मिपा संपादकीय - आढावा वर्तमानाचा, कानोसा भविष्याचा

संपादक's picture
संपादक in विशेष
25 Aug 2008 - 12:29 am
संपादकीय

मिपा व्यवस्थापन 'मिपा संपादकीय' हे सदर लोकमान्य टिळक यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित करत आहे. यापूर्वीचे संपादकीय लेखन येथे वाचायला मिळेल! धन्यवाद...

आढावा वर्तमानाचा, कानोसा भविष्याचा

प्रत्येक क्षणाला जगात काही ना काही तरी घडत असतं. त्यातील काही भाग हा पुढच्या क्षणाला काळाच्या उदरात गडप होतो, काही भाग हा काही काळासाठी प्रसिद्धीत रहातो तर काही भाग हा इतिहास होतो, म्हणजे त्यावर अवलंबून वर्तमान आणि भविष्य घडते/घडू शकते. हे व्यक्तीबद्दलपण खरे असते आणि समाज, देश, जग यांच्या बाबत पण खरे असते. अग्रलेख हा बर्‍याचदा यातील दुसर्‍या आणि तिसर्‍या प्रकारातील प्रसंगाशी संलग्न समजला तर गेल्या काही दिवसात असे काय काय घडले जे अजून प्रसिद्धी झोतात आहे आणि/किंवा ज्यात इतिहास घडवायची ताकद आहे असा प्रश्न पडतो. साहजीकच बर्‍याच चांगल्या/वाईट गोष्टी डोळ्यासमोरून जाऊ लागतात....

गेल्या काही दिवसांत राजकीय स्तरावर एक गोष्ट घडली ती म्हणजे विद्यमान महसूल मंत्री नारायण राणे यांचे राजीनामा नाट्य आणि त्यांना मिळालेला काँग्रेस श्रेष्ठींकडून प्रसाद. ही बातमी अनेक दिवस प्रसिद्धीमाध्यमे चघळत होती. सवयीने "चमत्कार" होणार स्टाईलची भाषा राणेसाहेब सातत्याने करत होते. पण झाले भलतेच काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनीया गांधींनी त्यांना साधे चर्चेसाठी निमंत्रणही दिले नाही. मुख्यमंत्री म्हणून काही कर्तुत्व दिसत नसतानाही विद्यमान मुख्यमंत्री विलासराव देशमूखांनी चारी मुंड्या चीत केल्या. एकंदरीतच हा प्रसंग बघताना दोन बैलांची झुंज पहावी असे आपण स्वतःच्या अथवा माध्यमांच्या नजरेने पहात आहोत का असा प्रश्न पडला. तरी देखील यातून तमाम राजकारण्यांना शिकण्यासारखे बरेच काही असे वाटते. ज्यावेळेस राणे शिवसेना सोडून काँग्रेसमधे गेले, नंतर शिवसेनेतील अनेकांना फोडले आणि काँग्रेस श्रेष्ठींकडून शाबासकी मिळवली जी आता पोकळ ठरली, त्यातून त्यावेळेस असे चित्र तयार झाले होते की जणू काही शिवसेना संपली आणि राण्यांच्या रुपाने काँग्रेसच्या राणीला महाराष्ट्र सांभाळायला नवीन हिरा मिळाला... पण शेवटी "ऐरावती रत्न थोर त्यासी अंकूशाचा मार..." अशी या रत्नाची अवस्था झाली... - राणे काही आज मुख्यमंत्री नाहीत जे ते शिवसेनेत असताना पण होऊ शकले तर दुसरी कडे विलासराव जणू काही धृवबाळच ठरले. यातून एक कालातीत सत्य दिसून आले. बाटलेला जितका कडवा असतो तितके त्याचे नवीन धर्मात स्वागत होते पण तो जेंव्हा तेथे महत्त्वाकांक्षी होतो तेंव्हा मात्र बाजूला करणे श्रेयस्कर असते. कारण तेंव्हा त्याच्याकडे "आपल्यातला" म्हणुन न बघता "फितुर" म्हणून बघितले जाते. थोड्याफार फरकाने हीच किंमत छगन भूजबळांना मिळाली असे म्हणावेसे वाटते. एखाद्या गटाशी, या संदर्भात राजकीय पक्षाशी पटत नाही म्हणून वेगळी चूल मांडायची हिंमत करणे हा एक भाग झाला आणि फितूरी करणे हा दुसरा... फितूराला, त्याच्या फितूरीला प्रोत्साहन देणारे पण नंतर किंमत देत नाहीत हा धडा जर यातून जरूर घेता येऊ शकतो...

