भीतीच्या भिंती: ७. कोपरा

आतिवास's picture
आतिवास in जनातलं, मनातलं
7 Jun 2015 - 4:24 pm

भाग , , , , ,
स्त्री-पुरुष समतेच्या प्रवासात ‘खास स्त्रियांसाठी असणा-या सोयी’ हा विरोधाभास नसतो, तर समतेच्या वाटचालीतला तो एक अपरिहार्य टप्पा असतो – हे भाषणातलं वाक्य वाटतं खरं; पण तसं नाही. अनेक प्रवास एकटीने करताना ‘प्रश्न फक्त माझ्या क्षमतेचा नसून सभोवतालच्या लोकांच्या संवेदनशीलतेचा देखील असतो’ असा आजवरचा अनुभव. त्यामुळे दिल्लीत मी राहायला गेल्यावर आठवडाभरात ‘दिल्ली मेट्रो’ स्त्रियांसाठी वेगळं कंपार्टमेंट (मेट्रोचा ‘डबा’ हे काही योग्य वाटेना म्हणायला!) घोषित केलं; तेव्हा मला आनंद झाला होता. स्वत:च्या मर्यादा ओळखायची ही सवय जाचक असते अनेकदा, पण किंमत मोजायची तयारी नसते माझी; तेव्हा इलाज नसतो.

रोज फक्त ऑफिस ते घर; ठराविक रस्ता; तेच सुरक्षा रक्षक; तीच माणसं; बोलायचे तेच विषय; रस्त्यात दिसणारे तेच रणगाडे; ऑफीसच्या कोप-यातून दिसणारा आकाशाचा तोच तुकडा; भिरभिरणारी तीच हेलिकॉप्टर्स; तेच सायरन आणि रोजचे तेच ते सुरक्षा संदेश! संध्याकाळी ‘पाचच्या आत घरात’. नाविन्य काही ते नाहीच.

शिवाय सोबत आणिक एक वेगळंच द्वंद्व. आजवरचं आयुष्य भेदभाव जोपासणा-या रूढी-परंपरांशी झगडण्यात गेलं; इथं मात्र ‘स्थानिक संस्कृतीबद्दल आदर’ म्हणत डोकं “हिजाब”मध्ये झाकून वावरत होते – त्याचाही मानसिक ताण होता. ‘हिजाब’ म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं तर ‘डोकं आणि छाती झाकणारं वस्त्र’. ओढणी वापरायची सवय असल्याने तसा त्रास नव्हता म्हणा. पण ‘हिजाब’ म्हणजे स्त्रीच्या सभ्यतेचं प्रतिक – असलं एक संभाषणवजा भाषण ऐकून एक दिवस वैतागाच्या भरात मी “हिजाब” वापरला नाही; तर गाडीच्या काचेवर सणसणीत दगड आला. प्रतिक्षिप्त क्रियेने मी खाली वाकले. गाडी बुलेटप्रुफ नसती, तर माझ्या डोक्याचा नेम अचूक साधला गेला असता. तिथल्या वातावरणात ही अगदीच किरकोळ गोष्ट. पण क्षणभर मी हादरले, हे कबूल करायला हवं.

माझ्यासमोर पर्याय असतात तेव्हा निर्णयस्वातंत्र्याची शेखी मला मिरवता येते. पण नियम मोडायची किंमत “मृत्यू” असेल तर? विचार आणि व्यवहाराचं स्वातंत्र्य ही आज अनेकांसाठी फक्त एक कविकल्पना आहे हे भयावह सत्य काबूलमधील वास्तव्यात समोर आलं आणि तिथल्या स्त्रियांची (आणि एकंदर समाजाचीही) कोंडी काही अंशी मला समजली.

एक दिवस “हंगामा”शी (ही माझी सहकारी) बोलत होते. “मला काही उद्योग/व्यवसाय करणा-या स्त्रियांना भेटायचं आहे” असं मी तिला सांगत होते. ती म्हणाली, “तू अजून बाग-ए-जनानात गेली नाहीस का? असं करू, परवा सकाळी जाऊया. मीही खूप दिवसांत गेले नाही तिकडे. परवानगी वगैरे मी काढते सगळी, तू फक्त तयार राहा नऊ वाजता.”

