मिपा संपादकीय - आढावा वर्तमानाचा, कानोसा भविष्याचा
विशेष
मिपा व्यवस्थापन 'मिपा संपादकीय' हे सदर लोकमान्य टिळक यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित करत आहे. यापूर्वीचे संपादकीय लेखन येथे वाचायला मिळेल! धन्यवाद...
आढावा वर्तमानाचा, कानोसा भविष्याचा
प्रत्येक क्षणाला जगात काही ना काही तरी घडत असतं. त्यातील काही भाग हा पुढच्या क्षणाला काळाच्या उदरात गडप होतो, काही भाग हा काही काळासाठी प्रसिद्धीत रहातो तर काही भाग हा इतिहास होतो, म्हणजे त्यावर अवलंबून वर्तमान आणि भविष्य घडते/घडू शकते. हे व्यक्तीबद्दलपण खरे असते आणि समाज, देश, जग यांच्या बाबत पण खरे असते. अग्रलेख हा बर्याचदा यातील दुसर्या आणि तिसर्या प्रकारातील प्रसंगाशी संलग्न समजला तर गेल्या काही दिवसात असे काय काय घडले जे अजून प्रसिद्धी झोतात आहे आणि/किंवा ज्यात इतिहास घडवायची ताकद आहे असा प्रश्न पडतो. साहजीकच बर्याच चांगल्या/वाईट गोष्टी डोळ्यासमोरून जाऊ लागतात....
गेल्या काही दिवसांत राजकीय स्तरावर एक गोष्ट घडली ती म्हणजे विद्यमान महसूल मंत्री नारायण राणे यांचे राजीनामा नाट्य आणि त्यांना मिळालेला काँग्रेस श्रेष्ठींकडून प्रसाद. ही बातमी अनेक दिवस प्रसिद्धीमाध्यमे चघळत होती. सवयीने "चमत्कार" होणार स्टाईलची भाषा राणेसाहेब सातत्याने करत होते. पण झाले भलतेच काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनीया गांधींनी त्यांना साधे चर्चेसाठी निमंत्रणही दिले नाही. मुख्यमंत्री म्हणून काही कर्तुत्व दिसत नसतानाही विद्यमान मुख्यमंत्री विलासराव देशमूखांनी चारी मुंड्या चीत केल्या. एकंदरीतच हा प्रसंग बघताना दोन बैलांची झुंज पहावी असे आपण स्वतःच्या अथवा माध्यमांच्या नजरेने पहात आहोत का असा प्रश्न पडला. तरी देखील यातून तमाम राजकारण्यांना शिकण्यासारखे बरेच काही असे वाटते. ज्यावेळेस राणे शिवसेना सोडून काँग्रेसमधे गेले, नंतर शिवसेनेतील अनेकांना फोडले आणि काँग्रेस श्रेष्ठींकडून शाबासकी मिळवली जी आता पोकळ ठरली, त्यातून त्यावेळेस असे चित्र तयार झाले होते की जणू काही शिवसेना संपली आणि राण्यांच्या रुपाने काँग्रेसच्या राणीला महाराष्ट्र सांभाळायला नवीन हिरा मिळाला... पण शेवटी "ऐरावती रत्न थोर त्यासी अंकूशाचा मार..." अशी या रत्नाची अवस्था झाली... - राणे काही आज मुख्यमंत्री नाहीत जे ते शिवसेनेत असताना पण होऊ शकले तर दुसरी कडे विलासराव जणू काही धृवबाळच ठरले. यातून एक कालातीत सत्य दिसून आले. बाटलेला जितका कडवा असतो तितके त्याचे नवीन धर्मात स्वागत होते पण तो जेंव्हा तेथे महत्त्वाकांक्षी होतो तेंव्हा मात्र बाजूला करणे श्रेयस्कर असते. कारण तेंव्हा त्याच्याकडे "आपल्यातला" म्हणुन न बघता "फितुर" म्हणून बघितले जाते. थोड्याफार फरकाने हीच किंमत छगन भूजबळांना मिळाली असे म्हणावेसे वाटते. एखाद्या गटाशी, या संदर्भात राजकीय पक्षाशी पटत नाही म्हणून वेगळी चूल मांडायची हिंमत करणे हा एक भाग झाला आणि फितूरी करणे हा दुसरा... फितूराला, त्याच्या फितूरीला प्रोत्साहन देणारे पण नंतर किंमत देत नाहीत हा धडा जर यातून जरूर घेता येऊ शकतो...