भारताला स्वातंत्र्य मिळून ६१ वर्षे झाली. अनेक उणीदूणी माहीत असली, त्यावर बोलता येत असले तरी लोकशाही आली आणि रुजली. जगातील इतर कुठल्याही समाजाप्रमाणे असेल, भारतीय समाजात पण विरोधाभास दिसतो. एकीकडे पूर्वेतिहास, संस्कृतीच्या गोष्टी की जे पण सत्य आहे आणि दुसरीकडे माणूसपण हरवून रुढीत रुतलेले मन हे पण तितकेच कडू असेल पण सत्यच. आज एकीकडे माहीतीतंत्रज्ञानाने आलेले नववैभव आणि पाश्चात्य संस्कृती तर दुसरीकडे आजही मुलभूत सेवासुविधांपासून दुर राहीलेले खेड्यापाड्यात आणि त्याही पुढे रानावनात अजूनही वनवास कंठणारे जीवन. एकीकडे दरवर्षी २६ जानेवारीला छाती गर्वाने फुलून यावी असे सामर्थ्य दाखवणारा हा देश, जेंव्हा दर चार वर्षांनी ऑलिंपिक्सची वेळ येते, तेंव्हा मात्र हात हालवत येणारा समर्थहीन नागरीकांचा देश वाटतो. हे वर्ष ही असेच असेल असे वाटत असताना काही आशादायी गोष्टी दिसल्या...

सर्वप्रथम प्रकाश-मंदाकीनी आमट्यांना मिळालेल्या मॅगेसेसे पुरस्कारामुळे केवळ एक व्यक्तीच नाही, तर कुटूंब आणि एकापेक्षा जास्त पिढी नि:शब्द राहून समाजसेवेचे व्रत कशी अंगिकारते ते लोकांपुढे आले. तो महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण होता. बर्‍याचदा असे बक्षिस हे केवळ त्या व्यक्तीपुरते आणि त्या एकाच कार्यापुरते मर्यादीत नसते तर त्यातून एक जाणीव होत असते की समाजात खर्‍या अर्थाने प्रसिद्धीपासून लांब राहून तन-मन-धन अर्पून सेवा करणारे, ह्यांच्याकडे संपुर्णत: जगाचे दुर्लक्ष नसते. कुठेतरी चांगुलपणाची नोंद होत असते. चांगले काम हे असे दुर्लक्षिले न जाणे हे देशापेक्षा मोठ्यापातळीवरील प्रगल्भावस्थेचे लक्षण आहे. ते वाढतच राहोत अशी आशा. पण ते कायम आणि सर्वत्र जमणे हे व्यवहार्य नसते. त्याच वेळेस आज सुदैवाने अशी ऋषितुल्य माणसे आहेत ही बर्‍याचदा तत्त्व म्हणून आणि कधीकधी तात्त्विक आणि सात्त्विक अहंकारातून उर्वरीत समाजापासून आणि प्रसिद्धीपासून लांब रहाणे पसंद करतात. वरकरणी त्यांची भूमिका चूक नसते. शिवाय त्याना चूक म्हणणरे तुम्हीआम्ही कोण हा पण तितकाच प्रश्न आहे. तरी देखील असे राहून राहून वाटते की त्यांनी जरी आठवड्यातून/महीन्यातून/वर्षातून स्वतःची पाठ थोपटणारे "प्रेस रीलीज" काढले नाहीत तरी माध्यमांनी - प्रसिद्धी आणि आंतर्जालावरील हौशी माध्यमांनी त्या कार्याची आणि त्याच्या मागील प्रेरणेची सातत्याने दखल घेणे जरूरीचे आहे. आज जग जवळ आले म्हणतो पण जर त्यातील कुठल्यातरी सामाजीक प्रश्नांना आपली खारीच्या वाट्याइतकी पण मदत होत नसेल तर काय उपयोग? पण जसे खारीला मदत कराविशी वाटायला, तमाम वानरांचे कार्य आणि रामाचे कर्तुत्व प्रेरणा ठरले तसे जनसामान्यांपर्यंत असे कार्य जाणे महत्त्वाचे वाटते.