काहीतरी नवं घडणार तर इथल्या आयुष्यात याचा मला आनंद झाला. मी हनीफला (हा बांगलादेशचा) म्हटलं, “तुला पण यायचं असलं तर चल तर माझ्या सोबत बाग-ए-जनानात.” त्यावर हंगामा हसून म्हणाली, “त्याला नाही इतक्या सहज येता येणार तिथं. त्याचं काही काम असलं तरच त्याला प्रवेश मिळेल, तोही ‘महिला मंत्रालया’च्या लेखी पूर्वपरवानगीने. ही बाग फक्त स्त्रियांसाठी आहे.” ही माहिती मला रोचक वाटली.
*****
नेहमीप्रमाणे बंदूकधारी सैनिकांच्या पहा-यातून आम्ही बागेत प्रवेश केला. संबंधित खात्याच्या शासकीय अधिकारी सोबत असल्याने आमची ‘सुरक्षा तपासणी’ झाली नाही कदाचित त्यामुळेच आम्हाला प्रवेशिकाही विकत घ्यावी लागली नाही. अन्यथा दहा अफगाण (आणि स्त्रियांच्या सोबत येणा-या १२ वर्षांपेक्षा लहान मुलींना आणि मुलांना पाच अफगाण) प्रवेश शुल्क आहे. गुरुवार-शुक्रवारी इथं गर्दी असते, आज मंगळवार असल्याने गर्दी कमी आहे पण अगदी शुकशुकाट नाही. तरुण मुलींचे, प्रौढ स्त्रियांचे छोटे गट दिसताहेत; हसण्याचे आवाज येताहेत; संगीत कानांवर पडतंय. वातावरणात एक निवांतपण आणि मोकळेपणा आहे. या भिंतीच्या शहरात अशीही एक जागा आहे तर! अशी एक जागा जिथं स्त्रियांना चेहरा लपवण्याची गरज नाही. माझ्याही नकळत मी एक दीर्घ श्वास घेतला.

wg

प्रथमदर्शनी बाग मला खूप आवडली. स्वच्छता आहे, शांतता आहे, सावली आहे, बसायला पुरेसे बाक आणि तेही चांगल्या स्थितीत आहेत. भरपूर झाडं आहेत. शिवाय उगीच शेरेबाजी करणारे, विखारी नजरेनं पाहणारे पुरुष (कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी येणारा हा सर्वसामान्य अनुभव- मात्र जगातल्या सर्व पुरुषांबद्दलची ही नोंद नाही) नाहीत. पुस्तक वाचत बसायला, नुसतं निवांत बसायला मस्त जागा आहे ही! तेरा एकरांची ही जागा. चारी बाजूंनी बंदिस्त; पण आता भवताली उभ्या राहणा-या इमारती या जागेच्या मूळ उद्दिष्टासाठी प्रश्नचिन्हं ठरताहेत.

wg2

ही जागा एके निसर्गरम्य स्थळ होतं काबूलमधलं. पण मुजाहिद्दीन, तालिबान, यादवी या काळात त्याची प्रचंड नासधूस झाली आणि कालांतराने तिथं कचरा डेपो झाला.

मुजाहिद्दीन आणि तालिबान या दोन्ही काळांत स्त्रियांच्या सार्वजनिक वावरावर, स्त्रियांच्या जगण्यावर अनेक निर्बंध लादले गेले. स्त्रियांनी शिकायचं नाही, अर्थार्जन करायचं नाही, संगीत ऐकायचं नाही, कुटुंबातील प्रौढ पुरुषाची सोबत असल्याविना रस्त्यावर यायचं नाही, पुरुष डॉक्टरकडून तपासून घ्यायचं नाही (आणि स्त्रियांनी वैद्यकीय व्यवसाय करायला बंदी!), शरीर नखशिखान्त झाकणारा बुरखा वापरायचा, सौंदर्यप्रसाधनांच्या वापरावर बंदी, क्रीडासहभागावर बंदी..... – असले अमानुष नियम. (इथं सविस्तर यादी आहे). स्त्रियांसाठी पूर्ण देशच तुरुंग झाला. नियमाविरुद्ध बंड करण्याची शिक्षा एकच – मृत्यू. तुम्ही, तुमचा भाऊ, तुमचे वडील, तुमचा नवरा, तुमचा मुलगा यांपैकी कुणीही – कदाचित सगळेही मारले जाऊ शकतात. आहे तयारी?

