१९६०चे दशक नुकतेच चालू झाले होते . मराठी चित्रपटसॄष्टीमध्ये ग्रामिण बाजाचे चित्रपट हळुहळु लोकप्रिय होऊ लागले होते. ग्रामिण पार्श्वभूमी असलेले कथानक व त्याला असलेली लावणीप्रधान गीत नॄत्यांची जोड हे काँबिनेशन मराठी प्रेक्षकांनी चांगलेच उचलून धरले ."सांगते ऐका" , "पाटलाचा पोर" ,"ओवाळणी" अशा ग्रामिण पार्श्वभूमीच्या सिनेमांनी चांगलेच यश मिळवले . साहजिकच मराठी चित्रपट निर्मातेही अशाच चित्रपटांच्या निर्मीतीकडे वळू लागले . अनंत माने , दिनकर द. पाटिल असे कल्पक दिग्दर्शक , माडगुळकर बंधू ,शंकर पाटिल असे कलासिद्ध लेखक, वसंत पवार,राम कदम असे अष्टपैलू संगीतकार, अरुण सरनाईक , सुर्यकांत , चंद्रकांत ,जयश्री गडकर, उषा किरण असे मेहनती अभिनेते अशी समर्थ कलाकारांची फळीच मराठी चित्रपटसॄष्टीमध्ये निर्माण होउ लागली होती .
पूण्यातील डेक्कन परिसरातील लकी कॅफेमध्ये आज फारशी वर्दळ नव्हती. मंगळवारचा दिवस ,सकाळी दहाची वेळ . अजित निवांतपणे कॅफेमध्ये बसून होता . एकिकडे शांतपणे हातातल्या ग्लासमधील चहाचा आस्वाद घेता घेता मधुनच त्याची नजर भिंतीवरील घड्याळाकडे जात होती . तो मोठ्या आतुरतेने आपल्या मित्राची, रवीची वाट पाहात होता.
अजित हा गेली पाच सहा वर्षे काही मराठी चित्रपट निर्मीती संस्थांमध्ये निर्मीती सहाय्यक म्हणून काम करत होता. पदवीनंतर त्याने स्वतःहून हे क्षेत्र आवडीने निवडले . या पाच सहा वर्षांमध्ये त्याला चित्रपट निर्मीतीमधल्या कथा ,पटकथा , संवाद , दिग्दर्शन अशा वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करण्याची संधी मिळाली होती. अजितनेही मोठ्या जिद्दीने व मेहनतीने या विभागांमध्ये चांगले काम करुन आपली चमक दाखविली . अनेक दिग्दर्शक , कॅमेरामन ,कथाकार व संवादलेखक यांच्या तो खास विश्वासातला माणुस झाला होता . निर्मातेही त्याच्यावर खुश होते.
अलिकडे अजितच्या मनात बरेचदा आपणच एखादे कथानक लिहून त्यावर चित्रपट दिग्दर्शीत करावा असा विचार येत होता. त्याविषयी त्याची एका निर्मात्याशीही चर्चा झाली होती . निर्मात्याचाही अजितवर विश्वास असल्याने त्याने संमती दिली . पुढील भेटीत निर्मात्याला आपले कथानक ऐकवण्याचे त्याने ठरवले . आपल्या मित्राला, रवीलाही त्याने आपला मनोदय ऐकविला .रवीलाही या क्षेत्रामध्ये अजितएवढाच चांगला अनुभव होता. दोघांनी बरेचदा एकत्र काम केले होते . त्यामुळे त्यांच्यात चांगलाच ताळमेळ निर्माण झाला होता. तेव्हा आपण चित्रपट बनवला तर रवीने आपल्याला कथा ,पटकथा , संवाद लेखनामध्ये मदत करावी हि अजितची ईच्छा रवीने आवडीने मान्य केली .
नव्या चित्रपटाच्या कथानकाबद्दल चर्चा करण्यासाठी आज दोघे भेटणार होते. अलिकडेच दोघांची आधीची कामे पुर्ण झाली होती .त्यामुळे दोघेही सध्या मोकळे , निवांत होते . आधीच्या कामाचे पेमेंट झाल्यामुळे दोघांचे खिसेही चांगलेच गरम होते . पूण्यातील डेक्कन परिसरातील लकी कॅफे हि त्यांची नेहमीची मोकळ्या वेळेत भेटण्याची , निवांतपणे गप्पा मारण्याची , चर्चा करण्याची जागा होती . आपले कामाचे पुढचे बेतही ते बरेचदा इथेच बसून ठरवत असत . आज अजित आतुरतेने आपल्या मित्राची, रवीची वाट पाहात होता .
--------- क्रमशः------------काल्पनीक------------------------
प्रतिक्रिया
17 Sep 2015 - 5:47 pm | मांत्रिक
अरे वा! उत्कंठावर्धक!
17 Sep 2015 - 6:01 pm | दिनु गवळी
पाठलाग नावाची एक कथा मी २०१३ १४ मध्ये
वाचली होती अनिकेत समुद्रे लेखक आहेत मस्त लेखक आहेत ते
17 Sep 2015 - 9:47 pm | लालगरूड
manatale.wordpress.com
17 Sep 2015 - 6:42 pm | एस
सुरुवात छान झाली आहे. पुभाप्र.
19 Sep 2015 - 1:01 am | एक एकटा एकटाच
वाचतोय
पण पुढचा भाग थोडा मोठा टाका
19 Sep 2015 - 1:30 pm | सिरुसेरि
"पण पुढचा भाग थोडा मोठा टाक" - मोठी कथा लिहिताना ती कंटाळवाणी बनते हा मला माझ्याच बाबतीत आलेला अनुभव आहे . उदाहरणार्थ मी काही दिवसांपुर्वी लिहिलेली "अस्तित्व" हि कथा . http://misalpav.com/node/32590 .