भारताला स्वातंत्र्य मिळून ६१ वर्षे झाली. अनेक उणीदूणी माहीत असली, त्यावर बोलता येत असले तरी लोकशाही आली आणि रुजली. जगातील इतर कुठल्याही समाजाप्रमाणे असेल, भारतीय समाजात पण विरोधाभास दिसतो. एकीकडे पूर्वेतिहास, संस्कृतीच्या गोष्टी की जे पण सत्य आहे आणि दुसरीकडे माणूसपण हरवून रुढीत रुतलेले मन हे पण तितकेच कडू असेल पण सत्यच. आज एकीकडे माहीतीतंत्रज्ञानाने आलेले नववैभव आणि पाश्चात्य संस्कृती तर दुसरीकडे आजही मुलभूत सेवासुविधांपासून दुर राहीलेले खेड्यापाड्यात आणि त्याही पुढे रानावनात अजूनही वनवास कंठणारे जीवन. एकीकडे दरवर्षी २६ जानेवारीला छाती गर्वाने फुलून यावी असे सामर्थ्य दाखवणारा हा देश, जेंव्हा दर चार वर्षांनी ऑलिंपिक्सची वेळ येते, तेंव्हा मात्र हात हालवत येणारा समर्थहीन नागरीकांचा देश वाटतो. हे वर्ष ही असेच असेल असे वाटत असताना काही आशादायी गोष्टी दिसल्या...
सर्वप्रथम प्रकाश-मंदाकीनी आमट्यांना मिळालेल्या मॅगेसेसे पुरस्कारामुळे केवळ एक व्यक्तीच नाही, तर कुटूंब आणि एकापेक्षा जास्त पिढी नि:शब्द राहून समाजसेवेचे व्रत कशी अंगिकारते ते लोकांपुढे आले. तो महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण होता. बर्याचदा असे बक्षिस हे केवळ त्या व्यक्तीपुरते आणि त्या एकाच कार्यापुरते मर्यादीत नसते तर त्यातून एक जाणीव होत असते की समाजात खर्या अर्थाने प्रसिद्धीपासून लांब राहून तन-मन-धन अर्पून सेवा करणारे, ह्यांच्याकडे संपुर्णत: जगाचे दुर्लक्ष नसते. कुठेतरी चांगुलपणाची नोंद होत असते. चांगले काम हे असे दुर्लक्षिले न जाणे हे देशापेक्षा मोठ्यापातळीवरील प्रगल्भावस्थेचे लक्षण आहे. ते वाढतच राहोत अशी आशा. पण ते कायम आणि सर्वत्र जमणे हे व्यवहार्य नसते. त्याच वेळेस आज सुदैवाने अशी ऋषितुल्य माणसे आहेत ही बर्याचदा तत्त्व म्हणून आणि कधीकधी तात्त्विक आणि सात्त्विक अहंकारातून उर्वरीत समाजापासून आणि प्रसिद्धीपासून लांब रहाणे पसंद करतात. वरकरणी त्यांची भूमिका चूक नसते. शिवाय त्याना चूक म्हणणरे तुम्हीआम्ही कोण हा पण तितकाच प्रश्न आहे. तरी देखील असे राहून राहून वाटते की त्यांनी जरी आठवड्यातून/महीन्यातून/वर्षातून स्वतःची पाठ थोपटणारे "प्रेस रीलीज" काढले नाहीत तरी माध्यमांनी - प्रसिद्धी आणि आंतर्जालावरील हौशी माध्यमांनी त्या कार्याची आणि त्याच्या मागील प्रेरणेची सातत्याने दखल घेणे जरूरीचे आहे. आज जग जवळ आले म्हणतो पण जर त्यातील कुठल्यातरी सामाजीक प्रश्नांना आपली खारीच्या वाट्याइतकी पण मदत होत नसेल तर काय उपयोग? पण जसे खारीला मदत कराविशी वाटायला, तमाम वानरांचे कार्य आणि रामाचे कर्तुत्व प्रेरणा ठरले तसे जनसामान्यांपर्यंत असे कार्य जाणे महत्त्वाचे वाटते.