आमटे दांपत्यांबद्दल आनंदाची बातमी "कालची" होते न होते तोच नुसती आनंदाची नाही तर सुखद धक्का देणारी बातमी अभिनव भिंद्रामुळे वाचायला मिळाली. भारताला प्रथमच ऑलिंपिक्समध्ये वैयक्तिक सुवर्ण पदक मिळाले आणि पाठोपाठ आलेल्या बातम्यांमुळे भारताला कधी नव्हे ती एकूण तीन पदके मिळाली.... वास्तवीक ही बातमी वाचताना जुन्या वाक्प्रचाराप्रमाणे "एका डोळ्यात हासू तर दुसर्‍या डोळ्यात आसू" आले. आनंदाश्रू आले कारण ते तीन पदके मिळाली आणि कदाचीत काहीच न मिळून केवळ हात हलवत कधीतरी अपरात्री विमानतळावर उतरणार्‍या खेळाडूंना बघायच्या आधीच विसरून जायची सवय मोडेल ह्या अपेक्षेने ... पण त्याच वेळेस कुठेतरी वाईट वाटले की अरे अब्जावधी लोकांचा हा देश - कायमच लोकसंख्येत किमान दुसया क्रमांकावर राहीला. पण इतकी अवस्था? त्याच वेळेस असेही ऐकले की अमेरिकन ऑलिंपिक्स टिममध्ये राज भवसार नावाच्या एका खेळाडूस जिमनॅस्टीक्स मधे घेतले होते. याचा अर्थ इतकाच की आपण कदाचीत खेळात पण कमी नसू. मग इतके वर्षे घोडे कुठे पेंड खात होते? उत्तर परत मिळते ते दोन गोष्टींत - सरकारवर कशासाठीही अवलंबून राहणे हे कुठल्यानकुठल्या तरी कारणाने आपली माणसे सोडू लागली आणि यश प्राप्त करू लागली. तरी देखील एक गोष्ट अजून होती - ती म्हणजे केवळ "पब्लीकचे" लक्ष क्रिकेट मध्ये म्हणून आपण पण त्याच भाउगर्दीत जायचे या लोकांनी टाळले. अथक प्रयत्न केले. काहींना दृश्य यश मिळाले पण त्यांच्या इतकेच या वर्षीच्या ऑलिंपिक्समधे असे यश न मिळवून प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे महत्वकांक्षी खेळाडू होते हे भारताच्या दॄष्टीने आशादायी चित्र आहे.

सरते शेवटी अजून एका अगदी ताज्या घटनेबद्दल लिहावेसे वाटते. ती मराठी समाजातील नाही, की महाराष्ट्रातील अथवा भारतातील नाही... पण जगाच्या रंगमंचावर जानेवारी २०, २००९ ला येण्याची मनिषा बाळगणार्‍या नवीन होतकरू कलाकाराची आहे. त्याचे नाव आहे अमेरिकन डेमोक्रॅटीक पक्षाचा राष्ट्राध्यक्षिय उमेदवार बराक ओबामा. अमेरीकन निवडणूक पद्धतीत एक घेण्यासारखा आणि म्हणून हेवा वाटणारा प्रकार म्हणजे पक्षांतर्गत प्राथमिक निवडणूका ज्या देशभर होतात. इच्छूक उमेदवारांना मतदारराजा/राणीच्या आणि माध्यमांच्या नजरेतून तावून सुलाखून जावे लागते आणि मगच तो पुढची लढाई लढण्यास पात्र ठरू शकतो. या वेळीस डेमोक्रॅटीक पक्षाने इतिहास करण्याचे मनावरच घेतले होते. म्हणून लढत होती स्त्री उमेदवार हिलरी क्लिंटन आणि कृष्णवर्णीय उमेदवार बराक ओबामा यांच्यात. मोठ्या कौशल्याने स्वत:चे श्रेष्ठत्व सिद्ध केलेल्या या ओबामाने राष्ट्राध्यक्षपदी प्रथम कृष्णवर्णीय उमेदवार आणि प्रथमच अल्पसंख्य उमेदवार म्हणून आत्ताच इतिहास केला आहे. राष्ट्राध्यक्ष होईल का नाही ते नोव्हेंबरच्या पहील्या आठवड्यात गोंधळ झाला नाही तर समजेल! ओबामाला बहुसंख्य कृष्णवर्णीयांचा नक्कीच पाठींबा होता आणि राहीला तर त्यात आशर्य नाही. ज्या समाजाला शतकानूशतके अनन्वित अत्याचार सहन करावे लागले त्या समाजाच्या दृष्टीने ही मानाची, अभिमानाची आणि राजकीय स्वत्व पूर्णत्वाला नेण्याची संधी आहे. तरी देखील हे होत असताना, अत्यंत सभ्य पद्धतीने अमेरिकन समाजात द्वेष निर्माण होईल असे वक्तव्य न करता, आणि तसे वक्तव्य करणार्‍या आपल्या स्वकीयांना दुर लोटून, ही निवडणूक लढवताना ओबामा अमेरिकन समाजात स्वत्:चे स्थान उंचावत आहे. यातून आपल्याक्डेही बरेच काही घेण्यासारखे आहे असे वाटते. सर्वप्रथम राजकीय तडजोड ही ओबामा विसरले नाहीत आणि त्याच वेळेस आपल्या वर्तनातून जाणारा संदेश हा उच्चश्रेणीचाच असेल आणि एखाद्या आदर्श नेतृत्वाचाच वाटू शकेल याची त्यांनी काटेकोर काळजी घेतली. परीणामी त्यांचे वर्तन हे केवळ त्यांनाच मोठे नाव देत नाही आहे तर त्यातून नवीन आणि नव्याने दर्‍या निर्माण होत नाही आहेत. अशा दर्‍या - सामाजीक, राजकीय, आर्थिक कुठल्याही असोत त्या निर्माण न करता आपण जिथे जे काम करत आहोत त्यातून बरेच काही चांगले निर्माण करू शकतो.

