------------------------------------ आता काका अकाली पाहू या.: पहीला प्रकार सु-काका. सु-काका हे अत्यंत सुस्थितीतले काका असतात.गोल्डन हँडशेक किंवा व्हिआरएस मध्ये घसघशीत रक्कम मिळालेली असते. घरचे मुळातच तसे बरे असतात. गावाकडलंही थोडसं उत्पन्न असतं. काकू म्युनीसीपालीटी किंवा तत्सम शाळेत शिक्षीका असतात. साहजीकच मुलांची संख्या एक किंवा दोन असते. मुलगी देताना दहा वेळा घर बघून दिलेली असते. ही सोंगटी कटेवर बसली की मुलाचं लग्न . आताशा सॉफ्टवेर मध्ये असल्यामुळे मुलगा लग्न झाल्यावर बंगळूर किंवा हैद्राबाद येथे असतो. कुणिच कुणाच्या पायापायात येत नाही. काका - (काकू घरात नसताना) घर सांभाळतात. काका अकाली यांच्या घरात पोळ्यावाली बाई. झाडू पोछावाली बाई आंटी घरात असतानाच येउन जातात.काका काकूला स्कूटरवरून स्टेशनवर सोडतात आणि परत घ्यायला पण जातात.बजाजची प्रिया किंवा चेतक .काका स्कूटरला फार संभाळून असतात. स्कूटरच्या मेंटेनंस वरून (जाणकार )काका काकूंची किती काळजी घेत असतील याचा अंदाज करू शकतात. यथाकाल काकांचा हार्नीया किंवा हायड्रोसील कलेकलेने वाढून ऑपरेशनच्या योग्य होतो आणि काकांची प्रिया-चेतक ची साथ सुटते. बजाजची पाठची सिट काकूंना पुरेनाशी होते हे पण एक दुराव्याचं कारण असू शकतं . पण काका निराश होत नाहीत .ते रुंद सिट असलेली कायनेटीक नोव्हा घेतात. वेळ घालवणे हाच एक दिवसभराचा कार्यक्रम असतो. काका जनरली काय करतात याचा आढावा घेतला तर खालील निरीक्षणे उपयोगी ठरतील. १ रोज बँकेत जातात. पास बुक भरून घेतात. २ आपली पत्रं पोस्टात जाउन घेउन येतात. ३ सोसायटीच्या वॉचमन बरोबर गप्पा मारतात.( काही काका वॉचमन कडून मुंबईसंध्या घेउन "ते"चौथे पान वाचतात असेही निदर्शनास आले आहे.) ४ दुपारी जेवणानंतर पोस्टाची प्रमाणपत्रं उलटी सुलटी करून वाचतात.डिव्हीडंड वॉरंटची काउंटर फॉईल पण ऐतीहासीक दस्तावेजासारखी जपून ठेवतात. ५ मॅच चालू असेल तर बॉल टू बॉल मॅच बघतात आणि त्यांच्या ऑफीसातल्या कलीग्जना धोणी शून्यावर आउट झाला असं काहीतरी सांगत राहतात.ते काही वेळानी यांचा फोन घेणं बंद करतात.पण यांना वाईट वाटत नाही. ६... ७..... निरीक्षकांनी यात भर घालावी. मुलगी अमेरीकेत असली तर बघायला नको. रोज मेल पाठवतात. सकाळी फोन करून मेल वाचली का म्हणून विचारतात.काकूंबरोबर मुलीच्या बाळंतपणाला अमेरीकेत वगैरे जातात. जावयाचा छळ मांडतात.परत आल्यावर नातवाचे फोटो आणि चॉकलेट-बदाम इत्यादीच्या पुरचुंड्या घेउन गावभर फिरतात. एकूण सु-काका होणं चागलंच.