२००२-०३ च्या सुमारास युएसएड (USAID) च्या आर्थिक मदतीतून या जागेचं पुनरुज्जीवन झालं. यात पुढाकार घेतला तो ‘महिला मंत्रालयाने’ आणि इतर अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी मदत केली. इथं काम करणा-या मजूरांत ५० टक्के स्त्रिया होत्या. हंगामासारख्या अनेक स्त्रिया झाडं लावण्याच्या कामात (विनावेतन) सहभागी झाल्या. विध्वंसातून झालेल्या या निर्मितीशी स्थानिक स्त्रियांचं एक हृद्य नातं आहे याचा प्रत्यय हंगामाच्या चेह-याकडे पाहून येत होता.

‘बाग-ए-जनाना’त स्त्रिया विविध कारणांसाठी येतात. कुणी संगणक शिकायला येतं (फेसबुक वापरणा-या अफगाण मुलींचे चमकणारे डोळे मला आजही आठवतात); तर कुणी ड्रायव्हिंग शिकायला. कुणी साक्षरता वर्गात येतं; तर कुणी शिवणकाम शिकायला, तर कुणी इंग्लीश शिकायला. कुणी व्यायामशाळेचा लाभ घेतं तर कुणी इथल्या खाद्यपदार्थांच्या आस्वादात मग्न असतं; कुणी मैत्रिणींच्या घोळक्यात ‘मन की बात’ सांगत असतं. काही शैक्षणिक उपक्रम मोफत आहेत आणि बाकीच्यांसाठी नाममात्र शुल्क आहे.

बाजार
स्त्रिया आणखी एका गोष्टीसाठी इथं येतात – ती म्हणजे खरेदी! या बागेत वीस दुकानं आहेत, आणि ती सर्व स्त्रियाच चालवतात. विक्रेत्याही स्त्रिया आणि ग्राहकही स्त्रिया. कपडे, लाकडी खेळणी आणि शोभेच्या वस्तू, सौंदर्यप्रसाधनं, घरगुती वापराच्या अनेक वस्तू (पायपुसणी, झाडू, हँगर इत्यादी), गालिचे अशा विविध वस्तू आकर्षकरीत्या मांडलेली दुकानं आहेत. काही शिलाई दुकानं आहेत. इथल्या सर्व कर्मचारी स्त्रियाच आहेत. कच्चा माल आणला जातो तो मुख्यत्वे दिल्ली आणि कराचीतून. सकाळी साडेसातला दुकानं उघडतात आणि दुपारी चार वाजता बंद होतात. दिवसभर इथं थांबायचं असल्याने या स्त्रिया दुपारचं जेवण इथं बनवतात – त्यामुळे वातावरण एकंदर ‘सहली’ सारखं वाटत होतं मला. ‘आम्ही आमच्या कुटुंबासाठी कमावतोय’ असा सार्थ (आणि सकारण) अभिमान त्यांच्याशी बोलताना जाणवला – एक मस्त अनुभव होता तो.

महिला मंत्रालयाकडे या जागेचे प्रशासकीय अधिकार आहेत. वीस दुकानदार स्त्रिया सरकारला भाडं देतात – ते महिना २५०० ते ३६०० अफगाण आहे. त्यात पाणी आणि सुरक्षा व्यवस्था आहे, विजेचं बील आपापलं भरायचं. बरीच दुकानं दहा वर्षांपासून इथं आहेत. ब-याच स्त्रिया इथं दुकान चालवतात आणि त्यांच्या घरचे पुरुष खुल्या बाजारात दुकान चालवतात. गरीब आणि दुसरी कोणतीही उपजीविका नसलेल्या स्त्रीला इथं दुकान चालवायला मिळण्याची शक्यता जवळजवळ शून्य. स्पर्धेत इथली मोक्याची जागा टिकवून ठेवायचं म्हटलं की भ्रष्टाचार होणं ओघानं आलं. इथल्या स्त्रियांशी पुढं तीन-चार वेळा चर्चा झाल्या तेव्हा हा मुद्दा ठासून मांडला गेलाही.

सरकारतर्फे जी विविध प्रदर्शनं भरवली जातात त्यात या स्त्रिया सहभागी होतात. काबूलमधले शेकडो-हजारो परदेशी कर्मचारी हे यांचं मुख्य ग्राहक. त्यामुळे इथल्या बहुसंख्य दुकानदार स्त्रियांकडे ‘विजीटिंग कार्ड’ आहेत. त्यावर फोन नंबर आणि ईमेल आयडीही आहेत. इमेल अर्थात घरातले पुरुष वापरतात. मोबाईल मात्र सर्वजणी वापरताना दिसल्या. २०१४च्या निवडणुकीनंतर बहुतेक विदेशी कर्मचारी परत जातील, मग खरेदी कोण करणार – ही व्यावसायिक चिंता इथं सगळ्यांना भेडसावते आहे. या स्त्रियांपुढेही हा प्रश्न आहेच.