राणे, आमटे, ऑलिंपिक्समधील खेळाडू आणि ओबामा या विविध वृत्ती आहेत ज्या व्यक्ती म्हणून सध्याच्या वर्तमानात बातम्या झाल्या. काही कालांतराने त्यातील काही काळाच्या उदरात गडप होतील तर काही या मंद दिव्याच्या प्रकाशाप्रमाणे अंधारात मार्ग दाखवतील तर काही जगभर परीणाम होऊ शकतील असा इतिहास घडवू शकतील. माध्यमांचे कर्तव्य आहे की त्यातून घेण्यासारखे काय आहे ह्याचे प्रामाणिक विश्लेषण करणे. तर तुम्हाआम्हासारख्या जनसामान्यांचे कर्तव्य आहे की नीरक्षीर वृत्तीने त्यातील जे काही चांगले वाटते ते यथाशक्ती आत्मसात करणे अथवा किमान ते जनसामान्यांपर्यंत पोचवणे.

पाहुणा संपादक : विकास.

प्रतिक्रिया

बेसनलाडू's picture

25 Aug 2008 - 12:45 am | बेसनलाडू

भारतातील तसेच जगातील ताज्या घटनांचा केलेला ऊहापोह चांगला झाला आहे. पाहुण्या संपादकाचे या तसेच इतर मंचांवरील लेखन व वावर पाहता त्या प्रतिमेशी प्रामाणिक रहायचेच काम या अग्रलेखाने केले आहे,असे म्हणता येईल.
लेखात नमूद केलेल्या 'बातम्यांचा' भविष्यावर काय परीणाम होईल,याचा कानोसा घेण्यात मात्र काहीशी कमतरता जाणवते. मात्र असा प्रत्यक्ष,सरळसोट आढावा न घेता प्रत्येक बातमीवर किंवा तिच्याशी संबंधित जी विधाने लेखकाने केली आहेत,त्यांचा अर्थ वाचकांनी आपापल्या परीनेच लावावा आणि स्वतःच स्वतःच्या भविष्याचा कानोसा घ्यावा,असा उद्देश असल्यास तो नक्कीच साध्य झाला आहे,असे म्हणता येईल. अग्रलेखात अशा बातम्यांच्या भविष्यकालीन,दूरगामी परिणामांबद्दलचे 'एक्स्प्लिजिट्' भाष्य असेल,असे (मला तरी) अपेक्षित होते. निदान शीर्षकावरून आणि लेखाच्या सुरुवातीवरून तरी तसेच वाटले. चू. भू. द्या. घ्या.
काश्मीरबाबत या तसेच इतर मंचांवर ज्वलंत चर्चा झडत असताना या लेखात मात्र त्याबाबत साधा नामोल्लेखही नाही,याचे राहून राहून आश्चर्य वाटते.लेखाच्या शीर्षकाशी आणि उद्दिष्टांशी प्रामाणिक राहणारी यापेक्षा चांगली 'बातमी' दुसरी कोणती असावी?
एकंदर अग्रलेख आवडला. मिसळपाववरील हा उपक्रम उत्तमोत्तम अग्रलेखांच्या आणि त्या अनुषंगाने होणार्‍या चर्चांच्या माध्यमातून यशस्वी होतो आहे,याचा आनंद वाटतो.
(वाचक)बेसनलाडू