पण प्रॉब्लेम एकच आहे की खरोखर निवृत्त होण्याची वेळ आली की ज्यूस संपलेल्या टेट्रापॅक सारखे अचानक कोलॅप्स होतात. ------------------------------------------------------------------------------------------------ होम्ममा काका हा पण अकाली काकांचा एक प्रकार आहे. यांना ओळखणे फार कठीण नाही. सकाळी साडेअकरानंतर बारा डबा गाडीची वाट बघत स्टेशनच्या शेवटच्या चार बाकावर हे बसलेले असतात. "ये बारा डबा गयी तो बादमे बारा दस" असं न विचारता अनोळखी माणसाला सांगतात. बाकड्यावर बाजूला कुणी बसलच तर आवश्यकता नसताना थोडसं सरकून बसतात यांच्या मोबाईलचा उपयोग फक्त मिस्स्ड कॉल देण्यासाठी वापरतात. फोन आला तर त्यांना फार आनंद होतो.दहा मिनीटं बोलतात. दाढी रोज करतात.शर्ट इन करतात. पण बेल्ट लावत नाहीत. यांच्या खिशात फारसे पैसे नसतात. शंभराची एक नोट घडी घालून आत कुठेतरी ठेवलेली असते. इच्छा नसताना कंपलसरी निवृत्त झालेली ही जमात डॉ.सामंतांनी गिरणी कामगारांचा संप यशस्वी केल्यावर मुंबई परीसरात अचानक वाढली. होम्ममा म्हणजे होरपळलेला मध्यमवर्गीय मराठी माणूस.ठाण्यात बंद कंपन्यांनी होम्ममाची संख्या वाढवतच नेली. बघा .वायमन गॉर्डन , एक्सेलो केबल, सिंघानीया हॉस्पीटल,सी.पी टूल्स,शक्ती डायींग,एफजीपी, इंदू फिल्म्स होचेस(हेक्स्ट) .होम्ममाची कमी नाही. अकाली निवृत्ती आणि त्यानंतरची एखाद दोन फसलेली बिझीनेस वेंचर यांना घरात कायमची राईट ऑफ करतात. यांची मुलं यांच्याशी बोलताना आठ्या घालूनच बोलतात.बायको नजरेनीच बोलते. कंपनी गेट वर माजावर आलेल्या सांडासारखी डुरकणारी ही माणसं कंपनी बंद पडल्यावर आपला आत्मविश्वास कायमचा घालवून बसलेली असतात. आपलं घरातलं अस्तीत्व घरात कसंबसं सांभाळून असतात.दोन टाईम जेवण आणि दोन जोडी कपडा या बेअर मिनीमम गरजेवर जगत असतात.सकाळी चहाची पण मागणी करत नाहीत. बसल्या जागी चुळबुळ करतात.नवाकाळ वाचतात.अग्रलेख वाचून स्वताशीच हसतात. यांच्या आयुष्याचा कर्तरी प्रयोग संपून कर्मणी प्रयोग सुरु झालेला असतो. आयुष्याचा दोर हातातून निसटत चालल्याची खंत कायम मनात घर करून असते त्यामुळे घरातसुद्धा चोरट्यासारखी राहतात आपल्याशी कोणीतरी बोलेल अशी वाट बघतात. हे आपणहून काही बोलले तर कुणाला ऐकूच येत नाही. घरात आपला उपद्रव शक्यतो कमी व्हावा असा यांचा प्रयत्न असतो.सकाळची काम संपली की मुंबईला जातात. पाचच्या गाडीनी परत येतात. लग्न मुंजी या समारंभात घरातर्फे जातात. यांचा दुसरा काही उपयोग नाही हे त्यांना रोज अप्रत्यक्षरित्या घरात सांगीतलं जातं. सोसायटीत प्रत्येक मर्तीकाला उपस्थीत असतात पण तिरडी बांधायला पुढे होत नाहीत. आपण बांधलेल्या गाठी सुटतील अशी भिती मनात असते. इतका खालावलेला आत्मविश्वास !!! दसरा दिवाळीला नवीन शर्ट घातल्यावर त्यांना अत्तराची आठवण होते. हलकेच खूण करून बायको कडून जुनी अत्तराची कुपी मागवतात.अत्तर लावतात. खरं म्हणजे अत्तर कधीच संपलेलं असतं पण उरलापुरला सुगंध उरल्यासुरल्या दिवसांसाठी पुरेसा असतो ------------------------------------------------------------------------------------------------

वाचन 33771 प्रतिक्रिया 0