इथं ‘बाग-ए-खजाना’चं कार्यालय आहे. अफगाणिस्तानमधल्या महिला उद्योजकांची ‘सबाह’ (सभा) ही असोसिएशन २००५ पासून कार्यरत आहे.

sabha

शिवणकाम, एम्ब्रॉयडरी आणि फूड प्रोसेसिंग अशा तीन क्षेत्रांत त्यांनी आजवर सुमारे दोन हजार स्त्रियांना प्रशिक्षण दिलं आहे. प्रशिक्षणोत्तर प्रत्यक्ष व्यवसाय करण्यातही ‘सभा’ स्त्रियांना मदत करते. मी ‘इंदी’ (म्हणजे हिंदी) आहे हे कळल्यावर इथल्या तरुण प्रशिक्षक माझ्याशी उत्साहाने ‘सिवा’ प्रॉजेक्टबद्दल बोलायला लागल्या. मला काही केल्या ‘सिवा’ शब्दाचा संदर्भ लागत नव्हता. काही काळाने उजेड पडला. त्या इलाबेन भट यांच्या ‘सेवा’ संस्थेबद्दल बोलत होत्या. ‘सार्क’ देशांच्या अंतर्गत जे अनेक कार्यक्रम चालतात त्यात अफगाण स्त्रियांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचे उत्तम कार्य ‘सेवा’ करते. इथल्या अनेक प्रशिक्षक अहमदाबादमध्ये राहून आल्यात; त्यांना ढोकळा आणि खाकरा माहिती आहे. पुढे मझार-ए-शरीफमध्ये एकीने मला तिचं प्रमाणपत्रही दाखवलं. ते पाहताना मला खूप बरं वाटलं.

certi

बाग-ए-जनानात एकाही दुकानदार स्त्रीने मला फोटो काढायला परवानगी दिली नव्हती (मी त्यांच्या निर्णयाची कारणमीमांसा समजू शकते.) इथं मात्र या तरुण मुलींनी मला आग्रहाने फोटो काढायला लावला.

girls

मग आम्ही तिथल्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन खास माझ्यासाठी बनवलेली शाकाहारी बलोनी (किंवा बलुनी - balooni) खाल्ली.

bln

प्रतिकूल परिस्थितीत केवळ तग धरायची नाही; तर आनंदाने जगायची कला अनेकांना अवगत असते हे खरं. अफगाण स्त्रियांच्या सकारात्मक वृत्तीला तोड नाही. त्यांना खूप काही शिकायचं आहे, खूप काही करायचं आहे हे सतत जाणवत राहतं.
जागतिकीकरणाच्या रेट्यात त्या कशा टिकतील? अफगाणिस्तान सरकार प्रत्येक प्रांतात एक ‘बाग-ए-जनाना’ निर्माण करतेय ही चांगली बाब आहे, पण ती पुरेशी नाही. प्रश्न फक्त या स्त्रियांच्या क्षमतांचा नाही. खुल्या स्पर्धेला तोंड द्यायला या स्त्रिया तयार आहेत, खुला बाजार त्यांना सामावून घ्यायला, त्यांना स्पर्धेत उतरू द्यायलाही तयार नाही असं दिसतं. तो बदल कसा घडवून आणणार? स्त्रियांना उपदेश करणं सोपं आहे तुलनेनं; जे स्त्रियांच्या वाटचालीत बाधा आणतात त्यांच्याबाबत आपण काय करणार आहोत?

हा प्रश्न अफगाणिस्तान सरकारला आणि समाजाला जितका आहे तितकाच तो भारतीय सरकारला आणि भारतीय समाजालाही आहे. स्त्रियांसाठी असा ‘खास कोपरा’ जेव्हा निर्माण करावा लागतो तेव्हा आपला पल्ला दूर आहे याची पुन्हा एकदा जाणीव होते. तोवर ‘बाग-ए-जनाना’ गरजेचा आहे. तोही बंदिस्त आहे, तरीही! पूर्ण शहरात तो फक्त एक कोपरा आहे; जिथवर कदाचित सगळ्या स्त्रिया पोचू शकत नाहीत, तरीही!!
क्रमशः

भीतीच्या भिंती: ८. मॉक ड्रिल

समाजदेशांतरअनुभव

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

7 Jun 2015 - 4:39 pm | मुक्त विहारि

पुभाप्र

ज्ञानोबाचे पैजार's picture

7 Jun 2015 - 4:39 pm | ज्ञानोबाचे पैजार

हा भागही आवडला.
लवकर लवकर पुढचे भाग टाका.