विकास's picture

25 Aug 2008 - 6:27 am | विकास

लेखात नमूद केलेल्या 'बातम्यांचा' भविष्यावर काय परीणाम होईल,याचा कानोसा घेण्यात मात्र काहीशी कमतरता जाणवते. मात्र असा प्रत्यक्ष,सरळसोट आढावा न घेता प्रत्येक बातमीवर किंवा तिच्याशी संबंधित जी विधाने लेखकाने केली आहेत,त्यांचा अर्थ वाचकांनी आपापल्या परीनेच लावावा आणि स्वतःच स्वतःच्या भविष्याचा कानोसा घ्यावा,असा उद्देश असल्यास तो नक्कीच साध्य झाला आहे,असे म्हणता येईल.

तुम्ही म्हणता ती कमतरता मला "अग्रलेख"म्हणून लिहीताना मर्यादा म्हणून जाणवली. लेख कंटाळवाणा/लांबलचक न होता त्यात सध्या घडत असलेल्या घटनांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न इतके करूनच म्हणून हा लेख थांबवला. अशंतः असाच विचार केला की वाचकांनी घटनांचा मागोवा घेताना कुठेतरी "रॅशनल" विचार करावा.

काश्मीरबाबत या तसेच इतर मंचांवर ज्वलंत चर्चा झडत असताना या लेखात मात्र त्याबाबत साधा नामोल्लेखही नाही,याचे राहून राहून आश्चर्य वाटते

अर्थातच मला ती बातमी देखील या संदर्भात घ्यावीशी वाटली. पण त्यावर अनेक चर्चा चालू असल्याने लेखाचा उद्देश भरकटलेला आणि एकांगी होऊ शकेल असे वाटले. आणि लेखातील उदाहरणे ही व्यक्तींसंदर्भात मर्यादीत ठेवण्याचा प्रयत्न देखील विचारात होता (राणे, खेळाडू, आमटे, ओबामा). काश्मिरच्या प्रश्नात केवळ एकच व्यक्ती नाही. म्हणून देखील तो विषय टाळला.

दोन्ही मोकळ्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद!

रामदास's picture

25 Aug 2008 - 1:09 am | रामदास

दह्यासारखा हा अग्रलेख वाटला.विषयाचे अनेक कोपरे हाताळायचे राहून गेले आहेत असं वाटलं.
वेगळा विषय हाताळल्याबद्दल संपादकाचे आभार.

विजुभाऊ's picture

25 Aug 2008 - 10:29 am | विजुभाऊ

रामदासांशी सहमत पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

मेघना भुस्कुटे's picture

25 Aug 2008 - 6:50 am | मेघना भुस्कुटे

अगदी वेगळा विषय. पण निदान शेवटच्या परिच्छेदाचा अजून विस्तार वाचायला आवडले असते.

सहज's picture

25 Aug 2008 - 7:08 am | सहज

मोजकी उदाहरणे देण्यामागचा पण त्या घडणार्‍या गोष्टीमागची विचारक्रिया समजुन घ्यावी हा हेतु कळला, सहमत.

अग्रलेख आवडला.

स्वाती दिनेश's picture

25 Aug 2008 - 11:51 am | स्वाती दिनेश

मोजकी उदाहरणे देण्यामागचा पण त्या घडणार्‍या गोष्टीमागची विचारक्रिया समजुन घ्यावी हा हेतु कळला
असेच म्हणते.
अग्रलेख आवडला.
स्वाती

लिखाळ's picture

25 Aug 2008 - 8:05 pm | लिखाळ

अग्रलेख आवडला.
--लिखाळ.

धनंजय's picture

6 Sep 2008 - 1:16 am | धनंजय

वेगळ्या शैलीतला अग्रलेख आवडला.

गेले काही दिवस अमेरिकेतील प्रमुख पक्षांच्या अधिवेशनांतली भाषणे अधून-मधून ऐकत होतो. या अग्रलेखाची आठवण आली.