आमटे दांपत्यांबद्दल आनंदाची बातमी "कालची" होते न होते तोच नुसती आनंदाची नाही तर सुखद धक्का देणारी बातमी अभिनव भिंद्रामुळे वाचायला मिळाली. भारताला प्रथमच ऑलिंपिक्समध्ये वैयक्तिक सुवर्ण पदक मिळाले आणि पाठोपाठ आलेल्या बातम्यांमुळे भारताला कधी नव्हे ती एकूण तीन पदके मिळाली.... वास्तवीक ही बातमी वाचताना जुन्या वाक्प्रचाराप्रमाणे "एका डोळ्यात हासू तर दुसर्या डोळ्यात आसू" आले. आनंदाश्रू आले कारण ते तीन पदके मिळाली आणि कदाचीत काहीच न मिळून केवळ हात हलवत कधीतरी अपरात्री विमानतळावर उतरणार्या खेळाडूंना बघायच्या आधीच विसरून जायची सवय मोडेल ह्या अपेक्षेने ... पण त्याच वेळेस कुठेतरी वाईट वाटले की अरे अब्जावधी लोकांचा हा देश - कायमच लोकसंख्येत किमान दुसया क्रमांकावर राहीला. पण इतकी अवस्था? त्याच वेळेस असेही ऐकले की अमेरिकन ऑलिंपिक्स टिममध्ये राज भवसार नावाच्या एका खेळाडूस जिमनॅस्टीक्स मधे घेतले होते. याचा अर्थ इतकाच की आपण कदाचीत खेळात पण कमी नसू. मग इतके वर्षे घोडे कुठे पेंड खात होते? उत्तर परत मिळते ते दोन गोष्टींत - सरकारवर कशासाठीही अवलंबून राहणे हे कुठल्यानकुठल्या तरी कारणाने आपली माणसे सोडू लागली आणि यश प्राप्त करू लागली. तरी देखील एक गोष्ट अजून होती - ती म्हणजे केवळ "पब्लीकचे" लक्ष क्रिकेट मध्ये म्हणून आपण पण त्याच भाउगर्दीत जायचे या लोकांनी टाळले. अथक प्रयत्न केले. काहींना दृश्य यश मिळाले पण त्यांच्या इतकेच या वर्षीच्या ऑलिंपिक्समधे असे यश न मिळवून प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे महत्वकांक्षी खेळाडू होते हे भारताच्या दॄष्टीने आशादायी चित्र आहे.