फक्त स्त्रीयांसाठी राखीव बाग ही रोचक कल्पना आहे.

आणि ही बाग आपल्या नेहमीच्या बागेसारखी (उदा. सारसबाग) नाही हे अजुन विशेष.

पैजारबुवा,

यशोधरा's picture

7 Jun 2015 - 4:58 pm | यशोधरा

वैतागाच्या भरात मी “हिजाब” वापरला नाही >> ह्या धाडसाचं मनापासून कौतुक.

तुमचं सगळंच लिखाण मला अतिशय आवडतं, पण ह्या लेखाला पहिला क्रमांक देईन! अतिशय संयत आणि संवेदनाशील असा हा लेख उतरलाय. इतक्या देखण्या लेखासाठी अनेक आभार. अजून लिहा.

आतिवास's picture

16 Jun 2015 - 7:02 pm | आतिवास

धाडस कसलं?
मूर्खपणा होता तो त्या परिस्थितीत!

हा भाग खूप आवडला. असंही काही अस्तित्वात असू शकतं असा विचारच कधी केला नव्हता.

बाकी हिजाब न वापरल्यामुळे दगड म्हणजे......असोच्च. :(

विवेकपटाईत's picture

7 Jun 2015 - 5:04 pm | विवेकपटाईत

जुन्या दिल्लीत ही पूर्वी रेल्वे स्टेशन जवळ एक जनाना बाग होता. (१९८० च्या आधी).

तशी बडोद्यातही (की उदयपूर - नेमकं आठवत नाही आता!) खास स्त्रियांसाठी असलेली एक बाग पाहिल्याचं आठवतं. ती अर्थातच ''संस्थान" काळातली होती. अफगाण "बाग-ए-जनाना" मनोरंजनाच्या पल्याडही बरंच काही आहे.

हाहि भाग छान अतिवास.आणि हिजाब न वापरण्याचे धाडस.बापरे!
खास स्त्रियांसाठी असलेली बाग उदयपुरला आहे.विविध प्रकारच्या पावसाच्या आवाजाची अनुभुती देणारी कारंजी असलेली हि बाग राजकन्येसाठी बांधली होती.आता मात्र सर्वांसाठी खुली आहे.

एस's picture

7 Jun 2015 - 5:41 pm | एस

आत्ता फक्त वाचल्याची पोच. सविस्तर प्रतिसाद लवकरच देईन.

जेपी's picture

7 Jun 2015 - 5:57 pm | जेपी

सगळे भाग वाचतोय.
या लेखातील शेवटचा पॅरा बरच काही सांगुन गेला.
"स्रियांसांठी असा खास कोपरा जेंव्हा निर्माण करावा लागतो,तेंव्हा आपला पल्ला दुर आहे याची पुन्हा एकदा जाणीव होते."

बहुगुणी's picture

7 Jun 2015 - 6:14 pm | बहुगुणी

या लेखातील शेवटचा पॅरा बरंच काही सांगुन गेला.
"स्रियांसाठी असा खास कोपरा जेंव्हा निर्माण करावा लागतो,तेंव्हा आपला पल्ला दुर आहे याची पुन्हा एकदा जाणीव होते."

अचूक!

सुधीर's picture

7 Jun 2015 - 6:09 pm | सुधीर

शेवटचा रोख अनहिता कडे तर नाही ना? :)
खरं तर पुरुष प्रधान संस्कृतीत वाढल्यामुळे छोटे छोटे मुद्दे जोपर्यंत दुसरा दाखवून देत नाही तो पर्यंत त्यात काही वावगं असं वाटत नाही. काही महिन्यांपूर्वी चतुरंग मध्ये "संस्कृती की हक्क" हा लेख वाचला तेव्हा ते प्रकर्षाने जाणवलं. असो, "पल्ला दूर आहे याची पुन्हा एकदा जाणीव होते" हे अगदी १००% खरय.