मथळा असा न वाटता, "आढावा वर्तमानाचा" असा वाटला.
हा आढावा घेण्यात विकास नी बरेच कष्ट घेतले आहेत. त्या कष्टांचे कौतूक वाटते.

अमोल केळकर's picture

25 Aug 2008 - 9:51 am | अमोल केळकर

विशेषतः शेवटचा परिच्छेद आवडला.
बाकी नारायण राणे सहजासहजी हार मानणार नाहीत. कोकणी माणुस मुळचाच चिवट असतो. प्रसारमाध्यमे जरी त्यांचा पराभवमानत असली तरी सोनियाजींकडुन त्यांनी नाक्किच मोठे आश्वासन घेतले असणार ( कदाचित पुढल्या निवडनिकीत काँग्रेस सत्तेवर आल्यास मुख्यमंत्रीपद / केंद्रात मंत्रिपद / मुलासाठी तिकिट इ.)

आपला
(कणकवली- आचर्‍याचा ) अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

मराठी_माणूस's picture

25 Aug 2008 - 10:54 am | मराठी_माणूस

ज्यांनि तळागाळातून उचलुन मुख्यमंत्रिपदा पर्यंत पोहचवले त्यांच्याशि फितुरि करुन ज्या बाइचे स्वतः चे काहिहि कर्तुत्व नसताना , अजुन पर्यंत तरि तुमच्या साठि काहिहि केले नसताना , तीचि एव्हढि हाँजी हाँजी ?

सुनील's picture

25 Aug 2008 - 10:00 am | सुनील

वर्तमानाचा आढावा अत्यंत उत्तम पद्धतीने घेतला गेला आहे परंतु भविष्याचा कानोसामात्र घेतला गेलेला नाही. अर्थात वर बेसनलाडू यांनी हे निदर्शनास आणले आणि आपण त्यास उत्तरदेखिल दिले आहेच.

अत्यंत सभ्य पद्धतीने अमेरिकन समाजात द्वेष निर्माण होईल असे वक्तव्य न करता, आणि तसे वक्तव्य करणार्‍या आपल्या स्वकीयांना दुर लोटून, ही निवडणूक लढवताना ओबामा अमेरिकन समाजात स्वत्:चे स्थान उंचावत आहे. यातून आपल्याक्डेही बरेच काही घेण्यासारखे आहे असे वाटते.

याच्याशी संपूर्णपणे सहमत.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मुक्तसुनीत's picture

25 Aug 2008 - 10:36 am | मुक्तसुनीत

लेख वाचताना विकासरावांच्या एकंदर व्यासंगाचे , घटनांकडे पहाताना त्यांचे पुढील-मागील संदर्भ व्यवस्थित जाणून घेण्याचे , आणि वाचकांपर्यंत परिणामकारकरीत्या पोचविण्याचे कसब विशेष जाणवते.

असे असले तरी बेला यांनी आधीच दाखवून दिलेला मुद्दा प्रकर्षाने जाणवला. लेखनाची एकंदर पातळी फार चांगली आहे ; परंतु प्रस्तुत लेख बिंदुगामी झाला नाही असे वाटले. एखाद्या मुद्द्याला घेऊन त्याच्या बाजूने किंवा विरोधात बोलण्यासारखे टोक कुठे आले नाहीसे जाणवले..

- विकास यांच्या दर्जेदार लिखाणाची नेहमीच वाट पहाणारा.

ऋषिकेश's picture

25 Aug 2008 - 11:40 am | ऋषिकेश

अग्रलेखात जे काहि आलं आहे ते खुप अभ्यासपूर्ण आणि अभिनंदनीय आहे.

तरीही का कोण जाणे.. अग्रलेख हा थोडासा अपूर्ण वाटतो.. बर्‍याच मुद्यांना स्पर्श करतो पण एकावरही संपूर्ण भाष्य करत नाहि अथवा ठाम मत मांडत नाहि.

तरीही घेतलेला वर्तमानाचा धांदोळा आवडून जातो हे विशेष :)

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

स्वप्निल..'s picture

25 Aug 2008 - 6:50 pm | स्वप्निल..

विकास,

लेख आवडला. लिहिण्याचे आपले कसब लेखातुन जाणवते. सध्याच्या घडामोडींचा चांगला आढावा घेतला आहे. पण
तरीही का कोण जाणे.. अग्रलेख हा थोडासा अपूर्ण वाटतो.. बर्‍याच मुद्यांना स्पर्श करतो पण एकावरही संपूर्ण भाष्य करत नाहि अथवा ठाम मत मांडत नाहि. या ऋषिकेश यांच्या वाक्याशी सहमत.

