..... तो कृष्ण 'एकटा' होता !

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
18 Sep 2015 - 10:32 am

कालिंदीच्या तटी नाचते राधा, गोपरास सावळा
वेडावुन गेल्या गोपी, अंबरात श्यामरंग उधळला
गोकुळ झाले मग्न, दंग, हर...; नामात हरीच्या गुंग
हर मिठीत सांवळकान्हा , तृप्त शृंगार प्रितीचा रंग
पण वृन्दावनचा राणा
..... तो कृष्ण 'एकटा' होता !

चाणूर, मुष्टिक, कंसही वधिला, उद्धरली मथुरा
चन्दन गंधीत झाली कुब्जा कृष्ण एक तो उरला
ब्रज, वृन्दावन, गोकुळ, मथुरा अन द्वारकामैय्या
अद्वैताला उजळून गेली, केशवा तव सावळमाया
विश्व डोलते ज्या मुरलीवर..
...... तो कृष्ण 'एकटा' होता !

धुर्त शकुनी, विषयी कौरव, षंढ सभागृह ठरले
सर्वस्व हरवून बसले पांडव पतीधर्मही विसरले
भीष्म, विदुर ते स्तब्ध, शापदग्ध हस्तिनापुरी
सखी द्रौपदी त्रस्त मंडपी, त्राता झाला श्रीहरी
कृष्णेसाठी स्वये धावला ,
...... तो कृष्ण 'एकटा' होता !

कुरुक्षेत्रावर डाव मांडूनी उद्धरीले कुरु कुल सारे
गतीमुढ पार्था बोध, जगाला सांगितली त्वां गीता
कर्तव्यबोध तो होता सरली शामसख्याची माया
व्याधाने धरीला नेम, सोडला बाण, छेदली काया
संपले पर्व सुटला देह...
..... तो कृष्ण 'एकटा' होता !

विशाल कुलकर्णी
१८-०९-२०१५

शांतरसकविता

प्रतिक्रिया

मांत्रिक's picture

18 Sep 2015 - 10:52 am | मांत्रिक

छान आहे! कृष्णाचा संपूर्ण जीवनपट उभा राहतो. प्रत्येक ओळीच्या मध्ये एक छान पाॅझ येतोय.
तो कृष्ण एकटा होता याचा अर्थ खूप गहन आहे. अद्वैतमतानुसार आयुष्यातील सर्व सुख दुःख जीव भोगताना दिसतो. परंतु आत्मा मात्र त्यापासून अलिप्त राहतो.
आणखी एकः कृष्णासारखा आत्मज्ञानी पुरूष भौतिक जगातील सर्व सुख दुःखे समरसून भोगताना दिसतो. परंतु अंतरात मात्र तो या सर्वांपासून अलिप्तच असतो.

इथे लेखक एकटा म्हणतोय.

एकटा आणि अलिप्त दोन्हीं शब्दांचे अर्थ वेगवेगळे आहेत.

एकटा असेल तो प्रत्येकवेळी अलिप्त असू शकत नाही आणि अलिप्त प्रत्येक वेळी एकटा असेलच असे नाही.

हे असले एकटे पण अटलजिंनि अचुक शब्दात पकडले आहे.

सच्चाई यह है कि, केवल ऊँचाई ही काफि नहीं होती,
सबसे अलग-थलग, परिवेश से पृथक, अपनों से कटा-बंटा,
शून्य में अकेला खड़ा होना, पहाड़ की महानता नहीं,
मजबूरी है, ऊँचाई और गहराई में, आकाश-पाताल की दूरी है,

जो जितना ऊँचा, उतना एकाकी होता है, हर भार को स्वयं ढोता है,
चेहरे पर मुस्कानें चिपका, मन ही मन रोता है,

या कवितेमधला कृष्ण मला असा वाटला.

पैजारबुवा,

विशाल कुलकर्णी's picture

18 Sep 2015 - 12:01 pm | विशाल कुलकर्णी

यस्स ज्ञानोबा, अगदी हेच अपेक्षीत आहे. मांत्रिक यांनी सांगितलेला अर्थ जरी लगू होत असला तरी मला तुम्ही सांगितलेला अर्थच अभिप्रेत आहे. धन्यवाद. _/\_

विशाल कुलकर्णी's picture

18 Sep 2015 - 12:06 pm | विशाल कुलकर्णी

धन्यवाद मांत्रिकभाऊ _/\_

दिनु गवळी's picture

18 Sep 2015 - 10:57 am | दिनु गवळी

अप्रतिम लेखन केलेय मला खुप आवडले माझा कान्हा एकटा होता

बोका-ए-आझम's picture

18 Sep 2015 - 11:57 am | बोका-ए-आझम

रच्याकने, हा प्राची अश्विनींच्या कवितेचा प्रतिवाद आहे का?