आदूबाळ's picture

7 Jun 2015 - 6:58 pm | आदूबाळ

अतिशय छान, पण अंगावर काटा आणणारा भाग. हिजाब नाही म्हणून दगड - याचं वैषम्य तर आहेच, पण उलीसं स्वातंत्र्य मिळवायची किंमत ghettoisation आहे, हे फार वाईट, आणि केवढा विरोधाभास!

सभ्य माणुस's picture

7 Jun 2015 - 8:54 pm | सभ्य माणुस

अफगाणिस्तानात "महिला मंत्रालय" आहे हे ऐकुनच समाधान वाटले. अशी(महिला मंत्रालयाची) अपेक्षाही केली नव्हती कधी. बाकी बाग-ए-जनाना बद्दल वाचून धन्य झाल्यागत वाटले.

बाग ए जनानाच्या निमित्ताने निदान काही काळ कुठेतरी बाग फुलते आहे याचे थोडेफार समाधान.
शेवट विचारात पाडुन गेलाय.
हिजाबच्या उल्लेखाने काटा आला अंगावर.काम संपवुन परतताना घृणा वाटायला लागली का हिजाबची?

आतिवास's picture

16 Jun 2015 - 7:06 pm | आतिवास

घृणा नाही.
कारण मला पर्याय होता.
तो ज्यांना नसतो त्यांची चिंता वाटते. परंपरेविरोधात बंड न करण्याची मानसिकता मला त्यामुळे वेगळ्या दृष्टिकोनातून समजली.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Jun 2015 - 11:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

वस्तुस्थितीचे संयत वर्णन ! म्हणुनच ही लेखमाला आवडते आहे ! हेजाबच्या मागे लपलेल्या एका कर्मठ संस्कृतीची तोंडओळख होते आहे.

पुभाप्र.

श्रीरंग_जोशी's picture

7 Jun 2015 - 11:36 pm | श्रीरंग_जोशी

अफगाणिस्तानातील एकंदरित परिस्थिती पाहता स्त्रियांसाठीच यशस्वीपणे चालवला जात असलेला हा उपक्रम पाहून समाधान वाटलं. अनुभवकथन नेहमीप्रमाणेच संयत.

इतरांना शेवटच्या परिच्छेदातल्या विधानाचा रोख मिपावरील अनाहिता विभागाकडे असण्याची शकत्यता वाटत असली तरी मला तसे काही वाटले नाही.

एक अवांतर प्रश्न - अफगाणिस्तान व अफगाण यांचा उच्चार स्थानिक लोक अफगानिस्तान व अफगान असा करतात का?

तुषार काळभोर's picture

12 Jun 2015 - 2:39 pm | तुषार काळभोर

शेवटच्या परिच्छेदाचा रोख 'थेट' अनाहिताकडे नसेलही. तो अशा सर्व मनोवृत्तींकडे आहे, ज्यामुळे 'त्यांच्या'साठी मध्ये पडदा टाकून स्वतंत्र व्यवस्था करावी लागते.

(अवांतरः बुरखा/हिजाब याची मूळ-प्राचीन-प्रारंभिक गरज अशीच(म्हणजे पडदा असणे)असेल काय)?)

आतिवास's picture

16 Jun 2015 - 7:11 pm | आतिवास

तो अशा सर्व मनोवृत्तींकडे आहे, ज्यामुळे 'त्यांच्या'साठी मध्ये पडदा टाकून स्वतंत्र व्यवस्था करावी लागते.

अफघानिस्तान - असा उच्चार ऐकला आहे जास्त वेळा.
विविध भाषांमधले उच्चार जाणून घेण्यासाठी ही एक उपयुक्त जागा आहे. रजिस्ट्रेशन आणि वापर विनाशुल्क आहे.

श्रीरंग_जोशी's picture

16 Jun 2015 - 7:30 pm | श्रीरंग_जोशी

धन्यवाद, उत्तरासाठी व या दुव्यासाठीही.

अनुप ढेरे's picture

8 Jun 2015 - 10:43 am | अनुप ढेरे

आवडला लेख!

अरुण मनोहर's picture

8 Jun 2015 - 10:53 am | अरुण मनोहर

तुमचे लेख मी नेहमीच आवडीने वाचतो. या वेळीस बरच उशीराने लेख आला. पण वाट पहाण्याची घालमेल इतका छान लेख वाचल्यावर पळून गेली.
सुरवातीचे पॅरा वाचल्यावर तुम्ही आता दिल्लीत रहायला आलात की काय असा गैरसमज झाला, त्यामुळे क्षणभर हा लेख दिल्ली विषयी आहे असे वाटून खूप आच्छर्य वाटले. दोन पॅरा मधे काही लिहायचे राहून गेले आहे कां?