स्वप्निल..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Aug 2008 - 5:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लक्षवेधी बातम्यांचा कानोसा घेतांना विकासरावांच्या लेखनामागील मेहनतीचे कौतुक आहेच...कारण बातम्या केवळ निर्देश करत आहेत, वाचकांनी त्याचा विचार करावा हा हेतू असल्याने संपादक यात यशस्वीच झाला आहे.

बाटलेला जितका कडवा असतो तितके त्याचे नवीन धर्मात स्वागत होते पण तो जेंव्हा तेथे महत्त्वाकांक्षी होतो तेंव्हा मात्र बाजूला करणे श्रेयस्कर असते. कारण तेंव्हा त्याच्याकडे "आपल्यातला" म्हणुन न बघता "फितुर" म्हणून बघितले जाते.

राणेंच्या बाबतीत ज्या लोकांना त्यांच्याबद्दल सहानुभुती वाटते त्यापैकी आम्ही एक. एक हुशार, अभ्यासू, आणि धाडसी निर्णय घेणारा अशी एक त्यांची प्रतिमा आमच्या मनात आम्ही उभी करतो. त्याबद्दलचे आपण काढलेला निष्कर्षाशी सहमत...राणेंना काँग्रेसी संस्कृती कळली नाही, मुख्यमंत्र्याचे स्वप्न भंगले...असा दांगडू करणार्‍यांना राणे अजून कळलेच नाही, असे वाटते. आज जरी त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले असले किंवा त्यांना महत्त्व दिले गेले नसले तरी सोनिया यांची शांतता त्यांना कदाचित रसातळाला किंवा कोणताही चमत्कार कदाचित त्यांच्या रस्त्याला मुख्यमंत्र्याच्या पदाकडे घेऊन जाईल असे वाटते. तसे नसते तर त्यांना प्रदेशाध्यक्षपद दिले गेले असते, तसे झाले असते तर वयक्तिक मला असे वाटते की राणे संपले असते. म्हणुनच अशा कोणत्याही पदापेक्षा त्यांनी काही वेळ शांत बसणे हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे वाटते. कोणतेही प्रयत्न न करता महाराष्ट्रातील काँग्रेसचे सरकार बुडणार आहेच. त्याचे सर्व अपयशाचे खापर फोडण्याची संधी राणेंना मिळणार आहे. तेव्हा एका महत्त्वाकांक्षी माणसाने थांबणे शहाणपणाचे वाटते.

अभिनव बिंद्राच्या बाबतीत ते काही भारताचे पदक नाही ते त्याचे वयक्तिक पद आहे, अशी एक जाहिरात सध्या वर्तमानपत्रातून झळकत आहे. असो,

ओबामा,आमटे आणि घेतलेल्या बातम्यांच्या कानोसा आवडला खूप विचार करता येईल, लिहिता येईल, ...कोणत्यातरी बातमीने आपल्या नियमित जीवनाच्या स्पंदनाचा ठोका चुकतो, तीचे विश्लेषन जर सकारात्मक विचाराला गती देत असेल तर, खर्‍या अर्थाने बातम्यातून भविष्यकाळाचा अचुक वेध घेता येतो, असे म्हणने वावगे ठरणार नाही.

सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय चिंतन हा आपल्या आवडीचा विषय. संस्थळावरील आपले लेखन/ प्रतिसाद/ आणि हा अग्रलेख पाहता आपल्या लेखनातल्या उणिवा शोधण्याचे धाडस आमच्यात तरी नाही, असो पुन्हा एकदा आपल्या उत्तम आणि विचाराला गती देणार्‍या लेखाबद्दल मनपुर्वक अभिनंदन !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर's picture

25 Aug 2008 - 6:10 pm | विसोबा खेचर

असो पुन्हा एकदा आपल्या उत्तम आणि विचाराला गती देणार्‍या लेखाबद्दल मनपुर्वक अभिनंदन !!!

बिरुटेसरांशी सहमत...

विकासराव, एका चांगल्या अग्रलेखाबद्दल मन:पूर्वक अभिनंदन....

तात्या.

विकास's picture

25 Aug 2008 - 8:01 pm | विकास

सर्व मोकळ्या प्रतिक्रीयांचे धन्यवाद!