सरते शेवटी अजून एका अगदी ताज्या घटनेबद्दल लिहावेसे वाटते. ती मराठी समाजातील नाही, की महाराष्ट्रातील अथवा भारतातील नाही... पण जगाच्या रंगमंचावर जानेवारी २०, २००९ ला येण्याची मनिषा बाळगणार्या नवीन होतकरू कलाकाराची आहे. त्याचे नाव आहे अमेरिकन डेमोक्रॅटीक पक्षाचा राष्ट्राध्यक्षिय उमेदवार बराक ओबामा. अमेरीकन निवडणूक पद्धतीत एक घेण्यासारखा आणि म्हणून हेवा वाटणारा प्रकार म्हणजे पक्षांतर्गत प्राथमिक निवडणूका ज्या देशभर होतात. इच्छूक उमेदवारांना मतदारराजा/राणीच्या आणि माध्यमांच्या नजरेतून तावून सुलाखून जावे लागते आणि मगच तो पुढची लढाई लढण्यास पात्र ठरू शकतो. या वेळीस डेमोक्रॅटीक पक्षाने इतिहास करण्याचे मनावरच घेतले होते. म्हणून लढत होती स्त्री उमेदवार हिलरी क्लिंटन आणि कृष्णवर्णीय उमेदवार बराक ओबामा यांच्यात. मोठ्या कौशल्याने स्वत:चे श्रेष्ठत्व सिद्ध केलेल्या या ओबामाने राष्ट्राध्यक्षपदी प्रथम कृष्णवर्णीय उमेदवार आणि प्रथमच अल्पसंख्य उमेदवार म्हणून आत्ताच इतिहास केला आहे. राष्ट्राध्यक्ष होईल का नाही ते नोव्हेंबरच्या पहील्या आठवड्यात गोंधळ झाला नाही तर समजेल! ओबामाला बहुसंख्य कृष्णवर्णीयांचा नक्कीच पाठींबा होता आणि राहीला तर त्यात आशर्य नाही. ज्या समाजाला शतकानूशतके अनन्वित अत्याचार सहन करावे लागले त्या समाजाच्या दृष्टीने ही मानाची, अभिमानाची आणि राजकीय स्वत्व पूर्णत्वाला नेण्याची संधी आहे. तरी देखील हे होत असताना, अत्यंत सभ्य पद्धतीने अमेरिकन समाजात द्वेष निर्माण होईल असे वक्तव्य न करता, आणि तसे वक्तव्य करणार्या आपल्या स्वकीयांना दुर लोटून, ही निवडणूक लढवताना ओबामा अमेरिकन समाजात स्वत्:चे स्थान उंचावत आहे. यातून आपल्याक्डेही बरेच काही घेण्यासारखे आहे असे वाटते. सर्वप्रथम राजकीय तडजोड ही ओबामा विसरले नाहीत आणि त्याच वेळेस आपल्या वर्तनातून जाणारा संदेश हा उच्चश्रेणीचाच असेल आणि एखाद्या आदर्श नेतृत्वाचाच वाटू शकेल याची त्यांनी काटेकोर काळजी घेतली. परीणामी त्यांचे वर्तन हे केवळ त्यांनाच मोठे नाव देत नाही आहे तर त्यातून नवीन आणि नव्याने दर्या निर्माण होत नाही आहेत. अशा दर्या - सामाजीक, राजकीय, आर्थिक कुठल्याही असोत त्या निर्माण न करता आपण जिथे जे काम करत आहोत त्यातून बरेच काही चांगले निर्माण करू शकतो.
राणे, आमटे, ऑलिंपिक्समधील खेळाडू आणि ओबामा या विविध वृत्ती आहेत ज्या व्यक्ती म्हणून सध्याच्या वर्तमानात बातम्या झाल्या. काही कालांतराने त्यातील काही काळाच्या उदरात गडप होतील तर काही या मंद दिव्याच्या प्रकाशाप्रमाणे अंधारात मार्ग दाखवतील तर काही जगभर परीणाम होऊ शकतील असा इतिहास घडवू शकतील. माध्यमांचे कर्तव्य आहे की त्यातून घेण्यासारखे काय आहे ह्याचे प्रामाणिक विश्लेषण करणे. तर तुम्हाआम्हासारख्या जनसामान्यांचे कर्तव्य आहे की नीरक्षीर वृत्तीने त्यातील जे काही चांगले वाटते ते यथाशक्ती आत्मसात करणे अथवा किमान ते जनसामान्यांपर्यंत पोचवणे.
पाहुणा संपादक : विकास.
वाचन
6647
प्रतिक्रिया
0