त्यामुळे दिल्लीत मी राहायला गेल्यावर आठवडाभरात ‘दिल्ली मेट्रो’ स्त्रियांसाठी वेगळं कंपार्टमेंट (मेट्रोचा ‘डबा’ हे काही योग्य वाटेना म्हणायला!) घोषित केलं; तेव्हा मला आनंद झाला होता. स्वत:च्या मर्यादा ओळखायची ही सवय जाचक असते अनेकदा, पण किंमत मोजायची तयारी नसते माझी; तेव्हा इलाज नसतो.

रोज फक्त ऑफिस ते घर; ठराविक रस्ता; तेच सुरक्षा रक्षक; तीच माणसं; बोलायचे तेच विषय; रस्त्यात दिसणारे तेच रणगाडे; ऑफीसच्या कोप-यातून दिसणारा आकाशाचा तोच तुकडा; भिरभिरणारी तीच हेलिकॉप्टर्स; तेच सायरन आणि रोजचे तेच ते सुरक्षा संदेश! संध्याकाळी ‘पाचच्या आत घरात’. नाविन्य काही ते नाहीच.

आतिवास's picture

16 Jun 2015 - 6:58 pm | आतिवास

दोन पॅरा मधे काही लिहायचे राहून गेले आहे कां?
नाही.
मी महिलांसाठी असणा-या खास सोयी परिस्थितीनुसार वापरते - इतकंच सांगायचं होतं - मला बहुधा ते नीट सांगता आलं नाही.

मधुरा देशपांडे's picture

8 Jun 2015 - 2:10 pm | मधुरा देशपांडे

नियमाविरुद्ध बंड करण्याची शिक्षा एकच – मृत्यू.
किती भयंकर आहे. बाकी लेख नेहमीप्रमाणेच आवडला.

तुमचे कौतुक करायला खरोखर शब्द कमी पडताहेत. म्हणजे कौतुक नेमकं कुठल्या गोष्टीचं करू. अगदी वेगळ्याच देशात जाउन, तिथल्या संस्कृतीत सामावून जात काम करण्याच्या हिमतीचं, इतक्या भीतीच्या वातावरणात सुद्धा लक्ख जाग्या असलेल्या तुमच्या निरीक्षण-शक्तिचं की तुमच्या अप्रतिम लेखन्शैलिचं.
तुमचे अनुभव आमच्याबरोबर शेयर केल्याबद्दल अगदी मनापासून तुमचे आभार..

मित्रहो's picture

8 Jun 2015 - 2:14 pm | मित्रहो

इतर लेखांप्रमाणेच हा लेख देखील आवडला.

स्त्रियांसाठी असा ‘खास कोपरा’ जेव्हा निर्माण करावा लागतो तेव्हा आपला पल्ला दूर आहे याची पुन्हा एकदा जाणीव होते.

सहमत

नेहमीप्रमाणेच उत्तम लेख. एका अनोळखी जगाची ओळख.

नुसते नाव पाहूनच ज्यांचे लेख आवर्जून वाचले जातात,काही वेगळी अनुभूती देतात त्यात आतिवास यांचा नंबर खूप वरचा आहे.

रुस्तम's picture

9 Jun 2015 - 8:12 pm | रुस्तम

सहमत

भडकमकर मास्तर's picture

9 Jun 2015 - 2:43 am | भडकमकर मास्तर

छान लेखमाला... स्वातन्त्र्याच्या प्राथमिक बाबी आपण किती गृहित धरतो; याची जाणीव असा लेख वाचल्यावरच होते...

रुपी's picture

9 Jun 2015 - 3:53 am | रुपी

तुमचे अनुभव आणि ते शब्दांत मांडण्याची तुमची हातोटी यांमुळे तुमचे लेखन अगदी आवर्जून वाचावे असे असतात.

जुइ's picture

9 Jun 2015 - 8:07 pm | जुइ

समाधानाची गोष्ट अशी की निदान परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तुमच्या धाडसाला सलाम!!

भाग्यश्री कुलकर्णी's picture

9 Jun 2015 - 11:50 pm | भाग्यश्री कुलकर्णी

भावला मनाला हा लेख.