आधीच्या एका प्रतिक्रीयेत म्हणल्याप्रमाणे, लेखन मर्यादा ठेवत असताना विश्लेषण किती करावे यावरपण मर्यादा घातल्या आणि केवळ "ओपिनियनेटेड" अथवा "ओपिनियन" तयार करण्याच्या ऐवजी, या काही घटनांतून काय दिसते हा प्रश्न माझ्यासकट सर्वच वाचकांनी आत्ता आणि पुढे पण स्वतःला विचारावा इतकाच उद्देश डोळ्यासमोर ठेवला. तसे करत असताना, पश्चातबुद्धी म्हणून वाटते की त्यात तोल सांभाळला गेला नसेल. "बेस्ट मिरर इज फ्रेंड्ज आयीज" असे म्हणतात ते या अनुषंगाने म्हणावेसे वाटते. या पद्धतीने वैचारीक आदानप्रदान होणे हे संकेतस्थळाचे - इथे अर्थातच मिपाचे यश ठरू शकते. म्हणुनच म्हणतो की आपण सुचवलेल्या गोष्टी पुढे लक्षात ठेवीन.

आता वर काही आलेल्या विषयसंदर्भातील प्रतिक्रियांसंदर्भात :

अमोल केळकर म्हणतात की, "बाकी नारायण राणे सहजासहजी हार मानणार नाहीत..." तर बिरूटेसर म्हणतात की, "...असा दांगडू करणार्‍यांना राणे अजून कळलेच नाही, असे वाटते."

दोन्ही प्रतिक्रीया आवडल्या कारण त्यात वेगळ्या पद्धतीने त्याच घटनेबद्दल काय असू शकते हे लिहीले आहे आणि तसे घडेलही... चर्चिलचे वाक्य आहे की, "politics is worst than war, because in war you die only once" ...तर यशवंतराव म्हणायचे की "politics is the game of patience". आज राणे ही दोन्ही वाक्ये अनुभवत आहेत. मी वरील अग्रलेख लिहून पाठवल्यावर वाचले की सोनीयांना भेटल्यानंतर राणे यांनी "तलवार म्यान केली" आणि त्या क्षणी बिरुटेसर जे काही वर म्हणले तेच मला देखील वाटले. तरी देखील राहून राहून वाटते - येथे राणे हा संदर्भ असेल पण तो कुणालाही लागू आहे. विशेष करून भारतीय राजकीय पद्धतीत. - आपले राजकारणी आपली "महत्वाकांक्षा" मोठी ठेवत असताना त्यासाठीची कृती "कोती" करतात. शिवाय महत्वाकांक्षेत एक विशिष्ठ मान, (या संदर्भात मुख्यमंत्री होणे) झाले की पुढे जनतेसाठी काय याचा काही विचार दिसत नाही. परत बाईने मुख्यमंत्री "केले" म्हणून तीला हवे ते करायला मोकळे. तीच अवस्था इतरत्रपण दिसून येते....

कदाचीत मी अमेरिकन राजकारण जवळून पाहीले/वाचले म्हणून अधिक जाणवत असेल पण - स्वतःची महत्वाकांक्षा ही जनहीताची कशी आहे हे जाहीर करून, वादविवाद करून सिद्ध करावे लागते - सर्वच राजकारण्यांना - गल्लीपासून (वॉशिंग्टन) डीसी पर्यंत. आज त्या जबाबदारीला गृहीत धरले जात नाही आणि आयाराम-गयाराम फितूरसंस्कृतीला राजमान्यता आणि लोकमान्यता मिळते हा फरक जाणवतो.

एकलव्य's picture

3 Sep 2008 - 4:27 am | एकलव्य

हे सारेच या जगाच्या रंगपटावर अनेकदा हजेरी लावून गेलेले आहेत. विकासरावांनी सूचित केलेल्या घटनांपैकी एखादी घटना किंवा व्यक्ति "यासम" हाच अशा पदवीस प्राप्त होईल असे आजतरी वाटत नाही. असो... पण उद्याचे खरोखरच माहीत नाही.

अमूर्त विषय पेलल्याबद्दल विकास यांचे अभिनंदन!

(भविष्यवेधी?) एकलव्य

जैनाचं कार्ट's picture

3 Sep 2008 - 12:27 pm | जैनाचं कार्ट (not verified)

विकास,
लेख आवडला

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!