विशाल कुलकर्णी's picture

18 Sep 2015 - 12:04 pm | विशाल कुलकर्णी

नाही, ही कविता खुप आधी लिहायला सुरुवात केली होती. पण अर्धवटच राहून गेली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी फेसबुकवर पुजा भडांगे यांची 'सावळबाधा' वाचनात आली. ती वाचल्यावर का कोण जाणे ही कविता पूर्ण कराविशी वाटली.

पुजा भडांगे यांची सावळबाधा इथे वाचता येइल.

मारवा's picture

18 Sep 2015 - 12:41 pm | मारवा

विशाल जी
तुम्हाला एक विचारु का ?
हि कविता लिहीतांना कवी ग्रेस यांची
असतील लाख कृष्ण कालिंदिच्या तटाला....
वस्त्रांत द्रौपदि च्याहि
तो कृष्ण नागडा होता
या ओळींचा प्रभाव हि रचना करतांना कुठेतरी होता का ?
अर्थात ते असो नसो हि कविता सुंदर च आहे यात वाद नाही
त्या ओळींची तात्काळ आठवण झाली म्हणुन विचारलं इतकचं.

विशाल कुलकर्णी's picture

18 Sep 2015 - 12:59 pm | विशाल कुलकर्णी

असेलही कदाचित... ग्रेसचं वेड आमच्याही रक्तात आहेच.
पण ही कविता वाचताना तुम्हाला ग्रेसच्या ओळींची आठवण आली यातच या रचनेचे सार्थक झाले _/\_

शिव कन्या's picture

18 Sep 2015 - 1:30 pm | शिव कन्या

आवडली.

नाखु's picture

18 Sep 2015 - 3:08 pm | नाखु

मस्त रचना.

तुझं वाचन अफाट आहे त्याचा पुनर्प्रत्यय आला.

कविता निरक्षर नाखु

अत्रुप्त आत्मा's picture

18 Sep 2015 - 8:47 pm | अत्रुप्त आत्मा

+१ टू ( यावेळी ;) )- ना खून काका!

विशाल कुलकर्णी's picture

18 Sep 2015 - 3:14 pm | विशाल कुलकर्णी

धन्यवाद देवानू _/\_

मदनबाण's picture

18 Sep 2015 - 3:14 pm | मदनबाण

सुरेख...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Gajanana... :- Bajirao Mastani

प्राची अश्विनी's picture

18 Sep 2015 - 4:34 pm | प्राची अश्विनी

वा!

द-बाहुबली's picture

18 Sep 2015 - 6:37 pm | द-बाहुबली

हम्म.. एक एकटा एकटाच...!

अवांतरः- अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता वगैरे टाइप वाचायला मिळेल असे भासले होते.

एक एकटा एकटाच's picture

19 Sep 2015 - 1:07 am | एक एकटा एकटाच

बोलवलत का मला?

:-)

पद्मावति's picture

19 Sep 2015 - 12:57 am | पद्मावति

श्रीकृष्णाचं अगदी यथार्थ वर्णन केलंय. अतिशय सुरेख कवीता. त्यात श्रीकृष्णाची कथा तुम्ही इतकी छान सारांश रूपात सांगितली आहे ते खूप आवडलं.

एक एकटा एकटाच's picture

19 Sep 2015 - 1:06 am | एक एकटा एकटाच

और ये लगा सिक्सर

विशाल - फिर चैपियन.....

विशाल कुलकर्णी's picture

19 Sep 2015 - 8:48 am | विशाल कुलकर्णी

धन्यवाद मंडळी _/\_

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

22 Sep 2015 - 10:23 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

अतिशय आशयघन...
स्वगतः एकदा भेटायलाच हवे या माणसाला...

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Sep 2015 - 6:36 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर !

पैसा's picture

23 Sep 2015 - 6:49 pm | पैसा

अप्रतिम कविता! मला मात्र एकटा म्हणजे 'एकाकी' या एकाच अर्थापेक्षा "one & only one" वगैरे अर्थच्छटा जाणवल्या! झकास! (याला कारण इथे गोव्यात एक जण या अर्थाने "एकटा" शब्द वापरतात त्याची झालेली सवय हे असू शकेल.)