मदनबाण's picture

10 Jun 2015 - 11:52 am | मदनबाण
काव्यान्जलि's picture

10 Jun 2015 - 3:53 pm | काव्यान्जलि

खूप छान. डोळ्यात पाणी आलं एकदम!! आधीचे सगळेच भाग खूप छान लिहिलेत तुम्ही.
शेवटच वाक्य खास करून भावलं.
"स्त्रियांसाठी असा ‘खास कोपरा’ जेव्हा निर्माण करावा लागतो तेव्हा आपला पल्ला दूर आहे याची पुन्हा एकदा जाणीव होते."
अगदी खर आहे.

अतिशय सुंदर असे लेख. हाही भाग आवडला.
लेख वाचताना त्या वेगळ्या जगाला भेट दिल्यासारखं वाटतं.
छानच!!

नाखु's picture

12 Jun 2015 - 2:04 pm | नाखु

नक्की आवर्जून वाचण्यासारखी एक सुंदर लेखमाला..
वास्तव किती दाहक आणि कटू असते हे जवळून अनुभवूनही तटस्थता (त्रयस्थता नव्हे)लिखाण ही अत्यंत विलक्षण बाब आपण कसोशीने पाळली आहे हेही मला फार भावले.

वाचक नाखु

मास्टरमाईन्ड's picture

12 Jun 2015 - 2:35 pm | मास्टरमाईन्ड

आवडला लेख.

मी ‘इंदी’ (म्हणजे हिंदी) आहे हे कळल्यावर इथल्या तरुण प्रशिक्षक माझ्याशी उत्साहाने ‘सिवा’ प्रॉजेक्टबद्दल बोलायला लागल्या. मला काही केल्या ‘सिवा’ शब्दाचा संदर्भ लागत नव्हता.

हे मजेशीर.
माझी एक इराणी मैत्रीण पण असेच काहीसे शब्द वापरून एखादं पाव किंवाटाकायची हिंदी वाक्यं टाकायची

मंजूताई's picture

12 Jun 2015 - 3:24 pm | मंजूताई

तुमची लेखमाला आवडीने वाचते ..पुभाप्र...

कौशिकी०२५'s picture

12 Jun 2015 - 5:06 pm | कौशिकी०२५

अप्रतिम लेखमालिका. खरंतर अप्रतिम तरी कसं म्हणू! कारण प्रत्येक लेखात त्या त्या ठिकणची प्रतिमा उभी राह्तेय डोळ्यांसमोर. आत्ताच सर्व भाग वाचले... अशा अनुभव घेण्याच्या उत्सुकतेला, ते इतक्या परिणामकारकतेने, ओघवते मांडायच्या कौशल्याला खरंच ____/\____

कौशिकी०२५'s picture

12 Jun 2015 - 5:07 pm | कौशिकी०२५

आणि हो...पुभाप्र..

पैसा's picture

12 Jun 2015 - 10:39 pm | पैसा

लिखाण उत्तम नेहमीप्रमाणेच. सगळं आवडलं तरी कसं म्हणू? काबूलमधे काही महिलांसाठी जनाना बाग आहे. पण एवढ्या मोठ्या पसरलेल्या अफगाणिस्तानचं काय?

हे हिजाब आणि बुरख्याचं नाटक आपल्याला कळण्यापलिकडचं आहे. दोन तीन वर्षांच्या मुस्लिम मुलींना इथे गोव्यातसुद्धा हिजाब घेतलेले पाहते तेव्हा मलाच घुसमटल्यासारखं वाटतं.

आतिवास's picture

15 Jun 2015 - 12:47 pm | आतिवास

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार.
भाग ८

खास महिलांसाठी बाग हि कल्पना खूप छान आहे पण आजच्या युगात अशी बाग असणे हे समाजाच्या दृष्टीने मागासलेपणाचे च लक्षण आहे.

चिगो's picture

29 Oct 2015 - 1:42 pm | चिगो

अत्यंत संयत लेख.. जे स्वातंत्र्य आपण गृहीत धरुन चालतो, तेपण कित्येकांसाठी 'लक्झरी' आहे, हा विचार नव्याने टोचला..

स्त्रियांसाठी असा ‘खास कोपरा’ जेव्हा निर्माण करावा लागतो तेव्हा आपला पल्ला दूर आहे याची पुन्हा एकदा जाणीव होते.

१००% सहमत..