आठवणी

मनीषा's picture
मनीषा in जनातलं, मनातलं
31 Aug 2008 - 1:00 am

(हे पद्य नाही... तरीही मी ते असे लिहिले आहे कारण , ते असे वाचले असता जास्तं परिणामकारक वाटेल असे मला वाटते )

ओथंबलेलं आकाश
बरसतच नाही कधीचं
मनात दाटलेलं मळभ
पसरत राहतं आभाळावर
संध्याकाळच्या कृष्णछाया
पसरतात घरावर
घराच्या या भिंती
माझ्या एकांताच्या साक्षी
सारे भोग ..... सा-या वेदना
जपल्या आहेत त्यांनीच
हळुवार होणारं मन
सावरलं आहे त्यांनीच
कसं सांगु? ........आणि काय सांगु?
नि:शब्द भावना जाणल्या आहेत त्यांनीच
घराबाहेरचं मळभ थोपवलं त्यांनी बाहेरच
आणि आतल्या प्रकाशावर
पडू दिली नाही अंधाराची छाया कधी
म्हणूनच तर आहेत त्या
माझ्या जीवाच्या जीवलग
निश्चिंत आहे मी त्यांच्या सहवासात
जगाच्या सा-या तापांपासून दूर
कधीतरी वाटतं मलाही
पहावं .... काय चाललं आहे बाहेर?
मग उघडते मी एक छोटासा झरोका
बाहेरचं सारं सारं आत घेण्यापुरता
त्यातुनच येतात मग
जुन्या नव्या आठवणी
काही सुखावणा-या ....
तर .. काही रडवणा-या
त्यांच्याशी बोलत राहते मी कधी
---कधी त्यांच्याकडे पहात देखील नाही
बाहेरचा कोलाहल मला अगदी
----- नवा नवा वाटतो
त्यात एखादा ओळखीचा
सूरही असतोच
त्या कोलाहलाचे अनेक चेहरे असतात
------ मग सगळे चेहरे
एकमेकात मिसळतात
अन त्यांचा बनतो एकच चेहरा
त-हेत-हेच्या भाव-भावनांचे
आविष्कार दाखवणारा
त्यातून मग अनेक रंग विखूरतात
त्यातले काही मला भावतात देखील ...
मग मी त्या रंगांना निरखून पाहते
त्यांना एक आगळा वेगळा
गंध असतो ....
तो गंध माझ्या कणाकणात भिनतो
मनावर एक अनोखी धुंदी चढते ----
त्या गंधांची ........ त्या रंगांची
मग त्या चार भिंतीतलं
माझं एकटेपण जणू नाहीसं होतं
अनेक भावनांचे रंग...
त्यातून एक अद्भूत नक्षी तयार होते
कशी माहित नाही ...
पण मला ती आवडते
त्या नक्षीच्या बिलोरी काचा
सा-या घरभर पसरतात
त्यावर उन पडून... त्याचे कवडसे बनतात
माझं मन मोहून जातं
त्या कवडशांना हातात घ्यावं
त्यांना जवळून पहावं ...
असं वाटतं ......
पण त्यांना हातात घ्यायला मी जाते
.... तशी ते माझ्यापासून लांब जातात
असा खेळ ----------
कितीतरी वेळ चालतो
शेवटी मी थकून जाते
एका जागी बसून
त्या कवडशांकडे पहात राहते
हळूहळू उन, आपली पावलं
मागे घ्यायला लागतं
तसे सारे कवडसे सुद्धा
त्याच्या मागे धावतात
मग तिथे काहीच रहात नाही
दिव्याचा प्रकाश घरभर पसरतो
शांत ..... सुस्थीर .... अश्वासक.......
मनाला दिलासा देणारा
काळोखाला माझ्यापासून दूर ठेवणारा
माझं मन शांत होतं
पण ते रंगीत ---- नक्षीदार-- कवडसे मात्र
हरवूनच जातात
माझ्या मनात राहतात मग
फक्त त्यांच्या आठवणी
त्या आठवणी मी माझ्या मनात
जपून ठेवते
आता त्या आठवणींना
माझ्याकडे यण्यासाठी
झरोक्याची आवश्यकता नसते
त्या चार भिंतींच्या अवकाशात
त्या बिलोरी ... सुंगंधी आठवणी
माझ्या, आणि माझ्या एकटेपणाच्या
सोबती असतात ..

जीवनमानप्रकटनअनुभव

प्रतिक्रिया

दत्ता काळे's picture

31 Aug 2008 - 10:00 am | दत्ता काळे

फारच सुंदर

ओळींच्या लयी जणू हळूवारपणे पदन्यास करत लि़खाणातल्या आशयाभोवती गुंफत राहतात.

प्रमोद देव's picture

31 Aug 2008 - 10:05 am | प्रमोद देव

नादमय स्वगत!

विसोबा खेचर's picture

31 Aug 2008 - 4:02 pm | विसोबा खेचर

सुरेख...!

पद्मश्री चित्रे's picture

31 Aug 2008 - 4:28 pm | पद्मश्री चित्रे

आहे कविता